28 Feb 2022

पासवर्ड - फेब्रुवारी २२ अंक - कथा

एक बंदर, दिल के अंदर...
------------------------------

अणंगपूरच्या अलीकडं, भणंगपूरच्या पलीकडं, डोंगराच्या उताराला, नदीच्या काठाला वसलं होतं गणंगपूर. गाव तसं नामी. नावाप्रमाणेच एक से एक गणंग लोक इथी वस्ती करून राहत होते. गावातल्या लोकांची नावंही एक से एक. कपडे शिवणाऱ्याचं नाव होतं कात्रे, तर चप्पल शिवणाऱ्याचं नाव होतं चावरे; फुलं विकणाऱ्याचं नाव होतं सुके आणि मटण विकणाऱ्याचं नाव होतं खटके. अशा गमतीदार नावांचं हे गणंगपूर. तिथं कुणालाच काहीच ना खटके ना टोचे! डोंगरावरच्या जाडजूड शिळेगत गाव नदीच्या काठाला वर्षानुवर्षं अगदी सुस्त पडलेलं होतं. गावात होती एकच सरकारी शाळा. तिथल्या मास्तरांचं नाव होतं मारके. नाव मारके असलं, तरी मास्तर मारके नव्हते. चष्मीस होते, स्वभावानं अगदी गरीब गाय होते. बदलून आले होते. एकटेच राहायचे. आणखी दोन मास्तर होते. पण त्यातले ढोले गुरुजी तर निवृत्त व्हायला आले होते, त्यामुळं ते कधी शाळेत यायचेच नाहीत. दुसरे होते सुकडे गुरुजी. ते दुसऱ्या गावी राहायचे. त्यामुळे कधी यायचे, तर कधी नाही. सगळा भार मारके मास्तरांनाच वाहायला लागायचा.
गणंगपूरच्या शाळेतली पोरंही तशीच होती. एक से एक वस्ताद! याला झाकावा, त्याला काढावा, असे सगळे. खोड्या करणे, नाना उपद्व्याप करणे, मास्तरांना त्रास देणे हे तर अगदी नेहमीचंच. गावात कुणी नवं माणूस आलं, की त्याला खुळं करून सोडायचं, हा पोरांचा आवडीचा छंद होता. गंप्या हा या सगळ्यांचा मेरुमणी. गंप्या सातवीत होता. म्हणजे शाळेतल्या सर्वांत मोठ्या वर्गात. कारण गणंगपुरात सातवीपर्यंतच शाळा होती. त्यापुढं शिकायचं तर तालुक्याच्या गावाला जावं लागे. त्यामुळं गंप्याचा सगळ्या शाळेत वट होता, दरारा होता. गंप्याच्या वाटेला कुणी जात नसे. तो रस्त्यानं निघाला, की माणसं आपोआप बाजूला होत. लहान लेकरं तर घरात लपून बसत. कारण गंप्या कधी कुणाची, काय खोडी काढील, हे कुणालाच सांगता यायचं नाही. गंप्यालाही ते सांगता यायचं नाही. त्याच्या मनात कधी काय येईल आणि तो काय उद्योग करून ठेवील, याचा अंदाज येणं ही फारच अवघड गोष्ट होती.
एकदा गावात एक मदारी आला. त्याच्याकडे एकच माकड होतं. लाल तोंडाचं. मदारी माकडाचे खेळ करू लागला. गावात माकड आलंय म्हटल्यावर गंप्याला आणि त्याच्या मित्रांना भलताच चेव चढला. मदाऱ्याचा खेळ सुरू होता, तिथं हे सगळे जाऊन गोल उभे राहिले. बारीक बारीक दगड त्या माकडाला फेकून मारू लागले. माकड उड्या मारायला लागे, त्यासरशी गंप्या आणि त्याचे मित्र खदाखदा हसत आणि आणखी दगड मारीत. मदाऱ्यानं हे पाहिलं. त्याला चांगलाच राग आला. त्याच्या लाडक्या माकडाला - बब्याला - गंप्या दगड मारत होता, हे बघून तो गंप्याला ओरडला. माकड म्हणजे महाबली हनुमानाचे वंशज. त्यांना असा त्रास देणं बरं नाही. त्यांना काय, कुठल्याच मुक्या प्राण्याला असा त्रास देऊ नये, असं मदाऱ्यानं गंप्याला सांगितलं. गावातल्या दोन जाणत्या माणसांनीही गंप्याला तसंच सांगितलं. त्यासरशी गंप्याही चिडला. तेवढ्यात कुणी तरी मागून गंप्याची चड्डी ओढली. बघतो तर काय, बब्या गंप्याच्या मागे उभा होता. मदाऱ्यानं त्याला चांगलंच सजवलं होतं. त्याच्या गळ्यात माळ होती. कपाळावर गंध होतं. अंगात एक चौकडीचा शर्टही घातला होता. बब्याच्या उजव्या कपाळावर एक तिरपा व्रण होता. कधी तरी मारामारीत बब्याला दुसऱ्या माकडानं ओरबाडलं असणार! हे असलं ध्यान मागं बघून गंप्या दोन मिनिटं जरा टरकला. पण तेवढ्यात सावध झाला. त्यानं बब्याची पुन्हा खोडी काढाची ठरवलं. शेजारची एक काटकी घेऊन बब्याला टोचायची, अशा विचारानं तो वाकला, तेवढ्यात मागून बब्यानं त्याची चड्डी पुन्हा जोरात खाली ओढली. आत्ता चड्डी पूर्णच निसटून खाली पडली. गंप्याची फाटकी अंडरपँट सगळ्यांना दिसली. सगळी मुलं खो खो हसू लागली. मुलं हसायला लागल्यावर बब्याला आणखी चेव आला. बब्यानं पाठीमागून एकदम उडी मारली आणि तो गंप्याच्या पाठुंगळीला जाऊन बसला. माकड पाठीवर बसलं म्हटल्यावर गंप्या फारच घाबरला. ''ओय, ओय... वाचवा, वाचवा,'' करत ओरडायला लागला. गंप्या उड्या मारत, नाचत त्या चौकात गोल गोल फिरू लागला. ते बघून हा मदाऱ्याचा नवाच खेळ आहे, असं समजून गावातले बरेच लोक तिथं गोळा झाले. त्यांच्यासमोर हे सगळं नाटक सुरू झालं आणि लोक टाळ्या वाजवू लागले. लोकांच्या टाळ्या ऐकून बब्याला आणखी चेव चढला. त्यानं आता गंप्याचे केस हातात धरले आणि गाडीवान कसा कासरा हातात धरून बैल पिटाळतो, तसं तो गंप्याला पिटाळू लागला. गंप्याच्या तोंडचं पाणी पळालं. त्यात बब्या त्याला मध्ये गुदगुल्या करी. त्यामुळं तर गंप्याला हसावं की रडावं हे काही कळेना झालं. मदारी हे सगळं बघत होता. बब्याला त्रास देणाऱ्या गंप्याची पुरेशी खोडी मोडली, हे बघून मग त्यानं बब्याला इशारा केला. बब्या टुणकन उडी मारून खाली उतरला. त्याबरोबर गंप्याचं धूड चक्कर येऊन तिथं चौकातच कोसळलं. सगळे लोक गंप्याला हसत हसत आपापल्या घरी गेले.
थोड्या वेळानं गंप्याला जाग आली तेव्हा सगळीकडं अंधार पडला होता. गंप्यानं आपले कपडे झटकले, केस नीट केले आणि तो पाय ओढत घरी गेला. घरचे सगळे पुन्हा गंप्याला हसले. गंप्याच्या डोक्यात संतापाची तिडीक गेली. जेवण वगैरे झाल्यावर तो पुन्हा घराबाहेर पडला. त्याच्या टोळीतल्या चार मित्रांना गोळा केलं आणि तो मदाऱ्याचा शोध घ्यायला निघाला. गावाबाहेर नदीच्या काठी मदाऱ्यानं एक झोपडी उभारली होती. बाहेर त्यानं लाकडं पेटवून जाळ केला होता. पलीकडं कुणाची तरी जुनी बाज होती. त्यावर बब्या बसला होता. स्वतःचं अंग कराकरा खाजवत बब्या मधूनच ओरडत होता. मदाऱ्यानं कोपऱ्यात चूल मांडली होती. त्यात अॅल्युमिनियमच्या मोठ्या भांड्यात काही तरी भातासारखं रटरटत होतं. जाळाचा प्रकाश मदाऱ्याच्या तोंडावर पडून त्याचा चेहरा लाल भासत होता. बब्याचा आधीचाच लाल चेहरा आता लालबुंद वाटायला लागलं होतं. शेजारीच वडाचं झाड होतं. त्या झाडाच्या सावल्या मदाऱ्याच्या झोपडीबाहेर विचित्र पद्धतीनं हलत होत्या. एकूण मोठं चमत्कारिक दृश्य होतं ते...
गंप्या तिथं पोचायला आणि तिथल्या एक भटक्या कुत्र्यानं गंप्याच्या दिशेनं बघून भुंकायला एकच गाठ पडली. कुत्र्याचं भुंकणं ऐकून गंप्याचे चारी मित्र मागच्या मागं पसार झाले. मदारी आणि बब्या एकदम सावध होऊन कुत्र्याच्या भुंकण्याच्या दिशेनं बघू लागले. त्यांना गवतात काही तरी हालचाल जाणवली. मात्र, तो गंप्या आहे, हे काही मदाऱ्याच्या पटकन लक्षात आलं नाही. गंप्यानं एक मोठा दगड कुत्र्याच्या दिशेनं भिरकावला आणि त्याबरोबर ते कुत्रं केकाटत दूर निघून गेलं. तिथूनही ते गवताच्या दिशेनं भुंकत होतंच. बब्या आता बाजेवरून खाली उतरला होता आणि मदाऱ्यासोबत हळूहळू गवताच्या दिशेनं येत होता. गंप्या हातात दगड घेऊन सज्ज होता. मदारी व बब्या पुढं सरकले. त्यांना जाळाच्या अंधुक प्रकाशात एकदम गंप्याचा चेहरा दिसला. गंप्याची चड्डी बघून मदाऱ्याला सकाळचा प्रसंग आठवला आणि एकदम हसायला आलं. गंप्या आत्ता पूर्ण, मोठी विजार घालून आला होता आणि त्यानं चक्क सुतळीनं ती कमरेला करकचून बांधली होती. तेवढ्यात बब्या गवताकडं बघून जोरजोरात किंचाळायला लागला. गंप्यानं बब्याला परत दगड मारला की काय, म्हणून मदारी बब्याकडं बघायला लागला. मग त्यानं गंप्याकडं पाहिलं. दगड अजूनही गंप्याच्या हातातच होता. बब्याचं लक्ष मात्र गंप्याच्या पायाकडं गवतात होतं. तिथं लक्ष गेलं आणि मदारी चमकलाच. एक भला मोठा नाग गंप्याच्या पायापासून दोन फूट अंतरावर फणा काढून उभा होता. गंप्याचं लक्षच नव्हतं तिकडं. बब्यानं मात्र ओरडून ओरडून त्याला सावध करायचा प्रयत्न चालवला होता. शेवटी मदारी ओरडला, "अबे ओ शाणे बच्चे, मरना है क्या? नीचे देख, नीचे देख..."
गंप्यानं खाली बघितलं मात्र... नागाला बघून त्याची कचकचून बांधलेली विजार ओलीच झाली. काय करावं, हे त्याला सुचेचना. तो तसाच पुतळा होऊन स्तब्ध उभा राहिला. मनातून देवाचा धावा करायला लागला. तेवढ्यात बब्यानं एकदम झेप मारून नागाला एका फटक्यात दूर उडवून लावलं. मदारी आता बब्याकडं कृतज्ञतेनं बघत होता. गंप्याच्या डोळ्यात पाणीच आलं. ज्या बब्याला त्यानं दुपारी खूप त्रास दिला होता, त्याच बब्यानं त्याचा जीव वाचवला होता.
दुसऱ्या दिवशी मदाऱ्याच्या खेळाला गंप्या स्वतः बब्याला डोक्यावर घेऊन जाहिरात करत फिरत होता. त्या खेळाला खूप गर्दी झाली हे सांगायला नकोच. मदाऱ्याला भरपूर पैसे मिळाले. गंप्यानं स्वतः भेळ-चिवडा आणून मदाऱ्याला खायला दिला आणि बब्यापुढं तर केळ्यांचा घडच ठेवला. काही दिवसांनी मदारी व बब्या पुढच्या गावाला खेळ करायला निघून गेले.
त्यानंतर आता गणंगपुरातल्या मारुतीच्या देवळासमोर गंप्या दर शनिवारी दर्शनाच्या रांगेत उभा दिसतो. मारके मास्तरांनी त्याला तालमीत पण धाडलंय. रोज संध्याकाळी गंप्या आता तालमीत घुमत असतो. त्याला अजूनही नीट शड्डू ठोकायला जमत नाही. मग मागून कुणी तरी थोरला पैलवान त्याची लंगोट ओढतो... आखाड्यातले सगळे जण गंप्याला हसतात. गंप्याही हसतो. हसून हसून अगदी डोळ्यांत पाणी येतं त्याच्या... त्या पाण्यात त्याला कधी कधी बब्याचं प्रतिबिंब दिसतं असं म्हणतात.

---

(पूर्वप्रसिद्धी : पासवर्ड फेब्रुवारी २२ अंक)

---

25 Feb 2022

पासवर्ड दिवाळी अंक २१ - कथा

अपना टाइम आएगा...
--------------------------

चपक्... चपक्... चपक्... चपक्...
चिखलातून चप्पल घालून जाताना होणाऱ्या या आवाजानं राघू नादावला होता. त्याचं घर डोंगरावर आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यानं सगळीकडं हिरवंगार वातावरण झालं होतं. भाताची रोपं तरारली होती. वाफ्यांत पाणी साठलं होतं. सगळीकडं भाताच्या लोंब्यांचा खरपूर वास दरवळत होता.
राघू सातवीत शिकतो आहे. त्याचे वडील सोन्याबापू एसटीत कंडक्टर आहेत. फाट्यावर त्यांना डबा द्यायचं राघूचं रोजचं काम होतं. आजही सकाळी सकाळी तो आईनं दिलेला भाकरी-भाजीचा डबा घेऊन रायबाच्या वाडीकडं निघाला होता. राघूचं घर रायबावाडी आणि पलीकडच्या डोणेवाडीच्या मधोमध होतं. मधे एक साधीशी बैलगाडीची वाट होती. आता पावसामुळं तिथं एवढा चिखल झाला होता, की वाट कोणती आणि शेत कोणतं, ओळखू येईना झालं होतं. बैलगाडीच्या धावेमुळं तयार झालेल्या खळगीत चहाच्या रंगाचं पाणी साठलं होतं. त्यात उडी मारून तिथलं पाणी उडवायला राघूला आणि त्याचा दोस्त महादूला फार आवडायचं. आज महादू नव्हता. त्याच्या दादांना - वडिलांना - तालुक्याच्या गावी नेलं होतं. त्यांना चार दिवसांपासून ताप येत होता. सगळीकडं धुमाकूळ घालणाऱ्या करोनानं त्यांना गाठलेलं असू नये, अशी प्रार्थना महादू आणि राघू रोज शिवारातल्या मारुतीकडं करत होते. शिवारातल्या मैदानावरच राघू एरवी मित्रांसोबत क्रिकेट खेळायचा. सध्या पावसामुळं त्यांचं 'स्टेडियम' पूर्ण भिजून गेलं होतं. पावसाळ्यात क्रिकेट खेळता आलं नाही, तर क्रिकेटवरचे लेख वाचायला राघूला आवडायचं. त्यातले क्रिकेटपटूंचे फोटो कापून, वहीत ठेवणं हा तर त्याचा छंद होता. सगळ्यांप्रमाणेच धोनी आणि विराट हे त्याचे अतिशय आवडते खेळाडू होते.
रायबाची वाडी अजून अर्धा-एक किलोमीटर असेल. राघूचे वडील रोज सकाळी सायकलनं वाडीपर्यंत जायचे आणि फाट्यावरून तालुक्याच्या गावाला जायचे. तिथून पुढं त्यांची ड्यूटी जिथं लावली असेल त्या गावाला जावं लागायचं. दोन दिवसांतून एकदा मुक्कामी पण जावं लागायचं. आज त्यांना पुन्हा मुक्कामाची ड्यूटी आली होती. त्यामुळंच राघूकडं त्यांना डबा पोचवायचं काम आलं होतं. सोन्याबापू फार सरळ आणि सज्जन माणूस होता. वाडीतल्या सगळ्या लोकांना त्यांचा फार आधार होता. त्यांचं तालुक्याच्या गावी रोजचं येणं-जाणं असल्यानं अनेक लोकांची पार्सलं पोचवण्याचं, वस्तू नेण्याचं-आणण्याचं, निरोप देण्याचं काम सोन्याबापू हसतमुखानं करत. गावातली काही मुलं शिकायला तालुक्याच्या गावी जात. ती सोन्याबापूंच्या एसटीनंच जात. त्यांच्यावर भरोसा ठेवून गावकरी आपल्या पोरांना निश्चिंतपणे त्यांच्या ताब्यात देत असत.
आज राघू विशेष खुशीत होता. त्याचे बापू त्याच्यासाठी तालुक्याच्या गावावरून एक मस्त भेटवस्तू आणणार होते. राघूला खूप दिवसांचं एक घड्याळ हवं होतं. शेतावर काम करताना, वाडीला जाताना-येताना, एसटीच्या वेळा पाळताना घड्याळ सारखंच लागायचं. राघूला सतत दुसऱ्याला वेळ विचारावी लागे. म्हणून त्यानं खूप आग्रह धरून बापूंकडं घड्याळ मागितलं होतं. अखेर खूप प्रयत्नांती बापूंनी त्याला घड्याळ आणून देण्याचं कबूल केलं होतं. आज बापूंच्या पगाराचा दिवस होता. त्यामुळं ते आज नक्की घड्याळ आणणार, याची खात्री होती.

झूम... झुइंग, झुइंग... झूम झूम...

एकदम आवाज आले, तसा राघू दचकला. त्यानं समोर पाहिलं तर चार-पाच अतिशय पॉश, खूप भारी, दणकट पांढऱ्या कार त्या कच्च्या रस्त्यानं वेगानं पलीकडच्या डोंगराकडं जाताना दिसल्या. त्या गाड्यांना काळ्या काचा होत्या. त्यात कोण बसलंय ते कळत नव्हतं. पण कुणी तरी मोठी, तालेवार माणसं असणार हे नक्की. पलीकडच्या डोंगरावर एक मोठी संस्था होती. गिर्यारोहण, साहसी खेळ यांचं प्रशिक्षण तिथं चालायचं म्हणे. त्या भागात अनेक खासगी लोकांची रिसॉर्ट पण होती. तिकडे जाणारा रस्ताही ‘खासगी मालमत्ता’ असा बोर्ड लावून बंद करण्यात आला होता. तिथं एक वॉचमन कायम असायचा. राघू व महादूची त्याची गट्टी होती. त्याला नाव विचारलं, तर तो ‘मला सुभेदार म्हणा’ एवढंच म्हणायचा. आताही राघू जरा पुढं गेला. सुभेदारकाका आलेच समोरून. राघूनं त्यांना वेळ विचारली. नऊ वाजून वीस मिनिटं झाल्याचं त्यांनी सांगितलं. बापूंच्या एसटीला अजून वेळ होता. फाटाही इथून अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर होता. मग राघू सुभेदारांच्या केबिनमध्ये येऊन बसला. तिथल्या माठातलं गार गार पाणी आधी त्यानं घटाघटा पिऊन घेतलं. सुभेदारांकडं ‘टायगर’ नावाचा गावठी, पण चांगला दणकट कुत्रा होता. राघूची आणि त्याचीही दोस्ती होती. राघू आत शिरल्याबरोबर टायगर आलाच शेपटी हलवीत. राघूनं त्याला थोपटलं. त्याच्या गळ्याखाली खाजवत त्यानं सुभेदारकाकांना विचारलं, ‘कसल्या गाड्या ओ काका या? कोण लोक आलेत?’
सुभेदारकाका म्हणाले, ‘आता काय सांगू? कुणाला सांगायचं नाही, अशी मला सक्त ताकीद आहे बाबा. फार मोठे लोक आहेत. तुला कळलं, तर तू आश्चर्यानं उडशील...’
राघू म्हणाला, ‘सांगा की... सांगा की काका... मी कुण्णाकुण्णाला सांगणार नाही.’
‘बरं... इकडं ये...’ सुभेदारकाका म्हणाले. ‘कान कर इकडं...’ असं म्हणत ते राघूच्या कानात काही तरी पुटपुटले.
ते ऐकून राघूनं एवढ्ढा मोठ्ठा ‘आ’ वासला की तो लवकर मिटेचना.
‘काय सांगताय काय, काका? खरंच? कोहली आणि आपली सगळी टीम आलीय इथं?’
‘श्शू... शांत शांत शांत बस बाबा. नोकरी जाईल माझी...’
राघूला एकदम आठवलं. पुण्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक टेस्ट मॅच खेळायला आपली टीम आली होती. त्या मॅचमध्ये आपण तीन दिवसांतच वाईट हरलो होतो. पण त्यानंतर आपली टीम इकडं आलीय, हे काही त्याला खरं वाटेना. पण डोंगरावरच्या संस्थेत ते दोन दिवसांसाठी आले आहेत, असं काकांनी त्याला सांगितल्यावर मग विश्वास ठेवावाच लागला. मगाशी गेलेल्या त्या कारमधून चक्क आपले आवडते क्रिकेटपटू गेले होते, हे लक्षात येऊन राघू मनोमन हरखला. त्यांना बघायला मिळालं तर? त्याच्या डोळ्यांतले भाव वाचूनच सुभेदारकाका बोटानंच ‘नाही नाही’ म्हणाले.
राघू हिरमुसला होऊन फाट्याकडं निघाला. टायगरही त्याच्या मागे मागे थोडं अंतर हुंदडत आला. ‘टायगर, परत जा... काकांना सोबतीला थांब,’ असं राघू म्हणाल्याबरोबर जणू समजल्यासारखं टायगर मागं वळला.
राघू फाट्यावर येऊन उभा राहिला. तिथं एक पडझड झालेली शेड होती. शेजारी वडाच्या झाडाखाली एरवी फळं विकणाऱ्या मावशी बसायच्या. सध्या पावसामुळं आणि करोनाच्या निर्बंधांमुळं हल्ली त्या दिसत नाहीत. राघू उजवीकडच्या वळणाकडं बघत बसला. त्याची ही नेहमीची सवय होती. वळणावर एसटी दिसली, की तो एक ते शंभर आकडे मोजायला सुरुवात करायचा. साधारण सत्तरच्या पुढं आकडे गेले, की एसटी बरोबर समोर येऊन थांबायची.
आत्ताही तसंच झालं. वळणावर लालचुटुक रंगाची, पण आता चिखलानं माखलेली गाडी दिसली आणि राघूनं ‘एक, दोन, तीन...’ सुरू केलं. बरोबर पंचाहत्तर आकड्याच्या वेळी एसटी समोर येऊन थांबली. दार उघडलं आणि सोन्याबापू खाली उतरले. वडिलांना बघून राघूचा चेहरा उजळला. बापू आले. ‘काय राघवा, डबा आणलायस का?’ त्यांनी राघूच्या डोक्यांतील केसात हात फिरवत विचारलं. मास्कमधूनही त्यांच्या चेहऱ्यावरचे मिश्कील भाव लपत नव्हते. ‘हो... हा घ्या...’ असं म्हणत राघूनं डबा दिला. ‘आणि माझं घड्याळ?’ राघूनं अधीरतेनं विचारलं.
‘थांब, थांब...’ म्हणत बापू शेडमधल्या बाकावर बसले. मानेवरचा रुमाल काढून आधी त्यांनी घाम पुसला. मग म्हणाले, ‘राघवा, मला माफ कर बेटा. या वेळी काही घड्याळ आणायला जमलं नाही.’
राघू एकदम खट्टू झाला. ‘का पण? तुम्ही मला आज घड्याळ आणणार होता ना... मग का नाही आणलं?’ असं म्हणताना त्याचा चेहरा अगदी रडवेला झाला.
‘अरे हो, ऐकतोस का जरा...’ असं समजुतीच्या स्वरात बोलत बापू म्हणाले, ‘आपल्या महादूचे दादा हॉस्पिटलात आहेत. मी आजच त्याच्याकडं जाऊन आलो. त्यांना प्लाझ्मा द्यावा लागला. आता त्यांची तब्येत सुधारते आहे हळूहळू... पण वेळ लागेल. मला त्यांच्या उपचारांसाठी पैसे द्यावे लागले राघवा... म्हणून तुझं घड्याळ राहिलं बघ. पण पुढच्या महिन्यात मी नक्की घेणार तुला... आपल्या मारुतीची शप्पथ...’
राघूला एकदम महादूचा चेहरा आठवला. त्याला मित्रासाठी एकदम भरून आलं. त्यानं मनातल्या मनात पुन्हा मारुतीरायाला हात जोडले. ‘शक्ती दे, बुद्धी दे’ हा नेहमीचा मंत्र मनातल्या मनातच परत म्हटला. तेवढ्यात ड्रायव्हर रामकाकांनी बापूंना हाक मारली. ‘राघू, सोड रे आता तुझ्या बापाला... आम्हाला लांबची ट्रिप आहे आज...’ असं ते हसत हसत गाडीतूनच म्हणाले. तशी बापू डबा आणि पैशांची कातडी पिशवी घेऊन लगबगीनं उठले. गाडीचं दार लावून घेताना राघूला म्हणाले, ‘नीट घरी जा रे...’ त्यांनी डबल बेल मारली आणि एसटी भुर्रकन पुढं निघून गेली. खंडीभर धूळ उडाली. फाट्यावर आता कुणीही नव्हतं. राघूला काही लवकर तिथून हलावंसं वाटेना. तो तिथंच बसून राहिला. समोरच्या वडाच्या झाडाकडं एकटक बघत बसला. त्या पारंब्यांतून, पानांतून वेगवेगळे आकार शोधण्याचाही त्याला नाद होता. त्याला आता तिथं सारखं घड्याळच दिसायला लागलं.
तेवढ्यात लांबून ‘झुम... झुम...’ आवाज आला. राघूचे कान टवकारले. मगाच्याच त्या मोठ्या गाड्या आल्या असणार! राघू नीट लक्ष देऊन बघू लागला. तेवढ्यात एक गाडी एकदम तिथं येऊन थांबलीच. करकचून ब्रेक मारत उभी राहिली. काळी काच खाली झाली. ‘अरे ओ बेटा, वो माची पर जानेवाला रास्ता कहाँ से है? हम रास्ता भटक गए है...’ कुणी तरी आतून बोलत होतं. राघू नीट जवळ गेला आणि तीन ताड उडाला. बघतो तो काय! साक्षात विराट कोहली होता कारमध्ये... पलीकडं ड्रायव्हर होता. काळा गॉगल आणि पांढरा टी-शर्ट घातलेला विराट राघूलाच पत्ता विचारत होता. भानावर यायला राघूला दोन मिनिटं लागली.
‘विराट ‌ऽऽऽऽऽ’ राघू किंचाळलाच. ‘हां बेटा, मैं ही हूँ... किसी को बोलना मत... हम यहाँ जरा आराम करने आए है... बताओ तो माची पर कहाँ से रास्ता है?’
‘वो... वो... यहाँ से...’ राघूनं फाट्याच्या बाजूनं बोट दाखवलं.
‘तुम्हे रास्ता पता है? एक काम करो... हमारे साथ आओ... बैठो गाडी में... रास्ता दिखाओ जरा..’
आता तर राघूला गगन ठेंगणं झालं. त्याला काय करावं ते समजेनाच. विराटनं दार उघडलं आणि त्याला आत बोलावलं. राघूला त्यानं चक्क मांडीवर घेतलं. राघूला आता चक्कर यायचीच बाकी होती. त्यानं रस्ता दाखवला. फाट्याच्या आत सुभेदारकाकांची केबिन दिसताच, ड्रायव्हर म्हणाला, ‘यही रास्ता है साब... हम आ गयें...’
रस्त्यात राघू एकटक विराटच्या हातातल्या काळ्या वस्तूकडं बघत होता. ते घड्याळ आहे का नक्की काय ते त्याला कळत नव्हतं. केबिनपाशी गाडी आल्यावर राघू खाली उतरला. न राहवून त्यानं विचारलं, ‘यह आप ने हाथ में क्या बांधा है?’
‘अरे ये स्मार्ट वॉच है... चाहिये क्या?’ असं म्हणत विराटनं चक्क ते काळं घड्याळ काढून राघूच्या हातात दिलं. न राहवून सुभेदारकाकांनी टाळ्याच वाजवल्या. ‘बहोत होशियार लडका है ये काका,’ विराट म्हणाला. त्यांची गाडी सुरू झाली आणि बघता बघता डोंगराच्या दिशेनं नाहीशी झाली.
सुभेदारकाका म्हणाले, ‘लकी आहेस गड्या...’
तेवढ्यात त्यांच्या केबिनमधल्या रेडिओवर गाणं सुरू झालं - अपना टाइम आएगा... अपना टाइम आएगा...राघू त्या तालावर उड्या मारायला लागला आणि टायगरही दोन पाय वर करून त्याला साथ देऊ लागला. सुभेदारकाकांच्या डोळ्यांत पाणी होतं...

---

(पूर्वप्रसिद्धी : युनिक फीचर्सचा ‘पासवर्ड’ दिवाळी अंक २०२१)

---

31 Jan 2022

चपराक दिवाळी अंक २०२१ - लेख

जीपीपीचे दिवस...
----------------------

दर वर्षी १५ सप्टेंबरला इंजिनीअर्स डे साजरा होतो. हा दिवस उजाडला, की माझ्या काळजात उगाच धडधडतं. पुण्यातल्या गणेशखिंड रोडवरची गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकची भव्य इमारत दिसू लागते. त्या दगडी इमारतीचे लांबच लांब कॉरिडॉर आणि त्यात हरवून गेलेला गावाकडचा एक १६ वर्षांचा कावराबावरा मुलगाही दिसू लागतो... डिप्लोमा इंजिनीअरिंगला जाऊनही इंजिनीअर न झालेल्या त्या मुलाची, अर्थात माझीच ही कथा आहे... कथेचा काळ आहे १९९१ ते १९९५...
मी १९९१ मध्ये दहावी झालो. बरे मार्क होते. तेव्हा ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्यांनी एक तर सायन्सला जायचं किंवा डिप्लोमा इंजिनीअरिंगला जायचं, अशी प्रथा रूढ होती. मला ८७.२८ टक्के पडले होते. त्यामुळं मी पुण्यात गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकला येणार, हे जणू विधिलिखितच होतं. तसा मी पुण्यात आलो. माझा जन्म या शहरातला नसला, तरी फार लहानपणापासून मी आत्याकडं पुण्यात येत होतो. त्यामुळं पुणेकर मुलांसारखीच माझीही सुट्टी सारसबाग, पेशवे उद्यान, फुलराणी, शनिवारवाड्यावरची भेळ इ. इ. या प्रकारेच जायची. त्यामुळं पुणं नवीन नव्हतंच. तेव्हा संधी मिळताच इथं यायचं, याची जणू मनात खूणगाठच बांधली होती. त्याप्रमाणे आलो. जुलैतले पुण्यातले ओलेते दिवस खरं तर फार रोमँटिक... मात्र, त्या भव्य कॉलेजात पाऊल टाकताच माझी छाती जी दडपून गेली, ती शेवटपर्यंत! त्यामुळं हा पाऊस, ती ओली झाडं, चिंब दगडी भिंती यांची आणि समोरच्या लेक्चरमधलं आपल्याला काहीही कळत नाहीय, ही भीती यांची एक विचित्र सांगड माझ्या मनात बसली आहे. पुढे किती तरी वर्षं मी जुलै-ऑगस्टचा पाऊस एंजॉय करू शकलो नव्हतो. मराठी माध्यमात शिकलेला मी, इथं पहिल्या दिवसापासून इंग्लिश मीडियममध्ये चालणारा इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रम शिकताना पूर्ण बावचळून गेलो होतो. लेक्चरमधलं काही कळत नसलं, तरी आमचं वर्कशॉप मला आवडायचं. घरच्यांनी उत्साहात सायंटिफिक कॅल्क्युलेटर, मिनी ड्राफ्टर आदी आयुधं अप्पा बळवंत चौकातून आणून दिली होती. घरून पाचशे रुपये महिना पॉकेटमनी मिळायचा. होस्टेलच्या शेजारीच मेस होती. तिला अडीचशे की २६० रुपये महिन्याचे भरावे लागायचे. जेवण अर्थात अत्यंत बेचव! पण त्यामुळंच पुण्यातली हॉटेलं पालथी घालायची संधी मिळाली ती तेव्हापासून! तेव्हा युनिव्हर्सिटी चौकात फाउंटन होतं. (त्याला कारंजं नाही, तर ‘फाउंटन’ असंच म्हणायचं असतं.) आम्ही संध्याकाळी विरंगुळा म्हणून फाउंटनला जाऊन बसायचो. मेसचा कंटाळा आला, की तिथंच काही तरी खायचो. संध्याकाळी एक काकू तिथं पोळी-भाजी विकायला यायच्या. रस्त्यावरच टेबल टाकून पोळी, एक भाजी, सोबत एखादी कोशिंबीर आणि कांदा-टोमॅटो त्या द्यायच्या. किंमत पाच रुपये! आम्हाला अगदीच परवडायचं. मी आणि माझा मित्र सुमंत बऱ्याचदा मेसला दांडी मारून ही पोळी-भाजी खायचो आणि फाउंटनवर बसून राह्यचो. पलीकडे पाषाण रोडला चौपाटी होती. तिथं संध्याकाळी तुफान गर्दी व्हायची. ‘मिलाप’ नावाची पावभाजी फार फेमस होती. अगदी वेटिंग असायचं त्याच्याकडं. आम्हाला ती वीस रुपयांची पावभाजी महाग वाटायची पण तेव्हा! कधी तरी खायचो. अंडाभुर्जी पहिल्यांदा खाल्ली ती इथंच!
फाउंटनचा कंटाळा आला, की चतु:शृंगीला जाऊन बसायचो... ती मागेच होती अगदी आमच्या. फिरोदियांच्या बंगल्यावरून एक गल्ली थेट चतु:शृंगीच्या समोर निघते. पूर्वी सेनापती बापट रोड अगदी लहान होता. मला आठवतं तसं तेव्हा दुभाजकही नव्हता. (बहुतेक १९९४ च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या वेळी पुणे शहरात ज्या भरपूर सुधारणा झाल्या, तेव्हा हा रस्ता रुंद करून दुभाजक बसविण्यात आला.) युनिव्हर्सिटी रोड मात्र मोठा आणि दुभाजक असलेला होता. महत्त्वाचं म्हणजे मला आवडायचे ते सोडियम व्हेपरचे दिवे त्यात मधोमध बसवलेले असायचे. सोडियम व्हेपरचे दिवे ज्या गावातल्या रस्त्यांच्या मधोमध आहेत, तेच खरं ‘शहर’ अशी माझी ठाम समजूत आहे. (आताचे पांढरे दिवे मला ॲनिमिक वाटतात. त्या सोडियम व्हेपरच्या पिवळ्याधमक दिव्यांमध्ये शहर गाभाऱ्यातल्या देवीसारखं तेजस्वी आणि ओजस्वी दिसायचं! असो.) चतु:शृंगीवरून सोडियम व्हेपरमध्ये लखलखणारं पुणं स्वर्गीय भासायचं. गर्दीतही एकांताची साधना व्हायची ती इथंच!
गणेशखिंड रोडवर रेंजहिल्स कॉर्नरला एका झाडाखाली पार आणि सार्वजनिक वाचनालय होतं. मी कित्येकदा ‘टीपी’ म्हणून तिथं जाऊन ज्येष्ठ नागरिकांच्या जोडीनं पेपर वाचत बसत असे. तिथंच एक सार्वजनिक टेलिफोन बूथ होता. त्यात एक रुपया टाकून फोन करता येत असे. एकदा मी आगाऊपणा करून थेट पु. लं.ना तिथून फोन लावला होता. हातात एक रुपयाची चार-पाच नाणी होती. सुनीताबाईंंनीच फोन उचलला. ‘भाईकाका आहेत का?’ मी विचारलं. त्यावर त्या ‘कोण बोलतंय?’ असं म्हणाल्या. मी नाव-गाव सांगितलं. पुढच्या मिनिटाला पु. ल. फोनवर आले. मी त्या रस्त्यावरच्या गोंगाटात साक्षात पुलंशी बोलत होतो. माझे सगळे प्राण कानात आले होते. पु. ल. म्हणाले, ‘काय नाव तुझं?’ मी पुन्हा नाव सांगितलं. ‘शिकतोय,’ असं सांगितलं. तुमचं सगळं साहित्य मला आवडतं, हेही सांगितलं. त्यावर ‘जे वाचलं त्यापैकी काय आवडलं?’ असंही त्यांनी विचारलं. मी ‘सगळंच’ असं म्हटल्यावर ते मंदसे हसले. पुढं काय बोलावं ते न समजून, काही निरोपाचं जुजबी बोलून मी फोन ठेवून दिला. रेंजहिल्स कॉर्नरचा तो पार आणि तो फोन अर्थातच आता तिथं नाही. पण माझ्या मनात तिथं पुलंच्या आठवणींची स्मृतिशिला कायमची कोरली गेली आहे.
मला गाड्यांचे नंबर बघायचा आणि त्यात काही तरी सिक्वेन्स शोधण्याचा नाद होता. मी त्या पारावर बसून येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांचे नंबर बघत असे. तेव्हा एमएच -१२, एमएच - १४ असे क्रमांक देण्याची पद्धत नुकतीच सुरू झाली होती. त्यापूर्वी ‘एमएई’, ‘एमटीएफ’ वगैरे अशा सीरियल असत. पुण्यात वाहनांची नोंदणी तुफान होत असल्यानं पुण्याची सीरियल एमएच १२ - ‘पी’पर्यंत गेली होती. नगरला तेव्हा ‘बी’ किंवा ‘सी’च सीरियल चालू होती. मी ‘पी’ सीरियलवाल्या गाड्यांकडं डोळे विस्फारून पाहत असे. भारतानं १९९१ मध्ये जागतिकीकरण स्वीकारलं होतं. त्याचे दृश्य बदल तेव्हा अजून दिसायचे होते आणि ते कळायचं माझं वयही नव्हतं. अगदी किंचित, धीम्या गतीनं जग बदलत होतं. तेव्हाचं पुणं तुलनेनं खरोखर आटोक्यात होतं आणि फार फार सुंदर होतं. सिमला ऑफिस चौकातून विद्यापीठाकडं जायला निघालं, की दोन्ही बाजूंनी वड, पिंपळ अशा मोठ्या झाडांची दाट रांग होती. ॲग्रीकल्चर कॉलेज चौकापर्यंत तर दुभाजकही नव्हता. तो त्यापुढे सुरू व्हायचा. तो रस्ताही विद्यापीठ चौकापर्यंत अगदी मर्यादित रहदारीचा आणि त्यापुढे तर अगदी शांत शांत असायचा.
‘बी-२८’ हा माझा होस्टेलचा पत्ता होता. इथंच मला शान्ताबाई शेळके आणि वसंत कानेटकरांचं पत्र आलेलं. (म्हणजे आधी मी त्यांना पत्रं पाठवली होती, त्यांची उत्तरं!) होस्टेलच्या खाली एका लाकडी फ्रेममध्ये कापडी पट्ट्यांमध्ये पत्रं लावलेली असत. अनेक मुलं रोज तिथं आपलं पत्र आलंय का हे बघायला घिरट्या घालत. मला बहुतांश कॉलेज बोअरच होत असे. मग मी तिथंच खाली पडलेले पेपर वाचत तासन्-तास बसत असे. आपल्याला दुसऱ्या कुणाची गरज नाही; आपण आपला जीव स्वत: रमवू शकतो, हा फार महत्त्वाचा शोध मला तिथंच लागला. तिथून जवळपास ‘नार्सिसस’ होण्यापर्यंत माझी मजल गेली, त्यात त्या भयाण होस्टेली वातावरणाचा फार मोठा वाटा होता. होस्टेलवर माझ्यावर रॅगिंग वगैरे झालं नाही. मी अगदीच गरीब, सोवळा नव्हतो. गावाकडच्या अत्यंत गावरान अन् सणसणीत शिव्या तोंडी असायच्या. तब्येतीनंही अगदी बारकुडा वगैरे नव्हतो. माझ्याहून बारीक दिसणारी अनेक मुलं असायची. त्यामुळं माझ्या वाट्याला कुणी फारसं जायचं नाही. रूम-पार्टनरही चांगले होते. नीलेश नगरकर आणि महेश जाधव हे माझे फर्स्ट इयरचे पार्टनर. पैकी नीलेशशी मैत्री कायम टिकली. अगदी आजही!
वर्गातली लेक्चरं मला बोअर व्हायची. म्हणजे काही कळायचंच नाही. आपण इथं काय करतोय असं वाटायचं. त्यातल्या त्यात वर्कशॉपमध्ये प्रॅक्टिकल असायची, ती मला आवडायची. लेथ मशिनवर जॉब करणं पहिल्या वर्षी सक्तीचं होतं. मी मन लावून ते करायचो. कारपेंटरी, लोहारकाम हेही केलं. इलेक्ट्रिकलची प्रॅक्टिकल वेगळीकडं असायची. का कोण जाणे, पण इलेक्ट्रिकलला चांगल्या पोरी असायच्या. आमची मेकॅनिकल ब्रँच होती. आमच्या वर्गात केवळ दोन की तीन मुली होत्या. बाकी काही बोलायलाच नको. त्यामुळं आमचं लक्ष कॉमन प्रॅक्टिकलकडं असायचं. आम्ही गावाकडची पोरं नुसतेच त्या गोऱ्यागोमट्या पोरींकडं बघत बसायचो. डे-ड्रीमिंग की काय म्हणतात, ते हेच असावं. त्यात त्या मुली इलेक्ट्रिकलच्या असल्यानं ‘दिवास्वप्न’ हे म्हणणं शब्दश: खरं ठरायचं. तेव्हा मुलग्यांमध्ये होस्टेलची पोरं आणि सिटीतली पोरं अशी एक अघोषित फाळणी ठरलेलीच असायची. या स्मार्ट पोरी सिटीतल्या पोरांना घोळात घेऊन त्यांच्याकडून प्रॅक्टिकलमधले स्वत:चे जॉब करवून घ्यायच्या. ती पोरंही वर्कशॉपमध्ये शब्दश: रंधा मारत बसलेली असायची. आमच्या कँटीनमध्ये एक मुलगा व एक मुलगी सोबत चहा घेत बसले असले, तरी आम्ही त्यांच्याकडे टक लावून बघत बसायचो. तेव्हा एक रुपयाला चहा आणि एक रुपयाला वडापाव मिळायचा. आमच्या कँटीनमधला वडापाव बरा असायचा. आम्ही अनेकदा तो खायचो. पण एकदाही एकाही मुलीला चहासाठी विचारण्याची हिंमत झाली नाही. माझीच नव्हे, तर माझ्यासारख्या गावावरून आलेल्या कोणत्याच मुलाची... बहुदा आम्ही त्या वातावरणानंच निम्मेअर्धे दडपून गेलो होतो.
आम्हाला शिकवायला जे सर होते किंवा ज्या मॅडम होत्या ते मात्र सगळेच्या सगळे भारी होते. त्यातल्या एक मॅडम तर अत्यंत देखण्या होत्या. बॉबकटवाल्या, गोऱ्या अशा! त्यात ‘स्लीव्हलेस’ घालून शिकवायला यायच्या. त्यामुळं ‘स्लीपलेस इन जीपीपी’ अशी माझी (आणि बऱ्याच पोरांची) अवस्था व्हायची, यात शंका नाही. खरं तर आम्ही सेकंड इयरला गेल्यावर या मॅडमची मुलगी आमच्याच कॉलेजात फर्स्ट इयरला आली. पण त्या दोघींत मॅडमच उजव्या होत्या, याबाबत पोरांचं एकमत होतं.
असलं सगळं असल्यावर पहिल्या वर्षी जे व्हायचं तेच झालं. दांडी उडाली. फेल! सपशेल फेल... पुन्हा घरी नगरला जायची लाज वाटायला लागली. पुण्यातच राहिलो. ‘उद्यान प्रासाद’जवळ तेव्हा भिडे क्लासेस फेमस होते. डिप्लोमाची सगळी पोरं तिकडंच जायची. मग मीही तो क्लास लावला. होस्टेल मिळायचा प्रश्नच नव्हता. मग आळंदी रोडवर आत्याच्या फ्लॅटमध्ये राहायला गेलो. सदाशिव पेठ ते आळंदी रोड सायकलवर जायचो. एकटाच त्या फ्लॅटमध्ये भुतासारखा राहायचो. आता कल्पना करूनही अंगावर काटा येतो. पण तेव्हा नापास झाल्याचा गिल्ट फार होता. पहिल्या वर्षीचे पेपर सुटले आणि दुसरं वर्ष सुरू झालं. तोवर बाबरी मशीद पडली होती आणि मुंबईतल्या दंगली आणि १२ मार्चचे बॉम्बस्फोट घडून गेले होते. आमचं दुसरं वर्ष सुरू झालं आणि त्या गणपतीत लातूरचा महाभयंकर भूकंप झाला. तेव्हा ‘संध्यानंद’ पेपर नवीन सुरू झाला होता. दुपारी तो पेपर आला आणि ‘लातूर भूकंपात पाच हजार ठार’ वगैरे हेडलाइन वाचून आम्ही नेहमीप्रमाणे ‘संध्यानंद’ला हसलो. मात्र, संध्याकाळी रेडिओच्या बातम्या ऐकल्या आणि मृतांची संख्या याहूनही किती तरी जास्त असल्याचं कळल्यावर ‘संध्यानंद’च्या बातमीचं महत्त्व कळलं.
पहिल्या वर्षी फिजिक्सला उमराणी सर होते. सर्व शिक्षकांत हे माझे सर्वांत आवडते होते. ते केवळ पुस्तकी शिकवायचे नाहीत. आजूबाजूचं काय काय सांगायचे. मुलांनी चांगलं वाचावं, चांगलं पाहावं, चांगलं ऐकावं याकडं त्यांचा कटाक्ष असे. चांगले इंग्लिश सिनेमे पाहा, असं आवर्जून सांगणारे मला भेटलेले हे पहिलेच सर! अगदी ‘फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट’चं उदाहरण देताना ‘पीसीएच’मध्ये (डेक्कनवरचं तेव्हाचं प्रसिद्ध पूना कॉफी हाउस) असे नळाखाली हात धरल्यावर सुरू होणारे नळ आहेत, ते जाऊन पाहा, असं आवर्जून सांगत. मला ते ऐकून फार उत्सुकता वाटलेली; पण एकदाही तिथं जाण्याची हिंमत झाली नाही.
मॉडेल कॉलनीत तेव्हा शारंगपाणी सरांचा गणिताचा क्लास होता. मी संध्याकाळी तिथं जाऊन बसायचो. क्लास लावूनही इंजिनीअरिंगचं इंग्लिशमधलं गणित काही केल्या सुटलं नाहीच. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेशननं फार डोकं खाल्लं. काहीच जमायचं नाही. पण हे सर गप्पीष्ट होते. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायचे. निवृत्त झालेले, आजोबा टाइप असे ते होते. म्हणून आवडायचे. मी त्यांच्या गप्पा ऐकायलाच जायचो तिथं.

तेव्हा ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्स नव्हतं. आम्हाला सर्वांत जवळ होतं ते राहुल ७० एमएम. (हे नाव असं एकत्रच उच्चारायचं!) ‘राहुल’ची फार शान होती तेव्हा. आम्ही सायकलवरून तिथं जायचो. गणेशखिंड रोडवर सगळा उतारच असायचा. चार पायडल मारले, की सायकल ‘राहुल’च्या दारात! तेव्हा अनेक लोक सायकली वापरायचे. त्यामुळे बहुतेक थिएटरमध्ये आत रीतसर सायकल स्टँड असत. तिथं सायकल लावायची. तेव्हा पार्किंगला एक रुपया घ्यायचे. आम्ही १६-१७ वर्षांची मुलं... कधी आत सोडायचे, कधी नाही! पण चुकून आत सोडलंच तर मज्जाच असे आमची... ‘प्रौढ शिक्षणा’चे खरे धडे गिरवले ते तिथं! अर्थात नेहमी तिथंच सिनेमा पाहायचो असं नाही. कधी ‘अलका’ला, तर कधी ‘प्रभात’ला ‘माहेरची साडी’ही बघायचो. ‘डेक्कन’वर आता आर डेक्कन मॉल उभा आहे तिथं पूर्वी डेक्कन टॉकीज होती. अगदीच साधी. वर बहुतेक सिमेंटचे पत्रे असावेत. छोटीशी बाल्कनी होती. तिथं मॅटिनीला कायम ‘घायल’ लागलेला असायचा. आम्हा पोरांना ती पर्वणीच. आम्ही कित्येकदा सायकली काढून तिथं ‘घायल’ला जाऊन बसायचो. सात किंवा दहा रुपये तिकीट असायचं. बाल्कनीत झुरळं फिरायची. पण चिडलेल्या सनीसमोर आम्हाला त्याची फिकीर नसायची. अनेक प्रेमीयुगुलांचंही हे हक्काचं ठिकाण होतं.
पहिल्या वर्षाची अजून एक आठवण आहे. तेव्हा म्हणजे १९९२ च्या सुरुवातीला पुणे महापालिकेच्या निवडणुका होत्या. निवडणुकीसाठी मतदानाचं वय नुकतंच १८ करण्यात आलं होतं. आमच्या मॉडेल कॉलनीचा तेव्हा ११० नंबरचा प्रभाग होता. महापौरपद भूषविलेले काँग्रेसचे एक माननीय त्यांचा नेहमीचा वॉर्ड महिला राखीव झाल्यानं या वॉर्डातून उभे होते. ते एकदा होस्टेलवर आले आणि त्यांनी सर्व मुलांना मतदान करण्यासाठी येण्याचं आवाहन केलं म्हणे. (कारण ते आले तेव्हा मी होस्टेलला नव्हतो.) आमच्यातली फर्स्ट व सेकंड इयरची बरीचशी म्हणजे ९० टक्के मुलं दहावीनंतर आली होती आणि त्या सर्वांचं वय १८ पेक्षा कमीच होतं. मात्र, गंमत म्हणजे या माननीयांनी सर्व पोरांची नावं मतदारयादीत घातली आणि बऱ्याच मुलांनीही अल्पवयातच मतदान केलंही! मी मात्र नावही नोंदवलं नाही आणि अर्थात मतदानालाही गेलो नाही.
आमचं जीपीपीचं ग्राउंड चांगलं मोठं होतं. आमच्या ए आणि बी या होस्टेलच्या समोरच हे मैदान होतं. आमच्या कॉलेजची बरीचशी मुलं या मैदानावर क्रिकेट खेळत. आमच्या वर्गात बोडस नावाचा मुलगा होता. त्याचं पहिलं नाव विसरलो. तो अप्रतिम ऑफ स्पिन टाकायचा. तो माझा मित्र होता. त्याच्यामुळंच एकदा मलाही मैदानात उतरण्याची संधी मिळाली. तोवर मी गावाकडं भरपूर क्रिकेट खेळलो असलो, तरी प्रॉपर पॅड बांधून, इनर गार्ड लावून बॅटिंगला उतरण्याची ही पहिलीच वेळ होती. मी फार भाव मारून घेतला. बॅटिंगला उभा राहिलो आणि पहिलाच चेंडू सूं सूं... करीत कानाजवळून गेला तेव्हा खरं क्रिकेट कळलं. मी कशाबशा तीन-चार धावा केल्या आणि आउट झालो एवढंच आठवतंय. त्यानंतर पुन्हा मला टाइमपास म्हणूनदेखील संघात घेण्याचं धाडस बोडसला झालं नसावं.
खेळाचं मैदान गाजवू शकलो नसलो, तरी गॅदरिंगच्या वेळी झालेली क्विझ कॉम्पिटिशन मी गाजवली. माझं ‘जीके’ उत्तम होतं आणि त्या जोरावर मी पहिल्यांदाच मेकॅनिकलला विजेतेपद मिळवून दिलं. या प्रसंगानंतर वर्गात माझा भाव वधारला. पहिल्या वर्षाला आमच्या गॅदरिंगला प्रमुख पाहुणे म्हणून द. मा. मिरासदार आले होते. त्यांच्या हस्ते मला आणि फाटकला क्विझचं पहिलं बक्षीस मिळालं. जीपीपीमधल्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या सुखद आठवणींमधला हा एक प्रमुख क्षण होता. त्याच गॅदरिंगला थर्ड इयर इलेक्ट्रिकलच्या संदीप खरे नावाच्या मुलानं स्वत: पेटी वाजवत, स्वत:च लिहिलेली आणि संगीत दिलेली ‘मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यांत’ ही भन्नाट कविता ऐकवली होती, तेव्हा आम्ही पोरं वेडेच व्हायचे बाकी राहिलो होतो. नंतरच्या वर्षी राजा गोसावी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. (किंवा उलटही असेल. आता आठवत नाही.) असो.
दुसऱ्या वर्षीही नापास झालो आणि घरी आलो. त्या काळात नगरला ‘लोकसत्ता’त प्रूफरीडर म्हणून काम मिळालं आणि आयुष्याला कलाटणी मिळाल्यासारखं झालं. त्या एका वर्षात आपल्याला काय येतंय आणि आपण काय केलं पाहिजे, याचं नेमकं आकलन झालं. तरीही थर्ड इयर सुरू झाल्यावर पुन्हा कॉलेजला आलो आणि शिकायला लागलो. आता पुन्हा नवी बॅच सोबत होती. माझ्याबरोबरची सगळी मुलं पास होऊन पुढं निघून गेली होती. पहिल्या दोन महिन्यांतच जबरदस्त फ्रस्टेशन आलं. त्यात पाऊस सुरू झाला. त्या ओल्याचिंब वातावरणात दगडी इमारती पुन्हा अक्राळविक्राळ हसत, खदाखदा फेर धरून नाचू लागल्या. दुसऱ्या दिवशी मशिन डिझाइनची टेस्ट होती. त्या मॅडम भलत्याच कडक होत्या. त्यांच्या धाकाने तर आणखीन गळून गेल्यासारखं झालं. बाहेर वेड्यासारखा पाऊस कोसळत होता. एका क्षणी मनानं ठरवलं, की बास्स! आता नाही हे शिकायचं... हे आपल्याला येणार नाही, जमणार नाही. त्यापेक्षा पेपरमध्ये काम करायचं. जिथं काम करण्यात आनंद मिळतो तेच काम करायचं. कुठून बळ आलं, कुणास ठाऊक! सरळ गादी गुंडाळली, सामान बांधलं, बादली घेतली, सायकल घेतली आणि रिक्षा करून शिवाजीनगरला आलो. तिथून एसटीनं थेट घरी! घरच्यांना धक्काच बसला. मी किमान थर्ड इयर पूर्ण करून पदविका पदरात पाडून घ्यावी, असं त्यांचं रास्त म्हणणं होतं. मात्र, मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. दुसऱ्या दिवशी जाऊन ‘लोकसत्ता’च्या ऑफिसमध्ये हजर झालो आणि सांगितलं, मला काम द्या... सगळं सोडून आलोय.
त्या दिवसापासून मी आजतागायत ‘जीपीपी’च्या आवारात पाऊलही ठेवलेलं नाही. माझं टीसी अजूनही तिथंच आहे. त्या कॉलेजपाशी काही तरी सोडून यायला हवं ना, म्हणून ते ट्रान्स्फर सर्टिफिकेट तिथंच ठेवलंय. आज २५हून जास्त वर्षं होऊन गेली. त्या कॉलेजच्या आवारात पाऊल ठेवलं नसलं तरी काय झालं! तिथं मी आयुष्यातली महत्त्वाची अशी चार वर्षं काढली आहेत. वय वर्षं १६ ते २०! ती कशी विसरणार? आणि त्या दिवसांनी मला काहीच दिलं नाही, असं म्हणणं तर फार मोठा अपराधच ठरेल. पुढच्या सगळ्या दिशा आणि मार्ग अचूक आले, याचं श्रेय या पहिल्याच चुकलेल्या वळणाला नको का द्यायला?



-----

(पूर्वप्रसिद्धी : साहित्य चपराक दिवाळी अंक २०२१)

---

30 Jan 2022

दृष्टी-श्रुती दिवाळी अंक २०२१ - लेख

माझ्या तीन हिरोंची गोष्ट...
------------------------------

मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म घेतल्यानं लहानपणापासूनच सतत मान वर करून कुठल्या ना कुठल्या आदर्शांकडं बघायची सवयच लागली. आयुष्यात त्याच्यासारखं झालं पाहिजे, याच्यासारखं दिसलं पाहिजे, अमक्यासारखं मोठं झालं पाहिजे, तमक्यासारखं कमावलं पाहिजे, ढमक्यासारखं जगता आलं पाहिजे, या आणि अशाच 'अटी व शर्ती लागू'चा स्टार जन्मापासूनच आपल्या नावापुढं गोंदला जातो. संस्कार नावाची आणखी एक फार महत्त्वाची भानगड लहान वयातच आयुष्यात उपस्थित झाली होती. 'आपल्याकडं असं करत नाहीत,' हे तर आपल्या जीवनगाण्याचं ध्रुवपदच! तेव्हा त्या काळात जे हिरो वाटले, ते नक्की आपल्याला मनापासून वाटले, की या संस्कारांमुळं हेच आपले हिरो असं वाटलं, हे आता सांगता येणं कठीण आहे.
पं. जवाहरलाल नेहरू हे अगदी लहान वयातले माझे पहिले हिरो. याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्याप्रमाणेच माझा जन्मही १४ नोव्हेंबरचा. त्यामुळं अगदी लहान वयापासून वाढदिवसाच्या वेळी नेहरूंची आठवण कुणी ना कुणी काढायचंच. माझा जन्म झाला तेव्हा नेहरूंना जाऊन अवघी ११ वर्षं झाली होती. माझ्या आईचे नेहरू हे फार लाडके होते. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या व वाढलेल्या पहिल्या पिढीची ती प्रतिनिधी असल्यानं त्या पिढीबाबत हे अगदी स्वाभाविक होतं. नेहरू गेले तेव्हा आपण ती बातमी रेडिओवर कशी ऐकली आणि नंतर दिवसभर कशा रडत होतो याची हकीकत आईकडून अनेकदा ऐकली होती. नेहरूंच्या मुलीची देशात सत्ता असताना मी शाळा शिकायला सुरुवात केल्यानं इतिहासात नेहरूंबाबतचे धडे आणि एकूणच त्यांची थोरवी मी सतत वाचत आणि ऐकत होतो. नंतरही शाळेमध्ये बालदिन साजरा करताना, त्यांच्याविषयीची भाषणं करताना आणि ऐकताना 'चाचा नेहरूं'विषयीचं माझं प्रेम ओसंडून वाहत असे. मी पुढं नगरला शिकायला आलो तेव्हा १९८९ मध्ये नेहरूंची जन्मशताब्दी आली. नेहरूंचा नातू तेव्हा देश चालवीत असल्यानं देशभर अगदी जोरदारपणे ही जन्मशताब्दी साजरी झाली. शाळाशाळांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले. 'अपना उत्सव' नावाचा एक मोठा उत्सव साजरा होत होता. लालटाकी इथं नेहरूंचा पूर्णाकृती पुतळा आहे. तिथं सुंदर कारंजंही होतं त्या काळी. समोरच अप्पू हत्तीचा एक पुतळा होता. तिथं झालेल्या कार्यक्रमात आम्ही नववीची मुलं सहभागी झाल्याचं आठवतंय. त्यात नगरच्या किल्ल्यात नेहरूंना ठेवलं होतं, तिथं आम्ही अनेकदा जायचो. 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ नेहरूंनी तिथंच लिहिला होता. त्यांची खोली, त्यांच्या वापरातल्या वस्तू बघून भारावून जायचो. अनेकदा रडू यायचं. एकूणच शालेय वयापर्यंत नेहरूंची मोहिनी मनावर कायम होती. पुढं मी पुण्यात शिकायला आल्यानंतर इथं आयुष्यभर काँग्रेसला व त्यांच्या नेत्यांना शिव्याशाप देणारी अनेक माणसं भेटली. त्यातली तर काही माझी जवळची आप्तमंडळी होती. तोवर माझी स्वतःची अशी कुठलीही राजकीय विचारसरणी तयारही झाली नव्हती. गांधी-नेहरू, पटेल, आंबेडकर आणि सावरकर हे सर्वच मला सारखे होते. माझ्या लेखी हे भारताचे थोर सुपुत्र होते. मात्र, नेहरूंना प्रचंड शिव्याशाप देणारी माणसं भेटली आणि मी थक्क झालो. आपल्या हिरोला नावं ठेवणारे लोक आपल्याच आजूबाजूला विपुल संख्येनं आहेत, याचा धक्कादायक साक्षात्कार मला तेव्हा झाला. हळूहळू इतिहासाची वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली पुस्तकं वाचली. आपल्या हिरोच्या कार्यकर्तृत्वाला दुसरीही बाजू असू शकते, हे लक्षात यायला लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची नेहरूंची मतं समजल्यावर स्वाभाविकच वाईट वाटलं. महाराजांबद्दलचं त्यांचं आकलन एवढं कसं चुकीचं असू शकतं, याचं आश्चर्यही वाटायचं. स्वातंत्र्यलढा, काँग्रेस, फाळणी, तेव्हाच्या नेत्यांची व नेहरूंची जीवनशैली, एडविना प्रकरण या सर्वांबद्दल वाचत गेलो आणि आपल्या हिरोचे पायही मातीचे असू शकतात, हे समजू लागलं. माणूस म्हणून त्यांच्याकडूनही काही चुका, काही चुकीचे निर्णय होऊ शकतात, हे लक्षात यायला लागलं. नेहरू मुलांवर प्रेम करीत असले, तरी त्यांचा स्वभाव शीघ्रकोपी होता आणि ते अनेकदा संतापत असत, हे वाचूनही मग आश्चर्य वाटलं नाही. एखादी व्यक्ती समजून घ्यायला ३६० अंशांतून तिच्याकडे पाहायला पाहिजे, हे शिकलो. एवढं सगळं असलं, तरी त्यांच्या चुकांसकट नेहरू आजही आवडतात. एवढ्या उंचीचा, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टेटसमन असलेला माणूस पहिला पंतप्रधान म्हणून आपल्या देशाला लाभला याचा अभिमानच वाटतो.

बालपणीचा माझा दुसरा हिरो होता गावसकर. द ग्रेट लिटल मास्टर सुनील गावसकर. मीच काय, माझी आख्खी पिढीच गावसकरच्या प्रेमात होती. आमच्या घरी तसा उशिरा टीव्ही आला. जानेवारी १९८६ मध्ये ब्लॅक अँड व्हाइट, शटरवाला क्राउन कॅसल टीव्ही घरात आल्यावर, तो सुरू केल्यावर टीव्हीवर सर्वांत पहिलं दर्शन झालं ते गावसकरचं. तेव्हा कुठल्या तरी कसोटी सामन्याचं दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण सुरू होतं. आमच्या गावी आम्ही क्रिकेट सोडून अन्य कुठलाही खेळ खेळलो नाही. शाळेच्या मैदानात आणि आमच्या वाड्यात अशा दोन्ही ठिकाणी आम्ही मित्र सतत फक्त क्रिकेट आणि क्रिकेटच खेळत असायचो. तेव्हा वृत्तपत्रांमध्ये आलेले क्रिकेटपटूंचे फोटो कापून ठेवायचे हा छंद मला होता. त्यात सर्वाधिक फोटो गावसकर, कपिल देव आणि वेंगसरकर यांचे होते. गावसकरच्या दहा हजार धावा पूर्ण झाल्या, तेव्हा पेपरमध्ये आलेला फोटो मी कापून ठेवला होता. त्याची ती स्कल कॅप घातलेले तर अनेक फोटो माझ्याकडे होते. भारतीय संघ कितीही अडचणीत आला, तरी गावसकर मैदानात आहे तोवर काही भीती नाही, असं वाटायचं. मी १९८७ च्या पाकिस्तान दौऱ्यातील बंगळूर कसोटी तर आयुष्यात कधीही विसरणार नाही. पाच कसोटींची ती मालिका होती व पहिल्या चारही कसोटी अनिर्णित राहिल्या होत्या. पाचवी व निर्णायक कसोटी बंगळूरमध्ये सुरू होती. कपिल भारताचा, तर इम्रान खान पाकिस्तानचा कर्णधार होता. बंगळूरच्या त्या आखाडा खेळपट्टीवर आपली चौथ्या डावात बॅटिंग होती. तौसिफ अहमद आणि इक्बाल कासिम यांचा फिरकी मारा दोन्ही बाजूंनी सुरू होता. एका बाजूने आपले एकेक खंदे फलंदाज बाद होऊन परतत होते आणि एका बाजूला गावसकरनं नांगर टाकला होता. पाचवा दिवस आणि सामन्याची वेळही संपत आली होती. शेवटचा फलंदाज मणिंदरसिंगला जोडीला घेऊन गावसकर खिंड लढवीत होता. त्याचं शतकही जवळ आलं होतं. मणिंदर पहिल्याच चेंडूवर बाद होण्यासाठी कुख्यात होता. इम्रान शेवटच्या चेंडूवर गावसकरला सिंगल धाव घेऊ देत नव्हता. अत्यंत टेन्स अशी ती कसोटी मी टीव्हीवर पाहत होतो. अखेर दुर्दैवानं गावसकर ९६ धावांवर स्लिपमध्ये झेल देऊन बाद झाला आणि आपण ती कसोटी हरलो. मात्र, माझ्या मते गावसकरची ती सर्वोत्कृष्ट कसोटी खेळी होती. आमच्या गावात उत्कृष्ट दर्जाचं वाचनालय असल्यानं खूप वेगवेगळी पुस्तकं वाचायला मिळायची. त्या काळात मी गावसकरची (बाळ ज. पंडित यांनी मराठीत अनुवाद केलेली) सनी डेज, रन्स अँड रुइन्स, वन डे वंडर्स, आयडॉल्स ही पुस्तकं अधाशासारखी वाचून काढली होती. 'एकच षटकार', 'चौकार' ही क्रीडाविषयक नियतकालिकं तेव्हा प्रसिद्ध होती. वाचनालयात मी ती कायम वाचायचो. त्यात गावसकरचे अनेक किस्से ऐकायला मिळाले. शाळेत गावसकरचा एक धडाही होता. त्यात वेस्ट इंडिजच्या पहिल्याच दौऱ्यात प्रचंड दाढदुखी सुरू असतानाही गावसकरनं कसं शतक ठोकलं, हा भाग होता. पुढं त्याच्या ओव्हलवरच्या ऐतिहासिक २२१ धावांच्या खेळीबद्दलही वाचायला मिळालं. मी प्रत्यक्ष क्रिकेट पाहायला लागल्यानंतर अगदी लवकरच गावसकर निवृत्त झाला. मात्र, १९८७ च्या भारतात झालेल्या रिलायन्स वर्ल्ड कपमध्ये नागपूरला त्यानं न्यूझीलंडविरुद्ध ठोकलेलं शतक मी विसरू शकत नाही. त्यात त्यानं त्या काळाच्या मानानं वेगवान शतक (९४ चेंडूंत) झळकावलं होतं. ते त्याचं वन-डेमधलं एकमेव शतक. इंग्लंडमध्ये १९७५ मध्ये झालेल्या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद ३६ धावांची कुप्रसिद्ध खेळी करणाऱ्या गावसकरचं हे ट्रान्स्फॉर्मेशन थक्क करणारं होतं. झेवियर्समध्ये शिकलेला, उत्तम इंग्लिश जाणणारा, विचक्षण बुद्धिमत्ता आणि अजोड विनोदबुद्धी असलेला गावसकर नंतर कॉमेंटरीमध्ये शिरला तो आजतागायत कॉमेंटरी करतोच आहे. पुढे १९९९ मध्ये राज ठाकरे यांनी पुण्यात शिवउद्योग सेनेतर्फे गणेश कला-क्रीडा मंच येथे आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत गावसकरला प्रत्यक्ष ऐकायची संधी मिळाली. ते गणेश कला-क्रीडा मंच खचाखच भरलं होतं आणि मधल्या रांगेतही लोक बसले होते. गावसकरनं तिथंही तुफान टोलेबाजी केली. नूरजहाँचा तो प्रसिद्ध किस्सा त्यानं याच व्याख्यानात सांगितला होता. आपला संघ पाकिस्तानात गेल्यावर लाहोरमध्ये आपल्या आणि पाकिस्तानच्या टीमला भेटायला नूरजहाँ आल्या होत्या. गावसकरची ओळख करून देताना, ओळख करून देणाऱ्यानं 'हे सुनील गावसकर, यांनी बरेच विक्रम केले आहेत,' वगैरे स्तुतिपर ओळख करून दिली. त्यावर नूरजहाँ यांनी जराशा आढ्यतेनं, 'हम तो सिर्फ इम्रान खान को जानते है' असं उत्तर दिलं होतं म्हणे. मग त्यांची ओळख करून दिल्यावर फटकळ गावसकरनंही, 'हम तो सिर्फ लता मंगेशकर को जानते है' असं उत्तर देऊन बाईंचा तिथल्या तिथं तुकडा पाडला होता. उत्तम नकलाकार असलेल्या गावसकरची कॉमेंटरी ऐकणं हा बौद्धिक आनंद असतो.
असं असलं, तरी या हिरोबाबत काही गोष्टी खटकतातच. एक तर मेलबर्नच्या त्या कसोटीत चुकीचं बाद दिल्यानंतर गावसकरनं चेतन चौहानला घेऊन मैदान सोडणं चुकीचंच होतं. तो गावसकरच्या कारकिर्दीवर बसलेला काळा डाग आहेच. दुसरं म्हणजे मुंबईत सरकारी भूखंड घेऊनही गावसकरनं तिथं क्रिकेट अकादमी सुरू केली नाही. याशिवाय मुंबईच्या खेळाडूंना झुकतं माप देण्याचा आरोप तर बहुतेक मुंबईच्या खेळाडूंवर होतोच. गावसकरही त्याला अपवाद नसावा. कपिल आणि त्याच्यामधलं शीतयुद्ध प्रसिद्ध आहेच. अर्थात हे सगळं जाणल्यावरही आपला हिरोही चुकू शकतो, याचाच पुन्हा प्रत्यय आला आणि त्याच्याविषयीचं प्रेम जराही कमी झालं नाही. जन्मल्याबरोबर एका कोळिणीच्या मुलाबरोबर एक्स्चेंज झालेला हा मुलगा मामाच्या तीक्ष्ण नजरेमुळं पुन्हा आईकडं येतो काय आणि जगाला अचंबित करून सोडणारा पराक्रम गाजवतो काय! गावसकरचं आयुष्य असं भन्नाट आहे. उतारवयातही तो आपल्या आवडीची गोष्ट ज्या उत्साहानं करतोय ती फार हेवा वाटावा अशी गोष्ट आहे.

माझे तिसरे आणि महत्त्वाचे हिरो आहेत अर्थातच पु. ल. देशपांडे. पुलंचा आयुष्यावर एवढा प्रभाव आहे, की ते नसते तर आपण कुणी निराळेच झालो असतो, याची खात्री आहे. पुलंनी आपल्या सगळ्यांनाच काय दिलं आणि त्यांच्यात काय काय गुण होते याची उजळणी मी करणार नाही. ते सर्वविदित आहे. फक्त या हिरोविषयी कधी भ्रमनिरास झाला का, असा प्रश्न आल्यास त्याचं उत्तर 'अजून तरी नाही आणि कदाचित कधीच नाही,' असंच असेल. एखादी व्यक्ती लेखनातून केवळ तुमच्या वागण्या-बोलण्यावर किंवा लिहिण्यावरच परिणाम करते असं नाही, तर तुमच्या एकूण जगण्यावर, जीवनविषयक दृष्टीवरही खूप सखोल परिणाम करते. पुलंनी माझ्यावर (आणि माझ्या पिढीतल्या बऱ्याच जणांवर) असा परिणाम केला आहे, असं म्हणायला जागा आहे. खूप लहानपणी पुलंची भरपूर पुस्तकं वाचल्यानंतर इतर काही पुस्तकं वाचायला गेलं तर ती बोअर होत असत. हे दीर्घ काळ टिकलं. याचा दुष्परिणाम नक्कीच झाला. वाचनातलं वैविध्य लहानपणी तितकं राहिलं नाही. पु. ल. टिपिकल मध्यमवर्गीय होते, त्यांच्या 'व्यक्ती आणि वल्ली'त त्यांना एकही स्त्री-व्यक्तिरेखा रंगवावीशी का वाटली नाही, वगैरे आक्षेप खूप नंतर वाचण्यात आले. मात्र, मला तेव्हा आणि आत्ताही त्यात काही तथ्य वाटत नाही. पुलंची जीवनविषयक दृष्टी अतिशय विशाल आणि उदार होती. एका जागी रमणारा हा माणूस नव्हता. वयाच्या पन्नाशीत बंगाली शिकणारा आणि त्यासाठी शांतिनिकेतनला जाऊन राहणारा, वेळप्रसंगी ठोस राजकीय भूमिका घेणारा आणि वेळीच त्यातून बाजूला होणारा... या त्यांच्या गोष्टी व्यक्ती म्हणूनही खूप अनुकरणीय आहेत. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे पुलंनी आम्हाला विनोदाचं शस्त्र दिलं. आपल्या जगण्यातल्या विसंगतीवर हसत हसत बोट ठेवता आलं पाहिजे आणि तितक्याच खेळकरपणे त्या विसंगती दूर करता आल्या पाहिजेत हे त्यांनीच शिकवलं. पु. लं.चं जगणं मध्यमवर्गीय असलं, तरी विचार तसे कधीच नव्हते. त्यांच्या गंभीर लिखाणातून हे जाणवतं. डाव्या, समाजवादी विचारसरणीचे 'भाई' सर्वच विचारसरणीच्या लोकांना आपलेसे वाटत. याचं कारण, त्यांचे विचार एकांगी नव्हते. माणसाच्या विचारापेक्षा तो माणूस महत्त्वाचा, हे त्यांना ठाऊक होतं. म्हणून ते गांधीजींवरही उत्कट लिहू शकत असत आणि सावरकरांवरही त्याच तोलामोलानं बोलू शकत असत.
वैयक्तिक माझ्या आयुष्यात त्यांचा प्रभाव केवळ लिखाणावर पडला नाही. लिखाणावर तर पडलाच. आज अनेक जण माझं एखादं लेखन वाचलं, की पुलंची आठवण येते असं म्हणतात. हा त्या प्रभावाचाच परिणाम आहे. मी त्या प्रभावातून कधी तरी बाहेर येईनही. मात्र, जगण्यावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जो पगडा आहे तो दूर होईल, असं वाटत नाही. उत्तमोत्तम गोष्टींचा आस्वाद कसा घ्यावा, गुणग्राहकता कशी असावी, जग कसं बघावं हे पुलंनी मला शिकवलं. त्यांची दानशूरता आणि उतारवयातील ऐहिकातील विरक्ती या गोष्टी तर केवळ स्तंभित करतात. या गोष्टी अशा आहेत, की त्या आयुष्यभर जोपाव्यात. जमेल तितकं करावं. त्यांची उंची गाठणं तर केवळ अशक्यच आहे. मात्र, त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चार पावलं तर नक्कीच टाकू शकतो.
माझ्या जगण्यातल्या तीन हिरोंची ही गोष्ट. या तिघांचीही मी अगदी व्यक्तिपूजा म्हणावी, अशी केली आणि त्यातून जमेस आलेल्या बऱ्या-वाईट अनुभवांतूनच मी जो काही आहे तो आहे.

-----

(पूर्वप्रसिद्धी : दृष्टी-श्रुती डिजिटल दिवाळी अंक २०२१)

 

---

26 Dec 2021

‘८३’च्या निमित्ताने....

ते फक्त क्रिकेट नव्हतं...
-----------------------------



काल शनिवारी ‘८३’ बघितला. भारताने १९८३ मध्ये कपिल देवच्या जिगरबाज नेतृत्वाखाली जिंकलेल्या पहिल्यावहिल्या वन डे वर्ल्ड कपच्या यशोगाथेची कहाणी सांगणारा हा कबीर खान दिग्दर्शित चित्रपट. तो बघताना अनेकदा डोळे पाणावले. हृदय उचंबळून आलं. देशप्रेमाच्या भावनेनं मन ओथंबून गेलं. सिनेमा संपला, तरी किती तरी वेळ हा प्रभाव टिकून राहिला. मग पुन:पुन्हा त्या अंतिम सामन्याची क्षणचित्रं यू-ट्यूबवर बघितली. परत परत तो अपार जल्लोष, ती उत्कट विजयी भावना मनात साठवून घेतली. 
मला हा सिनेमा एवढं भावण्याचं आणखी एक वैयक्तिक कारण आहे. ते म्हणजे, मी १९८३ मध्ये सात-आठ वर्षांचा होतो, तरी मला हा वर्ल्ड कप बिलकुलच आठवत नाही. मला १९८१ च्या घटना आठवतात. महंमद अझरुद्दीननं हैदराबादकडून रणजी स्पर्धेत १५१ धावा केल्याची बातमी पेपरमध्ये वाचल्याचं मला लख्ख आठवतं. मला १९८२ ची एशियाड स्पर्धा अंधुक अंधुक आठवते. १९८४ नंतरच्या तर सर्वच घटना नीट आठवतात. १९८३ चा वर्ल्ड कप मात्र अजिबात आठवत नाही. मी तेव्हा तिसरीत गेलो होतो. जूनमध्ये शाळा नुकतीच सुरू झाली असणार. तेव्हा या वर्ल्ड कपची चर्चा आजूबाजूला होत असणारच. पेपर तर मी रोज वाचायचो. टीव्ही फार नव्हते, पण आजोबांना रेडिओवर कॉमेंटरी ऐकायची सवय होती. हे सगळं असूनही माझ्या स्मरणाच्या हार्ड डिस्कमधून वर्ल्ड कपची फाइल कायमची उडालेली आहे. या गोष्टीची मला निरंतर खंत वाटत आलेली आहे. मला १९८७ चा वर्ल्ड कप व्यवस्थितच आठवतो. इतकंच काय, तर १९८५ चा ऑस्ट्रेलियात झालेला बेन्सन अँड हेजेस मिनी वर्ल्ड कप आणि त्यात फायनलमध्ये आपण पाकिस्तानला धूळ चारून मिळविलेलं अजिंक्यपद, शास्त्रीला मिळालेली ऑडी हे सगळं आठवतं. पण १९८३ मात्र... टोटल ब्लँक! त्यामुळं ‘८३’ या सिनेमानं मला माझ्या आयुष्यातून कायमचे हरवलेले ते क्षण पुन्हा जगण्याची संधी दिली. सिनेमात नाट्यरूपानं का होईना, ते सगळं पुन्हा पाहता आलं, ते वातावरण अनुभवता आलं आणि म्हणूनच हा सिनेमा मला एवढा भिडला. (याच कारणामुळं मला या सिनेमाचं परीक्षण लिहिता येणार नाही.)
कबीर खाननं ‘८३’ सिनेमा अगदी ‘दिल से’ तयार केला आहे, हे त्या सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये जाणवतं. खरं सांगायचं तर या सिनेमाचा ट्रेलर मी प्रथम पाहिला तेव्हा मला तो काही तितकासा भावला नव्हता. अगदी रणवीरसिंहही कपिल म्हणून पटला नव्हता. इतर खेळाडू तर सोडूनच द्या! मात्र, त्यामुळंच मी अगदी किमान अपेक्षा ठेवून हा सिनेमा पाहायला गेलो होतो. त्या तुलनेत तो खूपच उजवा निघाला आणि अंत:करणापर्यंत पोचला. 
हा सिनेमा अर्थातच केवळ वर्ल्ड कपमधल्या त्या विजयापुरता नाही. तो अर्थातच केवळ क्रिकेटपुरताही नाही. भारताला जागतिक स्तरावर एक ताकद म्हणून ओळख मिळवून देणारी, देशवासीयांचा स्वाभिमान जागविणारी, पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणारी अशी ती एक ऐतिहासिक घटना होती. म्हणूनच कबीर खाननं चित्रपटाच्या सुरुवातीलाच त्या काळात आजूबाजूला घडत असलेल्या घटनांचे सूचक उल्लेख करून आपल्याला त्या काळात नेलंय. फूलनदेवी आणि नवाबपूरची दंगल हे त्यातले ठळक उल्लेख. 
भारतीय क्रिकेट मंडळ आणि तेव्हाच्या क्रिकेटपटूंची एकूणच सांपत्तिक स्थिती, क्रिकेटच्या जगात, त्यातही वन डे क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं असलेलं स्थान, स्वातंत्र्य मिळून ३५ वर्षं झाली तरी इंग्लंडबाबत मनात असलेली ‘साहेबाचा देश’ ही मानसिकता, इंग्लिश क्रिकेट बोर्ड आणि एकूणच तेथील पत्रकार, सर्वसामान्य यांच्या मनात भारताबद्दल असलेली तुच्छतावादी मानसिकता, वेस्ट इंडिजच्या संघाचा तेव्हा असलेला प्रचंड दबदबा, आपले क्रिकेटपटू आणि त्यांचे कुटुंबीय, आपल्या संघाचे उत्साही आणि धडाकेबाज मॅनेजर मानसिंह असे सगळे बारकावे आणि व्यक्तिरेखा कबीर खाननं अगदी बारकाईनं टिपल्या आहेत. 

सिनेमाचा सगळा भर हा आपल्या संघाने इंग्लंडमध्ये पोचल्यापासून ते वर्ल्ड कप जिंकेपर्यंत खेळलेला प्रत्येक सामना आणि त्याच्या आगेमागे ड्रेसिंग रूममध्ये आणि मैदानावर घडत असलेल्या घटना यावरच केंद्रित आहे. त्यातही टनब्रिज वेल्सच्या मैदानावर कपिलने झिंबाब्वेविरुद्ध मारलेलं जबरदस्त शतक आणि १७५ धावा करून मोडलेला ग्लेन टर्नरचा विश्वविक्रम हा सर्वच घटनाक्रम अत्यंत प्रभावी झाला आहे. कपिल आणि सुनील यांच्यात असलेली काहीशी तेढ, श्रीकांतचा गमत्या स्वभाव, इंग्लंडच्या राणीला भेटण्याचा प्रसंग, श्रीकांत व कपिलला एका साउथ इंडियन कुटुंबाकडून भोजनाचं आलेलं आमंत्रण व त्यांच्या घरातील प्रसंग, नंतर ब्रिटिश राजदूतांच्या पार्टीतील श्रीकांतचं जोरदार भाषण, संदीप व रवी शास्त्री यांना आणि तीन-चार जणांसह रात्री मजा करायला बाहेर जायचं असतं तेव्हा कपिल त्यांना सल्ला देतो तो प्रसंग, गावसकरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून वगळण्याचा प्रसंग, वेंगसरकरचा जबडा मोडून तो वर्ल्ड कपला मुकण्याचा प्रसंग, इंग्लंडला हरवल्यानंतर भारतीय चाहत्यांना ढोल वाजवू न देणाऱ्या त्यांच्या उद्धट प्रेक्षकांना भारतीय प्रेक्षकांनी ठोकणं अशा अनेक घटनांच्या साखळीतून वर्ल्ड कपच्या मोहिमेचा हा थरार आपल्यासमोर उलगडत जातो.
भारतीय संघाला या स्पर्धेला जाण्यापूर्वी कुणीही फार मोजत नव्हतं, हे आता सर्वश्रुत आहे. या सिनेमातही ठायी ठायी त्याचा प्रत्यय देणारे प्रसंग आहेत. भारतीय संघाला लॉर्ड्सचे पासच दिलेले नसतात. मॅनेजर मानसिंह हे पासेस मागायला जातात, तेव्हा उद्धट इंग्रज अधिकारी ‘भारताची एकही मॅच लॉर्ड्सला नाही, तुमचा संघ फायनलला गेला तर नक्की पास देऊ’ असं सांगतो. त्यानंतरच्या प्रसंगात मानसिंह त्याच अधिकाऱ्याकडे पुन्हा जातात तेव्हा थिएटरमध्ये एकच जल्लोष होतो, हे सांगणे न लगे. इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय पाठीराख्यांचाही एक समांतर ट्रॅक या सिनेमात आहे. त्यातही एक लहान मुलगा आणि त्याचे वडील हे जणू काही समस्त भारतीय प्रेक्षकांचे प्रतिनिधी म्हणून सिनेमाभर दिसत राहतात. या मुलाच्या हातातील तिरंग्यामुळंच कपिल आणि त्याच्या संघाला प्रेरणा मिळते. 
कपिलला व्यवस्थित इंग्लिश बोलता येत नसतं. या मुद्द्याचाही सिनेमात अनेकदा उल्लेख येतो. त्या अनुषंगाने कपिलची पहिली प्रेस कॉन्फरन्स आणि तिथं असलेले दोन-तीन पत्रकार आणि फायनलपूर्वीची भरगच्च प्रेस कॉन्फरन्स आणि तिथंही पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्या आत्मविश्वासानं ‘वी आर हिअर टु विन’ असं कपिल म्हणतो, त्याच आत्मविश्वासानं हेच वाक्य ऐकवणारा कपिल बघताना डोळे भरून न आले तरच नवल. 
भारतीय संघाच्या बसमध्ये मानसिंह कपिलला ‘टीम मीटिंग’ घ्यायला सांगतात, तो प्रसंगही असाच जमून आलाय. त्या बसमध्ये रंगीत टीव्ही असतो आणि व्हीसीआरवर लागलेलं ‘हम बन तुम बने एक दुजे के लिए’ हे गाणं आणि त्या गाण्यातील ‘आय डोण्ट नो व्हॉट यू से’ या ओळींचा विनोदासाठी केलेला चपखल वापर यासाठी दिग्दर्शकाला आपली दाद जातेच. तसंच बहुतेक सामन्यांची प्रत्यक्ष दृश्यं आणि त्यात खऱ्या सामन्यातला एखादा फोटो आणि टीव्हीवर दिसणारा सामन्यात मूळ सामन्याचीच ध्वनिफीत वापरणं अशा काही युक्त्यांनी मजा येते.
भारतीय संघ या वर्ल्ड कपपूर्वी आधीच्या दोन वर्ल्ड कपमध्ये केवळ एक सामना जिंकू शकला होता. तोही ईस्ट आफ्रिकेविरुद्ध. मात्र, १९८३ च्या वर्ल्ड कपनं भारतीय क्रिकेट आरपार बदलून गेलं. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्र्यांचा एक प्रसंग सिनेमात आहे. नवाबपूरच्या दंगली थांबविण्यासाठी पंतप्रधानांनी क्रिकेटज्वराचा उपयोग करून घेतला, असं त्यात सूचित करण्यात आलंय. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोचल्यानंतरच खऱ्या अर्थानं भारतात माध्यमांनी (म्हणजे वृत्तपत्रंच!) या स्पर्धेचं जोरदार वार्तांकन सुरू केलं आणि सर्वसामान्य जनतेतही स्पर्धेची चर्चा सुरू झाली. मग होस्टेलवर वर्गणी काढून टीव्ही आणले गेले. गावोगावी अँटिने बसविले गेले. ‘पिक्चर दिसतंय का?’ हा अँटेना हलवून विचारायचा प्रश्न सर्व देशभरात विचारला जाऊ लागला. सिनेमात हे सगळं क्रिकेटचं वाढतं प्रेम चढत्या भाजणीनं दाखवण्यात आलंय. भारतानं पहिला सामना वेस्ट इंडिजविरुद्ध जिंकला, तरी ‘भारत नशिबानं जिंकला’ असं लिहिणाऱ्या इंग्लिश वृत्तपत्रांच्या पानांनी कपिल बूट साफ करत बसतो, हे दृश्य फारच बोलकं! (भारत जिंकला तर I will eat my words म्हणणारा समीक्षक भारतानं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर शेवटी महिन्यानंतर चक्क त्यानं लिहिलेला लेख पाण्यात (की दारूत?) बुडवून खातो, याचाही उल्लेख सिनेमाच्या शेवटी येतो.) थोडक्यात, सर्वांच्या नाकावर टिच्चून भारतानं, विशेषत: कपिलनं आपल्या जिगरी वृत्तीच्या बळावर हा वर्ल्ड कप खेचून आणला होता. या मूळ घटनेतच इतकं नाट्य आहे, की त्यावर गेली ३८ वर्षं चित्रपट तयार कसा झाला नाही, याचंच आश्चर्य वाटतं. करोनापूर्व काळातच तयार झालेला हा सिनेमा प्रदर्शित व्हायला अखेर जवळपास दोन वर्षं जावी लागली. मात्र, हा सिनेमा बघण्याची मज्जा मोठ्या पडद्यावरच, यात काही वाद नाही.

अखेर कलाकारांविषयी. रणवीरसिंह कपिल म्हणून शोभत नाही, हे ट्रेलर बघून झालेलं माझं मत सिनेमा बघितल्यानंतर पूर्ण पुसलं गेलं. त्यानं फारच मेहनतीनं ही भूमिका साकारली आहे, यात वाद नाही. श्रीकांत झालेला जिवा हा अभिनेता मजा आणतो. पंकज त्रिपाठीनं मानसिंहच्या भूमिकेत हा सिनेमा अक्षरश: तोलून धरला आहे. आदिनाथ कोठारेला दिलीप वेंगसरकरांची छोटीशी भूमिका करण्याची संधी मिळाली आहे. सुनील गावसकर झालेला ताहिर भसीन मुळीच गावसकर वाटत नाही. पण त्यानं काम चांगलं केलंय. बाकी बलविंदर संधूचं काम करणाऱ्या कलाकारानं (बहुतेक अॅमी विर्क असं नाव आहे) पण लक्षात राहण्यासारखं काम केलंय. नीना गुप्तानं कपिलच्या आईचं काम सुंदर केलंय. इतर संघांचे खेळाडू (जसेच्या तसे दिसणारे) मिळणं अवघडच. त्यातल्या त्यात व्हिव रिचर्ड्सला जरा वाव आहे. तो कलाकारही बराचसा रिचर्ड्ससारखा दिसणारा निवडला आहे. दीपिका पदुकोणनं कपिलच्या पत्नीची - रोमीची छोटी भूमिका साकारली आहे. अंतिम सामन्यापूर्वी सकाळी लॉर्डसवरचा सूर्योदय पाहत तिचं आणि कपिलचं संभाषण हा या सिनेमाचा एक हायपॉइंट आहे. त्याच सकाळी लॉर्ड्सवर तिरंगा वर वर जातानाचं दृश्य पाहताना डोळे वाहिल्याशिवाय राहत नाहीत. चित्रपटातली दोन-तीन गाणीही स्फूर्तिदायी आहेत. 
भारतामधल्या क्रिकेटचं भवितव्य कायमचं बदलवून टाकणारी या स्फूर्तिदायी यशोगाथा पाहायला हवीच. क्रिकेट न आवडणाऱ्यांनीही जरूर पाहावा, तसंच आपल्या लहान मुलांना आवर्जून दाखवावा असाच हा चित्रपट आहे.

---

याच शीर्षकाचा माझा आणखी एक लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

19 Dec 2021

पुणे मेट्रो लेख

मेट्रोच्या बोगद्यात...
-----------------------

जगातल्या सर्व गोष्टींविषयी मला कुतूहल वाटतं. माझ्या पेशाला पूरक अशीच ही गोष्ट आहे. आपल्या आजूबाजूला काय चाललंय ते जाणून घ्यावं, असं सतत वाटत असतं. नवीन काही निर्माण झालं, की शक्य होईल तेवढ्या लवकर त्या ठिकाणाला भेट देणं मला आवडतं.
पुणे मेट्रोचं काम सुरू झाल्यापासून मला त्या कामाविषयी कुतूहल आहे. मी येता-जाता त्या कामाची प्रगती बघत असतो. स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट हा पिंपरी ते स्वारगेट या लाइनचा भाग अंडरग्राउंड आहे. हे काम बघण्याचा योग शनिवारी आला. सहकारी सुनीत भावे पूर्वीपासून मेट्रोशी संबंधित सर्व बातम्या बघतो. त्याच्यामुळं ऑफिसातल्या काही सहकाऱ्यांना मेट्रोचं काम बघता आलं. पूर्वीही काही जण गेले होते, तेव्हा मला जमलं नव्हतं. मात्र, या शनिवारी जमवलंच. मग अभिजित थिटे, चैत्राली चांदोरकर, विहंग घाटे आणि मी असे आम्ही चौघं हे काम बघायला दुपारी बारा वाजता स्वारगेटला पोचलो. स्वारगेटकडून सारसबागेकडं येताना पाणीपुरवठा केंद्राच्या अलीकडं मेट्रोचं मोठं गेट लागतं. तिथून आत गेल्यावर तिथल्या जनसंपर्क अधिकारी अर्चना यांनी आमचं स्वागत केलं.

प्रत्येकाला शूज कम्पलसरी होते. याशिवाय तिथं गेल्यावर हेल्मेट आणि रेडियमचं जॅकेट आम्हाला घालायला दिलं. बोगद्यापर्यंत खाली जायला एखादी लिफ्ट असेल असं वाटलं होतं. प्रत्यक्षात लोखंडी सांगाड्याचा एक तात्पुरता जिना तिथं उभारला आहे. या जिन्यात एका वेळी पाचच लोकांना खाली किंवा वर जाता येतं. आम्ही तो जिना उतरू लागलो, तेव्हा तिथले काही कामगार वर येताना दिसले. दोन माणसं जेमतेम जाऊ शकतील, अशा रुंदीच्या त्या जिन्यानं आम्ही खाली खाली जात होतो. जवळपास तीस मीटर म्हणजे दहा मजले एवढं खाली आम्ही गेलो. वरून पाहिलं तर खाली एवढं काम सुरू आहे हे समजतही नाही. आम्ही खाली पोचल्यावरच त्या कामाच्या भव्यतेचा अंदाज आला. डाव्या बाजूला मेट्रोच्या स्टेशनची इमारत आकार घेत होती. तिथं एकूण चार मजले दिसत होते. आम्हाला तिकडं न जाता उजवीकडं म्हणजे बोगद्याकडं जायचं होतं. तिथं सुरुवातीला एक केबिन होती. तिथल्या रजिस्टरमध्ये आम्ही आमची नावं व येण्याची वेळ नोंदविली. अर्चना यांनी आम्हाला प्राथमिक माहिती दिली व नंतर युवराज गावंडे हे तेथील काम पाहणारे इंजिनीअर आमच्यासोबत आले. त्यांनीच आम्हाला नंतर सगळी माहिती दिली. बोगद्याच्या सुरुवातीची जागा खूपच मोठी होती. मधोमध दोन ठिकाणी रुळ टाकले होते. त्यावरून ट्रॉलीची ये-जा सुरू होती. बोगद्याच्या आत बसवायच्या सिमेंट-काँक्रिट रिंग वाहून नेण्याचं आणि टीबीएमनं बोगदा खणल्यावर निघालेली माती आणून टाकायचं काम या ट्रॉल्या करीत होत्या. स्वारगेट हे शेवटचं स्टेशन असल्यानं इथं रुळ बरेच क्रिस-क्रॉस होणार आहेत. त्यामुळं हा सुरुवातीचा भाग बराच रुंद होता. इथून दोन वेगवेगळ्या बोगद्यांतून मेट्रो सिव्हिल कोर्टाकडे (म्हणजेच मंडई, बुधवार चौकाकडे) जाणार आहे आणि तिथून येणार आहे. स्वारगेटवरून मंडईकडे जाणाऱ्या लाइनला डाउन लाइन म्हणतात, तर तिकडून इकडे येणाऱ्या लाइनला अप लाइन म्हणतात. अप लाइनच्या बोगद्याचं खोदकाम जवळपास एक किलोमीटरहून अधिक झालं आहे.
(मंडईपर्यंतचं अंतर साधारण दोन किलोमीटर २०० मीटर एवढं आहे.) सिव्हिल कोर्टकडून खणत येणारं टीबीएम आणि इकडून तिकडं खणत जाणारं टीबीएम यांचं जंक्शन बुधवार चौक (फडके हौद स्टेशन) इथं आहे. अप लाइनचं मशिन एक किलोमीटरहून दूर असल्यानं युवराज यांनी आम्हाला डाउन लाइनवरचं मशिन दाखवायला न्यायचं ठरवलं. हे मशिन साधारण पाचशे मीटरपर्यंत दूर खणत गेलं होतं. आम्ही त्या बोगद्यात शिरलो. तो बोगदा अगदी व्यवस्थित तयार झालाय. शेजारून (त्या जिन्यासारखीच) एक तात्पुरती लोखंडी पट्ट्यांची लाइन चालत जाणाऱ्यांसाठी केली आहे. आम्ही त्या पट्टीवरून चालत निघालो. थोडं आत गेल्यावर जरा घाम जाणवू लागला. आम्ही खरं तर फार खोल आलो नव्हतो, तरी बोगद्यात आत आत चाललो आहोत या जाणिवेनं थोडीशी भीती वाटली. अर्थात तिथं सर्व सुरक्षा व्यवस्था (पुरेसे दिवे, ऑक्सिजन इ.) चोख होती आणि महत्त्वाचं म्हणजे टीबीएम बघायची उत्सुकता फार होती. आत आत जाऊ लागलो तशी थोडी धाप लागू लागली. (ज्यांना श्वासांचा किंवा दम्याचा वगैरे त्रास आहे, त्यांना इथं येणं जरा अवघडच जाईल.) आम्ही आमचे स्वेटर, जर्किन काढून टाकली. त्यांचं ते हेल्मेट वर होतंच. शिवाय मास्क. त्यामुळं नंतर मास्कही काढून टाकला. आता जरा नीट श्वास घेऊन चालता यायला लागलं.
अखेर (आमच्या दृष्टीनं) बरीच पायपीट केल्यावर यंत्राचा आवाज येऊ लागला. लाइट दिसू लागले. सुरुवातीला रेल्वेच्या इंजिनासारखं एक युनिट लागलं. तिथं आत अनेक कम्प्युटर आणि डिस्प्ले होते. समोर चाललेलं सगळं काम आणि त्याचे तपशील तिथं दिसत होते. सीसीटीव्ही कॅमेरे होते. या केबिनमध्ये एसी होता. त्यामुळं तिथं शिरताच एकदम बरं वाटलं. हे विचार, ते विचार असं करून थोडा जास्तच वेळ आम्ही तिथं उभे राहिलो आणि जरा गार झालो. (बाकी हे सगळं अवाढव्य काम बघून तसेही गारच झालो होतो म्हणा...) हे टीबीएम ‘टेराटेक’ नावाच्या ऑस्ट्रेलियन कंपनीचं असलं, तरी ते चीनमध्ये तयार झालं आहे. त्या इंजिनासारख्या दिसणाऱ्या युनिटमधून एक ट्रॉली मागे जाताना दिसली. खणल्यावर बाहेर पडणारा सगळा राडारोडा वरून सिमेंट मिक्सरसारख्या मोठ्या भांड्यातून खाली एकेका ट्रॉलीत पडत होता. नंतर ही ट्रॉली त्याच रुळांवरून मागे जात बोगद्यातून बाहेर जात होती. हा सगळा टीबीएमचाच भाग होता असं कळलं. मला ते यंत्र म्हणजे एकच युनिट असेल असं वाटत होतं. पण ते समोर गोल फिरणारं कटर हा त्या महाकाय यंत्राचा केवळ एक भाग होता, असं कळलं. त्या कटरपर्यंत तर आपल्या पोचताच येत नाही. त्याच्यामागे सिमेंटच्या रिंग गोलाकार बसवण्याचं काम यंत्राच्या साह्यानं सुरू होतं. हे कामही ऑटोमॅटिक होतं. फक्त दोन रिंग जोडणारे मोठाले स्क्रू यंत्रानं पिळण्याचं काम कर्मचारी करतात. अशी एकेक रिंग बसवत हे मशिन पुढं जातं. दिवसाला साधारण आठ ते दहा मीटर खोदाई करून रिंग बसवल्या जातात. आम्ही गेलो तेव्हा ५५३ वी रिंग बसविली जात होती. (म्हणजेच साधारण ५०० ते ५५० मीटर अंतर मशिननं पार केलं होतं.) आपण आत्ता साधारण कुठे आहोत, असं अभिजितनं विचारलं. तेव्हा साधारण खडक पोलिस स्टेशनच्या आसपास (म्हणजे त्या जागेच्या खाली) आपण आहोत, असं समजलं. गंमत वाटली. आपल्या डोक्यावर आख्खं शहर, रस्ते, तुफान रहदारी आहे, या कल्पनेनं थरारून जायला झालं. इथं २४ बाय ७ सतत काम सुरू असतं, असं युवराज सांगत होते. आठ आठ तासांची शिफ्ट असते. तरीही हे कर्मचारी तिथं एवढ्या उकाड्यात आणि थोड्या कमी ऑक्सिजनमध्ये काम करताहेत हे बघून कमालच वाटली. हे काम साधारणपणे सहा महिन्यांत, तर शेजारच्या अप लाइनचं काम पुढील तीन महिन्यांत पूर्ण करण्याचं ‘महामेट्रो’चं नियोजन आहे. 

सगळं काम बघितलं, फोटो काढले आणि मागं फिरलो. परत येताना बोगद्याच्या बाहेरचा प्रकाश दिसला आणि हायसं वाटलं. तिथं प्रचंडच पाणी गळत होतं. पुण्यात भूजलपातळी अगदी चांगली आहे. जरा खणलं, की पाणी लागतंच. इथं तर शेजारून कालवाही जातो. हे पाणी नंतर वॉटरप्रूफिंग तंत्रानं बंद करणार आहेत. बाहेर पडताना पुन्हा एकदा वेळ नोंदविली आणि तिथून निघालो. अगदी दारात एक छोटंसं मंदिर असल्याचं दिसलं. हे आत जाताना मगाशी दिसलं नव्हतं. तिथंही फोटो काढले. आता पुन्हा त्या तात्पुरत्या जिन्याने दहा मजले वर जायचं होतं. शेजारी चार मजली स्टेशन आकाराला येत होतं. जिने चढून वर आलो, तेव्हा ऊन चांगलंच जाणवत होतं. तो सगळा एरिया केवढा मोठा आहे, याचा आता नीट अंदाज आला. स्वारगेट हे मल्टिमोडल हब असणार आहे. इथं पीएमपी, एसटी आणि मेट्रो यांना एकाच छताखाली आणण्यात येणार आहे.
बाहेर पडलो. वरच्या बाजूला त्यांचं छोटंसं ऑफिस आहे. तिथं गेलो. चहा झाला. समोर मेट्रोचे नकाशे लावले होते. साइड व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, एलिव्हेशन बघून इंजिनीअरिंगचे दिवस आठवले. समोर एका नकाशावर सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांचा फोटो होता. ते माझ्याकडंच बघताहेत असा भास झाला आणि मी मनोमन चेहरा झाकूनच घेतला.
त्या सग‌ळ्या जगड्व्याळ पसाऱ्याला आणि हे काम उभं करणाऱ्या सर्व कर्मचारी, अधिकारी आणि अभियंत्यांना नमस्कार केला आणि तिथून निघालो...


---

याआधी मेट्रोवर लिहिलेला लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा...

---





29 Nov 2021

अक्षरदान दिवाळी अंक २०२१ - लेख

लेखणी मेकअप करते तेव्हा...
-----------------------------------

चित्रपटकला आणि लेखक किंवा साहित्यिक यांचा संबंध या कलेच्या सुरुवातीपासूनच आहे. चित्रपटकला ही विसाव्या शतकाची देणगी. आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञानाच्या आविष्कारामुळे ही कला जन्माला आली. लेखन किंवा सर्जनाची प्रक्रिया मात्र त्यापूर्वी किती तरी वर्षांपासून चालत आलेली आहे. तेव्हा चित्रपटात काम करणारे साहित्यिक किंवा लेखक यांचा संबंध किती घनिष्ठ असेल, याची कल्पना आपण करू शकतो. लेखकांनी कथा लिहायची, दिग्दर्शकांनी चांगल्या अभिनेत्यांना घेऊन सिनेमा तयार करायचा अशी सर्वसाधारण पद्धत. अभिनय करता येणे ही अगदीच वेगळी कला आहे. त्यासाठी वेगळी प्रतिभा लागते. तीच गोष्ट लेखनकलेची. मात्र, या दोन्ही कला प्रसन्न असलेले काही थोर कलावंत आपल्याकडे होऊन गेले. त्यामुळे त्यांनी सिनेमा लिहिला पण आणि त्यात काम पण केले. याशिवाय पाहुणे कलाकार म्हणून झळकणारे लेखक, साहित्यिक तर आहेतच.

मराठीत सर्वांत प्रथम नाव आठवतं ते पु. ल. देशपांडे यांचं. पु. ल. अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे प्रतिभावान कलाकार होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चित्रपट क्षेत्रात आपलं नशीब आजमावलं. 'गुळाचा गणपती' हा सबकुछ पु. ल. चित्रपट होता. यात पुलंचीच कथा होती, पटकथा होती, संगीतही होतं आणि नायकाची भूमिकाही त्यांनी केली होती. याखेरीज पु. ल. आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई यांनी नायक-नायिका म्हणून वंदे मातरम् या चित्रपटात सुरुवातीला काम केलं होतं. पुलंनी तर अनेक नाटकांत, चित्रपटांत भूमिका केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी हे क्षेत्र सोडलं आणि ते लेखक म्हणून अधिक नावारूपाला आले. त्यानंतर दीर्घ काळाने त्यांनी एक होता विदूषक (१९९३) या चित्रपटासाठी पुन्हा पटकथा लेखन केलं होतं.

आचार्य अत्रे हेदेखील असेच बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्व. त्यांनी अनेक नाटके लिहिली, चित्रपट केले. मात्र, त्यांनी स्वतः व्यावसायिक भूमिका कधी केल्या नाहीत. मात्र, श्यामची आई या चित्रपटात त्यांनी चक्क प्रबोधनकार ठाकरे यांना झळकावलं होतं. यात प्रबोधनकार अगदी छोट्या भूमिकेत दिसले होते.

ग. दि. माडगूळकर म्हणजे महाराष्ट्राचे महाकवी. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक चित्रपटांसाठी पटकथा लेखन, गीतलेखन केलं. अगदी सुरुवातीला मा. विनायक यांच्या ब्रह्मचारी या चित्रपटात त्यांनी एक छोटी भूमिका केली होती. याशिवाय १९४७ मध्ये आलेल्या लोकशाहीर रामजोशी या चित्रपटातही त्यांनी अगदी लहान भूमिका केली होती. मात्र, वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटात त्यांना प्रमुख भूमिका करताना रसिकांनी बघितलं, तेव्हा त्यांना सुखद धक्का बसला होता. गदिमांनी यातील कन्नड माणसाच्या विनोदी भूमिकेत धमाल केली होती. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट व पेडगावचे शहाणे या चित्रपटांतही गदिमांनी भूमिका केल्या होत्या. वऱ्हाडी आणि वाजंत्री चित्रपटात दिग्दर्शक राजदत्त यांनी शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार या तेव्हाच्या प्रसिद्ध लेखकत्रयीला पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत झळकवलं होतं. द. मा. मिरासदार यांनी अनेक चित्रपटांचं पटकथा लेखन केलं. त्यापैकी 'एक डाव भुताचा' या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी स्वतः हेडमास्तरची भूमिका केली होती, हे अनेक चित्ररसिकांच्या स्मरणात असेल. 'द. मां.'चे नुकतेच निधन झाले, तेव्हाही या आठवणींना उजाळा मिळाला होता.

वास्तविक, ना. सी. फडके, पु. भा. भावे, वसंत कानेटकर ही सर्वच लेखकमंडळी दिसायला देखणी व रुबाबदार होती. मात्र, त्यांनी त्या काळात चित्रपटात किंवा नाटकात कुठे काम केल्याची नोंद नाही. क्वचित केल्याच असतील, तर हौशी भूमिका एखाद्या प्रयोगात केल्याही असतील. मात्र,  पु. ल. देशपांडे व ग. दि. माडगूळकर हे दोघेही याला सणसणीत अपवाद ठरले. पुढे दादा कोंडके यांनी हा वारसा चालविला. दादा हे रूढार्थाने प्रस्थापित लेखक नसले, तरी शाहीर होते. ते स्वतः उत्तम गीते लिहीत असत. त्यांच्या चित्रपटांतील द्व्यअर्थी संवाद व गाण्यांची नकारात्मक चर्चा खूप झाली. परंतु 'अंजनीच्या सुता...'सारखं अतिशय उत्कृष्ट गीत दादांनी लिहिलं आहे, हे विसरता कामा नये.

त्यानंतर दीर्घकाळ लेखक मंडळींचं दर्शन रूपेरी पडद्यावर झालं नाही. अगदी अलीकडे लेखकांना पडद्यावर झळकवण्याचा मान मिळविला तो सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांनी. त्यांच्या नितळ या चित्रपटात त्यांनी थेट विजय तेंडुलकरांना एक छोटी भूमिका दिली होती. तेंडुलकरांनीही नायिकेच्या आजोबांची ही छोटेखानी भूमिका फार सुंदर केली होती. त्याआधी वास्तुपुरुष या चित्रपटात सुमित्राताईंनी महेश एलकुंचवार यांना रूपेरी पडद्यावर पेश केलं होतं. यातील भास्कर या पात्राची मोठेपणीची भूमिका एलकुंचवार यांनी साकारली होती. या चित्रपटाचं कथानक आणि एलकुंचवार यांची वाडा नाट्यत्रयी यांचा जैव संबंध असल्यानं या चित्रपटात एलकुंचवारांचं असणं फारच सूचक व महत्त्वाचं होतं. अवलिया लेखक अनिल अवचट हेदेखील असंच बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या विविध कलागुणांचा वापर त्यांच्या जवळच्या स्नेही असलेल्या सुमित्राताईंनी वास्तुपुरुष चित्रपटात करून घेतला होता. यात चित्रपटाच्या सुरुवातीला येणारं एक स्तोत्र अनिल अवचट यांच्याकडून त्यांनी गाऊन घेतलं. चित्रपटात येणारी बासरी अनिल अवचट यांनीच वाजविली आहे. नंतर एक कप च्या या चित्रपटात सुमित्राताईंनी थेट कमल देसाईंना छोटी भूमिका दिली होती. त्यांना या चित्रपटात आजीच्या भूमिकेत बघणं हा त्यांच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का होता. सुमित्रा भावे स्वतः समाजशास्त्रज्ञ व लेखिका होत्याच. मात्र, त्यांनी स्वतः भूमिका कुठे केली नाही. अगदी अलीकडं चैतन्य ताम्हाणे यानं त्याच्या 'डिसायपल' या चित्रपटात सुमित्रा भावे यांच्या आवाजाचा निवेदनासाठी चपखल वापर करून घेतला होता. दुर्दैवानं तो सुमित्रा भावे यांचा शेवटचाच चित्रपट ठरला.

लेखक आणि अभिनेता या दोन्ही भूमिकांत रमणारं आणखी एक प्रसिद्ध नाव म्हणजे दिलीप प्रभावळकर. चित्रपटांत ब्रेक मिळण्यापूर्वीपासूनच प्रभावळकर लेखन करीत होते. क्रिकेट हा त्यांच्या आवडीचा विषय. शिवाय मुलांसाठीही त्यांनी विपुल साहित्य लिहिलं आहे. चिमणराव व गुंड्याभाऊ या मालिकेपासून त्यांची अभिनयाची मोठी व प्रदीर्घ कारकीर्द सुरू झाली. मात्र, त्यांचं लेखनही सोबतच सुरू राहिलं. अनुदिनी या वृत्तपत्रीय स्तंभावरून तयार झालेली श्रीयुत गंगाधर टिपरे ही टीव्ही मालिका म्हणजे प्रभावळकरांच्या दोन्ही क्षेत्रांतील हुकुमतीचं दर्जेदार उदाहरण आहे. लेखक व अभिनेते म्हणून दोन्ही क्षेत्रांत त्यांना भरपूर पुरस्कार मिळाले आहेत. 'बोक्या सातबंडे' हा त्यांचा मानसपुत्र आणि त्याच्या करामती यांचा उल्लेख केल्याशिवाय मराठी बालसाहित्याचा इतिहास सांगणं अशक्य आहे.
प्रभावळकरांसारखंच दोन्ही क्षेत्रांत दमदार कामगिरी करणारं अलीकडच्या काळातलं प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणजे कवी व अभिनेता सौमित्र ऊर्फ किशोर कदम. किशोर हा जेवढा प्रतिभाशाली कवी आहे, तेवढाच तो दमदार अभिनेता आहे. गारवा हा अल्बम गाजल्यानंतर सौमित्रचं नाव सर्व महाराष्ट्राला माहिती झालं. त्यानंतर जोगवा ते अलीकडच्या 'दिठी'पर्यंत अभिनयातही त्याचं नाव दुमदुमतं आहे. किशोरप्रमाणंच असंच एक जोरदार नाव म्हणजे नागराज मंजुळे. नागराज मूळचा कवी. त्याच्या कविता अतिशय संवेदनशील आहेत. चित्रपटात तो नंतर आला. आपल्या चित्रपटात तो पाहुणा कलाकार म्हणून दिसतो. मात्र, दिग्दर्शक म्हणून त्याची कामगिरी अतिशय वरच्या दर्जाची आहे.
याशिवाय अतुल कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, (थोरली) सोनाली कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, हृषीकेश जोशी, किरण यज्ञोपवित ही सर्व मंडळी उत्तम लेखक आहेत. यांच्यावर केवळ अभिनेता किंवा नाटककार म्हणून शिक्का मारणं त्यांच्यावर अन्याय करणारं ठरेल. यातल्या मृणाल कुलकर्णीच्या तर घरातच साहित्याचा वारसा आहे. प्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकर हे तिचे आजोबा. आई वीणा देव मराठीतल्या प्रसिद्ध लेखिका. तो वारसा मृणालकडे आपोआपच आला आहे. हृषीकेशदेखील विपुल लिहीत असतो. उत्तम विनोदी नटाप्रमाणेच उत्तम विनोदी लेखक होण्याची मोठी क्षमता त्याच्यात आहे. सोनाली कुलकर्णीही विविध वृत्तपत्रांतून स्तंभांद्वारे लेखन करत असते. हे लोक आधीपासूनच उत्तम लिहिणारे होते आणि नंतर त्यांनी अभिनयाची वाट चोखाळली, असंही म्हणता येईल. अभिराम भडकमकर लेखक, कादंबरीकार, नाटककार म्हणून प्रसिद्ध आहेत. महेश कोठारे यांच्या 'पछाडलेला' या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका केली होती.
हिंदी चित्रपटसृष्टीचा विचार करता, मीनाकुमारीपासून ते दीप्ती नवलपर्यंत अनेक अभिनेत्रींची उदाहरणे सांगता येतील. मीनाकुमारी उत्तम शायरा होत्याच. त्यांच्या लिखाणात एक खोल 'दर्द' आहे. मीनाकुमारी यांना चित्रपटाच्या पडद्यावरही 'ट्रॅजेडी क्वीन' म्हणूनच ओळखलं गेलं. त्या चित्रपटसृष्टीत फार काळ रमल्या नसत्या, तर एक उत्तम लेखिका, शायरा, गझलकार म्हणूनही प्रसिद्ध झाल्याच असत्या, यात वाद नाही. दीप्ती नवलही उत्तम लेखिका, कवयित्री आहे. तिच्या सर्व भूमिकांप्रमाणेच तिची ही लेखिका म्हणून भूमिकाही तिच्या चाहत्यांना आवडते. अगदी अलीकडच्या काळातलं, जरा उलटं उदाहरण द्यायचं तर ट्विंकल खन्नाचं देता येईल. अभिनेत्री म्हणून अपयशी कारकिर्दीनंतर ट्विंकलनं लेखनाकडं लक्ष वळवलं. आज ती इंग्लिशमधील उत्तम विनोदी लेखन करणारी यशस्वी लेखिका म्हणून गणली जाते. तिचं पुस्तकही प्रसिद्ध झालं आहे.
प्रसिद्ध लेखक-गीतकार, दिग्दर्शक गुलजार यांना घेऊन बासू भट्टाचार्य यांनी सत्तरच्या दशकात 'असमाप्त कविता' नावाचा चित्रपट करायला घेतला होता. यात गुलजार यांची नायिका शर्मिला टागोर असणार होती. गुलजार यांना यात एका प्रकाशकाची भूमिका करायची होती. मात्र, काही रिळं शूटिंग झाल्यावर हा चित्रपट डब्यात गेला आणि नायक म्हणून पदार्पण करण्याचं गुलजार यांचं स्वप्न अधुरंच राहिलं. शीर्षकाप्रमाणेच हा सिनेमाही 'असमाप्त'च ठरला. मात्र, बासू भट्टाचार्य यांनी नंतर १९७७ मध्ये 'गृहप्रवेश' या चित्रपटाच्या वेळी गुलजार यांना पडद्यावर झळकावलंच. याखेरीज एन. चंद्रा यांच्या 'वजूद' नावाच्या चित्रपटातही गुलजार यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती.
अलीकडच्या काळातील ठळक नाव म्हणजे पीयूष मिश्रा. पीयूष मिश्रा हे नाटकातलं बहुरंगी-बहुढंगी व्यक्तिमत्त्व. गीतकार म्हणून नाव कमावल्यानंतर पीयूष मिश्रांनी अनेक चित्रपटांतून लहान-मोठ्या भूमिका केल्या. त्यांचा चेहरा आता सिनेरसिकांना चांगलाच परिचित आहे. गुलाल, तेरे बिन लादेन, गँग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका लक्षात राहिल्या आहेत. असेच आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे इंदूरचे मूळ मराठी स्वानंद किरकिरे. प्रसिद्ध गीतकार असलेल्या स्वानंद किरकिरेंनी पडद्यावरही अनेक भूमिका केल्या आहेत. अगदी अलीकडे आलेल्या चुंबक नावाच्या मराठी चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका होती. याशिवाय 'भाई : व्यक्ती आणि वल्ली' या चित्रपटात त्यांनी कुमार गंधर्वांची छोटीशी भूमिका केली होती.
याखेरीज अनेक लेखक, साहित्यिकांना कधी गमतीत, तर कधी गांभीर्याने कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याचं धैर्य दाखवलं आहे. त्यातले काही चित्रपट डब्यात गेले असतील, तर काही विस्मरणात गेले असतील. या लेखातही सर्वांचा आढावा घेणं अशक्य आहे. काही नावं विस्मृतीत गेलेली असू शकतात, तर काही नोंदी नोंदवायच्या राहून गेलेल्या असतील. मात्र, यापैकी काही प्रतिभाशाली मंडळींचं स्मरण यानिमित्तानं करता आलं, यामुळं माझ्यासाठी तरी ही आनंदाची स्मरणयात्रा ठरली आहे, यात वाद नाही.

----


(पूर्वप्रसिद्धी : अक्षरदान दिवाळी अंक २०२१)


---


28 Nov 2021

समतोल दिवाळी अंक २०२१ - लेख

 स्पर्श ‘रूपेरी’
----------------


स्पर्श... एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीला होणारा स्पर्श! किती काय काय दडलेलं असतं या स्पर्शात! एक तर जिवंतपणाची भावना... शिवाय प्रेम, अधिकार, वासना, माया, ममता, लोभ, तिरस्कार... किती तरी भावना एका स्पर्शात गुंतलेल्या असू शकतात... माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याला माणसांच्या सहवासात राहायला आवडतं. कळप करून राहणारे प्राणी असतात, त्याच समूहापैकी मानव हा एक प्राणी आहे. माणसाचा मेंदू अर्थातच इतर कुणाहीपेक्षा अधिक प्रगत असल्याने त्याच्या भावभावना आणि त्यांचं प्रदर्शन यांच्याही परी अनेक! माणसाच्या पाच ज्ञानेंद्रियांपैकी त्वचा हे अर्थातच स्पर्शाचं पहिलं आणि सर्वांत प्रभावी इंद्रिय! स्पर्शाची जाण प्रथम होते ती त्वचेला... त्यानंतरचे स्पर्शाचे लाभार्थी इंद्रिय म्हणजे डोळे! त्यानंतर जीभ, मग कान व नाक! कुणी स्पर्श केलाय हे डोळ्यांना दिसतं आणि मग आपला मेंदू तसा प्रतिसाद देतो. स्पर्शाची जाणीव अतिशय तीव्र असते. स्पर्शाप्रती आपलं शरीर विलक्षण संवेदनशील असतं आणि इथेच स्पर्श आणि त्यासंबंधीचे सर्व आचार-विचार यांचे नियम येतात. माणसानं समाज म्हणून जसजशी प्रगती केली तसतसे जगण्याचे, आहाराविहाराचे नियम तयार केले. अनावश्यक स्पर्श टाळण्याकडे या नियमांचा कल असणं स्वाभाविक होतं. तसं झालं नसतं, तर वासनेचा स्पर्श कायमच इतर स्पर्शांवर वरचढ ठरण्याची भीती तत्कालीन समाजाला वाटत होती. (खरं तर माणसाची नैसर्गिक आदिम प्रेरणा जोवर जिवंत आहे, तोवर ही भीती राहणारच!) मात्र, याचा तोटा असा झाला, की अनावश्यक स्पर्श टाळण्याच्या नादात आवश्यक स्पर्शही दूर सारले गेले. स्पर्शात असलेली निखळ मायेची, ममतेची भावना हरपली आणि माणसं चांगल्या स्पर्शालाही पारखी झाली.
चित्रपट ही तशी आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित कला. एकोणिसावे शतक संपताना पॅरिसमध्ये ल्युमिए बंधूंनी पहिल्या चलतचित्रांचं सादरीकरण केलं आणि सिनेमा आपल्या आयुष्यात आला. विसाव्या शतकात या कलेचा पूर्ण विकास झाला आणि आता तर आपल्या जगण्यातून सिनेमा आपण वजा करूच शकत नाही.
भारतात चित्रपटसृष्टीची सुरुवात दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या मूकपटाद्वारे १९१३ मध्ये झाली. तेव्हा चित्रपटात स्त्री-पुरुष स्पर्शाची दृश्यं दाखवणं जवळपास अशक्य होतं, याचं कारण मुळात चित्रपटांत महिलांनी काम करणं हेच निषिद्ध मानलं जात होतं. दादासाहेब अगदी वेश्यांकडेही गेले. मात्र, ‘आम्ही वेश्या आहोत, सिनेमात काम करण्यासारखं हलकं काम आम्ही करणार नाही,’ असे बाणेदार उत्तर तेव्हाच्या वेश्यांनी त्यांना दिलं होतं. त्यानंतर साळुंके नावाच्या एका पुरुष कलाकारालाच मिशी उतरवून ‘तारामती’ची भूमिका देण्यात आली होती, हा इतिहास आता बहुतेकांना माहिती आहे. सुरुवातीचे मूकपटही बहुतेक पौराणिक कथांवर आधारित होते आणि ते अगदीच समजण्यासारखं होतं. त्यानंतर मात्र स्टंटपटांचा एक काळ आला. वाडिया मूव्हिटोनने ‘फिअरलेस नादिया’ला घेऊन अनेक स्टंटपट त्या काळात आणले. मेरी ॲन इव्हान्स असं नाव असलेल्या, मूळ ऑस्ट्रेलियन असलेल्या या नटीचा ‘हंटरवाली’ हा चित्रपट १९३५ मध्ये प्रदर्शित झाला आणि तुफान हिट झाला. ही विभागणी अगदी सरळ होती. कुणी कुठलं काम करायचं आणि कुणी नाही याचे संकेत ठरले होते. अर्थात लवकरच म्हणजे १९३१ मध्ये ‘आलमआरा’ हा पहिला बोलपट आला आणि त्यानंतर सिनेमा बोलू लागल्यानंतरचं चित्र झपाट्यानं बदललं. पहिलं चुंबन दृश्यही याच काळात चित्रित झालं. ते होतं हिमांशू रॉय आणि देविकाराणी यांच्यात! सिनेमाचं नाव होतं ‘कर्मा’. तेव्हाच्या पद्धतीनुसार थेट प्रणयी चुंबन न दाखविता, नायक साप चावून बेशुद्ध पडला आहे आणि नायिका त्याला शुद्धीवर आणण्यासाठी तोंडाने श्वास देते आहे, अशा पद्धतीनं हे दृश्य चित्रित करण्यात आलं होतं. तरीही होतं ते चुंबनच आणि ते दृश्य तब्बल चार मिनिटांचं होतं. देविकाराणी यांना भारतीय चित्रपटांची ‘फर्स्ट लेडी’ म्हटलं जायचं आणि हिमांशू रॉय हे त्यांचे खऱ्या आयुष्यातले पतीच होते, हा तपशीलही तसा महत्त्वाचाच!
मा. विनायक यांनी ‘ब्रह्मचारी’ या १९३८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात मीनाक्षी शिरोडकर या अभिनेत्रीला बिकिनीत पेश करून मराठी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडवून दिली होती. ‘यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया का लाजता?’ हे त्यांचं गाणं तेव्हा सुपरहिट ठरलं. यात नायक-नायिका एकमेकांना थेट स्पर्श करीत नसले, तरी मुळात नायिकेला बिकिनीत दाखविणे हीच मराठी चित्रपटांसाठी एक क्रांती होती. (त्यानंतर मराठी चित्रपटात नायिका बिकिनीवर दिसण्यासाठी थेट २०१२ हे वर्ष उजाडावं लागलं. ‘नो एंट्री’ या सिनेमाच्या मराठी रिमेकमध्ये सई ताम्हणकर बिकिनीत झळकली होती. यावरून मा. विनायक यांनी १९३८ मध्ये केलेल्या धाडसाची पातळी लक्षात यावी.) स्वातंत्र्यपूर्व काळात स्टुडिओ पद्धत कायम होती, तरी वेगवेगळे विषय पडद्यावर येऊ लागले होते. अशोककुमारचा ‘किस्मत’ (१९४२) हा या प्रकारच्या चित्रपटांमधला ‘माइलस्टोन’ म्हणावा लागेल. यात पहिल्यांदाच नायक हा न-नायक (अँटिहिरो) दाखविण्यात आला होता. हिंदी चित्रपटसृष्टी बदलत चालली होती. मोकळ्या स्पर्शांना आत्मसात करत होती, याचंच हे द्योतक होतं.

त्यानंतर थोड्याच अवधीत भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आपल्या चित्रपटसृष्टीतही बदलांचं मोकळं वारं वाहू लागलं. राज कपूरने हिंदी चित्रपटसृष्टीतील नायक-नायिकांच्या प्रेमाला एक आक्रमक परिमाण दिलं. नायकाच्या एका हातात व्हायोलिन आणि एका हातावर रेललेली नायिका हे ‘बरसात’मधलं दृश्य पुढं ‘आरके स्टुडिओ’चा बॅनर बनलं. ‘आवारा’तल्या ‘दमभर जो उधर मूँह फेरे ओ चंदा...’सारख्या गाण्यात दिसणारा थेट आव्हान देणारा प्रणय प्रेक्षकांनी तत्पूर्वी फार क्वचित मोठ्या पडद्यावर पाहिला होता. तत्कालीन भारतीय समाजमानस पाहिलं, तर नायक-नायिकेच्या अशा जवळिकीची, स्पर्शाची दृश्यं चित्रपटांतूनच पाहायला मिळण्यासारखी स्थिती होती. देशातील बहुसंख्य जनता गरिबीत जगत होती आणि अनेकांना दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत होती. तेव्हाही महानगरांमधून छोट्याशा घरांतून लोक राहत असत आणि प्रणयासाठी वेगळी जागा मिळणं किंवा तेवढा निवांतपणा मिळणं हे दुरापास्तच होतं. ग्रामीण भागातील अडचणी आणखीन निराळ्या होत्या. स्त्रियांनी ‘चूल आणि मूल’ एवढ्यापुरतंच मर्यादित राहावं, अशीच एकूण समाजधारणा होती. अशा वेळी तेव्हाच्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या फँटसीला स्पर्श केला. चित्रपट म्हणजे रूपेरी पडद्यावरची विलक्षण सुंदर, स्वप्नील दुनिया ठरली. प्रत्यक्ष आयुष्यात जे जे करणं शक्य नाही, ते ते चित्रपटाच्या नायक-नायिकेच्या रूपाने अनुभवण्याचं सुख प्रेक्षकांना लाभलं. प्रणयातील स्पर्शाबाबत समाज पूर्वीपासूनच फार कठोर होता. अगदी आजही हे चित्र बदललेलं नाही. समाजातील दांभिकता अशा वेळी अगदी लख्ख उठून दिसते. ते काहीही असलं, तरी चित्रपटांनी बदलत्या काळानुसार, धाडसीपणा दाखवीत स्पर्श या संकल्पनेबाबत असलेली एक अदृश्य नकारात्मकता तोडून टाकली. चित्रपटांचा प्रवास समाजाच्या धारणांशी समांतर होत असला, तरी फँटसीबाबत (मग ती कुठलीही असो!) हा रथ थोडा दशांगुळे वर चालतो. प्रेक्षकांनाही तेच हवं असतं. 

स्पर्शाबाबत अगदी वेगळा विचार करणारे काही चांगले चित्रपट आले. सई परांजपे यांचा ‘स्पर्श’ हा हिंदी चित्रपट तर त्याच्या नावापासूनच या विषयाशी जोडला गेला आहे. अंध मुलांच्या शाळेचा प्रिन्सिपॉल असलेला अंध नायक, त्याची अंध शाळा, तिथल्या मुलांचं भावविश्व आणि या जगात ‘डोळस’ नायिकेचं आगमन होणं... हा सर्व प्रवास सई यांनी फार तरलतेनं दाखवला आहे. अंध व्यक्तीला स्पर्शाचं किती महत्त्व असतं, हे सांगायला नको. हा चित्रपट त्या स्पर्शाची महती सांगत असतानाच ‘डोळस’ व्यक्तींनाही आणखी डोळस बनवतो, यात शंका नाही. उत्कृष्ट संवाद, नसीरुद्दीन शाह व शबाना आझमी यांचा अप्रतिम अभिनय आणि सई यांचं संवेदनशील दिग्दर्शन यामुळं आजही हा चित्रपट अनेक रसिकांच्या मन:पटलावर कोरला गेला आहे. यातली अनेक दृश्यं डोळ्यांत पाणी आणतात. एखाद्या व्यक्तीकडं एखादं ज्ञानेंद्रिय नसेल, तर त्याची अन्य ज्ञानेंद्रियं अत्यंत तीक्ष्ण आणि तीव्र होतात. या चित्रपटात अंध व्यक्तींच्या आयुष्यातले असे अनेक क्षण कमालीच्या तरलतेनं दाखविले आहेत. नसीरुद्दीन आणि शबाना यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर ते सर्व प्रसंग अगदी जिवंत, रसरशीत केले आहेत.
‘कोशिश’सारख्या चित्रपटात जया भादुरी आणि संजीवकुमार यांनी मूकबधिर दाम्पत्याची भूमिका कमालीच्या प्रभावीपणे रंगविली होती. त्यातही स्पर्शाची महती कित्येक प्रसंगांत दिसून येते. ‘खामोशी - द म्युझिकल’ आणि ‘ब्लॅक’ यासारख्या चित्रपटांतून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी अनुक्रमे मूक-बधीर माता-पित्यांची मुलगी आणि अंध व मूक मुलगी व तिचे शिक्षक यांची कथा प्रत्ययकारकरीत्या सांगितली होती. या चित्रपटांत स्पर्शाचं महत्त्व अगदी अनन्यसाधारणपणे आपल्यासमोर येतं. ही काही सहज आठवणारी आपल्याकडची ठळक उदाहरणं. चित्रपटांमधला स्पर्श या कलाकृतींमधून अगदी प्रगल्भ आणि संवेदनशीलतेनं मांडल्याचं सहज दिसून येतं.
हिंदी चित्रपटसृष्टीत स्पर्शाच्या बाबतीत मोकळेपणा आला, त्याला आणखी एक महत्त्वाचं कारण असावं असं मला वाटतं. हिंदी चित्रपटसृष्टीवर पहिल्यापासून पंजाबी मंडळींचं प्राबल्य राहिलेलं आहे. पंजाबी मंडळी स्वभावानं मोकळीढाकळी असतात. दोन द्यावेत, दोन घ्यावेत असा एकूण त्या मातीचाच गुण दिसतो. शरीरानं काबाडकष्ट करावेत, मजबूत खावं-प्यावं आणि जगणं साजरं करत राहावं अशी एकूण वृत्ती दिसते. त्यामुळं तिथं स्पर्शाबाबत कुठलेही अवडंबर नाही. एखादी तरुण नात आपल्या आजोबांना येऊन बिलगू शकते, तर एखादा रसिक जिजाजी सहज आपल्या ‘साली’ला गमतीत मिठी मारू शकतो. पंजाबी किंवा एकूणच उत्तर भारतीय संस्कृतीत असलेला हा मोकळेपणा हिंदी चित्रपटसृष्टीतील स्पर्शाबाबत फार मोलाचा ठरला. त्यामुळे हिंदी सिनेमांत एखादा नायक (भले तिशीचा दिसत असला, तरी) ‘माँ, मैं बीए पास हो गया हूँ’ म्हणत धावत येऊन आपल्या ‘माँ’ला सहज बिलगू शकायचा. तुलनेनं मराठी संस्कृतीत, आणि पर्यायाने मराठी सिनेमात हे बसत नाही. कल्पना करा, रमेश देव किंवा रवींद्र महाजनी किंवा अरुण सरनाईक किंवा कुलदीप पवार पळत येऊन, दुर्गा खोटे किंवा सुमती गुप्ते किंवा शांता जोग यांना येऊन ‘आई, आई... मी बीए पास झालो’ म्हणत मिठी मारताहेत... शक्यच नाही हे आपल्याकडे!
मा. विनायक यांनी १९३८ मध्ये नायिकेला बिकिनी परिधान करायला लावली असली, तरी मराठीत नायक-नायिकांनी शारीर जवळीक साधण्याचं प्रमाण पुढच्या काळात जवळपास शून्यवत होतं. फार तर एखादी अवघडलेली मिठी... चुंबन वगैरे गोष्ट तर लांबच राहिली. ते दाखवण्यासाठी दोन गुलाबाची किंवा चक्क झेंडूची फुलं एकमेकांवर आपटायची. किंवा नायक-नायिका एकमेकांच्या तोंडाजवळ येत येत एकदम कॅमेऱ्याच्या फ्रेममधून वर, खाली, डावीकडे, उजवीकडे असे कुठेही ‘फेड आउट’ व्हायचे. जी काही फेडाफेडी असेल, ती प्रेक्षकांच्या डोळ्यांआड! साधारण ऐंशीच्या दशकापर्यंत हे असंच होतं. मराठी नायकांची (आणि त्यांचीच का? नायिकांचीही) या काळात पडद्यावर झालेली कुचंबणा अगदीच कारुण्याची झालर वगैरे लेवून आलेली होती. वास्तविक, सूर्यकांत, चंद्रकांत, रमेश देव, श्रीकांत मोघे, अरुण सरनाईक किंवा रवींद्र महाजनी हे सर्वच नायक रूपाने देखणे होते. उंचेपुरे होते. मात्र, त्यांना पडद्यावर फार शारीर जवळीक साधून, नायिकेशी प्रणय करताना दाखवणं कुठल्याही मराठी दिग्दर्शकाला तेव्हा तरी जमलं नाही. मराठी चित्रपटांत व्यवस्थित चुंबनदृश्य यायला एकविसावं शतक उजाडावं लागलं. माझ्या आठवणीनुसार, २०१० मध्ये आलेल्या ‘जोगवा’ या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि उपेंद्र लिमये यांचं चुंबनदृश्य होतं. त्यानंतर ‘डबलसीट’ या चित्रपटातही अंकुश चौधरीसोबत मुक्ता बर्वेचं एक चुंबनदृश्य आलं. हल्लीच्या काळात चुंबनदृश्यांना प्रेक्षक सरावले असले, तरी मराठी चित्रपटांत अशी दृश्यं पाहायला प्रेक्षक आजही जरा दचकतात हेच खरं. किंबहुना पूर्वी मराठी चित्रपटांना ‘ए’ (फक्त प्रौढांसाठी) हे प्रमाणपत्र फार क्वचित असायचं. ‘पुणे ५२’ या चित्रपटाला तसं सर्टिफिकेट होतं आणि त्याला साजेशी बोल्ड दृश्यंही त्या चित्रपटात होती. त्यानंतर तसे इतरही काही मराठी चित्रपट झळकले.
हिंदी काय, इंग्रजी काय किंवा मराठी काय; कुठल्याही चित्रपटांत शारीर जवळिकीची, निकट स्पर्शाची दृश्यं साकारणं हे संबंधित अभिनेत्यांसाठी तसं कठीणच काम असणार! तीव्र प्रखर उजेड देणारे लाइट्स, कॅमेरे, साउंड आणि इतर अनेक तंत्रज्ञ मंडळींच्या उपस्थितीत चुंबनदृश्य किंवा प्रणयदृश्य देणं, ते भाव नजरेत आणणं हे सराईत अभिनेत्यांनाच जमू शकतं. शिवाय तो ‘अभिनय’च असतो. सामान्य प्रेक्षकांना त्या क्षणापुरता त्या नायकाचा कितीही ‘हेवा’ वाटला, तरी प्रत्यक्ष नायकाला तो प्रसंग साकारणं तितकंच सुखद किंवा सहज असतंच असं नाही. नायिकांची अवस्थाही काही यापेक्षा वेगळी नसणार!
अलीकडे ओटीटी माध्यम आल्यापासून तर सेन्सॉर नसल्याने या स्पर्शाला काही धरबंधच राहिलेला नाही. ‘जे खपतं, तेच विकायचं’ या तत्त्वानुसार, लैंगिक भावना चेतविल्या जातील, अशा भडक दृश्यांची रेलचेल बहुतेक वेबसीरीजमध्ये असते. त्यातील काही दृश्ये मुद्दाम आधी सोशल मीडियावर लीक केली जातात. प्रेक्षकांची प्रतिक्रिया आजमावली जाते आणि मग ती सीरीज ‘गाजविली’ जाते. अर्थात ओटीटीवरचे स्पर्श हा स्वतंत्र लेखाचाच विषय होईल. या लेखापुरता केवळ चित्रपटांचा विचार केला तरी पूर्वीपेक्षा या रूपेरी स्पर्शांत खूप जास्त सहजता, मोकळेपणा आला आहे हे मान्य करायला पाहिजे. विशेषत: एकविसाव्या शतकात जन्मलेल्या पिढीसाठी ‘स्पर्श’ ही कुठलीही कलंकित किंवा अवांछित चीज नसून, ती एक अगदी सहज घडणारी शारीर क्रिया आहे. मनाचा हा नितळपणा दुर्दैवानं आधीच्या पिढ्यांमध्ये नव्हता. त्यासाठी तेच जबाबदार होते, असंही नाही. तेव्हाचे संस्कारच तशा पद्धतीनं घडण करणारे होते. आताच्या पिढीमध्ये ते अवघडलेपण नाही, तसंच स्पर्शाविषयीची अनावश्यक, फाजील, छुपी अशी कुठलीही धारणाही नाही. तेच प्रतिबिंब आजच्या चित्रपटांत उमटतंय, यात आश्चर्य नाही. स्पर्श या निखळ आनंददायक भावनेचा आविष्कार तसाच होत असल्याचं पाहून चित्रपटांचा पडदाही अधिक ‘रूपेरी’ व देखणा दिसू लागला आहे.
टच वूड!

---

(पूर्वप्रसिद्धी : समतोल दिवाळी अंक २०२१)

---

29 Oct 2021

साहित्य शिवार दिवाळी अंक २०२१ - लेख

लक्षात राहिलेली असाइनमेंट
----------------------------------


पत्रकारितेच्या पेशात सर्वांत आनंददायक भाग विविधांगी अनुभवांचा असतो. एरवी सहजासहजी जे अनुभव घेता येत नाहीत ते या पेशात सहज घेता येतात. वेगवेगळ्या व्यक्तींना भेटता येतं, अनेक ठिकाणांना भेटी देता येतात आणि अनेक घटनाचं वार्तांकन प्रत्यक्ष उपस्थित राहून करता येतं. अनेक जण केवळ या अनुभवांसाठी पत्रकारितेत येतात. अर्थात पत्रकारितेत सर्वांनाच हे ‘थ्रिल’ अनुभवता येतं असं नाही. विशेषत: डेस्कला, म्हणजे उपसंपादक म्हणून जी मंडळी काम करत असतात, त्यांना वार्ताहरांसारखी बाहेर जाऊन असे वार्तांकन करण्याची संधी तुलनेनं कमी वेळा मिळते. माझ्या सुदैवानं मी उपसंपादक असूनही मला काही अविस्मरणीय असाइनमेंट मिळाल्या. माझ्या परीने मी त्या चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याचा प्रयत्न केला.
मी ‘सकाळ’मध्ये काम करीत असताना केलेल्या एका दौऱ्याची हकीकत इथं सांगणार आहे. आपल्या संसदेवर १३ डिसेंबर २००१ रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होताना, म्हणजे डिसेंबर २००२ मध्ये या हल्ल्यात मरण पावलेल्या जवानांच्या नातेवाइकांशी बोलून एक रिपोर्ताज करावा, असं मला तेव्हाचे आमचे संपादक अनंत दीक्षित यांनी सांगितलं. ही मोठीच जबाबदारी होती. मी अगदी थरारून गेलो. मी लगेच या घटनेची सर्व माहिती जमा करण्यास सुरुवात केली आणि जोडीला दिल्लीला जाण्याची तयारीसुद्धा! साधारण आठ ते दहा दिवसांचा दौरा होता.
या दौऱ्याची हकीकत सांगण्यापूर्वी १३ डिसेंबर २००१ याच दिवसाची एक आठवण सांगणं अप्रस्तुत ठरणार नाही. नगरचे नुकतेच दिवंगत झालेले माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासंदर्भातील ही आठवण आहे. मी १९९९-२००० या वर्षात बी. सी. जे. (बॅचलर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम) हा कोर्स पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पूर्ण केला. या वर्षाच्या शेवटी दिल्लीला ट्रिप जायची. आम्ही मार्च २००० मध्ये दिल्लीच्या ट्रिपला गेलो. या ट्रिपच्या निमित्ताने मी दिल्ली प्रथमच पाहिली. संसद भवन पाहायला मिळालं. संसदेचं अधिवेशन सुरू होतं. तिथल्या कडक सुरक्षाव्यवस्थेतून आत प्रेक्षक गॅलरीत जाऊन कामकाज पाहिलं. नंतर तिथल्या प्रसिद्ध व्हरांड्यातून आम्ही फिरत होतो. राम नाईकांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथं दिलीप गांधी बसले होते. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. ‘मी पण नगरचाच’ वगैरे सांगून जरा जवळीक दाखवली. त्यांनी त्यांचं कार्ड दिलं. ते घेतलं आणि आम्ही तिथून परतलो. त्यानंतर पुढच्याच वर्षी १३ डिसेंबर २००१ रोजी संसद भवनावर दहशतवाद्यांचा हल्ला झाला. आम्ही ‘सकाळ’ ऑफिसमध्ये तेव्हा टीव्हीवर बातम्या बघत होतो. त्या वेळी एका चॅनेलवर खासदार दिलीप गांधी दहशतवाद्यांच्या गोळीबारातून बचावले, असं सांगत होते. मला एकदम आठवलं, की माझ्याकडं त्यांचं कार्ड आहे. मी ऑफिसमध्ये सांगून, त्यांच्याशी बोलता येतंय का बघू असं ठरवलं. माझ्या कार्डवर त्यांचा मोबाइल आणि दिल्लीतल्या घरचा असे दोन्ही नंबर होते. मोबाइल लावला तर तो लागला नाही. मग थोड्या वेळाने घरचा लँडलाइन नंबर लावला. गांधी घरीच होते. मी त्यांना माझा परिचय सांगितला आणि त्या घटनेविषयी विचारलं. त्यांनी सांगितलं, की हल्ला झाला, तेव्हा ते त्या व्हरांड्यातच होते. संसद भवनाच्या त्या प्रसिद्ध मोठमोठ्या गोल खांबांजवळून ते जात असताना अचानक गोळी आली आणि त्यांच्या जवळून गेली. त्या वेळी ते त्या खांबांमागे गेले आणि त्यामुळे वाचले इ. इ.
मी सर्व तपशील देऊन ती बातमी लिहिली आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ डिसेंबर २००१ रोजी ‘सकाळ’च्या पहिल्या पानावर माझ्या बायलाइनने (‘श्रीपाद ब्रह्मे यांजकडून’ अशी बायलाइन देण्याची तेव्हा स्टाइल होती...) प्रसिद्ध झाली. ‘गोळी सुटली आणि मी खांबामागे लपलो...’ असं काही तरी शीर्षक होतं. ती बातमी मी बरेच दिवस जपून ठेवली होती. थोडक्यात, ही हल्ल्याची घटना घडली त्या दिवशीही वार्तांकनात मी थोडाफार असा सहभाग नोंदवला होताच. कदाचित त्यामुळेच दीक्षितसाहेबांनी मला या मुलाखती घेण्यासाठी पाठवण्याचं ठरवलं असावं. काही का असेना, मला ही असाइनमेंट मिळाली हे खरं!
तेव्हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बरंच काय काय घडत होतं. जगात उलथापालथ सुरू होती. एकविसावं शतकाचं आगमन सर्व जगानं मोठ्या उत्साहानं केलं होतं. मात्र, दहशतवादाचं एक अदृश्य सावट तोवर सगळीकडं पसरलेलं स्पष्ट जाणवत होतं. भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन वर्षांपूर्वीच कारगिलचं युद्ध झालं होतं. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लाहोर बसयात्रा काढून पाकिस्तानशी मैत्रीचा हात पुढं केला होता. मात्र, पाकिस्ताननं ‘कारगिल’ घडवून आपला विश्वासघात केला होता. कारगिलमध्ये पाकिस्तानला आपण चोख धडा शिकवला असला, तरी पुढच्या काळात पाकिस्तानबरोबरच्या संबंधांत कमालीची कटुता आली होती. जगभरात दहशतवादाचं सावट गडद होत होतं. त्यात ११ सप्टेंबर २००१ रोजी कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेननं न्यूयॉर्कमधील ट्विन टॉवर्सवर विमानं धडकवून इतिहासातला सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणला. या भयानक हल्ल्यानं सर्व जग भयचकित झालं होतं. या हल्ल्यानंतर केवळ तीनच महिन्यांत भारताच्या संसदेवर दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आला होता. तिथे तैनात असलेल्या कडक सुरक्षाव्यवस्थेमुळं दहशतवादी आतपर्यंत जाऊ शकले नाहीत. देशातील सर्व प्रमुख राजकीय नेते तेव्हा संसदेच्या इमारतीत होते. दहशतवादी संसदेच्या मुख्य इमारतीत प्रवेश करू शकले असते, तर काय झालं असतं, याची कल्पनाही करवत नाही.
या हल्ल्याची वर्षपूर्ती जवळ आली, तेव्हा म्हणजे साधारणत: २००२ च्या नोव्हेंबर महिन्यात संपादक अनंत दीक्षित यांनी मला बोलावून, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलिस व जवानांच्या नातेवाइकांना भेटून लेख करण्याची कामगिरी सोपविली. मी दोन-अडीच वर्षांपूर्वी दिल्लीला गेलो होतोच. आता या दौऱ्यानिमित्त पुन्हा दिल्लीवारी होणार, याचा आनंद होता. तेव्हा मोबाइल खूप प्रमाणात सर्वांकडे नव्हते. माझ्याकडे तर मोबाइल नव्हताच. आमचं दिल्लीला ऑफिस होतं आणि विजय नाईक, अनंत बागाईतकर ही ज्येष्ठ मंडळी तिथं होती. त्यामुळं मी निर्धास्त होतो.
पुण्यातून २५ नोव्हेंबर २००२ रोजी पहाटेच्या वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेसनं मी दिल्लीला निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाला हजरत निजामुद्दीनला पोचलो. इंडियन न्यूजपेपर्स सोसायटीच्या (आयएनएस) गेस्ट हाउसमध्ये माझी राहण्याची सोय होती. याच इमारतीत आमचं ‘सकाळ’चं कार्यालय होतं. इतर वृत्तपत्रांचीही कार्यालयं त्या इमारतीत होती. रफी अहमद किडवाई मार्गावर तेव्हा दिल्ली मेट्रोचं काम सुरू होतं, हे आठवतंय. ‘आयएनएस’च्या समोरचा रस्ता पूर्ण खोदून ठेवला होता. संसद भवनाला भेट द्यायची होती. म्हणून मग विजय नाईकांना फोन केला. ‘संसदेसाठीच्या पासाचा अर्ज करून ठेवू, उद्या मिळेल,’ असं ते म्हणाले. आमचं तिथलं ऑफिस साधारण साडेदहाला उघडायचं. तेव्हा विवेक नाशिककर हे तिथं कार्यालयीन सहायक होते. मग मी माझे फोटो त्यांच्याकडं देऊन ठेवले. नाशिककरांनी अर्ध्या तासात संसदेतून माझा अर्ज आणला. मी तो भरून दिला.
माझ्याकडं या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांची यादी होती. नाईकसाहेबांनी या मंडळींचे पत्ते मिळवून दिले होतेच. मग मी माझी मोहीम सुरू केली. पहिले हुतात्मा होते मातबरसिंह नेगी. दिल्लीत मंदिर मार्ग परिसरात नेगींचं घर होतं. रिक्षानं गेलो. तिथं मातबरसिंह नेगींचं घर शोधलं. त्यांच्या पत्नी, मुलगा, जावई, मुलगी भेटले. नेगींच्या पत्नी टिपिकल पंजाबी घरातल्या. त्यांना पतीच्या आठवणीनं गहिवरून येत होतं. एवढ्या लांबून पुण्याहून हा एक मुलगा मुलाखत घ्यायला आलाय, असं काहीसं कौतुकही त्यांच्या डोळ्यांत होतं. ही पहिली मुलाखत उत्तम झाली. मला आता पुढच्या मुलाखतीचे वेध लागले होते. पुढचे पोलिस हुतात्मा होते बिजेंद्रसिंह गुर्जर. ते मोलडबंद नावाच्या गावात राहत होते. मग आकाशवाणीच्या स्टॉपवरून ४६० नंबरची बस पकडून बदरपूरला गेलो. तिथं मोलडबंद गावात गुर्जर यांचं घरही लगेच सापडलं. मुळात वर्षभरात या हुतात्मा पोलिसांची व त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रसिद्धी बऱ्यापैकी झाली होती. त्यामुळं कुणालाही विचारलं, तर लगेच लोक पत्ता सांगायचे. अर्थात पुढे वेगळे अनुभवही आले. बिजेंद्रसिंहांचं घर टिपिकल उत्तर भारतीय. वरच्या गच्चीत बाजा वगैरे टाकलेल्या होता. हुक्काही दिसला. हे सर्व पोलिस व त्यांचे कुटुंबीय तसे अगदी साधे होते. बिजेंद्रसिंहांची पत्नी, पाच मुलं व सासरे भेटले. त्यांचेही फोटो काढले. बिजेंद्रसिंहांचे सासरे सुभेदार होते. त्यांचं नाव लक्षात नाही आता, पण त्यांनी भरपूर गप्पा मारल्या. पहिल्याच दिवशी दोन मुलाखती चांगल्या झाल्यानं मला हुरूप आला. तेव्हा मी वहीत मुद्दे लिहून घेत होतो. मुलाखती झाल्यावर लगेच रात्री त्या सविस्तर लिहून काढल्या आणि मगच झोपलो.
बुधवार, २७ नोव्हेंबर २००२. आज राठधाना या गावी शहीद नानकचंद यांच्या घरी जायचं होतं. दिल्लीतल्या ‘महाराणा प्रताप अंतर्राज्यीय बस अड्ड्या’वर पोचलो. तिथं लगेच सोनीपतची बस मिळाली. एक वाजता सोनीपतला पोचलो. हरियाणा राज्यात मी प्रथमच येत होतो. धुळीनं माखलेल्या त्या गावातून लगेच ‘राठधाना’ला जायला बस नव्हती. मग सायकलरिक्षा करून सुभाष चौकात गेलो. तिथं तो सायकलरिक्षावाला म्हणाला, की आणखी दुसरीकडंनंच राठधानाला जाणारे ‘टप्पू’ मिळतील. (हे एक अजबगजब वाहन आहे. उत्तरेत तेव्हा सर्रास दिसायचं. आता आहेत की नाही, माहिती नाही.) त्यानं एका ठिकाणी नेऊन घातलं. तिथनं जाम लवकर रिक्षा मिळेना. अखेर एक रिक्षावाला ठरवला. जाऊन-येऊन व तिथं थांबण्याचे ७५ रुपये ठरले. एकदाचा राठधानात पोचलो. अगदी छोटंसं गाव होतं. शहीद नानकचंदांचं घर शोधून काढलं. त्यांच्या पत्नी गंगादेवी एकट्याच घरात होत्या. मग शेजारच्या एक बाई आल्या. गंगादेवी निरक्षर होत्या. नानकचंद हे हरिजन होते. त्यामुळं ‘आम्हाला मदत मिळताना जातिभेद केला जातोय,’ असं गंगादेवींनी डोळ्यांत पाणी आणून सांगितलं. उत्तर भारतातलं हे भयंकर जातवास्तव असं धाडकन माझ्या अंगावर कोसळलं होतं. मला अस्वस्थ व्हायला झालं. काय करावं ते सुचेचना. गंगादेवींना पाच मुलं आहेत. त्यापैकी एकही घरी नव्हता. थोरल्या मुलाला दिल्ली पोलिसांत नोकरी मिळालीय, असं त्या सांगत होत्या. मग तिथले काही फोटो काढले. त्यांच्या स्मारकाचं कामही रखडलंय. त्यामागचं कारणही त्यांचं दलित असणं हेच होतं. देशासाठी प्राणार्पण केलेल्या या शहिदाच्या नशिबी आपल्या स्वत:च्या गावात एक बरंसं स्मारकही नव्हतं! अस्वस्थ मनस्थितीतच तिथून निघालो.
आता मला पूँठकुलाँला जायचं होतं. तेव्हा अंगात उत्साह बराच होता. सोनीपतहून दिल्लीला पोचेपर्यंत पाच वाजले. लगेच बलवानाला (ते बवाना आहे, हे नंतर कळलं.) जाण्याचा निर्णय मी घेतला. (अतिउत्साह नडतो, तो असा) दोन-चार जणांनी सांगितल्यावरून नरेलाला आधी जाण्याचं ठरवलं. मग आयएसबीटी ते नरेला हा जवळजवळ पावणेदोन तासांचा प्रवास उभ्यानं, असह्य गर्दीत पार केला, हे चांगलंच आठवतंय. (सध्याच्या कोव्हिडकाळात हे नुसतं आठवूनही अंगावर काटा येतो तो भाग वेगळा!) नरेलालाच जाईपर्यंत आठ वाजले होते. अजून पूठकुलाँ दृष्टिक्षेपातही नव्हतं. तरीही लगेच बस मिळाली, म्हणून बवानालाही गेलो. मात्र, तिथं गेल्यावर पूठकुलाँला आणखीन अर्धा तास लागेल, असं कळल्यावर माझा उत्साह संपला. दिल्लीला परत जायला रात्री उशिरा गाड्याही नव्हत्या. मग तिथूनच नाईकांना फोन केला. नंतर पूठकुलाँला उद्या येण्याचं ठरवलं व सरळ दिल्लीची परतीची बस पकडली. ती दहाला आयएसबीटीला पोचली.
गुरुवार, २८ नोव्हेंबर २००२. आज संसद भवनात जायचं होतं. सकाळी साडेदहा वाजता मी संसद भवनात गेलो. कडेकोट बंदोबस्त होता. दोन-अडीच वर्षांपूर्वी मी संसदेत आलो होतो, त्या तुलनेत आता हे फारच जाणवलं. अर्थात माझ्याकडं पास असल्यानं सहज आत जाऊ शकलो. मला ११ नंबरच्या गेटपाशी शहीद जवानांची नावं लावली होती, ती जागा पाहायची होती. पण तिथं फारच सिक्युरिटी असल्यानं जाता आलं नाही. मग प्रेस गॅलरीत जाऊन बसलो. प्रश्नोत्तराचा तास व शून्य प्रहरातली चर्चा ऐकली. पंतप्रधान वाजपेयी राज्यसभेत होते; पण चंद्रशेखर, शरद पवार लोकसभेत पाहायला मिळाले. बाकीही बरेच होते. प्रेस गॅलरीत बागाईतकर होतेच. नंतर नाईकही आले. शून्य प्रहर झाल्यावर एक वाजता संसदेचे तेव्हाचे उपसंचालक (सुरक्षा) व्ही. पुरुषोत्तम राव यांना भेटलो. त्यांच्याकडून सुरक्षाव्यवस्थेबाबत माहिती घेतली. गेल्या वर्षभरात संसदेत वाढवलेल्या सुरक्षाव्यवस्थेची (अर्थात माध्यमांना देणं शक्य आहे इतपतच) माहिती राव यांनी दिली. नंतर राम नाईकांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथं खासदार दिलीप गांधी भेटले. त्यांना गेल्या वर्षी फोनवर घेतलेल्या मुलाखतीची आठवण करून दिली.
संसदेतून लगेच बाहेर पडलो. आज पूँठकुलाँला शहीद ओमप्रकाश यांच्याकडं काहीही करून जायचं होतंच. मग मोरीगेटला गेलो. पण तिथून बवानाला थेट बस नसल्याचं कळलं. मग आझादपूरची बस पकडून तिथं गेलो. तिथून बवानाची बस पकडली. रस्त्यातच पूठकुलाँ गाव अशी पाटी दिसली. मग तिथंच उतरलो. ९७२ नंबरची बस पकडून पूठकुलाँला गेलो. तिथं शहीद ओमप्रकाश (हेडकॉन्स्टेबल) कुणालाच माहिती नव्हते. मी हादरलोच. पण मी सायकलरिक्षानं सुलतानपुरी पोलिस ठाण्यात गेलो. तिथं कळलं, की हे पूठकुलाँ नाही, पूठ खुर्द गाव आहे म्हणून! मग तिथल्या पोलिसानं एक रिक्षा बघून दिली. त्यानं २० मिनिटांत पूठकुलाँला पोचवलं. आता मी योग्य ठिकाणी आलो होतो. त्यामुळं तिथं ओमप्रकाश यांचं घर लगेच सापडलं. त्यांचे म्हातारे आई-वडील भेटले. त्यांच्या पत्नी, मुलगा भेटले. भावाच्या घरी गेलो. अगदी दाटीवाटीच्या वस्तीत असलेलं हे एक साधं घर होतं. ओमप्रकाश दहशतवादी हल्ल्यात मरण पावल्यानं अचानक हे कुटुंब प्रसिद्धीच्या झोतात आलं होतं. इतर माध्यमांचे प्रतिनिधीही येत होते. वाहिन्यांचा एवढा सुळसुळाट नव्हता. तरी मिळणाऱ्या प्रसिद्धीनं ओमप्रकाश यांचं कुटुंब चांगलंच बावरून गेलं होतं, असं आज विचार करताना जाणवतं.
शुक्रवार, २९ नोव्हेंबर २००२. आज उत्तर प्रदेशातील हरिपुरा गावी हुतात्मा घनश्याम गुर्जर यांच्या घरी जायचं होतं. सकाळी सात वाजता नवी दिल्ली रेल्वे स्टेशन गाठलं. कोसीकलाँचं तिकीट काढलं. पावणेआठला आग्रा पॅसेंजर आली. तिच्यात बसलो. ही गाडी अकराला कोसीकलाँ गावात पोचली. तिथून ‘टप्पू’तून हरीपुरा गावात गेलो. गाव अगदी छोटं होतं. रस्त्यातच घनश्याम गुर्जर यांचा मोठ्ठा बंगला लागला. त्यांचा मुलगा बच्चूसिंह भेटला. घनश्याम यांची पत्नी भेटली. आता त्या बंगल्याशेजारीच घनश्याम यांच्या स्मारकाचं काम सुरू आहे. ते बच्चूसिंहनं दाखवलं. आतापर्यंत भेटलेल्या कुटुंबांत नेगींनंतर घनश्याम गुर्जर यांचंच कुटुंब जरा सुस्थितीतलं वाटलं. वडिलांच्या स्मारकासाठी बच्चूसिंह यांनी कंबर कसली होती. इथंही कुणाचं स्मारक होणार, कधी होणार, कसं होणार या सर्वांत जातीचं एक गणित अदृश्यपणे दिसलंच. उत्तर प्रदेशात यापूर्वी एक आग्रा सोडलं, तर मी यापूर्वी कधी गेलो नव्हतो. हरिपुरा हे खऱ्याखुऱ्या उत्तर प्रदेशाचं, एकविसाव्या शतकातलं दर्शन होतं. महाराष्ट्रासारख्या राज्यातून आलेल्या कुणालाही धक्काच बसेल, अशीच तेव्हा तिथली सामाजिक परिस्थिती होती. मी मनातल्या मनात या गोष्टींची नोंद घेऊन पुढच्या मुलाखतीकडं वळलो. आता मला अकबरपूर या गावी शहीद रामपाल यांच्या घरी जायचं होतं. ‘टप्पू’च्या मागं लटकून कोसीत आलो. मग जीपमध्ये बसून पलवलला आलो. तिथून मंडिकौलाला जायचं होतं. एक बस आली. खच्चून भरली होती. शिवाय टपावरही लोक बसले होते. मग त्यात घुसलो. मध्ये तर ती बस पार तिरपी झाली होती. मग कंडक्टरनं वरच्या काही लोकांना खाली उतरवलं. (धन्य धन्य तो उत्तर प्रदेश!) पुढं एका फाट्यावर बस पंक्चर झाली. (आनंदीआनंद!) बरेच लोक खाली उतरले. मीही उतरलो. तेवढ्यात त्या शहाण्या ड्रायव्हरनं लगेच गाडी पुढं ताबडली. मी भयंकर चरफडलो. पण इलाज नव्हता. मग मागून आलेल्या एका जीपच्या साइडपट्टीवर लटकून १५ किलोमीटरवर असलेल्या मंडिकौला गावात गेलो. तिथून अकबरपूरला जायला व परत यायला रिक्षा ठरवली. रामपाल यांच्या घरी (अखेर) पोचलो. त्यांचे भाऊ होते. त्यांच्याशी बोललो. तिथं समोरच रामपाल यांच्या स्मारकाचं व लायब्ररीचं काम सुरू आहे. हे गाव तर पारच छोटं, अगदी वस्ती म्हणावं एवढं लहान होतं. आजूबाजूला सर्वत्र शेती. गावापर्यंत जायला धड रस्ता नाही. संपूर्ण चिखलातून आमची रिक्षा चालली होती. आता या वास्तवाचे तेवढे धक्के बसत नव्हते. रामपाल यांच्या कुटुंबीयांचा निरोप घेऊन सुन्न अवस्थेत निघालो व रात्री दिल्लीला मुक्कामी परतलो.
शनिवार, ३० नोव्हेंबर २००२. आज राजस्थानात नीम का थाना येथे शहीद जगदीशप्रसाद यादव यांच्याकडे जायचं होतं. यापूर्वी या गावाचं नाव मी एका सूर्यग्रहणाच्या वेळीच ऐकलं होतं. या गावावरून ते स्पष्ट दिसणार असल्यानं तिथं तेव्हा बऱ्याच खगोल अभ्यासकांची गर्दी झाली होती, वगैरे मला थोडं आठवत होतं. मात्र, या गावाला जायचा योग कधी येईल असं वाटलं नव्हतं. तो या निमित्ताने आला होता. मग 'अंतर्राज्यीय बस अड्डेपर’ गेलो. तिथं ‘नीम का थाना’कडं जाणाऱ्या गाड्यांची राजस्थानच्या काउंटरवर चौकशी केली, तर तिथल्या माणसानं सराई काले खाँ बसस्थानकावरून या गाड्या सुटतात, असं सांगितलं. अकरा वाजून गेले होते. मी कपाळावर हात मारून घेतला. मग निमूटपणे दुसरी रिक्षा करून त्या स्टँडवर गेलो. तिथं पोचेपर्यंत १२ वाजले. तिथं सीकरची बस एक वाजता सुटत असल्याची माहिती मिळाली. मात्र, एक वाजता बरोबर गाडी निघाली. ‘नीम का थाना’ला जायला ९० रुपये तिकीट होतं. चार तास लागतील, असं कंडक्टर म्हणाला. प्रत्यक्षात दिल्लीतून ‘गुडगाँवा’च्या दिशेनं बाहेर पडेपर्यंतच दोन वाजून गेले होते. ‘नीम का थाना’ला पोचेपर्यंत साडेसहा वाजले होते. मग रिक्षा करून जे. पी. यादव यांच्या घरी गेलो. माझ्या अपेक्षेपेक्षा पुष्कळ मोठ्ठं घर होतं त्यांचं. म्हणजे भरपूर नातेवाइक एकत्र राहत होते. ‘जे. पीं.’चे आई-वडीलही होते. सुरुवातीला वडील कन्हैयालाल हेच माझ्याशी बोलले. ‘जे. पीं.’चा मेव्हणा राजेश यादव (मिसेस प्रेम यांचा भाऊ) हाही तिथंच राहतो. त्यानंही पुष्कळ माहिती दिली. ‘जे. पीं.’ची मुलं अगदी छोटी. थोरला गौरव (पाच वर्षांचा) फारच गोंडस होता. धाकटी गरिमा तर अवघी पावणेदोन वर्षांची आहे. मला गलबलून आलं. ‘जे. पीं.’च्या पत्नीशीही नंतर बोललो. काय बोलणार खरं तर? अवघ्या तिशीच्या या मुलीवर काय प्रसंग आलाय! त्या आता शिक्षिका म्हणून काम करतात. तिथून परत दिल्लीला यायला नऊला बस होती. मला तर ते राहाच, म्हणत होते. पण मी नको म्हटलं. मग गरमागरम (संपूर्ण ‘घी’त माखलेल्या) रोट्या व दाल आणि लोणचं, मिरची असं छान जेवण त्यांनी दिलं. यादव कुटुंबीयांच्या या राजस्थानी आदरातिथ्यानं मी तर भारावून गेलो. मला काय बोलावं, तेच सुचेना. जगदीशप्रसाद यांचे वडील आता थकले होते. त्यांच्या चेहऱ्यावर मुलगा गमावल्याचं अपार दु:ख स्पष्ट दिसत होतं. या कुटुंबाचं आदरातिथ्य आठवतच दिल्लीला जायला निघालो, तेव्हा डोळे नकळत पाणावले होते.
या हल्ल्यात एक महिला कॉन्स्टेबल कमलेशकुमारी याही शहीद झाल्या होत्या. त्यांच्या पतीला भेटायचं होतं. मात्र खूप प्रयत्न करूनही त्यांचा पत्ता मिळाला नाही आणि फोनवर बोलणंही झालं नाही. ते उत्तर प्रदेशात कुठे तरी कनौज किंवा आणखी कुठं तरी असल्याची माहिती उडत उडत मिळाली होती. हा एक अपवाद वगळता, मी सर्व हुतात्म्यांच्या घरी जाऊन आलो होतो. त्यामुळे आता पुण्याला परत निघण्याची तयारी सुरू केली. दोन डिसेंबरला दिल्लीतून पुन्हा गोवा एक्स्प्रेसनं पुण्याला परतलो.
आल्यानंतर दीक्षितसाहेबांना भेटलो. लिहिलेले लेख दाखविले. ‘सप्तरंग’ पुरवणीत ‘जरा याद करो कुर्बानी’ या नावाने दोन आठवडे माझे लेख प्रसिद्ध झाले. या लेखांना वाचकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.
ही असाइनमेंट केली तेव्हा मी २७ वर्षांचा होतो. पत्रकारितेत येऊन पाच-सहाच वर्षं झाली होती. त्या तुलनेत मला ही मोठी संधी संपादकांनी दिली होती. या निमित्ताने मला खूप काही शिकायला मिळालं. आपल्या शारीरिक, मानसिक, वैचारिक क्षमता तपासता आल्या. डोळे उघडे ठेवून, कुठलेही पूर्वग्रह न बाळगता अनुभव घ्यायला शिकता आलं. दिल्ली आणि आजूबाजूच्या हरियाणा, राजस्थान व उत्तर प्रदेशात एकाच वेळी जाता आलं, तिथली लहान लहान गावं, रस्ते, धूळ-माती, शेती-जमीन, जेवण-खाण यांचा अनुभव घेता आला. माणसांचं वागणं-बोलणं, लहेजा, पेहराव-ठेहराव समजले. ही शिदोरी दीर्घकाळ पुरणारी असते. दहशतवादी हल्ल्यात घरातलं माणूस जातं, तेव्हा त्या कुटुंबावर कोसळलेलं आभाळ थेट त्यांच्या डोळ्यांत बघायला मिळालं. या दौऱ्यानंतर माणूस म्हणून मी थोडा अधिक संवेदनशील झालो... त्यामुळं या अविस्मरणीय असाइनमेंटबद्दल मनात कायमची कृतज्ञता आहे!



---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्य शिवार दिवाळी अंक २०२१)

----