9 Nov 2013

सुवर्णभूमीत... ३


बर्ड इज फ्री नाऊ...
-----------------------

सकाळ झाली आणि कालची सगळी मनोवस्था म्हणजे जणू एक स्वप्न होतं, असंच वाटलं. एकाएकी मला फारच मोकळं आणि छान वाटलं. एकूण तो तिथल्या हवेचा आणि सुखासीनतेचा परिणाम असावा. साडेसातला उठल्यावर तासाभरात सगळं आवरलं. ब्रेकफास्टला गेलो. तिथं मधुरा, लक्ष्मी आणि मार्सेलिस आधीच आले होते. त्यांच्यासोबत मग फलाहार केला, ज्यूस प्यायलो. आता मला मस्त वाटत होतं. कालचा सगळा होमसिकनेस गेला होता. आपण आता ही ट्रिप छान अनुभवू शकू, याची खात्री पटली. मधुरा कट्टींनाही माझा हसरा चेहरा पाहून बरं वाटलं. तसं त्यांनी बोलूनही दाखवलं. मग आम्ही बीचवर जाऊन फोटो काढले.  


टोनीनं तिथं एक मैत्रीण गटवली होती. (की आधीपासूनचीच होती, कोण जाणे...) तिच्याबरोबर तो भरपूर दंगा करीत होता. नंतर आम्ही स्पीडबोटीनं पुन्हा बीचवर आलो. तिथून कारनं दुसऱ्या बीचवर गेलो. तिथून कोह याऊ नोई हे बेट बघायला स्पीडबोटनं गेलो. जवळपास पाऊण तास भर समुद्रात लाटांवर हेलकावे खात स्पीडबोटचा प्रवास करायला मजा आली. आमच्याबरोबर आज ऑर नावाचा एक मुलगा गाइड म्हणून आला होता. हा ऑरही गमत्या होत्या. कोह याऊ नोई या बेटावर ९० टक्के मुस्लिम वस्ती होती. तिथं एक टाटा मोबाइलसारखी जीप कम् कार आम्हाला घ्यायला आली होती. मग तिथून ऑरनं सगळं गाव, तिथलं ग्रामीण जीवन आम्हाला दाखवलं. वास्तविक कोकण किंवा गोव्यातल्या कुठल्याही खेड्यासारखंच ते गाव होतं. मच्छिमारांची वसाहत, भले मोठे पकडलेले खेकडे, टूरिस्ट सेंटर, रबर प्लँटेशन, नारळाची बाग हे सगळं पाहिलं. नारळाच्या बागेत तिथल्या माणसानं दिलेलं शहाळं आणि भुकेच्या वेळी मिळालेलं आतलं ओलं खोबरं खरवडून खाताना मस्त वाटलं. शिवाय टोनी आणि ऑरनं विकत घेतलेले खेकडे त्यांनी कुठून तरी भाजून घेतले. मग ते खायला आम्ही एका बीचवर गेलो. अर्थात खात ते होते. मी, मधुरा व लक्ष्मी तिघंही पक्के शाकाहारी असल्यानं आम्ही फळं खाल्ली. मग दोन-अडीचला स्पीडबोटनं परत आलो. तिथून मग नोमफारा नावाच्या बीचवर लंचसाठी गेलो. आमच्यासाठी सगळं व्हेज बनवलं होतं. एकूणच थायलंडच्या हॉटेलवाल्यांना आमच्यासाठी व्हेज बनवणं म्हणजे एक कटकटच होती. भूक लागली होतीच. मग चांगला आडवा हात मारला. तिथून मग पॅव्हेलियन क्वीन्स बे या नव्या हॉटेलात गेलो. आजचा मुक्काम इथं होता. हॉटेल फारच छान होतं. शिवाय मुख्य भूमीवर होतं. तिथं चेक-इन करून फ्रेश झालो आणि संध्याकाळी सगळ्यांनी शॉपिंग केलं. रात्रीचं जेवण हॉटेलच्या जनरल मॅनेजरनं आमच्यासाठी होस्ट केलं होतं. हे मॅनेजर अतिशय हुशार होते. त्यांना भारतीय संस्कृती, विविध भाषा, विविध देश यांत रस होता आणि बरीच गतीही होती. मग त्यांच्यासोबत गप्पा मारताना छान जेवण झालं. कालच्या तुलनेत आजचा दिवस फारच उजवा गेला... 
दुसऱ्या दिवशी क्राबीची सिटी टूर होती. सकाळी हॉटेलच्या सहाव्या मजल्यावर ब्रेकफास्ट होता. सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाल्यावर तिथल्या एका छान वेट्रेस मुलीसोबत फोटो काढून घ्यायची लहर मला आली. ती मुलगीही अगदी सहज माझ्या हातात हात गुंफून फोटोला उभी राहिली. सगळे जमल्यावर आधी हॉटेल इन्स्पेक्शन झालं. हा त्या टूरचा एक अधिकृत कार्यक्रम होता. त्या हॉटेलमध्ये फिरवून अगदी कानाकोपरा आम्हाला दाखवायचे. अर्थातच त्या हॉटेलची जाहिरात आमच्या लेखाद्वारे आम्ही करावी, हा मुख्य हेतू असायचा. या हॉटेलमधलं स्पा सेक्शन फारच आकर्षक होतं. (अर्थात बघण्यापुरतंच.) मग आमची सफर सुरू झाली. आधी थायलंडमधील समुद्रात आढळणाऱ्या माशांचं संवर्धन केंद्र पाहिलं. नंतर नोप्पोरात थारा बीचवर जाऊन चार कोटी की असेच किती तरी कोटी वर्षांपूर्वीचे जीवाश्म आणि समुद्रकिनाऱ्यावरचे अवशेष दाखवण्यात आले. प्रत्येक ट्रिपमध्ये असा एक ऐतिहासिक गोष्टी दाखवण्याचा भाग असतोच. आम्ही जीवाश्मांपेक्षा त्या ठिकाणी असलेल्या दुकानांमध्येच जास्त टाइमपास केला आणि भरपूर शॉपिंगही केलं. नंतर एक स्लिपिंग बुद्धाचं टिपिकल मंदिर दाखवण्यात आलं. मंदिर पारंपरिक असलं, तरी ती बुद्धमूर्ती मात्र फारच भव्य आणि देखणी होती. नंतर एका डोंगराकडं हात दाखवून टोनीनं आता आपल्याला तिथं (टायगर केव्ह मॉनेस्ट्री) जायचंय, असं सांगितलं. आम्ही तो डोंगर बघूनच एकजात नाही, असं ओरडलो. अर्थात हा स्पॉट आम्हीच रद्द करवून घेतला. मग दुपारी एका ठिकाणी थाई पदार्थ कसे तयार केले जातात, ते पाह्यलं. भूक लागलीच होती. तिथं भरपूर खाणं झालं. त्या बाईंनी शेंगदाण्याचा कूट, टोमॅटो आणि कांदा घालून आपल्याकडं कोशिंबीर करतात, तसा एक पदार्थ केला होता. त्यात आणखीही बऱ्याच भाज्या वगैरे तुकडे टाकले होते. त्यातल्या त्यात हा पदार्थ मसालेदार होता. मग आम्ही ब्रेडबरोबर तो भरपूर हाणला. पुन्हा शहरातल्या एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन दुपारचं जेवण घेतलं. त्यानंतर टोनीनं एका ठिकाणी गरम पाण्याचे झरे पाहायला नेलं. तासाभराच्या प्रवासानंतर ते ठिकाण आलं. अगदी जंगलात, आत ते झरे होते. तिथं या सगळ्या लोकांनी पाण्यात बसून मस्त आंघोळी केल्या. मी कपडे नेले नसल्यानं फक्त हात-पाय धुतले. संध्याकाळी येताना मधुरा, लक्ष्मी, टोनी, ऑर हे सगळे थाई मसाज करायला गेले. दोनशे बाथ खर्चून अंग रगडून घेण्यात मला व मार्सेलिसला रस नव्हता. म्हणून मग आम्ही बीचवर टाइमपास केला. रात्रीचं जेवण तथातथाच झालं. एका ठिकाणी इंडियन फूड अशी पाटी पाहिली आणि तिथं गेलो. तर तो एक बांगलादेशी माणूस ते हॉटेल चालवीत होता. जेवण भारतीय असलं, तरी सगळं नॉन-व्हेजच होतं. मग तिथून लगेच बाहेर पडलो. क्राबीत पुन्हा बाहेर भटकून किरकोळ शॉपिंग केलं.


 (क्राबी नगरपालिकेची इमारत आणि त्यासमोर असलेली राम व हनुमानाची मूर्ती...)

----

(क्रमश:)

----

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

No comments:

Post a Comment