27 Oct 2018

मटा मैफल लेख


ये छूने से फैलता है...
--------------------


काही वर्षांपूर्वी शबाना आझमीची एड्सबद्दलच्या जागृतीची एक जाहिरात लागायची. त्यात एड्सग्रस्तांना स्पर्श करायला हरकत नसते, असं सांगताना शबाना म्हणायची, ‘ये छूने से नहीं फैलता... इससे तो प्यार फैलता है...’ 
ही जाहिरात पाहताना आणि नंतरही आयुष्यात असं सतत जाणवत राहिलं, की आपण दुसऱ्या माणसाच्या स्पर्शाला पारखी असलेली माणसं आहोत. माणसानं दुसऱ्या माणसाला कुठल्या भावनेनं स्पर्श करावा, याचं कुठलंही शिक्षण आपल्याला दिलं जात नाही. त्यामुळं आपण आपल्यातल्या ‘बेसिक इन्स्टिंक्ट’ला जागून स्पर्श करायला जातो आणि तिथंच सगळा लोचा होतो. वास्तविक, माणसानं माणसाला जवळ घेणं, मिठी मारणं, हस्तांदोलन करणं, हात हातात घेणं, पायाला वाकून नमस्कार करणं अशा किती तरी गोष्टींमध्ये निखळ प्रेम किंवा माया किंवा आदर दडलेला असतो. हजारो शब्द जी भावना बोलू शकत नाहीत, ती आपण केवळ एका स्पर्शानं व्यक्त करू शकतो. पण हे स्पर्श कधी, कुठं, केव्हा, कसे करायचे याचे काही नीतिनियम, काहीएक चौकटी समाज म्हणून आपण आखून घेतल्या आहेत. त्यांचं पालन सगळ्यांनी करणं अपेक्षित आहे. पण तसं होताना दिसत नाही. समाज म्हणून आपल्या जगण्या-वागण्यात अनेक विसंगती आहेत. आपण खूप भोंदूपणानं जगतो. दांभिक वागतो. त्याचाच परिपाक म्हणजे आपण आज जिथं आहोत तिथं आहोत. आपण प्रेमाचा स्पर्श तर गमावलाच आहे; पण स्पर्श या साध्या शारीर क्रियेमागच्या सर्व मानसिक भावनाही गमावून बसलो आहोत आणि ते जास्त खेदकारक आहे.
आपण लहान असतो, तेव्हा आईच्या अंगावर दूध पीत असतो. तिच्या पदराशी खेळत असतो. कधी आज्जीच्या मांडीवर बसून आपण जेवण भरवून घेत असतो, तर कधी आजोबांच्या पाठीवर बसून त्यांचा ‘घोडा घोडा’ करत असतो. भावंडांशी तर प्रचंड दंगा-मस्ती चालू असते. गादीवर उड्या मारणं, एकमेकांच्या अंगावर पडणं, एकमेकांना बुकलून काढणं, घुसळणं हे सगळं आपण वयाच्या आठव्या-नवव्या वर्षापर्यंत करत असतो. त्याचं तेव्हा कुणालाच काही वाटत नाही. मग एके दिवशी अचानक आपल्या मोठ्या बहिणीला या गटातून बाहेर काढलं जातं. ‘उगाच कुणाच्या अंगचटीला जायचं नाही,’ असं तिला शिकवलं जातं. तीही अचानक ‘शहाणी’ होते आणि खाली मान घालून हिंडू-फिरू लागते. ताईला अचानक असं काय झालं, हे आपल्याला काही कळत नाही. मग आपणही मोठे व्हायला लागतो. सातवी-आठवीच्या वयात आतून काही तरी सतत धडका द्यायला लागतं. काय होतंय ते कळत नाही. पण आपण उगाचच आईच्या, बहिणींच्या अंगचटीला जायला लागतो. त्यांना मिठ्या मारायला लागतो. आईच्या हे लक्षात येतं आणि पाठीत धपाटे मिळतात. बहिणींना कायमचं दूर केलं जातं. आपलं आपल्यालाच नीट काय ते कळत नसतं. पण काही तरी बिनसत चालल्याचं तेवढं लक्षात येतं. आयुष्यात पहिली आठ-दहा वर्षं मनसोक्त मिळालेला आपल्या माणसांचा स्पर्श मग अचानक संपून जातो. एकदम दुष्काळ पडावा तसे आपण कोरडे कोरडे होत जातो. घरातल्या मोठ्या पुरुष माणसांच्याही स्पर्शापासून आपण पारखे होतो. वडिलांचा हात कधी आपल्या अंगाला लागलाच, तर तो मार देण्यापुरताच लागतो. जेव्हा आपण आपल्या आयुष्यातल्या सगळ्यांत नाजूक कालखंडातून जात असतो, तेव्हा आपल्याला क्रूरपणे सर्व स्पर्शांपासून तोडून टाकण्यात येतं. पुरुष ही कुणी तरी भयंकर जमात आहे आणि ती तुला हर प्रकारे उद्ध्वस्त करायला टिपलीय असं मुलीच्या; तर स्त्रीला आता तुझं लग्न झाल्यावरच (बायको म्हणूनच) हात लावायचा, असं प्रत्येक मुलाच्या मनावर नकळतपणे बिंबवलं जातं. (याला सन्माननीय अपवाद आहेतच. पण सर्वसाधारणतः असंच घडतं.)
अशा वयात मग मुलगी असो, की मुलगा... अचानक एकलकोंडे व्हायला लागतात. दरम्यान निसर्ग आपलं काम करीत असतोच. भिन्नलिंगी व्यक्तीविषयी जाम आकर्षण वाटायला लागतं. पण इथंही समाजाने लावलेले कडी-कोयंडे दिसत राहतात. आईच्या, मावशीच्या, काकूच्या शिकवणीमुळं मुली दुसऱ्याच्या स्पर्शाबाबत भलत्याच जागरूक होतात आणि पापभिरू मुलगेही फुकटचा मार पडू नये, म्हणून अशा स्पर्शापासून होता होईल तो दूर राहायचा प्रयत्न करतात. पण या समाजनियमांमध्ये नैसर्गिक आकर्षणाचा फार मोठा ‘ग्रे एरिया’ तसाच राहिलेला असतो. मग हे नियम झुगारून देण्याचे प्रयत्न सुरू होतात. मुली आणि मुलगे या दोघांकडूनही! पण सगळ्यांच्याच नशिबी कथित प्रेम वगैरे गोष्टी येत नाहीत. मग त्यांचं हे आकर्षण विकृतीकडं झुकायला लागतं. आर्थिक परिस्थिती, अभावग्रस्तता, घरचे संस्कार आदी गोष्टीही यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मग या गोष्टींच्या कमी-अधिक परिणामांनुसार विकृतीचं प्रमाणही ठरतं. 
मिळत नसलेली गोष्ट ओरबाडून मिळवायची, ही भावना अशा वेळी सर्वांत प्रबळ ठरते. साध्या प्रेमाच्या स्पर्शाला पारख्या झालेल्या नजरा मग सावज हेरायला लागतात. बहुतेकांना अशी संधी मिळत नाहीच. त्यामुळं विकृतीचं प्रमाण वाढत जातं. चोरटं का होईना, पण स्पर्शसुख मिळविण्यासाठी धडपड सुरू होते. मग बसमध्ये, ट्रेनमध्ये, सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी, लिफ्टमध्ये असं कुठंही संधी मिळताच हात फिरवण्याची किळसवाणी स्पर्धा सुरू होते. मुलींना लहानपणापासूनच मिळालेल्या शिकवणीनुसार, या स्पर्शाची ‘जात’ त्यांना कळतेच. त्यातून मग साध्या स्पर्शाची ही गोष्ट नकोशा विकृतीपर्यंत येऊन थांबते. स्पर्शाची उणीव नजर दूषित करून टाकते.
स्पर्शासारख्या नितांतसुंदर गोष्टीचं हे विकृतीकरण झालंय, त्याला नक्की कोण कारणीभूत आहे? एक समाज म्हणून आपण सगळेच. समाज सुरळीत चालावा, सगळ्यांनी नीतिनियमांचं पालन करावं म्हणून काही रूढी-परंपरा आल्या, काही अलिखित संकेत आले, तर काही कायदे आले. ‘सार्वजनिक ठिकाणी प्रेमाचे प्रदर्शन’ (पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन - पीडीए) हा आपल्याकडे कायद्याने गुन्हा आहे. ठीक आहे. पण एवढा कायदा करून त्याचं पालन नीट होतंय का? मुळीच नाही. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांत काही ठरावीक ठिकाणी या कायद्याचं सर्रास उल्लंघन होताना आपल्याला दिसतं. मग कायदे करून काय उपयोग?
मूळ मुद्दा हा आहे, की आपण लहानपणापासून मुलांना या गोष्टी नीट शिकवतो का? स्पर्शातलं सौंदर्य, त्यातली माया, जिव्हाळा आपण त्यांना शिकवतो का? विरुद्ध लिंगी व्यक्तीला स्पर्श केला (किंवा चुकून झाला), की ते महापाप! असं का? निसर्गाच्या विरोधात जाऊन नियम केले, की ते मोडण्याकडंच कल वाढणार. त्यापेक्षा त्या मुलाला मुलींचा, स्त्रीचा आदर करायला आपण शिकवू नाही का शकत? मुलं आपल्या आजूबाजूला जे दिसतं, त्यातून धडे घेत शिकत असतात. आपलंच अनुकरण करत असतात. आपण स्त्रियांवर घरात वाह्यात जोक करायचे आणि मुलानं मात्र त्यांना आदर द्यायची अपेक्षा करायची, हे कसं जमायचं? आपण घरातल्या पत्नीला, आईला, बहिणीला कसं वागवतो हे मुलं पाहत असतात. आपण स्वतः किती महिलांना आदरानं वागवतो? घरात, सोसायटीत, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी, ऑफिसात (आणि एकांतातसुद्धा) आपलं स्त्रियांसोबतचं वर्तन कसं असतं? आत्मपरीक्षण करण्याचीच ही गोष्ट आहे.
पंजाबी लोकांकडं किंवा एकूणच उत्तर भारतीय लोकांकडं पाहिलं, की मला फार छान वाटतं. ते लोक न लाजता, मोकळ्या मनानं एकमेकांना मिठ्या मारतात. वयस्कर आज्जीला तिचा तरुण नातू जाऊन बिलगू शकतो, तसंच एखादा खट्याळ ‘जिजाजी’ आपल्या मेव्हणीला सहज, छानशी मिठी मारू शकतो. आपल्यात ही सहजता नाही, याचं कारण आपलं मन तेवढं साफ नाही. मन साफ नाही, कारण लहानपणापासून तसे संस्कार नाहीत. आपण सार्वजनिक ठिकाणी एखाद्या स्त्रीशी शेकहँड करायलाही बिचकतो. याचं कारण स्त्रीचा आदर राखून, तिला मान देऊन, ग्रेसफुली तिला (अर्थात तिच्या संमतीनं) स्पर्श करता येतो, हे आपण शिकलोच नाही. त्यामुळं आधी हे तातडीनं शिकायची अन् शिकवायची गरज आहे. असा आदरानं, प्रेमानं केलेला स्पर्श कुठलीही स्त्री कधीही नाकारणार नाही, याची खात्री बाळगा. स्त्रीला देवीचं रूप मानणारे आपण लोक आहोत. ते केवळ दिखाऊपणापुरतं मर्यादित असू नये.
स्पर्शातल्या प्रेमाला पारखे झालेल्या लोकांकडून मग किळसवाणे, बीभत्स प्रकार होत राहतात. ते ज्यांच्या बाबतीत होतात त्यांना ते आयुष्यभर पुरतात. मग ते कधी तरी बाहेर येतात. अन् तेव्हा ‘मी टू’ चळवळ सुरू होते!
त्यानिमित्त हे सगळं आठवलं, जाणवलं अन् सांगावंसं वाटलं, इतकंच...

----
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, मैफल पुरवणी, २७ ऑक्टोबर २०१८)
---


9 Oct 2018

रिव्ह्यू - अंधाधुन

उघड्या डोळ्यांसमोरचा चकवा
-------------------------------------



श्रीराम राघवनचा ‘अंधाधुन’ हा नवा हिंदी चित्रपट म्हणजे एक जबरदस्त सस्पेन्स-क्राइम-थ्रिलर आहे. म्हणजे तो थोडासा सस्पेन्स, थोडा क्राइम आणि थोडा थ्रिलर असा आहे. मात्र, या तिन्हीचा एकसंध परिणाम साधून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात श्रीराम राघवन यशस्वी झाला आहे. पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवता येणं ही यशस्वी सिनेमाची साधी व्याख्या आहे. त्या व्याख्येत ‘अंधाधुन’ फिट बसतो. असा सिनेमा पाहताना एखादं कोडं सोडवीत असल्याचा बौद्धिक आनंद लाभावा लागतो. मेंदूला काहीसा खुराक मिळावा लागतो. बऱ्याच दिवसांनी असा बौद्धिक आनंद देणारा, मेंदूला खाद्य देणारा सिनेमा ‘अंधाधुन’च्या निमित्तानं बघायला मिळाला. ‘ल अकॉर्दोओर’ (द पियानो ट्यूनर) या २०१० मध्ये आलेल्या फ्रेंच लघुपटावर हा सिनेमा आधारित आहे.

SPOILER ALERT (रसभंग इशारा)

श्रीराम राघवनचं पुणे प्रेम चित्रपट रसिकांना माहिती आहे. त्यानं हा संपूर्ण सिनेमा पुण्यात तयार केला आहे. सिनेमाला पुण्याचं नेपथ्य आहे. नायक प्रभात रोडवर राहत असतो, तर दुसरी महत्त्वाची पात्रं मगरपट्टा सिटीत राहत असतात. थरारपट किंवा रहस्यपट सहसा दोन प्रकारचे असतात. पहिल्यात पात्रांपैकी काहींना रहस्य माहिती नसतं आणि काहींना ते माहिती असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनाही ते रहस्य माहिती नसतं. चित्रपटातील रहस्य माहिती नसलेल्या पात्रांची घालमेल त्यामुळं प्रेक्षक त्या पात्रांच्या बरोबरीनं अनुभवू शकतात. दुसऱ्या प्रकारात पात्रांपैकी काहींना रहस्य माहिती नसतं, तर काहींना ते माहिती असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनाही ते रहस्य माहिती असतं. चित्रपटातील रहस्य माहिती असलेल्या पात्रांना त्यामुळं मिळणारा एक विचित्र आनंद प्रेक्षकही त्या पात्रांच्या सोबतीनं अनुभवतात. ‘अंधाधुन’ची सुरुवात होते, तेव्हा तो दुसऱ्या प्रकारचा चित्रपट आहे, असं आपल्याला वाटतं. या चित्रपटाचा नायक आकाश (आयुष्मान खुराना) हा एक अंध पियानोवादक आहे. अंध व्यक्तींच्या आंधळं असण्या/नसण्यावर बेतलेले अनेक रहस्यपट आपण पाहिलेले असल्यामुळं आपण सुरुवातीलाच अंदाज व्यक्त करून मोकळे होतो, की हां, हा आकाश काही आंधळा नसणार बरं का! पण थोड्याच वेळात आपल्याला असं कळतं, की नाही, हा पहिल्या प्रकारातला चित्रपट दिसतोय. नंतर थोड्या थोड्या वेळानं आपल्याला एकदा तो या प्रकारातला, तर एकदा त्या प्रकारातला हा सिनेमा आहे, असं वाटू लागतं. आपल्याला अंदाजांच्या या झोक्यावर खेळायला लावून दिग्दर्शक बराच काळ आपल्यालाही गुंगवून ठेवतो आणि एका बेसावध क्षणी एक जोरदार थप्पड देतो. ती मिळाल्यावर आपण खरंच भेलकांडतो.
चांगल्या रहस्यपटाचं किंवा थरारपटाचं हेच वैशिष्ट्य असायला हवं आणि ‘अंधाधुन’ एक मिनिटही आपल्या या वैशिष्ट्यापासून दूर जात नाही. अशा रहस्यपटात प्रेक्षकाला सतत काही एक अनुमान करण्याची सवय लागते आणि त्याचे अनुमान बरोबर येणार नाही, याची काळजी घेण्याचे काम दिग्दर्शकाला करावे लागते. प्रेक्षकांचे अनुमान चुकणे म्हणजे चित्रपटाचे यश म्हणता येईल.
चित्रपट माध्यमाची सर्व बलस्थाने पणाला लावून श्रीराम राघवन हा खेळ सुरू करतो. चित्रपटाच्या सुरुवातीला सशाच्या शिकारीचं एक दृश्य येतं... एक शेतकरी बंदूक हाती घेऊन एका सशाच्या मागं लागलेला असतो. ‘पुणे ३२ किमी’  अशा माइलस्टोनसमोर तो ससा येऊन थांबतो आणि शेतकरी गोळी झाडतो. इथून हा सिनेमा सुरू होतो. या प्रसंगाचं चित्रपटाच्या दृष्टीनं महत्त्व काय असं आपल्याला वाटत राहतं. ते अगदी शेवटी उलगडतं. इथून चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममधून एक नजरबंदीचा खेळ दिग्दर्शक सुरू करतो. आपला अंध पियानोवादक असलेला नायक, तो राहत असलेला प्रभात रोडवरचा बंगला, त्याच्या खाली राहणारा एक आठ-दहा वर्षांचा पोरगा, आपल्या नायकाला अपघातानं भेटलेली सोफी (राधिका आपटे) ही मुलगी, तिच्या वडिलांच्या हॉटेलमध्ये त्याला पियानो वाजवायला मिळालेली संधी, तिथं त्याची प्रमोद सिन्हा (अनिल धवन) या एके काळच्या बॉलिवूड नटाची झालेली ओळख, सिन्हाची जराशी विचित्र स्वभावाची बायको सिमी, या दोघांच्या घरी अचानक त्याला जावं लागणं आणि तिथं एका भयंकर प्रसंगाशी झालेला त्याचा सामना... हा सर्व घटनाक्रम पूर्वार्धात दिग्दर्शक सफाईनं उलगडतो. यातही आपल्या मनात येत असलेले विशिष्ट अंदाज, अनुमान, तर्क या सगळ्यांना फाटा मिळतो आणि वेगळंच नाट्य आकाराला येतं.
उत्तरार्धात हे नाट्य आणखी वेगवान, थरारक होतं. आता हा पहिल्या प्रकारातला सिनेमा आहे असं आपल्याला वाटू लागतं. आणखी पात्रं सामील होतात. नायक आणि विरुद्ध पार्टी असे दोन सरळ तट पडलेले दिसतात. पण नंतर दिग्दर्शक त्यात अशी सरमिसळ करतो, की कोण कुणाच्या बाजूला आहे हेच कळेनासं होतं. एक प्रकारचं कोडं सोडवीत असल्याचा बौद्धिक आनंद इथं मिळायला सुरुवात होते. आपण अंदाज करीत राहतो आणि दिग्दर्शक आपल्याला वेगळ्याच ठिकाणी नेऊन उभं करतो. अर्थात असं करताना सर्व घटनाक्रमाला किमान तर्काचं अधिष्ठान असावं लागतं. ते नसेल तर मग सगळाच डोलारा कोसळू शकतो. यातल्या प्रमुख पात्रांचा एकमेकांशी लपंडाव सुरू असताना तर्काची बाजू भक्कम ठेवणं हे कसबी दिग्दर्शकालाच शक्य होतं. श्रीराम राघवन यात अजिबात कमी पडलेला नाही. किंबहुना प्रेक्षकाला आपले अंदाज चुकत चालल्याचा आनंदच होतो.
या चित्रपटात एक सोडून दोन खून घडतात. ते कुठे, कसे आणि का घडतात, त्यामागं कोण असतं, हे सगळं अर्थातच क्लायमॅक्सला उलगडतं. त्या क्लायमॅक्सनंतरही दिग्दर्शक दोन वर्षांनी घडणारा एक घटनाक्रम दाखवून आपल्याला अजून एक धक्का देतो. हा धक्का तसा प्रेडिक्टेड आहे. पण तरीही तो पुरेसा आनंददायक आहे. सिनेमा संपल्यावर प्रेक्षक उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवतात, एवढा सिनेमाचा प्रभाव राहतो.
आयुष्मान खुरानानं यातल्या अंध पियानोवादकाची भूमिका छान केली आहे. त्याच्या नेहमीच्या पठडीतल्या भूमिकांपेक्षा ही वेगळी आहे. आपण जे नाही ते आहोत, असं दाखविण्याची त्याच्या पात्राची धडपड संपूर्ण सिनेमाभर आहे. ती साकारणं अवघड होतं. पण आयुष्माननं ते काम फार चांगलं निभावलं आहे. राधिका आपटे, मानव विज, अश्विनी काळसेकर, छाया कदम, झाकीर हुसेन असे अनेक कलाकार यात आहेत. त्या सगळ्यांनीच आपापली कामे चांगली केली आहेत. अनेक वर्षांनी दर्शन देणारे अनिल धवन यात सरप्राइजिंग पॅकेज म्हणून आले आहेत. यात त्यांच्या जुन्या गाण्यांचा खुबीनं वापर करण्यात आला आहे. या सगळ्या कलाकारांत खरी भाव खाऊन जाते ती तब्बू. तिच्या अप्रतिम भावदर्शनानं आपण अचंबित होतो. तब्बूच्या काही चांगल्या भूमिकांत ही सिमीची भूमिका निश्चितच असेल.
श्रीराम राघवनच्या या सिनेमात आपलं पुणं सतत दिसत राहतं. सिनेमात दिसणारं पुणं वेगळंच भासतं. ते पाहायला छान वाटतं. या चित्रपटाला अमित त्रिवेदीचं संगीत आहे. काही गाणीही आहेत. पण माझ्या ती फारशी लक्षात राहिली नाहीत.
थोडक्यात, चुकवू नये असाच हा थ्रिलर आहे.

---
दर्जा - चार स्टार
---