22 Nov 2013

झाकलं माणिक...मी जामखेडचा. नगर हे माझ्या जिल्ह्याचं प्रमुख ठिकाण. मी ते प्रथम पाहिलं, ते वयाच्या सहाव्या वर्षी बहुधा. 'बालशिवाजी' हा सिनेमा नगरमध्ये अप्सरा टॉकीजमध्ये (आताचं शिवम प्लाझा) लागला होता आणि तो पाहायला आम्ही काकासमवेत नगरमध्ये आलो होतो. त्यानंतर वयाच्या बारा-तेराव्या वर्षी नगरमध्ये राहायलाच आलो. त्यानंतर सलग जरी नाही, तरी सुमारे दहा-पंधरा वर्षं नगरमध्ये राहण्याचा योग आला. माझ्या आयुष्यात त्यामुळं नगर आणि तिथल्या माझ्या रहिवासाचं स्थान अविभाज्य आहे. नगरच्या आठवणी कायम मनात दाटतात. आता असं वाटतं, की हे काहीसं दुर्दैवी गाव. नैसर्गिकरीत्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात येणारं आणि सामाजिक-सांस्कृतिक अन् राजकीयदृष्ट्या पुण्याच्या छायेत येणारं. भव्य ऐतिहासिक वारसा असला, तरी भविष्याकडं जाण्यासाठी वर्तमानानं जे बोट धरावं लागतं, ते कधीच सोडून दिलेलं. एखाद्या बड्या राजघराण्यात पाच-दहा कर्तबगार मुलं असतात अन् त्यातलं एखादं सगळ्याच बाबतीत कमी असतं, तसं हे पश्चिम महाराष्ट्रातलं उणावलेलं ठाणं! खरं तर नगर खूप चांगलं, प्रगत शहर व्हायला काही हरकत नव्हती. किंबहुना ऐंशीच्या दशकात हे तसं बऱ्यापैकी टुमदार शहर होतं. तिथल्या रेल्वे स्टेशनसारखंच. पण पुढं काही तरी जबरदस्त बिनसत गेलं. नवनीतभाई बार्शीकरांसारखं या शहरावर प्रेम करणारं नेतृत्व पुन्हा झालं नाही. त्यामुळंच नाशिक व औरंगाबाद ही शहरं 'प्रगती फास्ट' करीत पुढं निघून गेली आणि नगर हे पुण्याचं (पण सावत्रच) उपनगर बनून राहिलं... पण मला तरी नगर म्हणजे कायम एक झाकलं माणिक वाटत आलेलं आहे...
...माणिक चौक हा नगरमधला एक प्रमुख चौक. माळीवाडा वेशीकडून नगरच्या सुप्रसिद्ध कापडबाजाराकडं जाताना लागतो. तिथं सेनापती बापटांचा पुतळा असून, त्याला एका सुंदर कारंज्याद्वारे संध्याकाळी साग्रसंगीत, संपूर्ण रंगीत अशी आंघोळ घातली जात असे. मी काही वर्षांपूर्वी नगरमध्ये राहत होतो, तेव्हा हे सुंदर दृश्य पाहून कायम तिथं थबकायचो. (आता काय परिस्थिती आहे, माहिती नाही.) चितळे रोड हा नगरमधला महत्त्वाचा रोड. चौपाटी कारंजापासून सुरू होऊन तेलीखुंटापाशी पुन्हा थेट त्या सुप्रसिद्ध कापडबाजाराला जाऊन मिळणारा. या चौपाटी कारंजापाशी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अर्धपुतळा आहे. या पुतळ्याभोवतीही एक कारंजं असायचं आणि संध्याकाळी ते छान थुईथुई उडत सावरकरांना सचैल स्नान घडवायचं. मी संध्याकाळी चितळे रोडवर टाइमपास करून घराकडं जाताना या पुतळ्यासमोर थबकायचो. ते कारंजं पाहून मस्त, गार वाटायचं. लालटाकी रोड आणि ती लालटाकी हे नगरमधलं तेव्हाचं तरुणांचं आवडतं 'डेस्टिनेशन' होतं. या लालटाकीवर नेहरूंचा पूर्णाकृती पुतळा आहे. त्याच्या पायाशी अर्धगोलाकार, रंगीत दिव्यांच्या झोतात पाणी सोडलं जायचं... संध्याकाळी फिरायला जायचं हे खास ठिकाण होतं... शिवाय सिद्धीबाग, वाडिया पार्क ही ठिकाणं होतीच. सावेडी विकसित होत होतं... पूर्वी झोपडी कँटीन गावाबाहेर वाटायचं, ते हळूहळू मध्यवस्तीत आलं. प्रोफेसर कॉलनी, गुलमोहोर रोड, आकाशवाणी हा सगळा भाग एकदम झक्कास झाला.


थोडक्यात सांगायचं, तर नव्वदच्या दशकातलं नगर हे तसं टुमदार, आटोपशीर व निवांत, मस्त शहर होतं. गुजर गल्ली किंवा सातभाई गल्लीत वाड्यात भाड्यानं किंवा स्वतःचा छोटा फ्लॅट घेऊन राहावं, नवीन मराठी शाळेत किंवा भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये किंवा कुलकर्णी सरांच्या समर्थ विद्या मंदिरात शिकावं, वाडिया पार्क किंवा गांधी मैदानात क्रिकेट खेळायला किंवा एरवी बड्या नेत्यांच्या सभा ऐकायला जावं, चितळे रोडवर भाजी घ्यावी, सारडा किंवा 'कोहिनूर'मधून कपडे घ्यावेत, 'वाय. प्रकाश' (म्हणजे प्रकाश येनगंदूल) किंवा 'डी. चंद्रकांत'कडून शिवून घ्यावेत, 'रामप्रसाद'चा चिवडा खावा, आशा टॉकीजला (आणि नंतर महेश) मॅटिनीचा शो बघावा, मोने कला मंदिरात (आणि नंतर सहकार सभागृहात) नाटकं पाहावीत, संध्याकाळी लालटाकी किंवा गुलमोहोर रोडला फिरायला जावं, १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला भुईकोट किल्ला हिंडून यावा, पावसाळ्यात सायकली काढून चांदबीबीचा महाल किंवा डोंगरगण गाठावं, आठवड्यातून एकदा तरी नगर-पुणे नॉनस्टॉप एसटीनं पुण्याला जावं (काही तरी काम असतंच असतं...), चतुर्थीला माळीवाड्याच्या विशाल गणपतीला किंवा दिल्लीगेटच्या शमी गणपतीला जावं, दर शनिवारी दिल्लीगेटच्या बाहेरच्या शनी मंदिरात जावं, नगर कॉलेजच्या ग्राउंडवर चाललेले सामने पाहावेत, कधी लष्कराच्या परिसरात हिंडून रणगाडे बघावेत, संक्रांतीला पचंब्याची जत्रा गाठावी... असं सगळं तेव्हाचं नगरी आयुष्य होतं. खूप स्वस्ताईही होती. गरजा फार थोड्या होत्या. आता ते खरोखर तसं राहिलं आहे का, मला शंका आहे.

गाव लहान असल्यामुळं बहुतेक सगळे जण एकमेकांना ओळखत. पुण्यात जसा पेठांचा भाग, तसं खरं नगर माळीवाडा ते दिल्लीगेट या दोन वेशींतच नांदत होतं. पूर्वी माळीवाड्याचं एकच स्टँड होतं. आता तीन तीन स्टँड झाले. माळीवाड्याच्या स्टँडच्या बाहेर प्रसिद्ध नगरी तांगे उभे असत. हे तांगे होते, तोपर्यंत बारकुडे रस्ते, गल्ल्या आणि बोळांतून वाडा संस्कृती टिकून होती. मिश्र वस्ती होती, त्यामुळं बहुतांश वेळा एकोप्यानं, गुण्या-गोविंदानं नांदण्याकडं कल असायचा. वर्ष-दोन वर्षांत दंगे-धोपे व्हायचेच. पण दोन्हीकडच्या भडक डोक्याच्या लोकांवर थंडगार पाणी ओतणारे बुजुर्गही दोन्ही बाजूंना उपस्थित असायचे. त्यामुळं ताणेबाणे असले, तरी विखारी नव्हते. शिवाय वस्ती एवढी एकमेकांना लागून आणि व्यवहाराला रोजचा संबंध... त्यामुळं गावात शांतता असे. पण ही शांतता कधी कधी अंगावर येई. कारण नगरी लोक एवढे सहनशील, की चार-चार दिवस पाणी आलं नाही, तरी हूं की चूं करणार नाहीत. आहे त्या पाण्यात भागवतील. त्या चितळे रोडवर नेहरू मार्केटसमोर रोज ट्रॅफिक जॅम व्हायचं. त्यातच गाई-गुरं, एवढंच काय म्हशींचे तांडे त्या रस्त्यावर फतकल मारून बसायचे. पण अस्सल नगरकर त्यांना वळसा घालून आपली लूना पुढं काढत आणि जाताना त्या गोमातेला हात लावून दर्शनही घेत. रस्त्यांची अवस्था भयानक, पण नगरचा माणूस शांतपणे त्यातून पुढे जाईल... नगर एरवी दुष्काळी असलं, तरी पावसाळ्यात कधी कधी जोरदार एक-दोन पाऊस पडतातच. अशा वेळी दिल्लीगेट ते न्यू आर्टस या रस्त्याचं अक्षरशः तळं होई. पण त्याविषयी ना खेद ना खंत. तेव्हा उन्हाळ्यात दिवसेंदिवस लाइट नसायचे... प्रचंड उकडायचं. पण नगरकर रागवायचे नाहीत. शांतपणे अंगणात खुर्ची टाकून डास वारीत बसायचे. ऐन सणाच्या दिवशी पाणी तोडायचं हा तर पालिकेचा खाक्याच होता. पण तेव्हाही कुठं मोर्चा निघाला नाही की निषेधाचं पत्र कुणी लिहिलं नाही. नगरमधल्या या टोकाच्या सहनशीलतेचा प्रचंड राग यायचा. पण नगरी वातावरणात तो मनातच नष्ट व्हायचा. कधी दगड उचलून मारावासा वाटला नाही.
खरं तर हे झाकलं माणिक सांस्कृतिकदृष्ट्याही किती समृद्ध होतं! नगरचं जिल्हा वाचनालय पावणेदोनशे वर्षांपूर्वी स्थापन झालं आहे. पुण्यातदेखील एवढं जुनं ग्रंथालय नाही. मामा (उर्फ मधुकर) तोरडमल, बंडू (उर्फ सदाशिव) अमरापूरकर यांच्यापासून ते मिलिंद शिंदे (उर्फ तांबडेबाबा) व्हाया अनिल क्षीरसागर, मोहन सैद असा इथल्या नाट्य क्षेत्राचा गाजावाजा आहे. नगरमध्ये अनेक नाटकं आणणारे चार्मिंग पेन सेंटरचे सतीश अडगटला यांना कोण विसरेल? रामदास फुटाण्यांपासून ते बाबासाहेब सौदागरपर्यंत अनेक कवी आणि सदानंद भणगेंपासून ते संजय कळमकरांपर्यंत अनेक लेखक अनेक वर्षांपासून नाव राखून आहेत. गंगाधर मोरजे, सुरेश जोशी यांच्यासारखे समर्पित संशोधक नगरमध्ये होऊन गेले. त्यांचं योगदान केवळ अतुलनीय आहे. विलास गिते, प्रा. लछमन हर्दवाणी अनेक वर्षे व्रतस्थपणे आपले अनुवादाचे कार्य करीत आहेत. सु. प्र. कुलकर्णी, लीला गोविलकर, मेधा काळे, अनिल सहस्रबुद्धे, मकरंद खेर यांच्यासारखे प्राध्यापक-लेखक मंडळीही उत्साहाने नगरचं सांस्कृतिक विश्व जागतं ठेवीत आले आहेत. श्रीधर अंभोरे, अनुराधा ठाकूर यांच्यासारख्या चित्रकारांनी राज्यभर नाव गाजवलं, तर शिल्पकार प्रमोद कांबळे यांचं नाव घेतल्याशिवाय नगरचा कलावारसा अपूर्ण राहील, याची खात्री आहे. नगरमध्ये गणपतीच्या मूर्ती तयार होतात आणि त्या राज्यभर जातात.  महापालिकेच्या महावीर कलादालनात वर्षभर कसली कसली प्रदर्शनं सुरू असतात. पूर्वीच्या नगरपालिकेचं पहिल्या मजल्यावरचं सुंदर सभागृह तर अनेक सांस्कृतिक-साहित्यिक सोहळ्यांचं साक्षीदार होतं. अलीकडंच ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचं समजल्यावर आपल्या शरीराचाच कुठला तरी हिस्सा नाहीसा झाल्यासारखं मला दुःख झालं होतं.
शैक्षणिकदृष्ट्याही नगरला चांगली परंपरा होती. नगर कॉलेज हे सर्वांत जुनं कॉलेज. शिवाय हिंद सेवा मंडळाचं पेमराज सारडा कॉलेज आणि जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचं न्यू आर्ट्-स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ही आणखी दोन महत्त्वाची कॉलेजेस. शिवाय गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय आणि विखे पाटलांचं विळद घाटात बांधलेलं इंजिनिअरिंग कॉलेज. या पंचकोनात नगरचं कॉलेजविश्व फिरायचं. पुणे विद्यापीठाला जोडलेलं असल्यानं दर्जा आणि प्रतिष्ठा लाभलेली. संपूर्ण जिल्ह्यातून आणि अगदी शेजारच्या मराठवाड्यातूनही मुलं नगरला शिकायला येतात. राजकीयदृष्ट्या नगर हे अत्यंत जागरूक गाव असल्यानं त्या राजकीय वारशाची लस महाविद्यालयीन जीवनातच टोचली जायची. भालचंद्र नेमाडेंच्या बऱ्याचशा कादंबऱ्यांतून नगरच्या तत्कालीन शैक्षणिक विश्वाचं चित्रण आल्याचं जाणकार सांगतात.
नगरमधील खाद्ययात्रेविषयी सहज आठवत गेलो आणि वाटलं, की नगरचं खाद्यजीवनही किती चवदार होतं... जुन्या एसटी स्टँडवरची बाबासाहेबची पुणेरी भेळ आणि त्या मालकांचं ते शास्त्रीय संगीताचं वेड नगरकरांना चांगलंच माहिती आहे. मार्केट यार्डच्या बाहेरही एक गाडी असायची. तिथं तीन रुपयांना भरपेट अन् चविष्ट फरसाण भेळ मिळायची. नगरमध्ये फरसाणला कडबा म्हणतात. तर हा कडबा आणि चुरमुरे घालून केलेला भेळभत्ता म्हणजे अनेकांचं टाइमपास खाणं... माणिक चौकातला वडापाव खूपच फेमस. संध्याकाळी तिथं प्रचंड गर्दी व्हायची. हा वडा एवढा मोठा असायचा, की तो देतानाच दोन पाव द्यायचा.

हा जंबो वडा-पाव खाल्ला, की कधी कधी एका जेवणाचं काम भागायचं. या वडापावनंतर दुर्गासिंग आणि द्वारकासिंगची लस्सी प्यायची. एक दुकान तिथं जवळच होतं, तर दुसरं चितळे रोडवर. चितळे रोडवरच नेता सुभाष चौकात खन्नूशेठ पंड्यांचं रुचिरा स्वीट्स आहे. लोक सकाळी नाष्ट्याला गरम जिलेबी घेऊन खातात, हे दृश्य माझ्या आयुष्यात सर्वप्रथम पाहिलं ते इथंच. खरोखर या जिलेबीसारखी खमंग, कुरकुरीत जिलेबी मी अन्यत्र कुठं अजून तरी खाल्लेली नाही. याच चौकात नगरचा प्रसिद्ध खवा मिळायचा, ते काका हलवाईंचं दुकान होतं. कापडबाजारात स्वीट होम हे आइस्क्रीमचं दुकान आणि तिथलं मँगो आइस्क्रीम हा कापडबाजारातल्या खरेदीनंतरचा हमखास कार्यक्रम असायचा. कोहिनूरच्या खालीच असलेला महेंद्र पेडावाला आणि त्यांचे ते जंबो साइझ पेढे परीक्षांमधलं आमचं यश खरोखर वर्धिष्णू आणि गोड करायचे. महेंद्र पेडावालांकडं मिळणाऱ्या विविध चवींच्या शेव हेही एक आकर्षण असायचं. सिद्धीबागेसमोर असलेल्या 'रॉयल' या फेमस दुकानातलं आइस्क्रीम आणि पिस्ता कुल्फी खाल्ली नाही, असा नगरकर माणूस नसेल! अर्बन बँक रोडवर रसना नावाचं मिसळीचं दुकान होतं. तिथली जहाल, तिखट मिसळ खाऊन डोळ्यांतून पाणी वाहिल्याच्या आठवणी आहेत. सारडा कॉलेजच्या कँटीनची मिसळही फेमस होती म्हणे. पण ती खाण्याचा अस्मादिकांना कधी योग आला नाही. मार्केट यार्डच्या दारात एक आवळ्याचे सर्व पदार्थ मिळणारं दुकान होतं. तिथं आवळ्याचा चहा मिळायचा. असा चहा अन्यत्र कुठंही आजतागायत मिळालेला नाही. तिथंच समोर सुखसागर नावाचं हॉटेल होतं. त्या हॉटेलात प्रथम सीताफळाच्या चवीचं आइस्क्रीम खाल्ल्याचं आठवतंय. नगरच्या पंचक्रोशीत विशेषतः पांजरपोळ संस्थेत भरणाऱ्या हुरडा पार्ट्या याही नगरच्या खाद्यजीवनाच्या अविभाज्य भाग आहेत.
नगरचे दिवस आठवले, की हे सगळं आठवतं. मग पुनःपुन्हा वाटत राहतं, की राजकीय-सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या एवढं पुढारलेलं असूनही नगर मागं का पडलं? हे झाकलं माणिक झाकलेलंच का राहिलं? त्याची किंमत कुणाला का कळली नाही? आशियातलं सर्वांत मोठं खेडं अशी कुचेष्टा नगरचेच लोक करतात. वर चांदबीबी आज जरी नगरमध्ये आली, तरी गल्ली-बोळ चुकणार नाही, असा विनोद करतात. हे प्रतिमाभंजन कशामुळं? ही आत्मपीडा कशामुळं? राजकीय नेतृत्वाची पोकळी आणि स्थानिक लोकमताच्या दबावाचा अभाव या दुहेरी कात्रीत नगरची ही दशा झाली का? माहिती नाही. पण उत्तरं शोधायला हवीत.
नगरमधली पुढची पिढी कदाचित अशी नसेल... त्यांच्यामध्ये काही वेगळ्या ऊर्मी जागत असतील... तसं असेल तर हे 'माणिक'' झळाळून उठायला वेळ लागणार नाही!

18 comments:

 1. प्रिय श्रीपाद,
  पूर्ण नगर फिरुऊन आणलस. छान वाटलं.
  - शशी देशमुख, जामखेड

  ReplyDelete
 2. कला नगर+ खाद्य नगर = नगरची सफर

  उत्तम लेख

  ReplyDelete
 3. खूप मस्त वाटलं यातल्या बऱ्याच गोष्टी शाळेत असताना अनुभवल्यात पण आता डेव्हलपमेंट च्या नावाखाली एतिहासीक वस्तूंची होणारी मोड तोड म्हणा किंवा आपलं राजकारण म्हणा या मुळे शहराचा ह्रास होतोय त्याच वाईट वाटतंय ��

  ReplyDelete
 4. I am also from Jamkhed. But settled at Ahmednagar & now residing at Pune. Thanks for such a beautiful script on Nagar. Proud to be Jamkhedkar.

  ReplyDelete
 5. Mi Nagarchach,balpan kapad bajarat gelela.Nantar Nagar college,State Bank (opp.Collector office,Ani nantar Vasant Tekadi.Atach Nagar pahila tar bharamsat gardy,vahana,Ani raste tevadhach.Barshikar anakhi 40 varsha tari have hote.Aapan Punyachya pudhe gelo asato.Pan hi re Deva .Lekh khup avadala Ani bhavala.Dhanyawad.

  ReplyDelete
 6. Good coverage. I was also at Jamkhed for the period of 5 years Our Jamkhed stay was very pleasant. We also spent 16 years from where my career started Now planning to shift Anagar.

  ReplyDelete
 7. Good coverage. I was also at Jamkhed for the period of 5 years Our Jamkhed stay was very pleasant. We also spent 16 years from where my career started Now planning to shift Anagar.

  ReplyDelete
 8. नगर आजही तसेच आहे परंतु आता खूपच गर्दी झाली त्यामुळे नकोसे वाटते पण आवडते

  ReplyDelete
 9. खरंच,शांत तणावविरहीत जीवन जगण्यासाठी नगर सारखं ग्वाही.उगीच नाही आचार्य अत्र्यांनी त्याच्या एका लेखात असे
  म्हटले आहे की नगरसारख शांत साधंसुधं गाव नाही.वाईट याच गोष्टीचं वाटतं की या जिल्ह्याला एवढे मोठमोठ् पुढारी झाले पण सर्वांनी या गावाकडे तुच्छता पाहिले.साधा उड्डाणपूल मिळत नाही.साध शांत जीवासाठी नगर सारखं गाव नाही.आम्ही नगरबाहेर असलो तरी नगर लोकांच्या नजरेत कसेही असो.तरी नगरचे खुप अभिमान आहे आणि कायम राहील.


  ReplyDelete
 10. खूप सुंदर नगरचे वर्णन. पूर्ण भूतकाळात गेलो.मी सोळा वर्षे नगरला होतो.... ते नगर आजही पूर्णपणे आठवणीत आहे. राजकीय इच्छा शक्ती पुरेशी नसल्यामुळे शहर प्रगती करू शकले नाही.हा एक दैव दुर्विलास आहे.असो....हा लेख परिपूर्ण करण्यासाठी जुनी छाया चित्रे मिळवता आली तर बरे होईल...

  ReplyDelete
  Replies
  1. अतुल सोरटे
   9096008184

   Delete
  2. अलीकडील काळात नगर दहशतीच्या छायेखाली आहे.परंतू नगर हे खूप cool व निवांत, तणाव विरहीत शहर आहे. अतिशय योग्य रीतीने आपण नगर शहराचा लेखाजोखा मांडला आहे. नगरला भौगोलिक, ऐतिहासिक व संरक्षण दृष्टीने ही महत्त्व आहेच.
   खरेच झाकलं माणिक....मी एक नगरप्रेमी आष्टीकर.

   Delete
 11. धन्यवाद ब्रम्हेजी.

  ReplyDelete
 12. Wah jasachya tasa nagar vachana dware firun aale.... Ajun nagar vishayi vachayla khoop आवडेल.. Tnx

  ReplyDelete
 13. तुम्ही लेख लिहिल्यानंतर हॉटेल ढाबा संस्कृति बहरली परंतु कारखाने,उद्योग क्षेत्रात फारशी प्रगति झाली नाही। असो लेख छान आहे।मी जामखेड़ येथे लना होशंग 1976-77 दहावीला प्रथम आलो होतो।भूषण देशमुख मित्र आहे।

  ReplyDelete