2 May 2013

आणि... निळू फुले



निळू फुले हे नाव माझ्या आयुष्यात फार लहानपणीच आलं. तेव्हा आमच्या गावात दूरदर्शन दिसत नव्हतं. तरी साठ साठ फुटी अँटिने लावून लोक हौसेनं टीव्ही आणायचे. त्या ब्लॅक अँड व्हाइट टीव्हीच्या जमान्यात, पडद्यावर चित्र कमी आणि मुंग्याच जास्त दिसायच्या. त्या मुंग्या-मुंग्यांमधून माणसं सिनेमा शोधत राहायची. दर शनिवारी संध्याकाळी दूरदर्शनवर मराठी सिनेमा लागे. तेव्हा नाव मोठं लक्षण खोटं, सुशीला, भालू, पिंजरा, सामना, सिंहासन, झुंज हे सिनेमे लागत. त्या मुंग्या-मुंग्यांच्या चित्रातून ठसठशीतपणे समोर यायचे ते निळूभाऊ. अक्कडबाज मिशा, कडक स्टार्चची गांधी टोपी, दुटांगी धोतर, करकर वाजणाऱ्या कोल्हापुरी वहाणा आणि या सर्वांवर कडी करणारी ती बेरकी नजर... निळू फुले अक्षरशः आमच्या मनावर राज्य करायचे. आजूबाजूच्या बाया-बापड्या निळूभाऊंना पडद्यावर बघितलं, तरी कडाकडा बोटं मोडायच्या. वाट्टोळं होईल मेल्याचं... म्हणायच्या. निळूभाऊंमधल्या अस्सल कलावंताला मिळणारी ती सर्वांत मोठी दाद होती हे कळायला काही वर्षं जावी लागली. तेव्हाच्या पठडीबाज मराठी सिनेमांना खलनायकही पठडीबाजच लागायचा. गावातला पाटील, सरपंच किंवा साखरसम्राट अशाच भूमिका सादर कराव्या लागायच्या. अशोक सराफ किंवा रवींद्र महाजनी हिरो, रंजना किंवा उषा नाईक नायिका आणि खलनायक निळूभाऊ. असे किती तरी सिनेमे आले... त्या सर्वांत लक्षात राहायचा तो निळूभाऊंचा बेरकी, कावेबाज, ग्राम्य असा खलनायक. पठडीबाज भूमिका करतानाही वेगळेपण दाखवणं हे खरोखर अवघड काम. पण निळूभाऊंनी ते साधलं. याचं कारण ते याच मातीतले होते. इथल्या ग्रामीण भागातील सुख-दुःखं त्यांना जवळून माहिती होती. पडद्यावर खलनायक साकारणारा, पण प्रत्यक्ष आयुष्यात अतिशय साधा, सच्छिल असणारा हा माणूसच आगळा. त्यांचं हे रूप मी प्रथम पाहिलं ते नगरला. तेव्हा आमच्या कॉलनीत एका डॉक्टरांकडं निळूभाऊ उतरल्याची बातमी आम्हाला कुठून तरी लागली. मग आम्ही काही मुलं त्या बंगल्यासमोर जाऊन सकाळपासून निळूभाऊ कुठं दिसतात का, ते न्याहाळू लागलो. तेव्हा महाभारत मालिका सुरू होती. ती बुडवून आम्ही निळू फुले बघायला आलो होतो, म्हणजे आमच्या दृष्टीनं मोठाच त्याग केला होता आम्ही. थोड्याच वेळात निळूभाऊ बाहेर आले. साधा झब्बा, लेंगा, सोनेरी काड्याचा चष्मा, ती अक्कडबाज मिशी नाही आणि चेहऱ्यावर चक्क मंदसं हसू. आम्हा मुलांची त्यांनी हळूवार आवाजात चौकशी केली. त्यांचा तो अवतार पाहून सगळेच चाट झाले होते. आम्ही त्यांना सह्या मागितल्या. दुपारी या, असं सांगून निळूभाऊ गेले. तेवढ्यात एका पोरानं ओरडून 'होळी रे होळी'मध्ये पुढं काय होणार आहे हो... असं विचारून घेतलं. (तेव्हा निळूभाऊ दूरदर्शनवर 'होळी रे होळी' नावाच्या एका मालिकेत काम करीत होते.) निळूभाऊंनी उत्तर दिलं नाही. ते शांतपणे निघून गेले. पडद्यावरचा खलनायक हा प्रत्यक्षात तसा नसतो, याची अनुभूती मिळण्याचा तो क्षण होता.
पुढं मोठेपणी त्यांचे अनेक चांगले सिनेमे पाहण्याचा योग आला. हा माणूस फक्त खलनायक नाही, तर कोणतीही भूमिका रंगवू शकतो, हे लक्षात आलं. केवळ कलाकार म्हणून नाही, तर माणूस म्हणून ते किती मोठे आहेत, हे कळलं. त्यांचं सामाजिक काम, सेवा दलाचा कार्यकर्ता ही आणखी रूपं समजली. प्रत्येक वेळी या माणसाविषयीचा आदर वाढतच गेला.
निळूभाऊंचा जन्म पुण्यातला. महात्मा जोतिबा फुलेंच्या घराण्याचा वारसा सांगणारे कृष्णाजी व सोनाई या दांपत्याच्या पोटी निळूभाऊंचा जन्म झाला. (त्यांचा जन्म १९३० किंवा १९३१ चा. त्याविषयी वाद आहेत.) अगदी तरुणपणी वानवडीच्या लष्करी महाविद्यालयात त्यांना माळीकाम मिळालं. हे पिढीजात काम करताना त्यांना मनापासून आनंद मिळत होता. याच क्षेत्रात करिअर करायचा त्यांचा विचार होता. मात्र, आर्थिक अडचणीमुळं त्यांना नर्सरी उघडता आली नाही. तेव्हा मिळणाऱ्या ८० रुपये पगारातले दहा रुपये निळूभाऊ राष्ट्रसेवा दलाला देत होते. १९५७ च्या सुमारास संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी निळूभाऊंनी सेवादलासाठी 'येऱ्यागबाळ्याचे काम नोहे' हे नाटक लिहिलं. या नाटकामुळं निळूभाऊंचं नाव झालं. मग त्यांनी माळीकाम सोडून पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. राम नगरकरांसोबत त्यांनी 'कथा अकलेच्या कांद्याची' हे वगनाट्य गाजवलं. महाराष्ट्रभरात या जोडगोळीचं नाव झालं. अनंत मानेंच्या 'एक गाव बारा भानगडी' या तमाशापटात निळूभाऊंना सिनेमातील पहिला ब्रेक मिळाला. या सिनेमात त्यांनी साकारलेल्या महाबेरकी झेलेअण्णांच्या भूमिकेनं त्यांना मराठी चित्रसृष्टीची कवाडं खुली झाली.
पुढं १९७२ मध्ये निळूभाऊंना विजय तेंडुलकरांचं 'सखाराम बाइंडर' नाटक मिळालं आणि या नाटकानं इतिहास घडवला. निळूभाऊंच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड असं या नाटकाचं वर्णन करावं लागेल. वास्तविक तेंडुलकर निळूभाऊंना सखाराम पेलवेल का, याविषयी साशंक होते. मात्र, कमलाकर सारंग निळू फुलेंच्याच नावावर ठाम होते. त्यांनी तेंडुलकरांना 'कथा'चा प्रयोग दाखवला. त्यानंतर निळूभाऊंना हे काम मिळालं. बाइंडर आणि त्याचा पुढचा सगळा इतिहास सर्वज्ञात आहे. या नाटकानं निळूभाऊंना आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव मिळवून दिलं. त्यांना स्वतःलाही बाइंडर आणि दळवींच्या 'सूर्यास्त'मधले अप्पाजी या भूमिका विशेष आवडायच्या. अप्पाजी ही भूमिका तात्त्विकदृष्ट्या त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातील मूल्यांशी साधर्म्य सांगणारी होती, म्हणूनही असेल. 'बाइंडर'नंतर तेंडुलकरांच्याच सामनामध्ये निळूभाऊंना हिंदूराव धोंडे पाटील साकारण्याची संधी मिळाली. शांतारामबापूंच्या 'पिंजरा'मुळं डॉ. श्रीराम लागूंचं मोठं नाव झालं होतं. 'सामना'त निळूभाऊंचा सामना त्यांच्याशीच होता. प्रेक्षकांना मात्र या दोन नटश्रेष्ठांची जुगलबंदी पाहण्याचा अपूर्व योग लाभला. वास्तविक 'पिंजरा'त निळूभाऊ होतेच. त्यांची भूमिका छोटी होती. मात्र, मास्तरांकडं पाहून केवळ कुत्सितपणे हसणं एवढीच कामगिरी त्यांनी अशी जबरदस्त साकारली होती, की हे केवळ निळूभाऊच करू जाणे. मास्तर म्हणजे डॉ. लागू संतापून एकदा निळूभाऊंच्या जोरात मुस्कटात भडकावतात, हा प्रसंग म्हणजे त्या चित्रपटातील एक हायपॉइंट ठरला होता. निळूभाऊंच्या अभिनयसामर्थ्याची प्रचिती डॉ. लागूंना तेव्हाच आली होती. त्यामुळं सामना करताना दोघांनाही मजा आली. हिंदूरावची भूमिका निळूभाऊ अक्षरशः जगले. तेव्हा महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातून ग्रामीण भागात होत असलेले बदल आणि या साखरसम्राटांकडून सुरू झालेला सत्तेचा गैरवापर हा मुद्दा प्रभावी होता. तेंडुलकरांनी हिंदूरावची भूमिका जबरदस्त लिहिली होती. या भूमिकेला निळूभाऊंनी पुन्हा एकदा समर्थपणे न्याय दिला.
सामना चित्रपटानंतर निळूभाऊंकडं अशाच पद्धतीच्या भूमिकांची रांग लागली. सगळेच चित्रपट काही एवढे दर्जेदार नसायचे. निळूभाऊंचाही पोटापाण्याचा व्यवसाय असल्यानं येतील त्या भूमिका कराव्या लागायच्या. बहुतेक वेळा टिपिकल खलनायक रंगवावा लागे. त्यात मग नायिकेच्या पदराला हात घालण्याचा प्रसंग अनेक वेळा यायचा. एरवी अत्यंत सच्छिल असलेल्या निळूभाऊंना वारंवार नायिकेवर बलात्कार करण्याचा सीन शूट करावा लागायचा. मराठी सिनेमांतल्या नायिकाही त्याच त्या असायच्या. कोल्हापुरातल्या मुक्कामात शेवटी ते वैतागून दिग्दर्शकाला म्हणाले, "अरे, गेल्या तीन सिनेमांत मी तेच करतोय आणि बाईही तीच. निदान या खेपेला बाई तरी बदला..." मध्येच कधी तरी 'भुजंग'सारखा वेगळा सिनेमा करायला मिळायचा. भस्म्या रोग झालेला त्यातला खादाड भुजंग साकारताना निळूभाऊंना मजा आली असणार. त्यांच्या या नेहमीच्या पठडीतून बाहेर काढून, त्यांना एकदम प्रोटॅगनिस्टची भूमिका देण्यासाठी पुन्हा जब्बार पटेल धावून आले. अरुण साधूंच्या मुंबई दिनांक आणि सिंहासन या दोन कादंबऱ्यांवर 'सिंहासन' हा मराठी चित्रपट जब्बार पटेल काढत होते. डॉ. श्रीराम लागू, अरुण सरनाईक, दत्ता भट, सतीश दुभाषी, मधुकर तोरडमल, मोहन आगाशे, श्रीकांत मोघे असे सगळे दादा कलाकार होते. यात दिगू टिपणीस या पत्रकाराची भूमिका निळूभाऊंच्या वाट्याला आली. सत्ताकेंद्राच्या अत्यंत जवळ राहून, सिंहासनाचा सर्व खेळ तटस्थपणे पाहणाऱ्या दिगूची भूमिका निळूभाऊंनी समरसून केली. या चित्रपटाचा शेवट मंत्रालयाच्या बाहेर खदाखदा हसत सुटलेल्या दिगूवर होतो. निळूभाऊंनी त्या हसण्यात त्या व्यवस्थेविषयीची सर्व प्रतिक्रिया एवढी टोकदारपणे व्यक्त केली होती, की तो चेहरा आजही डोळ्यांसमोरून हलत नाही. सिनेमा संपल्यावर स्टँडिंग ओव्हेशन द्यावंसं वाटतं त्यांना या वेळी. (खूप नंतर त्यांनी अशोक सराफसोबत 'सगळीकडे बोंबाबोंब' या सिनेमात पुन्हा संपादकाची काहीशी कॉमेडी अशी भूमिका केली होती. पण दिगू म्हणजे दिगूच. त्याची सर अन्य कुठल्या पात्राला कशी येणार?) जब्बार पटेलांच्या बहुतेक सिनेमांत ते असायचेच. मग तो जैत रे जैत असो, की एक होता विदूषक असो. निळूभाऊंमुळं या सिनेमांची रंगत काही वेगळीच झाली आहे. त्यानंतर 'माझा पती करोडपती' या सचिनच्या चित्रपटात निळूभाऊ चरित्र भूमिकेत दिसले. त्याच सुमारास मराठीत तथाकथित विनोदी सिनेमांची लाट आली. या लाटेत निळूभाऊंसारख्या टिपिकल खलनायकाला स्थान नव्हतं. तरीही त्यांची त्याविषयी काही तक्रार नव्हती. येईल ती भूमिका खणखणीतपणे साकार करायचं ब्रीद त्यांनी शेवटच्या सिनेमापर्यंत सोडलं नाही.
त्यापूर्वी निळूभाऊंनी थोडे-फार हिंदी सिनेमेही केले. 'कुली'मध्ये ते अमिताभसमोर तेवढ्याच ताकदीनं उभे राहिले. महेश भटच्या 'सारांश'मध्येही त्यांना खलनायक साकारायला मिळाला. पण निळूभाऊ हिंदीत फार रमले नाहीत. त्यांना आपल्या गावरान मराठी सिनेमांचा ठसकाच अधिक भावत असावा.
निळूभाऊंच्या व्यक्तित्वाचा आणखी एक विशेष म्हणजे ते निव्वळ अभिनेते नव्हते. त्याहीपलीकडं जाणारी, खऱ्या आयुष्यातली माणूस नावाची एक वास्तववादी भूमिका ते अगदी समरसून जगत होते. महात्मा फुल्यांचा वारसा सांगणारे एक सामाजिक अंग निळूभाऊंना होते. सर्वसामान्य, गोरगरीब जनतेविषयी त्यांना कळवळा होता. शबनम, झब्बा अशा साध्या वेषात एरवी ते तसेही कार्यकर्ताच वाटत. राष्ट्रसेवा दल, डॉ राममनोहर लोहिया यांच्या विचारांची बांधिलकी त्यांनी आयुष्यभर जपली. सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा विविध उपक्रमांना, संघटनांना त्यांचा सक्रिय पाठिंबा असे. त्यामुळंच राज्यभरातल्या कार्यकर्ते मंडळींना निळूभाऊंचा मोठा आधार वाटे. अशा या निळूभाऊंना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात कॅन्सरनं गाठलं. छुपेपणानं वार करणाऱ्या त्या रोगापुढं या कलंदर माणसाचं काही चाललं नाही. शेवटी १३ जुलै २००९ रोजी निळूभाऊ आपल्यातून निघून गेले. अर्थात फक्त शरीरानंच. त्यांच्या अनेक अजरामर भूमिकांमधून ते आपल्यात कायमच राहतील. किंबहुना जोवर मराठी सिनेमा आहे, मराठी नाटक आहे, मराठी भाषा आहे तोवर निळू फुले हे नावही अक्षय राहील. चित्रपटाच्या शेवटी मानानं येणाऱ्या त्यांच्या 'आणि निळू फुले' या ऐटबाज नामावलीसारखं....

---

(पूर्वप्रसिद्धी - साहित्य शिवार दिवाळी २०११)

---
---

7 comments:

  1. Chhanach! 'Saamna' mala aathwatoy me pahilyanda pahila hota karan tyat 'jamkhedcha' bus stop aani thodasa shooting madhe aapla 'jamkhed' dista mhanun. Nanatar Saamna punha pahila, to Nilubhaunsathich!! Tamashapatanchya gardit 'saamna' naaw gheunahi fadawar rangnaara saamna na dkhawta ha weglach saamna publicla pahayla milala, yacha jitka shreyya jabbar patel aani tendulkaranna jata, titkach shreyya aapya nilubhaunna aani Dr. Lagu yanna jata.. kimbahuna me tar mhanel hindurao dusra kunihi itkya taktina ubha karuch shakala nasta jasa aaplya NIlubhaunni kela!! Atyant guni aani bahuguni ashya ya kalakarala aamchahi manacha muzara.

    ReplyDelete
  2. Very Nice!! As Amol said when i first saw movie Saamna only because there was few shots of "Jamkhed" and now though the full movie is a great art work, i will still watch to get glimpses of my childhood memories where i spent all my holiday with my ever loving grandparents and all my cousins so for me equation is still the same Saamna = Jamkhed.
    Thank you for taking down memory lane!

    ReplyDelete
  3. अप्रतिम लेख, वाड्यावर या!! असा सूर कानावर पडला नाही तर नवलच 😊

    ReplyDelete