6 Oct 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - बँग बँग

आम्रखंड विथ चेरी
----------------------
 सणासुदीला काही गोष्टी आपण रीतीरिवाज, परंपरा म्हणून मोठ्या आनंदानं करतो. पुन्हा पुन्हा त्या करताना आपल्याला कंटाळा येत नाही. उलट त्या केल्या नाहीत, तर चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. उदा. दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे हार करून आपल्या वाहनांना घालणे, आपट्याची पानं सोनं म्हणून लुटणे किंवा श्रीखंड-पुरीचा बेत करून दुपारी ताणून देणे. वर्षानुवर्षं याच गोष्टी केल्या म्हणून यंदा वेगळं करू या, असं कुणी म्हणत नाही. हल्ली दर मोठ्या सार्वजनिक सुट्टीला आपल्या सिनेमासृष्टीतल्या मोठमोठ्या हिरोंचे सिनेमे रिलीज होत असतात. त्यातही मनोरंजनाचं पॅकेज म्हणून वर्षानुवर्षं दाखवलेल्या गोष्टीच अधिक चकचकीत, पॉलिश करून दाखवत असतात. या हिरोंचे आणि हिरॉइनींचे फॅन्स मोठ्या आनंदानं ते पाहतात आणि आपली सुट्टी सत्कारणी लावतात. यंदाच्या गांधी जयंती आणि विजयादशमीच्या जोडसुट्टीला हृतिक रोशन आणि कतरिना कैफ या हॉट जोडीचा ‘बँग बँग’ हा नवा हिंदी सिनेमा प्रदर्शित झाला असून, तोही या नियमाला अपवाद ठरलेला नाही. हे आम्रखंड विथ चेरी खाताना, अर्थात या सिनेमाची एकमेव जमेची बाजू मि. रोशन आणि मिस कैफ हेच दोघं आहेत, ही तळटीप विसरू नये.
सिद्धार्थ आनंदनं या सिनेमात मनोरंजनाचा मेगापॅक देण्याचा प्रयत्न करताना क्लिशेंचा (साचेबद्धता) उच्चांक गाठला आहे. त्याच गोष्टी, पण ओव्हरस्मार्टपणे मांडल्या आहेत, एवढंच. उदा. हिरा चोरणारा हिरो अनेक सिनेमांत असतो. पण थेट कोहिनूर चोरायला निघालेला हिरो याच सिनेमात पाहायला मिळेल. हिराचोरीचं एवढं ऑब्सेशन आपल्या लोकांना का आहे, काही कळत नाही. पण ते असो. मग या चोरीच्या निमित्तानं लंडन, प्राग, कुठलंसं आयलंड, शिमला, गल्फ अशा अनेक ठिकाणी दिग्दर्शक आपल्याला घुमव घुमव घुमवतो. हिरोचं हिरोपण हल्ली एखादीच शौर्याची गोष्ट करून सिद्ध होत नाही. मग त्याला शिमल्यातल्या इमारतींवरून पाठलाग करवून घ्यावा लागतो. लंडन किंवा प्रागमध्ये गाड्या उडवाव्या लागतात, शत्रूपक्षाला हूल देण्यासाठी वेगवेगळे प्लॅन्स आखावे लागतात, दोन हात अपुरे पडतात पण एकाच वेळी कित्येक गुंडांना धडाधडा गोळ्या घालून मारावं लागतं, त्याच वेळी घाबरलेल्या हिरॉइनला कुशीत घ्यायचं असतं, एखाद्या कथित विनोदी पात्राची खेचावी लागते, त्याच वेळी माँचे अश्रू आठवून स्वतःचे डोळे ओलवावे लागतात. केवढं काम! कष्टाशिवाय फळ नाही आणि चक्क्याशिवाय श्रीखंड नाही याची सिद्धार्थ आनंदला जाणीव आहे. म्हणून मग त्यानं आपल्या हिरोलाही या सर्व खडतर कोर्समधून पुढं नेलं आहे. त्यात इंटरनॅशनल क्रिमिनल असलेल्या (किंवा भासणाऱ्या) गुंडाला पकडण्यासाठी देशाची सर्वोच्च गुप्तचर यंत्रणा कामाला लावावीच लागते. भले त्या यंत्रणेत दोन किंवा तीनच लोक असोत. या यंत्रणेला मोस्ट वाँटेड असलेल्या गुंडाचा ठावठिकाणाही फक्त हिरोलाच ठाऊक असतो. मग आपलावाला एक जण तरी शत्रू पार्टीला फितुर असतोच. ही शत्रूपार्टीही होता होईल तेवढी बिनडोक असावी लागते. हिरो तिला किरकोळीत फसवू शकला पाहिजे. हिरॉइन बिचारी या सगळ्यापासून अनभिज्ञ असते. हिरोचे बायसेप्स बघून चक्करल्यासारखं करणे आणि नंतर त्याच बायसेप्सांमध्ये विरघळणे याच कामावर तिची नेमणूक झालेली असलेकारणाने ती हे मनोभावे करते, यात शंकाच नको. हिरो स्वतःच्या पोटातील गोळी काढून पोट शिवत असताना त्यावर बॅटरी धरणे यासारखी लहानसहान कामेही तीस करावी लागतात. याखेरीज खुद्द तिची आखीवरेखीव फिगर बघायलाच आलेल्या तिच्या भक्तांना ती नाराज करीत नाही. त्यासाठी तिला बीचवर जावं लागतं. कपडे विसरावे लागतात. खाऱ्या पाण्यात पडावे लागते. खूपच कष्टमय, खडतर अशा प्रसंगमालिकांनंतर तिला (आणि भक्तांनाही) हवं ते मिळतं आणि मगच शत्रूपार्टी गोळ्या झाडीत तिथं अवतरते. (ती किमान तेव्हा यावीच लागते, कारण त्यानंतरची प्रसंगमालिका दाखवायची सोय अजून तरी आपल्या हिंदी सिनेमात नाही!) शिवाय पडद्यावरची हॉटेस्ट जोडी हा किताब मागे असल्यावर किमान एक किस तो बनता है भाई... पण अजूनही सहज किस घेतला असा प्रसंग आणण्याचं धैर्य आपल्या सोज्वळ मंडळींना होत नाही. मग अचानक काही तरी घडावं लागतं, मागावर असलेले पोलिस यावे लागतात, पण हिरोला हिरॉइनला भिंतीला खेटून लपवावं लागतं. त्यानंतर नायिका हिरोला तू आता माझा किस घेणार नाहीयेस, असं सांगून (खरं तर) ‘घेऊन टाक’ असं सांगते. मग तेव्हा कुठे आपले हिरोमहाशय ओठांचा व्यायाम करतात. अरे, कित्ती पीळ माराल...
थोडक्यात, बँग बँग इज नथिंग बट अ बंच ऑफ क्लिशेज. पण आम्रखंडाचं तरी वेगळं काय असतं... त्याचीही रेसिपी वर्षानुवर्षं ठरलेली असते. तसंच या कथांचा चक्का वर्षानुवर्षं टांगलेला आहेच. गोड मानून घ्यावा.
अशा वेळी, एखाद्या ग्रीक देवतेच्या ब्राँझ पुतळ्यासारखा दिसणारा, अत्यंत हँडसम असा हृतिक आणि केवळ मदनिका अशी कतरिना यांना पाहत राहणे हीच एकमेव गोष्ट मग करण्यासारखी उरते. ती आपण करावी.
अजून काही या सिनेमाविषयी सांगावंसं वाटत नाही. डॅनीसारखा कसलेला अभिनेता यात खलनायक आहे. पण तो टिपिकलसुद्धा म्हणवत नाही एवढा टिपिकल आहे. त्याला काहीच वाव नाही. कतरिनाची धाकटी बहीण शोभावी असे संवाद बोलणारी तिची ग्रॅनी हेच काय ते टिपिकल नसलेलं एक पात्र. हृतिकनं त्याला जे जे करणं शक्य आहे ते सर्व यात करून दाखवलं आहे. (दुर्दैवानं त्यानं नुसतंच हँडल फिरवलं. भांड्यात चक्काच नव्हता.) मिस कैफ यांनी प्रेक्षकांना पुरेसा कैफ मिळेल आणि जायफळ घातलेलं श्रीखंड खाऊनही येणार नाही एवढी धुंदी आणली, हे नक्की. ही अभिनेत्री दिवसेंदिवस अधिकच सेक्सी दिसायला लागलीय, एवढं सांगितलं तरी पुरे.
तेव्हा, हे सिनेमारूपी आम्रखंड अगदी बोटे चाटत खावं असं नाही; पण किमान तुमचा सण तरी साजरा करणं एवढं किमान काम ते करतं.
---
निर्माते : फॉक्स स्टार स्टुडिओज
दिग्दर्शक : सिद्धार्थ आनंद
कथा : सुभाष नायर
संगीत : विशाल-शेखर
प्रमुख भूमिका : हृतिक रोशन, कतरिना कैफ, डॅनी डेन्झोंग्पा, जावेद जाफरी, पवन मल्होत्रा, विक्रम गोखले, दीप्ती नवल, कंवलजित आदी
दर्जा - ***
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे ४ ऑक्टोबर १४)
---

No comments:

Post a Comment