जगणं मस्त मजेचं... १८-५
------------------------------------
(सकाळी नऊची वेळ... कुणाल घाईत...)
कुणाल - रेणू, चल हं पटकन... मी गाडी काढतो तोपर्यंत पार्किंगमधून...
रेणू - अरे हो, तू हो पुढं... मी आलेच सायलीला घेऊन...
कुणाल - अरेच्चा, सायली पण आहे नाही का आपल्याबरोबर? चल, मग तू पटकन...
(कार इंजिन स्टार्ट केल्याचा आवाज... मग हॉर्नचा आवाज...)
कुणाल - चला, चला, पटकन...
रेणू - हो रे... सायलीच्या आईशी जरा बोलत होते... बाजारातून येताना तिचं पण काही सामान आणायचंय. ते सांगत होती...
कुणाल - हो, पण आता चला लवकर. नाही तर सिनेमा बुडेल आपला. आणि मला पहिल्या फ्रेमपासून पाहायचा असतो तुला माहितीय...
रेणू - माहितीय महाराज, चला आता...
सायली - काका, फास्ट मार जरा... वेळेत पोचायला पाहिजे.
कुणाल - क्या बात है सायली. तू खरं ओळखलंस बघ मला. नाही तर ही रेणू.... सारखी आपली स्पीड कंट्रोल करायला सांगत असते मला... (हसतो)
रेणू - मी बरोबरच सांगत असते. सायली, आपण पोचू गं वेळेत. तू उगाच त्याला निमित्त पुरवू नकोस फास्ट चालवायला...
कुणाल - अगं, आपल्या शहरातल्या या गर्दीत मला कितीही इच्छा झाली, तरी आपण ४०-५० च्या वरच्या स्पीडनं गाडी चालवू शकणार आहोत का? मला लाख 'फॉर्म्युला वन'मध्ये चालविल्यासारखी कार चालवायची असेल. पण इथं रस्त्यावर उतरलो, की माझा ट्रकवाला होतो की नाही... तोही सोळा चाकंवाला ट्रकवाला...
सायली - मावशी, फास्ट कार चालवता येणं हेच कूल असतं बरं का... आमचा बाबा तर १४० च्या स्पीडनं चालवतो गाडी एक्स्प्रेस-वेवर...
रेणू - ए बाई, इथं बोलतेयस ते ठीक आहे. बाकी कुठं बोलू नकोस. एवढ्या स्पीडनं कार चालवणं हा गुन्हा आहे माहितीय का तुला?
कुणाल - खरंय बरं का सायली. मी बोलतोच निखिलशी एकदा...
सायली - काका, तू बोलच बाबाशी... पण आत्ता फास्ट चालव ना गाडी... आपली सिनेमाची स्टार्ट मिस नाही झाली पाहिजे.
रेणू - अगं हो हो... डोण्ट वरी. काका नीट आणि वेळेत नेईल आपल्याला... हो ना रे कुणाल?
कुणाल - येस्स... अगदी राष्ट्रगीताला आपण पोचतो की नाही पाहा थिएटरमध्ये... बाय द वे, सायली, तू आता दहावीत गेलीस ना गं?
सायली (फुरंगटून) - ए नाही रे काका... नववीत गेलेय आत्ताशी... मी एवढी मोठी आहे का?
कुणाल (हसतो) - अगं, एवढी मोठी म्हणजे काय? आत्ता पुढच्या वर्षी तर जाशीलच ना दहावीत? मग?
रेणू - आमचं पात्र तर अजून केवढंसं आहे... कधी मोठं व्हायचं? देवा!
सायली - पात्र? म्हणजे काय गं मावशी?
रेणू (हसते) - अगं, साराला म्हटले मी पात्र... मराठीत असं म्हणायची पद्धत आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, काय कॅरेक्टर आहेत एकेक.... तसं मराठीत 'पात्र' म्हणतात...
सायली - अगं, पण 'पात्र' म्हणजे एलिजिबल ना? आमच्या मराठीच्या टीचरनी हा अर्थ सांगितला होता आम्हाला...
रेणू - अगदी बरोबर... मराठीत एकाच शब्दाचे अनेक अर्थ होतात. पात्र म्हणजे कॅरेक्टर पण आणि पात्र म्हणजे एलिजिबल पण... अजूनही एक अर्थ आहे 'पात्र'चा? माहितीय?
सायली - नाही गं मावशी...
रेणू - अगं, पात्र म्हणजे भांडंसुद्धा.
(तेवढ्यात ब्रेक दाबल्याचा आवाज येतो...)
कुणाल (वैतागून) - हे बघितलं का पात्र? कशी गाडी चालवतात राव लोक? डावीकडून येऊन मला आडवं जाऊन हा उजवीकडं वळतोय मूर्ख... अशांना तातडीनं वाहन चालवण्यासाठी अपात्र ठरवलं पाहिजे...
रेणू - खरंच रे... ट्रॅफिक सेन्स नावाचा काही प्रकारच राहिलेला नाही लोकांना... सीरियसली...
सायली - आमच्या शाळेसमोर परवा असाच एक माणूस वेडपटासारखा येऊन धडकला आमच्या मुलींच्या ग्रुपला... त्या पूर्वाला एवढं लागलं ना...
कुणाल - काय सांगतेयस? मग तुमच्या शाळेच्या सिक्युरिटीनं पकडला की नाही त्या गाढवाला?
सायली - अरे, मुलींनीच त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो पळून गेला. पण इशितानं त्याच्या बाइकचा नंबर लक्षात ठेवला. ती नंबर्समध्ये एक्स्पर्ट आहे अरे एकदम...
कुणाल - ग्रेट! नंबर महत्त्वाचा. पूर्ण नंबर असेल तर पोलिस पाच मिनिटांत शोधून काढतात त्या ड्रायव्हरला...
सायली - राइट... आमच्या टीचरनी तो नंबर दिला पोलिसांना. पोलिसांनी लगेच पकडलं त्याला. पूर्वाच्या बाबांनी कम्प्लेंट दिलीय. आता त्या माणसाला चांगली शिक्षा होईल.
रेणू - पण सायली, तुम्ही पण काळजी घ्या हं... हल्ली मुलांना फार सवय असते. घोळका करून रस्त्याच्या मधोमध उभे राहतात. आपल्याच तंद्रीत असतात. काय बोलत असता देव जाणे...
सायली - अगं मावशी. ते आमचं सिक्रेट असतं. वर्गात सारखे एकापाठोपाठ एक लेक्चर असतात. आम्हाला बोलायलाच मिळत नाही. होमवर्क पण एवढा असतो ना! मग शाळा सुटल्यापासून ते बसमध्ये जाईपर्यंत आमच्याकडं जो वेळ असतो, तेव्हाच आम्ही बोलतो.
कुणाल - हल्ली या आठवी-नववीच्या मुलांकडं सर्रास मोबाइल दिसतात. तेही साधे नाही. स्मार्टफोन! आणि मग ही पोरं, तिथं रस्त्यात सेल्फ्या काढत बसतात. काय गं सायली, खरं ना?
सायली - अरे काका, हो! सेल्फी काही रोज काढत नाही. आमच्या ग्रुपमध्ये कुणाचा बर्थडे असला, किंवा काही स्पेशल ऑकेजन असलं ना, तरच आम्ही सेल्फी काढतो.
रेणू - अगं, केवढ्याशा गं तुम्ही मुली... तुम्हाला कशाला हवेत सेल्फी अन् बिल्फी?
सायली - काय गं मावशी! कसली बोअर आहेस... सेल्फी काढून 'इन्स्टा'वर अपलोड करणं ही सगळ्यांत बेश्टेश्ट आणि कूल थिंग आहे, यू नो...
कुणाल - आईशप्पथ... सायली, तू आणि तुझ्या मैत्रिणी महान आहात... नाही नाही, कूल महान आहात... (हसतो) पण काय गं, तुला पण दिलाय का स्मार्टफोन निखिलनी?
सायली (वैतागून) - नाही ना... माझ्याकडं हा साधा, बटणाचा, विदाउट इंटरनेट फोन आहे. मला तर तो बाहेर काढायची पण इतकी लाज वाटते ना...
रेणू - अगं, पण तुझ्या आई-बाबांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. तुम्हाला आत्ता काही गरज नाहीय त्या स्मार्टफोनची. पुढं मोठं झाल्यावर सगळं मिळणारच आहे की...
सायली - मावशी, तू सेम आईसारखं बोलतेयस. तुम्ही दोघीही बोअर आहात.
(कुणाल हॉर्न वाजवतो...)
कुणाल - हे बघा, आणखी एक काशिनाथराव गेले आडवे...
रेणू (आश्चर्याने) - काशिनाथराव? तू ओळखतोस त्याला...?
कुणाल (मोठ्यांदा हसतो) - अगं काय गं रेणू, तुला ही आमची भाषा माहिती नाही का? मध्ये मध्ये तडमडणारे लोक असतात ना, ते काशिनाथ असतात. म्हणजे मी त्यांना तसं म्हणतो. कळलं का? बाप रे! हा सिग्नल लागला की संपलो... खूप जॅम दिसतंय समोर... अवघड आहे.
सायली - काका, पोचू ना रे वेळेत आपण? मला स्टार्ट मिस नाहीय करायची....
कुणाल - सायली बेटा, आपण ना अॅक्चुअली, तुमच्या त्या डोरेमॉनसारखं स्वतःच एक हेलिकॉप्टर होऊन हवेतून उडत जायला पाहिजे होतं... तरच आपण वेळेत पोचू असं वाटतंय.
सायली - काका, तुला डोरेमॉन माहितीय? कसला कूल आहेस तू...
रेणू - अगं बाई, सारामुळं आम्हाला त्या डोरेमॉन आणि नोबिताचं सगळं खानदान पाठ झालंय.
सायली - भारी ना! डोरेमॉनसारखे ते हेलिकॉप्टर पंख हवेत आपल्याला. डोक्यावर पंखा सुरू आणि आपण हवेत... झूम... कसलं कूल...
कुणाल - रेणू, ऐकतीयस ना! सायलीची पिढी सतत कूल, बोअर, भारी आणि बेश्टेश्ट असलंच बोलतीये. यांची ही कोड लँग्वेज असल्यासारखीच आहे. आपल्याला ही समजली पाहिजे गं...
रेणू - अरे तुला काय वाटतंय? सारामुळं आपल्याला येत्या काही वर्षांत हे सगळं माहिती होणारच आहे. या नव्या पिढीची भाषा, त्यांचे विचार, त्यांचं राहणीमान, त्यांचे अॅटिट्यूड, त्यांचे स्वभाव सगळं सगळं आपल्याला माहिती असणारच आहे. निदान मला तरी नक्कीच!
कुणाल - हो गं... माहिती पाहिजेच. सायली, तू माझ्याशी गप्पा मारायला येत जा...
सायली - येईन की काका... कसलं कूल ना... कॉफी विथ कुणाल काका.... हा हा हा...
कुणाल - देवा... म्हणजे तुला रोज कॉफी द्यावी लागणार की काय मला, सायली? करू करू. रोज धमाल करू.
रेणू - सध्या सुट्ट्या आहेत. आत्ता तर नक्कीच धमाल करू. येत जा की गं सायली साराबरोबर खेळायला... अर्थात ती लहान आहे म्हणा. तुला लगेच बोअर वगैरे होईल, नाही का?
सायली - नाही गं मावशी. डोण्ट वरी. मी येईन आणि खेळवीन साराला... आमच्याकडं माझा मावसभाऊ चिन्मय येत असतो. त्याला पण मी खेळवत असते.
कुणाल - अजून काय काय करतेस सायली? खरं तर तुला एवढीशी बघितलीय... आता केवढी मोठी झालीस... हिचा जन्म झाला तेव्हा आपण हिला बघायला गेलो होतो हॉस्पिटलमध्ये, आठवतंय का रेणू?
रेणू - तर! जाई तर रडायलाच लागली मला बघून... तिला एवढा आनंद झाला होता!
सायली - हो? सही यार... तुम्ही कसले कूल आहात. बेबी झालं तर रडता वगैरे...
कुणाल (खाकरतो) - अहम्, अहम्.... चला, विषय बदला... फार तपशील नकोयत...
रेणू (हसते) - काय रे, घाबरलास की काय?
कुणाल - सीरियसली अगं... आता आपण असंच बोलत राहिलो, तर सायलीकडून या विषयावरचं ‘ग्यान’ ऐकायची वेळ यायची...
सायली (वैतागून) - काका, तू बोअर आहेस. आत्ता अगदी बाबासारखं बोललास. आय डिसलाइक...
रेणू - बघ कुणाल, सायलीचा एक लाइक मिळवायची संधी तू घालवलीस... तिनं तुला डिसलाइक केलंय...
कुणाल - देवा... कठीण आहे. आपलं कसं झालंय माहिती का रेणू? आपली सँडविच पिढी झालीय.... म्हणजे आपण आपल्या आई-वडिलांचीही बोलणी खाल्ली आणि आता ही पुढची पिढीही आपल्यालाच बोलणार... आपण कधी आणि कुणाला बोलायचं?
रेणू (हसते) - अरे, असं काही नसतं. प्रत्येक पिढीला वाटतं, की आपल्याच पिढीनं फार त्रास सोसलाय. आणि असं ही पिढी, ती पिढी, किंवा ‘आमच्या वेळी असं नव्हतं’ टाइप कुणी बोलायला लागलं ना, की ती व्यक्ती म्हातारी झालीय असंच मी म्हणते.
सायली - काका, तू म्हातारा झालायस...
कुणाल - ए, काहीही काय, मी तुझ्याएवढाच आहे गं सायली... (हसतो) आणि रेणू, मी म्हातारा वगैरे झालेलो नाहीय मुळीच. पण मला खरंच असं वाटतं, की आपल्या आधीच्या पिढीनंही आपल्यावर हुकूमत गाजवली आणि आपण आता ती चूक टाळायची म्हणून आपल्या पुढच्या पिढीला मोकळीक देतोय. अर्थात हा आपला चॉइस आहे. पण परिणाम मात्र असा झालाय, की दोन्हींकडून आपलं सँडविच झालंय. वादच नाही.
रेणू - एवढा विचार नाही करायचा रे. ही सायली बघ, तिच्या लेखी गोष्टी एक तर ‘कूल’ असतात, नाही तर ‘बोअर’ असतात. आपल्याला असं जमलं पाहिजे. ही पिढी एवढी ‘सॉर्टेड’ आहे ना, तसं जमलं पाहिजे बघ कुणाल.
कुणाल - हे काही आपल्याला जमलं नाही. आपल्याला सगळ्यांतलं चांगलं तेवढं हवं असायचं. पण मग फरफट व्हायची. सगळं हवं, या नादात पूर्ण काहीच गवसलं नाही.
सायली - ए काका, तुम्ही फारच फिलॉसॉफिकल झालात रे. बोअर होतं मग मला. अजून किती लांब आहे रे मल्टिप्लेक्स? तोवर गाणी लाव ना मस्त अरिजितची....
रेणू - बघ, आवडनिवड कसं सगळं फायनल झालेलं आहे.
कुणाल - आलोच हं सायली बेटा आपण... आता गाणी वगैरे नको. आता डायरेक्ट पार्किंगमधून वर जाऊ. पाच मिनिटांत सिनेमा सुरू होईल बघ.
सायली - येय्ये... कसलं ग्रेट! हा सिनेमा अजून आमच्या ग्रुपमध्ये कुणीच बघितलेला नाहीय. तुमच्यामुळं मी आता शायनिंग मारून दाखवीन त्यांच्यासमोर... कूल...
कुणाल - अहाहा... लई भारी काम झालेलं आहे. म्हणजे आता तरी आम्ही कूल आहोत ना गं सायली...
सायली - काका, अरे, खरंच तुम्ही दोघं कूल आहात. मला त्यामुळंच आवडता. नाही तर मी आई-बाबा सोडून कुणाबरोबर तरी जाते का बाहेर? मावशीला माहितीय. कधीच जात नाही. पण तुमच्यासोबत मला मस्त वाटतं.
रेणू - थँक्यू गं सायली. अगं, तुझ्याकडून आम्ही कूल असल्याचं सर्टिफिकेट मिळणं हे फार महत्त्वाचं वाटतं. नाही तर आम्हाला वाटतं, की आपण आता या नव्या पिढीसमोर अगदीच जुने झालोय की काय...
कुणाल - पूर्वीच्या पिढ्यांना लवकर म्हातारपण येत नसे असं म्हणतात. आता चाळिशीतच आपण वयोवृद्ध झाल्याचा फील येतो मला तर...
सायली - काय रे काका... काहीही बोलतोस! तू तर जेव्हा तो गॉगल घालतोस ना, तेव्हा वरुण धवनपेक्षा भारी दिसतोस. खरंच...
कुणाल - आईशप्पथ... सायली, तू कसली गोड आहेस गं... चल, इंटरव्हलला तुला माझ्याकडून काय हवं ते घे...
रेणू - स्मार्ट आहे ती... त्यासाठीच तिनं माझं कौतुक न करता तुझं केलं...
सायली - काय गं मावशी? तू पण भारीच आहेस...
रेणू - अगं, मी त्याला असंच चिडवत होतेस. मला माहितीय तू मनापासून म्हणालीस ते. चिल...
कुणाल - व्वा, व्वा... आणि मंडळी, पार्किंग मिळालेलं आहे. मोठं काम झालेलं आहे... आता सिनेमा...
सायली - सहीच...
रेणू - चला, आता तीन तास बडबड बंद... फक्त सिनेमा पाहायचा, काय!
सायली व कुणाल - येस्स मॅम...
(हसतात...)
----
जगणं मस्त मजेचं... २५-५
-------------------------------
रेणू - कुणाल, अरे बास कर.... किती वेळ तो टीव्ही पाहणार आहेस?
कुणाल - रेणू, रेणू... अगं असं काय करतेयस? हा आपल्या देशाचा प्रश्न आहे... लोकशाहीचा प्रश्न आहे....
रेणू - अरे हो, पण गेले तीन दिवस सतत तेच ते बघून मला कंटाळा आलाय रे... आणि तू असा ते सतत बघत राहिल्यानं परिस्थिती बदलणारे का? मला तर राजकारण या नावाचाच तिटकारा आलाय अगदी...
कुणाल - असं नाही रेणू. अगं, आपल्या देशाची सत्ता आपण कुणाकडं द्यायची याचा हा महत्त्वाचा निकाल असतो. त्याकडं आपण गांभीर्यानं बघायला नको का? मला तर प्रत्येक घटना, घडामोडी जाणून घेण्यात इंटरेस्ट असतो.
रेणू - हो रे. पण सगळीकडं तेच तेच... मला खरंच बोअर झालंय. आणि तुला माहितीय ना, आज सई येणार आहे खूप दिवसांनी... आम्ही शॉपिंगला जाणार आहोत.
कुणाल - आणि मी काय करू?
रेणू (हसते) - तू बघ ना राजकीय बातम्या, तुझ्या त्या चर्चा आणि मतमतांतरं...
कुणाल - ए रेणू, मुळीच नाही हं... मी पण येणार तुमच्याबरोबर...
रेणू - यायचं तर चल बाबा. आमच्या शॉपिंग बॅगा उचलायला मदत तरी होईल.
कुणाल - आणि तुम्हाला ड्रायव्हर पण मिळेल ना आयता... चालेल ना?
रेणू - एक मिनिट. अरे हे बघ. सईचाच मेसेज. ती पोचतेय पाच मिनिटांत... तू आवर ना अरे...
कुणाल - अगं, आज मी खरं जिमला जाणार होतो. या बातम्यांच्या पायी गेले तीन-चार दिवस सगळंच शेड्यूल गंडलंय गं माझं... श्या...
रेणू - नाही नाही. असं कसं? बघ ना, अजून बघ टीव्ही. डोळे बघ जरा आरशात. कसले तांबारलेयत... सई आली तर तिला वाटेल, की सकाळी सकाळीच...
कुणाल - बास, बास हं... चेष्टा पुरे झाली. मी चाललोय आवरायला.
रेणू - जा आता...
(स्वतःशीच बोलते) किती पसारा करून ठेवलाय यानं हॉलमध्ये. आई गं... चहाचा कपसुद्धा तसाच... सोफ्यावर टॉवेल... मला ना, सुट्टी असूनही काही उपयोग नाही. सगळं घर आवरण्यातच केवढा वेळ जातो. पार्लरला जायचंही राहून गेलंय... सईनं हा अवतार बघितला तर काय म्हणेल? शी... वैताग आहे नुसता...
(तेवढ्यात बेल वाजते...)
रेणू - आले, आले.... (दार उघडते.) ये गं सई, ये. अगं, तुझीच वाट बघत होतो आम्ही.
सई - अगं, काय अवतार झालाय तुझा? आवरत होतीस का? आणि कुणालमहाराज कुठं आहेत? त्यानं अजून आवरलं नसेलच...
रेणू - काही विचारू नकोस बघ सई. सकाळपासून आमच्या घरीही तो रणसंग्रामच सुरू आहे...
सई - अगं, आमच्या घरीही तेच. खाली सोसायटीतही तेच... फेसबुक, व्हॉट्सअपवरही तेच... सतत राजकारण आणि राजकारण! मला तर हिमालयात पळून जावंसं वाटायला लागलंय...
(कुणाल डोकं पुसत येतो...)
कुणाल - मलाही घेऊन जा... (रेणूच्या अंगावर पाणी उडवतो...) हे असं छान छान गार वाटेल तुम्हाला... हा हा हा...
रेणू (वैतागून) - कुणाल, अरे काय हे? पाणी कसलं उडवतोयस?
सई - वा, वा... काय रोमँटिक दृश्य आहे!
रेणू - अगं, कसलं रोमँटिक आणि कसलं काय? सकाळी सकाळी हा लोळत टीव्ही पाहत बसणार आणि मी सगळं घर आवरणार...
कुणाल - ए रेणू, एरवी मी मदत करत नाही का गं? आज जरा एक्स्क्युज मी हं...
रेणू - तू शनिवारचं ब्रेकफास्टचं बघणार असंही ठरलं होतं आपलं महाराज. त्याचं काय झालं?
कुणाल - अगं, आज सई आलीय ना... बाहेरून ऑर्डर करतो ना... बोला, काय हवंय? साउथ इंडियन की मिसळ वगैरे?
सई - कुणाल, अरे, आम्हा दोघींना जरा बाहेर जायचंय... कळलं ना.... एक्स्क्युज अस हं...
कुणाल - अहो सईबाई, मी पण येणार आहे म्हटलं तुमच्यासोबत. बॅगा उचलायला आणि ड्रायव्हर म्हणून...
सई - अरे, काहीही काय? चल की असाच. मजा करू...
कुणाल - अगं, रेणू सोबत असताना मी मजा करू शकतो, असं वाटतंय का तुला?
रेणू - कुणाल, बास हं आता... आवरा लगेच... खरंच, निघू या...
कुणाल - बाय द वे, हिमालयावरून आठवलं. सई, अगं तू हिमालयात जाऊन आलीस ना? कसा काय झाला प्रवास तुला?
सई - अरे, फारच मस्त... हिमालय हे वेगळंच प्रकरण आहे. प्रेमप्रकरण म्हटलंस तरी चालेल. त्या भव्य आणि शुभ्र सौंदर्याच्या प्रेमात पडताच तुम्ही! माझी ही दुसरी वेळ होती. मागच्या वेळी आम्ही हिमाचलात गेलो होतो. या वेळी थेट काश्मीरमध्ये...
रेणू - सही यार! ए, मी अजून गेलेले नाहीय काश्मीरला. मला जायचंच आहे. कुणाल, ऐक नीट. मला जायचंच आहे.
कुणाल - अगं हो. आपल्याला जायचंच आहे.
सई - आता पर्यटकांनी गजबजणारी सगळीच ठिकाणं तशी कमर्शियल झालीयत. पण जरा वेगळा हिमालय पाहायला मिळाला तर प्रयत्न करा.
कुणाल - वर काश्मीरपासून ते थेट इकडं सिक्कीम, अरुणाचल प्रदेशापर्यंत सगळीकडं तो धवलगिरी पसरलाय. त्या रौद्रभीषण दर्शनानं हबकून जायला होतं सुरुवातीला...
सई - बरोबर आहे. आधी आपल्याला अनोळखी असतो ना तो... म्हणून तसं वाटतं. पण हळूहळू आपण त्याच्या अंगा-खांद्यावर खेळायचं. त्याच्या दोस्ती करायची... मला तर नंतर नंतर शुभ्र वस्त्रं परिधान केलेले, लांब पांढरी दाढी असणारे, उभं गंध लावणारे एखादे धीर-गंभीर आजोबा आपल्या अगदी लहानग्या नातीला मांडीवर खेळवताहेत, असं फीलिंग यायला लागलं.
रेणू - आई गं...!! किती गोड...! मला आता अजिबात राहवत नाहीये, बरं का कुणाल!
कुणाल - काय? काय म्हणायचंय नक्की तुला?
रेणू - गप रे... तसलं नाही. हिमालयाला सईनं दिलेली उपमा ऐकून मला आत्ताच्या आत्ता तिथं जावंसं वाटतंय, असा अर्थ होता त्याचा...
कुणाल - हुश्श! मग असं नीट सांग ना बाई... मी इथं केवढा घाबरलो होतो.
सई - ए... बास... निघायचंय ना?
रेणू - अगं, उपम्यावरून आठवलं. मी ब्रेकफास्टला उपमा केलाय. तो खाऊनच जाऊ.
कुणाल - अरे देवा... ब्रेकफास्ट घरीच आहे वाटतं. मला वाटलं, की 'खादाडेश्वर'ला आज देणं लागतोय आपण...
सई - त्याचं तर आपण गेल्या जन्मापासूनचं देणं लागतोय बहुतेक. 'रिण फिटता फिटेना' अशी अवस्था झालीय... (हसते)
रेणू - ते काहीही असलं, तरी आज ब्रेकफास्ट घरीच. तू हलला आहेस का जागेवरून कुणाल? मग वेळ किती गेला सकाळी, कळतंय का?
कुणाल - अगं हो हो... मी सपशेल माफीनामा लिहून देतो. पण आता खरंच घ्या खायला. सई, तू हिमालयाबद्दल छान सांगत होतीस. ते सांग ना पुढं...
सई - अरे हो. म्हणजे ते 'साद देती हिमशिखरे' आहे ना, ते अगदी खरं वाटतं. त्या भव्य गिरीशिखरांमध्ये काय जादू आहे ते कळत नाही.
कुणाल - अगं, भव्यता हीच जादू. काय होतं, की आपला निसर्ग केवढा अफाट आणि अचाट आहे हे आपल्याला तिथं गेल्यावर कळतं. हजारो किलोमीटर लांबीची बर्फाच्छादित जमीन, तिथल्या त्या शुभ्र, खळाळत्या नद्या, वेगवेगळ्या प्रकारची झाडं, जंगल आणि स्वच्छ हवा... बास! अजून काय पाहिजे...
सई - हे तर झालंच. पण यापलीकडं काही तरी आत्मिक कनेक्शन असावंसं वाटतं. म्हणजे ते सांगता येत नाही. पण आहे काही तरी ओढ लावणारं...
रेणू - तुम्ही आता मला फार त्रास देताय हं हे सांगून... मी अजून हे अनुभवलेलं नाही याची आता फार खंत वाटतेय...
कुणाल - रेणू, ठरलं... पुढच्या एप्रिल-मे महिन्यात आपण जाऊ या हिमालयात.
सई - अगं, जगभरातून लोक येतात. कुणी ट्रेकिंगला येतात, कुणी गिर्यारोहण करायला येतात, कुणी देवदर्शनाला येतात, कुणी मनाची शांती शोधायला येतात, तर कुणी नुसतेच पर्यटनाला येतात.
कुणाल - नुसतं करायचं म्हणून पर्यटन करायला माझा विरोध आहे. अनेक लोक ना, केवळ बाकीचे लोक जाऊन आले म्हणून एखाद्या ठिकाणी जातात. याला मी 'टिकिंग द बॉक्सेस' म्हणतो. म्हणजे, हं चला, सिंगापूर झालं, दुबई झालं, युरोप झालं... ऑस्ट्रेलिया झालं... जपान झालं... किंवा भारतात फिरताना काश्मीर झालं, कन्याकुमारी झालं, गोवा झालं. उटी झालं, दार्जिलिंग झालं... असं एकेक ठिकाण नुसतं 'टिक्' करतात. त्याला काय अर्थ आहे? एखाद्या ठिकाणी जायचं म्हणजे त्या भागाची नीट माहिती करून घ्यायला हवी, तिथं जरा वेळ घालवायला हवा, स्थानिक लोकांशी संवाद साधायला हवा, स्थानिक पदार्थ चाखायला हवेत.
रेणू - अरे, तू म्हणतोस ते फार आदर्श देशाटन झालं. ते करून 'मनुजा चातुर्य' आल्याशिवाय राहणार नाहीच. पण सगळ्यांनाच कुठं जमतं असं? एक तर असं पर्यटन करण्यासाठी भरपूर पैसे लागतात. दुसरं म्हणजे वेळ लागतो. आपल्याकडं या दोन्ही गोष्टी एकत्र आणि मुबलक क्वचितच असतात. म्हणजे पैसे असले, तर वेळ नसतो आणि वेळ असला, तर कदाचित पैसे नसतात किंवा मग तब्येत साथ देत नाही.
सई - खरंय. त्यामुळं ना, जेव्हा शक्य होईल तेव्हा सरळ बॅग उचलावी आणि बाहेर चालू पडावं.
रेणू - हे असं बोलणं सोपंय गं. पण आपल्यासारख्या संसारी माणसांना सगळं सोडून असं एकदम खरंच बाहेर पडता येतं का? त्यातही बाईला असं बाहेर पडता येतं का गं खरंच? नाहीच. म्हणजे फार फार अवघड... मग अशा वेळी या 'कंडक्टेड टूर' घ्यायच्या आणि निदान ती ठिकाणं बघून यायची.
कुणाल - म्हणजे नुसताच भोज्या शिवून यायचा. याला म्हणतात दुधाची तहान ताकावर! माझ्या लेखी याला खरंच काही अर्थ नाही रेणू...
रेणू - अरे, निदान तेवढं तरी... आपण तेवढं तरी करू शकतोय का बघ...
सई - आणि अजून एक सांगते. सारा अजून लहान आहे ना, तोवर तुमचं फिरून होईल. नंतर मग ती मोठी झाली की मग तिच्या शाळेनुसार, सुट्ट्यांनुसार तुम्हाला सगळं वेळापत्रक बसवावं लागेल. मग खरंच फिरणं होणार नाही.
कुणाल - पण मी काय म्हणतो रेणू, ती अचानक एके दिवशी बॅग उचलून बाहेर पडायची आयडिया कसली भारी आहे ना! रोमँटिक आहे अगदी...
रेणू - झालं. याचा रोमँटिसिझम ऐका. चाळिशी आली तरी येळकोट जात नाही आपला...
कुणाल - ओ मॅडम, ओ मॅडम... चाळिशीला हल्ली आयुष्य सुरू होतं म्हणतात बरं का! 'फॉर्टी इज न्यू ट्वेंटी' असं म्हणतात ते काही खोटं नाही. आणि येळकोट जात नाही काय? काहीही हं रेणू...
रेणू (हसते) - किती राग येतो रे तुला हल्ली... त्यातही वयाचा विषय काढला की जास्तच... एकूणच तुझं खरंच वय झालंय, असाच निष्कर्ष निघतो बरं का यातून!
कुणाल - थोडक्यात, सगळा संसार सोडून हिमालयात जाण्याची माझी वेळ झालीय तर...
रेणू - अजिबात नाही. तुला एकट्याला तर मी मुळीच हिमालयात जाऊ द्यायची नाही. मी पण येणार.
कुणाल - व्वा, व्वा रेणू... मला एकदम 'हुस्न पहाडों का' गाणं आठवलं...
सई - छान... नेमकं तेच आठवलं का? (हसते) रेणू म्हणते, ते खरंय अगदी. येळकोट जात नाहीच आपला, नाही का महाराज!
कुणाल (पोझ घेऊन) - मी आता त्या माया, मत्सर, लोभ, राग, द्वेष या सगळ्यांच्या पलीकडं गेलोय रेणू... विरक्त विरक्त भाव मनी जागृत होऊ लागले आहेत.
रेणू - अजिबात जमायचं नाही. विरक्त भाव वगैरे सांगून तू आमच्याबरोबर शॉपिंगला यायचं टाळू शकत नाहीस. बॅगा उचलायच्याच आहेत आणि ड्रायव्हिंगही करायचंय.
कुणाल - अरेरे, सामान्य संसारी माणसाचा पाश तुटायचा नाहीच का? हिमालय आमच्या नशिबी नाहीच का? किमान बाहेर गेल्यावर आइस्क्रीम तरी खायला घाला. तेवढंच जरा गारेगार फीलिंग येईल.
सई - चला, शेवटी हिमालयाकडून पुन्हा सह्याद्रीकडे आला विषय...
कुणाल - अगं, प्रश्नच नाही. शेवटी सगळं जग फिरलो, तरी आपलं गाव, आपलं शहर, आपला जिल्हा, आपलं राज्य व मग आपला देश सगळ्यांना प्रिय असतोच. मला तर कुठंही बाहेर गेलो, तरी आठ दिवसांच्या वर करमत नाही. परत कधी घरी येतो असं होऊन जातं.
सई - घर ही गोष्ट आपल्याला बांधून ठेवते हे खरंच. पण हिमालयात गेल्यावर अनेकांना आता इथंच राहावं, असं वाटतं हेही खरंय बरं का!
रेणू - ते तुमची आध्यात्मिक पातळी किती आहे त्यावर ठरत असेल. आपण अजून फार मटेरिअलिस्टिक लोक आहोत. अजून ऐहिक सगळं भोगून व्हायचंय. मग विरक्तीची ओढ लागणार कशी?
कुणाल - असं काही नाही. प्रत्येकाला वेगवेगळ्या टप्प्यावर हे फीलिंग येऊ शकतं. मला तरी आत्ता नुसतं पर्यटन करायचीच इच्छा आहे. एकदम संन्यासी नाही व्हायचंय मला... (हसतो)
रेणू - आणि मी तुला होऊ देईन असं वाटतं का?
सई - अरे, तसं नाही मला म्हणायचं. कधी तरी माणसाला काही काही ठिकाणी गेल्यावर ज्याला आपण दैवी, किंवा इंग्लिशमध्ये डिव्हाइन म्हणतो ना, तसा अनुभव येतो. पुन्हा हे मी सांगून उपयोग नाही. तो अनुभव ज्याचा त्याने प्रत्यक्ष जाऊनच घ्यावा.
रेणू - ठरलंच आहे आता माझं... म्हणजे आमचं! पुढच्या वर्षी हिमालयात जायचंच...
सई - पण आत्ता आपल्याला शॉपिंगला जायचंय...
कुणाल - हे बघा, मी पुढच्या वर्षी हिमालयात जाईन. नंतर कुणाला तिथं यती वगैरे आढळला तर तो मीच आहे, असं समजा.
रेणू - ए कुणाल, आम्हाला आत्ता यतीची नाही, एका ड्रायव्हरची गरज आहे. निघतोयस ना...
(सगळे हसतात...)
---