पुन्हा सुवर्णभूमीकडे...
------------------------
सकाळी साडेसहाला उठलो. साडेसातला
आवरून पुन्हा सहाव्या मजल्यावर ब्रेकफास्टला गेलो. तिथं
कुणीच नव्हतं. मग थोड्या वेळानं मार्सेलिस आला. त्याच्याबरोबर
नाश्ता केला. साडेआठ वाजता चेक-आउट केलं. टोनीलाच
यायला जरा वेळ लागला, पण तो आल्यावर आम्ही लगेच निघालो. जाताना
एका सॉव्हेनिअर शॉपमध्ये भरपूर खरेदी केली. पावणेदहा
वाजता क्राबी विमानतळावर पोचलो. बरोबर दहा वाजता आमचं विमान निघालं आणि साडेअकरा वाजता
आम्ही बँकॉकला पोचलो. तिथं आम्हाला घ्यायला आलेल्या लोकांची आणि टोनीची जरा
चुकामूक झाली. अखेर ती पिंकी नावाची आमची होस्ट मुलगी कार घेऊन आली. बँकॉकच्या
मधोमध नाइन रामा रोड नावाचा एक मोठा एक्स्प्रेस-वे काढला आहे. त्या
रस्त्यावरून आमची कार धावू लागली. या रस्त्यावर ४० बाथचा टोल भरावा लागला.
दोन्ही
बाजूंनी उंच उंच इमारती दिसत होत्या. त्यावर थायलंडचा लोकप्रिय राजा भूमिबोल
अदुल्यदेज यांची काढलेली भव्य चित्रं लक्ष वेधून घेत होती. हा राजा
एवढा लोकप्रिय आहे, की तो रोज वेगवेगळ्या रंगाचे शर्ट घालतो आणि थायलंडमधले
हजारो तरुण-तरुणी त्या दिवशी त्याच रंगाचा टी-शर्ट घालतात. कुठल्या
दिवशी कुठला रंग हे म्हणे आधीच जाहीर केलं जातं. पण त्या
राजाला एकूणच पिवळा रंग आवडत असावा. कारण बहुतेक चित्रांत तो पिवळ्या शर्टमध्येच होता. आम्ही
गेलो, त्या दिवशी बहुधा गुलाबी रंग होता. अनेक
लोक गुलाबी शर्टमध्ये होते. आम्हाला घ्यायला आलेल्या मुलीचं नावही पिंकी होतं आणि
तिनंही गुलाबी टॉप घातला होता, हे लक्षात आल्यावर मला जोरदार हसू फुटलं. अखेर
पाऊण तासांनी आमच्या सोफीटेल ग्रँड हॉटेलमध्ये पोचलो. हे एक
२०-२२ मजली फाइव्ह-स्टार हॉटेल होतं.
तिथं
गेल्यावर नियमानुसार हॉटेल इन्स्पेक्शन झालं. या हॉटेलच्या
सर्वांत वरच्या मजल्यावर एक खास स्यूट होता. त्याचं
नाव आता विसरलो, पण कुठलं तरी राजेशाही थाटाचंच नाव होतं. तिथं
राहायला म्हणे सहा हजार डॉलर दिवसाला... लांबूनच त्या खोलीला नमस्कार केला आणि
उतरलो. मग हॉटेलच्या दोन मध्यमवयीन, उत्साही
मॅनेजरीणबाईंबरोबर लंच झालं. आता हे फाइव्ह-कोर्स जेवण थोडं सरावाचं
झालं होतं. म्हणून मग थोडं थोडं करीत पाचही कोर्स पूर्ण केले आणि उठलो. लंचनंतर
आम्ही समोरच लोटस म्हणून एक मॉल होता, तिथं गेलो. जाताना
एका फूटओव्हरब्रिजच्या पायथ्याशी एक भिकारी जोडपं दिसलं आणि मनोमन समाधान वाटलं. अर्थात
हे जोडपं गाणी वगैरे म्हणून भीक मागत होतं आणि जरा बरं दिसत होतं. आम्हीही
काही नाणी त्यांच्यासमोर टाकली आणि परदेशी पर्यटक असल्याचं कर्तव्य निभावलं. लोटस
मॉल भव्य होता, तरी आपल्याकडेही आता असे मॉल आहेतच. तिथं
बरीचशी खरेदी झाली.
स रे सेक्सचा...
------------------
संध्याकाळी नाइट मार्केटला हॉटेलची एक कॅब जाते आणि तिच्यातून
अर्थात फ्री जाता येतं, हे कळलं. मग त्याच कॅबनं आम्ही चौघंही त्या ठिकाणी
गेलो. आपल्याकडच्या हाँगकाँग लेनसारखीच, पण रुंदीनं
बरीच मोठी अशी एक गल्ली होती.
बाजूनं एक प्रचंड वाहता रस्ता होता. वरून
मोनोरेल जात होती. त्या गल्लीच्या तोंडाशी घड्याळं, किंवा
पर्स वगैरे विकणारी दुकानं होती. खरं आकर्षण आत गेल्यावर कळलं. दोन्ही
बाजूंना मद्यपानाचे बार होते. आतमध्ये सेक्स शो सुरू होते. त्याचं
प्रदर्शन दारातच सुरू होतं. दाराच्या मधोमध एक उंचवटा केलेला होता. त्या
उंचवट्याच्या सेंटरला एक स्टीलचा उभा बार होता. तो थेट
वरच्या मजल्याला टेकवला होता. त्या बारला धरून आणि त्या प्लॅटफॉर्मवर अनेक मुली उभ्या
होत्या. कामुक, उत्तेजक हावभाव करून त्या येणाऱ्या-जाणाऱ्यांना
खुळावीत होत्या. त्या मुलींनी अंगावर अगदी छोटी चड्डी आणि वर लज्जारक्षणापुरतं
कापड घातलं होतं. अर्थात हे दर्शनी भागात म्हणून एवढं तरी होतं. आतमध्ये
या मुली पूर्ण नग्नावस्थेत सेवा देण्यासाठी सज्ज होत्या आणि त्याचीच ही दारावर केली
जाणारी जाहिरात होती. मधुरा आणि लक्ष्मी या दोन्ही बायका जग पाहिलेल्या असल्यामुळं
त्यांना हे दृश्य पाहून काहीच वाटत नसावं. त्या
शांतपणे त्यांची, खास तुळशीबाग टाइप शॉपिंग करीत होत्या. मार्सेलिस
केव्हाच एका बारमध्ये सटकला होता. आता या दोन बायका आणि मी त्या बाजारात फिरत होतो आणि दोन्ही
बाजूंनी सेक्स शोंनी थैमान मांडलं होतं. त्या गल्लीत अन्य युरोपीय पर्यटकही
होते आणि त्यांचा हेतू स्पष्ट होता. त्या गल्लीतून आम्ही पुढं पुढं जाऊ लागलो, तसंतसं
मार्केट आणखी उघडंवाघडं होत गेलं. आता तर तिथली माणसं माझ्या हाताला धरून आत नेण्यासाठी
झोंबू लागली. बहुतेकांच्या हातात अल्बम होते आणि त्यात मुलींचे फोटो. भाषा
समजत नसली, तरी तो माणूस वेगवेगळ्या मुलींच्या फोटोवर बोट ठेवून खाली इंग्रजीत
लिहिलेले डॉलरमधले त्यांचे दर सांगत होता, एवढं
तर कळत होतंच. या गल्लीत येऊन बारच्या आत पाऊल न टाकणारा मी कुणी तरी खुळा
माणूस आहे, असे भाव नंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटू लागले. नंतर
त्यांनी माझा नाद सोडून युरोपीय म्हातारे पकडले. त्या
गल्लीत अनेक गोरे, विशेषतः म्हातारे पुरुष होते आणि त्यांना थाई मुलींशी
सेक्स करण्याचा आनंद उपभोगायचा होता. बँकॉक ही जगातल्या सेक्स मार्केटची
राजधानी, हे मला माहिती होतं. पण कागदावर
वाचलेलं ते वास्तव त्या गल्लीत असं एकदम माझ्या अंगावर कोसळलं होतं. एक मात्र
आहे. त्या बारच्या आत जावं, असं मला
चुकूनही वाटलं नाही. आधी मी मजेनं हे सगळं पाहत होतो. मग एकदम
लक्षात आलं, की या मुली वयानं फारच लहान आहेत. अगदी
बारा-तेरा किंवा त्याहून कमी वयाच्या काही. सर्कशीतल्या
मुली दिसतात, तशा लवचिक शरीराच्या त्या मुली अजाणतेपणाने किंवा जाणतेपणाने
आपलं शरीर विकायला उभ्या राहिल्या होत्या. काही
वेळानंतर मला त्या मुलींची दया येऊ लागली. मधुरा
आणि लक्ष्मीला मागं सोडून मी आता बरंच पुढं गेलो होतो. आमची
चुकामूक झाली होती. आता पाऊसही सुरू झाला होता. मी आणखी
पुढं गेल्यावर ती गल्ली संपली आणि पुन्हा एक वाहता रस्ता लागला. मी माघारी
फिरलो आणि पुन्हा त्या गल्लीच्या तोंडाशी येऊन उभा राहिलो. थोड्या
वेळानं मधुरा, लक्ष्मी आल्या आणि मी हुश्श केलं. त्याही
मला शोधत होत्या. आम्ही मार्सेलिसची वाट पाहू लागलो. पण या
गल्लीत गायब झालेला मार्सेलिस आता पुन्हा आपल्याबरोबर लवकर येणं शक्य नाही, याची
लवकरच आम्हा तिघांनाही जाणीव झाली. मग त्याचा नाद सोडून आम्ही जेवणासाठी भटकू लागलो. सुदैवानं
मला एक इंडियन रेस्टॉरंट दिसलं. एका शीख माणसाचं ते हॉटेल होतं. मग तिथं
आम्ही मस्त पंजाबी व्हेज डिश मागविल्या आणि जेवलो. जेवण
चांगलं होतं. पाच दिवसांनी नान, फ्लॉवरची भाजी, जिरा
राइस असं आपल्या चवीचं जेवलो. बरं वाटलं. तिथून बाहेर पडल्यावर आमची कॅब जिथं
उभी राहते, ते ठिकाण शोधू लागलो. पण ते
लवकर सापडेना. अखेर कॅब गेली असेल, आता आपण
आपली टॅक्सी करून जाऊ, असं मधुरा कट्टी म्हणाल्या. शेवटी
मी एक टॅक्सी शोधली. रात्रीचे दहा वाजले होते. आमचं
सोफीटेल हॉटेल नेमकं कुठल्या भागात आहे, हे आम्हाला आठवेना. टॅक्सीवाल्यांना
विचारलं, तर ते बँकॉकमध्ये चार सोफीटेल हॉटेल आहेत, असं सांगायचे. शेवटी
मधुराकडं एक कार्ड सापडलं. त्यात त्या हॉटेलचा पत्ता होता. एक म्हातारा
टॅक्सीवाला शेवटी आम्हाला न्यायला तयार झाला. टॅक्सी
निघाली. या दोन बायकांना घेऊन एकट्यानं बँकॉकमध्ये फिरताना मलाच टेन्शन
आलं होतं. पण त्या दोघी निर्धास्त होत्या. एक तर
पाऊस, त्यात टॅक्सीवाला भलत्याच रस्त्याला लागलाय, असं प्रत्येक
टर्नला मला वाटायचं. हा खूप बिल करणार, याचीही
आम्हा तिघांना खात्री वाटत होती. अखेर आम्ही आपल्याकडं किती पैसे आहेत वगैरे हिंदीतून बोलायला
सुरुवात केली. सुमारे पाऊण तासानंतर टॅक्सीवाल्यानं आमच्या हॉटेलमध्ये आम्हाला
सुखरूप नेऊन सोडलं. ते हॉटेल २२ मजली असल्यानं बरंच लांबून मला दिसलं. मग मी
पुष्कळ आरडाओरडा करून टॅक्सीवाल्याला तिकडं घे, तिकडं
घे, असं सांगून टेन्शन आणलं होतं. बिल फक्त
१११ बाथ झालं. फसवाफसवी काही नाही. मी हुश्श
केलं आणि रूमवर जाऊन पडलो...
(क्रमश:)
Chaan Lihalay..................
ReplyDeleteधन्यवाद...
Deletehttp://www.esakal.com/esakal/20100329/4824885682085703077.htm
ReplyDeleteवाचलं... छानच...
Delete