2 Nov 2013

फर्स्ट डे फर्स्ट शो - क्रिश 3

करील मनोरंजन जो मुलांचे

--------------------------------हल्ली लहान मुलांसाठी म्हणून जे सिनेमे निघतात, ते लहान मुलांनाही बालिश वाटतात. त्यांना आता कूल आणि चिल सिनेमात रस असतो. याउलट एका विशिष्ट वयानंतर मोठी माणसं एक तर अतिच नॉस्टॅल्जिक होतात किंवा दुसरं म्हणजे स्वतःचं लहानपण मिस करत, पुन्हा लहान मुलांसारखं वागू लागतात. समाजातला हा मोठा प्रेक्षकवर्ग डोळ्यांसमोर ठेवून राकेश रोशन हे महोदय बऱ्याच वर्षांपूर्वीपासून कार्यान्वित झाले आहेत. त्यांच्या एरवी बाह्यतः पडीक असलेल्या, पण आतून पुष्कळ सुपीक असलेल्या डोक्यातून अनेकविध चमकदार कल्पना बाहेर पडत असतात. फिल्मक्राफ्ट असं सार्थ नाव असलेल्या कंपनीद्वारे राकेश रोशन निखळ मनोरंजनाचे अनेक क्राफ्टी सिनेमे देत आले आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःच्या मुलाद्वारे क्रिश हा भारतातला पहिला सुपरहिरो जन्माला घातला. आता ती त्यांची हिट फ्रँचायझी झाली आहे. या मालिकेतला दुसरा सिनेमाही यशस्वी झाल्यानं राकेश सरांनी आता तिसरा सिनेमा पडद्यावर आणला आहे. निखळ आणि (बालांसाठीचे असे जे ते बालिश या अर्थाने) अत्यंत बालिश असे छान मनोरंजन त्यांचा हा नवा सिनेमा करतो. त्या अर्थानं आता त्यांचं कायम प्रभूशी नातं जडलं आहे. पुण्यवान माणूस हो...

तर आपण क्रिश हा सुपरहिरो पाहायला जातो तेच त्यानं काही तरी अचाट आणि अफाट करून दाखवावं आणि आपली डोळ्यांची बुबुळं जाग्यावर राहणार नाहीत अशी तयारी करूनच. तर या अशा सर्व अपेक्षा चि. कृष्णा ऊर्फ क्रिशदादा आपणांस यात पूर्ण करून दाखवीत आहे बरे. उदा. असे की, एक भले मोठे विमान व्हीएफएक्स द्वारे निर्मित मुंबई नावाच्या भलत्याच पॉश शहरात उतरत असताना, त्या विमानाच्या पुढच्या चाकाचा लँडिंग गिअर बिघडला आहे... समस्त हवाईजन खाली वाकून प्रभूची करुणा भाकत आहेत... आणि देवा, अहाहा... काय ते विलक्षण दृश्य. डोळ्यांभोवती काळी वर्तुळं (इथं सिक्स पॅक, अर्थात ताकदवान आरोग्याचं प्रतीक) असलेला तो सुपरहिरो व्हीएफएक्स द्वारे निर्मित मुंबई नामक विलक्षण देखण्या शहराच्या इमारतींमागून इमारतींवर उड्या मारीत येत आहे. आणि काय सांगू महाराजा, अस्सं त्यानं जंप मारून ते चाक पकडलं आहे, की यंव रे यंव... आणि चाकावर घट्ट पाय रोवून उभं राहत त्यानं तो अडकलेला गिअर विमानाच्या वजनासकट अस्सा काही दोन्ही हातांनी उचललेला आहे... जणू गोवर्धनधारी बाळकृष्ण... अहाहा... केवढं साहस... केवढं मनोरंजन...! नातं जडलेले प्रभू इथं नतमस्तक झालेले आहेत.
तर अशा पद्धतीनं या हिरोचे वडील श्रीमान रोहित मेहरा आपल्या विचक्षण प्रतिभेनं सोलर एनर्जीचा एक स्क्रू ड्रायव्हर कम एनर्जी चार्जर कम बॅटरी कम एक्सवायझेड करण्यात गुंतलेले आहेत. चि. कृष्णा आता धर्मपत्नी चि. सौ. कां. प्रिया हिजसोबत आणि प्रिय पप्पांसोबत व्हीएफएक्स निर्मित एका खासच देखण्या अशा बंगल्यात राहत असून, तो वेगवेगळ्या नोकऱ्या करीत आहे. आणि तो क्रिश तर काय, बालगोपाळांचा आणि गावातल्या (नव्हे, नव्हे, व्हीएफएक्स निर्मित मुंबई नामक महानगरीतल्या) प्रत्येक माणसाचा किरकोळीत ओळखीचा झाला आहे आणि तेथील सुगृहिणीही अशा उडत्या, फिरत्या, नाचत्या, धावत्या सुपरहिरोशी भाजीवाल्याशी बोलावं तसं आमचा वरच्या वायरीत अडकलेला पोरगा काढून द्या ना हो, अशी लाडीक विनवणीच आपल्या क्रिशदादाला करीत आहेत. असं मोठं मौजेचं दृश्य आहे ते... तद्ननंतर क्रिशदादा त्या कबुतरप्रेमी हुशार बालकास तूदेखील कसा क्रिशच आहेस, हे समजावून सांगतो, ते दृश्य तर एका डोळ्यांत आसू आणि एका डोळ्यांत हासू आणणारे असेच वठले आहे बरे.
अशा या सुपरहिरोसंगे लढण्यास सक्षम असा, पण प्रत्यक्षात पॅरालाइज असलेला काल नामक शत्रू दूर तिकडं जुंगफ्राउच्या बर्फाळ डोंगरावर एका एकाकी बिल्डिंगीत वास्तव्यास आहे हे तुम्ही मंडळी, जाणून असा हं खासच.


 आणि या कालाने मानव आणि जनावर यांचा जंबो मिक्स पॅक करून मानवर (अहाहा) तयार केले आहेत.

यात काया ही घटकेत कायापालट करणारी नवयौवना प्रमुख असून, तिज मदतनीस म्हणून एक शॅमेलिऑन आणि एक मस्तवाल रेडाही देण्यात आलेला असतो. काल नामे हा क्रूर इसम बसल्या जागी बोटे फिरवीत जगाचं वाट्टोळं करण्यास टपलेला आहे. त्याचे विशेष असे, की रासायनिक अस्त्रं टाकून लोकं मारणे आणि नंतर स्वतःच्या लॅबमध्ये तयार केलेल्या प्रतिबंधक लशीची विक्री करून डॉलर जमा करणे हा त्यास जडलेला छंद होय. यात त्याने सर्वप्रथम आफ्रिकेतल्या नामीबिया नामक गरीब देशास उगाचच वेठीला धरले आहे. तेथे पुरेसा नरसंहार झाल्यानंतर मात्र कालइसमाची नजर भारतभूकडं जाणार हे ओघाने आलेच. त्यानंतर काल आणि क्रिश यांचे जे काही तिसरे महायुद्ध होते आणि त्यात व्हीएफएक्स द्वारे निर्मित (रामोजीसिटीतल्या) सुंदर अशा मुंबई शहराचे जे काय होते, ते पाहणे म्हणजे या विलक्षण खेळाचा परमअध्याय होय. त्यातही पिताजींचे काय होते, त्या लुच्च्या कालइसमाचे आणि या सगळ्यांचे नक्की काय नाते असते, तीन महिन्यांची गर्भवती प्रिया कालच्या कराल कोठडीत कशी अडकून पडते आणि नंतर तिचे (आणि क्रिश-४ चे) काय होते या सर्व प्रश्नांची सुलभ आणि आकर्षक अशी उत्तरे शेवटच्या रिळात मिळोन ही साठा उत्तरांची कहाणी सुफळ संपूर्ण होते. त्या क्षणी एक अत्यंत अद्भुत, पारलौकिक दर्जाचे रोमांच अंगावर उभे राहोन नवरसयुक्त भावनांची निष्पत्ती मनात होते.
(ता. क. एवढे चित्ताकर्षक विवेचन केल्यानंतर काही गोष्टी सांगायला हव्यात. एक म्हणजे हृतिकची दोन्ही रोलमधली अॅक्टिंग, त्याची नृत्यनिपुणता आणि एकूणच कामातली कमिटमेंट आणि दुसरं म्हणजे या सिनेमात वापरण्यात आलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पेशल इफेक्ट्स... वरचा दीड स्टार त्यासाठी आहे. विवेक ओबेरॉय आणि कंगना रनोट यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकांनाही दाद द्यायला हवी. प्रियांका चोप्रा ओक्के ओक्के. राजेश रोशनचं संगीतही ठीकठाक... )
थोडक्यात, दिवाळीच्या सुट्टीत लहानपणीच्या राक्षसाच्या गोष्टींच्या आठवणी काढत बसण्यापेक्षा क्रिश ३ ला जावे आणि दिवाळीत पैसे उडविल्याचे समाधान मानावे.
---
निर्माता - फिल्मक्राफ्ट, राकेश रोशन
दिग्दर्शक - राकेश रोशन
संगीत - राजेश रोशन
प्रमुख भूमिका - हृतिक रोशन, विवेक ओबेरॉय, प्रियांका चोप्रा, कंगना रनोट आदी. कालावधी - दोन तास ३२ मिनिटे (यू)
दर्जा - *** १/२
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स पुणे आवृत्ती, 2 नोव्हेंबर 2013)
---

No comments:

Post a Comment