माझा नगरचा मित्र (आणि पक्षिमित्र) मिलिंद बेंडाळे याच्या आग्रहावरून तो, मी आणि अभिजित पेंढारकर असे आम्ही तिघं मार्च 2002 मध्ये भरतपूरच्या केवलदेव घना राष्ट्रीय पक्षी अभयारण्यात फिरायला गेलो होतो. मी आणि पेंढारकर एक दिवस जयपूरही पाहून आलो. नंतर येताना आम्ही आग्र्यात ताजमहाल पाहिला. आठ दिवसांची ही ट्रिप मस्त झाली. त्याचीही डायरी माझ्याकडं आहे. ती ब्लॉगवर शेअर करतोय. या ट्रिपला पार्श्वभूमी होती ती गोध्रा हत्याकांड आणि गुजरात दंगलींची.... अर्थात आम्ही आमची ट्रिप व्यवस्थित पूर्ण केली... मला खात्री आहे, तुम्हालाही ही डायरी आवडेल...
-----
शुक्रवार, १ मार्च २००२
-----
शुक्रवार, १ मार्च २००२
-------------------------
सकाळी पावणेआठ वाजता संतोष आला, तेव्हा उठलो.
तेवढ्यात पेपरवाले ब्रह्मे आले. त्यांना उद्यापासून नऊ तारखेपर्यंत पेपर टाकू नका,
असं सांगितलं. मग पेपर वाचले. बजेट व गुजरातच्या हिंसाचाराचं आमचं (‘सकाळ’चं) कव्हरेज
सगळ्यांत चांगलं झालं होतं. नंतर मी व संतोष पर्वतीला गेलो. तिथून आल्यावर ‘अंबिका’त चहा
प्यायलो. मग संतोष गेला. मी रूमवर येऊन आवरलं. पाणी तापवून आंघोळ केली. बाहेर पडलो.
कल्पक भेटला. त्यानं सगळी दुकानं बंद असल्याचं सांगितलं. मला ‘कॉम्बीफ्लाम’च्या
गोळ्या आणायच्या होत्या. मग कल्पकबरोबर दुसऱ्या दुकानात जायला निघालो. तेवढ्यात राम
जगताप भेटला. तो माझ्याकडंच यायला निघाला होता. मग कल्पकला सोडून त्याच्याबरोबर रूमवर
आलो. त्याआधी समोरच्या मेडिकलमध्ये (ते उघडंच होतं) जाऊन पेनकिलर गोळ्या, सेल व
तेलाची बाटली घेतली. रूमवर आलो. रामला माझी ‘कॉलेज
पोर्च’ची कात्रणं हवी होती. ती फाइल मी त्याला दिली. मग साडेअकरा वाजता
ऑफिसात गेलो. टीव्ही लावला. गुजरातच्या हिंसाचाराच्या बातम्या दाखवीत होते. लेलेंनी
मला एलआयसीची स्लिप दिली. ती मी वर अकौंट्समध्ये चित्रावांकडं नेऊन दिली. त्यांनी माझ्या
इन्कमटॅक्सच्या फायनल फिगर्स सांगितल्या. २१ हजार गुंतवूनही साडेतीन हजार रुपये आणखी
भरावे लागणार होते. मग या महिन्यात दीड हजार रुपये कापून घ्यायला त्यांना सांगितलं.
(दुसरं काय करणार?) मग आत्याकडं गेलो. तिथंच जेवलो. मग रूमवर आलो. झोपलो.
साडेपाचला उठलो. दाढी केली. सहाला ऑफिसात गेलो. पेंढारकरला खाली बोलावलं. मग कँटीनला
चहा प्यायलो. वर गेल्यावर बेंडाळेचा फोन आला. भरतपूरला जायचं काय करायचं, म्हणत
होता. मी म्हटलं, आम्ही फर्म आहोत. मग तोही ‘येतो’ म्हणाला. आज गुजरातच्या दंगलीचंच मेन फीचर होतं. संध्याकाळी
दीक्षितसाहेबांकडं नेहमीची मीटिंग झाली. नऊ वाजता मी कँटीनला जाऊन अंडाकरी व पोळी खाल्ली.
रात्री नगरचं पान दोन लावलं. साडेबाराला पेंढारकर त्याचं सगळं आवरून ऑफिसात आला. मग
तेलकर व पवारांनी आम्हाला माझ्या रूमवर सोडलं. मी बॅग भरली व आम्ही अडीचला रिक्षा पकडून
स्टेशनला आलो.
---
शनिवार, २ मार्च २००२
--------------------------
...भूक प्रचंड लागली होती, म्हणून
स्टेशनवर भुर्जी खाल्ली. क्रीमरोल-चहाही घेतला. तीन वाजता स्टेशनमध्ये आलो. आधी नगरची
तिकिटं काढली. ११८ रुपये झाले. पेंढारकरनंच पैसे दिले. मग तीन नंबरच्या फलाटावर जाऊन
बसलो. गाडी यायला वेळ होता. मग ‘वॉकमन’ ऐकत बसलो. पेंढारकर दिवसभर झोपला नव्हता. त्यानं बसल्याबसल्याच
एक डुलकी काढली. आमची गाडी ‘वास्को-ह. निजामुद्दीन’ अगदी वेळेवर होती. (नेहमीप्रमाणंच.) पावणेचारलाच ही गाडी
फलाटावर लागली. आम्ही लगेच गाडीत शिरलो. आमचं ‘एस-७’मध्ये
रिझर्व्हेशन होतंच नगरपासून. त्याच नंबरवर बसलो. ४.१० ला तर आमची गाडी हललीही. आम्ही
दोघंही लगेच आडवे झालो. श्रीगोंद्याजवळ मात्र बराच वेळ गाडी रखडली. का ते कळलं नाही.
सातला आम्ही दोघंही उठलो. या वेळेला ही गाडी नगर स्टेशनात असते. पण आज ती आठ वाजता
पोचली. तिथं मिलिंद, त्याचा भाऊ विकास, राजेश
परदेशी व त्यांचा आणखी एक मित्र एवढे जण आले होते. परदेशीचं यायचं कॅन्सल झालं होतं.
शेवटी आमची गाडी नगरहून हलली. बेंडाळेनं काल आईनं विलासकरवी दिलेलं खायचं बरंच काही
आणलं होतं. त्यानं स्वतः खिचडी आणली होती. (आज संकष्टी! पण उपास केला नाही.) मग आधी आईनं दिलेल्या साटोऱ्या, तिखटाच्या
पुऱ्या, ती खिचडी वगैरे एवढं हादडलं. दुपारी जेवलो असं नाहीच. भुसावळला
केळी खाल्ली. इटारसीला ते वडापावसारखं मिळतं ते खाल्लं. याशिवाय गप्पा, ‘वॉकमन’वर गाणी
ऐकणं हे सुरू होतंच. दुपारी जरा झोपही काढली. गाडी इटारसीच्या पुढं आली, तेव्हा
बुदनीचा तो प्रसिद्ध घाट लागला. दोन वर्षांपूर्वी याच गाडीनं ‘बीसीजे’च्या
दिल्ली ट्रिपसाठी आम्ही गेलो होतो, तेव्हा ‘ताल’ची कॅसेट
मी या घाटात ऐकली होती. आजही मी तीच कॅसेट घाटात ऐकली; दारात उभं राहून! मजा आली. नंतर भोपाळला डिनर आलं. आम्ही फक्त
भात-भाजीच घेतली. नंतर ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ वाचत व ‘वसंतराव देशपांडे’ ऐकत झोपलो.
---
रविवार, ३ मार्च २००२
------------------------
...पहाटे अडीचलाच बेंडाळेनं उठवलं. तीन वाजता बरोबर आग्रा
आलं. उतरलो. आधी चहा घेतला. मग एक नंबरच्या फलाटाला आलो. तिथं ‘वेटिंग
रूम’मध्ये बसून राहिलो. पहाटे साडेपाचला स्टेशनबाहेर पडलो. ‘डुग्गी’ रिक्षात सामान व स्वतःला कोंबून तिघेही ईदगाह एसटी स्टँडवर
आलो, तेव्हा पावणेसहा वाजले होते. ‘लखनऊ-जयपूर’ गाडी मिळाली. त्या गाडीने भरतपूरला आलो. येताना सकाळी
भरपूर धुकं होतं. साडेसातलाच भरतपूरमध्ये आलो होतो. मग दोन सायकल-रिक्षा करून ‘केवलदेव
राष्ट्रीय उद्याना’त आलो. २५ रु. प्रत्येकी ‘एन्ट्री
फी’ भरून आत आलो. ‘शांती
कुटिर’ या फॉरेस्ट खात्याच्या
गेस्ट हाऊसवर आलो. तिथं आमचं बुकिंग होतंच. तीन नंबरचा सूट मिळाला. आधी बॅगा फेकल्या
आणि आडवे झालो. पण मग लगेचच आवरलं. ब्रेकफास्ट घेतला. चहाही आधी आला होताच. मग साडेनऊनला
भाड्याच्या सायकली घेऊन जंगलात हिंडलो. बेंडाळेला सैबेरियन क्रौंचांचे फारच वेध लागले
होते. आम्हाला हळूहळू, बारीक-सारीक पक्षी बघत जायचं होतं. मग तो पुढं गेला. आम्हीही
भरपूर भटकलो. नीलगायी, सांबरं, निरनिराळे पक्षी भरपूर पाहिले. फोटोही
काढले.
सायकली चालवून चालवून पायाचे तुकडे पडत आले, तेव्हा
परत आलो. बेंडाळेही मागून आलाच. त्याला सैबेरियन क्रौंचांची एक (व एकमेव) जोडी दिसली
होती. त्याने मग पाच रोल संपविले होते. नंतर आम्ही मागे ‘डायनिंग
रूम’मध्ये बसून जेवलो. नंतर लगेच सायकली घेऊन बाहेर पडलो. तिघांनीही
घरी फोन केले. मी जामखेडला काकूला फोन करून कळवलं. (आई, दादा
व पौर्णिमा पंढरपूरला गेले होते; पण पंढरपूरचा फोन लागत नव्हता.) नंतर मग भरतपूर गावात गेलो.
तिथं मिलिंदनं रोल घेतले. पान खाल्लं. परत गेस्ट हाऊसवर गेलो. तिघांनीही ताणून दिली.
मग साडेचारला उठलो. चहा घेतला. पुन्हा जंगलात ‘प्राचीन
मंदिरा’पर्यंत चक्कर मारली. परत आलो. बाहेर जरा गप्पा मारीत बसलो. नंतर
जेवण केलं. पुन्हा जरा आवारात हिंडलो. आता उद्या लवकर उठून ‘सैबेरियन
क्रौंच’ पाहायला जायचंय!
---
सोमवार, ४ मार्च २००२
--------------------------
...सकाळी सात वाजता उठलो. चहा प्यायलो. आवरलं. आंघोळ केली.
खरं तर पेपर आणायला जायचं होतं. (काल रात्री बालयोगी हेलिकॉप्टर अॅक्सिडेंटमध्ये ठार
झाल्याचं ऐकलं होतं.) पण पेपर आणायचं राहूनच गेलं. मग आठ वाजता ब्रेकफास्ट करून आम्ही
तिघं बाहेर पडलो. ‘बैरियर’जवळ सायकली (भाड्याच्या!) घेतल्या.
मग सैबेरियन क्रौंचांच्या शोधात निघालो. मिलिंदनं काल त्यांचे भरपूर फोटो काढले होते.
म्हणून ते आम्हाला लगेच ‘ट्रेस’ झाले. आम्ही त्या पाणथळीच्या शेजारी बसून मनमुराद न्याहाळलं
त्यांना. दोन सारस पक्षीही होते.
पण सैबेरियन क्रौंचांचं देखणेपण विलक्षण होतं. ही
जो़डी चार हजार मैलांवरून इथं उडत आली होती. त्यांच्यात नर-मादी आयुष्यभर एकमेकांशी
एकनिष्ठ असतात. एक जरी मेला, तरी दुसरा प्राणत्याग करतो, म्हणे.
असे हे विलक्षण क्रौंच, परदेशी पाहुणे, मी दुर्बिणीतून
बरेच लांबून न्याहाळत होतो. अन् अचानक ते उडाले. त्यांनी ‘फ्लाइट’ घेतली... त्यांचं ते डौलदार उडणं मी दुर्बिणीतून एकचित्तानं
पाहत राहिलो. काय अप्रतिम दृश्य! दोघंही इतके एकसमान उडत होते, असले ‘स्टायलिश’ उडत होते की बस्स! मी किती वेळ तो आनंद लुटत होतो. अचानक एक क्षणी माझी दुर्बीण
हलली व ‘साइट लॉस्ट’ झाली. पुन्हा काही क्रौंच दिसले नाहीत. नंतर कळलं, की ते
अशा अशा पद्धतीनं उडाले म्हणजे परत सैबेरियाला गेले म्हणून... मला फार हळहळ वाटली.
किती थोड्या कालावधीत माझं त्या जोडीशी काय नातं तयार झालं होतं, कुणास
ठाऊक! नंतर आम्ही केवलदेव
मंदिरापाशी आलो.
तिथं अजगर दिसला. त्याचे फोटो काढले. मग रेस्ट हाऊसवर येऊन जेवलो.
झोपलो. चार वाजता रेस्ट हाऊसच्या मागे जो ‘ट्रेल’ आहे, तिकडं गेलो. तिकडं विपुल पक्षीजीवन, प्राणीजीवन
पाहायला मिळालं. एका सांबराच्या पिलामागं कुत्री लागली होती. सांबराच्या मादीनं त्या
कुत्र्यांना पळवून लावलं, हे किंचित नाट्य पाहायला मिळालं. सात वाजता परत आलो. जेवलो.
जरा वेळ गप्पा मारल्या. आता उद्या सकाळी जयपूरला जायचं आहे.
---
मंगळवार, ५ मार्च २००२
--------------------------
सकाळी पावणेसातला उठलो. आवरलं. आज आम्हाला जयपूरला जायचं
होतं. सकाळी चहा घेतला व मी आणि पेंढारकर बाहेर पडलो. 'बैरियर'पासून
रिक्षा केली. त्यानं बसस्टँडला नेलं. ५० रुपये घेतले. भरतपूरच्या स्टँडवर कॉम्प्युटरवर
बसचं तिकीट होतं. जयपूरला प्रत्येकी ६० रुपये तिकीट होतं. जाताना दौसा लागलं. पायलट
यांचा हा मतदारसंघ. साडेबाराला जयपूरमध्ये पोचलो. जातानाच तिथल्या ऐतिहासिक खुणा दिसत
होत्या. शहर सुंदरच आहे. ‘सेंट्रल बस स्टैंड’ला पोचलो.
मग बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाल्लं. मग सिटीबसनं ‘बडी चौपड’ला गेलो.
तिथं ‘हवामहल’ पाह्यला. शनिवारवाड्यासारखाच आहे. (म्हणजे ‘आता निरुपयोगी’ या अर्थानं!) प्रत्येक ठिकाणी तिकीट व कॅमेऱ्यासाठी
अधिक चार्ज होता. ‘हवामहल’चे बरेच फोटो काढले. मग तिथून सायकल-रिक्षान ‘सिटी पॅलेस’ला गेलो. हा सवाई माधोसिंह, मानसिंह, जयसिंह, प्रतापसिंह
वगैरेंचा पॅलेस. आजही महाराणी गायत्रीदेवी तिथं राहतात. हा पॅलेस अप्रतिमच आहे. मी
जादा ५० रुपये चार्ज देऊन भरपूर फोटो काढले. त्याआधी गायत्रीदेवींच्या ‘शिल्प
ग्राम उद्योग’मध्ये जाऊन रजया व साड्यांची खरेदी केली. ‘सिटी
पॅलेस’नंतर ‘जंतर-मंतर’ बाहेरूनच पाह्यलं. मग ‘बडी चौपड’ला जाऊन ‘मॅक्सी कॅब’नं आमेर फोर्टला गेलो. तो बंद झाला
होता. पण आत पटांगणात जाता आलं. तिथं कसलं तरी शूटिंग चाललं होतं. अविनाश वधवान, युनूस
परवेझ वगैरे होते. एक नटीही होती कोणी तरी. तिथून मग सिटीबसनं जोहरीबाजारात गेलो. बांगड्या
घेतल्या, बहिणीवर्गासाठी! मग पाव-छोले खाल्ले रस्त्यावर. नंतर ‘राजमंदिर’ थिएटर पाह्यलं, पण बाहेरूनच.
मग सायकल-रिक्षानं ‘सेंट्रल बस स्टैंड’ला आलो. ‘जयपूर-फिरोजाबाद’ बस मिळाली. पण ती एका ढाब्यावर थांबली. त्यामुळे भरतपूरला यायला
एक वाजला. पार्कच्या दारात बसवाल्यानं सोडलं. तिथून दोघं दोन किलोमीटर अंधारात चालत
आलो. टरकलो होतो; पण आलो
एकदाचे! जयपूर लक्षात राहील
ते सौंदर्य व साधेपणासाठी!
---
बुधवार, ६ मार्च २००२
------------------------
सकाळी साडेसात-पावणेआठला उठलो. नेहमीप्रमाणे आवरलं. सकाळीच
देवेंद्रसिंह हा राजेश परदेशीचा मित्र बेंडाळेला भेटायला आला होता. परदेशीने त्याला
फोन करून आम्ही इथं आल्याचं सांगितलं होतं व आम्हाला भेटायलाही सांगितलं होतं. मग आमचं
आवरून झाल्यावर ब्रेकफास्ट घेतला. नंतर सायकली घेतल्या व देवेंद्रसिंहबरोबरच ‘पायथॉन
पॉइंट’वर गेलो. पण दुर्दैवानं ‘पायथॉन’ महाराज एकही पाहायला मिळाले नाहीत. नंतर बेंडाळेची सायकल
पंक्चर झाली, म्हणून आम्ही परत आलो. अकराला तो, देवेंद्र
व अभिजित पुन्हा मागच्या ‘ट्रेल’ला गेले.
मी रूमवरच थांबलो. जरा वेळ पडलो. ते तिघं एकच्या आसपास परत आले. मग मी उठलो. नंतर जेवायला
गेलो. जेवण झाल्यावर देवेंद्रसिंहबरोबर गावात गेलो. भरतपूरचा किल्ला पाहिला.
---
गुरुवार, ७ मार्च २००२
-------------------------
आज सकाळी सहा वाजता उठलो. आवरलं. आज परतीच्या प्रवासाला
निघायचं होतं. सकाळी पुन्हा एकदा मागच्या ‘ट्रेल’ला जाऊन
आलो. अरण्य सारं डोळ्यांत भरून घेतलं. परत आलो. चहा घेतला. बिल दिलं. मग सायकल-रिक्षानं
सारस चौकात गेलो. एका प्रायव्हेट बसनं आग्र्यात गेलो. ‘आगरा
कैंटोन्मेंट छावनी’ स्टेशनात
टमटमनी गेलो. तिथं क्लोकरूममध्ये सामान टाकलं. मग ताजमहालाकडं निघालो. एका सायकल-रिक्षात
बसलो. फारच गरीब वाटत होता. पण तो आमचा गैरसमज निघाला. तो एका कसल्याशा हँडीक्राफ्टच्या
दुकानात आम्हाला घेऊन गेला. मग आम्ही त्याच्याशी भांडून रिक्षा सोडली. मग दुसऱ्या एका
ऑटो-रिक्षाने ताजमहालाकडे गेलो.
तिथं फोटो वगैरे काढले. खासगी फोटोग्राफरकडूनही फोटो
काढून घेतले. ते लगेच मिळाले. मग भर दुपारी एक-सव्वा वाजता दीड किलोमीटर चालत, लाल किल्ल्यात
(आग्रा फोर्ट) गेलो. आधी बाहेर छोले-रोटी, पराठे, दाल-भात
वगैरे हादडलं. तिथं किल्ल्यासमोरच शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे. नंतर
किल्ल्यात गेलो. किल्ला पाहिला. आत थोडा वेळ हिरवळीवर झोपलो. मग पावणेचारला निघालो.
टांगा केला, स्टेशनवर जाण्यासाठी. जाताना एका दुकानापाशी टांगा थांबवून पेठा
खरेदी केला. मग स्टेशनला गेलो. क्लोकरूममधून सामान काढलं. साडेपाचची वेळ होती आमच्या
गाडीची; पण ती अर्धा तास लेट
असल्याचं कळलं. अखेर सहा वाजता आमची ‘ह. निजामुद्दीन-वास्को गोवा एक्स्प्रेस’ आली. आमचं ‘एस-३’मध्ये
रिझर्व्हेशन होतं. आमच्या शेजारचे दोन जण पुण्याचेच निघाले. लुंकड व पडे म्हणून. त्यांच्याशी
गप्पा मारता मारता बरा वेळ गेला. रात्री मी ट्रेनमधलं जेवण मागवलं. ते बरं होतं. मग
बेंडाळेनंही एक मागवलं. अभिजित जेवला नाही. लगेच झोपला. मी जरा वेळ पुस्तक वाचीत बसलो.
मग साडेदहाला झोपलो.
------------------
शुक्रवार, ८ मार्च २००२
-------------------------
सकाळी सहा वाजता जाग आली. गाडी खांडवा स्टेशनात उभी होती.
बेंडाळे उठला होता. वरच्या बर्थवर झोपलेले लुंकडही उठले होते. मग मी चहा घेतला. तोंड
धुतलं. ‘दैनिक भास्कर’ घेतला. तो चाळेपर्यंत भुसावळ आलंच. तिथं मिलिंदचा मेव्हणा आला
होता. त्यानं डबाच आणला होता. अभिजितही तोपर्यंत जागा झाला होता. पण आम्ही ती पोळी-भाजीच
ब्रेकफास्ट म्हणून खाल्ली. भुसावळला केळी घेतली होती. तीही हादडली. साडेदहा वाजता गाडी
मनमाडला आली. तिथून डिझेल इंजिन असूनही गाडी ‘फास्टा’तच आली.
बरोबर १२.५५ ला गाडी नगरच्या स्टेशनमध्ये उभी होती. मग आम्ही तिघं बाहेर पडलो. आमच्या
आठ दिवसांच्या ट्रिपची ही यशस्वी सांगता झाली होती. बाहेर मला व अभिजितला लगेच रिक्षा
मिळाली. १५ रु. देऊन आम्ही जुन्या स्टँडला आलो. तिथून बसनं वैदूवाडीला उतरलो. चालत
घरी पोचलो, तेव्हा दोन वाजले होते. स्वाती व आई घरात होती. मग आधी जरा स्वस्थ
बसलो. आवरलं. आईनं दिलेलं सरबत प्यायलो. तीन वाजता मी व अभिजित जेवलो. मग जरा वेळ पडलो.
सव्वापाचला उठलो. अभिजितनंही आवरलं होतं. मग मिलिंदकडं फोन केला. मला ‘रोल’ टाकायचा होता. म्हणून मग येतोस का, म्हणून
विचारलं. पण त्याच्याकडं घरी कुणी नव्हतं म्हणे. म्हणून त्याला यायला जमणार नव्हतं.
मग मी व अभिजित वैदूवाडीला गेलो. तिथं आम्हाला ‘शेअर
रिक्षा’ मिळाली. पावणेसहाला
स्टँडवर गेलो. त्याला ‘नॉनस्टॉप पुणे’ मिळाली. मी एमआयडीसी बसनं परत घरी आलो. तोपर्यंत दादा, पौर्णिमा
हेही आले होते. मग सगळी ट्रिपची हकीगत सांगणं झालं. नंतर जेवलो. जेवणं झाल्यावर जुने
आठ दिवसांचे अंक काढून वाचीत बसलो. (बापू अहमदाबादला गेलेला दिसतोय, त्याच्या
बातम्यांवरून.) नंतर जरा वेळ वाचलं अन् आता झोपणार!
---
No comments:
Post a Comment