चो ऽऽ च्विट...!
------------------
सिनेमा म्हणजे माणूस असता, तर ‘इश्कवाला लव्ह’
या नव्या मराठी सिनेमाचे मी प्रेमाने गालगुच्चे घेतले असते आणि ‘चो ऽऽ
च्विट...’ असं म्हटलं असतं. एखादी लहान, परीसारखी, गोबऱ्या गालाची, निळ्या
डोळ्यांची बाहुलीसारखी सुंदर मुलगी असते ना, तसं या सिनेमाचं बाह्यरूप आहे.
एकदम गोग्गोड. सुधारस, काकवी, रसमलई, आंबाबर्फी.... एकदम! मराठी सिनेमा
‘प्रेक्षणीय’ बनविण्याचे जे प्रयत्न गेल्या काही सुरू आहेत, त्यात रेणू
देसाईंचा हा सिनेमा एकदम फिट्ट बसतो.
सिनेमाचा विषय तसा आपल्याला जनरल प्रेक्षक
म्हणून काही नवा नाही. कदाचित मराठीत मात्र पहिल्यांदा येत असावा. लग्न की
लिव्ह इन रिलेशनशिप हाच तो प्रश्न! यात हा प्रश्न नायकाला पडलेला नसून,
अत्यंत ‘कन्फ्युज्ड’ अशा ‘मोबाइल पिढी’चं प्रतिनिधित्व करणाऱ्या नायिकेला
पडला आहे, हे आणखी एक विशेष! (इथं मोबाइल पिढी या शब्दाचा खुलासा करणं
आवश्यक आहे. भारतात १९९५ मध्ये मोबाइलचं आगमन झालं. त्या वर्षी जन्मलेल्या
मुलांना आता मतदानाचाही अधिकार मिळाला आहे. एका अर्थानं ही मोबाइल पिढी आता
‘अॅडल्ट’ झाली आहे. भारतात तरी आता आधुनिक काळात दोन युगं निर्माण झाली
आहेत. एक मोबाइलपूर्व काळ आणि दुसरा मोबाइलोत्तर काळ... ‘इश्कवाला लव्ह’ हा
सिनेमा या मोबाइलोत्तर पिढीचं प्रतिनिधित्व करतो, त्याही अर्थानं तो
ट्रेंडसेटर आहे.) ही पिढी विचारांमध्ये अत्यंत मोकळी आहे, त्यांचे फंडे
क्लिअर आहेत, तरीही काही प्रसंगी ते अत्यंत गोंधळल्यासारखं वागतात. लग्न
आणि एकूणच या संकल्पनेविषयी या पिढीच्या मनात असाच गोंधळ आहे. त्यात ‘लिव्ह
इन’सारखा पर्याय दिसत असल्यानं तर त्यांच्या मनातला गोंधळ आणखीनच वाढला
आहे. मात्र, अजूनही शेवटी पारंपरिक वळणाकडंच जाण्याचा प्रघात आहे आणि तो या
सिनेमानं कायम ठेवला आहे. म्हणजे शेवटी असा प्रश्न पडतो, की मग हे सगळं
चाललं होतं तरी कशासाठी?
या सिनेमाचा घाऊक यूएसपी म्हणजे त्याचं
प्रॉडक्शन डिझाइन. अत्यंत प्रसन्न आणि ‘फील गुड’ असा अनुभव देण्यात
दिग्दर्शिका यशस्वी झाली आहे. यश चोप्रा किंवा करण जोहरचे सिनेमे (आणि
त्यांच्या नायिका) पाहताना असं वाटतं, की या जगात केवळ सुख आणि सुख भरलेलं
आहे. ही भूमी म्हणजे जणू स्वर्गच होय. रेणू देसाईंचा सिनेमा पाहतानाही
आपल्याला हाच अनुभव येतो. या सिनेमात वाईट, दुष्ट, नकारात्मक असं काही
नाहीच. मस्त बंगल्यांत राहणारी माणसं आहेत, उत्तमोत्तम गाड्यांमधून सुरेख
वेषभूषा करून फिरणारे नायक-नायिका आणि त्यांचे मित्र आहेत, सर्व काही
उत्कृष्ट आणि नीटनीटकं... रिळारिळांत जणू सण साजरा होतो आहे!
पूर्वार्धात हे सगळं असं छान-छान, फील गुड
वातावरण पाहून आपली शुगर लेव्हल बऱ्यापैकी वाढली, की ती कमी करायला
मध्यंतरातला मॉरिशसचा ट्विस्ट येतो. खरं तर हेही वळण आपल्याला तसं ठाऊकच
असतं. नायिकेला ‘लिव्ह इन’मध्येच राहायचं आहे, कारण लग्नानंतर प्रेम
संपुष्टात येतं, असं तिचं मत आहे. घटस्फोटित माता-पित्यांची पार्श्वभूमी
असलेल्या नायकाला मात्र लग्नच हवं आहे. अखेर गैरसमज, रुसवे-फुगवे,
लटके-झटके आणि काही गाणी होऊन नायिकेला लग्नसंस्थेची महती पटते आणि ती एकदम
नऊवारी आणि नथ वगैरे ‘शुंदल शुंदल’ मेकअप करून बोहोल्यावर चढते.
हा सिनेमा पाहावा तो फक्त नेत्रसुखासाठी.
सुलग्ना पाणिग्रही या उडिया अभिनेत्रीनं या सिनेमातून मराठीत पदार्पण
केलंय. ओवी अभ्यंकरच्या भूमिकेत ती फारच गोंडस, लोभस वगैरे वगैरे दिसलीये.
(बाय द वे, जिचं नाव ‘सुलग्ना’ आहे आणि आडनाव ‘पाणिग्रही’, तिला
लग्नसंस्थेला कट्टर विरोध करणारं पात्र साकारावं लागतंय. गंमतच एकेक!)
आजच्या अल्लड आणि नवथर तरुणाईचं प्रतीक म्हणून ती छान शोभते. तिच्या
वाट्याला अनेक टाळ्याखाऊ संवाद आले आहेत. तिचे मराठी उच्चारही तितकेसे
त्रासदायक नाहीत. अजिंक्य नेनेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारेनंही सहजतेनं काम
केलं आहे. सुचित्रा बांदेकर, लीना भागवत यांची उपस्थिती मजा आणते. विनोद
प्रधान यांच्यासारख्या दिग्गज सिनेमॅटोग्राफरनं याचं छायांकन केलं आहे. ते
अर्थातच अव्वल दर्जाचं आहे. अविनाश-विश्वजित यांचं संगीतही ठीकठाक.
तेव्हा एक प्रसन्न, फील गुड असा सिनेमा म्हणून
एकदा पाहायला हरकत नाही. सिनेमाच्या जाहिरातीत दावा केल्याप्रमाणं ही वेगळी
प्रेमकथा मात्र अजिबात नाही.
----
निर्माते : अकिरा फिल्म्स
दिग्दर्शिका : रेणू देसाई
कथा-पटकथा, संवाद : रेणू देसाई
सिनेमॅटोग्राफी : विनोद प्रधान
संगीत : अविनाश-विश्वजित
प्रमुख भूमिका : आदिनाथ कोठारे, सुलग्ना
पाणिग्रही, भार्गवी चिरमुले, सुचित्रा बांदेकर, लीना भागवत, शैलेश दातार,
अपूर्वा नेमळेकर, स्वप्नील बांदोडकर, सतीश पुळेकर आदी.
कालावधी : एक तास ५८ मिनिटे
दर्जा : ***
No comments:
Post a Comment