17 Apr 2018

ऑक्टोबर - रिव्ह्यू

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल...
-------------------------------------------------------------------------------------


प्रेम या भावनेविषयी बोलू तेवढं कमी आहे. माणसाचं आयुष्य संपलं, तरी प्रेमाच्या सर्व परी त्याला माहिती होतीलच असं नाही. आपल्या चिमुकल्या आयुष्यात माणूस जमेल तसं प्रेमाची उकल करण्याचा प्रयत्न करत असतो. आपापल्या वकुबानुसार, कुवतीनुसार त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. पण प्रेम तरीही दशांगुळे उरतं... प्रेमाच्या या अचाट ताकदीकडं आपण फक्त स्तिमित होऊन पाहत राहतो. ‘ऑक्टोबर’ या नव्या हिंदी चित्रपटात दिग्दर्शक शुजित सरकारनं प्रेमाचा असाच एक उत्कट भाव उलगडून दाखवला आहे. तो पाहताना आपल्यालाही प्रेमाचा एक नवाच पैलू गवसतो. आपल्या प्रिय व्यक्तींविषयी पोटात खूप काही दाटून येतं... डोळे पाणावतात... मन कुठल्याशा पवित्र भावनेनं आटोकाट भरून येतं...
तसं म्हटलं तर ही रूढार्थानं प्रेमकथाही नाही. हिंदी चित्रपटांच्या प्रेमकथांच्या व्याख्येत बसेल असंही यात फार काही नाही. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करणारा दानिश ऊर्फ डॅन (वरुण धवन) हा तरुण आणि त्याच्याचसोबत काम करणारी शिऊली (वनिता संधू) यांची ही गोष्ट. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात असतात असंही नाही. एकदा शिऊली हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून अपघात होऊन खाली पडते आणि गंभीर जखमी होते. नंतर कोमात जाते. पडण्यापूर्वी तिनं आपली चौकशी केली होती, एवढंच डॅनला समजतं. तो रोज तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायला लागतो. तिच्या कुटुंबीयांशी त्याची ओळख होते. तिची आई भेटते. या सगळ्यांना डॅन शिऊलीसाठी एवढा का तळमळतोय हे कळत नसतं. खुद्द डॅनलाही ते कळत नसतं. मात्र, तिनं पडण्यापूर्वी आपलीच आठवण का काढली असावी, हा एकच प्रश्न त्याला सतावत असतो. मग तो या प्रश्नाचा नकळत शोध घेऊ लागतो. शिऊलीचं पुढं काय होतं, डॅनला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं का, शिऊलीला डॅनविषयी नक्की काय वाटत असतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चित्रपटाच्या शेवटी मिळतात. ती पडद्यावरच पाहण्यात गंमत आहे.
शुजित सरकारनं या चित्रपटाद्वारे प्रेमाची ही अबोध रीत शोधण्याचा फार अप्रतिम प्रयत्न केला आहे. प्रेम अनेकदा व्यक्त केलं जात नाही. बोलून दाखवलं जात नाही. एखाद्यावर आपलं प्रेम असेल, तरी ते त्याला कळतंच असंही नाही. प्रेम करणारी व्यक्ती कधी ते बोलून दाखवू शकतेच असं नाही. तरीही प्रेम असतंच. ती भावना कायम असतेच. या अशा तरल, अबोध भावनेचा शोध म्हणजे रेशमाची लड उलगण्यासारखा नाजूक प्रकार. या चित्रपटात नायक असा शोध घेऊ लागतो आणि त्याच्या जोडीला आपणही!
कुठल्याही कलाकृतीत कथावस्तूतील मुख्य पात्राशी प्रेक्षकांना असं तादात्म्य साधता आलं, की त्या कलाकृतीच्या आस्वादनाची पातळी स्वाभाविकच उंचावते. ‘ऑक्टोबर’मध्येही नेमकं हे होतं. दिग्दर्शक, संगीतकार, कॅमेरामन आणि प्रमुख अभिनेते यांच्यामुळं हे शक्य झालंं आहे.
वरुण धवननं यात साकारलेला नायक पाहण्यासारखा आहे. त्याच्या कारकिर्दीला दहा वर्षं होत असताना, त्यानं असा चित्रपट करावा, हे त्याच्यातला अभिनेता प्रगल्भ होत चालल्याचं लक्षण आहे. या अभिनेत्याकडून येत्या काळात आणखी चांगल्या कामाची अपेक्षा ठेवायला हरकत नाही. बनिता संधू या नवोदित अभिनेत्रीनं शिऊलीचं काम केलं आहे. चित्रपटातील बहुसंख्य भागांत ती बेडवर आणि नाका-तोंडात नळ्या घातलेल्या स्थितीत आहे. अशा परिस्थितीतही केवळ डोळ्यांतून भावप्रदर्शन करण्याचं आव्हान तिनं पेललं आहे. आणखी एक उल्लेख करायचा म्हणजे गीतांजली राव यांचा. नायिकेच्या आईची भूमिका त्यांनी समजून-उमजून केली आहे. चित्रपटाच्या पार्श्वसंगीताचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. शंतनू मोईत्रा या गुणी संगीतकारानं दिलेल्या संगीत व पार्श्वसंगीतामुळं या चित्रपटाला विशेष परिमाण लाभलं आहे.
या चित्रपटाच्या शीर्षकात एक प्राजक्ताचं फूल दाखवलं आहे. ऑक्टोबर महिन्याचा आणि या फुलाचा चित्रपटाच्या कथावस्तूशी काहीएक जैव संबंध आहे. त्यामुळंच चित्रपटाचं नाव आणि हे फूल लक्षात राहतं. प्राजक्ताच्या फुलांचा सुवास मन मोहून टाकणारा असतो. सकाळी प्राजक्ताच्या झाडाखाली उभं राहिलं, की खाली सर्वत्र या प्राजक्ताच्या नाजूक फुलांचा सडा पाहायला मिळतो. प्राजक्ताच्या फुलांचं आयुष्यही अगदी कमी असतं. मात्र, तेवढ्या छोट्याशा आयुष्यातही ते फूल आपल्याला सुवासाच्या रूपानं अपरिमित आनंद देऊन जातं. या गोष्टीतल्या कोमात गेलेल्या नायिकेसाठी हे प्रतीक अगदी चपखल आहे. तिचं अव्यक्त प्रेम आणि आता कदाचित ती ते कधीच बोलू शकणार नसल्याचं वास्तव या दोन्ही दृष्टीनं प्राजक्ताच्या फुलाचं प्रतीक इथं बरंच काही व्यक्त करून जातं.
आपण आपल्या आयुष्यात अनेकदा या परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो. आपल्याला तेव्हा त्या घटनांची उकल नीटशी होत नाही. मात्र, काही काळानंतर, अनुभवांचे घण सोसून मन घट्ट झालं की, कदाचित पूर्वीच्या अनुभवांची नव्यानं ओळख पटू लागते. आपण काही तरी गमावलंय ही भावनाही मनात घर करून बसते. तेव्हा उपयोग नसतो. प्रेम करता यावं लागतं हे खरं, पण कुणी करत असलेलं प्रेम जाणून घेता यावं लागतं हेही तेवढंच खरं. आपल्याला कुणाचं प्रेम समजू शकलं नाही, तर त्यासारखं दुर्दैव दुसरं काही नाही. प्रेम समजण्यासाठी प्रेम करता यावं लागतं असा हा तिढा आहे. ‘ऑक्टोबर’ आपल्याला दोन्ही गोष्टी शिकवतो.
या सिनेमात अशा ‘बिटवीन द लाइन्स’ सांगितल्या जाणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. दिग्दर्शक दृश्यांच्या रचनेतून, संवादांतून, तर कधी पार्श्वसंगीतातून त्या गोष्टी आपल्याला कानात गुज सांगितल्यासारख्या हळुवारपणे सांगत राहतो. यातल्या नायकाची तडफड त्यामुळं आपल्यापर्यंत नीट पोचते. कोमात गेलेल्या आणि नंतर केवळ डोळ्यांनी प्रतिसाद देणाऱ्या नायिकेचा श्वास आपल्या कानांना ऐकू येतो. मुलीची ही स्थिती बघून काळीज तुटत असलेल्या तिच्या आईची वेदना आपल्याही काळजापर्यंत पोचते...
आपल्या आजूबाजूला सुरू असलेल्या कर्कश आवाजांमध्ये आपण हे असे तरल, नाजूक आवाज ऐकायला विसरत चाललो आहोत. सगळ्या भावभावनाही ठळक अन् बटबटीत होत चालल्या आहेत. काही भावना तर सततचे आघात झेलून पूर्ण बधीर झाल्या आहेत. प्रेमासारख्या विश्वव्यापी भावनेला आपण आपल्या आकलनाच्या छोट्याशा कुपीत बंदिस्त करून मेंदूतल्या कपाटात बंद करून ठेवलंय.
पण कधी तरी समोर अशी कलाकृती येते आणि आपल्याला अंतर्बाह्य हादरवून टाकते. आपल्या जाणिवांना आतून आतून धक्के मारते आणि गदागदा हलवून जागं करते. प्रेमाच्या या नव्या परीचं हे रूप पाहून आपण अवाक होतो. आपण कधी असं प्रेम करू शकू का, या विचारानं अंतर्मुखही होतो. आतून आतून तुटतं काही तरी... मग सुरेश भटांच्या ‘मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल...’ या कवितेतली आर्तता अचानक जाणवू लागते. समजू लागते...
आपण अशा कलाकृतींचं देणं लागतो, ते यासाठीच!
---
दर्जा - चार स्टार
---



5 comments:

  1. श्रीपाद, तू लिहिलेलं आतापर्यंतच मला सर्वात आवडलेलं हे चित्रपट परीक्षण आहे. फारच छान लिहिलंयस.

    ReplyDelete