परत मायभूमीकडे...
-----------------------
सकाळी साडेसातला उठलो. कालची
ती थरारक पावसाळी रात्र आणि त्या दोन बायकांसोबत अनोळखी टॅक्सीवाल्यासोबत केलेला तो
प्रवास आठवला आणि स्वतःचंच हसू आलं. साडेआठपर्यंत आवरून तयार झालो. तेवढ्यात
लक्ष्मीचा फोन आला, की ब्रेकफास्टला येतोयस का म्हणून. मग पावणेनऊला
खाली लॉबीत गेलो. त्यांच्याबरोबर ज्यूस आणि फळं हा नेहमीचा ब्रेकफास्ट घेतला. नंतर
तिथल्या वेट्रेसनं खास थाई चहा आम्हाला सर्व्ह केला. तो घेतला
आणि पुन्हा वर रूमवर आलो. बँकॉक पोस्ट टाकला होता. तो चाळला. त्यात
युवराजसिंगनं टी-२० वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूंवर
सहा षटकार मारल्याची बातमी ठळक आली होती. त्या संपूर्ण पेपरमध्ये भारताशी संबंधित
अशी ती एकच बातमी होती. त्या पेपरची किंमतही होती २५ बाथ. अर्थात
हॉटेलमध्ये मला तो फुकटच मिळाला होता. पण एकूण थायलंडमध्ये इंग्रजी वृत्तपत्र
ही काही परवडण्याजोगी बाब आहे, असं वाटलं नाही. त्या
मानानं आपल्याकडं पेपरच्या किमती फारच स्वस्त आहेत.
दहा वाजता शॉपिंगसाठी लॉबीत जमायचं असं आमचं ठरलं होतं. त्यानुसार
मधुरा आणि मी पुन्हा लोटस आणि सेंट्रल या दोन मॉलमध्ये जाऊन उरलीसुरली खरेदी केली. बरोबर
तीन वाजता पिंकी आम्हाला न्यायला गाडी घेऊन आली. खाली
लॉबीत आम्ही चौघांनी फोटो काढून घेतले. मग गाडीतून त्याच त्या नाइन रामा रोडवरून
सुवर्णभूमी विमानतळाकडं निघालो.
पाऊण तासात एअरपोर्टवर पोचलो. तिथं
लगेज चेक-इन, इमिग्रेशन आदी सोपस्कार पार पडल्यावर आम्ही थाई एअरवेजच्या
लाउंजमध्ये जाऊन बसलो. पावणेसहा वाजता मी तिथून बायकोला मेल पाठविली आणि निघत
असल्याचं कळवलं. बरोबर सहा वाजता आम्ही डी-६ नंबरच्या गेटला
गेलो. तेथील सोपस्कार आटोपून मुंबईच्या विमानात बसलो. आमच्या
विनंतीनुसार मार्सेलिसला बिझनेस क्लासमध्ये अपग्रेडेशन मिळालं. एकच सीट
शिल्लक होती. त्यामुळं आम्ही तिघं इकॉनॉमी क्लासमध्ये बसलो. बरोबर
पावणेसातला आम्ही त्या सुवर्णभूमीला टाटा करून टेकऑफ केलं. विमानात
व्हेज जेवण मिळालं. कुठला तरी फालतू हिंदी सिनेमा पाहत वेळ घालविला. येताना
विमान बंगालच्या उपसागरावरून उडत होतं व काही काळ जरा एअर टर्ब्युलन्स जाणवला. पहिल्यांदाच
थोडी भीती वाटली. आपल्या खाली प्रचंड पाण्याचा साठा पसरलेला आहे आणि आपल्याला
पोहता येत नाही, या दोन गोष्टी एकदमच मनात आल्या. सहज मी
खिडकीतून बाहेर पाहिलं. माझ्या डाव्या बाजूला विमानाचा लांबलचक पंख पसरला होता. आमचं
विमान ढगांच्या वरून उडत होतं. त्यामुळं खालचं काही दिसत नव्हतं. उलट चंद्र
उगवला होता. ढगांच्या वरून मी पहिल्यांदाच असा चंद्र पाहत होतो. चंद्राचा
पांढुरका प्रकाश खालच्या ढगांवर पडला होता आणि एका रूपेरी महासागरातून आपलं विमान नावाचं
जहाज हळुवारपणं चाललं आहे, असं काही तरी मला वाटू लागलं. अचानक
त्या पंखावर साक्षात पवनपुत्र हनुमान बसले आहेत, असं मला
चक्क दिसलं. एक गुडघा टेकवून ते त्या पंखावर बसले आहेत आणि माझ्याकडं बघून
हसताहेत, असंही मला दिसलं. आता हा निखालस भास होता, यात वाद
नाही. (मी इकॉनॉमी क्लासमध्ये बसलो होतो, त्यामुळं
मद्य मिळाल्याची व मी ते घेतल्याचीही शक्यता शून्य होती.) पण असं
ते दृश्य अचानक माझ्या डोळ्यांसमोर का आलं, याचा
उलगडा मला आजतागाजत झालेला नाही. वास्तविक मी खूप देव देव करणारा नव्हे. मारुतीचा
भक्त, शनिवारचा उपवास करणारा असा तर मुळीच नव्हे. तरीही
मला वाटतं, त्या भीतीच्या क्षणी माझ्या अबोध मनात कुठं तरी खोल दडून बसलेलं
मारुती स्तोत्र उफाळून वर आलं असणार आणि त्या मारुती स्तोत्राच्या पुस्तकावर असतो, तसाच
तो मारुतीराया तिथं बसलेला दिसला असणार. पण एकूणच त्या प्रसंगानंतर माझी भीती
पूर्ण नष्ट झाली. तो एअर टर्ब्युलन्सही आता गेला होता. विमानात
सर्वांत जवळचा विमानतळ कुठला, हे समोरच्या स्क्रीनवर येत होतं. आधी पोर्ट
ब्लेअर आलं. नंतर हैदराबाद आलं. नंतर
तर वेरूळ-अजिंठा, नाशिक हेही नकाशात दिसू लागलं. मग खाली
एक झगझगीत शहर दिसलं. ते बहुधा नाशिकच असावं. थोड्याच
वेळात विमानाचं डिसेंडिंग सुरू झालं. ठाणं ओलांडलं. खाडीही
ओलांडली, पण मुंबईच्या विमानतळावर भरपूर ट्रॅफिक जॅम होतं, म्हणे. मग आमचं
विमान आकाशात गोल गोल फेऱ्या मारीत राहिलं. लांब
अरबी समुद्रात जाऊन पुन्हा ठाण्यावरून, खाडीवरून एक चक्कर झाली. अखेर
खाली ग्रीन सिग्नल मिळाला आणि विमान वेगानं वांद्र्याच्या झगमगाटावरून विमानतळावर उतरलं. जाताना
भव्य वाटलेलं आपलं मुंबईचं विमानतळ आता फारच छोटं आणि साधं वाटलं. इमिग्रेशनचे
सोपस्कार पार पाडून ग्रीन चॅनेलमधून बाहेर आलो. मला आठवतंय, आता साठीपार
गेलेला डॉलर तेव्हा फक्त ३९ रुपयांना होता. कारण
समोरच एसबीआयचं करन्सी एक्स्चेंज काउंटरवर हे दर लिहिलेले मला अजून लक्षात आहेत. बाहेर
आल्यावर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. कार्डांची देवाणघेवाण झाली. विमानतळाच्या
बाहेर पडल्यावर मी प्री-पेड टॅक्सी केली आणि दादरला निघालो. मुंबईत
हलका पाऊस सुरू होता. गणपतीचे दिवस होते. काही
ठिकाणी सात दिवसांच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. रात्री
साडेदहा-अकराचा सुमार होता. पण माहीममध्ये
ट्रॅफिक तुंबलं होतं. बँकॉकच्या रस्त्यांची आणि मुंबईची सारखी तुलना सुरू झाली. तरीही
मुंबईचा डौल, शान, ऐट काही औरच आहे, असंच
वाटलं. दादरला अकराची शिवनेरी व्होल्वो मिळाली. अडीचला
शिवाजीनगरला आलो. माझे वडील मला न्यायला तिथं आले होते. पहाटे
तीनला घरी पोचलो. अशा रीतीनं माझा पहिला परदेश दौरा सुफळ संपूर्ण झाला...
तेव्हा माझ्याकडं डिजिटल कॅमेरा नव्हता. तेव्हा
रोल टाकून मी माझ्या कोडॅक क्रोमावर तिथले फोटो काढले. अर्थात
ते सगळे चांगलेच आले. पण मोबाइलही कॅमेरावाले नव्हते. सहाच
वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, पण आपण फार काही तरी जुनी गोष्ट सांगतो आहोत, असं वाटतंय, एवढं
हल्ली सगळं फार वेगानं बदलतंय. अर्थात जग कितीही बदललं, आपण कितीही
बदललो, तरी आयुष्यात पहिलेपणाच्या ज्या काही गोष्टी असतात, त्या
कधीच विसरल्या जात नाहीत. माझा हा पहिला परदेश दौरा असल्यानं मीही तो कधी विसरणं
शक्य नाही. आयुष्याकडं बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मला या ट्रिपमुळं मिळाला. थायलंडविषयीचे
अनेक गैरसमज दूर झाले. या ट्रिपविषयी लिहावं, असं तेव्हा
लगेच मला का वाटलं नाही, हे मला आता लक्षात येत नाही. पण सुदैवानं
मी त्या पाच दिवसांची डायरी लिहिली आहे. आता इतक्या वर्षांनंतर या ट्रिपविषयी
लिहावंसं वाटलं, तेव्हा त्या डायरीचा नक्कीच खूप उपयोग झाला. मधुरा
आणि लक्ष्मी यांच्याशी काही काळ ई-मेलवरून संपर्कात होतो. नंतर
तोही संपर्क हळूहळू कमी होत गेला. आता तर तो नाहीच. त्या
दोघीही कुठं असतात, काय करतात मला ठाऊक नाही. यथा काष्ठं
च काष्ठं च... म्हणतात, तसंच हे. या छोट्याशा ट्रिपमध्ये ग्रेट काही
घडलं नसेल, पण तरीही माझ्यासाठी ती स्पेशल आहे, कारण
शेवटी ती माझी पहिलीवहिली परदेशाची सहल आहे...
---
(समाप्त)
-----
No comments:
Post a Comment