9 Nov 2013

सुवर्णभूमीत... २


पहिला दिवस... मातृभूमीविना
------------------------------------

मुंबईतला झगमगाट खूप खूप खाली सोडून मी आता कित्येक हजार फूट आकाशात उंच उडत होतो. आपण जन्मल्यापासून ज्या भूमीवर सदैव पाय ठेवून वावरत आलो, त्या आपल्या मातृभूमीवर आता आपण नाही, याची जाणीव एका क्षणी झाली आणि त्याचा काहीसा मानसिक धक्का बसलाच. विमानात जेवण होतंच, पण सायनला टाइमपास करण्यासाठी खाल्लेले डोसे आणि मातृभूमीवरून सदेह उचललो गेल्याचा धक्का यामुळं जेवलो नाही. फक्त ज्यूस प्यायलो. नंतर त्या हवाई सुंदरीनं दिलेली चादर पांघरून सरळ झोपी गेलो. रात्रीची वेळ असल्यानं तसंही खिडकीत असलो काय आणि नसलो काय, काहीच फरक पडणार नव्हता. मार्सेलिसनं मला चटकन खिडकी का दिली याचा आता उलगडा झाला. मी विमानाच्या डाव्या बाजूला बसलो होतो. मुंबई सोडताच मी घड्याळ दीड तासानं पुढं करून आपल्याला आंतरराष्ट्रीय प्रवास कसा रोजचाच आहे, असं जादा शहाणपणा करून उगाचच स्वतःपुढं सिद्ध करून दाखवलं होतं. तर मध्येच मला जाग आली आणि मी घड्याळात पाहिलं, तर साडेचार वाजले होते. आमचं विमान पाच वाजता बँकॉकला पोचणार हे मला माहिती होतं. खिडकीचा पडदा बाजूला करून मी बाहेर पाहिलं, तर बँकॉकचे झगमगते दिवे दिसू लागले होते. बँकॉक शहर प्रचंडच होतं. आम्ही कित्येक रस्ते, उपनगरं ओलांडली... चकचकीत लांबच लांब रस्ते, फ्लायओव्हर्स, उंच उंच इमारती हे सगळं पाहून भारी वाटत होतं. माझी झोप तर केव्हाच उडाली. त्यातच हलका हलका पाऊस सुरू होता. म्हणजे तो असा पडताना छान दिसत होता आणि त्यात खाली लक्ष दीप नगरात... असं एक देखणं शहर दिसत होतं. बँकॉकच्या विमानतळाचं नाव आहे सुवर्णभूमी आंतरराष्ट्रीय विमानतळ. थोड्याच वेळात कॅप्टननं आपण सुवर्णभूमी विमानतळावर उतरत असल्याची घोषणा केली.
आयुष्यात पहिल्यांदाच परदेशाला पाय लागले. जामखेडसारख्या छोट्या गावात वाढलेला आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला मी - पुढं कधी दुसऱ्या देशात जाईन, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण मी आपली मुंबई पाहिली वयाच्या एकविसाव्या वर्षी आणि राजधानी दिल्ली पंचविसाव्या. त्या हिशेबानं बत्तिसाव्या वर्षी परदेशवारी हे तसं ठीकच होतं. विमानतळावर उतरल्यावरचे कागदोपत्री सोपस्कार पूर्ण झाले.  


ते भव्य विमानतळ पाहून मी हरखून गेलो. शेकडो आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आवक-जावक, ते सरकते जिने, चकाचक दुकानं, रेस्तराँ, सरकत्या पट्ट्या हे सगळं पाहून छान वाटत होतं. टोनीनं आम्हाला थाई एअरवेजच्या लॉबीत नेलं. आम्ही त्या देशाच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचे पाहुणे असल्यानं आमचा तसा थाट होता. त्या लॉबीत आम्हाला पुष्कळ सुख-सुविधा पुरवण्यात आल्या. महत्त्वाचं म्हणजे प्रातःविधी उरकले. आता आम्हाला लगेच आठ वाजता क्राबीला जाणाऱ्या विमानात बसायचं होतं. मग आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून डोमेस्टिक टर्मिनलकडं जाणं आलं. मध्येच मी माझ्याकडच्या २० डॉलरचं चलन बदलून घेतलं. तेव्हा त्याचे ६७० बाथ मिळाले. आठ वाजता आम्ही क्राबीच्या फ्लाइटमध्ये बसलो. हे विमान छोटं होतं. काही सीट्स रिकाम्याच होत्या. आता मी सराईतासारखा वावरू लागलो होतो. लगेच एक रिकामी खिडकी मी पटकावली. थायलंड देशाचा नकाशा पाहिला, तर एक चिंचोळी पट्टी दक्षिणेला लांबपर्यंत समुद्रात गेलेली दिसते. फुकेत हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ तिकडंच आहे. हे क्राबीही त्याच्या जवळच होतं. आमचं विमान या चिंचोळ्या पट्टीवरूनच उडत होतं. कधी समुद्र दिसे, तर कधी जमीन. तासाभराच्या प्रवासानंतर विमान क्राबीला पोचलं. लँडिंग करतानाच हे ठिकाण किती सुंदर आहे, हे दिसलं. अत्यंत देखणा समुद्रकिनारा, नारळीची बनं, मधून-मधून समुद्रात उगवलेले मोठे खडक आणि शेतांच्या चौकोनी पट्ट्या... क्राबी प्रथमदर्शनीच प्रेमात पडावं असं होतं. बँकॉकच्या मानानं क्राबीचं विमानतळही अतिशय चिमुकलं. म्हणजे सामानाच्या सरकत्या पट्ट्यावरून बॅगा उचलल्या आणि दार ओलांडलं, की आपण थेट बाहेरच्या रस्त्यावरच येतो, इतकं छोटं. मला हे टुमदार एअरपोर्ट आवडलं. बाहेर आम्हाला न्यायला आलेली बस उभी होती. ती क्राबीमध्ये शिरली. तिथं टोनीनं बराच टाइमपास केला. त्याला पैसे काढायचे होते. पण इकडं आता आम्हाला भुका लागल्या होत्या. मधुरा, लक्ष्मी यांनी खायला आणलेलं हळूहळू आम्ही फस्त केलं. टोनी आल्यानंतर आमची बस एका बीचवर जाऊन थांबली. आपल्याला कुठं जायचंय, हेच मला तोपर्यंत कळलं नव्हतं. अखेर दोन स्पीडबोटींमध्ये आमचं सामान टाकून आणि अर्थातच आम्हालाही घेऊन त्या बोटी निघाल्या. सुमारे १५ मिनिटं समुद्रातून किनारपट्टीला समांतर असा प्रवास करीत त्या बोटी एका डोंगराच्या पायथ्याशी आल्या. हा डोंगर आम्ही जिथून आलो, त्या मुख्य भूमीवरचाच होता. पण तिथं जाताना वळसा घालून जाण्याऐवजी आम्ही थेट समुद्रातून, समोरून गेलो होतो. त्या डोंगराच्या पायथ्याशी समुद्र भिडला होता. मधल्या चिंचोळ्या जागेत आमचं हे सेंटारा हॉटेल अँड रिसॉर्ट व्हिला वसलं होतं.  



समुद्राच्या पाण्यात प्लास्टिकची हलती जेट्टी सोडली होती. त्या तरंगत्या फळ्यांवरून मधुरा, मी, लक्ष्मी एकमेकांचे हात धरून, आरडाओरडा करीत एकदाचे रिसॉर्टला पोचलो. रिसॉर्ट अप्रतिमच होतं. मला नुकत्याच पाहिलेल्या अँबी व्हॅलीची आठवण झाली. या रिसॉर्टमध्ये आम्हाला प्रत्येकाला राहायला चक्क एकेक व्हिला दिला होता. तिथल्या त्या बॅटरी ऑपरेटेड गाड्यांनी आमचं सामान आमच्या व्हिलात नेऊन ठेवलं. फ्रेश झाल्यावर मी रिसॉर्टचा एक फेरफटका मारून आलो. जगातील सर्व सुखं तिथं हात जोडून उभी होती. (ती उपभोगायला भरपूर पैसा मात्र हवा.) पुन्हा एकदा माझ्या महालात जाऊन बसलो. अत्यंत उंची असा बाथटब तिथं होता. उत्तमोत्तम परफ्युम्स, नामवंत ब्रँडचे शाम्पू, साबण वगैरे तिथं ठेवले होते. मिनी बार होता. टीव्ही होता. संपूर्ण देह रुतून बसेल एवढा बेड होता... सगळं काही होतं. पण मी एकटाच होतो. सुख उपभोगायलासुद्धा कुणाची तरी सोबत असावी लागते, हे तेव्हा तीव्रपणे जाणवलं. प्रचंड होमसिक झालो. एक तर लग्न झाल्यापासून बायको आणि तीन वर्षांच्या मुलाला सोडून कधीच कुठं गेलो नव्हतो. शेवटी हॉटेलमधून पुण्याला बायकोच्या मोबाइलवर फोन लावून तिच्याशी बोललो तेव्हा बरं वाटलं. पण रिकामपण जात नव्हतं. आपल्या भाषेतून बोलायला कुणी नाही, हे माझ्याबाबत प्रथमच घडत होतं आणि मला तर सदैव बडबडण्याची प्रचंड सवय. शिक्षा दिल्यासारखं झालं. ते प्रचंड रिसॉर्ट आणि तिथल्या सुख-सुविधा अंगावर आल्या. शेवटी मी उठून मधुरा कट्टींच्या व्हिलात गेलो. त्या आवरत होत्या. पण थोड्याच वेळात बाहेर आल्या. माझा रडवेला चेहरा पाहून त्यांना माझी दया आली असावी. मी माझी अवस्था त्यांना सांगितली. होतं असं पहिल्यांदा... म्हणून त्यांनी मला समजून घेतलं. त्यांच्या व्हिलाच्या व्हरांड्यात मी मग बराच वेळ त्यांच्याबरोबर बडबड करीत बसलो... 

संध्याकाळी टोनीनं आमच्यासाठी फाइव्ह कोर्स डिनर ठेवलं होतं. सुरुवातीलाच मद्य आलं. मग स्टार्टर... मला कशातच रस वाटेना. शेवटी टोनीचा मान राखायचा म्हणून शेवटपर्यंत बसून राहिलो. पण जेवण काहीच गेलं नाही. माझ्या होमसिकनेसनं टोक गाठलं. पुढले चार दिवस आपण इथं काढूच शकणार नाही, असं वाटलं. एक क्षण तर असा आला, की टोनीला सांगावंसं वाटलं, की बाबा, मला उद्याच्याच विमानानं मुंबईला पाठव. पण मी ते सगळं आतल्या आत दाबलं. आमच्या आजूबाजूला लोक मस्त एन्जॉय करीत होते... मद्य, मदनिका आणि मदहोशी यांचंच सर्वत्र राज्य होतं... मी मात्र आतल्या आत रडत बसलो होतो. शेवटी व्हिलावर आलो. मोबाइलमधली मराठी गाणी ऐकत बसलो... बरोबर आणलेलं पुलंचं पुस्तक काढलं आणि एवढा वेळ आवरून ठेवलेलं रडू डोळ्यांबाहेर आलं... मनसोक्त रडून घेतलं. आपण आपली भाषा आणि प्रियजन यांच्याशिवाय एक श्वासही मोकळेपणानं कधी घेऊ शकणार नाही, याची तीव्र जाणीव झाली... झोपलो, पण या अस्वस्थ मनोवस्थेतच...

(क्रमश:)


No comments:

Post a Comment