2 Sept 2013

फर्स्ट डे फर्स्ट शो - मद्रास कॅफे


वेदनादायी भूतकाळाचा अस्वस्थ अनुभव




मद्रास कॅफेहा सुजित सरकार दिग्दर्शित नवा हिंदी सिनेमा पाहून बाहेर पडल्यावर एकच प्रश्न मनात येतो - विक्रमसिंहला फक्त काही सेकंद आधी घटनास्थळी पोचता आलं असतं तर?.... तर... तर या देशाचा इतिहास आणि आजचं वर्तमान कदाचित पूर्ण वेगळं झालं असतं! प्रेक्षकाच्या मनात अशी तीव्र भावना निर्माण करण्यात मिळवलेलं यश या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर घेऊन जातं.
यातली तीघटना अर्थातच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येची. तमिळनाडूतील श्रीपेरुंबुदूर इथं २१ मे १९९१ रोजी रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी मानवी बॉम्बच्या साह्यानं राजीव गांधींना मारण्यात आलं. श्रीलंकेतील एलटीटीई या तमिळ दहशतवादी संघटनेवर संशयाची सुई रोखली गेली. नंतर या घटनेत एलटीटीईचा म्होरक्या वेलुपिल्लई प्रभाकरनचा हात स्पष्टच झाला. या सर्व घटनाक्रमाची सुरुवात भारतानं श्रीलंकेत पाठविलेल्या शांतिसेनेपासून झाली. राजीव गांधींचा हा राजकीय निर्णय आणि त्याचे त्यांना आणि देशाला भोगावे लागलेले भयानक परिणाम सर्वांनीच पाहिले आहेत. मात्र, हा सर्व अस्वस्थ कालखंड हिंदी सिनेमाच्या पडद्यावर आला नव्हता. विकी डोनरहा आगळावेगळा सिनेमा देणाऱ्या सुजित सरकारनं मद्रास कॅफेमधून प्रथमच हा विषय मांडण्याचं धाडस केलं आहे. विषयाची प्रामाणिक हाताळणी, बंदिस्त पटकथा आणि प्रमुख कलाकारांचा दमदार अभिनय यामुळं मद्रास कॅफेहा एक अस्वस्थ करणारा, पण नक्की पाहावा असा सिनेमा ठरतो.
अर्थात हा सर्व वादाचा विषय असल्यामुळं दिग्दर्शकानं हे काल्पनिक कथानक आहे, असं सुरुवातीलाच जाहीर करून सर्व वादांतून स्वतःची सुटका करून घेतली आहे. शिवाय राजीव गांधी, प्रभाकरन यांचे थेट उल्लेखही नाहीत. पण त्यामुळं फारसं काही बिघडत नाही. समोर पडद्यावर चाललेल्या नाट्याचा निखळ आनंद घेण्यापासून हे अडथळे आपल्याला वंचित करू शकत नाहीत.
गुप्तचर संघटना, गुप्तहेर आणि त्यांचे देश-परदेशांत चालणारे कारनामे यांचं एक वेगळंच विश्व आहे. आपल्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांचे आणि आणि आपले वर्षानुवर्षांचे प्रेमाचे संबंध पाहता, या देशांनी आपल्याकडे आणि आपण त्यांच्याकडे पाठविलेले गुप्तहेर आणि त्यांच्या माध्यमातून घडविले जाणारे घातपात, कटकारस्थानं, देवाणघेवाण, राजकीय निर्णयांचा अंमल, फंदफितुरी हे सर्व कुठल्याही सिनेमासाठी एक आकर्षकपॅकेजआहे. सुजितनं या सर्व आकर्षक वेष्टनाचा यथायोग्य वापर करून त्याच्या गोष्टीतलं नाट्य खुलवलं आहे. शिवाय काल्पनिक कथा असं वर्णन केलं असलं, तरी आपण भारतीय उपखंडाच्या इतिहासातल्या एका अत्यंत भयानक, क्रूर आणि उद्वेगजनक अशा वांशिक संघर्षाविषयी टिप्पणी करीत आहोत, याचं भान सुजितनं कुठंही सोडलेलं नाही. त्यामुळंच एखाद्या लाइव्ह रिपोर्ताजसारखी मांडणी करून त्यानं ही गोष्ट सांगितली आहे. नव्वदच्या दशकात श्रीलंकेत उसळलेला सिंहली-तमिळी संघर्ष, त्यात हस्तक्षेप करण्याचा भारताचा निर्णय, शांतिसेना पाठविण्याचा निर्णय, या शांतिसेनेचा एलटीफ (सिनेमातलं एलटीटीईचं नाव) या अण्णा भास्करनच्या (म्हणजे प्रभाकरन) संघटनेशी झालेला घनघोर संघर्ष, त्यात मारले गेलेले भारतीय जवान आणि या राजकीय निर्णयाची दोन्ही देशांतील सर्वसामान्य लोकांना मोजावी लागलेली जबर किंमत... या सर्व पार्श्वभूमीवर या सर्व घटनाक्रमात थेट सहभागी झालेला आणि माजी पंतप्रधानांची हत्या रोखण्यापासून केवळ काही सेकंद अंतर दूर राहिलेला आपला नायक विक्रमसिंह याचा प्रवास म्हणजे सुजितचा मद्रास कॅफे.
कुठल्याही सिनेमाच्या यशस्वितेमध्ये महत्त्वाचा वाटा असतो तो पटकथेचा. इथं सोमनाथ डे आणि शुभेंदू भट्टाचार्य या जोडीनं लिहिलेली पटकथा निम्मी बाजी मारते. दोन देशांतला व्यापक राजकीय संघर्ष, आपली गुप्तचर संघटना व परदेशातील दहशतवादी संघटना यांच्यात रंगणारे डाव-प्रतिडाव आणि या सर्वांत एक महत्त्वाचा मोहरा असलेला रॉने पाठविलेला गुप्तचर लष्करी अधिकारी विक्रमसिंह व त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर या सर्व घटना-घडामोडींचा होणारा परिणाम अशा तीन स्तरांवर त्यांनी ही पटकथा गुंफली आहे. सिनेमात वांशिक संघर्ष असला, तरी दिग्दर्शकानं तो फार रक्तरंजित किंवा क्रूरपणे न दाखवता केवळ काही छायाचित्रांतूनच त्यांची भीषणता स्पष्ट केली आहे. विक्रमसिंह आणि त्याचा वैयक्तिक आणि संघटनात्मक पातळीवर चाललेला संघर्ष याचा सखोल वेध घेण्यावर दिग्दर्शकानं सर्व फोकस ठेवला आहे.
शांतिसेना तैनात केल्यानंतर श्रीलंकेतील स्थानिक निवडणुका घेण्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन पंतप्रधान श्रीलंकेला देतात. एलटीएफमध्ये फूट पाडून यशस्वीपणे निवडणुका घेण्याच्या कामी विक्रमसिंहची (जॉन अब्राहम) नियुक्ती होते. श्रीलंकेत शिरताना त्याची ओळख जया (नर्गिस फाकरी) या पत्रकार तरुणीशी होते. (हे पात्र प्रभाकरनची पहिल्यांदा मुलाखत घेणाऱ्या पत्रकार अनिता प्रताप यांच्यावर बेतलेलं आहे, असं म्हणतात!) तेथून पुढे चेन्नईतील एका बॉसच्या सहकार्यानं विक्रमचं मिशन सुरू होतं. मात्र, पुढं त्याला अनेक धक्कादायक सत्यांचा सामना करावा लागतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही आघात होतात. एका संघर्षात अण्णा भास्करन (अजय रत्नम) मरण पावल्याचं जाहीर होतं आणि जखमी विक्रमच्या दृष्टीनं मिशन संपतं. पण अण्णा भास्करन जिवंत असल्याचं लवकरच समजतं. आता त्यानं त्याचे उरलेसुरले अंतर्गत विरोधकही संपविलेले असतात. त्याचं लक्ष्य एकच असतं - भारताचे माजी पंतप्रधान. पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची खबर विक्रमला जयाकडून समजते. आपल्याच संघटनेतील काही वरिष्ठांची फितुरीही त्याच्या लक्षात येते. आता त्याला दुहेरी धोक्यातून वाट काढीत माजी पंतप्रधानांना वाचवायचं असतं. दिल्लीतील त्याचे टॉप बॉस रॉबिन दत्त (सिद्धार्थ बसू) त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. तेही माजी पंतप्रधानांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. मात्र, शेवटी दैवाचे फासे असे काही पडतात, की विक्रमला यट निअर... यट सो फारअसं म्हणायची वेळ येते. मानसिकदृष्ट्या खचलेल्या अवस्थेत तो कसौलीला निघून जातो. तेथे एका चर्चमध्ये फादरना ही सर्व हकीगत सांगतो आणि फ्लॅशबॅक तंत्रानं गोष्ट आपल्यापुढं उलगडत जाते.
सुजित सरकारनं पहिल्या फ्रेमपासून शेवटपर्यंत या सिनेमातील प्रतिपाद्य विषयाचं एक गांभीर्य कायम ठेवलं आहे. त्यामुळंच हा आपल्या वेदनादायी भूतकाळाचा एक अस्वस्थ करणारा अनुभव ठरतो. सुजितला सर्वच कलाकारांनी मनापासून साथ दिली आहे. यात विशेष उल्लेख करावा लागेल तो जॉन अब्राहमचा. त्यानं मोठ्या मेहनतीनं यातला विक्रम साकारला आहे. त्याच्या कारकिर्दीतील ही एक महत्त्वाची भूमिका ठरावी. नर्गिस फाकरी, जॉनच्या पत्नीचं काम करणारी राशी खन्ना आणि सिद्धार्थ बसू यांनीही आपापली कामं जीव ओतून केली आहेत. बालाचं काम करणारा प्रकाश बेलवडी आणि अण्णा भास्करनचं काम करणारा अजय रत्नम हे दक्षिणेतले नटही लक्षात राहतात. राजीव गांधींची हत्या करणारी धनू, शिवरासन आदी मंडळीही जशीच्या तशीसाकारण्यात वेषभूषाकारांनी यश मिळवलं आहे. सिनेमाचं संगीत व पार्श्वसंगीत शंतनू मोईत्रा यांचं आहे. त्या आघाडीवरही सिनेमानं जबरदस्त कामगिरी केली आहे.
थोडक्यात, अजिबात वेळ न दवडता जाऊन पाहावी अशी ही कलाकृती आहे.
--- 

निर्मिती : व्हायाकॉम १८ मोशन पिक्चर्स, जेए एंटरटेन्मेंट
दिग्दर्शक : सुजित सरकार
पटकथा : सोमनाथ डे, शुभेंदू भट्टाचार्य
संगीत : शंतनू मोईत्रा
कालावधी : दोन तास दहा मिनिटे (यू/ए)
प्रमुख भूमिका : जॉन अब्राहम, नर्गिस फाकरी, सिद्धार्थ बसू, राशी खन्ना, प्रकाश बेलवडी, अजय रत्नम
दर्जा : ****
---
(पूर्वप्रसिद्धी - २४ ऑगस्ट १३, महाराष्ट्र टाइम्स पुणे आवृत्ती) 

17 Aug 2013

फर्स्ट डे फर्स्ट शो - वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा




‘दोबारा’ देखी, तो अकल बुरा मान जाएगी...
----------------------------------------------------------------------------------------

‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई - दोबारा’ या मुळात मुंबईच्या लोकलसारख्या (आणि वर ‘दोबारा’ हा शब्द जोडल्याने आठ डब्यांऐवजी बारा डब्यांच्या लोकलएवढ्या) लांबलचक नावाचा आणि जवळपास पावणेतीन तास एवढ्या लांबलचक वेळेचा सिनेमा एकदा बघितल्यावर त्यातल्या नायकाचीच भूमिका करणाऱ्या व्हिलनचा संवाद थोडा बदलून म्हणावंसं वाटतं - अगर मैंने ये फिल्म ‘दोबारा’ देखी, तो मेरी अकल बुरा मान जाएगी!




‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’ हा या सिनेमाचा पहिला भाग आणि त्यानंतर ‘डर्टी पिक्चर’सारखा ‘बुम्बाट’ सिनेमा देणाऱ्या मिलन लुथरियानं हा सिनेमा दिग्दर्शित केलाय. म्हणजे सिनेमाच्या सुरुवातीला तशी पाटी येते, म्हणून असं म्हणायचं एवढंच. बाकी मिलननं या सिनेमात केवळ तीच नाही, तर पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत फक्त पाट्याच टाकल्या आहेत, हे पहिल्या रिळातच लक्षात येतं.
साठच्या दशकात मुंबईत संघटित गुन्हेगारीचा झालेला उदय, त्यानंतर एकेका डॉनची भाईगिरी, दादागिरी आणि त्यांची दहशत याच्या दंतकथा प्रसिद्ध आहेत. त्यावर अनेक दिग्दर्शकांना सिनेमे काढण्याचा मोह झाला. या भाईलोकांचा हिंदी चित्रपटसृष्टीवर असणारा वचक आणि त्यांचं ‘लव्ह-हेट’ नातं याचंही एक सुप्त आकर्षण अनेकांना आहे. दाऊद इब्राहिम हा या कुख्यात भाईलोकांमधला सर्वांत नीच, पाताळयंत्री माणूस. मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आता उंदरासारखा पाकिस्तानात लपून बसलेला हा भ्याड माणूस सिनेमाचा विषय नक्कीच होऊ शकतो. मात्र, देशाचा मोस्ट वाँटेड गुन्हेगार असलेल्या या माणसावर त्याच्या नावाने सिनेमा काढायला सिनेमावाली मंडळी घाबरतात. मग खोटं नाव देऊन आणि ‘सर्व पात्रं काल्पनिक’ असं म्हणून सुटका करून घेता येते. मिलनही तेच केलंय. या सिनेमात दाऊदचं नाव त्यानं केलं आहे शोएब. अर्थात सुरुवातीला यातली सर्व पात्रं काल्पनिक आहेत, अशी पाटी मात्र नाही. तेव्हा दिग्दर्शकाच्या मनातल्या गोंधळाला येथूनच सुरुवात होते.
‘वन्स अपॉन’चा पहिला भाग निखालस गुन्हेगारीपट होता. हाजी मस्तान, करीम लाला आणि वरदा या अट्टल तस्करांकडून मुंबईच्या अधोविश्वाची सत्ता दाऊदकडं कशी जाते, याची नीटस मांडणी मिलननं त्या सिनेमात केली होती. या सिनेमात दाऊद मुंबईत कसा जम बसवतो आणि त्यानंतर या शहरात काय काय धंदे करतो, येथपासून मुंबईच्या बॉम्बस्फोटापर्यंतचा प्रवास तो दाखवील, अशी स्वाभाविक अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षांना सुरुंग लावून दिग्दर्शक एक (कथित) प्रेमत्रिकोणाची कथा आपल्यासमोर मांडतो. अर्थात त्यात चूक काहीच नाही. त्यानं ही कथा नीट मांडली असती, तर या अपेक्षाभंगाचंही दुःख झालं नसतं. मात्र, त्यानं ही कथाही धड मांडलेली नाही. त्यामुळं अपेक्षाभंगाचं दुःख ‘दोबारा’ वाट्याला येतं.
या सिनेमाच्या सुरुवातीपासूनच सतत काही तरी बिनसल्याचा फील येतो. आधी दोन मुलांच्या रेसचं दृश्य येतं. त्यानंतर खुद्द शोएबचं (अक्षयकुमार) दर्शन होतं. या दोन मुलांना कामावर ठेवण्याचा आदेश शोएब आपल्या माणसांना देतो. ही दोन मुलं म्हणजेच अस्लम (इम्रान खान) आणि देढटांग (पितोभाष त्रिपाठी) नंतर त्याचे खास विश्वासू माणसं होतात. त्यानंतर एक-दोन रिळं इकडं-तिकडं चाचपडल्यानंतर सिनेमात नायिकेचं म्हणजेच जस्मिनचं (सोनाक्षी सिन्हा) आगमन होतं. जस्मिनची एकाच वेळी शोएब आणि अस्लमशी ओळख होते आणि दोघेही एकदम तिच्यावर प्रेम करू लागतात. स्वाभाविकच कथा एकदम या प्रेमत्रिकोणाकडं झुकते. त्यानंतर भाईची गुंडगिरी साइड-बाय-साइड आणि लव्हस्टोरी मुख्य ट्रॅकवर चालते. ती शेवटपर्यंत आपला कंटाळा घालवू शकत नाही.
अक्षयकुमारचा गेटअप आणि एकूण लूक चांगला आहे. तरीही तो ‘दाऊद’ वाटत नाही. चित्रपटातील पहिला संवाद म्हणताना त्यानं आवाजाची एक विशिष्ट पट्टी (पीच) राखली आहे. विशेष म्हणजे शेवटपर्यंत त्यानं ती सोडलेली नाही. मात्र, सदैव त्याला त्याच पीचमध्ये ऐकताना कंटाळा येतो. तीच गोष्ट संवादलेखक रजत अरोराची. प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकायचा अशा इराद्याने त्यानं या सिनेमाचे संवाद लिहिले आहेत. ‘अगर मैं अच्छा इन्सान बना, तो मेरी पहचान बुरा मान जाएगी’ हे किंवा असलेच अनेक संवाद आपण प्रोमोजमध्ये पाहिले आहेत. हे सातत्यही दाद देण्यासारखे असले, तरी कुठलीही व्यक्ती सदैव टाळ्याखाऊ वाक्यांतच कशी बोलेल? आपण रोज पुरणपोळी किंवा बिर्याणी खातो का? पण मिलन-रजतची पात्रं प्रत्येक संवाद अगदी टेचात उच्चारतात. ते काही काळानं अत्यंत विनोदी वाटू लागतं. शिवाय प्रत्यक्षात विनोद म्हणून लिहिलेले संवाद अश्लीलतेकडं झुकल्यानं बऱ्याच ठिकाणी सेन्सॉरला ‘बीप’ वाजवावं लागलं आहे. तरी लोकांना व्हायचा तो ‘अर्थकोर्स’ होतोच!
सोनाक्षी सिन्हाची कामगिरी बरी असली, तरी शेवटच्या दृश्यात ती कर्कशपणे शोएबवर ओरडताना बघवत नाही. तीच गोष्ट इम्रान खानची. या चिकन्याचुपड्या हिरोला अस्लमची भूमिका शोभलेली नाही. काही काही दृश्यांत टाळ्याखाऊ संवाद बोलताना त्याची कुचंबणा झालेली स्पष्ट जाणवते. मात्र, अस्लमची प्रेमी म्हणून जी शेड आहे, ती त्यानं चांगली रंगवली आहे. पितोभाष त्रिपाठीनं साकारलेल्या ‘देढटांग’ची भूमिका लक्षात राहणारी आहे. महेश मांजरेकरचा रावल हा खलनायक लिखाणातच फार वाव नसलेला आहे. त्यामुळं जस्मिनला जखमी करण्यापलीकडं त्यानं फार काही साधलेलं नाही.
पहिल्या सिनेमातली गाणी चांगली होती. या सिनेमात मात्र प्रीतमनं काहीशी निराशा केली आहे. ‘तैयबअली प्यार का दुश्मन हाय हाय’ या ‘अमर अकबर अँथनी’त ऋषी कपूरनं साकारलेल्या जबरदस्त लोकप्रिय गाण्याचं नवं रूप या सिनेमात पाहायला मिळतं. इम्राननं या गाण्यात धमाल केली आहे.
मात्र, असे काही तुरळक प्रसंग सोडले, तर संपूर्ण सिनेमा अत्यंत कंटाळवाण्या वेगानं पुढं सरकतो. त्यामुळं एकदा हा सिनेमा बघणारा माणूस ‘‘दोबारा’ देखी, तो मेरी अकल बुरा मान जाएगी...’ असं म्हणणार यात शंका नाही.
---
निर्मिती : बालाजी मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक : मिलन लुथरिया
लेखक, संवाद : रजत अरोरा
संगीत : प्रीतम
प्रमुख भूमिका : अक्षयकुमार, इम्रान खान, सोनाक्षी सिन्हा, पितोभाष त्रिपाठी, महेश मांजरेकर
दर्जा : **
---
(पूर्वप्रसिद्धी - १७ ऑगस्ट २०१३, महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती)

10 Aug 2013

फर्स्ट डे फर्स्ट शो - चेन्नई एक्स्प्रेस

चालो, ये पिच्चर देखेगी...




अय्यय्यो, रामा, शिवा, गोविंदा... शाहरुखा, दीपिका, रोहिता... क्या पिच्चर बनाई! क्या पिच्चर बनाई! चेन्नई एक्स्प्रस्स... हमारी गाव की नाम की पिच्चर... नंबर वन्न... फुल्ल यंटरटनमंट्ट... यंटरटनमंट्ट... और्र यंटरटनमंट्ट! हिरो कैसा यकदम चिकना... हिरोइन भा कैसा यकदम लंबा, लंबा और ब्यूटीफुल्ल, ब्यूटीफुल्ल... दोनों के गाल्ल पर डिम्पल्ल, डिम्पल्ल... और्र स्टोरी यकदम सिम्पल्ल... सिम्पल्ल... यन्ना रास्कला... मैं मीना, अपनी पूना की मीना... तुम को बोलती - चालो, हम-तुम ये पिच्चर देखेगी... फिर देखेगी... और्र फिर देखेग्गी!
...रोहित शेट्टीच्या 'चेन्नई एक्स्प्रेस' या नव्या हिंदी सिनेमाविषयी खरं तर याच भाषेत लिहायला हवं. 'जब तक है जान'च्या वेळी काहीसा ढपलेला वाटलेला आणि आता पुन्हा फॉर्मात आलेला शाहरुख खान, त्याला दीपिका पदुकोणच्या अप्रतिम अभिनयाची मिळालेली साथ आणि सध्या 'हात लावीन तिथं शंभर कोटी' असा परीस गवसलेल्या रोहित शेट्टी नामक हलवायानं पुन्हा एकदा जमविलेली भट्टी... यामुळं 'चेन्नई एक्स्प्रेस' हा एक प्रेक्षणीय अनुभव ठरतो. मुख्य प्रवाहातल्या हिंदी सिनेमाकडून प्रेक्षकांच्या ज्या ज्या अपेक्षा असतात, त्या हा सिनेमा पूर्ण करतो. त्यामुळं 'अडीच तास डोक्याला नो त्रास' हा मूलमंत्र जपणाऱ्या कोणाही प्रेक्षकाला आपले (वाढीव रेटचे) पैसे वसूल झाल्याचं समाधान 'चेन्नई एक्स्प्रेस' नक्कीच मिळवून देतो.
नायक राहुल (शाहरुख) त्याच्या आजीच्या आग्रहावरून आजोबांच्या अस्थी रामेश्वरमला विसर्जित करण्यासाठी निघाला आहे. खरं तर त्यानं मित्रांसोबत परस्पर गोव्याला जाण्याची योजना आखली आहे. मात्र, स्टेशनवर सोडायला आजी आल्यानं त्याला ट्रेनमध्ये बसण्याचं नाटक करावं लागतं. इथं त्याला नायिका मीना (दीपिका) भेटते. तिचे वडील तमिळनाडूतील एका गावातील डॉन आहेत. दुसऱ्या गावातील डॉनच्या मुलासोबत तिचं लग्न ठरवल्यानं ती पळून आली आहे. मात्र, तिचे आडदांड चुलतभाऊ तिला पकडून पुन्हा गावाकडं निघालेले आहेत. राहुल मीनासोबत तिच्या गावी पोचतो. बरंच भवती-न-भवती झाल्यानंतर दोघं पळून जातात. सिनेमाच्या उत्तरार्धात मग प्रेमाचा ट्रॅक सुरू होतो. राहुल व मीना जवळच्याच एका गावात राहतात. तिथं एक लग्नसोहळा सुरू असतो. तिथं या दोघांना नवरा-बायको बनून राहावं लागतं. काही 'रस्म' (रस्सम नव्हे) पूर्ण कराव्या लागतात. त्यातून दोघांमधलं 'बाँडिंग' वाढत जातं. मग शेवटी रोहित शेट्टी स्टाइल गाड्यांची उडवाउडवी, तुफान मारामारी, शाहरुखचं एक भावस्पर्शी भाषण आणि मग गोड शेवट...
या सिनेमाचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो संपूर्ण कुटुंबाला एकत्र बघून छान एन्जॉय करता येतो. कुठलीही बीभत्सता किंवा हल्लीच्या हिंदी सिनेमांत वाढलेली (नसती) फिजिकल इंटिमसी यांना या करमणूकपटात अजिबात स्थान नाही. साधारण आठ ते बारा वयोगटातील मुले (आणि त्या मानसिकतेचे कुठल्याही वयाचे प्रेक्षक) डोळ्यांसमोर ठेवून रोहितनं चेन्नई एक्स्प्रेस काढला आहे. त्यामुळं मारामारीचे काही दाक्षिणात्य शैलीचे भडक प्रसंग सोडले, तर संपूर्ण सिनेमावर फील गुड क्षणांची प्रसन्न छाप आहे. आणि हेच या चित्रपटाचं मोठं बलस्थान ठरलं आहे. शाहरुख खान अनेकदा ओव्हरअॅक्ट करतो. त्याचे ते विशिष्ट शैलीतले मॅनरिझम (तिरकं डोकं करून मान झुकवणं, किंवा ओठांची विचित्र हालचाल करणं, किंवा गाण्यात दोन्ही हात फैलावून कमरेत तिरकं वाकणं वगैरे) कधी कधी बोअर होतात. पण या सिनेमात रोहितनं शाहरुखचे हे सगळं गुण-अवगुण योग्य प्रमाणात वापरल्यानं ते कंटाळवाणे वाटत नाहीत. किंबहुना ते प्लस पॉइंट ठरतात. स्वतः शाहरुखनं अनेक प्रसंगात त्याची अभिनेता म्हणून असलेली छाप उमटवली आहे. त्यातून शाहरुख पुन्हा फॉर्मात आल्याचं जाणवतं. त्याला अतिशय अप्रतिम साथ दिलीय ती दीपिकानं. तमिळ मुलगी मीनाची भूमिका तिनं तंतोतंत साकारली आहे. (त्यात ती 'पूना'ची राहणारी आहे, हे कळल्यावर आणि मध्येच एकदा ती 'तुझ्या नानाची टांग', 'तुझ्या आयचा घो' असं शाहरुखला सुनावते, तेव्हा टाळ्याच घेते.) तिची हिंदी उच्चारणाची एक विशिष्ट शैली तिनं शेवटपर्यंत कायम ठेवली आहे. ती दाक्षिणात्य वळणाची हिंदी ऐकायला खूप गोड वाटते. तिनं या सिनेमात साकारलेला स्वप्न पडण्याचा प्रसंग पाहण्यासारखा आहे.
'चेन्नई एक्स्प्रेस' ही प्रेमकहाणीच आहे. पण तिची ट्रीटमेंट अगदी वेगळी आहे. सुरुवातीपासून या सिनेमानं एक विनोदी ढंग अंगीकारला आहे. अशा प्रसंगी नायकाला चॅप्लिनसदृश कारनामे करायला लावण्याचा मोह अगदी स्वाभाविक आहे. मात्र, शाहरुखची अभिनयप्रकृती पाहून रोहितनं तो मोह टाळला आहे, ही बाब विशेष अभिनंदनीय. त्याऐवजी त्यानं शाहरुखच्या यापूर्वीच्या लोकप्रिय भूमिकांची आठवण करून देणारे प्रसंग पेरून हा ढंग खुलवला आहे. त्या दृष्टीनं सुरुवातीला ट्रेनमध्ये शाहरुख-दीपिका शाहरुखच्या लोकप्रिय गाण्यांच्या भेंड्या खेळतात, तो प्रसंग पाहण्यासारखा आहे. याशिवाय सिनेमातले संवादही चटपटीत आहेत. शाहरुखच्या लोकप्रिय सिनेमांतल्या गाण्यांसोबत लोकप्रिय संवादही (डोण्ट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ द कॉमन मॅन, माय नेम इज राहुल, आय अॅम नॉट टेररिस्ट इ.) जागोजागी वापरण्यात आले आहेत. हे संवाद शाहरुखच्या फॅन्सना नॉस्टॅल्जिक करतात आणि उत्स्फूर्त टाळ्याही मिळवतात. (अर्थात एका मोबाइल हँडसेटची किमतीसकट केलेली जाहिरात, भले तो हँडसेट महागडा असला, तरी फारच 'चीप' आहे!) असो.
मुलींना अजूनही पती निवडण्याचं स्वातंत्र्य नाही, हे सांगताना शाहरुखनं शेवटाकडे जो एक लांबलचक संवाद म्हटला आहे, तो त्यानं अगदी मनापासून साकारल्याचं जाणवतं. या दृश्याला तो टाळ्या घेतो, यात आश्चर्य नाही.
सिनेमात मोजकीच गाणी आहेत. शेवटच्या टायटल्सना येणारं गाणं धरून पाच गाणी आहेत. त्यातही दुसऱ्या भागात दोन गाणी अगदी लागोपाठ येतात. ही गाणी अगदीच ग्रेट नसली, तरी सुमारही नाहीत. विशेषतः शाहरुख आणि दीपिकाचं एक रोमँटिक ड्युएट पैसावसूल आहे. पूर्वार्धात येणारं आयटेम साँगही ठेकेदार आहे. चित्रपटात दूधसागर धबधब्याचं अप्रतिम दर्शन घडवलंय. रामेश्वरम आणि तिथल्या रेल्वेपुलाचं दर्शनही छान. एकूणच रेल्वेचे सर्व प्रसंग खास चित्रित केलेयत. एकूणच, सिनेमॅटोग्राफी एक नंबर आहे.
(अर्थात कल्याणहून कर्जतला चाललेली ट्रेन सिंगल ट्रॅकवरून आणि डिझेल इंजिन लावून का धावते, हे विचारायचं नाही. सुरुवातीला म्हटलं, तसं कोणतेही तर्कसुसंगत विचार मनात न आणता फक्त करमणूक म्हणून पाहण्याची ही चीज आहे. शिवाय या हिंदी सिनेमात एवढी तमीळ वापरली आहे, की या सिनेमाची भाषा हिंदी-तमिळ अशीच लिहायला हवी होती. शिवाय सबटायटल्स नसल्यानं एवढे तमीळ संवाद झेपत नाहीत. यामागचं लॉजिकही दिग्दर्शकानं सिनेमात सूचकपणे सांगितलंय. पण तरीही हे तमिळी संवादाचे खडे कमी करायला हवे होते. असो.)
आणि हो, शाहरुखनं दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर जाहीरपणे सांगितल्यानुसार, या सिनेमापासून त्याच्या नायिकेचं नाव त्याच्याआधी पडद्यावर झळकायला सुरुवात झाली आहे. तेव्हा सुरुवातीची टायटल्स चुकवू नका आणि शेवटची तर तुम्ही चुकवू शकणारच नाही. कारण तिथं साक्षात रजनी सरांचं (भले फोटोंच्या रूपानं का होईना) दर्शन घडतं.
सो... बोर्ड ऑन धिस एक्स्प्रेस फॉर फुल्ल फन जर्नी....
वाई वेट्टिंग... चालो....
---
निर्माते - रेड चिलीज, यूटीव्ही मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक - रोहित शेट्टी
संगीत - विशाल-शेखर
संवाद - साजिद-फरहाद
प्रमुख भूमिका - शाहरुख खान, दीपिका पदुकोण, सत्यराज, निकेतन धीर
दर्जा - ****

(पूर्वप्रसिद्धी - १० ऑगस्ट, महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती)
---