26 Jun 2016

मटा वर्धापनदिन मराठी सिनेमा लेख

‘सांगत्ये ऐका’ ते ‘सैराट’...
----------------------------------

मराठी सिनेमाच्या इतिहासात सैराटया चित्रपटानं आता अढळ स्थान मिळवलंय. लवकरच हा सिनेमा शंभर कोटी रुपये उत्पन्नाचं रेकॉर्ड गाठणार अशी चिन्हं आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच मराठी सिनेमा ठरेल. मराठी सिनेमानं मारलेली ही मजल मराठी माणसांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. या सिनेमाची केवळ भारतात नव्हे, तर जगभर चर्चा झाली. मराठी सिनेमाचा बोलबाला गेल्या काही वर्षांत वाढला आहेच. तो या निमित्तानं पुन्हा अधोरेखित झाला. यानिमित्तानंमटा’च्या स्थापनेपासून ते आतापर्यंतचा मराठी सिनेमाचा प्रवास जाणून घेणं रंजक ठरेल. 
मुंबईत महाराष्ट्र टाइम्स सुरू झाला १८ जून १९६२ ला. त्याआधी तीन वर्षांपूर्वी म्हणजे १९५९ मध्ये पडद्यावर आलेला सांगत्ये ऐका’ हा चित्रपट असाच सैराट धुमाकूळ घालत होता. अनंत माने दिग्दर्शित हा चित्रपट आणि त्यातलं जयश्री गडकरवर चित्रित झालेलं बुगडी माझी सांडली गंहे आशा भोसलेंनी गायलेलं गाणं सर्वतोमुखी झालं होतं. पुण्याला विजयानंद टॉकीजमध्ये या सिनेमानं तब्बल १३१ आठवडे मुक्काम ठोकला होता. त्या काळात मराठी चित्रपटसृष्टी प्रामुख्यानं कोल्हापुरातच होती. पुण्यात प्रभात स्टुडिओ बंद पडल्यानंतर कोल्हापूर हेच मराठी चित्रपटांचं माहेरघर झालं होतं. बाकी इतर काही सिनेमे मुंबईत बनत. तेव्हा भालजी पेंढारकर, राजा परांजपे, अनंत माने हे दिग्दर्शक जोरात होते. ‘साधी माणसंआणि ‘जगाच्या पाठीवर’ हे दोन्ही सिनेमे १९६५चे. अत्यंत गाजलेले. राज्य सरकारनं मराठी चित्रपटांसाठी पुरस्कार सुरू केले ते १९६३ मध्ये. प्रपंच हा सिनेमा तेव्हा पहिला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा ठरला होता. व्ही. शांतारामही चित्रनिर्मितीत अग्रेसर होते. त्यांनी १९७२ मध्ये पिंजरासिनेमा केला. 
हा सिनेमा मराठीतला एक माइलस्टोन सिनेमा मानला जातो. डॉ. श्रीराम लागूंनी साकारलेली मास्तरांची अजरामर भूमिका, राम कदमांचं बहारदार संगीत, उषा मंगेशकरांनी गायलेल्या एक से फर्ड्या लावण्या आणि अनंत मानेंची भक्कम पटकथा या जोरावर पिंजराजबरदस्त हिट ठरला. पिंजराच्या यशासोबतच आणखी एक नाव मराठी चित्रपटसृष्टीत झळकू लागलं होतं आणि ते म्हणजे दादा कोंडके. दादांचा सोंगाड्याहा पहिला चित्रपट १९७० मध्ये प्रदर्शित झाला आणि तो प्रचंड गाजला. त्याआधी विच्छा माझी पुरी करासारख्या वगनाट्यांतून दादा मराठी रसिकांना परिचित होते. मात्र, ‘सोंगाड्याच्या यशानंतर दादांना राजमार्ग सापडला आणि त्यांनी ओळीनं नऊ रौप्यमहोत्सवी चित्रपट दिले. पुढचं ऐंशीचं पूर्ण दशक दादा मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य करीत होते. 
पांडू हवालदार, एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, तुमचं-आमचं जमलं, राम राम गंगाराम, ह्योच नवरा पाहिजे, बोट लावीन तिथं गुदगुल्या असे एक से एक हिट सिनेमे दादांनी दिले. पुढं दादांच्या सिनेमांचा दर्जा घसरला. ते द्व्यर्थी संवादांवरच अवलंबून राहू लागले. या जोडीला टिपिकल शहरी, मध्यमवर्गीय प्रेक्षकांना भावणारे सिनेमे तयार होतच होते. त्यात मुंबईचा जावई, अवघाचि संसार, अपराध, मानिनी, अरे संसार संसार, धाकटी जाऊ, वहिनीच्या बांगड्या, मुंबईचा फौजदार, देवता अशा सिनेमांचा समावेश होता. अरुण सरनाईक, कुलदीप पवार, रवींद्र महाजनी, अशोक सराफ हे नायक जोरात होते. नायिकांमध्ये जयश्री गडकर, रंजना, पद्मा चव्हाण, उषा चव्हाण, उषा नाईक, आशा काळे ते नव्यानं आलेली अलका कुबल या सगळ्या फॉर्मात होत्या. ऐंशीच्या दशकात दादांप्रमाणेच सुषमा शिरोमणीनं एकहाती किल्ला लढविला. त्यांनी काढलेले भिंगरी, फटाकडी, मोसंबी-नारंगी, गुलछडी आदी सिनेमेही जोरात चालले. पुढं १९८० ते १९८४ हा काळ हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणंच मराठीलाही वाईट गेला. याचं कारण व्हीसीआरचा लागलेला शोध आणि गावोगावी बोकाळेली व्हिडिओ पार्लर. 
यामुळं सिनेमांचा धंदा बसायला लागला. अर्थात याच काळात डॉ. जब्बार पटेल, अमोल पालेकर यांनी मराठी चित्रपटांची वेगळी वाट तोलून धरली होती. सामना, सिंहासन, जैत रे जैत आणि उंबरठा हे डॉ. पटेलांचे चारही चित्रपट खूप हिट झाले आणि चर्चेत राहिले. अमोल पालेकरांनी आक्रीत, तर डॉ. लागूंनी झाकोळ या चित्रपटाची निर्मिती याच काळात केली. शांतारामबापूही चानी’सारखा वेगळा सिनेमा देत होते. साधारण १९८२-८३ च्या सुमारास आलेले गोंधळात गोंधळ, लेक चालली सासरला हे सिनेमे चांगले चालले होते. राजदत्त आणि कमलाकर तोरणे हे दिग्दर्शक तेव्हा जोरात होते.
व्हिडिओ पार्लरच्या गर्तेत सापडलेल्या मराठी सिनेमाला परत ऊर्जितावस्था मिळवून दिली ती दोन सिनेमांनी. हे दोन्ही सिनेमे १९८४ मध्ये झळकले. एक होता महेश कोठारेचा धूमधडाका’ (हा शशी कपूरच्या प्यार किये जाचा रिमेक होता) आणि दुसरा होता सचिनचा ‘नवरी मिळे नवऱ्याला...’ हे दोन्ही चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत माइलस्टोन ठरले. पुढं या दोघांनीही अनेक हिट चित्रपट दिले. दोघांचेही सिनेमे एकाच वेळी येत आणि दोन्ही व्यवसाय करीत. 
सचिनचे सिनेमे शहरी तोंडवळा असलेले असत आणि महेशचे ग्रामीण. गंमत-जंमत, दे दणादण, अशी ही बनवाबनवी, थरथराट, एकापेक्षा एक, धडाकेबाज, आमच्यासारखे आम्हीच, झपाटलेला असे अनेक हिट चित्रपट या काळात आले. आत्मविश्वास’सारखा गंभीर सिनेमाही सचिननं दिला. पुढं कुंकू’ सिनेमा केल्यानंतर सचिननं दीर्घकाळ मराठी चित्रनिर्मितीतून संन्यास घेतला. (पुढं २००५ मध्ये नवरा माझा नवसाचाद्वारे त्यानं पुन्हा मराठी सिनेमांकडं लक्ष वळवलं.) लक्ष्मीकांत बेर्डे हा महेशचा हुकमी एक्का होता, तर अशोक सराफ हा सचिनचा. पुढची पाच-सात वर्षं या दोघांनीही मराठी चित्रपटसृष्टीवर अनिर्बंध राज्य केलं. केवळ लक्ष्या आणि अशोकमामांना घेऊन अनेक विनोदी चित्रपट तयार झाले. पण या इनोदीचित्रपटांमुळं मराठी चित्रपटसृष्टीचं दीर्घकाळ नुकसानच झालं. प्रेक्षकांनी मराठी सिनेमांकडं पाठ फिरविली. 
याच काळात आणखी एक तरुण निर्माती-दिग्दर्शिका धाडसानं मराठी चित्रपटांची निर्मिती करीत होती. स्मिता तळवलकर तिचं नाव. कळत-नकळतपासून ते तू तिथं मी’पर्यंत अनेक चित्रपट स्मितानं पुढील दशकभरात दिले आणि मरत्या मराठी इंडस्ट्रीमध्ये धुगधुगी कायम ठेवली. नव्वदच्या दशकात पुण्यातून सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयीनंही हेच केलं. ‘दोघीपासून ते वास्तुपुरुषपर्यंत अनेक उत्तमोत्तम सिनेमे त्यांनी दिले. 
याच काळात सातत्यानं दर्जेदार चित्रपटनिर्मिती करणारं नाव म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी. त्यांच्या बिनधास्त’ या पहिल्याच सस्पेन्स थ्रिलर चित्रपटानं खळबळ उडवून दिली. यातल्या सर्व प्रमुख भूमिका महिलांनीच केल्या होत्या, हे विशेष. पाठोपाठ भेट, कायद्याचं बोला, कदाचित, संत तुकाराम, आजचा दिवस माझा असे अनेक उत्तमोत्तम सिनेमे त्यांनी या काळात दिले. याच काळातलं आणखी एक नाव म्हणजे गजेंद्र अहिरे. नॉट ओन्ली मिसेस राऊत’ या चित्रपटापासून लक्ष वेधून घेणाऱ्या गजेंद्रनं त्यानंतर अनेक सिनेमे केले. सातत्यानं चित्रपट देण्याची त्याची हातोटी अचंबित करणारी आहे. शिवाय एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पेलून तो सिनेमे करीत असतो. सिनेमाच्या प्रती विलक्षण पॅशन असल्याशिवाय हे शक्य नाही.
एकविसावं शतक उजाडलं आणि पाठोपाठ मल्टिप्लेक्सचंही युग सुरू झालं. मल्टिप्लेक्समुळं सिनेमाच्या व्यवसायाचं परिमाणच बदलून गेलं. सिनेमानिर्मितीचं प्रमाण वाढलं. व्यावसायिकता वाढली.
नंतर २००४ मध्ये श्वास’ आला आणि सगळंच चित्र बदललं. श्वास’नंतर मराठी चित्रपटसृष्टीतलं सगळं चित्रच बदललं. अनेक दर्जेदार चित्रपट आले. तरुण मुलं दिग्दर्शनात आली. सचिन कुंडलकर, उमेश कुलकर्णी, सतीश राजवाडे, गिरीश मोहिते, सतीश मन्वर, मंगेश हाडवळे, सुजय डहाके यांनी खूप चांगले सिनेमे देण्याचा प्रयत्न केला. महेश मांजरेकर यांनी मराठी चित्रपटनिर्मितीत भव्यता आणली. ‘झी टॉकीज’नं मार्केटिंगचं प्रभावी तंत्र आणलं. जोगवा, नटरंग, बालगंधर्व, लोकमान्य टिळक, टाइमपास, शाळा ते अगदी अलीकडचा नटसम्राट असे किती तरी सिनेमे जोरात चालले. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’सारखा सिनेमा सर्वदूर पोचला. रितेश देशमुखनं मराठीत पदार्पण करून काढलेला लय भारीही असाच कानाकोपऱ्यात पोचला आणि हिट झाला. ग्रामीण भागातून पुढं आलेले भाऊराव कऱ्हाडे, नागराज मंजुळे हे दिग्दर्शक जोमानं नवनव्या कलाकृती सादर करू लागले. त्यातून मराठी सिनेमाचा चेहरा बदलत गेला. नवे प्रयोग होत आहेत. आशयदृष्ट्या मराठी सिनेमा समृद्ध होताच; आता तो तंत्रदृष्ट्याही समृद्ध झाला आहे. बजेटही वाढलं आहे. आता मराठी चित्रपट नव्या वळणावर आहे. यापुढंही चांगले चांगले सिनेमे येत राहतील आणि मराठी चित्रपटसृष्टी नव्या उंचीवर जाईल, अशी खात्री वाटते.


---
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, मुंबई आवृत्ती, २५ जून २०१६)
----

24 Jun 2016

एक अलबेला - रिव्ह्यू




नाम बडे और दर्शन भी...
------------------------------

मा. भगवान म्हटलं, की अलबेला आणि अलबेला म्हटलं की मा. भगवान हीच नावं आठवतात, एवढं या नावांचं अद्वैत झालंय. भगवान पालव नावाच्या मराठमोळ्या माणसानं चाळीसच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत अक्षरशः थैमान घातलं. भगवान यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं नृत्य. कमरेखालचा भाग अजिबात न हलवता, केवळ हात आणि कमरेवरील भाग यांचा वापर करून ते ज्या पद्धतीनं नृत्य करीत असत, ती शैली लोकांनी डोक्यावर घेतली. भगवान स्टाइल डान्स या नावानंच तो नृत्यप्रकार ओळखला जाऊ लागला. अशा या अवलिया कलाकारावर 'एक अलबेला' हा मराठी चित्रपट आला आहे. मराठी कलाकारावर असा बायोस्कोपिक पद्धतीनं आलेला हा दुसरा मराठी सिनेमा. (आधीचा फाळकेंवरचा 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'.) शेखर सरतांडेल या दिग्दर्शकानं अत्यंत मेहनतीनं आणि प्रामाणिकपणे हा प्रयत्न आपल्यासमोर मांडला आहे. 
'एक अलबेला'मध्ये एक वाक्य आहे. भगवान यांना काही कारणानं नृत्य कलाकार मिळत नसतात. तेव्हा ते फाइट सीन करणाऱ्या कलाकारांकडून नृत्य करून घेतात. त्या वेळी ते म्हणतात, की प्रत्येकाच्या शरीरात नाचाची लय असते. तुम्ही ती फक्त ओळखायला हवी. हे वाक्य म्हणजे या सिनेमाचं भरतवाक्य म्हणायला हरकत नाही. कारण नंतर सिनेमाचा जवळपास संपूर्ण भाग भगवान तयार करीत असलेला 'अलबेला' हा सिनेमा आणि त्यातील गाणी व नृत्यं यांनीच व्यापला आहे. भगवान यांचा मूळ सिनेमा पाहताना आणि त्यातल्या 'शोला जो भडके'सारख्या गाण्यावर गीताबाली आणि भगवान यांचा (आणि त्यांच्या सहनृत्यकलाकारांचा) डान्स पाहताना आपणही नकळत ताल धरतो आणि नाचू लागतो. शेखर सरतांडेल यांनी या गाण्यांचं 'फ्रेम टु फ्रेम' रिक्रिएशन केलं आहे. ते पाहतानाही आपण तसाच ताल धरतो आणि (मनातल्या मनात का होईना) ते झिंग आणणारं नृत्य करू लागतो आणि हेच मला वाटतं, या सिनेमाचं यश आहे.
सरतांडेल यांनी सिनेमाचे सरळ सरळ दोन भाग केले आहेत. पहिला भाग भगवान यांचं सुरुवातीचं आयुष्य दाखविण्यात खर्च झाला आहे. त्यात अगदी १९३० च्या आंदोलनात भगवान यांनी शिवडीच्या मिठागारात केलेला 'सत्याग्रह' ते 'अलबेला'च्या निर्मितीपर्यंतचा प्रवास आला आहे. भगवान यांची कौटुंबिक परिस्थिती, त्यांना घर सोडावं लागणं, पानाच्या दुकानात काम करणं, त्या मोहल्ल्यातील शाहीन या तरुणीशी जुळलेले त्यांचे नाजूक भावबंध, मग तिचा विरह, त्यानंतर त्यांचं कुस्ती खेळायला जाणं, तिथल्या मित्रासोबत स्टुडिओत जाणं, मग अचानक सिनेमात काम करायची मिळालेली संधी, नंतर अॅक्शन हिरो म्हणून बी ग्रेड सिनेमांमध्ये त्यांनी कमावलेलं नाव आदी सर्व भाग तपशिलात येतो. सिनेमाचं संकलन झक्कास असल्यानं तो वेगानं पुढं सरकतो. कुठलंही दृश्य अकारण ताणलेलं नाही. अनेकदा तर नॅरेशनमधूनच गोष्ट पुढं जाते. प्रेक्षक सिनेमात गुंतून राहण्यासाठी हे असं वेगवान सादरीकरण पथ्यावर पडणारं आहे.
भगवान यांच्या आयुष्यात सी. रामचंद्र यांचं महत्त्वाचं स्थान होतं. त्यांची आणि भगवान यांची मैत्रीही सिनेमात दिसते. 'अलबेला'च्या यशात सी. रामचंद्र यांच्या संगीताचा आणि त्यांनी दिलेल्या तब्बल ११ गाण्यांचा मोठा वाटा आहे. 'भोली सुरत दिल के खोटे', 'शोला जो भडके', 'शाम ढले खिडकी तले तुम सिटी बजाना छोड दो' यासारखी सुपरहिट गाणी किंवा 'धीरे से आजा री अखियन में, निंदिया आजा री आजा'सारखी आजही सर्वश्रेष्ठ मानली जाणारी अंगाई ही सर्व अण्णा चितळकरांची कमाल होती. त्यांचा आणि लता मंगेशकरांचा आवाज, राम्बा-साम्बा म्युझिकच्या धर्तीवर दिलेलं ठेका धरायला लावणारं संगीत आणि पडद्यावर भगवान आणि गीताबालीचं अफलातून नृत्य हे कॉम्बिनेशन हिट होणारच होतं. पण तिथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. शेखर सरतांडेल यांनी 'एक अलबेला'च्या उत्तरार्धात हीच कहाणी मांडली आहे. 'अलबेला' सुपरहिट होण्यापर्यंतचाच प्रवास दाखवून त्यांनी या सिनेमासाठी नेमकी चौकट आखून घेतली आहे. सिनेमा केवळ एक तास ४७ मिनिटांचा आहे. वेगवान आणि क्रिस्पी मांडणीमुळं सिनेमाच्या वेधकतेत आणखी भरच पडली आहे.
उत्तरार्धाचं सर्वांत मोठं आकर्षण म्हणजे 'शोला जो भडके' आणि 'भोली सुरत दिल के खोटे' या गाण्याचं दिग्दर्शकानं केलेलं रिक्रिएशन आणि त्यातली मंगेश देसाई आणि विद्या बालन यांची जबरदस्त अदाकारी!  हे मूळचं सोनं एवढं बावनकशी आहे, की ते केवळ जसं आहे तसं मांडलं तरी भागणार होतं. सरतांडेल यांनी हे ओळखून या गाण्यांना व त्याच्या सादरीकरणाला धक्का लावलेला नाही. कुठलाही धोका न पत्करता ते 'फ्रेम टु फ्रेम' रिक्रिएट केलं आहे. हे करताना त्यांना मंगेश देसाई आणि विद्या बालन यांनी समरसून साथ दिल्यानं या दोन्ही गाण्यांचं सोनं पुनश्च झळाळून उठलं आहे, यात शंका नाही. विशेषतः विद्यानं गीताबाली खूपच तन्मयतेनं अंगी भिनवून घेतल्याचं जाणवतं. तिच्या प्रत्येक मुद्रेत, हावभावात आणि नृत्याच्या प्रत्येक स्टेपमध्ये तिनं गीताबाली पुन्हा आपल्यासमोर उभी केली आहे. (विशेषतः 'भोली सुरत' या गाण्यात पहिल्या अंतऱ्याच्या शेवटी तिच्या अत्यंत बोलक्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहावेत.) आज ही दोन्ही (म्हणजे आताची आणि मूळची) गाणी पाहताना त्या गाण्यांतला ठेका आणि नृत्यातली लय एवढी भावते, की त्याचं वर्णन करायला शब्द नाहीत. अगदी समूह नृत्यातील कलाकारही एवढ्या फ्रेश चेहऱ्यानं आणि तन्मयतेनं नाचले आहेत, की आयुष्यात कधीही नाच न केलेल्या माणसांनाही उठून त्यांचा हात हाती धरून नृत्य करावंसं वाटलं पाहिजे.
भगवान यांना त्या वेळी हा सिनेमा बनवताना आलेल्या अडचणी, अॅक्शन पटांतून सामाजिक सिनेमाकडे वळताना चित्रपटसृष्टीतील वितरक, इतर लोकांनी व्यक्त केलेला अविश्वास, गीताबालीला सिनेमासाठी साइन करताना झालेला त्रास, नंतरही तिच्या सेक्रेटरीनं दिलेला त्रास हा सगळा भाग उत्तरार्धात येतो. भगवान यांचं कणखर व्यक्तिमत्त्व समोर येतं. 'लायकीपेक्षा मोठी नसतील, तर ती स्वप्नं काय कामाची?' हा त्यांचा सिद्धान्त होता. तो ते अखेरपर्यंत जगले. 'अलबेला' तयार झाला. प्रदर्शितही झाला. सुरुवातीला प्रेक्षकांचा फार प्रतिसाद नव्हता. तेव्हा भगवानदादांनी स्वतःची सर्व संपत्ती गहाण ठेवून चित्रपट आणखी काही दिवस थिएटरमध्ये ठेवण्याची विनंती केली. त्या दिवशी ते इम्पिरियल थिएटरमध्ये जातात आणि दार उघडून हळूच आत पाहतात. त्यानंतर समोरच्या मोकळ्या जागेत एकटेच खास भगवान शैलीतलं नृत्य करतात हा शॉट जमून आलेला आहे. 'अलबेला' त्या दिवशी हिट झाला. लोकांनी 'शोला जो भडके' गाण्यावर पैसे उधळले. भगवान जिंकले...
प्रमुख व्यक्तिरेखेच्या जीवनात आपल्याला रस निर्माण झाला पाहिजे, त्याच्या सुख-दुःखाशी तो रममाण झाला पाहिजे, तर तो सिनेमा चांगला! 'एक अलबेला' या कसोटीला उतरला आहे, असं म्हटलं पाहिजे. हे दिग्दर्शक सरतांडेल यांचं जसं यश आहे, तसंच ते मंगेश देसाईचंही आहे. मंगेशचा चित्रपटसृष्टीतला प्रवास मी दीर्घकाळ पाहतो आहे. या गुणी कलाकाराला एकाच संधीची आवश्यकता होती. ती या सिनेमाच्या रूपानं त्याला मिळाली आहे आणि त्यानंही या संधीचं सोनं करून दाखवलं आहे. 'एक अलबेला' हा त्याच्या कारकि‍र्दीतला माइलस्टोन सिनेमा ठरणार, यात शंका नाही. भगवानदादांच्या नृत्य शैलीची नक्कल करणं तसं सोपं नाही. पण मंगेशनं मेहनतीनं ते जमवलं आहे.
या सिनेमात गीताबालीच्या भूमिकेच्या रूपानं विद्या बालन प्रथमच मराठीत अवतरली आहे. तिचा प्रसन्न वावर या सिनेमाला 'चार चाँद' लावणारा ठरला आहे. विद्याच्या चाहत्यांसाठी तिला गीताबालीच्या भूमिकेत बघणं ही एक पर्वणी ठरेल. विद्यानं गीताबालीच्या नृत्याची लय अंगी भिनवून घेतल्याचं पदोपदी जाणवतं. तिच्याच आग्रहावरून चित्रित करण्यात आलेला 'शाम ढले खिडकी तले'चा तुकडाही यात आहे.
एवढं सगळं सांगितल्यावर हा सिनेमा आवर्जून पाहाच, हे वेगळं सांगणं म्हणजे भगवानदादा अफलातून नृत्य करीत असत, हे आवर्जून सांगण्यापैकी झालं. जो मनापासून नाचतो, तो जास्त जगतो. (भगवानदादा दीर्घायुषी होते. नव्वदाव्या वर्षी गेले...)
जा, नृत्याची लय अंगी भिनवून घ्या....! कारण आपल्यातही 'एक अलबेला' वस्ती करून आहे... त्याला मस्ती करण्याची संधी कधी देणार?
---

दर्जा - साडेतीन स्टार
---

12 Jun 2016

उडता पंजाब लेख

सिनेमाला मुक्तपणे जगू द्या... 
----------------------------------


सेन्सॉर बोर्ड पुन्हा एकदा नव्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या वेळचं निमित्त आहे ‘उडता पंजाब’ या नव्या चित्रपटाचं. पंजाबमधील अंमली पदार्थांच्या व्यसनात तरुण पिढी कशी वाहून चालली आहे, यावर प्रकाश टाकणारा हा सिनेमा आहे म्हणे. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यानं या सिनेमाची निर्मिती केली आहे आणि अभिषेक चौबे यानं हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. यात शाहीद कपूर, आलिया भट, करिना कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १७ जूनला सर्वत्र प्रदर्शित व्हायचा होता. पण वादाला सुरुवात झाली ती सेन्सॉरनं हा चित्रपट अडविल्यामुळं. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं तब्बल ९४ कट सुचविले आणि शीर्षकातून पंजाब हे नाव आणि इतर बरंच काय काय कापायला लावलं. म्हणजे तसं केलं तरच हा सिनेमा सेन्सॉरकडून पास होईल, असं सांगितलं. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी यापूर्वी अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत आणि तसे निर्णयही घेतले आहेत. जेम्स बाँडच्या ताज्या चित्रपटातील एक चुंबनदृश्य ५६ सेकंदांवरून २० सेकंदांचं करणारे हेच ते महाशय! निहलानींवर त्या वेळी ‘संस्कारी निहलानी’ अशी टीका माध्यमांतून झाली होती. त्या वेळीही मी ‘हे संस्कार बोर्ड बुडवा’ या शीर्षकाचा लेख लिहिला होता, हे वाचकांना स्मरत असेल.
आता पुन्हा सेन्सॉर बोर्ड चर्चेत आलंय. या वेळी तर निहलानींनी निर्माता अनुराग कश्यपवर थेट आरोप केलाय. पंजाबमध्ये लवकरच विधानसभेची निवडणूक होऊ घातलीय. त्यात आम आदमी पक्षाला (आप) अनुकूल वातावरण आहे, असं आत्ताचं चित्र आहे. तर अनुराग कश्यप हा ‘आप’चा असून, त्यानं त्या पक्षाकडून पैसे घेऊन सध्याच्या सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्यासाठी हा चित्रपट तयार केलाय, असा गंभीर आरोप निहलानी यांनी केलाय. अनुरागनं हा आरोप हसण्यावारी नेलाय आणि निहलानींना खोटंही धड बोलता येत नाही, अशी टिप्पणी केलीय.
 यात सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांनी सरळ सरळ राजकीय भूमिका घेतली आहे. ‘मी नरेंद्र मोदींचा चमचा आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. मोदींचा नाही तर काय इटलीच्या पंतप्रधानांचा चमचा व्हायचं का?’ असे बाणेदार उद्-गार निहलानी साहेबांनी काढले आहेत. चमचा होण्याची एवढी असोशी आत्तापर्यंत कुणातच पाहिली नव्हती. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी आतापर्यंत जे जे लोक विराजमान झाले, ते सगळे काही या एकाच गुणामुळं तिथं पोचले नव्हते, याचं भान निहलानींना असण्याचं कारण नाही. बाकी निहलानींसारखे लोक सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी आणि गजेंद्र चौहान एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्त करून केंद्र सरकारनं एकूण आपली या विषयातली रुची आणि गती दाखवून दिलीच आहे. त्यामुळं निहलानींसारख्यांना रान मोकळंच मिळालं आहे. एवढे दिवस ते किमान सिनेमाशी संबंधित वाद निर्माण करीत होते. आता त्यांनी थेट राजकीय वाद निर्माण करून पुढचं पाऊल गाठलं आहे. ‘उडता पंजाब’ जात्यात आहे, पण बाकीचे सुपात आहेत आणि त्यांनाही कधी तरी या सेन्सॉरशाहीचा सामना करावा लागणार आहे, हे नक्की. कदाचित याची चाहूल लागल्यामुळेच की काय, बॉलिवूडमधले इतर निर्माते-दिग्दर्शकही अनुराग कश्यपसोबत उभे राहिले आणि या सर्वांनी सेन्सॉरविषयी आवाज उठविला. किमान वरकरणी तरी सगळे एक दिसत आहेत.
अर्थात हे सगळे बॉलिवूडवासी निर्माते आणि दिग्दर्शक सगळेच काही धुतल्या तांदळासारखे आहेत, असं मुळीच नाही. उगवत्या सूर्याला नमस्कार करणे आणि वारा पाहून टोपी फिरवणे यात ते पटाईत आहेत. शिवाय त्यांचं तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्य ‘सिलेक्टिव्ह’ असतं, हे वारंवार दिसून आलं आहे. बाकी कलात्मक मूल्यांशी निष्ठा, सहकलाकारांविषयी आस्था आणि संवेदनशीलतेविषयी न बोललेलंच बरं. आत्ताही या वादात बॉलिवूडमधले एरवी कायम नाकानं कांदे सोलणारे काही बडे लोक ‘अळीमिळी गुपचिळी’ बसले आहेत, हे लोकांच्या लक्षात आहे. या लोकांच्या राजकीय प्रेरणा काय आहेत, हे सर्वांना ठाऊक आहे. ‘पोलिटिकली करेक्ट’ असण्याची त्यांची धडपड लाजवाब असते. सर्वसामान्य लोकांचं एखाद्या गोष्टीविषयी एक मत असेल, तर यांचं नेमकं त्याविरुद्ध असणार, हे धरूनच चालावं. त्यामुळं अनुरागनंही उच्चरवात सेन्सॉरविरोधात डरकाळी फोडताना, आपल्याच व्यवसायबंधूंच्या दांभिकतेविषयीही कधी तरी बोलावं. सिनेमातले लोकही राजकीयदृष्ट्या प्रेरित असतात आणि स्वतःच्या फायद्यासाठीच ते आपली टोपी वारंवार फिरत असतात, हे सत्य आहेच. ‘उडता पंजाब’विषयी नक्की काय घडलंय हे समोर येईलच. पण कुणा राजकीय पक्षाची ‘सुपारी’ घेऊन असे सिनेमे कुणी काढू लागलं, तर उद्या तशा नसलेल्या सिनेमाकडंही लोक संशयानं पाहतील आणि एकूणच या व्यवसायाचंच दीर्घकालीन नुकसान होईल, यात दुमत नसावं.
सेन्सॉर बोर्ड, राजकारण आणि बॉलिवूडवाल्यांचे इगो यात सर्वांत भरडला जाणार आहे तो खरा, अस्सल सिनेमा. आपल्याकडचा सिनेमा मोकळा श्वास घेऊ लागलाय तो गेल्या १५-२० वर्षांत. त्यापूर्वी वेगळ्या सिनेमाचे प्रयत्न होतच नव्हते असं नाही. पण मल्टिप्लेक्सच्या आगमनानंतर या सिनेमाला हक्काची जागा मिळाली. त्यातून अनुराग कश्यप, दिबाकर बॅनर्जी, रीमा कागती, झोया अख्तर यांच्यापासून ते अभिषेक चौबेपर्यंत अनेक नवे दिग्दर्शक वेगळ्या प्रकारच्या कलाकृती घेऊन समोर येऊ लागले. हा सिनेमा प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारला. या सर्वांचे प्रयत्न प्रामाणिक होते, सच्चे होते हे जाणवत होतं. काही तरी मांडायची, सांगायची त्यांची असोशी प्रेक्षकांना कळत होती. ज्याला जे सांगायचंय ते सांगता येतंय आणि ज्याला ते पाहायचंय ते पाहता येतंय अशी ही सोयिस्कर आणि लोकशाहीयुक्त मांडणी होती. समाजातल्या विविध वर्गांतल्या गटांना, जातिसमूहांना हा सिनेमा साद घालत होता आणि आहे. इथल्या चुकीच्या प्रथांना, कथित संस्कारांना हा सिनेमा प्रश्न विचारू लागला होता आणि आहे. गेल्या २५ वर्षांत देशात आर्थिक उदारीकरण आल्यानंतर पुलाखालून पुष्कळच पाणी वाहून गेलं. त्यानंतर जन्मलेली पिढी आज पंचविशीत आहे. त्यातले अनेक जण या सिनेमासृष्टीत आहेत. नवे प्रयत्न करीत आहेत. हात-पाय हलवीत आहेत. आपल्या जाणिवा तपासून पाहत आहेत. नवं काही तरी शोधत आहेत. मांडत आहेत. अशा वेळी सेन्सॉर बोर्डानं प्रागतिक भूमिका घ्यायला हवी. या नव्या लाटेला, नवा आशांना, नव्या स्वप्नांना योग्य दिशा दाखवायला हवी. त्याउलट हे करू नका, ते करू नका, असं घरातल्या एखाद्या किरकिऱ्या आणि जुन्या काळासोबत गोठलेल्या आजोबांसारखं हे सेन्सॉर बोर्ड किरकिर करू पाहतंय. तुमचे राजकीय हितसंबंध काय असायचे ते असोत, तुम्हाला कुणाचे चमचे व्हायचंय की कुणाचे तळवे चाटायचेत हा तुमचा प्रश्न आहे. पण इथल्या नव्या दमाच्या तरुणांना, इथल्या अभिव्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केलात, तर ती तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही, हे या लोकांनी नीट लक्षात ठेवायला हवं. सत्ताधीशांपेक्षा कधी कधी सत्तेच्या आश्रयानं वाढणारी बांडगुळंच जास्त माज करतात, हे अनेकदा दिसून येतं. पण या बांडगुळांमुळं सत्ताधीशांच्या वृक्षातला जीवनरस शोषला जाऊन एके दिवशी तो महाकाय वृक्षही जमीनदोस्त होतो, हे सत्ताधीशांनी लक्षात घ्यावं.
सेन्सॉर बोर्डाला दादा कोंडके ‘शेणसार बोर्ड’ म्हणत. याचं कारण या सेन्सॉर बोर्डानं त्याला नेमून दिलेली कामं सोडून इतर गोष्टींत नाक खुपसण्याचे उद्योगच पुष्कळ केलेले बघायला मिळतात. सेन्सॉर बोर्ड नामक ही यंत्रणा अस्तित्वातच नको, असं काही लोक म्हणतात. एवढा टोकाचा विचार करायला नको; पण या बोर्डानं काळाप्रमाणं बदलावं आणि तिथं किमान आजच्या नव्या सिनेमाची नवी भाषा जाणणारी, तरुणांच्या आदरस्थानी असलेली ज्येष्ठ मंडळी कधी तरी बसावीत. सरकारनं आपल्या स्वतःच्या हितासाठी तरी हे करावं. म्हणजे मग ‘उडता पंजाब’सारखे वाद भविष्यात होणार नाहीत.
---

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र  टाइम्स, पुणे आवृत्ती; १२ जून २०१६)
---

22 May 2016

प्रियांका चोप्रावरील लेख

डॅडीज लिटल गर्ल 
---------------------

सर्वांची लाडकी पीसी चॉप्स किंवा पिग्गी चॉप्स (तिचं खरं नाव प्रियांका चोप्रा) राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये ‘पद्मश्री’ स्वीकारायला गेली, तेव्हा तिच्याभोवती असलेल्या ग्लॅमरमुळं सर्वांचं लक्ष तिनं वेधून घेतलं यात आश्चर्य नाही. पण त्या पिवळ्या साडीच्या झगमगाटापलीकडं तिच्या हातावर गोंदलेल्या ‘डॅडीज लिटल गर्ल’ या वाक्याकडं फार कुणाचं लक्ष गेलं नसणार. प्रियांका वेगळी आहे, यशस्वी आहे, जग गाजवते आहे त्यामागं हे वाक्य आणि यासारख्या अनेक प्रेरणा आहेत. आधुनिक भारतातल्या नव्या स्त्रीचा प्रियांका हा चेहरा आहे. तो केवळ सेक्स अपीलपुरता मर्यादित नाही; तर त्यापलीकडं जाऊन खऱ्या अर्थानं स्त्रीत्वाचं भान राखून जग जिंकणाऱ्या मुलीचा चेहरा आहे. ही आपल्या डॅडींची फार लाडकी मुलगी आहे. बहुतेक सर्व मुली आपल्या वडिलांच्या लाडक्या असतात आणि त्यांचे वडीलही त्यांचे फार लाडके असतात. आपले वडील म्हणजे त्यांचं विश्वच असतं. प्रियांका अशा सर्व मुलींसारखीच आहे आणि तरीही ती वेगळी आहे. कुठल्या गोष्टींमुळं प्रियांकाला हे वेगळेपण साधता आलं?
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी. प्रियांका चोप्राचा जन्म जमशेदपूरचा. १८ जुलै १९८२ ही तिची जन्मतारीख. अशोक आणि मधू चोप्रा हे तिचे आई-वडील. वडील पंजाबी, तर आई झारखंडची. दोघेही लष्करात फिजिशियन. त्यामुळं सारख्या बदल्या होत असत. त्यामुळं प्रियांकाचं बालपण दिल्ली, अंबाला, चंडीगड, लेह, लखनौ, बरेली आणि पुण्यात गेलं. तिचं शालेय शिक्षण लखनौच्या ला मार्टिनेअर गर्ल्स हायस्कूलमध्ये, तर कॉलेज शिक्षण बरेलीच्या सेंट मारिया गोरेटी कॉलेजात झालं. पण तेही अर्धवट सोडावं लागलं. त्यापूर्वी ती वयाच्या तेराव्या वर्षी अमेरिकेत आपल्या काका-काकूंकडं शिकायला गेली. तिथंही त्यांच्या फिरतीमुळं तिचं शिक्षण न्यूटन, मॅसेच्युसेट्स, क्वीन्स-न्यूयॉर्कमध्ये झालं. त्यामुळं एक झालं, की लहान वयातच तिला वेगवेगळी शहरं आणि जग पाहता आलं. वेगवेगळ्या संस्कृतींशी परिचय झाला. त्यामुळं स्वाभाविकच तिचं भावविश्व प्रगल्भ झालं. अमेरिकेत ती वेगवेगळ्या नाट्यसंस्थांमध्ये कामं करू लागली. वेस्टर्न क्लासिकल संगीत शिकली... 
‘क्वांटिको’मधल्या तिच्या यशस्वी भूमिकेचं मूळ हे त्यात असावं नक्कीच! अमेरिकेत तिला वंशभेदाचाही सामना करावा लागला, असं तिनं एका मुलाखतीत सांगितलंय. त्यातूनच पुढं तिथल्या जनमानसावर राज्य करण्याची जिद्द तिच्यात निर्माण झाली असणार. अर्थात स्वप्नं सगळेच पाहतात. पण ते सत्यात उतरवणं फार थोड्यांना जमतं. कारण त्यासाठी कठोर परिश्रमांची आवश्यकता असते. आयुष्यात फार ‘फोकस्ड’ असावं लागतं. बॉलिवूडसारख्या ग्लॅमर जगाशी केवळ अठराव्या वर्षी संबंध येऊनही प्रियांकानं हे कसं साधलं असेल?
तिनं त्याच मुलाखतीत पुढं म्हटलंय, ‘मी अगदीच अडाणी होते. अत्यंत कमी आत्मविश्वास असणारी होते. अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली होते. त्यात भरीस भर म्हणजे माझ्या पायावर पांढरे डाग होते. पण मी प्रचंड मेहनती, कष्टाळू होते. आज माझे पाय १२ ब्रँड्स विकत आहेत...’ प्रियांकाच्या या उत्तरात बरंच काही दडलेलं आहे. भारतात आर्थिक उदारीकरणाचं पर्व सुरू झालं, तेव्हा ती ९ वर्षांची मुलगी होती. सुश्मिता आणि ऐश्वर्या यांना ‘मिस युनिव्हर्स’ आणि ‘मिस वर्ल्ड’चा मुकुट मिळाला, तेव्हा ती १२-१३ वर्षांची होती. पुढं सहा वर्षांनी तिलाही तो ‘मिस वर्ल्ड’चा मुकुट मिळायचा होता. ती अमेरिकेहून पुन्हा भारतात परतली, तेव्हा तिच्या आत्मविश्वासात चांगलीच वाढ झाली होती. त्यानंतर तिनं बरेलीच्या कॉलेजमध्ये एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला. तिथं विजेती ठरल्यावर तिच्या आईनं मग जरा सीरियसली या उपक्रमाकडं लक्ष द्यायला सुरुवात केली. मग फेमिना मिस इंडिया स्पर्धेत त्यांनी प्रियांकाला उतरवलं. तिथं ती दुसरी आली म्हणजेच ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड’ झाली. स्वाभाविकच तिची निवड मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी झाली आणि लंडनमध्ये ३० नोव्हेंबर २००० मध्ये तिला तो ‘मिस वर्ल्ड’चा मुकुट मिळालाही. त्यानंतर स्वाभाविकच तिला बॉलिवूडच्या ऑफर येऊ लागल्या आणि तिनं कॉलेज सोडलं. मात्र, बॉलिवूडमध्येही तिच्या वाट्याला येणारा संघर्ष टळणार नव्हताच. सुरुवातीला तिनं जे काही सिनेमे केले त्यात ती तशी शोभेची बाहुलीच होती. फार काही प्रभाव नव्हता तिच्या भूमिकांचा. अखेर २००६ मध्ये आलेल्या ‘क्रिश’ (हृतिक रोशनसोबत) आणि ‘डॉन’ (शाहरुखसोबत) या दोन सिनेमांनी ती घराघरांत पोचली. 
पुढं २००८ मध्ये आलेल्या मधुर भांडारकरच्या ‘फॅशन’नं प्रियांकाचं करिअर स्थिर केलं. याच सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर असे दोन्ही पुरस्कार मिळाले. तिथून या मुलीनं मागं वळून पाहिलेलंच नाही. मग ‘मेरी कोम’ असो, ‘बाजीराव-मस्तानी’ असो, की ‘क्वांटिको’ असो. पण या सर्व काळात तिचं तिच्या कुटुंबासोबतचं नातं अधिकाधिक घट्ट होत गेलं. तिच्या गायनॅकॉलॉजिस्ट आईनं बरेलीतली प्रॅक्टिस सोडून पूर्णवेळ प्रियांकासाठी देण्याचं ठरवलं. आज मुंबईत प्रियांका आलिशान फ्लॅटमध्ये राहते; पण शेजारीच तिचं सर्व कुटुंबीयही राहतं. प्रियांका तिच्या वडिलांची फार लाडकी होती. तिचे वडील २०१३ मध्ये गेले. त्यापूर्वीच तिनं २०१२ मध्ये त्यांच्या हस्ताक्षरातली ‘डॅडीज लि’ल गर्ल’ ही अक्षरं हातावर गोंदवून ठेवली होती. प्रियांकाला कुठलंही फिल्मी बॅकग्राउंड नव्हतं की कुणी गॉडफादर नव्हता. पण तिनं स्वतःच्या हिमतीवर हे सर्व यश मिळवलं. जगातले सर्व मान-मरातब तिच्यासमोर आज हात जोडून उभे आहेत. यशासारखं दुसरं काहीच नसतं म्हणतात. प्रियांकानं यश मिळवलं ते स्वतःच्या हिमतीवर आणि मेहनतीवर...! ही गोष्ट अर्थातच सोपी नसते. मोहमायेच्या दुनियेत राहूनही स्वतःच्या प्रगतीसाठी सातत्यानं प्रयत्नशील असणं अवघडच... पण प्रियांकानं ते साधलं याचं कारण तिच्या स्वतःच्या कणखर व्यक्तिमत्त्वात आणि परिस्थितीनुसार तिनं स्वतःमध्ये केलेल्या बदलांत असणार. 
उदा. ‘फॅशन’ हा सिनेमा अर्थातच नायिकाप्रधान होता आणि प्रियांकानं या संधीचं सोनं केलं. फॅशन इंडस्ट्रीशी ती जवळून परिचित होतीच. त्यामुळं तिनं ही भूमिका फार संवेदनशीलतेनं साकारली. समीक्षकांकडून आणि सर्वसामान्य प्रेक्षकांकडूनही ही भूमिका उचलली गेली. पुढं आशुतोष गोवारीकरच्या ‘व्हॉट्स युअर राशी?’ या चित्रपटात तब्बल १२ भूमिका करण्याचा विक्रम तिनं केला. याशिवाय ‘सात खून माफ’ (२०११) हा विशाल भारद्वाजचा सिनेमाही तिच्या करिअरमधला एक महत्त्वाचा टप्पा ठरला. 
याशिवाय अनुराग बसूच्या ‘बर्फी’मधली तिची झिलमिल कोण विसरेल? एका ऑटिस्टिक मुलीची ही भूमिका प्रियांकानं अतिशय जबरदस्त साकारली होती. या भूमिकेचा तिनं फार बारकाईनं अभ्यास केला. अनेक स्वमग्न मुलांच्या संस्थांना भेटी दिल्या. यातून एक अभिनेत्री आणि त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून ती फार प्रगल्भ झाली. श्रीदेवीनं ‘सदमा’मध्ये साकारलेल्या भूमिकेशी तिच्या या भूमिकेची तुलना करण्यात आली. नंतर हृतिकच्या ‘अग्निपथ’मध्येही तिची भूमिका लक्षणीय होती. पण २०१४ मध्ये आलेल्या ‘मेरी कोम’ या सिनेमानं प्रियांकाची अभिनेत्री म्हणून ताकद सगळ्यांच्याच लक्षात आली. भारताची जगप्रसिद्ध बॉक्सर मेरी कोम हिच्या जीवनावर आधारित या सिनेमासाठीही प्रियांकानं अफाट मेहनत घेतली. मेरी कोमसोबत अनेक दिवस ती राहिली. चार महिने बॉक्सिंगचं शास्त्रशुद्ध ट्रेनिंग तिनं घेतलं. नंतर ‘दिल धडकने दो’पासून ते ‘क्वांटिको’मधल्या अलेक्स पॅरिश या व्यक्तिरेखेपर्यंतचा तिचा यशस्वी प्रवास आपल्यासमोरच आहे. अन्य अभिनेत्री आणि तिच्यात प्राधान्यानं जाणवणारा फरक म्हणजे वाढत्या वयानुसार अनेक जणी स्वतःमध्ये बदल करणं नाकारतात. वाढतं वय स्वीकारणं ही अवघडच गोष्ट आहे. प्रियांका मात्र सहजतेनं ते करताना दिसते. तिनं अलीकडच्या काळात स्वीकारलेल्या भूमिकांवरूनच ते दिसून येईल. मूळची बुद्धिमान असलेली ही अभिनेत्री खरं तर कुठल्याही क्षेत्रात गेली असती, तरी यशस्वीच झाली असती, असं वाटतं.
प्रियांकाची आणखी एक बाजू म्हणजे तिचा हात सढळ आहे. अनेक संस्थांना ती कायम मदत करीत असते. जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्रसंघापासून ते अनेक संस्था-संघटनांशी ती वेगवेगळ्या प्रकारे जोडली गेली आहे. सर्वार्थानं ती आज एक यशस्वी स्त्री आहे. ‘सेल्फ-मेड वुमन’ आहे.... अन् म्हणूनच ३३ वर्षांची प्रियांका आज भारतातली ‘मोस्ट डिझायरेबल’ स्त्री आहे!
मुंबईसारख्या मायानगरीत देशभरातून रोज शेकडो तरुणी मधुबाला, श्रीदेवी, माधुरी, दीपिका व्हायला येत असतात. प्रियांकाही अशीच एक मुलगी होती. मात्र, अतूट कौटुंबिक बंध, उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमी आणि अफाट कष्ट करायची तयारी... सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्त्री म्हणून स्वतःला कमी न लेखता उलट स्त्रीत्वातून येणाऱ्या सकारात्मक गोष्टींचा फायदा घेत स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द यातून ती आज खऱ्या अर्थानं यशस्वी सेलिब्रिटी झाली आहे. पण मला नक्की ठाऊक आहे, की ती मनातून अजूनही कुठं तरी ‘डॅडीज लिटल गर्ल’च आहे. आणि तीच तिच्या अफाट यशाची गुरुकिल्ली आहे! 
---

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती - २२ मे २०१६)

----

17 May 2016

लघुकथा - वळीव

वळीव
-----

मे महिन्याचे अखेरचे दिवस. उकाडा 'मी' म्हणत होता. सगळ्यांचीच काहिली काहिली होत होती. माणसं सोडा, पण दुपारच्या वेळी चिटपाखरूपण रस्त्यावर दिसत नव्हतं. आमच्या वाड्यातल्या विहिरीचं पाणी पार तळाला गेलं होतं. सगळी झाडं शुष्क दिसत होती. बाभळींवर धुळीचे थरच्या थर साठले होते. 'पाणी पाणी' होत होतं. नुसतं पाणी पिऊनच पोट फुगत होतं. जेवण जातच नव्हतं. दुपारच्या वेळी आईचा डोळा लागलेला असतो. शेजारी-पाजारीही जरा सामसूमच असते. अशा वेळी बाहेर सटकायला चांगली संधी असते. तसा मी सटकलो. पाय चांगलेच भाजत होते. आत्ताच्या चप्पलचा अंगठा तुटलाय. बाबा नवी घेऊन देणारेत. पण शाळा चालू झाल्यावर! तोपर्यंत मातीत पाय बचकत हुंदडायला मजा येते. 
आमच्या गावच्या पेठेतून सरळ खाली गेलं, की विठ्ठलाचं मंदिर आहे. पेठेत सामसूमच होती. मंदिरात दोन-तीन म्हातारबुवा लवंडले होते. मंदिराच्या दारासमोरूनच मोठ्ठं गटार वाहत होतं. तिथं वर वर अगदी नितळ पाणी वाहतं. मी त्यात पाय बुचकळले. जरा गार वाटलं. तसाच पुढं गेलो. मंदिर मागं टाकलं, की जिल्ह्याच्या गावाकडं जाणारा हमरस्ता लागतो. तिथल्या मैलाच्या दगडावर बसायला मी नेहमी येतो. रस्ता ओलांडला, की म्हशींचं तळं लागतं. या तळ्यात सदा न् कदा म्हशी डुंबत असतात, म्हणून हे म्हशीचं तळं! आत्ताही तिथं भरपूर म्हशी निवांत डुंबत होत्याच. शेजारी दलदलीत झुडपं माजली होती. तळ्याकाठी वळसा घालायला बैलगाडीवाट आहे. त्या वाटेनं गेलं, की सोपानरावांची आमराई लागते. या आमराईत भर उन्हाळ्यातही कसं गार वाटतं! आमची गँग एरवीही इथं येतेच. पण कुणी सोबत नसताना मला इथं येऊन बसायला आवडतं. आम्ही पलीकडच्या मोकळ्या जागेत क्रिकेट खेळायला ग्राउंड तयार केलंय. खेळत नसलो, की आमराईत येऊन बसतो. आताही मी माझ्या नेहमीच्या 'केशऱ्या'खाली येऊन बसलो. उन्हामुळं दूरवर नुसतं पिवळं पिवळंच दिसत होतं सगळं. पाखरं तर कुठं गेली होती, कुणास ठाऊक! असल्या शांततेचा आवाज ऐकायला मला फार आवडतं. विमानात बसल्यावर असं वाटत असेल, असं मला उगीचच वाटतं! इथं येऊन बसलं, की मला दिवसासुद्धा स्वप्न पडतं. त्यात 'चित्रहार'मधल्या नट्याच बऱ्याचदा दिसतात. पण आमच्या वर्गातली सुशीसुद्धा दिसते. सुशी दिसते बाकी मस्त! फक्त तिला त्या दोन लांबड्या वेण्या शोभत नाहीत. तिचा 'बॉबकट' असता, तर ती कशी दिसली असती, हे मी इथं डोळ्यांपुढं आणत राहतो.
आजच्या या पिवळ्या-पिवळ्या दृश्यांत सुशी कुठंच दिसत नव्हती. शेतांत, त्यापलीकडं, त्याच्याही पलीकडं पार डोंगरांपर्यंत सगळीकडं नुसताच रखरखीतपणा भरला होता. अशा वातावरणात मला भयंकर तहान लागते; पण मी तसाच बसून राहतो. बाबा ओरडले, की म्हणतात, 'आता जीभ टाळूला चिकटली का तुझी?' पण असल्या उन्हात माझी जीभ नेहमीच टाळूला चिकटते. खरं तर आंबे खाऊन खाऊन जीभ अशी जडावते, की बोलावंसंसुद्धा वाटत नाही. आंब्यांच्या आंबट-तुरट चवी जिभेवरून जाऊच नयेत, असं वाटतं. पूर्वी मी मे महिन्यात आमच्या शेतातल्या दगडी विहिरीत पोहायला शिकायला जायचो. पण हल्ली विहिरीचं पाणीच आटलंय. आणि मला का कोण जाणे, पोहायला आवडतही नाही फारसं! त्यात आमच्या विहिरीत तर पोरांची ही गर्दी असायची. सारखे आपले हात-पाय दुसऱ्याला लागायचे. त्यात काय डुंबत बसायचं? मग मी मामाकडं कॅरम खेळायला शिकलो. पण पुढच्या वर्षीच त्यातली मजा गेली. आता फक्त इथं येऊन डोळ्यांपुढं 'चित्रहार' आणत पडून राहावंसं वाटतं.
अचानक या शांततेला भेदत मोठ्ठी वावटळ आली. बचकाभर धूळ डोळ्यांत गेली. डोळे चोळून चोळून लाल लाल झाले. नीट दिसायला लागेपर्यंत बघतो, तर मघाचं ऊन कुठल्या कुठं गायब झालं होतं. सोसाट्याचा वारा सुटला होता. वर आकाशात एक मोठ्ठा काळा ढग चाल करून आला होता. कसले कसले आवाज यायला लागले! गडगडायला लागलं. कुठून तरी दुरून मातीचा ओला वास नाकात शिरला. इतकं छान वाटलं! तेवढ्यात 'टप टप' आवाज करीत मोठमोठे थेंब अंगावर पडायला लागले. विजा कडकडू लागल्या. विजा कोसळत असताना झाडाखाली उभं राहू नये, म्हणून मी पटकन झाडाखालून आमच्या ग्राउंडवर गेलो. आता पाऊस जोरातच कोसळायला लागला होता. मी न ठरवतासुद्धा आपोआप 'गाड्या गाड्या भिंगोऱ्या' करीत गोल फिरायला लागलो. पावसानं चिंब भिजलो होतो... कपडे ओलेकच्च झाले होते. डोळे मिटूनच घेतले होते... अचानक मला कुणी तरी उचललं! मी जणू पिसासारखा तरंगत ढगांकडे निघालो. ढगांच्याही वर आलो. खाली सगळीकडं हिरवीगार पृथ्वी दिसत होती. हळूहळू मी डोंगररांगांच्या वर आलो. हा सह्याद्री पर्वत बहुतेक! शिवरायांचे गड-कोट दिसू लागले. हा टॉवर असलेला सिंहगड, मग हा तोरणा, शेजारचा गरुडासारखे पंख पसरलेला राजगड... मग हे मोठ्ठं शहर कोणतं? ही तर मुंबई! शेजारी अथांग पसरलेला अरबी समुद्र... हे काय! मी हळूहळू समुद्रावर उतरलो... समुद्राच्याही खाली... इथंही पाऊस पडतोय... शिंपले उघडले जातायत... मोत्यांमागून मोती बाहेर पडतायत... आणि... चक्क सुशी... इथं? तीही समुद्रदेवतेच्या वेषात? गॅदरिंगमध्ये तिनं डिट्टो असलीच पांढरी साडी नेसली होती! मी भारावून सुशीकडं बघतच राह्यलो. या सुशीनं चक्क 'बॉबकट' केला होता! मी तिच्याजवळ गेलो... मला तिला जवळ घ्यायचं होतं... तिच्या केसांतून हात फिरवायचे होते... पण छे! मला पुन्हा कुणी तरी उचललं आणि समुद्राबाहेर काढलं. समुद्रावरही जोरदार पाऊस पडत होता. समुद्रावरचा पाऊस मी कधीच बघितला नव्हता. देव तरी काय! समुद्रावर पाऊस म्हणजे निव्वळ पाणी वाया घालवणं! हळूहळू समुद्रही आटला. तिथं आता आमचं ग्राउंड दिसायला लागलं. हळूहळू मी गोल फिरायचा थांबलो. डोळे उघडून बघितलं, तर पाऊस थांबला होता... स्वच्छ, पिवळं सोन्यासारखं ऊन पडलं होतं.... आकाशात सुरेखसं इंद्रधनुष्य उगवलं होतं... समोर एक कण्हेरीचं फूल नुकतंच उमललं होतं... जणू माझ्याकडं बघून हसत होतं... 
घरी गेलो तर आई कुणाला तरी सांगत होती... 'चिरंजीवांना शिंगं फुटलीयत!' मी लगेच आरशात बघितलं आणि मनसोक्त हसलो!




---------------------------

29 Apr 2016

सैराट रिव्ह्यू

सुन्नाट
---------

फर्स्ट थिंग फर्स्ट. 'सैराट' पाहणं हा एक भन्नाट अनुभव आहे, यात शंकाच नाही. अलीकडच्या काळातील मराठीमधला हा महत्त्वाचा चित्रपट ठरावा. मराठीत प्रेमकथा फार आल्या नाहीत. मराठीला प्रेमकथा झेपत नाहीत. पण 'सैराट' ही अव्वल दर्जाची प्रेमकथा आहे.  अस्सल या मातीमधली आहे. कथित खालच्या जातीतला तरुण आणि कथित उच्चवर्णीय तरुणी यांच्या प्रेमाची आणि त्यातून येणाऱ्या अपरिहार्य, पण भीषण शेवटाची ही गोष्ट आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेला त्यातून काही तरी ठोस सांगायचंय. ते त्याला 'फँड्री'मधूनही सांगायचं होतं. ते याही सिनेमातून सांगायचं आहे. ते काय आहे, हे आपल्याला नीट कळतं. त्यामुळं 'सैराट' पाहून झाल्यावर ते सांगणं डोळ्यांमध्ये ठसठशीत भरून राहतं; कान बधीर होतात आणि मेंदू सुन्न होतो.
आपल्या समाजातलं जातिवास्तव ही आजही एक दाहक गोष्ट आहे. या जातिप्रथांमधून आलेल्या दुर्गुणांमुळं चांगली चांगली माणसं भैराट होतात; वेड्यासारखं वागतात. कथित प्रतिष्ठेपायी वाट्टेल ते प्रकार करतात. हे आपल्याला नवं नाही. दोन प्रेमी जीवांची त्यात होणारी होरपळही नवी नाही. एक दुजे के लिए, लव्हस्टोरी, कयामत से कयामत तक या सर्व चित्रपटांतून या प्रकारची प्रेमकहाणी आपण पाहिलेली असते. पण 'सैराट'मध्ये आणि त्यांच्यामध्ये गुणात्मक फरक आहे. 'सैराट' हा त्या प्रेमाच्याही पलीकडं जाऊन काही भाष्य करतो. 'फँड्री'सारखंच. हे भाष्य अर्थातच नागराजच्या स्टाइलनुसार अंगावर येतं. चरचरीत चटका देतं. प्रेक्षकांना सामुदायिक उसासे सोडायला लावतं. पुढं काही सुचतच नाही...
सिनेमा म्हणून 'सैराट'कडं पाहताना काही गोष्टी चटकन जाणवतात. सिनेमा हे किती दिग्दर्शकाचं माध्यम आहे, हे 'सैराट' आपल्याला पुनःपुन्हा दाखवून देतो. इथं दिग्दर्शक अक्षरशः प्रत्येक फ्रेममध्ये दिसत राहतो. कारण सिनेमात सगळेच कलाकार (छाया कदम यांचा काहीसा अपवाद) अगदीच नवखे आहेत. यापैकी कित्येकांनी या सिनेमाच्या निमित्तानं प्रथमच कॅमेराला तोंड दिलं आहे. असं सगळं असूनही आपण तब्बल १७० मिनिटांचा सिनेमा पाहताना एक क्षणही विचलित होत नाही की आपल्याला कंटाळा येत नाही. याचं कारण त्या सर्वांकडून दिग्दर्शकानं त्याला काय पाहिजे ते काढून घेतलंय. दिग्दर्शकाचा लखलखीत ठसा प्रत्येक ठिकाणी दिसत राहतो.
दुसरं म्हणजे या चित्रपटाचं संगीत. अजय-अतुल यांनी या चित्रपटासाठी दिलेलं संगीत आणि पार्श्वसंगीत हा या सिनेमाचा मोठाच प्लस पॉइंट ठरला आहे. त्यांनी हॉलिवूडमधील स्टुडिओत या चित्रपटाची गाणी आणि पार्श्वसंगीत रेकॉर्ड केलंय, हे सर्वांना माहिती आहे. अत्यंत अव्वल दर्जाचं हे पार्श्वसंगीत चित्रपटाला वेगळी उंची नक्कीच प्राप्त करून देतं. सिनेमा पाहत असताना आपण तो 'ऐकत'ही जातो. चित्रपटाचं छायांकनही अप्रतिम दर्जाचं. सुधाकर रेड्डी यांचा कॅमेरा महाराष्ट्राचा ग्रामीण भाग ते हैदराबादमधली झोपडपट्टी हे सर्व फार सुंदर पद्धतीनं दाखवतो. चित्रपटाच्या अनेक फ्रेममध्ये पक्ष्यांचा थवा येत राहतो. हे चित्रणही जमलेलं आणि खूपच बोलकं.
चित्रपटाचे सरळ सरळ दोन भाग पडले आहेत. पहिला भाग नायक-नायिकेच्या प्रेमकथेचा, प्रेम जमण्याचा, चेष्टा-मस्करीचा आणि मित्रांबरोबर केलेल्या धमाल गोष्टींचा आणि उत्तरार्ध त्यांच्या संघर्षाचा. पूर्वार्ध अर्थात खूपच आवडणारा आणि जमलेला. चित्रपटातील सर्व चारही गाणी पूर्वार्धातच होऊन जातात. ही सर्वच गाणी भावमारू आणि प्रेक्षणीय अशी जमली आहेत. सिनेमाचा उत्तरार्ध तुलनेत खूप रखरखीत आहे. नायक-नायिका हैदराबादमध्ये जातात आणि तिथं त्यांचं खरं आयुष्य सुरू होतं. दिग्दर्शकानं हे चित्रणही खूप मनापासून आणि वास्तववादी केलं आहे. पण पूर्वार्धाच्या तुलनेत यात धमाल-मस्ती नसल्यानं प्रेक्षक एकदम काहीसा अस्वस्थ होतो. चित्रपटाची संथ लय त्याला पटकन झेपत नाही. पण सिनेमाची मांडणी म्हणून दिग्दर्शकाची यात काही चूक आहे, असं वाटत नाही. असलीच तर चित्रपटाची एकूण लांबी हीच त्रुटी म्हणावी लागेल. हा सिनेमा आणखी वीस मिनिटांनी सहज ट्रिम करता आला असता. दोन तास पन्नास मिनिटांची ही लांबलचक स्टोरी पूर्वीच्या हिंदी सिनेमांची आठवण करून देते. पण मधेच प्रेक्षकांना अस्वस्थही करते. असो.
आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू या दोन्ही तरुण मुलांनी अप्रतिम काम केलंय. विशेषतः रिंकूनं पाटलांच्या आर्चीचा ठसका फारच जबरदस्त दाखवला आहे. तिचे डोळे अत्यंत बोलके व प्रभावी आहेत. तिचं ग्रामीण बाजाचं बोलणं फार गोड आहे. बुलेट चालवताना, ट्रॅक्टर चालवताना तिनं दाखवलेला अॅटिट्यूड एक नंबर. उत्तरार्धात झोपडीतलं राहणं झेपेनासं झाल्यावर कोलमडलेली अर्चनाही तिनं अगदी तन्मयतेनं साकारली आहे. तिच्या रूपानं मराठीला एक बोलक्या डोळ्यांची प्रभावी अभिनेत्री लाभली आहे, असं म्हणायला हरकत नाही. आकाश ठोसरनंही कोळ्याच्या मुलाचं - परशाचं -  निरागस तारुण्य, काहीसं दबलेपण, काहीसा न्यूनगंड झकास दाखवला आहे. अर्थात यात दिग्दर्शकाचा वाटा मोठा आहे, हे ओघानं आलंच. परशाचे मित्र झालेले प्रदीप (तानाजी गलगुंडे) आणि सल्या (अरबाज शेख) यांचीही कामं फार जोरदार झाली आहेत.
सिनेमाचा शेवट फिल्मी असला, तरी अंगावर येतो. विशेषतः त्या लहान मुलावर कॅमेरा जाताना जो सायलेन्स आहे, त्यामुळं तर हा सर्वच प्रसंग भयंकर अंगावर येतो. पण या दिग्दर्शकाला असा आघात करून प्रेक्षकांना झटका देण्याची सवय आहे. मात्र, पुढच्या सिनेमात हा फंडा कदाचित उपयोगी येणार नाही. असो.
सैराट ही आपल्या ढोंगी, भोंदू, दांभिक जातिव्यवस्थेला मारलेली सणसणीत चपराक आहे. ती खायला थिएटरला जावंच लागेल.

दर्जा - साडेतीन स्टार
---

18 Apr 2016

बॉलिवूडचा ‘लखन’...



हिंदी चित्रपटसृष्टीत दर शुक्रवारी नवी स्वप्नं प्रदर्शित होतात आणि त्यासोबत कदाचित कुठल्या तरी अभिनेता किंवा अभिनेत्रीचं नशीबही. या तारांगणात अनेक तारे लुकलुकत असतात. त्यातले अनेक कधी येतात आणि कधी विझतात तेही कळत नाही. सूर्यासारखं नशीब घेऊन आलेले फार थोडे. अनिल कपूर हे त्यातलं एक लखलखीत नाव. मी अनिल कपूरला बॉलिवूडचा ‘लखन’ म्हणतो. अमिताभ बच्चन हा बॉलिवूडचा ‘राम’ असेल, तर अनिल निखालसपणे ‘लखन’ आहे. जसं लक्ष्मणाशिवाय रामायण अपूर्ण तसंच बॉलिवूडचा इतिहास अनिल कपूरच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच. एकाच वेळी अत्यंत हँडसम, देखणा, स्वर्गलोकीचा राजकुमार वाटावा आणि त्याच वेळी अत्यंत साधा, गरीब, ‘बॉय नेक्स्ट डोअर’ असाही वाटावा असं काहीसं अजब कॉम्बिनेशन अनिल कपूरच्या व्यक्तिमत्त्वात आहे. अभिनयाच्या सर्व पैलूंमध्ये वाकबगार, कामामध्ये अत्यंत व्यावसायिक आणि महत्त्वाचं म्हणजे चारित्र्यसंपन्न अशा गुणांनी अनिल कपूर समृद्ध आहे. त्यामुळंच तो दीर्घकाळ या मायानगरीत टिकू शकला आणि यश मिळवू शकला. 
 अनिल कपूरचा थिएटरला मी पाहिलेला पहिला सिनेमा म्हणजे बहुतेक ‘साहेब’. मला नक्की आठवत नाही. पण साहेबच असावा. आमच्या जामखेडच्या टूरिंग टॉकीजमध्ये मी तो पाहिला. अलीकडं बालक-पालक सिनेमात ‘साहेबचा रेफरन्स आहे. रवी जाधवच्याही लहानपणच्या काही गोड आठवणी ‘साहेबसोबत जोडल्या असाव्यात, असं मला ते पाहून वाटलं. विशेषतः अनिल कपूर आणि अमृतासिंहच्या जागी ती दोन मुलं स्वतः नाचत आहेत, असं जे दृश्य त्यानं टाकलंय, त्यावरून. असो. हे विषयांतर झालं. मूळ मुद्दा अनिल कपूर हे नाव माझ्या आयुष्यात पहिल्यांदा केव्हा आलं हा... अनिल कपूरचा भोळाभाबडा साहेब खूप भावला. अनिलनं १९८० ते १९८४ च्या दरम्यान काही सिनेमे केले. पण त्यातला मशाल हा सर्वांत लक्षात राहिलेला. यात तो अभिनयसम्राट दिलीपकुमारसमोर तेवढ्याच ताकदीनं उभा राहिला. ‘जिंदगी आ रहा हूँ मैं...’ या किशोरकुमारच्या गाण्यानं (आणि हृदयनाथांच्या संगीतानं) अनिल कपूरच्या बॉलिवूडमधील येण्याची वर्दी सर्वांना मिळाली. पण साहेबमुळं अनिल कपूर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य रसिकांच्या हृदयात जाऊन पोचला, असं म्हणावं लागेल.
तो काळ बॉलिवूडसाठी एकूण फारच विचित्र होता. देशातलं वातावरणही फार अस्थिर होतं. अमिताभ काहीसा उतरणीला लागला होता. राजेश खन्ना तर केव्हाच गायब झाला होता. व्हिडिओ पार्लरनी गावोगावी धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती आणि सिनेमाचा धंदा बसवला होता. बॉलिवूड संभ्रमावस्थेत होतं. दाऊद आदी मंडळींचा त्या वेळी बॉलिवूडवर वरचष्मा होता. काळ्या पैशांची चलती होती. राज कपूरनं अभिनय केव्हाच सोडून दिला होता आणि तो सिनेमा चालण्यासाठी ओलेत्या मंदाकिनीवर विसंबून राहू लागला होता. इंदिरा गांधींची क्रूर हत्या झाली होती आणि राजीव गांधींसारखा उमदा पंतप्रधान आपलं अस्तित्व सिद्ध करायला चाचपडत होता. भारतानं वर्ल्ड कप आणि नंतर बेन्सन अँड हेजेस चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सची ट्रॉफी जिंकली असली, तरी नंतर वेस्ट इंडिजकडून वाईट मार खाल्ला होता. शिवाय शारजातल्या भारत-पाक सामन्यांचं दुष्टपर्व त्याच काळात सुरू होतं. दुष्टपर्व म्हणायचं कारण, की त्यावर पुन्हा दाऊद प्रभृतींचं वर्चस्व होतं. सचिन तेंडुलकर, एसटीडी-आयएसडी बूथ आणि मुक्त अर्थव्यवस्था हे फिनॉमिना अजून देशाच्या पटलावर यायचे होते. मोबाइल ही तर परग्रहावरची कल्पना होती. संगीत क्षेत्रातही मेलडी संपून डिस्कोचा जमाना सुरू झाला होता. गरिबांचा अमिताभ (म्हणे) मिथुन चक्रवर्ती ‘डिस्को डान्सर बनून महानगरी तरुणांच्या रिक्त, पोकळ आयुष्यात झिंग आणण्याचा तोकडाच प्रयत्न करीत होता. पण एकूणच बहुतेक क्षेत्रांत मीडिऑक्रसीनं कळस गाठला होता. साधं-सोपं जगणं फार बेगडी, कृत्रिम झालं होतं. महागाईनं तेव्हाही कळस गाठला होता आणि अन्नधान्यातल्या भेसळीसारखे भ्रष्टाचार गाजत होते. 
असल्या वातावरणातून, असल्या विचित्र मानसिकतेतून देशाला बाहेर काढण्यासाठी कुणी तरी मिस्टर इंडिया’च जन्माला यायला हवा होता... जो दिसत तर नाही, पण जगातील सगळी सत्कृत्यं करतो आणि जे जे वाईट, गलिच्छ, घाण आहे, ते ते समूळ नष्ट करतो... जो मुलांचा आवडता आहे आणि जो प्रेयसीबरोबर उत्कट रोमान्स करतो... शेखर कपूर नावाच्या अस्सल भारतीयत्व जपणाऱ्या आणि ओळखणाऱ्या जाणत्या दिग्दर्शकानं हे सगळं हेरलं आणि रजतपटावर आकाराला आला ‘मि. इंडिया...’! या ‘मि. इंडियाचा चेहरा शेखर कपूरला अनिल कपूरमध्ये दिसला हे महत्त्वाचं. यापूर्वी म्हटलं तसं एकाच वेळी अत्यंत देखणा, परिलोकातला वाटावा असा आणि त्याच वेळी साधा, चाळीतला, भोळाभाबडा वाटावा असा चेहरा हे अनिलचं वैशिष्ट्य होतं. शिवाय तो अभिनय करू शकत होता, ही खूपच मोठी गोष्ट ठरली त्याच्या बाजूनं. १९८७ मध्ये ‘मि. इंडिया’ अवतरला आणि अनिल रातोरात सुपरस्टार झाला... तेव्हा आताएवढी माध्यमांची बजबजपुरी नव्हती, पण जी थोडीफार होती, त्यांनी त्याला लगेच अमिताभचा उत्तराधिकारी घोषित करून टाकलं. ही फार मोठी गोष्ट होती. मि. इंडिया बारकाईनं पाहिला, तर भारतातल्या तत्कालीन आर्थिक, सामाजिक वास्तवाचं दारूण दर्शन शेखर कपूरनं घडवलेलं दिसतं. मि. इंडिया भेसळ करणाऱ्या अजित वाच्छानीला बडवतोय आणि खडे असलेलं अन्न त्याला खायला लावतोय,’ या दृश्याला टाळ्या पडायच्या, असा तो काळ होता. अनिल कपूर परफेक्ट मि. इंडिया शोभला. श्रीदेवीसोबत कांटे नही कटते’ म्हणत त्यानं केलेला ओलेता रोमान्सही पब्लिकला भावला आणि मुलांसोबत ‘खिलौना मेरे बच्चों का...’ म्हणत नायिकेसोबत भांडणारा त्याचा अरुणही आवडून गेला.
अनिल कपूरची ताकद सर्वांच्याच लक्षात आली. याच वेळी चंद्रशेखर नार्वेकर उर्फ एन. चंद्रा हा मराठी दिग्दर्शक अंकुश’, ‘प्रतिघात असे हट के आणि व्यवस्थेविरुद्धचा संताप व्यक्त करणारे सिनेमे घेऊन प्रेक्षकांची दाद मिळवत होता. याच एन. चंद्रानं त्याच्या पुढच्या सिनेमासाठी अनिल कपूरला साइन केलं आणि जोडीला होती एक मराठी मुलगी - माधुरी दीक्षित. मध्यमवर्गीय घरातला, नेव्हीत जाण्याचं स्वप्न पाहणारा तरुण व्यवस्थेमधल्या दोषांमुळं गुन्हेगार कसा होतो, असं हे चंद्राच्या आवडीच्या विषयावरचंच कथानक होतं आणि सिनेमाचं नाव होतं - तेजाब. १९८८ मध्ये तेजाब’ झळकला आणि ‘एक दो तीन...’ म्हणत माधुरी एका रात्रीत सुपरस्टार झाली. अनिल कपूरच्या सुपरस्टारपदावर शिक्कामोर्तबच केलं माध्यमांनी! त्याचा महेश देशमुख उर्फ मुन्ना पब्लिकनं डोक्यावर घेतला. मुंबईतल्या अंधाऱ्या रात्री, रुळांवर उभ्या असलेल्या दोन लोकलच्या मध्ये दारूच्या नशेत झिंगत, ‘मैं तो भूल चली बाबूल का देस...’ म्हणत झोकांड्या खाणारा आणि गुंडांनी हल्ला करताच नशेचं सोंग सोडून एकदम कडक आवाजात ‘तुम मेसे मुकुटबिहारी कौन है... म्हणणारा मुन्ना एकदम सुपरहिट झाला. अमिताभच्या जंजीरच्या वेळच्या अँग्री यंग मॅन इमेजशी अनिल कपूरच्या या भूमिकेचं साधर्म्य होतं. तेजाबनंतर या माणसानं कधीच मागं वळून पाहिलं नाही.
सुभाष घई हा तेव्हा इंडस्ट्रीतला नवा शो-मॅन होता. राज कपूर १९८८ मध्ये गेल्यानंतर तर हे बिरुद आपसूक घईंकडं चालत आलं. घईंना संगीताची, कथेची आणि त्यातल्या मसाल्याची नेमकी जाण होती. हा सगळा सुपरहिट मसाला घालून त्यांनी १९८९ मध्ये आणला राम-लखन. जॅकी श्रॉफ राम आणि अनिल लखन! अर्थात वन टू का फोर...’ करणारा अनिलचा राउडी लखनच हिट झाला. सोबत त्याची सुपरहिट जोडीदार - माधुरी होतीच! घईंचा राम-लखन सुपरडुपर हिट झाला. अनिल कपूरची लोकप्रियता कळसाला पोचली. तत्पूर्वी घईंच्याच ‘कर्मामध्येही अनिल कपूर पुन्हा एकदा दिलीपकुमारांसोबत होताच. तेजाबच्या आधी केलेले वो सात दिन’, ‘मेरी जंग’, ‘जाँबाज’ या चित्रपटांतही त्यानं आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. अनिल कपूरचं वैशिष्ट्य म्हणजे कारकिर्दीच्या ऐन शिखरावर असतानाही त्यानं कधी आपलं संतुलन गमावलं नाही. तो तेव्हा फार मीडिया फ्रेंडली नव्हता म्हणे. सुनीता ही अनिल कपूरची पत्नी. हे सर्व सिनेमे येण्याआधीच सुनीताबरोबर अनिलची लग्नगाठ बसली होती. पण सुपरस्टार पद मिळाल्यानंतरही अनिलचं कधीच कुणा नटीसोबत अफेअर असल्याची चर्चासुद्धा ऐकायला मिळाली नाही. आपण बरं आणि आपलं काम बरं, याच वृत्तीनं तो जगला. अनिल कपूरची ही वृत्ती फिल्म इंडस्ट्रीत फारच दुर्मिळ आणि म्हणूनच काबिले तारीफ आहे.
अनिलनं याच काळात के. विश्वनाथ यांचा ईश्वर’ही (१९८९) केला. ईश्वरनं अनिलच्या सर्वांगीण अष्टपैलुत्वावर पुन्हा एक शिक्कामोर्तब झालं. विधू विनोद चोप्राच्या परिंदामध्ये नाना पाटेकरचा अण्णा भाव खाऊन गेला असला, तरी अनिलची भूमिका आणि अस्तित्व विसरणं शक्यच नव्हतं कुणाला... नंतर बॉलिवूडमध्ये खान मंडळींचं साम्राज्य सुरू झालं आणि अनिल यात थोडा मागं पडला... पण १९९२ मध्ये इंद्रकुमारच्या ‘बेटा’नं अनिलला पुन्हा हात दिला. यात माधुरी धक धक गर्ल’ म्हणून तुफान गाजली, तरी अनिल कपूरची साथ महत्त्वाची होती. यानंतर विधू विनोद चोप्राचाच १९४२- ए लव्ह स्टोरी’ (१९९४) आला. सिनेमा फार चालला नाही, तरी त्यातलं एक लडकी को देखा’, ‘कुछ ना कहो...’ ही गाणी सुपरहिट झाली. पंचमदांनी संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट. अनिल कपूरचं सुदैव असं, की या अवलिया संगीतकाराची शेवटची मास्टरपीस गाणी त्याच्यावर चित्रित झाली. नंतर १९९७ मध्ये आलेला विरासतही गाजला. पण अनिलच्या करियरला पुन्हा हात दिला तो घईंच्याच ताल’नं... वर्ष होतं १९९९. विश्वसुंदरी ऐश्वर्या रायसोबत रमलेला हा ‘रमता जोगी...’ पब्लिकला जाम आवडला. नंतर माधुरीसोबत २००० मध्ये पुकार आला. पण फार चालला नाही. पण २००१ मध्ये राणी मुखर्जीसोबत आलेल्या नायक या दाक्षिणात्य सिनेमाच्या रिमेकनं अनिल कपूरला चांगला हात दिला. एका दिवसासाठी मुख्यमंत्री होणाऱ्या त्याच्या शिवाजी राव या पात्राची कथा लोकांना खूप आवडली.
पण यानंतर अनिलच्या करियरमध्ये मोठा ब्रेक आला. पुढची चार-पाच वर्षं त्याचा एकही नाव घेण्यासारखा मोठा सिनेमा आला नाही. पण २००५ मध्ये आलेल्या नो एंट्री’नं अनिलची बॉलिवूडमधली रि-एंट्री सुखद केली. अनिल विनोदी भूमिकाही उत्तम करतो, हे पुन्हा सिद्ध झालं. नंतर २००७ मध्ये वेलकममध्येही अनिलनं कॉमेडी केली. २००८ मध्ये आलेल्या डॅनी बोएलच्या स्लमडॉग मिलेनिअर या महत्त्वाकांक्षी सिनेमात अनिल कपूरला महत्त्वाची भूमिका मिळाली. या चित्रपटानंतर तो आंतरराष्ट्रीय जगतात एक मान्यवर अभिनेता म्हणून गणला जाऊ लागला. नंतर टॉम क्रूझच्या मिशन इम्पॉसिबल’मध्येही त्याने एक छोटी भूमिका केली. 
अनिल कपूरचं वैशिष्ट्य म्हणजे एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीत तो कधीच वादग्रस्त ठरला नाही. कधीही कुठल्या अफेअरमध्ये, वाईट गोष्टींमध्ये त्याचं नाव आलं नाही. त्यानं कधीही त्याचा विषय सोडून बडबड केली नाही, की कुणाबरोबर भांडण केलं नाही. तो अंतर्मुख स्वभावाचा माणूस आहे. त्याची मुलगी सोनम कपूर नायिका झाली, तरी तो स्वतःही नायकाच्याच भूमिका करतोय... वयाच्या ५६ व्या वर्षीही त्यानं स्वतःला जे काही फिट ठेवलंय, ते नक्कीच कौतुकास्पद आहे. आपलं आयुष्य असावं तर अनिल कपूरसारखं... असं मला अनेकदा वाटतं, यातच त्याच्या यशस्वी आयुष्याचं सार आहे!
---
(पूर्वप्रसिद्धी - साहित्य शिवार, दिवाळी २०१३)
----