31 Jul 2020

आपले छंद दिवाळी अंक लेख २०१९ - पाऊस

पाऊस... जनांतला, मनातला!
----------------------------------

पावसाळा म्हटलं, की आयुष्यातल्या काही ओल्याचिंब आठवणींची सर बरसू लागते. पावसाळ्यातल्या खाण्याप्रमाणेच या काळातल्या आठवणीही चटक-मटक चवीच्या असतात. काही कांदा-भज्यांसारख्या कुरकुरीत अन् खुसखुशीत, तर काही लालजर्द मिसळीच्या तर्रीप्रमाणे झणझणीत... काही वाफाळत्या चहाच्या स्वादासारख्या तरतरीत, तर काही विशेष पेयांसारख्या मादक अन् उत्तेजक... पावसाळ्यातल्या पायवाटेप्रमाणेच काही आठवणीही निसरड्या, तर काही आठवणी दुष्काळासारख्या - कायमचा घाव घालून गेलेल्या! ते काहीही असलं, तरी पावसाळी आठवणींच्या गमती-जमतींची सर इतर कुठल्याही आठवणींना नाही.
लहानपणीचा पाऊस खेळगड्यासारखा सोबत करायचा. पाऊस सुरू झाला, की 'गाड्या गाड्या भिंगोऱ्या' करत खेळ सुरू व्हायचा. पावसात मुक्तपणे भिजणं लहानपणी जसं जमलं, तसं नंतर कधीच जमलं नाही. नंतर सामाजिक रीतीरिवाजांचा आणि 'कोण काय म्हणेल' या भीतीचा रेनकोट जो अंगात चढला, तो नंतर उतरणं शक्यच झालं नाही. पावसाचा थेंब जेवढा शुद्ध तेवढंच तो झेलणारं निरागस बालपणही शुद्ध! ही अशी अंतर्बाह्य स्वच्छता नंतर फारशी वाट्याला आली नाही. 'दाग अच्छे है' असं मनाला पटवत राहणं एवढंच राहिलं. बाकी त्या लहानपणी कोसळणाऱ्या त्या पावसानं अविरत, संततधार आनंदच दिला. कागदी होड्यांचं आणि प्रत्येकाच्या बालपणाचं एक अद्भुत नातं आहे. म्हणून तर कवीला 'वो कागज़ की कश्ती, वो बारीश का पानी' असं लिहावंसं वाटलं. या कागदी होड्या करून पाण्यात सोडण्यात एक अपरिमित आनंद असायचा. पावसाच्या पाण्याशी आपलं नातं जुळवणारी ती चिमुकली होडी पाच-दहा फूट पळायची आणि पुढं कुठं तरी ओली होऊन बुडायची तरी किंवा फाटून संपून तरी जायची. आपलं बालपणही असंच संपून जातं. पण त्या ओल्याचिंब आठवणी मागे राहतात.
पावसाचा आणि शाळेचा संबंधही असाच 'लव्ह-हेट' पद्धतीचा. 'सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?' हे बालगीत एवढं अफाट लोकप्रिय होण्यामागे पावसाचा आणि सुट्टीचा असलेला अन्योन्य संबंधच असावा. आपल्याकडं शाळा आणि पाऊस दोन्ही एकदमच जूनमध्ये सुरू होतात. त्यामुळं शाळेच्या अत्यावश्यक खरेदीत शहरांत तरी रेनकोट आणि छत्री असतेच. माझं बालपण तालुक्याच्या गावात गेलं. कित्येक मुलांच्या पायांत चपलांचादेखील पत्ता नसायचा, तिथं रेनकोट आणि छत्र्या कुठल्या असायला? अनवाणी पावलांनी, चिखलयुक्त रस्ता तुडवत शाळेला जायचं. आमच्या शाळेभोवती कधी तळं साचून सुट्टी मिळाली नाही, पण शाळेच्या मागेच एक तळं होतं. तिथं म्हशी डुंबत असायच्या. वर्गातून कधी कधी ते दृश्य दिसायचं. बाहेर पाऊस कोसळत असताना वर्गात बीजगणित, भूमिती वगैरे विषय बोअर व्हायचे. पण मराठी, इतिहास, भूगोल असे विषय आवडायचे. त्यातही मराठीतल्या कविता शिकायला, ऐकायला मजा यायची. भूगोलातही 'पाऊस कसा पडतो' इथपासून ते बारमाही नद्या, धरणं यांची माहिती वाचताना समृद्ध झाल्यासारखं वाटायचं. पाऊस आणि आपलं जगणं यांचा काही तरी फार महत्त्वाचा संबंध आहे, हे शाळेतच समजायचं. मग 'मान्सून' आणि त्याच्या नाना कळा शिकायला मिळाल्या. शाळेतले पहिले काही दिवस म्हणजे नव्या कोऱ्या पुस्तकांच्या वासाचे आणि पावसाने ओल्या झालेल्या धरतीच्या वेडावणाऱ्या सुगंधाचे...! या दिवसांचं स्मरणरंजन म्हणजे जगातल्या सर्वांत मौल्यवान अत्तराची कुपी! कधीही उघडावी आणि त्या धुंद वासानं मन नादावून जावं... याच काळात शाळेत नवे मित्र यायचे. काही सोडून जायचे. तेव्हा लहानपणी मित्रांना, नातेवाइकांना पोस्टानं कार्डं लिहायचो. खुशाली कळविण्यामधला महत्त्वाचा मजकूर हा पावसासंबंधीचा असायचा. इकडं पाऊस सुरू आहे, तुमच्याकडं येतोय का, असा मजकूर असायचाच. मित्राचं पत्र आलं, की तो पूर्ण दिवस आनंदात तरंगत राहायचं. पुनःपुन्हा ते पत्र काढून वाचायचं. जरा मोठे झालो आणि वर्गात मुलीही आल्या! मग आयुष्य निरागस राहिलं नाही. अर्धवट वय होतं. काही कळायचं नाही. पण पलीकडल्या बाकांविषयी काही तरी आतून गुदगुल्या करणारं असं वाटायचं. पाऊस हा तर अशा भावनांना खतपाणी घालणारा रोमँटिक ऋतू. मग मनातल्या मनातच पाऊस पडायचा, इंद्रधनूही उगवायचं, चंद्रही दिसायचा, चांदणंही लखलखायचं. असा सगळा निसर्ग शरीराच्या पेशीपेशींत कसल्या तरी अनाम आकर्षणाची पेरणी करून जायचा. त्या वयातले ते सगळे दिवस सगळेच असायचे. त्या वेळच्या सगळ्या नाजूक भावनांना पावसाची सोबत असायची. म्हणून तर स्मरणरंजनाचा एक धागा पावसाशी कायम जोडलेला असतो. पाऊस पडू लागला, की मागच्या सगळ्या पाऊसवेळा आठवतात आणि डोळ्यांत पुन्हा पाऊस उभा राहतो. चांगल्या आठवणींची याद येते, तशाच काही गमतीशीर आठवणी आठवून हसायलाही येतं. पावसात अनेकदा झालेली फजिती आठवते. समोरच्या गाडीनं आपल्या शाळेच्या नव्या कोऱ्या ड्रेसवर उडवलेली चिखलाची नक्षी आठवते आणि आपण चिडून त्या गाडीच्या दिशेनं फेकलेले दगड आठवतात. मित्राच्या घरी वाढदिवसाला जाताना, छत्री न घेताच निघाल्यानं पावसानं नवे कोरे कपडे भिजलेले आठवतात. तशाच अवस्थेत तिथं कापलेला केक, नंतर मित्राच्या लक्षात येऊन त्यानं बदलायला दिलेले कपडे... असं सगळं आठवत जातं. न वाळणारे कपडे हा तर एक थोर प्रकार याच काळात घडत असतो. ते कपडे वाळवण्यासाठी घाईघाईत केलेली इस्त्री आणि कधी तरी त्या नादात कपडेच जाळून टाकण्याचे किस्से हे सगळं आठवतं.

लहानपणचा पाऊस आणि तेव्हाच्या आठवणीही अशा निरागसच असतात. मग आपण मोठे होतो. पावसाच्या आणखी गमतीजमती कळू लागतात. आपण वयात येऊ लागतो, तसतशी कविता नावाची एक गोष्ट आपल्या आयुष्यात येऊन दाखल होते. एखाद्या बोअर तासाला किंवा ऑफ तासाला, बाहेर तुफान पाऊस कोसळत असताना वहीच्या मागच्या पानावर कवितेसारख्या कुठल्याही चार ओळी खरडल्या नाहीत, असं क्वचितच कुणी असेल! या कवींचं आणि पावसाचं नातं काय विचारता! अहाहा! यांचं नातंही गमतीशीर, पण प्रेमाचं! मुळात समस्त पावसाळी कवीमंडळींनी पावसाला प्रियकर किंवा प्रेयसीचीच उपमा देऊन त्याला अगदी आपल्यातलाच एक करून टाकलाय. पावसाळा सुरू होण्याची नुसती चर्चा जरी झाली, तरी कवीमंडळींना कविता 'होतात', म्हणे. पण खरंच पाऊस हा सर्जनाचाच ऋतू आहे. आपली सगळी परंपरा कृषीसंस्कृतीची आहे. या कृषीसंस्कृतीत पावसाचं महत्त्व काय, हे सांगायला नकोच. पहिल्या बीजाचं रोपण आणि भरणपोषण व्हायला पहिला पाऊस पडायलाच हवा. शेतीतलं धनधान्य हे समृद्धीचं प्रतीक, तसंच सर्जनाचंही! त्यामुळंच नवं काही उगवून येण्यासाठी पावसाची हजेरी ही हवीच. अगदी मनातल्या भावभावना उमलून येण्यासाठीही आजूबाजूचा निसर्ग अनुकूल असावा लागतो. कडक उन्हात, घामाच्या धारा लागलेल्या असताना प्रेमकविता सुचणं अंमळ कठीणच. याउलट थंडगार वारं सुटलं, जमीन शांतावली, झाडं हलू लागली आणि पाऊस आला, की आपल्या मनातल्या सर्जनालाही सहजीच अंकुर फुटतात. ही अभिव्यक्ती बाहेरच्या कुणाला भले कितीही हास्यास्पद वाटो, आपल्याला ती आनंदच देऊन जाते. जगण्यासाठीचं एक सबळ कारण पुरवून जाते. पावसाबरोबरच आपल्याही आतून काही तरी फुलून येतंय, ही भावना वास्तविक आनंदाचीच. पण आपल्याकडं या अभिव्यक्तीची नीट कदर होत नाही. 
कवी आणि पावसाच्या कविता यांची जेवढी टर उडविली गेली असेल, तेवढी अन्य कशाचीही उडविली गेली असेल, असं मला वाटत नाही. वास्तविक पाऊस पडला, की सगळ्यांनाच छान वाटतं. हे छान वाटणं शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर असतं. उन्हाळ्यातला असह्य दाह कमी झालेला असतो. शरीराची तलखी संपून जाते. मग आपोआप चित्तवृत्तीही फुलून येते. अशा वेळी माणसाला व्यक्त व्हावंसं वाटतं. मग कुणी गाणं म्हणतं, तर कुणी चित्र काढतं, कुणी नाचायला लागतं, तर कुणी वाद्य वाजवतं, कुणी भटकायला जातं, तर कुणी फोटो काढतं... या सगळ्यांत कविता करणं सगळ्यांनाच सोपं वाटतं. 'ट'ला 'ट' जोडला, की झालं. बालकवी किंवा कुसुमाग्रजांसारखी प्रतिभा सगळ्यांकडे कुठून येणार? मग सुमार कवितांचं एक वेगळंच पीक येतं. या कविता पूर्वी खासगी मैफलींत किंवा फार तर वृत्तपत्रांतच पाहायला मिळत. आता सोशल मीडियामुळं प्रत्येकाला आपली ती 'खास' पावसाळी कविता टाकायची संधी मिळाली आहे. मग ती कोण सोडणार? कांदाभज्यांचं आणि या पावसाळी कवितांचं प्रस्थ फारच वाढलं, तशी मग आपोआपच त्यांची टिंगल व्हायला लागली. पावसाळ्यात होणाऱ्या काव्य मैफली म्हणजे तर अचाट प्रकार असतो. तोटी नसलेल्या नळातून अखंड पाणी गळत असावं, तसं या कथित मैफलींतून कवितांमागून कविता गळू लागतात. इयत्ता पाचवी 'ब'मध्ये शिकणाऱ्या एखाद्या वर्षाराणीपासून ते विद्यापीठात पीएचडी सादर करणाऱ्या एखाद्या प्रा. जोशीकाकांपर्यंत सगळ्यांनाच कविता होऊ लागतात आणि त्या ऐकवण्याची खुमखुमीही येते. अशा वेळी 'आलिया भोगासी असावे सादर' म्हणत त्या कविता ऐकणे हा एकच पर्याय उरतो. तिकडं गुलज़ारांनी 'एक अकेली छत्री में जब आधे आधे भीग रहे थे' लिहिलं, की आमच्याकडच्या नवोदित कवीनं 'पावसात जाताना दिसलीस तू, स्वप्नातल्या परीवाणी भिजलीस तू, माझ्याकडं होती एक छत्री, पण त्यात तू येईनास भित्री' वगैरे लिहून त्यावर सूड उगवलाच म्हणून समजा. 'कविता म्हणजे आकाशीची वीज. ती धरू पाहणारे शंभरातील नव्व्याण्णव जण जळून खाक होतात,' वगैरे केशवसुतांनी म्हटलं असलं, तरी पावसात हे नवोदित कवीलोक कवितांपाठोपाठ कविता सादर करून समोरच्या प्रेक्षकांवर विजा कोसळवत असतात. समोरच्या शंभरपैकी नव्व्याण्णव श्रोते त्यात जळून खाक होतात. (जो एक उरतो, तोही शेवटी उठून मंचावर जातो आणि आपली कविता सादर करतो.) पावसाळ्यात माणसाच्या पचनसंस्थेवर एकूणच विपरीत परिणाम होतो. त्यामुळं पावसाळ्यातच आपल्याकडं चातुर्मास पाळतात. वांगी आदी वातुळ पदार्थ खाण्यातून वर्ज्य केले जातात. मात्र, कवीमंडळी बहुदा चातुर्मास पाळत नसावेत. त्यामुळं ते कविता सादर करायला मंचावर आले, की त्यांच्यातली वातप्रकृती जागी होते. ते वेडवाकडे हातवारे करू लागतात. प्रेमळ कविता असेल, तर ठीक; पण कवितेत बंडखोरीची 'वात' पेटलेली असली, तर प्रेक्षकांना वात आलाच म्हणून समजा. हे असलं वातुळ खाऊन, बिघडलेल्या पोटानं केलेली निर्मिती कशी काय सकस वगैरे असेल! 
पावसाळ्यातच अनेक प्राणी, पक्षी व कीटकांचा मीलनाचा काळ येतो. बेडूक आदी मंडळी त्यांच्या उन्हाळी निद्रेतून जागे होऊन मादीसाठी 'डराव डराव'ची आर्त साद घालू लागतात, तशीच काही कवी मंडळी आपल्या उन्हाळी 'हायबरनेशन'मधून जागे होऊन फेसबुकादी 'सायबर नेशन'मध्ये प्रविष्ट होतात आणि प्रेमकवितांचा रतीब घालून, 'जे 1 झालं का?' असं विचारायला कुणी आपल्यासारखीच विव्हल कवयित्री भेटते का, ते बघू लागतात. श्वानजगतातील 'भाद्रपदा'ची ख्याती तर प्रसिद्धच आहे. ते बिचारे प्राणी असल्यानं त्या एकाच महिन्याशी एकनिष्ठ असतात. 'सायबर नेशन'मध्ये बाराही महिने 'भाद्रपद' सुरू असतो. थोडक्यात, प्राणी, पक्षी, कीटक यांच्याप्रमाणेच माणूस या प्राण्याच्याही रोमँटिक वृत्तीला या पाऊसकाळात अगदी बहर येतो. वेगळ्या अर्थानं 'सर्जनशीलते'चा अक्षरशः धुमाकूळ सुरू होतो. अशा वेळी पावसाळ्यात बुंदी पाडावी तशा कविता पाडणाऱ्या कवीमंडळींच्या कवितांमध्ये प्रेमकवितांना पूर यावा, यात नवल नाही. चारोळ्यांपासून ते कथित खंडकाव्यापर्यंत प्रेमाचे नाना आविष्कार कवितेतून बदाबदा कोसळू लागतात. या अशा प्रेमवीरांना पावसाळी पर्यटनाचा किडा चावला, की मग तर काही विचारायलाच नको! पाऊस सुरू झाला रे झाला, की जवळचा एखादा गड, एखादा ओसाड किल्ला, एखादं बारकुडं धरण किंवा कुठल्या तरी शंकराचं डोंगर-दरीत असलेलं देवस्थान गाठायला या प्रेमवीरांची अगदी झुंबड उडते. एखाद्या तळ्यावर शेवाळं साठावं तसे त्या किल्ल्यावर किंवा गडावर या प्रेमीलोकांची गर्दी दिसते. बाइक चालविणाऱ्या, एखाद्या लुकड्यासुकड्या आणि झँगपँग गावठी गॉगल लावणाऱ्या हिरोच्या मागं तशीच कडकी कन्यका बसलेली असते. त्याला तो सलमान आहे असं वाटत असतं आणि तिला कतरिना! अशा या प्रेमवीरांच्या टोळ्याच्या टोळ्या वानरांसारख्या या गडावरून त्या गडावर (किंवा खरं तर या झाडावरून त्या झाडावर) उड्या मारत असतात. प्रेमात पडलेल्यांना कुठलीही भीती अथवा लज्जा नसते, हे जगजाहीर आहे. त्यामुळं ऐतिहासिक वारसास्थळं असलेल्या त्या वास्तूंच्या सान्निध्यात ही मंडळी वेगळाच इतिहास लिहिण्याच्या मागं लागलेली असतात. तरी पूर्वीचे ते वासू आणि सपना आता पुष्कळ कमी झाले. तरी काळ्या दगडी भिंतींवर पांढऱ्या खडूनं बदाम वगैरे काढून त्यात तिरका बाण रेखाटून मध्ये आपलं नाव लिहिणारी दिवटी जमात अजूनही पूर्णपणे संपलेली नाही. कुठल्याही प्रेमवीराला सर्वांत गरजेची गोष्ट कुठली आहे, असं विचारलं, तर तो सांगेल - आडोसा! उडप्याच्या हॉटेलमध्ये गेल्यावर कुठला डोसा पाहिजे, असं विचारल्यानंतर 'आडोसा' असं उत्तर देणारी हीच ती जमात! एकदा हा तो आडोसा नवसानं लाभला, की यांच्या पुढच्या सगळ्या नवसांची तयारी जवळपास तिथंच पूर्ण होते. रंगीत तालीमच म्हणा ना हनीमूनची! अनेकदा तर हा प्रेमालाप एवढ्या थराला जातो, की त्यांना जागं करून सांगावंसं वाटतं, 'मित्रा, अरे, हनीमूनसाठी थोडं शिल्लक ठेव रे... इथंच उरकणारेस का सगळं?' पण मग आपल्याला आपल्या टीनएजमधले दिवस आठवतात आणि 'आपलेच दात आणि आपलेच ओठ' म्हणून आपण गप्प बसतो. 
बाकी पावसाळा आणि प्रेमीजन यांचं हे नातं भारीच आहे. दर शनिवार, रविवारी लोकलला लटकून किंवा बाइकवर स्वार होऊन, लोणावळा गाठणारी अतिउत्साही तरुणाई बघायची. पाऊस पडल्या पडल्या एकदा सिंहगडावर जाऊन तिथली कांदाभजी खाणे आणि दुसरं म्हणजे लोणावळ्यात जाऊन त्या भुशी डॅमच्या पाण्यात उघडंबंब होऊन बसणे या दोन गोष्टी केल्या नाहीत, तर पुण्यातल्या तरुणाईमध्ये तो 'फाउल' धरला जातो. याशिवाय लवासा, मुळशी, हाडशी, ताम्हिणी, वरंध, माळशेज, आंबोली आदी ठिकाणं तर देवानं सह्याद्रीमध्ये खास पावसाळ्यात लोकांना वेडाचार करण्यासाठीच निर्माण केली असावीत, अशी दाट शंका येते. सह्याद्रीतली एकही धबधबा किंवा एकही घळ आता अनाघ्रात राहिली नसेल. प्रत्येक दगडा-दगडावर आमच्या 'दगडू आणि प्राजक्ता'ची प्रेमफुले पडलेलीच असणार. पण बाकी इतर कुठल्याही चाळ्यांपेक्षा धबधबे गाठून, त्याखाली उघडे होऊन भिजणे हा एक खास विशेष सोहळा आहे. पहिल्यांदा जाणाऱ्या हौशी पर्यटकांना हे जमत नाही. त्यासाठी विशेष नैपुण्य प्राप्त करावे लागते. धबधबा पर्यटनाची रेसिपी येणेप्रमाणे - एक तर तुम्ही एकटे-दुकटे जाण्यात अर्थ नसतो. किमान दहा लोकांचा ग्रुप घेऊन जावे. एसयूव्हीचे धूड सोबत नेले तर विशेष प्रभाव पडतो. त्यातही मोठमोठ्याने स्पीकरवर वाह्यात गाणी लावावीत. काचेतून मुंडके बाहेर काढून माकडालाही लाजवतील असे चाळे करावेत. आपण जेथे चाललो आहोत, त्या भागातला सर्वांत मोठा धबधबा निवडावा. तिथं गाडी शक्यतो रस्त्यात मधोमध लावावी. होता होईल तो सगळे कपडे गाडीतच काढून ठेवावे आणि अर्धनग्न अवस्थेत धबधब्याकडे कूच करावे. आपला अवतार बघूनच तिथले साधेसुधे लोक पळून गेले पाहिजेत. एका हातात मद्याची बाटली असेल तर ही दृश्यचौकट विशेष खुलते. नरड्यातून जेवढा शक्य आहे तेवढा किंकाळीसदृश टाहो फोडावा. आयुष्यात प्रथमच पाणी बघितल्यासारखा चेहरा करून, वेगवान हालचाली करून धबधबा गाठावा. मधली धार पकडून डोईवर घ्यावी. शक्य झाल्यास माकडासारख्या उड्या माराव्यात. नंतर आयुष्यात प्रथम अंगाला पाणी लागल्यासारखे सर्वांग घुसळावे. हे करताना किंचाळणे सुरूच ठेवावे. आपल्या या विलोभनीय कृतीने आसमंतातील पक्षी उडून जातील, कीटक दडून बसतील, सरिसृप वर्ग लपून जाईल आणि जलचर पाण्यातल्या पाण्यातच जीव देतील! हे साधलं तरच तुम्ही खरे व्यावसायिक, परिपूर्ण धबधबा पर्यटक! आपल्या राज्यात अशा अनेक व्यावसायिक पर्यटकांनी आपला सगळा सह्याद्री पादाक्रांत करून टाकला आहे. कवी केशवसुत म्हणाले होते, 'जिकडे जावे तिकडे माझी भावंडे दिसताहेत', त्याच चालीवर सह्याद्रीत कुठंही गेलं, की आपली ही महान पर्यटक भावंडे दिसतातच. त्यांना लांबूनच नमस्कार करावा आणि आपल्या वाटेनं चालू पडावं, हेच खरं.
पर्यटनासोबतच पावसात शहरातल्या शहरात आपली गाडी चालवण्याची गंमत अशीच न्यारी. पावसात चारचाकी बाहेर काढणारा हा, पुलंच्या भाषेत सांगायचं, तर आमच्या शहरात भोपळे बांधून पोहणाऱ्याएवढाच बावळट समजला जातो. इथं बाइकच हवी. त्यातही बाइकच्या मागच्या चाकाला मडगार्ड लावलेले असले, तर तो फाउल धरला जातो. जोरदार पावसात मागच्या चाकातून रस्त्यावरचे चिखलयुक्त पाणी मागच्याच्या अंगावर उडवत जाणे हे आमच्याकडे खऱ्या मर्दाचे लक्षण मानले जाते. पावसाळ्यात शक्यतो सिग्नल बंदच ठेवले जातात. उगाच लोकांना पावसात भिजत सिग्नलला उभे राहायला लागू नये, हाच त्यामागचा चांगला विचार असतो. अशा बेधुंद, बेभान वाहतुकीत आपली बाइक तीरासारखी काढत पुढं पुढं नेणं हे विशेषातले विशेष नैपुण्य मानले जाते. या शहरातला पोरगा वयाचे सोळावे वरीस गाठले, की लायसन्स मिळायच्या आधी हे कौशल्य प्राप्त करतोच. पावसाळ्यात नेहमीच्या रस्त्याने बाइक हाकणे हे तसे मागासलेपणाचे लक्षण मानले जाते. शक्यतो रस्त्याच्या डाव्या बाजूच्या फूटपाथवरून गाडी चालवत पुढं पुढं नेणे हेच खऱ्या कर्मयोग्याचे लक्षण होय. वरून धो धो पाऊस सुरू असताना सुपरफास्ट वेगात बाइक पळविणे याला वाघाचे काळीज लागते. आपल्या शहरातील हजारो युवकांनी हे काळीज कष्टाने मिळविले आहे. त्यात ती स्पोर्ट बाइक असेल आणि मागे एखादी कन्या बसली असेल, तर गाडीला विशेष वेग येतो. या गाडीचा पार्श्वभाग शेळीच्या शेपटासारखा असतो. 'धड माशीही वारली जात नाही आणि अब्रूही झाकली जात नाही,' अशी शेळीच्या शेपटाची स्थिती असते. तीच गत या बाइकची असते. उंचच उंच तिरकी चढत गेलेली मागची सीट आणि त्यावर समोरच्या मदनाच्या पाठीवर 'झोकून देऊन' बसलेली त्याची रती हे दृश्य बघून अनेकांना लहानपणी बघितलेली 'विक्रम और वेताल' मालिकाच आठवते. त्यात तो वेताळ त्या विक्रमाच्या पाठीमागे अगदी अस्साच बसलेला असतो. अशी ही भयावह जोडी रस्त्यातल्या प्रत्येकाला मरणभय दाखवीत मार्गक्रमणा करीत पुढे पुढे जात राहते, तेव्हा 'राम राम' म्हणत राहणं एवढंच आपल्या हाती उरतं.
पावसाळा आला, की आजारपण आलंच. ओल्या हवेनं कपडे वाळत नाहीत. घरभर सगळीकडं आतले बाहेरचे कपडे वाळत घातलेले दिसतात. त्या ओल्या वासानं कसंसंच व्हायला लागतं. पण इलाज नसतो. मग जुने कपडे बाहेर येतात. इस्त्र्या फिरवायला सुरुवात होते. ऑफिसची घाईची वेळ, त्यामुळं प्रत्येकाला सकाळी ऑफिसच्या दिशेनं धावत सुटायचं असतं. त्या घाईत आजारपण आलं, तर संपलंच. पण त्याला आपणच जबाबदार असतो, कारण या पावसाळी हवेत पाणीपुरी, भेळ, कांदाभजी, मिसळ असलं अरबट-चरबट खाण्याचा मोह होतोच. पोटाची इच्छा नसताना, जिभेचे लाड पुरवले जातात. मग कधी तरी पोटाचं बंड होतं. लगेच डॉक्टरकडं पळायची वेळ येते. नेमकी पावसाळ्यात सगळ्या डॉक्टरांची क्लिनिकं भरून वाहत असतात. खासगी हॉस्पिटलांमध्येही जागा नसते. सरकारी दवाखान्यांची अवस्था तर काही विचारूच नका. तिथली गर्दी बघून आजारी पडल्याचा पश्चात्ताप झाल्याशिवाय राहत नाही. खरं तर कुठलं तरी साधंसं इन्फेक्शन होतं आणि आपलं नाक पार चोंदून जातं. बाहेरची गर्दी आधीच असह्य झालेली असते, त्यात ही आतली सर्दी! अशा वेळी मग माणूस सर्द न झाला तरच नवल! थोडक्यात निभावलं, तर ठीक; नाही तर हॉस्पिटलात अॅडमिट व्हायची वेळ येते. तिथल्या गमती-जमती आणखी वेगळ्या. पावसाळी हवेत औषधांचा वास मिसळला, तर असह्य असा वास तयार होतो. हा वास नाकात बसला, तर जगणं असह्य होऊन जातं. त्यामुळं शक्य तो आजारी पडू नये, याकडं लक्ष द्यावं. पावसाळ्यात सगळ्यांत आनंदी असतात ते डॉक्टर, असं म्हटलं जातं ते काही खोटं नाही. 'यमज्येष्ठसहोदरा'चं सगळं देणं देऊन झालं, की आपले खिसे पूर्ण रिकामे झालेले असतात, हे नंतर लक्षात येतं.
असा हा पावसाळा... अस्मादिकांना हा ऋतू आवडतो, नाही असं नाही. पण पावसाळा सुरू होताना मन उदास होतं, हेही खरं. याचं कारण शाळा आणि कॉलेजमधल्या दिवसांशी आहे. मोठ्या शहरात पहिल्यांदाच शिकायला आलेल्या मुलांना हा अनुभव आलेला असेल. शहरातली सर्व मोठी कॉलेजे आणि शिक्षण संस्था भक्कम दगडी बांधकामात उभ्या आहेत. तिथं जाताना त्या थंडगार इमारतीचंच दडपण येतं. आपल्या छोट्या घरातल्या भिंती देत असलेली ऊब इथं अजिबातच नसते. उलट त्या दगडी भिंतींचा अजस्र थंडपणा अंगावर येतो. आपण एकटेच असतो. कुठं तरी होस्टेलला नुकताच प्रवेश मिळालेला असतो. गावातले आत्तापर्यंतचे मित्र आता दुरावलेले असतात. इथून पुढचा प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा असतो. सगळंच नवीन असतं. अशाच वातावरणात मान्सूनचा संततधार पाऊस सुरू होतो. होस्टेलच्या दाट झाडी असलेल्या इमारतीभोवती अजूनच अंधारून येतं. अशा वातावरणात वर्गात जावंसं वाटत नाही. गेलो तरी शंभर अनोळखी मुला-मुलींमध्ये एकटं एकटं वाटू लागतं. उंच छताच्या कोपऱ्यात वळचणीला बसलेल्या भिजलेल्या एकांड्या कबुतरात आणि आपल्यात विलक्षण साम्य वाटायला लागतं. लेक्चरमधे लक्ष लागत नाही. मुळात काय शिकवत आहेत, तेच समजत नाही. लेक्चर संपलं, की आपण गुपचूप बाहेर येतो. बाहेर सगळी मुलं हसत-खिदळत कँटीनला जातात. आपल्याला अजूनही कुणी जवळचं मित्र नसतं. होस्टेलच्याच तीन-चार मुलांचा ग्रुप जमतो. आपण बळंच त्यांच्यात सामील होतो. कँटीनला गेलो, तरी त्यांच्या गप्पांमध्ये इंटरेस्ट वाटत नाही. गावची, घराची आठवण येत राहते. बाहेरचं कुंद वातावरण पावसामुळं अजूनच दमट-घामट-कोंदट झालेलं असतं. आपल्याला आतल्या आत गुदमरायला लागतं. आत्ताच्या आत्ता गाडी पकडून गावी निघून जावं, असं वाटू लागतं.
अशा वेळी मग जे भाग्यवान असतात, त्यांना कुणी तरी जिवा-भावाचं माणूस भेटतं. मग ते आयुष्यभर आपल्या लक्षात राहतं. हातात हात गुंफले जातात आणि पावसाळा सुखाचा होतो. पुढचे सगळे पावसाळेही सुखाचे जातात. आयुष्यभर आनंदाच्या सरी कोसळत राहतात. दुर्दैवानं ज्यांना कुणी भेटत नाही, त्यांच्या आयुष्यात पुढंही गावातल्यासारखाच दुष्काळी रखरखाट कायम राहतो. कुठंच कसलीच ओल म्हणून राहत नाही. आपण आतून आतून कोरडे होत जातो. पाऊस असतानाही रडवतो आणि नसतानाही रडवतो, तो असा!
म्हणूनच पावसाळा म्हटलं, या अशा ओल्या आठवणी मनात दाटून येतात. त्यातल्या काही जनांतल्या असतात, तर काही मनातल्या! ज्या जनांतल्या असतात, त्या गमतीदार असतात; पण ज्या मनातल्या असतात, त्या कधी मोरपिशी असतात, तर कधी कडव्या...!! 
तो पाऊस मात्र सर्व काळ सारखाच असतो - अगदी स्वच्छ, निर्मळ अन् पवित्र!!

---

17 Jul 2020

रिव्ह्यू – जानू

हरवलेल्या मोरपिसाची मधुर मोहिनी...
----------------------------------------------


शाळेत असताना प्रेमात पडतोच आपण. तेव्हा कळतच नसतं, की त्या प्रकाराला नक्की काय म्हणायचं? प्रेम असतं का खरंच? की त्या पौगंडावस्थेतलं केवळ शारीरिक आकर्षण? काहीही म्हणा, पण कुणी तरी आवडतं, बस्स... आणि मग बाकी काही सुचतच नाही. हवेवर तरंगणाऱ्या मोरपिसासारखं मन हलकं हलकं होऊन जातं. समोर फक्त ती (किंवा तो) दिसत राहते. अहोरात्र तिचाच विचार मनात येत राहतो. पण मनातलं प्रेम व्यक्त करता येतंच, असं नाही. शंभरातल्या किमान ८० जणांना तरी ते नसेलच करता येत! नकाराची भीती वाटत राहते, विशेषतः मुलांना.... पुढं शाळा संपते. आपापले रस्ते वेगळे होतात. पुढं लग्नं होतात, संसार सुरू होतात. तरी ती सध्या काय करते याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. हल्ली फेसबुक, व्हॉट्सअपसारख्या माध्यमांमुळे जुन्या मित्र-मैत्रिणींना पुन्हा भेटणं सहज शक्य झालंय. शाळांची रियुनियन म्हणजे जुन्या प्रेमांची गॅदरिंगंच झालीयत जणू. तिथं बहुतेकांना आपापलं जुनं प्रेम दिसतं. वस्तुस्थितीचं भान येतं आणि मनातलं मोरपीस मनातच कोमेजून जातं. काही भाग्यवानांचं मात्र प्रेम टिकतं... कायम राहतं. अशा भेटीच्या वेळी मग हृदय दहावीतल्यासारखंच दुप्पट वेगानं धडधडू लागतं. जुन्या आठवणी आषाढातल्या कृष्णघनांसम आवेगानं कोसळू लागतात. मेंदू बधिर होतो. हाता-पायांना कंप सुटतो... ती अशी समोर येते आणि आपण अक्षरशः कोसळतो. नंतर आपल्याला कळतं, की ती परदेशातून आलीय. मोठ्या मुश्किलीनं मुलीला घरी ठेवून तिनं यायचं जमवलंय. पहाटेच्या फ्लाइटनं ती परत जाणार आहे. हातात केवळ काही तास आहेत. तिचा सहवास लाभणार आहे तो तेवढाच काळ... आता या काळातल्या प्रत्येक क्षणावर कादंबरी होऊ शकते, महाकाव्य लिहिलं जाऊ शकतं, कवितांचा पूर येऊ शकतो आणि आठवणींच्या चांदण्यांनी मनाचं आकाश लखलखू शकतं.
सी. प्रेमकुमार दिग्दर्शित 'जानू' या तेलगू चित्रपटाचं कौतुक अशासाठी, की त्यानं या सर्व शक्यता आजमावल्या आहेत. प्रेमाची नवी गाथा सांगितली आहे. खरं तर ती नवी नाहीच, पण तिच्यातली तरलता मात्र नवी भासू शकते. आपल्या आजूबाजूचं सर्व जग आणि एकूणच अभिव्यक्ती व्यवहारी आणि रोकडे हिशेब मोजणारी होत असताना, एवढं नितळ, स्वच्छ काही असू शकतं का, यावरचा आपलाच विश्वास उडण्यासारखी परिस्थिती आहे, म्हणूनही ही तरलता नवी भासू शकते.
खरी गोष्ट अशी आहे, की या कलाकृतीतून आपल्यात पूर्वी असलेली आणि आता कुठे तरी हरवून गेलेली निरागसता आपल्याला अशी जुन्या प्रेयसीसारखी अवचित गवसते. त्या प्रेमातील निरागसता आणि निरागसतेवरचं आपलं प्रेम दोन्ही आत्ताच्या रुक्ष जगात गवसण्याची एक शक्यता ही कलाकृती निर्माण करते आणि म्हणूनच मला तिचं खूप खूप मोल वाटतं. 
चित्रपटाची सुरुवात आणि मध्यंतरापर्यंतचा भाग एरवीच्या शालेय प्रेमपटांसारखाच पुढं सरकतो आणि आपल्याला पुढं काय होणार याचा काहीसा अंदाज येतो. मात्र, चित्रपटाची खरी जान आहे तो याचा उत्तरार्ध. तो फक्त आपल्या नायक-नायिकेचा आणि त्यांच्यातल्या त्या खास क्षणांचा आहे. प्रेम म्हणजे नक्की काय, याचा काहीएक अदमास यातून येऊ शकतो. ज्यांनी कधी तरी एकदा का होईना, असं निस्सीम प्रेम केलंय, त्यांना यातल्या अबोध प्रेमाची तरलता कळू शकेल. नायक-नायिका एकदाही अंगचटीला न येता, शारीर स्पर्शाविना प्रेमाचं एवढं उत्कट दर्शन घडवू शकतात, यावर हल्ली कुणाचाच विश्वास बसायचा नाही. पण जानू असं प्रेम दाखवतो. किंबहुना हा अशक्य वाटणारा प्रेमाचा पैलू फार ठळकपणे दाखवतो आणि त्यातली हवीहवीशी अशक्यता स्वप्नवत सत्यात उतरवून दाखवतो. म्हणूनच भिडतो.
'जानू'चा सगळा प्राण हा त्या दोघांच्या त्या अव्यक्त क्षणांमध्ये आहे. तिला लिफ्ट द्यायची आहे हॉटेलपर्यंत... तिथून पहाटे एअरपोर्टला सोडायचंय.... मधल्या काळात भूतकाळाची सगळी उजळणी होते. कुठं काय चुकलं हे समजत जातं. ती उन्मळून पडते. एक लहानशी चूक निमित्तमात्र झालेली असते. आता काळाची चक्रं उलटी फिरवणं अशक्यच असतं. पण फ्लाइटची वेळ होईपर्यंतचा प्रत्येक क्षण तिला त्याच्यासोबत काढायचा असतो. मग दोघे हॉटेलमधून बाहेर पडतात. तिला त्याला दहावीच्या रूपात पाहायचं असतं. मग सलूनमध्ये जाऊन आधी ती त्याची दाढी करवून घेते. नंतर शहरातल्या सुनसान रस्त्यांवर दोघे भटकत राहतात. प्रत्येक क्षण असोशीनं जपू पाहतात. मेट्रोनं फिरतात. कॅफेमध्ये जातात. तिथं त्याच्या विद्यार्थिनी भेटतात. तिला त्याची पत्नी समजतात. गप्पा मारतात. तीही भूतकाळातली घटना तिला जशी घडायला हवी होती, तशी रचून सांगते. तो ती ऐकताना अस्वस्थ होतो. अखेर त्या मुली जातात. नंतर त्याच्या घरी जातात दोघं. दारातून पाऊल आत टाकताना आवर्जून तो तिला उजवा पाय आधी टाकायला सांगतो. पावसानं भिजलेली ती त्याच्या बाथरूममध्ये जाते. अंघोळीला त्याचाच साबण वापरते. तो संकोचानं तिला टॉवेल व त्याचे शर्ट देऊ पाहतो. ती निश्चिंतपणे त्याचा शर्ट घालते. शर्टचा गंध घेऊन पाहते... तो कॉफी करतो... गॅलरीत दोघं गप्पा मारतात... तिला त्याचं लग्न व्हावं, असं वाटतंय, त्याला मुलं झालेली बघायची आहेत. ती हे सगळं असोशीनं त्याला सांगत राहते... त्याला भूक लागलेली असते. ती त्याच्या स्वयंपाकघरात जाते, खायला करते. तो तिच्यासमोर बसून मांडी घालून बसतो आणि खात राहतो. तिच्यातल्या प्रेयसीतलं हे मातृस्वरूप दर्शन प्रेमाची उच्च प्रत दाखवून जातं. एका टप्प्यानंतर हेच उरतं ना खरं तर... एकमेकांची काळजी, जिव्हाळा, माया.... एवढंच राहतं. शारीर आकर्षणापलीकडं गेलेलं हे प्रेम... अचानक लाइट जातात. तो बॅटरी आणायला धावतो. ती एकदम 'यमुना तटी...' म्हणायला सुरुवात करते. राधाकृष्णाचं हे गाणं... त्यानं शाळेत अनेकदा फर्माइश करूनही तिनं कधीच न म्हटलेलं! आज असं अचानक त्याच्या घरात ती म्हणते. त्यांच्यातल्या उत्कट प्रेमाचा हा सर्वोच्च क्षण असतो... ती शांतपणे त्याच्या बेडवर पडते. श्रमानं तिचा डोळा लागतो. तो खाली जमिनीवर निजतो. पण झोप येत नाहीच. तो पाहत राहतो तिच्या झोपलेल्या निरागस चेहऱ्याकडं... आता काही काही नको असतं. हृदय उचंबळून येतं, मन भरून येतं.... 'क्षण एक पुरे प्रेमाचा', तो हाच...
अखेर तिचा जाण्याचा क्षण येतो. दोघं तिच्या हॉटेलवर येतात. कारनं एअरपोर्टला जायला निघतात. एअरपोर्ट जवळ येतो, तसं तिला जाणवतं, की हे सगळं लवकरच संपणार आहे. तिचा हात नकळतपणे गिअरवर जातो. तो बघतो. तिच्या हातावर हात ठेवून गिअर बदलत राहतो. शेवटी ती न राहवून म्हणते, मला अजून तुझा थोडा वेळ हवाय. मग तो चक्क तिच्या विमानाचं आणखी एक तिकीट स्वत:साठी काढतो. दोघंही आत जातात. मूकपणे एकमेकांची सोबत अनुभवत राहतात. पण शेवटी ताटातुटीचा प्रसंग पुन्हा येतोच. सगळे बांध फुटतात.... ती त्याच्या गळ्यात पडू पाहते. पण सावरते लगेच आणि विमानाकडं धावत सुटते. तो घरी येतो. दहावीनंतर तिनं शाई शिंपडलेला शर्ट आणि आत्ता तिचा ‘विसरलेला’ कुर्ता तो बॅगेत बंद करून ठेवतो. मोरपीस पुन्हा वहीत जातं.... मन एकाच वेळी रिक्तही असतं आणि तृप्तही...
शर्वानंद (राम) आणि जानकी उर्फ जानू (समंथा रुथ प्रभू) या दोघांचा अभिनय केवळ लाजवाब. त्यातही समंथानं साकारलेली जानू केवळ अप्रतिम. अनेक शांत, संथ क्षणांमध्ये अर्थ उतरवण्याचं अवघड काम या दोघांनीही फार उत्कृष्ट पेललंय. 
शाळेत एकदा तरी प्रेम केलेल्यांना नक्की आवडेल असा हा सुंदर चित्रपट चुकवू नका.

----

दर्जा – चार स्टार

-----------------------
 

26 Jun 2020

दृष्टी-श्रुती दिवाळी १९ - लेख - भाग ३


नव्वदचं दशक - 'अस्वस्थ' ते 'आश्वस्त'...
---------------------------------------------

भाग ३
--------

माझं तिसरं आणि (कदाचित शेवटचं मोठं) स्थित्यंतर १९९७ या वर्षानं घडवून आणलं. मी नगर कायमचं सोडलं आणि 'पुणे लोकसत्ता'त रुजू झालो. त्यामागं काही कारणं होती. छोट्या तलावात मी राहू नये, असं माझ्या गुरुजींना वाटत होतं. त्यांचा सल्ला मी ऐकला आणि पुण्यात आलो. तिथं आल्यानंतर दीडच महिन्यात माझी 'सकाळ'मध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून निवड झाली. 'सकाळ'तर्फे तेव्हा रीतसर प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. 'सकाळ'तर्फे ही दीर्घ काळानं केली जात असलेली भरती होती, असंही कळलं. 'सकाळ'शेजारी असलेल्या एच. व्ही. देसाई कॉलेजात आम्हाला शंभर मार्कांचा पेपर देण्यात आला होता व त्या कॉलेजच्या वर्गात बसून तीन तासांत आम्ही तो पेपर सोडवला होता. या परीक्षेला खूप लोक आले होते. त्यात अनेक सीनियर मंडळीही दिसत होती. माझा डिप्लोमा अर्धवट सुटल्यानं मी १९९६ मध्ये नगरला न्यू आर्टस कॉलेजमध्ये असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या केंद्रात बी. ए.च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता. 'सकाळ'च्या परीक्षेत मी पहिला आलो आणि तिथं माझी प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून निवड झाली. एक सप्टेंबर १९९७ रोजी मी 'सकाळ'मध्ये रुजू झालो. माझ्यासोबत श्रीपाद कुलकर्णी, मंदार कुलकर्णी, संजय आवटे, संजीव ओहोळ व सूरश्री चांडक असे पाच जण होते. आम्ही रुजू झालो, त्याच्या आदल्याच दिवशी लेडी डायनाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्याचीच ठळक बातमी अंकात होती. मी पहिल्याच दिवशी 'सकाळ'च्या ग्रंथालयात जाऊन माणूस चंद्रावर उतरला त्या दिवशीचा अंक पाहायला मागितला. तेव्हाचे ग्रंथपाल सुरेश जाधव यांनीही तत्परतेनं मला तो अंक काढून दाखवला होता. 'लोकसत्ता'तले विनायक लिमये यांच्या ओळखीनं भाऊमहाराज बोळात ओक वाड्यात कॉट बेसिसवर मी राहत होतो. तिथून मी अरोरा टॉवर्सला 'लोकसत्ता'च्या ऑफिसात सायकलवर जात असे. आता 'सकाळ'चं ऑफिस एकदमच जवळ आलं. मी तर अनेकदा तुळशीबाग, जोगेश्वरीच्या बोळातून चालत ऑफिसात जात असे. तेव्हाचे सहसंपादक राजीव साबडे यांच्या हाताखाली आमचं प्रशिक्षण सुरू झालं. इथून पुढं मी खऱ्या अर्थानं 'बातमी'शी जोडला गेलो. या दिवसानंतरच्या प्रत्येक मोठ्या घडामोडीचा मला या ना त्या प्रकारे साक्षीदार होता आलं. त्यावर लिहिता आलं. 
सन १९९७ या वर्षी भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. तेव्हा रूमवर राहत असताना मी पहिल्यापासून सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स व टाइम्स ऑफ इंडिया हे चार पेपर रोज घ्यायचो. (ही परंपरा आजही चालू आहे.) त्या वर्षी 'टाइम्स ऑफ इंडिया'नं १५ ऑगस्टला शंभर पानांचा बंपर अंक काढला होता. तो अंक आणि त्यातल्या अत्याधुनिक जाहिराती पाहून माझे डोळे विस्फारले होते. आपल्या आजूबाजूचा भवताल वेगानं बदलत असल्याची त्या जाहिराती ही ठळक खूण होती. दुसरीकडं कुसुमाग्रजांची 'स्वातंत्र्यदेवीची विनवणी' ही कविता आमच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती आणि तीही अफाट लोकप्रिय झाली होती. तेव्हा ही कविता सर्व शासकीय कार्यालयांत लावण्याचं फर्मान तेव्हाच्या राज्य सरकारनं काढल्याचं आठवतं. बाकी 'टाइम्स'च्या जाहिरातींतल्या सगळ्याच गोष्टी आमच्यापर्यंत आल्या नसल्या, तरी महानगरांमध्ये हा बदल घडतोय हे आम्हाला दिसत होतं. याच वर्षी दिल्लीत पहिला मॉल आणि पीव्हीआर हे पहिलं मल्टिप्लेक्स उभारण्यात आलं. पुणंही झपाट्यानं बदलत होतंच. पुण्याची वस्ती आता चहूबाजूंनी वाढत होती. मी १९९७ मध्ये बहुसंख्य ठिकाणी सायकलवरूनच बातमीदारी केल्याचं मला आठवतंय. मात्र, १९९४ ला बालेवाडी स्टेडियम उभं राहिलं आणि कात्रज-देहूरोड बायपासच्या दोन्ही बाजूला तेव्हा वैराण माळरान होतं, ते हळूहळू इमारतींनी व्यापू लागलं. यश चोप्रांच्या 'दिल तो पागल है'नं याच वर्षी आम्हाला 'पागल' करून टाकलं होतं. नायिकांचे कपडे तोकडे होत चालले होते. शहरांमध्ये त्या फॅशनचं प्रतिबिंब आता लगोलग पडलेलं दिसू लागलं होतं. मोबाइलनं सर्व जग व्यापण्यापूर्वी पेजर नावाचा एक प्रकार याच काळात आला आणि धुमकेतूसारखा अंतर्धानही पावला. 'सकाळ'मध्ये नोकरीचे सुरुवातीचे दिवस मी फार एंजॉय केले. मी, मंदार, श्रीपाद आम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीचा कंटाळा नसायचा. आम्ही बॅचलर व रूमवर राहणारे असल्यानं दिवसाचा बराच काळ ऑफिसमध्येच पडीक असायचो. कुठलंही काम करायला आम्ही नाही म्हटलं नाही. गावभर फिरायचो. जवळपास प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम अटेंड केलाच पाहिजे, असं आम्हाला वाटायचं. आम्ही छोट्या शहरांतून आलेली मुलं होतो. आमचं सांस्कृतिक कुपोषण लपलेलं नव्हतं. मग आम्ही पुण्यात आल्यावर या गोष्टी भरभरून लुटायला सुरुवात केली. सवाई गंधर्व, 'बालगंधर्व'ची नाटकं, मंगला किंवा 'प्रभात'चे सिनेमे, एनएफएआयमधले वेगळे सिनेमे यातलं काही आम्ही चुकवलं नाही. 'सकाळ'मध्ये अगदी सुरुवातीलाच 'झलक' हे सांस्कृतिक डायरीचं काम माझ्याकडं आलं. त्यानिमित्तानं शहरातल्या सांस्कृतिक वर्तुळातील बहुसंख्य लोकांची ओळख झाली, ती आजतागायत टिकून आहे. 'सकाळ'चा रुबाब पुण्यात तेव्हा एवढा होता, की 'सकाळ'चा बातमीदार येतोय म्हणून पत्रकार परिषदा थांबलेल्या आहेत. मी स्वतः याचा अनेकदा अनुभव घेतलाय. 'सकाळ' ही आमची 'मास्टर की' होती. 'सकाळ'मधून आलो म्हटल्यावर सगळीकडची कुलपं निघायची. आम्ही याचा चांगल्या अर्थानं भरपूर फायदा करून घेतला. आम्हाला बाकी काहीच नको होतं. आम्हाला फक्त सगळीकडं उपस्थित राहायचं होतं आणि सगळं भरभरून अनुभवायचं होतं. तेव्हाची माझी डायरी आज नुसती वाचली, तरी दमायला होतं. तेव्हा मी प्रत्यक्ष ते सगळं करत होतो. कंटाळा नावाची गोष्टच माहिती नव्हती. पण या भरभरून जगण्याची, सगळ्या चांगल्या गोष्टींचा आस्वाद घेण्याची ही जी सवय लागली, तिचा आयुष्यभर फार मोलाचा उपयोग झाला. पत्रकारिता करीत असताना सर्वांत महत्त्वाचं काय असतं, तर ते कुतूहल. आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टींबाबत लहान मुलासारखं कुतूहल पाहिजे. माझ्या ठायी ते भरपूर होतं आणि त्यामुळंच मला भरपूर बघावंसं वाटायचं, लिहावंसं वाटायचं. तेव्हाचं हे संचित पुष्कळ पुरलं. 
बघता बघता १९९८ उजाडलं. आमच्या ऑफिसमध्ये मार्च महिन्यात आणखी २२ जणांची 'मेगाभरती' झाली. आम्ही लगेच 'सीनियर' झालो. हा सगळा शिकण्याचा काळ होता, जडणघडणीचा काळ होता. ऑफिसमध्ये वरिष्ठ सांगतील ती प्रत्येक गोष्ट आम्ही केली. आजूबाजूचं जग बदलत होतं. लोक सढळ हातानं खर्च करताना दिसत होते. पुणे ते मुंबई एक्स्प्रेस-वे बांधायचं बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. या एक्स्प्रेस-वेच्या कामाचा शुभारंभ याच वर्षात झाला. तेव्हाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी हे काम वेगात पूर्ण करायचं ठरवलं. त्यांनी मुंबईतही ५५ उड्डाणपूल बांधल्यानं लोक त्यांना 'ब्रिज'भूषण गडकरी म्हणायला लागले होते. याच वर्षी केंद्रातलं (देवेगौडा जाऊन आलेलं) गुजराल सरकार कोसळलं आणि पुन्हा निवडणुका झाल्या. या वेळी लोकांनी वाजपेयींच्या बाजूनं झुकतं माप दिलं. तरीही त्यांना माया, ममता व जयललिता या तिघींचा पाठिंबा घ्यावा लागला. मार्च १९९८ मध्ये वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि सोनिया गांधी विजनवासातून बाहेर येऊन प्रथमच काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. तेव्हा 'सकाळ'मध्ये या दोघांविषयीचा माहितीपर लेख लिहिण्याची संधी मला मिळाली. 
एप्रिलमध्ये शारजात सचिन तेंडुलकर नावाचं वादळ आलं आणि त्यानं शेन वॉर्नच्या ऑस्ट्रेलियाचा दोनदा कचरा करून, भारताला अजिंक्यपद मिळवून दिलं. पंचविशीचा हा तरुण आता देशाचा 'यूथ आयकॉन' झाला होता. दोन वर्षांपूर्वीच इंग्लंड दौऱ्यात आणखी दोन हिरे भारतीय संघाला गवसले होते. राहुल द्रविड आणि सौरभ गांगुली... १९९६ च्या वर्ल्ड कप सेमीफायनलला रडणारा भारत आता दिसत नव्हता. उलट सचिनच्या त्या 'डेझर्ट स्टॉर्म' म्हणून नंतर प्रसिद्ध पावलेल्या दोन झंझावाती शतकांनी सगळा माहौलच बदलवून टाकला. याच वर्षात करण जोहर नामक दिग्दर्शकाचा 'कुछ कुछ होता है' हा सिनेमा आला आणि या चित्रपटानं भारतीय चित्रपटसृष्टीतील मनोरंजनाचे सगळे आयामच बदलले. 'कुछ कुछ' तुफान हिट झाला. 'राहुल' आणि 'अंजली' घराघरांत पोचले. याच काळात भारतात पेप्सी आणि कोला या अमेरिकी जायंट शीतपेय कंपन्यांचं 'युद्ध' सुरू झालं होतं. क्रिकेट संघाच्या स्पॉन्सरशिपपासून ते रस्त्यावरच्या बसस्टॉपवरील होर्डिंगपर्यंत सगळीकडं पेप्सी किंवा कोका-कोला दिसायला लागले होते. ही शीतपेयं पिणं म्हणजे 'कूल' असणं असं समस्त तरुणाईला वाटायला लागलं होतं. 'लहर पेप्सी'च्या जाहिरातीत 'आहा' म्हणत रेमो फर्नांडिस आणि जूही चावला नाचू लागले होते. जागतिकीकरण स्वीकारल्याच्या घटनेला आता सात-आठ वर्षं उलटून गेली होती आणि सरकारं बदलली तरी धोरण बदललं नव्हतं. देशाचा सुस्त पहुडलेला हत्ती भांडवलवादी अर्थव्यवस्थेमुळं हळूहळू हालचाल करायला लागला होता. याच वर्षी मे महिन्यात पोखरणमध्ये भारताने पाच अणुचाचण्या केल्या. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या अणुचाचण्यांद्वारे पंतप्रधान वाजपेयींनी जगाला भारताच्या सामर्थ्याची पुन्हा एक चुणूक दाखविली होती.
सन १९९९. या वर्षी एक मार्च रोजी आम्ही 'सकाळ'मध्ये परमनंट झालो. आयुष्याची इतिकर्तव्यता झाली, असं वाटायचा तो काळ होता. दीड वर्ष राबल्यावर आम्ही कायम झालो होतो, त्यामुळं असं वाटणं स्वाभाविक होतं. याच वर्षात मे महिन्यात मी माझ्या बी. ए.च्या तिसऱ्या वर्षाची परीक्षा दिली आणि फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. आता मला आणि मंदारला रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेची पदवी घेण्याचे वेध लागले होते. त्याप्रमाणे आम्ही जूनमध्ये या कोर्सची प्रवेश परीक्षा दिली. तेव्हा आमच्या सुदैवानं अरुण साधू या विभागाचे प्रमुख होते. त्यांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला आणि कोर्ससाठी आमची निवडही केली. या कोर्ससाठी मी दाखल झालो, हा आयुष्यातला आणखी एक महत्त्वाचा टप्पा. वयाची चोविशी आली, तरी माझं शिक्षण सुरूच होतं. पण एकीकडं नोकरी करत असल्यानं हा सगळा प्रवास आता आनंददायी वाटत होता. याच वर्षी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका झाल्या आणि वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. या वेळी मात्र त्यांना जनतेनं बऱ्यापैकी बहुमत दिलं होतं. 'रानडे'मध्ये दिवसा कॉलेज आणि दुपारी ऑफिस अशा धावपळीत हे वर्ष कसं संपलं ते कळलंही नाही. याच वर्षी सुभाष घईंचा 'ताल' प्रदर्शित झाला. राज्यात मनोहर जोशी जाऊन धडाकेबाज नारायण राणे मुख्यमंत्री झाले होते. या सरकारनं मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका जाहीर करायला लावल्या आणि त्यात युतीचा निसटता पराभव झाला. (पुढची पंधरा वर्षं राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्य केलं.) याच वर्षी जूनमध्ये शरद पवार यांनी सोनियांच्या परदेशी मूळ असल्याच्या मुद्द्यावरून स्वतंत्र 'राष्ट्रवादी काँग्रेस' हा पक्ष स्थापन केला. यामुळं राज्यातील राजकारणाचे आयामच बदलले...
...या सगळ्या वेगवान घडामोडी घडत असताना २००० हे वर्ष उजाडलं. नव्वदचं दशक संपलं होतं आणि जग या विसाव्या शतकातील शेवटच्या वर्षात शिरलं होतं. आज मागं वळून पाहताना लक्षात येतं, की आज आपला जो काही भला-बुरा पिंड घडला आहे, तो या नव्वदच्या दशकानं घडवला आहे. 'अस्वस्थ' ते 'आश्वस्त' असा हा प्रवास होता. वयाच्या चौदा वर्षांसारख्या अत्यंत अस्वस्थ, अस्थिर वयापासून ते चोविसाव्या वर्षापर्यंत, थोडक्यात आयुष्याला स्थैर्य देण्यापर्यंतचा हा प्रवास होता. माझ्यासोबत किंवा माझ्या आगे-मागे तीन-चार वर्षं जन्मलेल्या सर्वांनी या काळात असाच प्रवास केला असेल. तपशील निराळे असतील, पण आपला रस्ता हाच होता. साध्या रस्त्यावरून आपण सहापदरी एक्प्रेस-वेवर येऊन दाखल झालो होतो. आता इथं सीटबेल्ट घट्ट बांधायचे होते आणि गाडी सुसाट सोडायची होती... तोही प्रवास भन्नाटच झाला... पण त्याविषयी नंतर केव्हा तरी.. 
तूर्त मला घडविणाऱ्या आणि काही अविस्मरणीय आठवणी देणाऱ्या या दशकाबद्दल केवळ आणि केवळ कृतज्ञता!!!

(समाप्त)

---- 

दृष्टी-श्रुती दिवाळी १९ - लेख - भाग २

नव्वदचं दशक - 'अस्वस्थ' ते 'आश्वस्त'...
----------------------------------------------

भाग २
--------

सन १९९१ उजाडलं आणि आखाती युद्ध सुरू झालं. टीव्हीवर पहिल्यांदाच लाइव्ह युद्ध दिसू लागलं. अमेरिकेची ‘क्रूझ’, ‘स्कड’ ही क्षेपणास्त्रं इराकवर भूमीवर कोसळून, तो देश बेचिराख करत होती. शाळेत शिकवता शिकवता काही जाणते शिक्षक या युद्धाबद्दलही चर्चा करीत होते, अभ्यासासोबत हे युद्धही टीव्हीवर पाहा, असं सांगत होते. या धामधुमीतच दहावीची परीक्षा आली. गावातल्या भारी शाळेत परीक्षेचा नंबर आला होता. तेवढा काळ का होईना, अस्मादिकांना त्या भारी शाळेत बसायला मिळालं. तिथल्या सुंदर मुलींकडं बघता आलं, हाच काय तो भाग्ययोग! दहावीची परीक्षा संपली आणि मानेवरचं ‘जू’ उतरल्यासारखं झालं. भूगोलाचा पेपर संपल्यावर मला तातडीनं कोणता तरी सिनेमा पाहायचाच होता. तेव्हा एकही धड सिनेमा गावात लागलेला नव्हता. पण संजय दत्तचा 'फतेह' नावाचा टुकार सिनेमा पाहून आम्ही परीक्षा संपल्याचं सेलिब्रेशन केलं. सुट्टी मजेत गेली. निकाल लागला. बरे मार्क होते. ८५ टक्क्यांहून अधिक मार्क पडलेल्यांनी इंजीनिअरिंगला जायचं हा अलिखित दंडक होता. मी पण सोलापूर, औरंगाबाद आणि पुण्याच्या गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये अर्ज टाकून ठेवले होते. पण माझा चॉइस पक्का होता - पुणे! पुण्याशिवाय दुसरं शहर मी निवडणं शक्यच नव्हतं. 
माझ्या आयुष्यातलं दुसरं आणि फार महत्त्वाचं स्थलांतर घडून आलं ते जुलै १९९१ मध्ये. मी पुण्याच्या 'जीपीपी'मध्ये होस्टेलवर राहायला आलो. विशेष म्हणजे तेव्हा सत्तेवर आलेल्या पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी काम केलेल्या डॉ. मनमोहनसिंग नावाच्या नव्या अर्थमंत्र्यांनी देशाचं नशीब बदलवणारा अर्थसंकल्प याच जुलैमध्ये सादर केला होता. अर्थात तेव्हा आम्हाला त्याचं महत्त्व समजणं शक्यच नव्हतं. आम्ही आमच्या रूमवर नवी गादी, नवी बादली, नवे कपडे आणण्यात मग्न झालो होतो. थोड्याच काळात भारतात 'झी' ही पहिली खासगी दूरचित्रवाहिनी सुरू झाली. मी कॉलेज लाइफ एंजॉय करण्याच्या मूडमध्ये नव्हतो. इंजिनीअरिंग काहीही समजत नव्हतं. दहावीपर्यंतची हुशारी कुठे गेली होती, देव जाणे! शहरातल्या मुला-मुलींचा स्मार्टनेस पाहून मी दचकलो होतो, विझलो होतो; आत आत संपत चाललो होतो. नगर आणि पुण्यात जमीन-अस्मानाचा फरक होता. आमची शाळा गरिबांची होती. इथं कॉलेजच्या इमारतीपासून ते शिक्षक-शिक्षिकांपर्यंत सगळंच लई भारी! पहिलं वर्ष कॉमनच असतं. पण मला वर्कशॉपमध्ये जाऊन जॉब करायला आवडायचं. मुलींना आयते जॉब करून देणारी पोरं इथंच पाहिली. मात्र, इंजीनिअरिंगच्या संपूर्ण तीन वर्षांत एकदाही, एकाही मुलीला 'चहा घ्यायला येतेस का?' असं विचारायचाही धीर झाला नाही. तेव्हा एक रुपयाला वडा-पाव आणि एक रुपयाला फुल चहा मिळायचा. घरून पाचशे रुपये मिळायचे. मेसचे २७० रुपये भरून उरलेल्या २३० रुपयांत महिना आरामात निघायचा. मिनी ड्राफ्टर, सायंटिफिक कॅल्क्युलेटर वगैरे खरेदी असली, की जास्त पैसे लागायचे, पण ती सगळी खरेदी आधीच झाली होती. तोवर कॉलेजमध्ये होस्टेलची मुलं आणि 'सिटी'तली मुलं असे गट पडलेच होते. स्लीव्हलेस ब्लाउज घालून वर्गावर येणाऱ्या हाय-फाय मॅडम बघून शिकण्यातलं उरलंसुरलं लक्षही पार कापरासारखं उडून गेलं होतं. त्याच मॅडम अचानक समोर आल्या, तर मात्र अंगाला कापरं भरत होतं. फिजिक्सचे सर मात्र आवडायचे. ते म्हणायचे, नुसती अभ्यासाची पुस्तकं वाचू नका; बाहेर फिरा, जग बघा, सिनेमे बघा... मी त्या सरांचा सल्ला तंतोतंत अमलात आणला.
राहुल - ७० एमएम! तेव्हाचं पुण्यातलं सगळ्यांत भारी थिएटर होतं राहुल! आमच्या पॉलिटेक्निकपासून सायकलनी दहा मिनिटांच्या अंतरावर! गणेशखिंड रस्त्यावर सगळा उतारच होता. एक पायडल मारलं, की थेट 'राहुल'पाशी सायकल थांबायची. तिथं सगळे इंग्रजी सिनेमे लागायचे. पण आम्ही १६-१७ वर्षांची मुलं लहान दिसायचो. कधी आत सोडायचे, तर कधी नाही! एकदा 'टू मून जंक्शन'ला बसायला मिळालं. पहिल्याच दृश्यात बाथरूममधली विवस्त्र नायिका दिसली आणि कानशिलं तापली. माझ्या आयुष्यात मी प्रथमच पडद्यावर नग्न स्त्री पाहिली होती. त्यामुळं माझ्या आयुष्यात या थिएटरचं स्थान किती महत्त्वाचं होतं, हे सांगायला नकोच. अर्थात आम्ही फक्त 'राहुल'ला इंग्रजी सिनेमे बघत होतो, असं नाही. अगदी ट्रिपल सीट सायकलवरून 'प्रभात'ला जाऊन सोळाव्या आठवड्यातही जोरात सुरू असलेला 'माहेरची साडी' पण बघितलाच होता. एक रूम-पार्टनर घरी येताना भलताच भावूक झाला होता. पण हे असे क्षण तसे कमीच. बाकी होस्टेली आयुष्य म्हणजे भर दुपारचं वाळवंटातून चालणं होतं. त्याच वर्षी नानाचा 'प्रहार' प्रदर्शित झाला. या सिनेमात नाना लष्करातून सिव्हील लोकांमध्ये येतो, तेव्हा प्रत्येक वेळी त्याच्या अंगाचा तिळपापड होऊन तो लोकांना मारत सुटतो. तेव्हा आजूबाजूला सगळं असंच चित्र होतं. समाजातलं दूषित, घाणेरडं वातावरण बघून आमच्याही डोक्यात तिडीक जात होती. पण या संतापाला वाट करून देण्यासाठी मार्गच नव्हता. असंच १९९१ संपलं आणि १९९२ उजाडलं. माझं अभ्यासात लक्ष नव्हतंच. ऑस्ट्रेलियात क्रिकेट वर्ल्ड कप सुरू झाला होता. आम्ही पोरं पहाटे चार वाजता सुरू होणाऱ्या मॅचेस 'लाइव्ह' पाहायला युनिव्हर्सिटीच्या होस्टेलवर जायचो. तेव्हा नव्यानंच 'स्टार'चं प्रक्षेपण सुरू झालं होतं. ते प्रक्षेपण पाहताना खास वाटत होतं. सचिन तेंडुलकर नावाचा नवा हिरा सहाव्या नंबरवर येऊन चांगली बॅटिंग करत होता. पाकिस्तानला आपण त्या वर्ल्ड कपमध्ये हरवलं. मियाँदादच्या माकडउड्या गाजल्या. बाकी वर्ल्ड कप आपल्याला तथातथाच गेला. माझी अभ्यासात तीच अवस्था होती. वर्गात शिकवलं, त्यापलीकडं काही अभ्यास करण्यात मला रस वाटत नव्हता. होस्टेलवर खाली पडलेले पेपर वाचण्यात मी टाइमपास करत होतो. वह्यांची मागची पानं भरत होती. आमच्या गॅदरिंगमध्ये थर्ड इयरच्या संदीप खरे नावाच्या मुलानं स्वतः पेटी वाजून, स्वतःचीच कविता असलेलं 'मन तळ्यात मळ्यात' हे गाणं गायलं तेव्हा फार मस्त वाटलं होतं. आम्ही फक्त टाळ्या वाजवत होतो. तेव्हा 'नक्षत्रांचे देणे' कॅसेट बाजारात आली होती. आशाताईंची 'तरुण आहे रात्र अजुनी' वगैरे गाणी ऐकून, त्यावर फुलस्केप लेख लिहिण्याइतपत प्रगती झाली होती. परिणामी, पहिल्या वर्षाचा 'निकाल' लागला. अस्मादिक नापास झाले होते. सपशेल लोटांगण! हा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर झालेला भलताच 'प्रहार' होता. 'राजसा, (परीक्षेत असा) निजलास का रे,' असं स्वतःलाच विचारायची वेळ आली होती.
नापास झालो, तरी गावी घरी गेलो नाही. लाज वाटली. मग पुण्यातच राहिलो. आमच्या आत्याचा एक छोटा फ्लॅट होता आळंदी रोडवर. तिथं मुक्काम हलवला. तिथून सायकल चालवत सदाशिव पेठेत सायकलवर भिडे क्लासला यायचं. परत जाताना कसब्यात आत्याकडं जेवायचं आणि संध्याकाळचा डबा घेऊन आळंदी रोडवर जायचं. रात्री त्या रिकाम्या फ्लॅटमध्ये, भकासपणे ती गार पोळी-भाजी खायची. काही दिवसांनी आत्याचा जुना टीव्ही तिथं आला आणि किमान रात्रीचा भयाणपणा गेला. शुक्रवारी रात्री दूरदर्शनवर 'प्रौढांसाठीचे' सिनेमे लागायचे. मी शुक्रवारची रात्र उगवायची आतुरतेने वाट पाहायचो. याच ठिकाणी मी माझी पहिली डायरी लिहिली. (ही डायरी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...) स्वतःशीच लढणाऱ्या मुलाचं ते करुण मनोगत होतं. ती डायरी कित्येक दिवस माझ्याकडं होती. तिथून घरी पत्र पाठवताना मी वर 'येरवडा कारागृह (?)' असं लिहीत असे. थोडक्यात, पुलंची पुस्तकं वाचून तरारलेली विनोदबुद्धी शाबूत होती. तिनंच तर तारलं नंतर कायम! पण हे वाचून घरच्यांना काय वाटत असेल, याचा कधीही विचार मनात आला नाही. पण एकूणच १९९२ हे वर्ष प्रचंड खळबळीचं ठरलं. वैयक्तिक आयुष्यातही आणि देशाच्याही! याच वर्षी सहा डिसेंबरला अयोध्येत बाबरी मशीद पडली. देश कायमस्वरूपी बदलला या घटनेनंतर! तेव्हा हे कळत नव्हतं. फक्त आजूबाजूला सुरू असलेलं हिंसक थैमान तेवढं दिसत होतं. तोवर सलमान, आमीर आणि शाहरुख या तिन्ही खानांची चित्रपटसृष्टीत चलती सुरू झाली होती. लता-आशा अजून गात होत्या; पण अनुराधा पौडवाल, कुमार सानू, अलका याज्ञिक, उदित नारायण हे गायक आणि नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद, जतीन-ललित हे संगीतकार हळूहळू आपलं स्थान निर्माण करत होते. 'आशिकी' हा नव्वदमध्ये आलेला चित्रपट मला दहावीमुळं पाहता आला नव्हता; पण त्याच्या गाण्यांनी सगळ्यांना वेड लावलं होतं. कित्येक दिवस 'चित्रहार'मध्ये 'आशिकी'चं गाणं पहिल्यांदा लागायचं. या सगळ्यांत बापमाणूस म्हणावासा एक संगीतकार १९९२ मध्येच अवतरला. चित्रपट होता - रोजा आणि या अवलिया संगीतकाराचं नाव होतं ए. आर. रेहमान! रेहमानच्या संगीताचा अमीट ठसा या संपूर्ण दशकावर उमटला आहे. पुढचं प्रत्येक वर्ष त्याचा एकेक क्लासिक चित्रपट येत गेला आणि आमची पिढी रेहमानच्या मागे वेडी झाली. 'रोजा'नंतर बॉम्बे, रंगीला, दिल से, ताल, झुबेदा अशा प्रत्येक सिनेमागणीक रेहमान एकेक मास्टरपीस गाणी निर्माण करत होता आणि लता-आशासह भारतातले झाडून सर्व दिग्गज त्याच्याकडे गात होते. 
अशा धाकधुकीतच १९९३ उजाडलं. पु. ल. देशपांडे यांची कथा-पटकथा असलेला शेवटचा चित्रपट 'एक होता विदूषक' एक जानेवारी १९९३ रोजी झळकला. मात्र, दंगलीच्या धामधुमीत तेव्हा तो पाहताच आला नाही. या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीत मुंबईत पुन्हा दंगली झाल्या. मार्चमध्ये या दंगलींचा सूड म्हणून दाऊदनं मुंबईत १२ तारखेच्या शुक्रवारी भीषण बॉम्बस्फोट घडविले आणि मुंबई पहिल्यांदा दहशतवादाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिकार झाली. देशात हळूहळू काही तरी बिघडत चाललंय, याची एक अस्पष्ट जाणीव कुठं तरी मनात रुजत गेली ती याच काळात. याच वर्षी मे महिन्यात पेपर दिले आणि पास झालो. पुन्हा पुण्यात कॉलेज सुरू झालं. त्या वर्षीचा गणेशोत्सव विशेष होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ती शताब्दी होती. तेव्हा बाबूराव सणस मैदानात भव्य मंडप उभारून, महिनाभर सलग रोज कार्यक्रम ठेवण्यात आले होते. मी रोज तिथं जायचो. बाबामहाराज सातारकरांचं कीर्तन असायचं. रात्री गाण्याचे कार्यक्रम असायचे. त्यातच पं. हृदयनाथ मंगेशकरांचा 'अमृताचा घनु' कार्यक्रम ऐकला. आशा भोसले आणि लतादीदींना 'लाइव्ह' ऐकलं प्रथमच! पण हा आनंद काही काळच टिकला. त्याच वर्षी गणपतीत अनंत चतुर्दशीच्या दिवशी, ३० सप्टेंबरला लातूरमध्ये किल्लारीला महाभयंकर भूकंप झाला आणि हजारो लोक ठार झाले. त्या दिवशी पहाटे मी आत्याच्या घरी झोपलो होतो. हा भूकंप मी स्पष्टपणे अनुभवला. तोवर मला भूकंपाचा अनुभव नव्हता. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेलो. दुपारी 'संध्यानंद' आला आणि त्यात बातमी वाचली, तेव्हा कळलं. भूकंपाच्या भयावह कहाण्या आणि पुनर्वसनाचे प्रयत्न याबाबतच्या बातम्या पुढचे कित्येक दिवस पेपरांमधून येत होत्या. माझं कॉलेजमधलं दुसरं वर्ष पहिल्या वर्षाहून भीषण निघालं. फक्त या वेळी काही नवे मित्र मिळाले. ते मैत्र बरेच काळ टिकलं. मला सगळं इंजीनिअरिंग अवघड जात होतं, हे तर उघडच होतं. मला घासून अभ्यास कसा करतात, हे माहिती नव्हतं. मी टीपी करत बसायचो. बाकी मुलं गुपचूप अभ्यास करायची. शेवटी गावाकडच्या एका मित्रानं बाहेर नेलं. चतुःश्रुंगीच्या पायथ्याशी एका बाकड्यावर बसवून भलं-मोठं लेक्चर दिलं. पण काहीही परिणाम झाला नाही. 
बघता बघता १९९४ उजाडलं. उजाडलं तीच एक दुःखद बातमी घेऊन! माझी आजी (वडिलांची आई) गेली. आजोबा पाच वर्षांपूर्वीच गेले होते. आता आजीही गेली. गावाकडचे सगळ्यांत घट्ट बंध एका फटक्यात तुटल्यासारखे झाले. मन सैरभैर होऊन गेलं. दोनच दिवसांनी, चार जानेवारीला 'पंचमदा' अर्थात, आर. डी. बर्मन गेले. अर्थात त्यांच्या मृत्यूमुळं झालेला तोटा कळण्याचं ते वय नव्हतं. पुढं त्याच वर्षी आलेल्या त्यांच्या शेवटच्या '१९४२ - ए लव्ह स्टोरी'तील गाण्यांनी आणि विशेषतः मनीषानं आम्हाला वेड लावलं होतं. 'कुछ ना कहो' गाण्यातला मनीषा-अनिल कपूरचा हळुवार, पण तरीही तप्त रोमान्स बघून डोकं झिणझिणलं होतं. मग हळूच हिंदीत ज्याला 'दबे पाँव' म्हणतात, तशी परीक्षा आली आणि पुन्हा माझा त्रिफळा उडवून गेली. सलग दुसऱ्या वर्षीही नापास! आता काही खरं नव्हतं. गुपचूप घरची वाट धरण्याशिवाय पर्याय नव्हता. पुढचे तीन-चार महिने कसे गेले, मला काहीही आठवत नाही. एकच आठवतं, परीक्षेचा निकाल लागल्यानंतर माझ्या रूम पार्टनरनं त्याच्या गावाकडं गळफास लावून आत्महत्या केली होती. वर्षभर एकाच खोलीत राहणारे आम्ही, पण त्याच्या अंतिम दर्शनाला जाऊ शकलो नाही. आतून पूर्ण कोलमडून गेलो होतो. कसा अभ्यास केला, कशी परीक्षा दिली काहीही आठवत नाही. पण या वर्षातला नोव्हेंबर माझ्या आयुष्यातला 'टर्निंग पॉइंट' घेऊनच उगवणार होता. तेव्हा नगरला एक मे १९९४ रोजी धुमधडाक्यात 'लोकसत्ता' सुरू झाला होता. मुंबईचा मोठा ब्रँड असलेल्या या वृत्तपत्रानं नगरमध्ये 'नगरच्या मातीचा, महानगरांच्या धर्तीचा' म्हणत आपली जंगी आवृत्ती सुरू केल्याचं नगरकरांना फार अप्रूप वाटत होतं. सगळे जण फक्त 'लोकसत्ता' वाचत होते तेव्हा नगरमध्ये! माझ्या इंजिनीअरिंगच्या शिक्षणाचं भवितव्य मला स्पष्ट दिसत होतं. अशातच एक दिवस 'लोकसत्ता'त 'मुद्रितशोधक पाहिजेत' अशी जाहिरात वाचली आणि 'मुद्रितशोधक' म्हणजे काय, त्याचं काम काय असतं, वगैरे काहीही माहिती नसताना अर्ज ठोकून दिला. नाही तरी पुढच्या वर्षी कॉलेज सुरू होईपर्यंत घरी बसून काय करायचं, हा प्रश्न होताच. काही दिवसांनी मला काहीच उत्तर आलेलं नाही, बघून मी स्वतःच 'लोकसत्ता'च्या कार्यालयात गेलो. मी गेल्यावर त्यांनी माझा अर्ज पुन्हा बाहेर काढला. तिथल्या तिथं मला एक बातमी तपासायला दिली. मला प्रूफरीडिंग कसं करतात हे माहिती नव्हतं. पण चुकीचे शब्द कोणते, वाक्यरचना कशी हवी हे कळत होतं. माझा पेपर तपासल्यानंतर त्यांनी तिथल्या तिथं माझा इंटरव्ह्यू घेतला आणि 'उद्यापासून ये' असं सांगितलं. माझा आनंद गगनात मावेना. चार वर्षं सगळीकडून रिजेक्शनच झेलल्यानंतर कुणी तरी मला स्वीकारलं होतं. मला काही तरी येतंय, मी आयुष्यात काही तरी करू शकतो, हा फार मोठा दिलासा आणि विश्वास त्या दहा मिनिटांच्या इंटरव्ह्यूनं मला दिला. मी 'लोकसत्ता'त रीतसर प्रूफरीडर म्हणून नोकरीला लागलो. मला एक हजार रुपये पगार मिळायला लागला. मी सायकलवरून सात किलोमीटर अंतरावरील ऑफिसला जायचो आणि रात्री बाराच्या सुमारास परत यायचो. माझ्या आयुष्यातला हा महत्त्वाचा टप्पा होता. आपण काय करू शकतो, याचा अंदाज मला इथं आला. 'लोकसत्ता'तले सतीश कुलकर्णी माझे फ्रेंड-फिलॉसॉफर-गाइड होते. त्यांनी माझ्या भरकटलेल्या आयुष्याला दिशा दिली. 'लोकसत्ता'तले ते सात-आठ महिने माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचे ठरले. 
मी तेव्हा नुकतीच १९ वर्षं पूर्ण केली होती. याच वर्षी सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या राय अनुक्रमे 'मिस युनिव्हर्स' आणि 'मिस वर्ल्ड' झाल्या होत्या. (यातली सुश्मिता मला इतकी आवडली, की तिच्याशीच लग्न करण्याचा निश्चय मी करून टाकला. तो बरेच दिवस टिकला होता.)
अशातच १९९५ हे वर्ष उजाडलं आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री होते. सोनईला त्यांची पहिली सभा झाली. त्याची एक जनरल बातमी तिथल्या बातमीदारानं पाठविली होती. मात्र, त्यातलं एक वाक्य - 'जोशी, महाजनांच्या हाती सत्ता देणार का?' आमच्या वरिष्ठांनी अचूक हेरलं. त्याचीच हेडलाइन झाली आणि ती 'लोकसत्ता'च्या सर्व आवृत्त्यांत छापून आली. मी हे सर्व बघत होतो. पुढं महाराष्ट्राची निवडणूक फिरली आणि 'जोशी-महाजनां'चीच सत्ता आली. त्यात या बातमीचा फार मोठा वाटा होता, असं मला अजूनही वाटतं. दरम्यान माझा सेकंड इयरचा निकाल लागला आणि मी पास झालो. 'लोकसत्ता'त आधीच सांगितल्याप्रमाणे मी काम सोडलं आणि थर्ड इयरसाठी पुन्हा पुण्यात येऊन दाखल झालो. त्या गणपतीत 'गणपती दूध पीत असल्या'ची जोरदार अफवा सगळीकडं पसरली. आजच्यासारखा सोशल मीडिया नसतानाही अत्यंत वेगानं ही अफवा सगळीकडं पसरली होती. तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी, त्यांच्या घरचा गणपतीही दूध पीत असल्याचं सांगून, टीकाकारांच्या हाती आयतं कोलीत दिलं. दिवाळीच्या आधी आमच्या टेस्ट होत्या. मशिन डिझाइनचा पेपर होता. माझा अभ्यास अजिबात झाला नव्हता. बाहेर कुंद पावसाळी वातावरण होतं. सगळीकडं एक ओलसर उदासपणा दाटला होता. मला रूममध्ये बसून प्रचंड ढवळून यायला लागलं. आपण हे काय करतोय, असं सारखं वाटायला लागलं. हे संपूर्ण वर्ष आपल्याकडून इथं निघणं अशक्य आहे, याची जाणीव झाली आणि मी एक निर्णय घेतला. माझा बाडबिस्तरा गुंडाळून, रूममधलं सगळं सामान घेऊन मी रिक्षा केली आणि तडक शिवाजीनगरला येऊन नगरची बस पकडली. मी इंजिनीअरिंग सोडलं ते कायमचं! त्या दिवसापासून आजतागायत मी 'जीपीपी'मध्ये पुन्हा पाय ठेवलेला नाही. सेकंड इयरला असताना 'मेकॅनिकल'ला मी मिळवून दिलेलं क्विझ काँपिटिशनचं विजेतेपद आणि 'दमां'च्या हस्ते गॅदरिंगमध्ये मिळालेलं त्याचं बक्षीस एवढा एकच चांगला क्षण माझ्या आठवणीत या कॉलेजबाबत राहिला.
नगरला परत आलो आणि पुन्हा 'लोकसत्ता'त जाऊन उभा राहिलो. तुमच्या भरवशावर सगळं सोडून आलोय, असं सांगितलं आणि पुन्हा नोकरीवर घ्या, म्हणालो. त्यांनी पण लगेच मला कामावर घेतलं. पगारही पाचशे रुपयांनी वाढला. आजूबाजूचं वातावरण हळूहळू बदलताना दिसत होतं. हर्षद मेहताचा गैरव्यवहार घडून गेला होता. सूटकेसमध्ये कोटी रुपये कसे बसू शकतात, यावर जसपाल भट्टी टीव्हीवर त्यांच्या 'शो'मध्ये धमाल कॉमेडी करत होते. (हा माणूस माझ्या आयुष्यात पुढं फार महत्त्वाची भूमिका बजावणार होता, हे तेव्हा ठाऊक नव्हतं.) १९९५ च्या १५ ऑगस्टला तेव्हाचे दूरसंचारमंत्री सुखराम यांनी बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांना दिल्ली ते कोलकता असा मोबाइल कॉल केला आणि भारतात मोबाइलचं युग अवतरलं. तेव्हा बिर्ला एटी अँड टीच्या कृष्णधवल पूर्ण पान जाहिराती पेपरांमध्ये झळकलेल्या आठवतात. पोलिसांच्या वायरलेस सेटसारखे दिसणारे मोठ्या आकाराचे मोबाइल काही जणांकडे दिसू लागले. आउटगोइंगला २४ रुपये मिनिट आणि इनकमिंगला १६ रुपये मिनिट हा दरही चांगलाच लक्षात आहे. यातूनच 'जुगाडू' भारतीयांनी 'मिस कॉल' नावाच्या अद्भुत प्रकाराचा शोध लावला. मला विशीबरोबर मिशी फुटली होती, पण ती राखावी असं कधीच वाटलं नाही. होस्टेलवर मित्रानं दाढी करायला शिकवलं होतं. वडील 'गोदरेज'चा गोल डबीतला साबण आणि 'टोपाझ'चं ब्लेड घेऊन दाढी करताना पाहिले होते. मी मात्र पहिल्यापासून 'यूज अँड थ्रो' रेझरनं दाढी करायला लागलो. भारीतलं शेव्हिंग क्रीम आणि आफ्टरशेव्ह लोशन माझ्याकडं होतं. वडिलांप्रमाणे तुरटी वगैरे कधी मी फिरवली नाही. हे बदल तेव्हा जाणवत नव्हते, पण आजूबाजूचा भवताल असा सूक्ष्मपणे बदलत होता. रामगोपाल वर्माच्या 'रंगीला'त रेहमानच्या तालावर थिरकणाऱ्या अल्पवस्त्रांकित ऊर्मिलाला बघून आम्हाला 'आँ!' असं झालं होतं. याच वर्षी दिवाळीत 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' झळकला आणि हे बदल अधिक लखलखीतपणे दृग्गोचर होत गेले. भारतातल्या तमाम मुलींना यातला 'जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी' हा संदेश मनापासून भिडला, पटला!
अशातच १९९६ उजाडलं. मी 'लोकसत्ता'त काम करतच होतो. मला आता 'कॉलेज पोर्च' नावाचं सदर लिहायची संधीही मिळाली होती. मी वेगवेगळ्या कॉलेजांत जाऊन तिथल्या कार्यक्रमांचं वार्तांकन करीत असे. जेव्हा असं काही नसे, तेव्हा मी वेगवेगळ्या विषयांवर ललित लेखन करत असे. या लेखनानं मला आपण लिहू शकतो आणि ते पेपरमध्ये प्रसिद्ध होऊन हजारो वाचकांपर्यंत पोचू शकतं, त्यांना ते आवडू शकतं, हा आत्मविश्वास दिला. तेव्हा आम्ही नगरमधले सगळे पत्रकार सकाळी वाडिया पार्कला क्रिकेट खेळायला जायचो. जानेवारीत नगरला क्रॉम्प्टन करंडक ही मोठी क्रिकेट स्पर्धा भरायची. महाराष्ट्रातले मोठमोठे क्लब यात भाग घ्यायचे. एकदा रोहन गावसकरला जवळून बघण्याची संधी तेव्हा मिळाली होती. एकदा झहीर खान नावाचा श्रीरामपूरचा एक डावखुरा मुलगा फार भारी फास्ट बोलिंग करतो, असं ऐकलं. वाडिया पार्कच्या वरच्या डेकवर बसून मी त्या मुलाची गोलंदाजी पाहिलीसुद्धा होती. याच वर्षी बहिणीचा एमपीएससीचा अर्ज नेऊन देण्याच्या निमित्तानं मला आयुष्यात प्रथमच मुंबईला जाण्याची संधी मिळाली. मी वयाच्या एकविसाव्या वर्षी प्रथम या महानगरीत पाऊल ठेवलं. पॉलिटेक्निकच्या होस्टेलवर असताना एका मित्रानं मला मुंबईचा भलामोठा नकाशा दिला होता. तो नकाशा मी अगदी पाठ करून ठेवला होता. त्यामुळं एकटाच पहिल्यांदा मुंबईत गेलो तरी कुणाला न विचारता, मी बेस्ट, लोकल अशी सगळी सार्वजनिक वाहतुकीची साधनं वापरून मुंबई दिवसभर पालथी घातली. संध्याकाळी दादरला शिवाजी मंदिरला जाऊन साक्षात प्रभाकर पणशीकरांचं 'तो मी नव्हेच' नाटकही पाहिलं. तेव्हा त्याचं तिकीट होतं २० रुपये. (पुढं पाचच वर्षांनी मला पंतांचा एक पूर्ण दिवस सहवास लाभणार आहे आणि त्यांची मुलाखतही घेता येणार आहे, हे तेव्हा गावीही नव्हतं.) मुंबईला माझं जाणं म्हणजे एक प्रकारे विहीर, मोठा तलाव, सरोवर झाल्यानंतर थेट महासागराचं दर्शन घेण्यासारखं होतं. मुंबईच्या दर्शनानं मी स्तिमित होऊन गेलो. मला त्या भव्य शहरानं प्रथमदर्शनीच प्रेमात पाडलं आणि ते प्रेम अजूनही कायम आहे. मुंबईत जाऊन राहावं, तिथं काम करावं अशी तेव्हा प्रचंड इच्छा झाली होती. मात्र, तो योग अजूनपर्यंत तरी काही आलेला नाही. असो.
१९९७. नगरमध्ये सत्तरावं साहित्य संमेलन भरलं होतं. या संमेलनाच्या तुतारीनंच १९९७ हे वर्ष उजाडलं. नगरच्या संमेलनामुळं मी आयुष्यात प्रथमच साहित्य संमेलन बघितलं. या प्रकाराशी पुढं आपली कायमची नाळ जोडली जाणार आहे, हे तेव्हा अर्थातच माहिती नव्हतं. नगरचं संमेलन प्रचंड गर्दीमुळं गाजलं. ग्रंथदिंडीत भेटलेले विंदा बघून भारावून जायला झालं. गिरीश कार्नाडांचं दमदार उद्घाटनाचं भाषण जोरात गाजलं. 'लोकसत्ता'त आम्ही या संमेलनाचं जोरदार वार्तांकन करीत होतो. पुण्याहूनही ज्येष्ठ-श्रेष्ठ लोक आले होते. त्यांच्या कॉप्या (बातमी) वाचायची, त्यांचं प्रूफरीडिंग करण्याची संधी मला मिळाली. एखाद-दुसऱ्या कार्यक्रमाचं वार्तांकनही मी केल्याचं आठवतंय. शेवटच्या दिवशी साक्षात गुलजारांच्या उपस्थितीत हृदयनाथ मंगेशकरांनी पहाटेपर्यंत रंगविलेली 'भावसरगम'ची मैफल अजूनही लक्षात आहे. या वर्षात आजूबाजूची परिस्थिती झपाट्यानं बदलताना दिसत होती. नरसिंह रावांचं सरकार गेलं होतं आणि वाजपेयींच्या १३ दिवसांच्या सरकारच्या नाट्यानंतर आलेले देवेगौडा तेव्हा पंतप्रधान होते. केंद्रात अस्थिर वातावरण होतं, पण राज्यात बाळासाहेबांचा 'रिमोट कंट्रोल' जोरात होता. पुलंना महाराष्ट्रभूषण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि १९९६ च्या शेवटी त्यांनी हा पुरस्कार स्वीकारताना केलेली ठोकशाहीवरची टीका यांचं सावट नगरच्या संमेलनावर होतं. कार्नाडांच्या भाषणात त्यांनी यावर 'सैनिकां'ची गोष्ट सांगून फार सूचक भाष्य केलं होतं. आमच्या घरी तेव्हा छोटा पोर्टेबल ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही होता आणि फक्त अँटेनावरून दिसणारं 'दूरदर्शन' हे एकच चॅनेल होतं. तेव्हा नगरच्या लघुप्रक्षेपकाद्वारे नऊ क्रमांकाच्या चॅनेलवरून दूरदर्शन दिसे. पुण्याच्या सिंहगडवरून होणारं प्रक्षेपण पाच क्रमांकाच्या चॅनेलवरून दिसे. दिल्लीचं प्रक्षेपण झालं, की मुंबई दूरदर्शनचं प्रक्षेपण सुरू होत असे व त्याच्या सूचना या थेट पडद्यावरूनच जाहीर दिल्या जात असत. अनेकदा नगरच्या केंद्रातले लोक मुंबई दूरदर्शनवर 'स्विच' करत नसत. त्यामुळं संध्याकाळचे पाच वाजून गेले, तरी आम्हाला दिल्लीचेच कार्यक्रम दिसत. मग अशा वेळी मी वर जाऊन अँटेना पुण्याच्या (सिंहगडच्या) दिशेनं फिरवी व खाली येऊन पाच क्रमांकाचं चॅनेल लावी. ‘सिंहगड’चे लोक कधी चुकत नसत. त्यामुळं थोडं खरखरीत का होईना, पण मुंबई दूरदर्शन व विशेषतः मराठी सिनेमा बघायला मिळे. आम्ही केबल घेतली नसल्यानं त्या काळातल्या 'झी' वगैरेवरील मालिका मला माहिती नसायच्या. पण काही मित्रांच्या बोलण्यात या मालिकांचे उल्लेख यायचे तेव्हा आपण मागासलेले आहोत, असं वाटायचं. मात्र, या वर्षी भारतात झालेला विल्स वर्ल्ड कप पुरेपूर एंजॉय केला. विशेषतः बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आपण पाकिस्तानचा पुन्हा खात्मा केला, तेव्हा देशभर उसळलेला जल्लोष अभूतपूर्व होता. मात्र, उपांत्य फेरीच्या सामन्यात कोलकत्यात आपण माती खाल्ली आणि कांबळी रडला. लोकांनी स्टेडियम पेटवून द्यायचंच बाकी ठेवलं होतं. त्या कटू आठवणी खूप दिवस छळत राहिल्या.
पण १९९७ या वर्षानं माझं तिसरं आणि (कदाचित शेवटचं मोठं) स्थित्यंतर घडवून आणलं...

(क्रमश:) 

दृष्टी-श्रुती दिवाळी १९ - लेख - भाग १

नव्वदचं दशक - 'अस्वस्थ' ते 'आश्वस्त'...
------------------------------------------------

भाग १
--------

नव्वदचं दशक उजाडलं, म्हणजेच १९९० हे वर्ष उजाडलं तेव्हा मी १४ वर्षांचा होतो. नववीत होतो. नगरसारख्या महाराष्ट्रातल्या एका मध्यम मध्यम शहरात राहत होतो. माझ्या आयुष्यातलं सर्वांत मोठं स्थलांतर घडून दोन वर्षं झाली होती. मी माझं जन्मगाव सोडलं होतं आणि कुटुंबासह जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन राहिलो होतो. एका अर्थानं मी छोट्या विहिरीतून तलावात आलो होतो. पुढच्याच वर्षी मी आणखी मोठ्या सरोवरात विहरायला जाणार होतो. माझं वय १४ होतं, म्हणजे मी सर्वार्थानं अंड्यातून बाहेर आलेलं पिल्लू होतो. 'अंगणात गमले मजला संपले बालपण माझे' असं ग्रेस म्हणतात, तसं नगर हे माझं अंगण होतं. जन्मगावातल्या गर्भाशयासारख्या सुरक्षित उबेतून मी एकदम बाहेर आलो होतो. मला बाहेरचं जग सोसेल की नाही, ऊन-वारा सहन होईल की नाही याचा कुठलाही विचार न करता मला एका नैसर्गिक प्रक्रियेचा भाग असल्यासारखं बाहेर भिरकावून देण्यात आलं होतं. माझं गाव, माझं घर, माझी खोली, तिथली माझी झोपायची जागा, तिथलं अंथरूण-पांघरूण, आजीच्या कुशीतली ऊब हे सगळं सगळं ८० किलोमीटरवर सोडून मी एका अनोळखी, शहरी वासाच्या गावात आलो होतो. नगरला शहर म्हणणं कठीण होतं; पण आमचं गाव तेव्हा इतकं छोटं होतं, की मला नगर हे खूप मोठ्ठं शहर वाटत होतं. तिथं शहराचा वास येत होता. आमच्या गावी घराजवळ येणाऱ्या उकिरड्याचा, तिथं लोळणाऱ्या डुकरांचा वास इथं नव्हता. इथं सकाळी सहा वाजता पेपर येत होता. गवळी येऊन दूध घालून जात होता. इथं कॉन्व्हेंट शाळा होत्या आणि मुलं टाय लावून शाळेत जात होती. इथं रिक्षा होत्या, सिटीबस होत्या आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे इथं बेकऱ्या होत्या. इथं पाव मिळत होता. माझ्या गावी तोवर ताजा पाव मिळत नसे. त्यामुळं माझ्या लहानपणच्या आठवणीत शहरी मुलांसारख्या पाव-बिस्किटं या गोष्टीच नव्हत्या. त्या इथं आल्या. पहाटे क्लासला जाताना कुठल्या ना कुठल्या बेकरीतून ताजे खमंग पाव भाजल्याचा वास यायचा आणि आपण शहरात राहतो, या जाणिवेनं माझं मन हरखून जायचं. इथं एकच का होईना, पण बाग होती. आमच्या गावात बाग सोडाच, पण ओळीनं लावलेली तीन फुलझाडं मी कधी पाहिली नाहीत. जी काही होती, ती आमच्या अंगणातच होती. आमच्या आजोबांनी मोठ्या हौसेनं रातराणी, काटेकोरांटी आणि दोन कण्हेरीची झाडं लावली होती. मात्र, त्या झाडांचा डुकरांपासून बचाव करणं हे आमच्यापुढचं सगळ्यांत मोठं आव्हान असायचं. 
नगरमधली सर्वांत भारी शाळा माझ्या नशिबात नव्हती. मला मिळाली ती गरिबांची शाळा. शाळा गरीब मुलांची असली, तरी शिक्षक मनानं व ज्ञानानं अतिशय श्रीमंत होते. एका मंदिराच्या आजूबाजूला, जागा मिळेल तसे आमचे चिमुकले वर्ग बांधलेले होते. याउलट आमची गावची शाळा जास्त नीटनेटकी व भक्कम बांधलेली होती. पण मला या गरिबांच्या शाळेनं जे दिलं, ते एखाद्या भारी बिल्डिंगमधल्या शाळेनंही कधी दिलं नसतं. या शाळेनं मला माणसाकडं माणूस म्हणून पाहायला शिकवलं. सगळ्यांबरोबर समानतेनं वागायला, सहानुभूतीनं-प्रेमानं वागायला शिकवलं. आमच्या वर्गात अनेक मुलं डबा आणत नसत. मी टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा होतो. पोळी, बटाटा किंवा कोबीची भाजी आणि लोणचं असा डबा मी नेत असे. आमच्या मंदिरात बसून मी एका मित्रासोबत तो खात असे. अनेक मुलं तेव्हा डबा न खाता नुसतीच खेळत असत. ती डबा का आणत नसतील, हा विचार तेव्हा कधीच मनाला शिवला नाही. आता विचार करून काळीज तुटतं. पण तेव्हा ती हसतमुख मुलं पाहून मला काहीही उमगलं नाही, हे खरं!
फार लहानपणीच, म्हणजे आठवीत असतानाच घरच्या जबाबदाऱ्या घ्यायची सवय त्या काळानं मला लावली. वडील नोकरीला जायचे आणि उशिरा घरी यायचे. कधी फिरतीवर जायचे. तेव्हा घरचा किराणा भरण्यापासून ते सिलिंडर आणण्यापर्यंतची सगळी कामं आठवीतला तो पोरगा करीत असे. सायकलच्या दोन्ही बाजूला दोन मोठ्या पिशव्या लावून, डुगडुगत हळूवारपणे दोन-तीन किलोमीटर अंतरावरच्या घरी तो सायकल पायी चालवत नेत असे. सिलिंडर आणणे हा एक दिव्य प्रकार असे. त्या लांबलचक रांगेत उभं राहून पावती घ्यायची, मग दुसरीकडं गोडाउन असलेल्या ठिकाणी जुनं सिलिंडर न्यायचं व नवं आणायचं हा एक सोहळा असे. सायकलच्या मधे तिरकं ठेवून ते सिलिंडर आणणं ही एक सर्कस होती. पण आठवीतल्या पोराला त्याचं काही वाटत नसे. त्याच्यासमोर दुसरा पर्यायही नव्हताच म्हणा. कधी ते सिलिंडर दाणकन पडे. तेव्हा त्या गावात काही भली माणसं राहत. त्यातलं कुणी तरी पुढं होऊन ते सिलिंडर पुन्हा पक्कं बसवून देई. शाळेची सहल निघाली, तेव्हा फुलपँट घ्यायचा आग्रह केला एकदा या मुलानं. गावातल्या बड्या दुकानात जाऊन नव्वद रुपयांची फुलपँट आणली मग त्यानं; कारण आईकडं फक्त शंभर रुपयेच होते. 
याचा अर्थ तेव्हाचं जगणं अगदी वाईट, रडूबाई होतं का? तर मुळीच नाही. आज मागं वळून बघताना या गोष्टी जाणवतात, पण तेव्हा त्या मुळीच जाणवत नव्हत्या किंवा त्याचा त्रासही होत नव्हता. पंधराव्या वर्षी वयात येऊ घातलेल्या मुलाचं सगळं जगणं मोरपंखीच असतं. प्रत्येक क्षण स्वप्नाळू असायचा. वास्तवाच्या कडक उन्हावर स्वप्नांच्या ढगांची सावली धरली जायची. आणि हा मुलगा तसा हुशार होता. गावाकडची हुशारी म्हणजे 'वासरात लंगडी गाय शहाणी' असं नव्हतं, हे त्यानं मोठ्या शहरात येऊन सिद्ध केलं. स्काउटमध्ये भाग घेतला, की त्यालाच प्लाटून कमांडर केलं जायचं. त्या वर्षी त्यानं कलेक्टरसमोर ऐटीत संचलन केलं होतं. चित्रकला परीक्षेला बसला आणि तेव्हा दुर्मीळ अशी 'ए' ग्रेड मिळवून दाखविली. विज्ञान प्रदर्शनात भाग घेतला आणि त्याला त्याच्या आयुष्यातली पहिली परी गवसली. ती दुसऱ्या शाळेतून याच्या शाळेत आली होती. ती आजही त्याच्या डोळ्यांसमोर लख्ख उभी आहे. अगदी 'शाळा' कादंबरीच सुरू झाली म्हणा ना नंतर! घरापर्यंत चकरा झाल्या, पण तेवढंच. बोलायची हिंमत नव्हतीच. आणि लगेच दहावी आली...
तापात दोन-तीन दिवस काही सुचू नये आणि एकदम घाम येऊन ताप उतरावा तशी दहावी आयुष्यात आली आणि गेली. त्या काळात कानशिलं तापायची, पण परीक्षेच्या टेन्शननं! स्वप्नाळू अवस्था कुलूपबंद करून कपाटात टाकून दिली. सकाळी लवकर उठायचो आणि क्लासला जायचो. अर्थात एवढं होतं, तरी सतत अभ्यास, अभ्यास केलं नाही, हेही खरं. आजूबाजूला काय काय घडत होतं! मंडल प्रकरणावरून देश तापला होता. व्ही. पी. सिंहांचं सरकार कोसळलं होतं आणि चंद्रशेखर पंतप्रधान झाले होते. आदल्याच वर्षी पं. नेहरूंची जन्मशताब्दी साजरी झाली होती आणि देशभर 'अपना उत्सव'मध्ये आम्ही नाचत होतो. टीव्हीवर बी. आर. चोप्रांचं 'महाभारत' सुरू होतं आणि बाहेर लालकृष्ण अडवाणींचं 'रामायण'! अडवाणींच्या अजेय वाटणाऱ्या रथयात्रेचा अश्वमेध बिहारमध्ये लालूप्रसादांनी अडविला होता आणि त्यांना अटकही केली होती. आमची दहावीची सहामाही संपली आणि लवकरच ऐतिहासिक असं १९९१ हे वर्ष उजाडलं. या वर्षाचं आपल्या देशाच्या आणि वैयक्तिक माझ्याही आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. देशाच्या आयुष्यात विसाव्या शतकातलं १९४७ व १९७७ नंतरचं तिसरं आणि महत्त्वाचं स्थलांतर घडणार होतं आणि माझ्याही आयुष्यातलं दुसरं आणि कदाचित कायमचं असं महत्त्वपूर्ण स्थलांतर घडणार होतं...

(क्रमश:)

---

31 May 2020

संवादसेतू दिवाळी अंक २०१९ लेख

सिनेमा : ‘तेव्हा’चा आणि ‘आता’चा...
-----------------------------------


कुठलीही कलाकृती ही त्या त्या काळाचं अपत्य असते, असं म्हणतात. म्हणजेच एखादी कलाकृती जन्म घेत असताना तिच्या सभोवतीच्या पर्यावरणाचा परिणाम तिच्यावर या ना त्या प्रकारे होतच असतो. हा काळाचा संदर्भ घट्ट असतो. रुढी, रिवाज, परंपरा, चालीरीती, समजुती, संस्कार, पालनपोषण या सगळ्यांचा आपल्यावर आधी एक समाज म्हणून आणि नंतर एक व्यक्ती म्हणून प्रभाव पडलेला असतो. आपल्या समजुतीतून साकारलेली कलाकृतीही त्यामुळं या प्रभावापासून मुक्त राहू शकत नाही. मात्र, काही वेळा काही कलाकृती ‘अजरामर’ आहेत, ‘कालातीत’ आहेत, असंही आपण म्हणतो. याचाच अर्थ, त्या कलाकृतीवर असलेला तात्कालिकतेचा शिक्का दूर करण्यात ती कलाकृती यशस्वी ठरलेली असते. हा तात्कालिकतेचा शिक्का किंवा पगडा दूर करण्यासाठी त्या कलाकृतीत काही तरी कालातीत, शाश्वत विचार असावा लागतो. साधारणत: वर्षानुवर्षे चालत आलेला ‘सत्’ आणि ‘असत्’ यांच्यातील झगडा किंवा मूलभूत मानवी प्रेरणांचा संघर्ष आणि मानवी मूल्यांची जपणूक अशा गोष्टी प्रभावीपणे मांडल्या गेल्या असतील, तर त्या काही प्रमाणात कालातीत ठरू शकतात. मात्र, काळाच्याही पुढचा, क्रांतिकारी विचार देणारी कलाकृती खऱ्या अर्थाने काळावर मात करणारी कलाकृती म्हणावी लागेल. यासाठी त्या कलाकृतीचा निर्माता द्रष्टा असावा लागतो. काळाची पावले ओळखणारा असावा लागतो. याखेरीज काही जणांमध्ये असामान्य गुण असतात. अशा व्यक्ती अनेक शतकांत क्वचित कधी तरी जन्माला येतात. अशा माणसांनी केलेलं कार्य किंवा त्यांनी निर्माण केलेली कोणतीही कलाकृती असामान्यच ठरते. 
या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या शतकाहून अधिक काळ भारतीय जनमानसावर मोहिनी घालणाऱ्या चित्रपट नामक कलाप्रकाराकडे बघायला पाहिजे. आधी दृश्य आणि नंतर दृश्य व श्रुती या दोन्ही माध्यमांतून या यंत्राधिष्ठित कलेनं भारतीय प्रेक्षकांवर गारूड केलं. भारतीय प्रेक्षकांनी फार थोड्या काळात या कलेवर मन:पूत प्रेम केलं; ही कला आत्मसात केली आणि तिच्याद्वारे आपली अभिव्यक्तीही शोधली. भारतीय सिनेमाची प्रगती आणि देशाची त्या त्या वेळची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक स्थिती यांचा मेळ लावता येतो. या प्रवासात काही अजरामर चित्रपट निर्माण झाले. सर्व सूर जुळून आलेल्या सुरेल गाण्याप्रमाणे लोक हे चित्रपट सतत गुणगुणत राहिले. त्यांचे गुण गात राहिले, त्यांच्याविषयी बोलत राहिले. पिढ्या बदलल्या, तरी यात खंड पडला नाही. मात्र, काही चित्रपटांबाबत काळानुरूप आस्वादन बदलू शकते. विशेषत: एका पिढीला आवडलेला चित्रपट पुढच्या पिढीला आवडेलच असं काही नाही. अशा काही चित्रपटांवर नव्या पिढीला लिहितं करण्याचा अभिनव प्रयोग या अंकाच्या संपादकांनी केला आहे. चित्रपट समीक्षेच्या अंगाने तर या प्रयोगाचं महत्त्व आहेच; शिवाय यात काळानुरूप बदललेल्या किंवा न बदललेल्या दृष्टिकोनाचाही अभ्यास करता येतो. त्या दृष्टीने या अंकात सुजाता, प्यासा, दस्तक, छोटी सी बात, अमर अकबर अँथनी, घरोंदा, अर्थ, इजाजत व वजूद या नऊ सिनेमांवर दहा लेख (‘प्यासा’वर दोन लेख) जुई कुलकर्णी, मृदुला बे‌ळ‌े, अदिती जोगळेकर-हर्डीकर, सानिया भालेराव, अतुल कुलकर्णी, विद्या पोळ-जगताप, विभव देशपांडे, नचिकेत खासनीस, पवन जोशी, आदित्य महाजन या नव्या पिढीच्या प्रतिनिधींनी लिहिले आहेत. या चित्रपटांची निवडही या लेखकांनीच केली आहे. हे चित्रपट त्यांना कसे वाटतात याबद्दल त्यांनी मोकळेपणानं लिहिलं आहे. ‘प्यासा’ चित्रपटावर विद्या पोळ-जगताप व अदिती जोगळेकर-हर्डीकर यांनी लिहिलं आहे. अदिती जोगळेकर यांनी ‘प्यासा’च्या दृश्यात्मकतेवर भर देणारा लेख लिहिलाय, तर विद्या पोळ-जगताप यांनी या चित्रपटाच्या आशयाबाबत लिहिलं आहे. ‘सुजाता’ हा चित्रपट जुई कुलकर्णी यांना नायिकेचा ‘को ‌‌ऽ हं ऽ’ प्रश्न वाटतो. नुकत्याच आलेल्या ‘आर्टिकल १५’ या चित्रपटातही हेच वास्तव दिसतं, असं निरीक्षण त्या नोंदवतात. ‘वजूद’ हा नाना पाटेकरच्या नेहमीच्या प्रतिमेपेक्षा वेगळी भूमिका असलेला चित्रपट १९९८ मध्ये आला होता. आज वीस वर्षांनी त्यातली काव्यात्मकता आजच्या पिढीच्या विभव देशपांडेला भावते. ‘घरोंदा’ हा गुलजार यांचा चित्रपट पाहताना आदित्य महाजनला तो केवळ त्या काळाचा चित्रपट वाटत नाही. अलीकडच्या ‘वेक अप सिद’ किंवा ‘डबल सीट’ या मराठी चित्रपटातही त्याला ‘घरोंदा’चे अंश आढळतात. ‘घरोंदा’तली गाणीही नव्या पिढीच्या आदित्यला आकर्षित करतात. तेव्हाच्या आयुष्यात असलेला साधेपणा, संथपणा यांच्याकडे काहीशा अलिप्तपणे पाहताना आदित्यला त्या काळातला हलकाफुलका रोमान्स विशेष भावतो. 
बासू चटर्जींच्या ‘छोटी सी बात’ या हलक्याफुलक्या सिनेमाकडे आजच्या पिढीचा पवन जोशी कौतुकानं पाहतो. तेव्हाच्या शांत, निवांत मुंबईतल्या निरागस प्रेमाचा कॅलिडोस्कोप या चित्रपटातून दिग्दर्शक आपल्याला दाखवतो, तेव्हा आपल्याला त्यातली जी सौंदर्यस्थळं जाणवतात, तीच पवन जोशीलाही भावतात. महेश भट यांचा १९८२ मध्ये आलेला ‘अर्थ’ हा चित्रपट आजच्या पिढीच्या सानिया भालेरावला ‘पाथब्रेकिंग’ चित्रपट वाटतो. मित्र, प्रियकर यांच्यापैकी एक हवा, किंवा दोघंही नकोत हे ठरविण्याचा अधिकार यात बाईला होता, ही गोष्ट सानियाला महत्त्वाची वाटते. तेव्हाच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता, या चित्रपटातील नायिकेचं असं चित्रण ही काळाच्या पुढचीच गोष्ट होती, असं तिला वाटतं. राजेंद्रसिंग बेदींच्या ‘दस्तक’विषयी, त्यातल्या गाण्यांविषयी लिहिताना अतुल कुलकर्णी भारावून जातात. गुलजारांचाच ‘इजाजत’ पाहताना मृदुला बेळेंना शरदबाबूंचा ‘देवदास’ आठवतो. ‘इजाजत’मधील स्त्री-पुरुष संबंधांचे गहिरे रूप उलगडताना पाहणं कुठल्याही पिढीच्या प्रेक्षकांसाठी एक वेगळी जाणीव करून देणारा प्रवास असतो. मनमोहन देसाईंचा ‘एव्हरग्रीन’ असा ‘अमर अकबर अँथनी’ हा चित्रपट पाहताना गेल्या चाळीस वर्षांत किती तरी पिढ्यांना तेवढीच मजा आली. आजच्या पिढीच्या नचिकेत खासनीसचा अनुभवही काही वेगळा नाही. हा सिनेमा त्याचा अगदी फेवरिट आहे. या सिनेमातली सिनेमॅटिक लिबर्टी या शब्दालाही लाजवणारी सिनेमॅटिक लिबर्टी, पटकथा लेखकाची अफाट कल्पनाशक्ती यांना सलाम करीत नचिकेत आजही या चित्रपटाचा निखळ आनंद घेताना दिसतो.
‘जुना सिनेमा’ या सर्वांच्या लेखणीतून व ‘आताच्या चष्म्यातून’ सविस्तर वाचायला मिळणारच आहे. त्यामुळं त्यातल्या तपशिलात फार न जाता, या प्रयोगाविषयी सांगायला हवं. या प्रयोगात लेखकांनी निवडलेले चित्रपट १९५७ ते १९९८ या चार दशकांतले आहेत. गुरुदत्तचा ‘प्यासा’ ते एन. चंद्राचा ‘वजूद’ अशी ही दोन टोकं आहेत. यातले बहुतेक सिनेमे माइलस्टोन म्हणूनच गणले गेले आहेत. त्यामुळं मुळ‌ात आधी या चित्रपटांनी आपली गुणवत्ता त्या त्या काळात सिद्ध केलेलीच आहे. ‘प्यासा’सारखा चित्रपट तर केवळ भारतीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही सार्वकालिक अभिजात चित्रपट म्हणून नोंदला गेला आहे. ‘छोटी सी बात’, ‘अमर, अकबर, अँथनी’, ‘अर्थ’ आणि ‘वजूद’ यासारखे चित्रपट संबंधित दिग्दर्शकांच्या कारकिर्दीतील माइलस्टोन म्हणून पूर्वीच ओळखले जात आहेत. अशा स्थितीत २०१९ मध्ये (म्हणजे यातला शेवटचा चित्रपट प्रदर्शित होऊनही २१ वर्षे झाल्यावर) नव्या पिढीला, म्हणजे साधारण विशीपासून ते चाळिशीपर्यंत असलेल्या पिढीला ते कसे वाटतात, हे पाहणे औत्सुक्याचे होते. यातील बहुतेक लेखकांनी त्यांच्या जन्माच्या साधारणत: वीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे रसग्रहण केले आहे. हे लक्षात घेतले म्हणजे त्यांच्या नजरेतून या चित्रपटांकडे नव्याने बघणे का महत्त्वाचे आहे, हे लक्षात येईल. अपेक्षेप्रमाणे हे सर्वच चित्रपट नव्या पिढीलाही तितकेच आवडलेले दिसतात. त्यांचं या चित्रपटांकडे पाहणं कुतूहलाचं, औत्सुक्याचं, तर काहीसं कौतुकाचंही आहे. 
या चित्रपटांचा काळ लक्षात घेतला, तरी या चाळीस वर्षांत आपल्या देशात झालेलं स्थित्यंतर आपल्या सहज लक्षात येईल. ‘प्यासा’ प्रदर्शित झाला, तेव्हा पंडित नेहरू देशाचे पंतप्रधान होते, तर ‘वजूद’ प्रदर्शित झाला, तेव्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. या ४० वर्षांत मिश्र समाजवादी अर्थव्यवस्थेकडून जागतिकीकरण स्वीकारल्यानंतरच्या भांडवलवादी अर्थव्यवस्थेपर्यंतचा प्रवास देशानं पूर्ण केला होता. ऐंशीच्या दशकात आलेल्या ‘छोटी सी बात’, ‘घरोंदा’ आदी चित्रपटांनी त्या त्या वेळची सामाजिक परिस्थिती चपखलपणे मांडली होती. याच दशकातल्या ‘अमर अकबर अँथनी’नं सर्वाधिक करमणुकीची नाममुद्रा आपल्या नावावर केली होती. ‘अर्थ’ आणि ‘इजाजत’मध्ये पुरुषप्रधान संस्कृतीचं आणि आधुनिक स्त्रीच्या आत्मभानाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. यातले काही सिनेमे सुप्त आशयातून, काही थेट कथानकातून, तर काही गीत-संगीताच्या माध्यमातून आपला वेगळेपणा सिद्ध करीत होते. अशा चित्रपटांविषयीचं कुतूहल सार्वकालिक असू शकतं. नव्या पिढीच्या चष्म्यातून या सिनेमांकडं पाहताना त्यांच्या आशयातला हा कालातीतपणा तपासणं हाही एक उद्देश असतोच. याशिवाय पूर्वी न जाणवणारी काही नवी वैशिष्ट्यं, काही वेगळेपणा, नवी सौंदर्यस्थळं नव्या पिढीला जाणवतात काय हेही पाहता येतं. या सर्व सिनेमांबाबत असं काही ना काही तरी गवसल्याचं या सर्व लेखांमधून प्रत्ययाला येतं.
चित्रपटासारख्या कलाप्रकाराला नाटकाप्रमाणे ‘पुढील प्रयोगात दुरुस्ती’ची संधी नसते. त्यामुळं चित्रपटात राहिलेली एखादी चूक कायमची तशीच राहू शकते. (क्वचितप्रसंगी तो भाग एडिट केला जातोही.) मात्र, अशी एखादी चूक, एखादी विसंगती, कथाप्रवाहातील किंवा संकलनातील दोष नंतरच्या काळात अभ्यासकांना नक्कीच आढळू शकतो. त्यावर चर्चाही होऊ शकते. विशिष्ट कलाकारांची निवड, त्यांची अभिनय पद्धती याविषयीही नव्या पिढीची काही तरी गमतीदार निरीक्षणं असू शकतात. त्या काळात लिहिले गेलेले संवाद, त्यातून प्रकटणारी त्या काळातील समाजाची मानसिकता यातही आजच्या पिढीला विसंगती आढळूच शकते. अशा सगळ्या गमतीजमतींसह या जुन्या सिनेमांकडं नव्या पिढीच्या चष्म्यातून पाहणं हा वाचकांसाठीही एक वेगळा, समृद्ध करणारा अनुभव ठरू शकतो.
चित्रपटांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं प्रदीर्घ काळ जतन करता येणं शक्य आहे. आता तर अत्याधुनिक, डिटिजल माध्यमामुळं चित्रपट अक्षरश: ‘अमर’ झाले आहेत. आपल्याकडं चित्रपटसृष्टी सुरू झाली, तेव्हा तयार झालेला पहिला मूकपट आपण आजही पाहू शकतो. आता तर तंत्रज्ञान पुष्कळ पुढं गेल्यानं तयार झालेले सगळेच्या सगळे चित्रपट आपल्याला जतन करून किती तरी वर्षं जपून ठेवता येणं शक्य आहे. त्या त्या काळाचा आरसा किंवा त्या काळाचा तुकडाच या चित्रपटांच्या रूपानं पुढच्या पिढ्यांना पाहायला मिळणार आहे. तेव्हा आणखी शंभर वर्षांनी कुणी आजच्या चित्रपटांबाबत असा प्रयोग करून पाहू शकेल, ही शक्यता अजिबातच नाकारता येत नाही. हे चक्र पुढं कित्येक काळ चालूच राहील, यात शंकाच नाही. 
अर्थात आपण आजच्या काळात असल्यानं आजची मजा लुटू या. या उत्तम सिनेमांकडं नव्या पिढीनं कसं पाहिलंय ते त्यांच्या लेखांतून अनुभवू या. हे सिनेमे पुन्हा पाहताना आपल्यालाही नवं काही गवसलं तर हा खटाटोप सार्थकी लागेल. 

---

(पूर्वप्रसिद्धी : संवादसेतू दिवाळी अंक, २०१९)

---

23 May 2020

मनशक्ती युवा दिवाळी अंक २०१८ लेख

फुलपाखरू
---------------


शाळेत सहलीची घोषणा झाली आणि सायलीच्या मनात फुलपाखरं उडू लागली. तिला भटकायला आवडे. सायलीचे बाबा उत्तम ट्रेकर होते. बाबांसोबत ती अनेकदा ट्रेकला जाई. मात्र, शाळेच्या ग्रुपबरोबर सहलीला जायची मजा काही औरच होती. या वर्षी आठवीत असलेल्या सायलीची सहल देवबन इथं जाणार होती. यंदा शाळेची ही कदाचित शेवटचीच सहल, कारण नववी आणि दहावीच्या मुलांना सहलीला नेत नाहीत. त्यामुळं या सहलीला जायचंच असं सायलीनं ठरवलं. 
पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर सह्याद्रीच्या डोंगरांच्या सांदीत ही देवराई होती. तिथूनच नंदिनी नदीचा खळाळता प्रवाह जात होता आणि खाली पठारावर उतरून विशाल रूप धारण करत होता. देवबनला एका खासगी उद्योजकानं सुंदर रिसॉर्ट बांधलं होतं. त्या रिसॉर्टमध्येच सायलीचा वर्ग उतरणार होता. सायलीच्या सगळ्या मैत्रिणीही सहलीला येणारच होत्या. पण तिची लाडकी मैत्रीण इरा नेमकी त्याच काळात तिच्या मावसबहिणीच्या लग्नाला दिल्लीला जाणार होती, त्यामुळं सायली जरा हिरमुसलीच. इराची सोबत नसेल तर सहलीत मज्जा येणार नाही, असं तिला वाटत होतं. पण अखेर इरानंच तिची समजूत काढली आणि अखेर सायली इराशिवाय सहलीला जायला तयार झाली. खूप लहानपणी सायली बाबांसोबत त्या देवराईच्या जवळच असलेल्या माधवगड किल्ल्यावर गेली होती. मात्र, त्या वेळी ही देवराई पाहायचं राहून गेलं होतं. सायलीच्या दुसऱ्या दोन मैत्रिणी राधा आणि अनुष्काही येणार होत्या. त्यामुळं सायलीला जरा बरं वाटलं. सहल शुक्रवारी रात्री पुण्यातून निघणार होती आणि रविवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परत पुण्यात येणार होती.
सहलीला चार दिवस राहिले, तशी सायलीची लगबग सुरू झाली. सायलीच्या आईनं तिच्या इतर मैत्रिणींच्या आयांबरोबर पुन्हा एक वेगळा 'देवबन ट्रिप' नावाचा व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला आणि त्यावर सहलीच्या तयारीचं नियोजन सुरू केलं. आईच्या या अतिउत्साहाचा सायलीला कधी कधी वैताग येतो. आता आपण काही लहान बाळ नाही आहोत, असं तिला वाटतं. पण तिच्या आईला ते काही पटत नाही. सायलीचे खास ट्रिपचे कपडे, शॉर्ट, शूज, गरम कपडे, थर्मास, चाकू, दुर्बिण, दोरी, छत्री इ. सारा जामानिमा तिच्या बॅकपॅकमध्ये गेला. मोबाइल, हेडफोन्स, इअरफोन्स, पॉवर बँक, कोरडा खाऊ, पाण्याची बाटली या सगळ्या जीवनाश्यक वस्तू हँडबॅगमध्ये गेल्या. सायलीचे बाबा तिला शाळेपर्यंत सोडायला आले. रात्री अकराची वेळ होती आणि जानेवारीतली पुण्यातली थंडी होती. सगळे जण कुडकुडत होते. शाळेच्या बाहेर चहाची एक टपरी अजून चालू होती. सगळ्यांनी तिथं जाऊन आधी गरमागरम चहाचा आस्वाद घेतला... अजून मुलं येत होती. सायलीचे बाबा थांबणार होते, पण सायलीच त्यांना जा म्हणाली. बाबांनी आता हे आपल्याला असं लहान बाळासारखं वागवणं थांबवावं, असं तिला मनोमन वाटे. कधी कधी बाबांचाही राग येई. शेवटी सायलीचे बाबा आणि तिच्या इतर मैत्रिणींचेही बाबा त्यांना 'टाटा, काळजी घ्या सगळे, पाण्यात जाऊ नका' असं सांगून घरी परतले... आता सायलीला एकदम 'हुश्श' झालं... आता खऱ्या अर्थानं ट्रिप सुरू झाल्यासारखं वाटू लागलं. 
हळूहळू सगळी मुलं जमली. सायलीच्या मैत्रिणींनी बसमध्ये एकाच बाकावर जागा पटकावली. रात्री बाराच्या सुमारास बस निघाली. 'गणपतीबाप्पा मोरया'चा गजर झाला आणि प्रवास सुरू झाला. मुलं सुरुवातीला दंगा करीत होती. गाण्याच्या भेंड्या सुरू झाल्या. पण शेवटी दोन वाजून गेले तशी एकेकाला झोप यायला लागली. गाडी अजून मारुतीच्या घाटातच होती. अजून बराच वेळ होता. पौर्णिमा जवळ आली होती. बाहेर लख्खं चांदणं पसरलं होतं. चंद्राचा पांढुरका दुधी प्रकाश सर्व आसमंतावर पडला होता. सगळीकडं चांदीचा महासागर पसरलाय असं वाटत होतं. सायलीला झोप येत नव्हती. राधा आणि अनुष्का तिच्या खांद्यावर मान टाकून झोपल्या होत्या. सायलीला इराची आठवण येऊ लागली. त्या दोघी एकच इयरफोन दोघींच्या कानाला लावून नेहमी गाणी ऐकत. सायलीनं मोबाइलला इयरफोन लावला. फेवरिट प्ले-लिस्टमधली तिची आवडती गाणी ऐकायला सुरुवात केली. अरिजित, राहत फते अली आणि श्रेयाची गाणी ऐकता ऐकता हळूहळू तिलाही शांत झोप लागली. अचानक धक्क्यानं जाग आली तेव्हा कळलं, की राधा आणि अनुष्का तिला हलवून उठवतायत. गाडी देवबनला पोचली होती. म्हणजे खरं तर देवबनच्या फाट्याला... तिथं एक तिठा होता. एक रस्ता सरळ पुढं कोकणात उतरत होता, तर देवबनला डावीकडं वाट होती. त्या तिठ्यावरच्या चहाच्या टपरीत सगळ्यांनी पुन्हा एकदा चहा घेतला. चहाच्या घोटानं सायलीला एकदम तरतरी आली. आता सगळे पाठीवर सॅक टाकून देवबनच्या वाटेकडं निघाले. पहाटेचे पाच वाजले होते. अजून अंधार होता. चंद्रप्रकाशात तो अरुंद डांबरी रस्ता एखाद्या सुस्त पडलेल्या अजगरासारखा दिसत होता. पहाटेच्या उत्साहात सगळ्यांनी भराभरा चालायला सुरुवात केली. सायलीनं आता त्या स्वच्छ हवेतला वास छातीत आतपर्यंत भरून घेतला. आजूबाजूला सगळं हिरवंगार होतं. भातशेतीचा आणि हिरव्या झुडपांचा असा तो मिश्र वास तिच्या नाकात शिरला आणि तिला वेडावल्यासारखं झालं. पुढं एक ओढा लागला. त्यावर एक साकव होता. सगळ्यांनी तिथं ओढ्यात दंगा करायला सुरुवात केली. सायलीच्या लाडक्या रानडे बाई सगळ्यांना लटकेच रागावल्या. मग मुलं जराशी खट्टू होऊनच तिथून पुढं निघाली. 
आता थोडं थोडं उजाडू लागलं होतं. ओढा संपल्यावर डाव्या बाजूला एक निमुळती पायवाट फुटली होती. त्या पायवाटेच्या तोंडावर एक रानफुलांचं झाड होतं. त्यावर एक मोठ्ठं फुलपाखरू बसलं होतं. ब्लू मॉरमॉन... सायलीनं लगेच ओळखलं. तिला फुलपाखरांचा खूप छंद होता. एकूणच कीटकांविषयी तिला अतिशय कुतूहल होतं. पुढं मोठं झाल्यावर कीटकशास्त्रज्ञ व्हायचं, असंच तिनं मनोमनी ठरवलं होतं. ते ब्लू मॉरमॉन पाहताच सायलीला खुळावल्यागत झालं. ती हळूच त्या फुलपाखराच्या दिशेनं पुढं झाली. तिला त्याचा फोटो काढायचा होता. सायली जवळ येताच फुलपाखराला चाहूल लागली आणि ते उडालं. सायलीला हसू आलं. 'अरे थांब सोन्या, मी काही करणार नाहीय तुला' असं म्हणत ती पुढं गेली. फुलपाखरू आणखीनच उडत उडत पुढं निघालं. सायली त्याच्या मागे धावली. ती निमुळती पायवाट पुढं आणखीनच अरुंद होत एका ठिकाणी नाहीशीच झाली होती. फुलपाखरू स्वच्छंदपणे उडत पुढं निघालं होतं. सायली भान हरपून त्याच्या मागं धावत होती. आता वाट बरीच मागं राहिली. ते फुलपाखरूही एका मोठ्या झाडाच्या खोडावर जाऊन बसलं. सायली दबक्या पावलांनी तिथं गेली. तिथं कॅमेरा झूम केला आणि क्लिक केलं. फोटो पाहिला. ते फुलपाखरू आता नीटच कॅमेऱ्यात कैद झालं होतं. सायलीनं मागं पाहिलं आणि तिच्या एकदम लक्षात आलं - ती त्या जंगलात एकटीच उभी आहे. फुलपाखराच्या मागं धावताना ती बरीच आत आली होती आणि आता ती नेमकी कुठं आहे हेच तिच्या लक्षात येत नव्हतं. तिनं मोबाइल पाहिला. रेंज पूर्णपणे गेली होती. सायलीला एक क्षण एकदम खूप भीती वाटली. तिनं आता नीट लक्ष देऊन आजूबाजूला पाहिलं. उंच उंच झाडं होती खूप तिथं. पाखरांचा किलबिलाट ऐकू येत होता. जंगलाची म्हणून एक शांतता असते. ती सगळीकडं पसरली होती. सायलीनं शांतपणे विचार केला. आल्या वाटेनं परत जाऊ म्हणून ती परत फिरली. आपल्या शूजच्या खुणा कुठं कुठं दिसताहेत हे ती पाहू लागली. पण खाली सगळीकडं गवत आणि पानं होती. त्यावर बुटांच्या खुणा दिसत नव्हत्या. आत्ता पावसाळा नव्हता. त्यामुळं चिखलही नव्हता. सगळी जमीन कोरडी होती. तिनं काही अंतर मागे जाऊन पाहिलं. पण तिला काही समजेना. आता बऱ्यापैकी उजाडलं होतं आणि सगळीकडं नीट दिसत होतं, एवढाच काय तो दिलासा होता. तिला परतीचा रस्ता सापडेना, तसं तिनं जोर लावून 'राधा...', 'अनू...' अशा हाका मारायला सुरुवात केली. पण कुठूनही काही प्रतिसाद आला नाही. आपण बरोबर नाही, हे लक्षात आल्यावर राधा आणि अनू रानडे बाईंना नक्की सांगतील, असं तिला वाटत होतं. तिच्या सॅकमध्ये बिस्किटांचा पुडा होता आणि पाण्याची बाटलीही होती. तिला एकदम पोटात खड्डा पडल्यासारखं झालं. तिनं पटकन तो पुडा फोडला आणि दोन बिस्किटं भराभरा खाल्ली. पाणी प्यायली. पुन्हा तिनं चारही दिशांना थोडं थोडं अंतर जाऊन पाहिलं. पण आपण नक्की कुठून इथं आलो हे काही तिला कळेना. एका वडाच्या झाडाखाली एक मोठा दगड होता. शिळेसारखा... वर थोडी सपाट जागा होती. सायली तिथं जाऊन बसली. तिला एकदम रडायला यायला लागलं. आईची, बाबांची खूप आठवण आली. पण ती लगेच सावरली. 'एवढं काही नाही झालेलं... आपण हरवलो आहोत आणि आपल्याला कुणी तरी शोधेलच, नाही तर आपण रस्ता शोधू,' असं तिनं स्वतःला बजावलं. सायलीचं वय अवघं तेरा वर्षं... या एवढ्याशा आयुष्यात तिनं किती तरी स्वप्नं पाहिली होती. हल्ली तिला आई-बाबांचा जरा राग येत असला, तरी तेच तिचं सगळं विश्व होतं. आणि हो, इरा... इरा ही तिची अत्यंत लाडकी मैत्रीण म्हणजे तिचा जीव की प्राण होती. 
सायलीनं शांतपणे विचार केला. आता जास्तीत जास्त काय होऊ शकतं? आपल्याला न घेता तर हे लोक नक्की जाणार नाहीत. एव्हाना त्यांना कळलंही असेल, की मी हरवलेय म्हणून... सगळे शोधत असतील. शिवाय मोबाइलला इथं रेंज नाही. पण थोडं फार इकडं तिकडं गेलं तर, विशेषतः उंचावर गेलं तर रेंज येईल... हे लक्षात आल्यावर तिला एकदम हुशारी वाटली. तिनं पुन्हा आजूबाजूला पाहिलं. तसा उंच भाग कुठं जवळ दिसत नव्हता. सगळी सपाटीच होती. पुन्हा तिचं मन हिरमुसलं. या जंगलात कुठले हिंस्र प्राणी नसतील ना? सायलीच्या मनात अचानक हा विचार आला आणि ती एकदम धास्तावली. तसा कुठला प्राणी समोर आला - म्हणजे बिबट्या किंवा तरस किंवा रानगवा तर जाऊच द्या - अगदी कोल्हा किंवा लांडगा जरी समोर आला, तरी आपली काही धडगत नाही, असं तिला वाटून गेलं. तिच्याकडं एक छोटी सुरी सोडली, तर कुठलंही हत्यार नव्हतं. शिवाय सरपटणारे प्राणीही धोकादायकच असतात. सायली दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून छातीजवळ घेऊन बसली. गुडघ्यांवर हनुवटी टेकवून ती समोर पाहत बसली. आणि पाहते तो काय... समोरच्या एका दगडावर खाली तेच फुलपाखरू बसलेलं... ब्लू मॉरमॉन... आता मात्र तिला त्या फुलपाखराचा खूप राग आला. त्याच्या नादापायीच ती रस्ता चुकली होती. मग एकदम तिच्या लक्षात आलं, या जंगलात तिनं अद्याप दुसरा कुठलाही जिवंत प्राणीच पाहिला नव्हता. ते फुलपाखरू सोडून... खरं तर ते फुलपाखरू म्हणजे तिच्या सोबतीला असलेला एकमेव जीव होता. सायलीला एकदम भरून आलं. तिला ती रोज रात्री आईच्या कुशीत शिरून कशी बिनधास्त झोपायची, याची आठवण आली. त्या फुलपाखराला आपल्याला काही तरी सांगायचंय असं तिला वाटू लागलं. तिच्या एवढ्याशा आयुष्याचा ती परत विचार करू लागली. आपणही त्या फुलपाखरासारखेच स्वच्छंदी आहोत आणि ते आत्ता एकदम कसं एकटं आहे, तसेच आपणही एकटेच आहोत, हे तिच्या एकदम लक्षात आलं. आपले आई-वडील, इरा, राधा, अनुष्का, रानडे बाई असं कोणी कोणी आत्ता आपल्याजवळ नाहीय आणि तरीही आपण आहोत. जिवंत आहोत, श्वास घेत आहोत. आपल्या पुढच्या आयुष्यातही असंच असेल कदाचित! सोबत कुणी नसेलही, पण तरीही हे फुलपाखरू कसं एकटंच मस्त उडतंय, छान जगतंय तसं आपल्याला जगायला हवं, असं काही तरी तिला वाटून गेलं. ती अगदी हळूच त्या फुलपाखराजवळ गेली... पण ते परत उडालं... एका दिशेला उडत राहिलं... सायली त्याच्या मागे धावत राहिली... खूप वेळ गेला... फुलपाखरू पुढं आणि सायली मागं.... अखेर पाण्याचा आवाज येऊ लागला. सायलीच्या एकदम लक्षात आलं, की आपण ओढ्याच्या जवळ आलो आहोत. तिनं फुलपाखरावरची नजर एक मिनिट हटविली आणि डावीकडं पाहिलं... तिला ओढा व तो पूल दिसला. तिनं पुन्हा समोर पाहिलं तर फुलपाखरू नव्हतंच. एकदम गायब... 
सायली थक्क झाली. ते ब्लू मॉरमॉन कुठं गेलं असेल, याचा ती विचार करीत राहिली. तेवढ्यात तिला एकदम तीन फुलपाखरं उडताना दिसली. त्यात तिचं फुलपाखरू होतं... म्हणजे ते त्या फुलपाखराचे आई-बाबा होते? होय, होय! त्या बाळाला त्याचे आई-बाबा सापडले होते. सायलीला खूप आनंद झाला. तिनं जागेवरच उंच उडी मारली. आता तिला खरोखरच तिच्या आई-बाबांची आठवण आली. आपण आपल्या आई-वडिलांना किती गृहीत धरतो ना, की ते आहेतच सदैव म्हणून... उद्या ते नसतीलच तर... आपण आत्ता हरवलो, तसे ते हरवले तर? सायली या विचारानं एकदम दचकली. तिनं मनोमन निश्चय केला, की आता आई-बाबांचं सगळं ऐकायचं. ते म्हणतील तसं वागायचं... एकदम शहाण्या मुलीसारखं! 
तेवढ्यात तिचा मोबाइल खणखणला. सायली 'रेंज'मध्ये आली होती. तिच्या आईचाच फोन होता. पलीकडून आई व बाबा दोघंही बोलत होते - 'बेटा, कशी सुरू आहे ट्रिप? नीट पोचलीस ना? वेळेवर जेव... नीट जा, नीट ये... दंगा करू नकोस...'
इकडं सायलीच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या धारा सुरू होत्या.... ती नुसती 'हो, हो' म्हणत होती... हसत होती...
अन् वर आकाशात तीन फुलपाखरं मस्त विहरत होती!!

---
 
(पूर्वप्रसिद्धी ः मनशक्ती युवा दिवाळी अंक, २०१८)

30 Apr 2020

महाराष्ट्र हीरकमहोत्सव विशेष

बहु असोत सुंदर, संपन्न....
-----------------------------


आजच्या शुक्रवारी, म्हणजे एक मे २०२० रोजी महाराष्ट्र साठी पूर्ण करतोय. साठीसोबत येणारा वाक्प्रचार फार काही चांगला नाही. पण तो व्यक्तीच्या संदर्भात असल्यानं सहज दुर्लक्षिता येईल. महाराष्ट्र हे आपलं एक राज्य असल्यानं त्याची साठी म्हणजे आपणा सर्व महाराष्ट्रवासीयांसाठी सुखाचा, आनंदाचा, जल्लोषाचा क्षण! आत्ता ‘करोना’ साथीमुळं आपल्याला हा जल्लोष एकत्र येऊन करता येत नसला, तरी या महत्त्वाच्या टप्प्याची नोंद करायलाच पाहिजे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती सहजासहजी झाली नाही. त्यासाठी इथल्या जनतेला मोठं आंदोलन करावं लागलं. एकशे पाच हुतात्म्यांचे बलिदान द्यावे लागले. तो सर्व इतिहास आता नव्या पिढीला कदाचित माहितीही नसेल. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी; मात्र ती मिळविण्यासाठीही इथल्या नेत्यांना रक्ताचं पाणी करावं लागलं. आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे अशा नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा प्राणपणाने लढला. चिंतामणराव देशमुखांसारख्या महाराष्ट्रभक्त नेत्याने आपल्या केंद्रीय अर्थमंत्रिपदावर सहज पाणी सोडले. सेनापती बापट यांच्यासारखा वयोवृद्ध सेनानी या लढ्याच्या अग्रभागी उभा ठाकला. ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्राविण राष्ट्रगाडा न चाले’ असे अत्यंत अभिमानास्पद, ज्वलज्जहाल उद्गार त्यांनी काढले आणि मराठी जनतेला स्फुरण चढले. एकदा राज्य स्थापन झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांसारख्या दूरदृष्टीच्या नेत्याने या राज्याच्या प्रगतीची मुहूर्तमेढ रोवली. हा सगळा इतिहास इथे पुन्हा सांगण्याचे कारण म्हणजे राज्याच्या साठीनिमित्त या सर्व कालखंडात नक्की काय घडलं, काय घडणं अपेक्षित होतं आणि पुढे काय व्हायला हवं याची किमान चर्चा तरी व्हावी.
महाराष्ट्रात बहुसंख्य जनता मराठी बोलणारी असल्यानं या लेखापुरता तरी मराठी माणसांचाच विचार केला आहे. दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आले आणि इथलेच झाले असे सगळे लोक मराठीच आहेत. काहींची मातृभाषा कदाचित मराठी नसेल, पण अनेक वर्षं, अनेक पिढ्या इथं राहिल्यानं ते मराठीच आहेत. महाराष्ट्राचा स्वभाव रांगडा आहे; तिखट आहे, ग्रामीण आहे. (ग्राम्य नव्हे!) शेती करणं, कष्टाने पैसा मिळवणं, तमाशा आदी संगीत मनोरंजन प्रकारात मन रमवणं या त्याच्या आवडत्या गोष्टी आहेत. तीस-चाळीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावातलं जीवन कसं होतं, ते आठवून पाहा. पिठलं-खर्डा-भाकरी खाणे, गणपती आणि दिवाळी हे सण मनापासून साजरे करणे, संध्याकाळी गावातल्या देवळात कीर्तनाला जाणे आणि शनिवारी रात्री फडाला जाणे यात ग्रामीण जीवन सामावलं होतं. शहरी जीवनही तसं साचेबद्धच होतं. बँक, एलआयसी किंवा सरकारी कचेरीत सकाळी दहा ते पाच नोकरी करणं, शनिवारी एखादं नाटक बघणं आणि क्वचित कधी तरी हॉटेलांत जाऊन जेवणं यात शहरी मध्यमवर्ग खूश होता. साठच्या दशकात आलेल्या अनेक मराठी चित्रपटांत या दोन्ही जगण्याचं प्रतिबिंब दिसेल. साहित्यातही सापडेल. ग्रामीण महाराष्ट्राचं व्यक्तिचित्र कुणाला हवं असल्यास व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील यांच्या साहित्यात तो गवसेल. शहरी महाराष्ट्र व. पु. काळे यांच्यापासून शं. ना. नवऱ्यांपर्यंत अनेकांनी रेखाटला आहे. नैसर्गिक दुष्काळ आणि अभावग्रस्तता इथल्या जनतेच्या पाचवीला पुजली होती. पण तरी लोक असमाधानी नव्हते. अपेक्षा थोड्या होत्या, जगणं साधं-सोपं होतं.
साठच्या दशकात सहकार चळवळीनं ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात या कारखान्यांच्या सभोवती समृद्धीची बेटं तयार झाली. काही मोजक्या कारखानदारांनी आणलेल्या उद्योगांमुळे छोट्या छोट्या, स्वयंपूर्ण वसाहती उभ्या राहिल्या. या बेटांवरचं जगणं उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळं झालं. विदर्भ आणि मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाले असले, तरी त्यांचं भौगोलिक, सांस्कृतिक वेगळेपण कायम होतं. मराठी भाषेच्या दुव्यानं हा सगळा भाग एका धाग्यात सांधला गेला. शिवाय हे राज्य अस्तित्वात येण्याआधीपासून इथं असलेली संतपरंपरा, वारकरी संप्रदाय यामुळं अंतरीचा जिव्हाळा होताच. ग्रामीण महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजत असतानाच वसंतराव नाईकांसारख्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात हरितक्रांती, धवलक्रांतीची बीजं रोवली. एके काळचा दुष्काळी, रखरखाटी महाराष्ट्र निदान काही परिसरापुरता तरी हिरवागार झाला, दुधदुभत्यानं न्हाऊ लागला. याच वेळी शहरांमध्ये, विशेषत: मुंबई व पुण्याच्या परिसरात औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या. मुंबई अद्यापही गिरण्यांचं शहर होतं. इथल्या कापड गिरण्यांची आणि त्याला जोडून वस्ती असलेल्या लालबाग-परळची एक वेगळीच गिरणगाव संस्कृती त्या अवाढव्य महानगराच्या एका कुशीत सुखानं नांदत होती. मुंबई, पुण्याच्या जोडीनं नागपूर, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर ही शहरंही चांगलीच विस्तारत होती. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरचा हा दहा-पंधरा वर्षांचा काळ कदाचित सर्वोत्कृष्ट काळ असावा. या काळातलं राज्यातलं सामाजिक, सांस्कृतिक जीवन रसरशीत होतं. साहित्यातही विद्रोही, दलित, स्त्री असे विविध प्रवाह नव्याने एकत्र येत होते. पुलंच्या बहुरूपी प्रयोगांपासून ते विजय तेंडुलकरांच्या बहुस्पर्शी नाट्यप्रयोगांपर्यंत सारं काही घडत होतं. कलाकारांमध्ये, लेखकांमध्ये नवं काही सांगण्याची, करण्याची ऊर्मी होती; तसंच इथल्या सर्वसामान्य जनतेलाही ते जाणून घेण्यात रुची होती. गावोगावी ग्रंथालये होती आणि नवसाक्षरांचं प्रमाणही वाढत होतं. महाराष्ट्र हे सर्वच बाबतींत देशातलं अग्रेसर, क्रमांक एकचं राज्य अशी प्रतिमा होती.
मात्र, लवकरच या सगळ्या प्रगतीला ग्रहण लागलं. भ्रष्टाचाराचा कली भल्याभल्यांच्या अंगात शिरला. समाजकारणापेक्षा सत्तेचं राजकारण वरचढ ठरू लागलं. याच काळात विजय तेंडुलकरांच्या लेखणीतून उतरलेला ‘सामना’ हा चित्रपट आणि ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक यावं, यात आश्चर्य नव्हतं. पुढच्या काळात सर्वच क्षेत्रांत ही कीड पसरू लागली आणि सामाजिक अस्वस्थतेची ठिणगी पडली. गावोगावी नांदत असलेल्या सलोख्याला सुरुंग लागला. पुढच्या काळात देशात सुरू असलेल्या मंडल आयोग वाद, बाबरी मशिदीचं पतन, जातीय दंगली या सगळ्यांचा परिणाम राज्याच्या प्रकृतीवर झालाच. गिरणी कामगार संपानं मुंबईतलं गिरणगाव उद्ध्वस्त झालं. मुंबईत वाढत असलेल्या टोळीयुद्धाला यातले काही बेरोजगार तरुण बळी पडले. तस्करी, काळा बाजार याला ऊत आला. ताप आलेल्या माणसाचं तोंड कडवट व्हावं, तसं राज्याचं तोंड कडू होऊन गेलं.
नंतर १९९१ मध्ये देशानं जागतिकीकरणाच्या रूपानं मोठा बदल पाहिला. महाराष्ट्रही त्याला अपवाद नव्हता. इथली शहरं महानगरं झाली आणि महानगरं लोकांच्या लोंढ्यानं फुटून मरणासन्न झाली. ग्रामीण महाराष्ट्रातून बेरोजगारांचे तांडेच्या तांडे शहरांच्या दिशेनं धावू लागले. ऐंशीच्या दशकात सडलेल्या सामाजिक व्यवस्थेचं बेंड जागतिकीकरणाच्या इंजेक्शननं ‌फुटलं. जखम मात्र वाहतच राहिली. शहरांतलं वातावरण वेगानं बदलत गेलं. कुटुंबकेंद्री व्यवस्था कधी व्यक्तिकेंद्री झाली आणि मूल्याधारित सांस्कृतिक धारणा कधी ईहवादी झाल्या, याचा अनेकांना तपास लागला नाही. कला क्षेत्रापासून ते राजकारणापर्यंत आणि शिक्षणापासून ते साहित्यापर्यंत सर्वत्र सुमारांची सद्दी सुरू झाली. एकविसाव्या शतकात तर वेगानं होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीनं साऱ्या समाजाचीच फरपट चालविली. अनेकांच्या मनात ‘आयडेंटिटी क्रायसिस’ निर्माण झाला. राजकारणातल्या भोंदूपणाने नवनवे तळ गाठले. समाजात द्वेषाची पेरणी झाली. आता तिला महाभयंकर विषारी फळं लगडली आहेत.
हे सगळं असलं, तरी हा महाराष्ट्र इथल्या सर्वसामान्य माणसाच्या शहाण्या समजूतदारपणावर उभा आहे आणि इथून पुढंही उभाच राहील. संत परंपरेचा वारसा आणि छत्रपती शिवरायांच्या लोककल्याणकारी राज्याचा इतिहास इथल्या मातीच्या कणाकणात आहे. सह्याद्रीचे भक्कम कोट आणि गोदा-कृष्णेचे अमृततुल्य पाणी इथल्या माणसाच्या अणुरेणूत मुरले आहे. अशा भूमीवर नांदणारे राज्य आता साठ वर्षांचे होऊ घातले आहे. त्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होऊ या. आपल्या पूर्वसूरींना यापेक्षा कोणती चांगली भेट असू शकेल?

----