9 Nov 2013

सुवर्णभूमीत... १

सदेह आकाशात...
------------------------------------------------


सहा वर्षांपूर्वी अचानक 'सकाळ'तर्फे मला थायलंडला जाण्याची संधी मिळाली. मी २००७ च्या जानेवारीत पासपोर्ट काढून घेतला होता, त्याचा उपयोग झाला. थाई एअरवेजनं भारतातल्या काही पत्रकारांना थायलंडमधलं क्राबी हे नवं पर्यटन ठिकाण दाखवण्यासाठी हा दौरा आयोजित केला होता. एका अर्थानं ही तशी लेजर ट्रिप होती. करायचं काहीच नव्हतं. फक्त जे जे पाहायला मिळेल, ते बघायचं होतं. सप्टेंबर २००७ मध्ये १६ ते २० या तारखांदरम्यान हा दौरा व्हायचा होता. २००७ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत एक चांगलीच बूम होती. त्या काळात आमच्या ऑफिसमधल्या अनेक लोकांना परदेश दौरे करायला मिळाले. त्यात मलाही एक संधी मिळाली. थायलंडमध्ये पर्यटक कशाला जातात, हे मला चांगलंच ठाऊक असल्यानं आपण तिथं जाऊन काय पाहणार, याची एक कल्पना मनात होती. प्रत्यक्षातला अनुभव मात्र खूपच वेगळा आणि अर्थात चांगला होता. एखाद्या देशाविषयी, संस्कृतीविषयी आपण फार झापडबंद विचार करतो आणि केवळ दुसऱ्याच्या मतांवर आपली मतं तयार करतो. त्याऐवजी प्रत्यक्ष तो देश पाहायला मिळाला तर नक्कीच आपलं एकूण अनुभवविश्व समृद्ध व्हायला मदत होते आणि आपले पूर्वग्रह धुतले जातात, हे मला या दौऱ्यातून शिकायला मिळालं. 
आमच्या थायलंड दौऱ्याचा समन्वय थाई एअरवेजच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये बसणारा सुनील पाल नावाचा एक तरुण पाहत होता. एके दिवशी मग मुंबईला जाऊन त्याला भेटलो आणि पासपोर्ट देऊन आलो. या दौऱ्यात भारतातले मिळून किमान पंधरा-वीस लोक असतील आणि महाराष्ट्रातल्या इतर मराठी वृत्तपत्रांतले काही सहकारीही असतील, असा माझा अंदाज होता. प्रत्यक्षात सहाच लोक येणार असं कळलं आणि त्यात एकही मराठी बोलणारा माणूस नाही, असं कळल्यानं माझा थोडा भ्रमनिरास झाला. त्यातही आम्ही प्रत्यक्ष जेव्हा निघालो, तेव्हा तर मी धरून फक्त चारच लोक येत असल्याचं स्पष्ट झालं. अर्थात खूपच छोटा ग्रुप मला एका अर्थानं बरंही वाटलं. या माझ्या तीन सहकाऱ्यांमध्ये एक मधुरा कट्टी म्हणून होत्या. या बाई मूळच्या कन्नड, पण पती मराठी होते. त्यामुळं त्यांना मराठी बोलता येत नसलं, तरी छान समजत होतं. त्यामुळं मी आपलं या बाईंशी मराठीतून बोलून माझी हौस भागवून घेत होतो. दुसऱ्या एक लक्ष्मी विश्वनाथ म्हणून होत्या. त्या बंगळूरच्या होत्या. या दोघीही तिशी-पस्तिशीच्या होत्या आणि कुठल्या तरी ट्रॅव्हल मॅगेझिनमध्ये कामाला होत्या. असे दौरे त्यांच्यासाठी नेहमीचीच गोष्ट होती. तिसरे होते मार्सेलिस बाप्टिस्टा. परदेश दौऱ्यावर जायचं म्हणून मी अगदी नवा शर्ट, नवी पँट घालून, इन-बिन करून ऐटीत विमानतळावर गेलो होतो. मार्सेलिस मात्र चक्क एका शॉर्टवर आणि टी-शर्टवर आले होते. तेही जग हिंडून आले होते. या तिघांच्याही पासपोर्टवर अनेक देशांचे व्हिसाचे शिक्के होते आणि त्याला सप्लिमेंट जोडल्या होत्या. माझ्या नव्या कोऱ्या पासपोर्टवर आता कुठं थायलंडच्या व्हिसाची हळद लागली होती. माझं नवखेपण आता मलाच फार जाणवू लागलं होतं...
मी पहिल्यांदाच परदेशात जाणार, म्हणून मला सोडायला मुंबईच्या विमानतळावर येण्याची घरच्यांची, विशेषतः वडलांची फार इच्छा होती. पण मी या कल्पनेला जोरदार विरोध केला. आणि ते फार बरं झालं असं नंतर मला वाटलं. शेवटी पुणे स्टेशनवर शिवनेरी व्होल्वोत मला बसवून द्यायला सगळे आले आणि तेवढं मी मान्य केलं. विमान रात्री अकराला होतं, पण मी चारलाच पुणं सोडलं. साडेसात-आठलाच मी सायनला उतरलो. कुठल्या तरी साउथ इंडियन एसी रेस्टॉरंटमध्ये बसून मी टाइमपास करण्यासाठी डोसा, उत्तप्पा असं काय काय मागवून खात राहिलो. नंतर टॅक्सी करून मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टू सी या टर्मिनलला गेलो. मी यापूर्वी एकदा विमानप्रवास केला होता आणि तोही मुंबई-बंगळूर असा. त्यामुळं मुंबई विमानतळाचं मला तितकंसं आकर्षण नव्हतं. पण आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि तिथलं एकूण वातावरण फारच वेगळं असतं, हे मला चटकन जाणवलं. विशेषतः देशांतर्गत प्रवासाच्या वेळी फार तपासण्या होत नाहीत. मात्र, आंतरराष्ट्रीय विमानतळावर या गोष्टी फारच सखोल आणि वेळखाऊ असतात, हे लक्षात आलं. मी नऊ वाजताच एअरपोर्टवर पोचलो.  


बरीच फोनाफोनी करून मधुरा कट्टी यांच्या पतीनं मला शोधून काढलं. आम्ही जरा वेळ गप्पा मारीत उभे राहिलो, तेवढ्यात थाई एअरवेजचे मॅनेजर आणि आमच्या या दौऱ्याचे प्रमुख उथ्थानाई पिआनप्रोम हे गृहस्थ आले. त्यांचं एवढं लांबलचक नाव सारखं कोण उच्चारणार, म्हणून त्यांनीच आम्हाला मला तुम्ही टोनी म्हणा, असं सांगून टाकलं. प्रथमदर्शनीच हा हसतमुख थाई माणूस मला आवडला. थोडा त्या लाफिंग बुद्धासारखाच वाटला मला तो. सदैव काही तरी जोक सांगून आम्हाला तो हसवत असे आणि स्वतःही सर्व अंग गदगद हलवून हसत असे. या टोनीमुळं आपला पुढचा प्रवास चांगला होणार याची मला कल्पना आली. शेवटी आम्ही एकेक तपासण्या करीत दहाच्या सुमारास आत गेलो. आता पुन्हा इथून बाहेर पडता येत नाही. थाई एअरवेजसाठी ओबेरॉयच्या महाराजा लाउंजमध्ये बसायची सोय होती. हे आंतरराष्ट्रीय प्रवाशांचं उच्चभ्रू जग मी प्रथमच पाहत होतो. अर्थात पत्रकारितेत येऊन दहा वर्षं झाली असल्यामुळं दबून वगैरे गेलो नाही. उलट एका वेगळ्या उत्सुकतेनं सर्व काही अनुभवत होतो. थोडा वेळ मधुरा, लक्ष्मीसोबत ज्यूस वगैरे पित टाइमपास केला. घरी फोन केला. अकराच्या सुमारास तोपर्यंत कुठं तरी गायब झालेला टोनी आला आणि आम्ही सगळे त्या इंटरकनेक्टेड लॉबीतून थाई एअरवेजच्या ए-३३० एअरक्राफ्टमध्ये शिरलो. आनंदाचा धक्का म्हणजे टोनीनं आमची तिकिटं बिझनेस क्लासमध्ये अपग्रेड केली होती. याचा मार्सेलिसला विशेष आनंद झाला, कारण त्याला आता मद्यपानाचा आनंद घेता येणार होता. मार्सेलिस आणि मी शेजारी शेजारी बसलो. विमान सुरू व्हायच्या आधीच मार्सेलिस डुलक्या घ्यायला लागला, तसं मी त्याला मी जरा खिडकीत बसू का, असं विचारलं. त्यानं चटकन मला खिडकी दिली आणि तो शेजारी बसला. मला आता खिडकी मिळाल्यानं खासच आनंद झाला. थाई हवाई सुंदऱ्या छानच होत्या. त्यांचं ते गोड सवादिका (सुस्वागतम) ऐकायला छान वाटत होतं. पण विमान समुद्रात बुडाल्यावर काय करायचं याची कंटाळवाणी प्रात्यक्षिकं दोन-तीनदा झाली आणि त्या सुंदऱ्यांच्या कृत्रिम हसण्याचा कंटाळा येऊ लागला. त्यातही तो ऑक्सिजन मास्क दणकन वरून खाली येतो, तेव्हा तर दचकायलाच होतं. एकूणच नवोदित प्रवाशाला फ्रस्ट्रेशन आणणारा तो प्रकार असतो 

विमानातील अन्य सुविधांचाही मी जमेल तसा अभ्यास सुरू ठेवला. माझ्याकडं एक किट आलं होतं. त्यातले दोन छोटे गोळे म्हणजे इयर प्लग... आणि विमानाच्या आवाजानं दडे बसू नयेत म्हणून ते देतात, हे ज्ञान मला पुन्हा पुण्यात आल्यावर झालं. भारतात येणारं विमान असल्यानं त्यांच्याकडं हिंदी गाणी होती आणि काही बोअर सिनेमेही होते. पण त्यापेक्षा त्या गोड पोरी पाहत बसणं जास्त छान होतं. शिवाय समोरच्या स्क्रीनवर विमान आता कुठं आहे, याची एक लाइन यायची, तेही मला आवडलं. बरोबर ११.२५ ला आमचं विमान उडालं....
(क्रमशः)



(पूर्वप्रसिद्धी - साहित्य चपराक दिवाळी अंक २०१३)

No comments:

Post a Comment