27 Dec 2015

आपले छंद दिवाळी अंक विशेष लेख

समकालीन मराठी चित्रपटांचा प्रवास...
आशेकडून... आशेकडेच!
-----------------------------




मराठी चित्रपटांचा गौरवशाली इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. या लेखात मात्र मी केवळ समकालीन मराठी चित्रपटांविषयी काही टिप्पणी करणार आहे. यात प्रामुख्याने एकविसावं शतक उजाडल्यानंतरचे, अर्थात गेल्या १५ वर्षांतील चित्रपट अपेक्षित आहेत. मात्र, २००४ मध्ये आलेला ‘श्वास’ हा चित्रपट समकालीन मराठी चित्रपटांच्या इतिहासातला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यामुळं या लेखात श्वास ते याच वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित झालेला कोर्ट अशी दोन्ही बाजूंची टोकं निश्चित केली आहेत. श्वासला राष्ट्रपतींचं सुवर्णकमळ मिळालं. श्यामची आई या चित्रपटानंतर मराठी चित्रपटाला तब्बल ५१ वर्षांनी हा देशातला सर्वोच्च बहुमान लाभला. शिवाय यंदाही ‘कोर्ट’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार, अर्थातच सुवर्णकमळ मिळालं. मध्यंतरी उमेश कुलकर्णीच्या ‘देऊळ’ या चित्रपटानंही या सन्मान मिळवला. थोडक्यात १९५३ मध्ये सुवर्णकमळ, त्यानंतर ५१ वर्षं काहीही नाही; नंतर पुन्हा ११ वर्षांत तीन सुवर्णकमळं... असा हा आलेख आहे. याचाच अर्थ गेल्या ११ वर्षांचा काळ हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक मोठी आशा घेऊन आलेला काळ आहे. मराठी चित्रपटांची गुणवत्ता वाढली आहे आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर हा चित्रपट दखलपात्र ठरतो आहे, हे निश्चितच. कोर्ट हा चित्रपट हे याचं अलीकडचं उदाहरण म्हणता येईल. या झालं या ११ वर्षांत? मराठी चित्रपटांचा प्रवास नक्की कुठल्या दिशेनं सुरू आहे? त्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत? काय प्रयोग होत आहेत? मुळात मराठी चित्रपटांची गुणवत्ता, दर्जा, आशयसंपन्नता खरोखर वाढली आहे का? चित्रपट ज्यांच्यासाठी तयार केला जातो, त्या सर्व प्रेक्षकांपर्यंत तो पोचतो आहे का?

मराठी सिनेमांच्या निर्मितीच्या बाबतीत गेल्या ११ वर्षांत मोठीच क्रांती झाली असं म्हणता येईल. १९९७-९८ या काळात वर्षाला अवघ्या दहा-बाराच्या घरात निर्माण होणारे मराठी चित्रपट आता शंभर-सव्वाशेचा आकडा पार करू लागले आहेत. हिंदी, तमीळ आणि तेलगूपाठोपाठ आता देशात मराठीतच सर्वाधिक संख्येनं चित्रपट तयार होतात, असा याचा अर्थ आहे. प्रत्यक्षात घोषणा आणि मुहूर्त होणाऱ्या चित्रपटांची संख्या याहून अर्थातच अधिक आहे. शंभर-सव्वाशे चित्रपट प्रत्यक्षात तयार होतात. यापैकी ७० ते ८० चित्रपट किमान कुठे ना कुठे प्रदर्शित होतात. यापैकी ४० ते ५० चित्रपट जेमतेम पडदा बघतात आणि आठवड्याच्या आतच किंवा त्याहूनही कमी काळात गाशा गुंडाळतात. उर्वरित २० ते ३० सिनेमे बऱ्यापैकी सिनेमागृहांत प्रदर्शित होतात आणि जाहिरात, मार्केटिंगमुळं त्यांची नावं तरी किमान बहुसंख्य प्रेक्षकांच्या कानावर जातात. हे चित्रपट किमान आपलं निर्मितीमूल्यं वसूल करतात. निर्मात्याचं अगदीच दिवाळं वाजत नाही. या २० ते ३० सिनेमांपैकी केवळ पाच ते दहा सिनेमे खऱ्या अर्थानं बरे चालतात. एकाहून अधिक आठवडे चालतात. मल्टिप्लेक्समध्ये किमान पहिल्या आठवड्यात तरी त्यांचे रोज एकाहून अधिक शो होतात. हे चित्रपट अगदी खूप नाही, तरी बऱ्यापैकी नफा कमावतात. या पाच ते दहा चित्रपटांपैकीही एखादाच सुपरहिट होतो आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या गावांत जाऊन प्रदर्शित होतो. त्याची चर्चा केवळ माध्यमांत होत नाही, तर राज्यात पसरलेल्या खेड्या-पाड्यांतील ग्रामीण लोकांतही होते. हा चित्रपट सर्वांना माहिती असतो आणि त्याचे संवाद किंवा गाणी किंवा एखादं दृश्य नक्कीच गाजलेलं असतं आणि सोशल नेटवर्किंग साइटमधूनही ते लोकप्रिय होतं. आता हे गुणोत्तर साधारणतः शंभरास एक असं पडतं. तेव्हा ही आकडेवारी बघितली, तर मराठी चित्रपटाला चांगले दिवस आले आहेत, असं म्हणायला जीभ कचरते.

तरीही मराठी चित्रपटसृष्टीत चित्रपट तयार होण्याचं प्रमाण कमी न होता, वाढतंच आहे. हा आतबट्ट्याचा व्यवहार का करत असतील निर्माते मंडळी? चित्रपट कोणी का तयार करतं, याचा शोध घेतला असता, मजेदार माहिती समोर येते. मराठी चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकार मराठी चित्रपटांना अनुदान देतं. या अनुदानाचे काही निकष ठरलेले आहेत. पहिल्याच चित्रपटाला अनुदान मिळत नाही. त्या निर्मात्यानं दुसरा चित्रपट तयार केला, तरच हे अनुदान मिळतं. थोडक्यात, दुसऱ्या चित्रपटाचं अनुदान मिळण्यासाठी पहिला चित्रपट स्वतःचे पैसे घालून निर्माता तयार करतो. स्वाभाविकच कमी बजेटमध्ये हा सिनेमा तयार होतो. यातून अत्यंत टुकार, दर्जाहीन चित्रपटांची लाटच आली. तेव्हा सरकारनं नियम बदलून सिनेमांच्या दर्जानुसार हे पैसे द्यायचा निर्णय घेतला. दर्जा ठरवण्यासाठी सरकारनं तज्ज्ञांची समिती नेमलेली असते. आता नियम असले, तरी त्याला पळवाटा असतातच. नियम वाकवणारे निर्माते मराठीत भरपूर आहेत. अनुदानासाठी त्यांचे काय काय प्रकार सुरू असतात, याचे सुरस आणि चमत्कारिक किस्से सिनेवर्तुळात सर्वत्र ऐकायला मिळतात. चित्रपट चर्चेत आणण्यासाठी अनेकविध शक्कली लढवल्या जातात. या कामासाठी निर्माते आणि त्यांचे दत्तू जेवढं डोकं लावतात, तेवढं त्यांनी चित्रनिर्मितीत लावलं, तर खरोखरच काही दर्जेदार चित्रपट तयार झालेही असते. या शक्कलींमध्ये चित्रपटाविषयी वाद निर्माण करणं, कोर्ट केस झाली तर पाहणं, सोशल नेटर्किंग साइटचा भला-बुरा वापर करून चित्रपट चर्चेत ठेवणं, काही दुय्यम-तिय्यम स्वरूपाचे पुरस्कार मॅनेज करणं, कलावंतांपैकी काहींच्या बाबतीत (ती अभिनेत्री असेल, तर उत्तमच!) काही वादग्रस्त घटना मुद्दाम घडवून आणणं आदी बरेच प्रकार केले जातात आणि ते सर्वांच्या परिचयाचे आहेत. महाराष्ट्रात १९९८-९९ ला खासगी मराठी वाहिन्या सुरू झाल्या. काही मोठ्या समूहांनी खासगी मराठी चॅनेल चांगल्या प्रकारे यशस्वी करून दाखवले. या वाहिन्यांनी मग मराठी चित्रपटांचीही वाहिनी सुरू केली. या वाहिन्या नवे चित्रपट घेण्यासाठी चांगले पैसे देऊ लागल्या. बुडीत जायला निघालेल्या मराठी निर्मात्यांना मग तरण्यासाठी या काडीचा उपयोग होऊ लागला. नंतर तर या वाहिन्यांचे संचालक आणि डीव्हीडीचे व्यावसायिकही चित्रपट निर्मितीत उतरले. या वाहिन्यांकडून मग खासगी चित्रपट पुरस्कार दिले जाऊ लागले. काही वृत्तपत्रे, काही खासगी प्रतिष्ठित संस्थाही या पुरस्कारांच्या खेळात उतरल्या. मराठी चित्रपटांचा गौरव करण्यासाठी सर्वांचीच अहमहमिका सुरू झाली. यातून चित्रपटसृष्टीतील चमक-धमक वाढली. मराठी कलाकार केवळ कलाकार न राहता, सुपरस्टार वगैरे झाले. काही जणांनी व्हॅनिटी व्हॅन घेतली, तर त्याच्याही चर्चा झाल्या. मराठी नायिकांचंही मानधन बऱ्यापैकी वाढलं. मराठी चित्रपटांचे पुरस्कार सोहळे वाहिन्यांवरून दिसू लागले, ते पाहताना असं वाटू लागलं, की व्वा... आपल्या चित्रपटसृष्टीनं चांगलंच बाळसं धरलंय. पण हे एखाद्या महालाच्या सेटवरून तो खरंच महाल असल्याची कल्पना करून घेण्यापैकी आहे. सेटवर जरा मागं जाऊन पाहिलं, की महालाला आधार दिलेले बांबू आणि बाकी सर्व अंधार दिसतो. मराठी चित्रपटसृष्टीच्या बाबतीतही हेच लागू आहे. काही चांगल्या चित्रपटांची मूठभर चमक-धमक सोडली, तर अन्यत्र सर्वच बांबू अन् अंधारच!

एकेका मुद्द्याचा परामर्श घेतल्यास चित्र स्पष्ट होईल. मराठी चित्रपट किती लोकांपर्यंत पोचतो हा मुद्दा घेतल्यास असं लक्षात येतं, की बहुसंख्य चित्रपट महाराष्ट्रातल्या ११ कोटी जनतेपर्यंत पोचण्यास केवळ असमर्थ ठरतात. अर्थात यात चित्रपटांचा सर्वस्वी दोष आहे, असं म्हणता येणार नाही. महाराष्ट्र हे देशातलं एकमेव असं राज्य आहे, की जिथं सर्वाधिक प्रमाणात चित्रनिर्मिती होते; पण ती राज्याच्या भाषेत असतेच असं नाही. किंबहुना नसतेच. हिंदी चित्रपटसृष्टीचं मुख्यालय दिल्ली किंवा लखनौ किंवा पाटणा नसून, चक्क मुंबई आहे आणि हेच वास्तव अनेकदा मराठी चित्रपटांच्या मुळावर आलेलं आहे. मुंबईतल्या सर्वभाषक चित्रपटसृष्टीचा आपल्याला अभिमान आहेच, असायला हवा. पण या हिंदी चित्रपटसृष्टीचं मुंबईत - मराठमोळ्या महाराष्ट्राच्या कष्टानं मिळवलेल्या राजधानीत - असलेलं हे भव्य अस्तित्व खुद्द मराठी चित्रपटसृष्टीला पूरकच ठरणारं आहे, असं कुणीही म्हणणार नाही. प्रादेशिक भाषांतली चित्रपटनिर्मिती सर्वाधिक होते, अशा तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार (भोजपुरी) या राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात हा प्रमुख फरक आहे. तमिळनाडूत तमिळी चित्रपटांना हिंदीशी किंवा अन्य कुठल्याही भाषक चित्रपटांशी स्पर्धा करावी लागत नाही. हैदराबाद किंवा हल्ली बेंगळुरूमध्ये हिंदीचं प्राबल्य वाढीस लागलं आहे, ही बाब खरी आहे. मात्र, तरीही मराठीच्या तुलनेत या दोन्ही राज्यांत अनुक्रमे तेलगू आणि कन्नड चित्रपटांना अधिक प्रेक्षक आहे, हेही तेवढंच खरं आहे. अशा स्थितीत मराठी चित्रपटांना महाराष्ट्रात हिंदी चित्रपटांशी जी अन्याय्य स्पर्धा करावी लागते, ती मराठी चित्रपटांबाबत सहानुभूती निर्माण करणारी आहे. अर्थात सहानुभूतीची ही भावना या एकाच मुद्द्यापर्यंत येते आणि संपते. कारण हिंदीच्या तोडीचं मार्केटिंग केलं, तर (आणि त्या चित्रपटात हिंदी चित्रपटांना शोभेल असा मालमसाला असेल तर) मराठी चित्रपटही जोरदार चालू शकतात, हे अलीकडच्या काळात झी टॉकीज किंवा अन्य काही बड्या बॅनरनी घेतलेल्या चित्रपटांवरून दिसून येतं. 
याबाबत २००९ मध्ये आलेला ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाचं उदाहरण आदर्श ठरावं. मराठी चित्रपटांच्या इतिहासात प्रथमच एकाच रनमध्ये २५ कोटीहून अधिक उत्पन्न कमावणारा हा चित्रपट ठरला. महेश मांजरेकर यांनी हा चित्रपट काढला होता. चित्रपटाचा विषय मराठी माणसांना अपील होणारा होता. शिवाजीराजे एका मराठी माणसाच्या स्वप्नात येतात आणि त्याला पुन्हा एकदा त्याच्या हक्कांविषयी जागं करतात, असा हा फँटसीचा आधार घेणारा सिनेमा होता. पण उत्कृष्ट पटकथा, चांगली गाणी, सचिन खेडेकरांचा उत्तम अभिनय आणि महत्त्वाचं म्हणजे अत्यंत आक्रमक मार्केटिंग या जोरावर या चित्रपटानं मराठी चित्रपटांच्या इतिहासात महत्त्वाचं पान लिहिलं. ‘शिवाजीराजे...’च्या यशानंतर झी टॉकीजसह काही बड्या बॅनरनी किंवा कंपन्यांनी नटरंग, टाइमपास, बालक-पालक, शाळा, दुनियादारी, बालगंधर्व, काकस्पर्श, प्यारवाली लव्हस्टोरी, लय भारी, लोकमान्य, टाइमपास-२ अशा अनेक चित्रपटांच्या बाबतीत उत्तम मार्केटिंग करून भरपूर उत्पन्न मिळवलं. तेव्हा हिंदीच्या तुलनेचा प्रश्न हा सोयिस्कररीत्या वापरला जातोय की काय, असं वाटू लागलं.

अशा मोठ्या बॅनरचे चित्रपट वगळता, अन्य चित्रपटांचं काय, हा प्रश्न उरतोच. २००४ नंतर केदार शिंदे, चंद्रकांत कुलकर्णी, गजेंद्र अहिरे, रवी जाधव, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर, सतीश राजवाडे, सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर, गिरीश मोहिते, निशिकांत कामत, अमोल पालेकर, परेश मोकाशी, किरण यज्ञोपवित, सुजय डहाके, मंगेश हाडवळे, निखिल महाजन, सतीश मनवर, अक्षय यशवंत दत्त, (कै.) राजीव पाटील आदी नव्या-जुन्या दिग्दर्शकांनी सातत्याने चांगले चित्रपट दिले. याशिवाय एकच चित्रपट दिग्दर्शित करणारे अन्य किती तरी नवे व चांगले दिग्दर्शक (संदीप सावंत ते भाऊराव कऱ्हाडे) या काळात समोर आले. त्यातल्या काहींच्या कामाचा थोडक्यात आढावा घेणं आणि त्यांच्या सिनेमांनी नक्की काय दिलं, याची चर्चा करणं इथं औचित्याचं ठरेल.

केदार शिंदेनं ‘अगं बाई अरेच्चा’ या आगळ्यावेगळ्या फँटसी चित्रपटातून मराठीत एक अत्यंत प्रसन्न आणि दर्जेदार कॉमेडीचा ट्रेंड पुन्हा सुरू केला. या चित्रपटातून अजय-अतुल हे नव्या दमाचे संगीतकार मराठी चित्रपटसृष्टीला मिळाले. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे यातली सर्वच गाणी तुफान गाजली. मराठी चित्रपटांचं संगीत चालत नाही, हे तोपर्यंत सर्वांनी मनोमन मान्यच करून टाकलं होतं. मात्र, अजय-अतुल यांनी या समजाला तडा दिला. शंकर महादेवन यांनी गायलेलं मन उधाण वाऱ्याचे किंवा मल्हारवारी यांसारखी गाणी आजही रसिकांच्या ओठी आहेत. गंमत म्हणजे हा चित्रपट सुरुवातीला फार चालला नव्हता. काही काळानं याची गाणी गाजू लागली आणि मग रसिकांचं लक्ष पुन्हा या चित्रपटाकडं गेलं. १९९९ मध्ये ‘बिनधास्त’ या ‘ऑल गर्ल्स’ चित्रपटातून पदार्पण करणारे चंद्रकांत कुलकर्णी २००५ मध्ये ‘कायद्याचं बोला’ या चित्रपटातून एक कायदेशीर कॉमेडी घेऊन आले. यातून त्यांनी मकरंद अनासपुरेसारख्या मराठवाड्यातून पुढं आलेल्या गुणी अभिनेत्याला नायक बनवलं. हा चित्रपट जोरदार चालला. त्यामुळं मकरंद रातोरात सुपरस्टार झाला. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडगोळीनं एके काळी मराठीत विनोदी चित्रपटांचा पाऊस पाडला होता. त्या तथाकथित विनोदी लाटेनं मराठी चित्रपटाचं वास्तविक दीर्घकालीन नुकसानच केलं होतं. इथं मकरंद आणि नंतर आलेला भरत जाधव या दोघांमध्ये काही निर्मात्यांना कालचे अशोक-लक्ष्या दिसू लागले. मग महेश कोठारेंसारख्या त्या काळात या जोडीच्या मदतीनं धुमाकूळ घालणाऱ्या निर्माता-दिग्दर्शकालाही भरत-मकरंदचा मोह न पडता तरच नवल. मग त्यांनी शुभमंगल सावधान, खबरदार आदी चित्रपटांतून मकरंद आणि भरतला विनोदी ढंगात पेश केलं. पुढं पुढं तर ‘नाना-मामा’सारखे (मकरंदच्या भाषेत सांगायचं, तर खिसा-पाकीट किंवा किचनवाले) चित्रपट या दोघांनीही ढिगानं केले. त्यात पुन्हा चित्रपटसृष्टीचं नुकसान झालंच. कारण अशोकमामा-लक्ष्या यांच्या त्याच त्या पांचट विनोदाला कंटाळलेला प्रेक्षकवर्ग नुकताच कुठं श्वासमुळं मराठी चित्रपटाकडं पुन्हा वळू लागला होता. पण भरत-मकरंदच्या इनोदी चित्रपटांच्या लाटेमुळं हा प्रेक्षक पुन्हा बिथरला आणि मराठी चित्रपट कधीही सुधारणार नाहीत, हे त्यांचं मत आणखी घट्ट झालं. म्हणजे अगंबाई अरेच्चा किंवा कायद्याचं बोला यासारखी निखळ करमणूक करणारे चित्रपट पाहू इच्छिणाऱ्या प्रेक्षकांवर पुन्हा भरत-मकरंदच्या पठडीबाज विनोदी चित्रपटांचाच मारा झाला. यामुळं भरत आणि मकरंद मोठे स्टार झाले, तरी मराठीचा काही प्रेक्षक पुन्हा दुरावला तो दुरावलाच.

या प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहांकडं वळवून आणण्याचं काम केलं निशिकांत कामत आणि उमेश कुलकर्णी या प्रयोगशील, ताज्या दमाच्या नव्या दिग्दर्शकांनी. निशिकांतनं दिग्दर्शित केलेला डोंबिवली फास्ट हा चित्रपट २००५ मध्ये आला. संदीप कुलकर्णीनं त्यात माधव आपटे या डोंबिवलीकर मध्यमवर्गीय माणसाची भूमिका साकारली होती. व्यवस्थेतून वाट्याला आलेल्या अन्यायाविरुद्ध तिडीक जाऊन हाती शस्त्र धरणारा नायक यात निशिकांतनं दाखवला होता. डोंबिवली फास्ट अन्य मराठी चित्रपटांसारखा नव्हता. त्याची चित्रभाषा वेगळी होती. संकलनात, मांडणीत प्रयोग होते, एक ताजेपणा होता. हा चित्रपट प्रेक्षकांनी भरभरून उचलून धरला. असंच उदाहरण उमेश कुलकर्णीचं. त्यानं २००८ मध्ये काढलेला वळू हा चित्रपट पाहा. गावाकडची एक साधीशी गोष्ट; पण उमेशनं ती खास शंकर पाटील किंवा द. मा. मिरासदार ज्या खुमासदार शैलीत त्यांची ग्रामीण कथा रंगवत, तशा ढंगात, चित्रभाषेचा प्रभावी वापर करून पडद्यावर साकार केली. इथं उमेशच्या मदतीला दिग्गज कलाकारांची फौज होती. पण नायकाच्या भूमिकेत असलेल्या अतुल कुलकर्णीनं जणू सूत्रधारासारखा हा चित्रपट स्वतःच्या खांद्यांवर तोलून नेला. वळूनं मराठी चित्रपटाला पुन्हा आपल्या मातीचा अस्सल गंध मिळवून दिला.  
याच उमेशनं मग २०११ मध्ये दिग्दर्शित केलेल्या ‘देऊळ’ या आपल्या धार्मिक रुढी-परंपरांची उपहासगर्भ खिल्ली उडवणाऱ्या चित्रपटानं पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कारात अव्वल बाजी मारून, श्वासनंतर केवळ सात वर्षांत पुन्हा सुवर्णकमळ महाराष्ट्रात आणलं. उमेश व गिरीश या कुलकर्णी जोडीनं नंतर मसाला हा एक मसालापट म्हणावा असाच चित्रपट काढला. पण त्याला माफक यश मिळालं.

सचिन कुंडलकर हा पुणेकर दिग्दर्शक याच काळात काही वेगळे प्रयोग करू पाहत होता. त्यानं २००६ मध्ये तयार केलेला ‘रेस्टॉरंट’ हा पहिलाच चित्रपट अगदी त्याच्या पर्यावरणापासूनच वेगळा होता. त्यानंतर त्यानं ‘निरोप’सारखा (२००७) अतिशय संवेदनशील चित्रपट केला. त्यानंतर त्यानं ‘गंध’सारखा (२००९) एकाच चित्रपटात तीन छोट्या वेगवेगळ्या कथा बसविण्याचा वेगळा प्रयोगही केला. (त्यानंतर तो हिंदीत गेला आणि ‘गंध’च्या पहिल्या कथेवरून त्यानं हिंदीत राणी मुखर्जीला घेऊन ‘अय्या’ हा पूर्ण लांबीचा चित्रपट बनवला. हा चित्रपट अपयशी ठरला असला, तरी हा प्रयत्न नक्कीच धाडसी होता. या धाडसानंतर सचिननं पुन्हा मराठी चित्रपटांकडं मोर्चा वळवला.) ‘हॅपी जर्नी’ हा त्याचा चित्रपट भावा-बहिणीच्या नात्यावर होता. विषय वेगळा असला, तरी पुन्हा एकदा तिकीटबारीवर त्याला अपयशच पाहायला मिळालं. आता तो ‘राजवाडे अँड सन्स’ या नव्या मराठी चित्रपटात गुंतला आहे. वेगळी चित्रभाषा, विषयाची संवेदनशील हाताळणी आदी त्याच्या चित्रपटांची वैशिष्ट्ये सांगता येतील.

याच काळात पुण्यातलेच सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर हे जुने-जाणते दिग्दर्शकद्वयही वेगवेगळे विषय घेऊन कार्यरत होते. दोघी, दहावी फ, वास्तुपुरुष, देवराई हे त्यांचे ‘श्वास’पूर्व काळातले चित्रपटही उत्तमच होते. किंबहुना १९९१ ते २००४ या चौदा-पंधरा वर्षांच्या मराठीच्या पडत्या काळात जे काही मोजके चित्रकर्मी कार्यरत होते, त्यात अमोल पालेकर (बनगरवाडी, कैरी, ध्यासपर्व), स्मिता तळवलकर-संजय सूरकर (कळत-नकळत, चौकट राजा, सवत माझी लाडकी, घराबाहेर, सातच्या आत घरात) यांच्या जोडीला सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर हेही महत्त्वाचं नाव होतं.  
यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील धग कायम ठेवली. ‘श्वासो’त्तर काळात त्यांनी नितळ, घो मला असला हवा, एक कप च्या, भारत माझा देश आहे, संहिता, अस्तु आदी अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले. या जोडीचं निर्मितीचं सातत्य कौतुकास्पद आहे. मात्र, एकदा चित्रपट करून झाला, की त्याच्या जाहिरातींसाठी, प्रमोशनसाठी काहीशी उदासीनता भावे-सुकथनकर यांच्यात दिसते. निर्माते वेगळे असतात आणि ते बहुतांश वेळा नवे असतात. त्यामुळं या जोडीचे चित्रपट काही अपवाद करता, महोत्सवांपुरतेच मर्यादित राहिलेले दिसतात.

(कै.) राजीव पाटील हा या काळातला महत्त्वाचा दिग्दर्शक होता. ‘सावरखेड एक गाव’सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटापासूनच राजीवनं आश्वासक सुरुवात केली होती. त्याचा नंतरचा सनई-चौघडे हाही चित्रपट आधुनिक, तरुणाईची भाषा बोलणारा, त्यांच्या समस्या सांगणारा होता. त्याचाच पुढचा ‘जोगवा’ हा चित्रपट या काळातला एक महत्त्वाचा चित्रपट म्हणता येईल. 
जोगतिणीच्या भूमिकेत उपेंद्र लिमयेनं अप्रतिम काम केलं. त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. यातली गाणीही गाजली. हरिहरन आणि श्रेया घोषाल यांनाही या चित्रपटातील ‘जीव रंगला...’ या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. नंतर राजीवनं विश्वास पाटलांच्या कादंबरीवर आधारित ‘पांगिरा’ हा चित्रपटही केला. पण तो चालला नाही. ‘७२ मैल - एक प्रवास’ हा त्याचा शेवटचा चित्रपट. तोही नावाजला गेला. राजीव पाटीलच्या अकाली निधनानं मराठीनं एक उमदा आणि गुणवान दिग्दर्शक गमावला, यात शंका नाही.

गजेंद्र अहिरे हाही एक नामवंत दिग्दर्शक. ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ या पहिल्याच चित्रपटापासून लक्ष वेधून घेणारा. अत्यंत वेगानं चित्रपट पूर्ण करण्याची त्याची हातोटी. अनेकदा त्याची टिंगल केली जाते; पण त्यानं चित्रनिर्मितीत जे सातत्य राखलं आहे, ते भल्याभल्यांना जमत नाही. याशिवाय दिग्दर्शनाखेरीज कथा-पटकथा-संवाद आणि गीतलेखन आदी बऱ्याच जबाबदाऱ्या गजेंद्र एकहाती पेलत असतो. डोक्यात २४ तास सिनेमाचं वेड असल्याशिवाय हे शक्य नाही. त्यानं या काळात सैल, दिवसेंदिवस सरीवर सरी, गुलमोहर, बयो, पारध, मायबाप, वासुदेव बळवंत फडके ते अगदी अलीकडचा गाजलेला अनुमती येथपर्यंत अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. तंत्रावर अत्यंत हुकूमत असलेला हा दिग्दर्शक असून, त्याचं नाव या काळातल्या महत्त्वाच्या दिग्दर्शकांच्या यादीत नक्कीच घ्यावं लागेल.
रवी जाधव हा जाहिरात क्षेत्रातून दिग्दर्शनाकडं वळलेला माणूस. त्याच्या पहिल्याच ‘नटरंग’ या चित्रपटानं हवा केली. यातली गाणी भरपूर गाजली. आनंद यादवांच्या तितक्याशा न गाजलेल्या कादंबरीवरून रवी जाधवनं हा चित्रपट तयार केला होता. त्यानंतर त्यानं ‘बालगंधर्व’ हा नारायणराव श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्वांची जीवनगाथा सांगणारा भव्य चित्रपट सादर केला. यामुळं रवी जाधवचं नाव मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकांमध्ये घेतलं जाऊ लागलं. नंतर त्यानं बालक-पालक, टाइमपास आणि आता टाइमपास-२ असे सर्वसामान्य प्रेक्षकांना अपील होणारे चित्रपट दिले. या चित्रपटांना झी टॉकीजचा पाठिंबा असल्यानं आणि जाहिरातबाजीत ते कुठंही कमी पडत नसल्यानं या सर्वच चित्रपटांची राज्यभर चर्चा होते. खऱ्या अर्थानं मराठीतील मुख्य प्रवाहातील सिनेमा असं रवीच्या चित्रपटांचा वर्णन करता येईल. महेश मांजरेकरांनी निर्मिलेले आणि त्यांच्या भावांनी किंवा अतुल काळेनं दिग्दर्शित केलेले मातीच्या चुली, दे धक्का, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय आदी चित्रपटही याच मुख्य प्रवाहातील चित्रपट म्हणता येतील.
 चंद्रकांत कुलकर्णी यांनीही कायद्याचं बोला चित्रपटानंतर कदाचित हा अश्विनी भावेच्या पुनरागमनाचा चित्रपट दिला. यातील सदाशिव अमरापूरकरांची भूमिका गाजली. त्यानंतर त्यांनी तुकाराम आणि आजचा दिवस माझा हे दोन आणखी चांगले चित्रपट दिले. विशेषतः ‘आजचा दिवस माझा’ हा वेगळाच चित्रपट होता अन् जमलेला होता. एवढा ऑथेंटिक राजकीय चित्रपट मराठीत फारच क्वचित पाहायला मिळतो. मात्र, चंद्रकांत कुलकर्णी यांचे चित्रपट दीर्घकाळानं येतात. ते आणि त्यांचे लेखक प्रशांत दळवी-अजित दळवी यांचं पेपरवर्क चांगलं असतं. ते तयारी आणि संशोधनही भरपूर करतात. त्यामुळंही चित्रपट यायला वेळ लागतो. अर्थात जेव्हा येतो तेव्हा तो गुणवत्तापूर्ण असणार, याची खात्री असते.
अमोल पालेकर हे चित्रपटसृष्टीतलं मोठं नाव. त्यांनीही मराठी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन या काळात सुरू ठेवलं होतं. स्त्री-पुरुषांच्या लैंगिक प्रेरणांचा शोध घेणारी त्यांची त्रिचित्रधारा प्रसिद्ध आहे. यातला अनाहत हा चित्रपट श्वासपूर्वी येऊन गेला होता. नंतर त्यांनी थांग (इंग्रजीत क्वेस्ट) आणि समांतर (यात प्रथमच शर्मिला टागोरनं मराठीत काम केलं होतं) या दोन चित्रपटांद्वारे ही तीन चित्रपटांची धारा पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी स्मृतिभ्रंशाच्या समस्येचा वेध घेणारा धूसर हा मराठी चित्रपट तयार केला. हा चित्रपट मात्र फार गाजला नाही.

सतीश राजवाडे हे अलीकडच्या पिढीतील मराठी दिग्दर्शकांमधलं महत्त्वाचं नाव. या माध्यमावरची त्याची हुकूमत वाखाणण्याजोगी आहे. मुंबई-पुणे-मुंबई, प्रेमाची गोष्ट हे त्याचे चित्रपट याची साक्ष देतील. या दिग्दर्शकाकडूनही मराठी चित्रपटसृष्टीला मोठ्या अपेक्षा आहेत.

या सर्व दिग्दर्शकांचा मराठी चित्रपटांच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत मोठा वाटा आहे. महेश मांजरेकर यांनी मराठी चित्रपटांना भव्यता मिळवून दिली. सचिन आणि महेश कोठारे हे जुने-जाणते दिग्दर्शकही याच काळात नव्यानं सक्रिय झाले. सचिननं नवरा माझा नवसाचा या सिनेमातून जोरदार कमबॅक केलं. मात्र, सत्ते पे सत्तावरून काढलेल्या आम्ही सातपुते या चित्रपटाला फार यश लाभलं नाही. तरीही सचिन अनेक सिनेमांतून दर्शन देत राहिला. ‘शर्यत’सारख्या सिनेमात त्यानं साकारलेला खलनायक लक्षात राहण्यासारखा होता. अगदी अलीकडं सतीश राजवाडेनं त्याला घेऊन काढलेला ‘सांगतो ऐका’ हाही एक वेगळा, पण अपयशी प्रयत्न होता. महेश कोठारेंनीही नवनवे सिनेमे देणं सुरू ठेवलं. तंत्रदृष्ट्या ते कायमच एक पाऊल पुढं असतात. 
‘धडाकेबाज’च्या रूपानं मराठीतला पहिला सिनेमास्कोप चित्रपट काढणाऱ्या महेश कोठारेंनी ‘झपाटलेला -२’च्या निमित्तानं प्रथमच थ्री डी मराठी चित्रपट बनवला. त्यांचे चित्रपट कायमच सर्वसामान्य प्रेक्षकांना आकृष्ट करीत राहिले. समीक्षकांनी कोठारेंच्या चित्रपटांना नाके मुरडली, तरी कोठारे यांचं हे योगदान वादातीत आहे, यात शंका नाही.

गेल्या काही वर्षांत मराठीत ग्रामीण भागातून आलेल्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांनी वेगळा प्रभाव पाडला. यात प्रामुख्यानं शिवाजी लोटन पाटीलचा धग, नागराज मंजुळेचा फँड्री अन् भाऊराव कऱ्हाडेचा ख्वाडा या चित्रपटांचा समावेश करावा लागेल. एरवी विदर्भाच्या पार्श्वभूमीवरचे फार कमी मराठी चित्रपट येत. मात्र, सतीश मनवरच्या गाभ्रीचा पाऊस आणि नंतरच्या तुह्या धर्म कोंचा या दोन्ही चित्रपटांनी वैदर्भीय चित्रपटांची चांगली वाट तयार केली. निशाणी डावा अंगठा या कादंबरीवर पुरुषोत्तम बेर्डेंनी काढलेल्या याच नावाच्या चित्रपटातही विदर्भ दिसला. श्रीहरी साठे या नव्या दिग्दर्शकाच्या एक हजाराची नोट या चित्रपटानं अनेक महोत्सवांत वाहव्वा मिळविली. विदर्भातल्या एका गरीब विधवा स्त्रीच्या जगण्यावर हा सिनेमा होता. मसाला, फँड्री, ख्वाडा, किल्ला या चित्रपटांतून सोलापूर, नगर या एरवी मराठीत कमी दिसणाऱ्या भागाचं एक तर दर्शन घडलं किंवा त्याचे दिग्दर्शक तरी त्या मातीतून आले होते. ‘ख्वाडा’सारख्या चित्रपटातून भाऊराव कऱ्हाडेनं स्थलांतराचा प्रश्न धनगर कुटुंब केंद्रस्थानी घेऊन प्रभावीपणं मांडलेला दिसतो.

 ‘फँड्री’मध्ये कैकाडी समाजातलं कुटुंब केंद्रस्थानी दिसतं. या समाजांचं चित्रिकरण मराठी चित्रपटांमधून पूर्वी अजिबात दिसत नसे किंवा अगदी कडेकडेनं दिसत असे. याच्या जोडीलाच ‘जयजयकार’सारख्या तृतीय पंथीयांच्या टोळीला मध्यवर्ती ठेवून निर्माण झालेल्या वेगळ्या चित्रपटाचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल. जयप्रद देसाई या नवोदित दिग्दर्शकानं ‘नागरिक’ या चित्रपटाद्वारे मराठीतील राजकीय चित्रपटांचा प्रवाह पुन्हा वाहता करण्याचं काम केलं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हा चित्रपट पाहताना दिग्दर्शकावर असलेला ‘सिंहासन’सारख्या चित्रपटाचा पगडा ठळकपणे जाणवतो. दोन्ही ठिकाणी एक पत्रकार हा प्रमुख पात्राच्या भूमिकेत आहे, एवढ्यावरच हे साम्य संपत नाही. अर्थात दोन्ही चित्रपटांची तुलना करता येत नसली, तरी मराठीत एवढ्या नामवंत कलाकारांना घेऊन केलेला हा प्रयत्न निश्चितच महत्त्वाचा आहे, यात शंका नाही.

हे सगळं चित्र पाहता, मराठी चित्रपटांचं विषयांचं वैविध्य निश्चितच दाद देण्याजोगं आहे, यात वाद नाही. पुण्यात फिल्म इन्स्टिट्यूट पूर्वीपासूनच होती. नंतरच्या काळात काही जाणत्या माणसांनी फिल्म सोसायट्यांच्या माध्यमांतून बऱ्यापैकी डोळस प्रेक्षक घडवायला सुरुवात केली. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू झाला तो याच काळात. (गेल्या दहा-बारा वर्षांत या महोत्सवानं चांगलंच बाळसं धरलंय. पुण्यात हा महोत्सव पाहायला सिनेमावेड्या प्रेक्षकांच्या उड्या पडतात. इथल्या प्रेक्षागृहांत चांगले सिनेमे पाहायला मोठमोठ्या रांगा लागतात. अर्थात यात हौशे-नवशे-गवशेही आलेच!) यापाठोपाठ नाशिक, कोल्हापुरातही आंतरराष्ट्रीय चित्रपटांचं आयोजन व्हायला लागलं. तिथं जागतिक चित्रपटांचं दर्शन आपल्या मराठी प्रेक्षकांना पूर्वीपेक्षा सहज आणि वारंवार होऊ लागलं. मराठी चित्रपटांच्या वाटचालीत या घडामोडीचा नक्कीच महत्त्वाचा वाटा आहे. कारण हे चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांत हे नवे, स्वतः चित्रपट दिग्दर्शित करण्याची उमेद बाळगणारे दिग्दर्शकही होते. त्यांच्या नजरेतून मराठीत नवनवे विषय आले. 
निखिल महाजनसारखा तरुण दिग्दर्शक ‘पुणे ५२’ या चित्रपटातून न्वार सिनेमाचा प्रयोग मराठीत करू पाहत होता. यातील बोल्ड दृश्यं मराठी चित्रपटांत कधी दिसतील, असं दहा वर्षांपूर्वी कुणी सांगितलं असतं, तरी विश्वास ठेवणं कठीण होतं. मात्र, महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांत तरी चित्रपटांविषयी निवडक का होईना, पण प्रेक्षकांना आलेलं दृश्यभान पाहूनच ‘पुणे ५२’सारखा प्रयोग करण्यात आला असणार. याच काळात सचिन खेडेकर, अतुल कुलकर्णी, सुबोध भावे, संदीप कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर या कलाकारांनी वेगळी वाट चोखाळत नवनवे प्रयोग केले. वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. याशिवाय भरत जाधव, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी या कलाकारांनी जवळपास मराठीतल्या सुपरस्टारचा दर्जा मिळवला आहे. यांच्या नावावर सिनेमा पाहायला येणारा आणि त्यांचा कट्टर फॅन असलेला प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे, हे निर्विवाद. अभिनेत्रींमध्ये प्रिया बापट, स्मिता तांबे, सोनाली कुलकर्णी, उषा जाधव, अमृता सुभाष आदींनी हीच नवतेची वाट धरली. सई ताम्हणकर, धाकटी सोनाली कुलकर्णी यांनीही आपला ठसा उमटवला. मृणाल कुलकर्णी, क्रांती रेडकर या अभिनेत्रींना दिग्दर्शनात उतरावेसे वाटले. मराठी चित्रपटांची वैभवसंपन्नता स्पष्ट करणारीच ही सगळी उदाहरणे होत.

हे सगळं चांगलं चित्र एका बाजूला असलं, तरी काही अपवाद करता मराठी चित्रपट अजूनही महाराष्ट्रातल्या ११ कोटी मराठी माणसांपर्यंत का पोचत नाही, हा सर्वांत कळीचा मुद्दा आहे. यामागची काही कारणं सांस्कृतिक, तर काही सामाजिक आहेत. अन्य राज्यांसारखं हेही एकभाषक राज्य असलं, तरी या राज्याचे ठळक असे चार प्रादेशिक भाग पडतात. कोकण, पश्चिम-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ हे चारही भाग एकच भाषा बोलणारे असले, तरी त्यांचा सांस्कृतिक-राजकीय अन् भौगोलिक वारसा निर्विवाद वेगवेगळा आहे. या चारही भागांना अपील करणारा मराठी चित्रपट काढायचा, तर या सर्व क्षेत्रांचा ‘लसावि’ काढूनच तो तयार करावा लागतो. खरं तर सुमित्रा भावेंचा वास्तुपुरुष हा चित्रपट आणि महेश एलकुंचवारांनी लिहिलेलं वाडा चिरेबंदी हे नाटक यांचं अंतस्थ सूत्र एकच आहे. प्रादेशिक बोली, लहेजा आणि बाह्य नेपथ्य वेगळं असलं, तरी दोन्हींचा आत्मा अस्सल मराठी संस्कृतीशी नातं सांगणाराच आहे. पण दुर्दैव म्हणजे याची जाणीव असणारे दिग्दर्शक थोडे आणि आणखी दुर्दैव म्हणजे या चित्रपटांना प्रतिसाद देणं अपेक्षित असलेले तसे प्रेक्षकही फारच थोडे. अलीकडच्या काळात असे प्रादेशिकत्व ठळक करणारे चित्रपट अनेक आले. श्वास, ताऱ्यांचं बेट, नारबाची वाडी, घो मला असला हवा, काकण, किल्ला आदी चित्रपटांमध्ये कोकणाचं; वळू, मसाला, देऊळ, फँड्री अन् ‘ख्वाडा’मध्ये ग्रामीण पश्चिम महाराष्ट्राचं; गाभ्रीचा पाऊस, तुह्या धर्म कोंचा, एक हजाराची नोट या चित्रपटांत विदर्भाचं जसं दर्शन घडतं, तसं मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र किंवा खानदेश यांची अस्सल प्रादेशिकता दाखवणारे फार कमी चित्रपट येतात. स्वाभाविकच अशा चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद साचेबद्ध असतो. खरं तर हे प्रयत्न स्तुत्य आहेत आणि त्याला सर्व राज्यानंच प्रतिसाद द्यायला हवा. पण तसं होताना दिसत नाही. 
महाराष्ट्रात गेल्या काही दशकांत सामाजिक स्तरांमध्ये प्रादेशिक वादासोबतच एक तीव्र स्वरूपाचा जातीयवाद झिरपत चाललेला दिसतो. पूर्वीसारखा सामाजिक सलोखा आता दिसत नाही. किमान गावांमध्ये तर नाहीच नाही. त्यामुळं समाज सर्वच कलाकृतींना एकसंध प्रतिसाद देताना दिसत नाही. त्यात हा आपला, तो त्यांचा असा चक्क जातीयवादी विचार केला जाऊ लागला आहे, हे स्पष्ट दिसतं. या गोष्टी उघडपणे कुणी बोलत नसलं, तरी त्याचं प्रतिबिंब विविक्षित चित्रपटांना मिळणाऱ्या (किंवा न मिळणाऱ्या) प्रतिसादात लख्खपणे उमटलेलं दिसतं. महाराष्ट्राची राजकीय (मतं मिळवून देणारी) व्यवस्था आणि सांस्कृतिक वारसा यांचा समन्वय दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. किंबहुना तो हेतुतः नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. चित्रपट किंवा कोणतीही सांस्कृतिक अभिव्यक्ती राजकीय परिप्रेक्ष्यातून मोजली-मापली जाऊ लागली, की त्या ठिकाणचा उदारतावाद संपुष्टात आलाच म्हणून समजा. महाराष्ट्र फार वेगाने या धोक्याकडं वाटचाल करतो आहे. अजूनही विवेकबुद्धी शाबूत असलेले समाजधुरीण याचा गांभीर्याने विचार करतील, एवढीच आशा आहे.

याशिवाय सर्वसाधारण मराठी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची क्षमता, आवड, निवड, क्रयशक्ती या सर्वांचाच विचार करायला हवा. आज शहरात चार जणांच्या कुटुंबाने एक चित्रपट पाहायचा, तर वीकएंडला किमान एक हजार रुपये खर्च येतो. आणि आपल्याकडं तर धाडधाड सहा ते सात सिनेमे सुट्टीच्या काळात एकाच दिवशी प्रदर्शित करायचे असतात. मागं दोन वर्षांपूर्वी रामनवमीच्या मुहूर्तावर पाच की सहा मराठी चित्रपट प्रदर्शित झाले होते. तेव्हा मी ‘मटा’मध्ये ‘धाव रे रामराया’ नावाचा लेख लिहिला होता. एकाच वेळी चित्रपट प्रदर्शित करण्याचा हा अट्टहास पाहता, केवळ रामच मराठी निर्मात्यांना वाचवू शकतो, असं त्याचं एकूण आशयसूत्र होतं. आजही ही परस्थिती फारशी बदललेली नाही. सारासार विचार गहाण ठेवून महत्त्वाच्या सणांच्या दिवशी, मोठ्या सुट्ट्यांच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्याची अहमहमिका सुरूच आहे. त्यात बळी मराठी चित्रपटांचाच जातो, हे कुणी लक्षात घेत नाही. निर्मात्यांचे राजकीय, आध्यात्मिक गुरू असतात. कुणी मुहूर्त बघून तारखा काढून देतं, तर कुणाला कुठल्याशा बाबांनी अमक्याच दिवशी तमक्याच क्षणी चित्रपट लाव, असा आदेशच दिलेला असतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला या चित्रपटसृष्टीत काम करायला खरंच खूप वाव आहे. खरं तर ज्याला आपल्या कलाकृतीवर विश्वास आहे, तो असले मुहूर्त वगैरे पाहत नाहीच. व्यावहारिक विचार करायला हरकत नसते; पण गळेकापू अंधश्रद्धा नसावी. प्रत्यक्षात मात्र याच्या अगदी उलट चित्र बघायला मिळतं.

मराठी चित्रपट खरोखर सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी व्हायचा असेल, त्यानं खरोखर उत्तम व्यवसाय करावा असं वाटत असेल, तर काही गोष्टी सरकार, चित्रपट महामंडळ, निर्मात्यांची संघटना, दिग्दर्शक मंडळी, फिल्म सोसायटी चळवळ आणि सर्वसामान्य प्रेक्षक यांनी एकत्र येऊन काही गोष्टी केल्या पाहिजेत. महाराष्ट्रात मराठी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित केला पाहिजे. फिल्म सोसायट्यांची चळवळ लहान लहान शहरांपर्यंतही पोचविली पाहिजे. सरसकट अनुदानाची पद्धत बंद केली पाहिजे. पुरस्कारांमधलं राजकारण थांबवलं पाहिजे. मराठी प्रेक्षकांना परवडतील अशा किमतीत हे चित्रपट पाहायला मिळाले पाहिजेत. माध्यमांतील आणि समाजातील तज्ज्ञ मंडळींनी एकत्र येऊन आणखी काही चांगले उपाय सुचवावेत. मराठी चित्रपटांची क्षमता मोठी आहे, हे ‘कोर्ट’सारख्या सिनेमानं पुन्हा सिद्ध केलं आहे. भारतात हा व्यवसाय सुरू केला तोच मुळी दादासाहेब फाळके या मराठी माणसानं. फार पूर्वी, म्हणजे १९३६ मध्ये आलेल्या ‘संत तुकाराम’ या ‘प्रभात’च्या चित्रपटानं त्याही काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावलं होतं. तेव्हा मराठी चित्रपटांना आता शंभर वर्षांनंतर हे उद्दिष्ट सातत्यानं गाठणं मुळीच अवघड जाऊ नये. मराठी चित्रपटांचा उत्कर्ष निश्चित आहे. कारण गेल्या ११ वर्षांत आशेकडून आशेकडंच हा प्रवास सुरू आहे...



----------------------------------------------------------

(नोंद - हा लेख माझ्या स्मरणशक्तीवर भरवसा ठेवून लिहिला आहे. काही नावे राहून गेली असतील, काहींच्या योगदानाची दखल निसटली असेल, तर काही उल्लेख कदाचित कुणाला खटकतील. मात्र, यात कुणाविषयीही कुठलाही आकस वा पूर्वग्रह नाही, याची नोंद घ्यावी. मराठी चित्रपटांचा गेल्या ११ वर्षांतल्या वाटचालीचा धावता आढावा घेणं एवढाच या लेखाचा प्रामाणिक हेतू आहे.)
---
(पूर्वप्रसिद्धी - आपले छंद दिवाळी अंक २०१५)
---

10 Dec 2015

संमेलन : एक घेणे

संमेलन : एक घेणे
----------------


नमस्कार. आमचं नाव सदा हुके. आम्ही पुण्यात राहत असून आणि लेखनकामाठी करण्याच्या धंद्यात असूनही त्या प्रमाणात लोकप्रिय नाही, याचे वास्तविक आम्हास केवढे तरी वैषम्य वाटावयास हवे होते. पण याच पुण्यनगरीच्या मधोमध (अधूनमधून) वाहणाऱ्या मुठेचे पाणी अस्मादिकांच्या देहात असल्याने ते वाटत नाही, हे खरे. याचे कारण स्वतःमध्येच मश्गुल राहण्याचा आमचा स्वभाव. अगदी नार्सिससच म्हणा ना! आपण बरे, आपले लेखन बरे आणि आपले फेसबुकवरील सदैव चकाट्या पिटण्याचे निरुपद्रवी उद्योग बरे अशी आमची एक जगण्याची रीत बनूनच गेली होती. फेसबुकावरील पोस्टीला किती लाइक आले, यावर आमचे त्या दिवसाचे बरे-वाईट मूड अवलंबून राहू लागले. चार लाइक कमी आले, तर आम्हास अन्न गोड लागेनासे झाले. चार लाइक जास्त आले, तर आम्हास गगन ठेंगणेसे वाटू लागले. (आणखी काही विविक्षित कमेंट आल्या, तर मग आम्हास स्वर्ग दोन बोटे उरू लागला...) अशा रीतीने फेसबुकावरील त्या आभासी जगात आम्ही अगदी म्हशीच्या तन्मयतेने डुंबत होतो. पण अचानक एके दिवशी ती पोस्ट पाहिली आणि आमचे 'होशोहवास' की काय म्हणतात ते साफ उडाले. त्या पोस्टमुळे आम्हास कळले, की आमच्या गावात साहित्य संमेलन होऊ घातले होते. आमच्यासारख्या लेखक माणसास ही केवढी पर्वणी लाभली होती, याची लेखक नसणारांस कल्पना यावयाची नाही. आपण कुठल्याशा ओहोळात डुबकी मारावी आणि डोके वर काढावे तर तो त्रिवेणी संगम निघावा, अशी काहीशी आमची गत झाली. स्वप्नच सत्यात उतरल्यासारखे झाले. आता काय वाट्टेल ते करून आपण हे संमेलन गाजवायचेच, असा निर्णय आम्ही घेऊन टाकला.
आधी आपणच आयोजक व्हावे, अशी एक धाडसी कल्पना मनी आली. मात्र, साहित्य संमेलन घोषित झाले आहे, त्या अर्थी त्याला आधीच एक आयोजक लाभला आहे, याची आम्हास 'आयडिया'च नव्हती. संमेलन आयोजित करायचे तर ही मागणी करायला कुठे जावे लागते, हेही आम्हाला ठाऊक नव्हते. एके दिवशी लकडी पुलावरून दुपारच्या वेळी टु-व्हीलर घातली असता, नेमके पोलिसांनी पकडले अन् आमचा हा प्रश्न सुटला. महाराष्ट्रातल्या पोलिसांनाही साहित्यामध्ये एवढी रुची आहे, याची कल्पना नव्हती. आमच्या झोळीतली सगळी पुस्तकं त्या पोलिसांनी काढून घेतली. किमान साहित्य संमेलनाच्या आयोजकांचा पत्ता तरी द्या, असं विनवल्यावर टिळक रस्त्याच्या दिशेने बोट करून त्या पोलिसानं आम्हास जवळपास तेथून हाकलून लावलं. टिळक रस्त्यावरील त्या इमारतीत पाऊल टाकताच आम्हाला एकदम आपण मोठ्ठे साहित्यिक असल्याचा फील आला. सुग्रास अन्नाचा वास दरवळत होता. येथे साहित्यिकांना दुपारचे भोजनही मिळते, या कल्पनेने आम्हाला भरून आले. हात वगैरे धुऊन, कुठे पाट-रांगोळी दिसतेय का ते पाहू लागलो. मात्र, हा सुवास समोरच्या डायनिंग हॉलमधून येत असल्याचे समजताच मनात फुटलेला आशेचा अंकुर अवचित खुडला की हो गेला! तिथे एक शाळेतल्या बाईही आल्या होत्या. त्याही अस्मादिकांप्रमाणेच हरवल्यासारख्या वाटत होत्या. पण लवकरच खुलासा झाला, की याच इथल्या 'हेडबाई' आहेत. बाई आता दोन्ही हात पुढे कर म्हणतील आणि सपासप छड्या मारतील, अशी भीती वाटली. म्हणून हात पाठीमागं बांधूनच आम्ही त्यांच्याशी बोलू लागलो. आमच्या अशा पवित्र्यामुळं आम्ही साहित्यिक आहोत, हे बाईंनी लगेच ताडलं आणि अर्थातच आमच्याकडं संपूर्ण दुर्लक्ष केलं. तिथं आलेल्या एका मंडप कंत्राटदाराशी त्या महिरपीच्या डिझाइनविषयी चर्चा करू लागल्या. त्या तसल्या वातावरणात आम्हास कविता होईल की काय, अशी भीती वाटली. तातडीने शेजारच्या हॉटेलात जाऊन मिसळ चापून आलो. मिसळ हेच वास्तव होय अन् कविता हे मिथक होय, यावर आमच्या तृप्त मनाने ढेकर देत शिक्कामोर्तब केलं. तेवढ्यात त्या वास्तूत एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम सुरू झालेला दिसला. दारात एक गृहस्थ येणाऱ्या-जाणाऱ्याला पेढा देऊन बळंच आत ओढत होते. एका अवसानघातकी क्षणी आम्हाला पेढ्याचा मोह पडला अन् आम्ही आत ढकलले गेलो. एका कवितासंग्रहाचं प्रकाशन होतं, असं आत गेल्यावर कळलं. कवी आणि प्रमुख पाहुणे असे दोनच लोक आत उपस्थित होते आणि दोघेही एकमेकांना कविता ऐकवीत होते. आम्ही आत येत आहोत, असं कळल्यावर दोघांनीही आमच्याकडं मोहरा वळविला. त्याबरोबर आम्ही प्राणांतिक किंकाळी मारून बाहेर पडलो आणि पहिली बस पकडून मंडईच्या दिशेनं कूच केले.
या प्रकारानंतर संमेलनाचे आयोजक होण्याची आमची इच्छा मटकन खाली बसली. आयोजक नाही तर नाही, पण किमान संमेलनात सहभाग तरी नोंदवू, या इच्छेनं मात्र हार मानली नव्हती. जरा चौकशी केली असता, पुन्हा त्याच इमारतीत जाऊन हेडबाईंना भेटायला लागेल, असं समजलं. या वेळी मात्र पुरती तयारी करून गेलो. भक्कम बायोडेटा बनवला. ती फाइल बगलेत घेऊन आम्ही सराईत राजकारण्यासारखे त्या इमारतीत शिरलो. पण हाय रे दुर्दैव... हेडबाई आज रजेवर होत्या म्हणे. पण तिथं सफारी घातलेले एक सुपरवायझरसदृश गृहस्थ बसले होते. त्यांच्यासमोर रेशनला पूर्वी साखर किंवा रॉकेल घ्यायला लागत असे, तशी एक मोठ्ठी रांग दिसली. आम्ही त्या रांगेच्या जरा जवळ खेटताच मागच्यांनी रांगेच्या स्वभावाला शोभतील अशा शिव्या दिल्या. आम्ही छताकडं पाहत आपण त्या गावचेच नाही, असं भासवू लागलो. तेवढ्यात एकानं सांगितलं, की ही संमेलनातील परिसंवादात सूत्रसंचालक होऊ इच्छिणाऱ्यांची रांग आहे. त्याबरोबर आम्हाला त्या रांगेतील लोकांच्या शब्दवैभवाचं कोडं एकदम उलगडलं. संमेलनातील एखाद्या परिसंवादात किंवा चर्चासत्रात भाग घ्यायचा असेल, तर काय करायचं, अशी चौकशी सुपरवायझर साहेबांकडं केली. तर त्यांनी खेकसून उद्या या, असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा लकडी पुलावरून सिग्नल मोडून आम्ही त्या इमारतीत घुसलो. आज रांग वाढलीच होती. अनेक दाढीधारी पुरुष आणि बॉबकटवाल्या महिल्या रांगेत उभ्या होत्या. चर्चासत्रात किंवा परिसंवादात भाग घ्यायला गडीमाणसांना दाढी अन् बायकांना बॉबकटही पूर्वअटच असावी, अशी आपली आम्हाला शंका आली. आम्ही रोज दाढी केली, तरी ती न केल्यासारखीच दिसते, त्यामुळे आज फावले. रांग मुंगीच्या पावलांनी सरकत होती. त्या वातावरणात आपल्याला पुन्हा कविता होईल की काय, अशी भीती वाटली. पण स्वतःला सावरलं. पुढच्या बॉबकटवाल्या ताईंच्या दंडावर मोर गोंदला होता, तो पाहत बसलो. आणखीही काही जणांच्या अंगावर गोंदलेलं दिसलं. तेव्हा हीदेखील अट असावी की काय, अशी शंका मनास चाटून गेली. समोरवाल्या ताईंना विचारल्यावर त्यांनी, भारीच विनोदी दिसता, असं म्हणून खुदुखुदू हसून घेतलं. संमेलनात विनोद विषयावर परिसंवाद असता, तर आपल्याला नक्कीच चानस गावला असता, या विचारानं आम्हाला हुशारी आली. पण संमेलनाचे कार्यक्रम पाहता, त्यात विनोदाला स्थानच नसल्याचं लक्षात आलं आणि मन अगदीच हिरमुसून गेलं. बॉबकटवाल्या ताईंच्या गोऱ्या दंडाकडं पाहत आम्ही मोरोपंतांची केकावली आठवत होतो अन् साहित्यिक अनुभूती घेत होतो, म्हणून तरी बरं! नेहमीप्रमाणं आमच्या पुढच्या माणसाचं (अर्थात मोर गोंदलेल्या ताईंचं) काम झालं आणि खिडकी बंद झाली. आमच्या चेहऱ्यावर 'ये दिल माँगे मोर'ची अवकळा दिसताच सुपरवायझर साहेबांनी अत्यंत कारुण्यपूर्ण कटाक्ष टाकला अन् हातानंच आता उद्या... अशी खूण केली. शिवाय एक कुपनही दिलं. आम्ही त्यांना मनोभावे नमस्कार केला आणि मिसळीकडं मोर्चा वळवला. 
दिवस तिसरा! लेंगा-झब्बा अन् कळकट झोळी असा वेश करून गेलो आणि फसलो. सुरक्षारक्षकानं तुमची लाइन तिकडं हाय, असं सांगून समोरच्या शाळेच्या पटांगणाकडं बोट दाखवलं. आम्हाला काही कळेचना. पण सुरक्षारक्षकानं जवळपास शाळेच्या दिशेनं धक्केच मारल्यावर आम्ही तिकडं गेलो. तिकडं संपूर्ण मैदानभर लोक रांगेत उभे होते. बहुतांश जण आमच्यासारखाच पेहराव करून आले होते. त्यात ऐंशी वयाच्या, हातात काठी घेऊन आलेल्या कवळी आजोबांपासून शिशुगटातल्या अथर्वांचे थवे जमले होते. ही टोळधाड कुठून आली, असा विचार करीत होतो, तोच डोक्यात लख्खकन प्रकाश पडला. ही कवींची रांग होती तर...! अबब! पळा, पळा... इथून पळा... अशा मनातल्या मनात आरोळ्या ठोकीतच तिथून बाहेर पडलो. घरी जाऊन पहिला लेंगा-झब्बा फेकला. दुसरे कपडे घातले आणि पुन्हा त्या इमारतीजवळ आलो. या वेळी काही अडचण आली नाही. सुरक्षारक्षकानं आत सोडलं. पण आत कुठलीच रांग नव्हती. त्याऐवजी तिथं संमेलनाची कार्यक्रमपत्रिकाच लागली होती. हा हन्त हन्त! 
अशा तऱ्हेनं आमची संमेलनात सहभागी होण्याची इच्छा अपुरीच राहिली. परिसंवादात सहभागाचा किंवा गेला बाजार सूत्रसंचालनाचा चान्स मिळता, तर फुकटात संमेलन झालं असतं आणि वर मानधनाचं पाकीटही मिळालं असतं. पण आम्ही पुणेकर मराठी लेखक असल्यानं संमेलन आमच्या अंगात कायमच घुमत असतं. संमेलनात तंबूत फुकटात शिरायचे अजून दोन मार्ग शिल्लक होते. एक होता प्रकाशकांचा अन् दुसरा होता पत्रकारांचा... आम्ही आधी प्रकाशकांच्या गोटात शिरलो. स्टॉल टाकायचा की नाही, या मूलभूत वादावरून त्यांच्यातील आपापसांतील चर्चाच 'स्टॉल' झाली होती. त्यामुळं आमच्याकडं पाहायला कुणालाच वेळ नव्हता. नवोदित लेखकाला ताटकळत ठेवण्यात प्रकाशकांना नेहमीच गंमत येते. आमच्या चेहऱ्यावर तशीही सदा याचकाची कळा असते. वास्तविक प्रकाशकांकडं जाणाऱ्या लेखकाच्या अंगी डास किंवा माशी यांचं मनोधैर्य अत्यावश्यक असतं. म्हणजे कितीही वेळा हाकललं तरी न लाजता पुन्हा त्यांच्या नाकावर बसायची कला साध्य असली पाहिजे. आम्ही लेखक असलो, तरी आत्ता पुस्तकाचं काही काम नव्हतं. तरीही चेहऱ्यावर सदैव असलेल्या अजीजीच्या भावानं घोटाळा केला होता. प्रकाशक मंडळींनी आमच्याकडं लक्षच दिलं नाही. संमेलन... स्टॉल... लिलाव... इच्छुक... असे शब्द तुटक तुटकपणे उच्चारले तरी कुणीही ढुंकून पाहिलं नाही. शेवटी आम्ही जीव खाऊन 'आवृत्ती संपली...' असं किंचाळलो, तसे सगळे जण हातातलं काम टाकून अस्मादिकांकडं धावत आले. 'संमेलनात तुमच्या स्टॉलची जबाबदारी आम्हाला द्या,' अशी विनंती सगळ्यांना केली. आवृत्ती कुठली संपली, ते आधी सांग, असा एकच गिल्ला प्रकाशकांनी केला. त्यावर जे इथं नाहीत त्या प्रकाशकांची संपली, असं उत्तर दिल्यानंतर प्रकाशकबंधू आणि भगिनींनी आमची कणीक तिंबली.
या अनुभवानंतर पत्रकारमित्रांकडं जावंसं वाटेना. तरीही धाडस करून एकाच्या कार्यालयात डोकावलो, तर तिथं संमेलनाला जाणाऱ्यांच्या चिठ्ठ्या पाडत होते. ते करुण दृश्य आम्हालाच पाहवेना. एवढं की, या सगळ्या पत्रकार मित्रांना आपल्या खर्चानं संमेलनाला न्यावं, अशी इच्छा मनी प्रकट झाली. पण थोड्याच वेळात आमच्या अंगचं मुठेचं पाणी खवळलं आणि कुणालाही फुकट नेशील तर बघ, असं आम्ही स्वतःवरच डाफरलो. संमेलनाला फुकट जाण्यासाठी एवढा आटापिटा करण्यासाठी आपणच संमेलन भरवलं तर? मनात कल्पना अशी येताक्षणी आम्ही टुणकन उडी मारली. आम्ही लगेच पत्रकार परिषद बोलावून अंटार्क्टिका खंडावर पहिलं मराठी संमेलन घेण्याची घोषणा करून टाकली. आमच्या या ऑफबीट ठिकाणाचं नाव घोषित होताच साक्षात पेंग्विन प्रकाशनानं संमेलनाचं प्रायोजकत्व घेण्याची तयारी दर्शविली. अंटार्क्टिकावर संमेलन होणार या कल्पनेनं अनेक मराठी साहित्यिकांना हुडहुडी भरली. काही बहाद्दर साहित्यिकांनी 'त्यातल्या त्यात आपल्याला इथून बर्फ नेण्याची गरज नाही; फक्त स्टॉक न्यावा लागेल,' या विचारानं आनंद व्यक्त केला. ...आणि ते रमणीय दृश्य आमच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. चार साहित्यिक हिमनगाच्या टोकावर बसून, मस्तपैकी मराठी साहित्याच्या खोलीविषयी चर्चा करीत आहेत. मधूनच शेजारचा बर्फ उचलून आपल्या ग्लासात घालताहेत... काहींच्या मोठमोठ्या मिशांवर, तर काहींच्या टकलांवर, काहींच्या बॉबकटवर, तर काहींच्या चष्म्यावर पांढरा, भुरभुरता बर्फ गोळा झालाय... मराठी साहित्य थंड पडलेय का, या विषयावर एका तळावर गरमागरम चर्चा रंगली आहे. एवढी की, तिथला बर्फ वितळून पेंग्विनांची पळापळ सुरू झालीय... प्रकाशकांनी इग्लूसारखे स्टॉल उभारले आहेत.... वाचक सरपटत आत जाताहेत... कविकट्ट्यावर तर शब्द गोठलेयत आणि प्रतिभा पाझरतेय अशी काहीशी अवस्था झाली आहे... व्वा व्वा! केवढी मज्जा... आम्ही स्वतः एका नौकेत बसून, या अलौकिक साहित्य चर्चेचा हलत-डुलत आस्वाद घेत होतो. तेवढ्यात कुणी तरी रप्पकन बर्फाचा गोळा आमच्या तोंडावर फेकून मारला... हाय हाय... खाडकन जाग आली... आमचं अर्धांग समोर अंधुकसं दिसत होतं. एका चांगल्या स्वप्नाची समाप्ती झाली होती.... पुढं काय घडलं, ते सांगायलाच पाहिजे का?

---

(पूर्वप्रसिद्धी - जत्रा दिवाळी अंक २०१५)
---

6 Dec 2015

सिनेमॅटिक कलाटणी...

सिनेमॅटिक कलाटणी...
-------------------
प्रत्यक्ष जीवनात काही तरी अतर्क्य किंवा आश्चर्यकारक घडलं, की आपण म्हणतो, हे अगदी फिल्मी स्टाइल झालं! कारण सिनेमात जे काही घडतं ते सगळं असंच घडवून आणलेलं असतं. दिग्दर्शक कथानकाला अशी काही तरी कलाटणी देतो, की प्रेक्षक थक्क होऊन पाहत राहतात. प्रत्यक्ष असं काही घडत नसतं, यावर आपला ठाम विश्वास असतो. पण खरं तर आपल्या वास्तव जगण्यातही असे अनेक प्रसंग येत असतात आणि त्यातून अनेकदा काही तरी वेगळं, अनपेक्षित असं निष्पन्न होत असतं. सर्वसामान्यांच्या आयुष्यातही असे प्रसंग घडतात. पण सिनेमातल्या जगात अशी कलाटणी मिळाली, तर ते किस्से दंतकथा म्हणून अजरामर होतात.
भारतातल्या चित्रपटसृष्टीचा जन्मच मुळी अशा कलाटणीतून झाला. धुंडिराज गोविंद फाळके नावाचा अवलिया इसम जादूचे प्रयोग करता करता या हलत्या चित्रांच्या प्रेमात पडतो काय आणि तिथून स्वतःच सिनेमा तयार करण्याचा ध्यास घेतो काय! खरंच सिनेमात शोभावी अशीच ही कथा आहे. दादासाहेब फाळके यांनी मुंबईत सुरू असलेले परदेशी मूकपटांचे प्रयोग पाहिलेच नसते तर... किंवा त्या प्रोजेक्टरवाल्यानं त्यांना माहिती न देता हाकलून लावलं असतं तर... पण त्या एका घटनेनं दादासाहेबांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि भारतात सिनेमाचा जन्म झाला. शंभर वर्षांनी मग त्यांच्या आयुष्यावर सिनेमा निघाला आणि ही हरिश्चंद्राची फॅक्टरी कशी जन्माला आली हे आपण डोळे भरून कौतुकानं पाहिलं.
सिनेमाच्या जगात अशा अनेक विस्मयकारक गोष्टींनी अनेकांची आयुष्यं बदलली. तसं नसतं तर बॉम्बे टॉकीजमध्ये लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून कामाला लागलेल्या कुमुदमल कुंजीलाल गांगुली उर्फ अशोककुमार उर्फ दादामुनी यांचा जीवनपट वेगळाच राहिला असता. बॉम्बे टॉकीजमध्ये 'जीवननैया' या सिनेमाचं काम सुरू असतानाच ती घटना घडली. बॉम्बे टॉकीजचे प्रमुख हिमांशू रॉय यांची पत्नी देविकाराणी नायक नज्मुल हसन याचा हात धरून चक्क पळून गेली. देविकाराणी हे मोठं प्रस्थ होतं. तिच्या या वागण्यामुळं बॉम्बे टॉकीज हादरली. पुढं देविकाराणी पतीकडं परतल्या. पण नायक नज्मुल हसनची हकालपट्टी ठरलेलीच होती. त्या वेळी हिमांशू रॉय यांना दिसले आपले दादामुनी. तोवर दादामुनी अगदी किरकोळ भूमिका करत असत, पण त्यांचं प्रमुख काम लॅबोरेटरी सांभाळण्याचंच होतं. पण जीवननैयामध्ये हिमांशू रॉयनी त्यांना थेट नायक म्हणून देविकाराणींसमोर उभं केलं. तेव्हाच्या प्रथेप्रमाणं कुमुदमलचं नाव बदलून अशोककुमार करण्यात आलं. त्यानंतर लगेचच आलेल्या 'अछूत कन्या' या चित्रपटातही हीच जोडी होती. या दोन्ही चित्रपटांना मिळालेल्या तुफान यशानंतर अशोककुमार-देविकाराणी ही तेव्हाची सर्वांत 'हॉट पेअर' ठरली. या घटनेनंतर दादामुनींचं आयुष्य कायमस्वरूपी बदलून गेलं आणि भारतीय चित्रपटसृष्टीला एक दादा अभिनेता मिळाला...
याच अशोककुमारचा 'अछूतकन्या'मधला अभिनय बघून भारावलेला पंजाबमधला आणखी एक युवक धरम देवदत्त पिशोरीमल आनंद - अर्थात देव आनंद - एका ब्रेकची वाट पाहत होता. नाटकांत-सिनेमात काम करायचंच या ध्येयानं पछाडलेला देव मुंबईत आला. एका अकौंटन्सी फर्ममध्ये क्लार्क म्हणून काम करणारा देव एके दिवशी पुण्यात तेव्हाच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा प्रभात स्टुडिओत येऊन धडकला. तेव्हा प्रभातचे एक मालक बाबूराव पै यांच्या ऑफिसात शिरलेल्या देवकडे पै पाहतच राहिले. या युवकाचं ते खास दिलखुलास हास्य त्यांना विशेष भावलं आणि या तरुणाला संधी दिली पाहिजे असं त्यांनी ठरवलं. आणि अशा रीतीनं प्रभातच्या हम एक है या सिनेमात देव झाला नायक. याच पुण्यात त्याला भेटला आणखी एक अवलिया मित्र... देवपेक्षा दीड-दोन वर्षांनी लहान असलेल्या या मित्राचं नाव होतं वसंतकुमार शिवशंकर पदुकोण - अर्थात गुरुदत्त. या मित्रांनी मग ठरवलं, की ज्याला आधी संधी मिळेल त्यानं दुसऱ्याला मदत करायची. म्हणजे देवनं जर सिनेमा काढला, तर गुरूला दिग्दर्शक म्हणून संधी द्यायची आणि जर गुरूला आधी सिनेमा मिळाला, तर त्यात देव काम करणार. पुढं झालंही तसंच. पण देवनं मुळात धाडस करून बाबूराव पैंच्या ऑफिसात शिरकाव केला नसता आणि आपलं ते प्रसिद्ध हास्य प्रकट केलं नसतं तर...? 
गुरुदत्तचं नाव घेतलं की अभावितपणे वहिदा रेहमानचं नाव ओठांवर येतंच. साठच्या दशकातली ही सुप्रसिद्ध जोडी. पण वहिदाला व्हायचं होतं मुळात डॉक्टर. ते काही जमलं नाही आणि नृत्यनिपुण असलेल्या वहिदाला तेलगू आणि तमिळ सिनेमांत काम मिळालं. तिला गुरुदत्तनं पाहिलं ते हैदराबादमध्ये. तेव्हा सीआयडीसाठी तो नव्या चेहऱ्याच्या शोधात होता आणि त्याचा मित्र अब्रार अल्वी त्याला हैदराबादमध्ये घेऊन आला होता. गुरुदत्त वहिदाला घेऊन मुंबईत आला आणि मग पुढचा सगळा इतिहास प्रसिद्ध आहे. 
प्रत्येक कलाकार मोठ्या यशासाठी, एका ब्रेकसाठी धडपडत असतो. मग असं काही तरी घडतं आणि त्या कलाकाराचं आयुष्यच बदलून जातं. मेगास्टार अमिताभ बच्चन हे याचं सर्वांत मोठं आणि महत्त्वाचं उदाहरण म्हणता येईल. आपल्या खर्जातल्या आवाजासाठी पुढं गाजलेल्या अमिताभला सुरुवातीच्या काळात आवाज चांगला नाही, या कारणासाठी आकाशवाणीवर नोकरी नाकारण्यात आली होती. अर्थात अमिताभचं कुटुंब तसं प्रभावशाली होतं. त्याचे वडील भारतातले प्रख्यात कवी होते. त्यांची गांधी कुटुंबाशी मैत्री होती. या सगळ्या कारणांमुळं अमिताभला चित्रपटसृष्टीत संधी लगेच मिळाली. पण मोठं यश पाहायला जी कलाटणी लागते ती दिली प्रकाश मेहरांच्या 'जंजीर'नं. या चित्रपटासाठी प्रकाश मेहरा आधी देव आनंदचा विचार करीत होते. देवनं गोष्ट ऐकून सिनेमा करायलाच नकार दिला. मग मेहरा गेले धर्मेंद्रकडं. पण त्याचंही काही जमलं नाही. त्यानंतर मेहरांना कुणी तरी अमिताभचं नाव सुचवलं. अमिताभ तोवर चित्रपटसृष्टीत तसा झगडतच होता. पण 'जंजीर'च्या रूपानं अमिताभला पडद्यावरचा अँग्री यंग मॅन गवसला. समजा, जंजीर देव आनंदनं स्वीकारला असता तर?
हिंदी चित्रपटसृष्टीतला आत्तापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट मानल्या गेलेल्या 'शोले'बाबतही वेगळं काही घडलं नाही. रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले मोठा गाजावाजा करून १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झाला. सुरुवातीला सिनेमा समीक्षकांनी तर या सिनेमाला नाकारलंच. प्रचंड हिंसा असलेला हा चित्रपट आपल्याला फार काही देत नाही, असाच सगळ्यांचा सूर होता. रमेश सिप्पी आणि त्यांचे सहकारी कानात प्राण आणून सिनेमाबाबतच्या प्रतिक्रिया जाणण्यासाठी सज्ज होते. मात्र, एकही अनुकूल प्रतिसाद येईना. शोलेची लांबी (१५ ते २० मिनिटांच्या सेन्सॉर कटनंतरही) तीन तास दहा मिनिटं एवढी प्रचंड होती. प्रेक्षकांना सिनेमा आवडत होता की नव्हता, हेच कळत नव्हतं. पहिले दोन दिवस तसे नरमच गेले. असं म्हणतात, की तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी सिप्पींनी निर्णय घेतला, की पुन्हा बंगळूरला जाऊन रिशूट करायचं. शेवट बदलायचा. सिनेमाच्या शेवटी अमिताभ मरतो, हा शेवट प्रेक्षकांना मान्य नाही, अशी कुणकुण त्यांच्या कानावर आली होती म्हणे. (आधीच सेन्सॉरनं सिप्पींना मूळ चित्रित केलेला शेवट बदलायला लावला होता. ठाकूर गब्बरला क्रूरपणे मारतो, हा शेवट तेव्हाच्या सेन्सॉर बोर्डाला मान्य नव्हता. त्यामुळं तो बदलून शेवटी पोलिस घटनास्थळी येतात, असं दाखवण्यात आलं. असो.) 
त्यामुळे पुन्हा एकदा 'शोले'चा शेवट बदलणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण त्या वेळी कुणी तरी त्यांना आणखी एकच आठवडा थांबून प्रतिसाद पाहण्याचा सल्ला दिला. सिप्पीनं ऐकलं. पुढच्याच आठवड्यात केवळ माउथ पब्लिसिटीवर शोले उचलला गेला. मुंबईत 'मिनर्व्हा'त तुफान गर्दी लोटली. सिनेमातल्या प्रत्येक दृश्याची, संवादाची, गाण्यांची आणि गब्बरची चर्चा नाक्या-नाक्यावर होऊ लागली. तिकिटं ब्लॅकमध्ये खपू लागली आणि शोले नावाचा इतिहास जन्माला आला. समजा, सिप्पींनी एक आठवडा थांबण्याचा निर्णय घेतला नसता तर? कदाचित वेगळीच कलाटणी मिळाली असती. 
आमीर खान आणि आशुतोष गोवारीकर या दोघांच्याही करिअरला महत्त्वपूर्ण कलाटणी देणाऱ्या लगान या चित्रपटाचा किस्साही असाच आहे. आशुतोषकडं 'लगान'ची गोष्ट कित्येक वर्षं तयार होती म्हणे. पण ही गोष्ट प्रत्यक्ष पडद्यावर येणं अशक्य आहे, अशी मनाची तयारी त्यानं करून ठेवली होती. कारण तोपर्यंत आशुतोष फार काही यशस्वी दिग्दर्शक म्हणून गणला जात नव्हता. तो आधी ही गोष्ट घेऊन शाहरुख खानकडं गेला होता. मात्र, शाहरुखला गोष्ट आवडली नाही आणि त्यानं आशुतोषला आमीरकडं पाठवलं. आमीरला गोष्ट आवडली पण एवढं महाकाय बजेट असलेला चित्रपट करायला निर्माताच मिळेना. कारण ही गोष्ट कितपत चालेल, लोकांना रुचेल याचा आधी काहीच अंदाज कुणाला येत नव्हता. फक्त आशुतोष ठाम होता. 
अखेर त्याचा निर्धार पाहून आमीरनं स्वतः या चित्रपटाचा निर्माता होण्याची तयारी दाखवली आणि मग पुढं घडलेला इतिहास आपल्याला माहिती आहे. लगान भारतात तुफान यशस्वी तर झालाच; पण त्यानं ऑस्करमध्येही परदेशी चित्रपटांच्या गटात अंतिम पाचांत स्थान मिळवलं होतं. लगाननं आमीरच्या करिअरला एक निर्णायक वळण दिलं. या चित्रपटानंतर आमीर अगदी निवडक आणि महत्त्वाचेच सिनेमे करू लागला. आशुतोषलाही या चित्रपटानं अव्वल दिग्दर्शकांच्या रांगेत नेऊन बसवलं. आमीरनं आशुतोषच्या पटकथेवर विश्वास दाखवला नसता तर?
मराठी चित्रपटसृष्टीचा विचार करतानाही अशी काही कलाटणी मिळून बदललेल्या कारकिर्दी आपल्याला पाहायला मिळतात. राजा गोसावी हे याचं एक ठळक उदाहरण म्हणता येईल. ते ज्या 'लाखाची गोष्ट' या चित्रपटाचे नायक होते, त्याच चित्रपटाची तिकिटे त्यांनी पुण्यात भानुविलास टॉकीजमध्ये बसून विकली होती. मला वाटतं, हा एक जागतिक विक्रम असावा आणि तो कुणी आता मोडेल असंही वाटत नाही. आणि हो, त्यांनी काही स्वतःच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी वगैरे हा फंडा वापरला नव्हता, तर ते खरंच तिथं नोकरी करीत होते. राजा गोसावी यांना नाटका-सिनेमाचं पराकोटीचं वेड होतं. या वेडापायी त्यांनी चौथ्या इयत्तेपर्यंत कसंबसं शिक्षण पूर्ण केलं आणि मग ते लगेच मुंबईला धावले. मा. विनायकांकडं त्यांनी ऑफिसबॉय म्हणून काम ­­­करायला सुरुवात केली.
नंतर सुतारकाम, पुढं मेक-अप, प्रकाश योजना आदी खात्यांत काम करीत करीत ते 'एक्स्ट्रा' नट झाले. त्यांची धडपड पाहून त्यांना सिनेमात कामं मिळू लागली आणि राजा परांजपेंनी तर त्यांना 'लाखाची गोष्ट'मध्ये नायक म्हणून काम दिलं. हा सिनेमा जोरदार चालला. मग आपल्याच सिनेमाची तिकिटं विकणाऱ्या या मनस्वी कलाकाराला नंतर कधी मागं वळून पाहावं लागलं नाही. एका अर्थानं त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात 'लाखाची गोष्ट' आणणारी ही मोठी कलाटणीच ठरली. 
मराठी चित्रपटसृष्टीच्या बाबतीत एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी कलाटणी देणारी एक गोष्ट घडली ती श्वास या सिनेमाच्या निमित्तानं. श्वास सिनेमाचं यश एवढं महत्त्वाचं मानलं गेलं, की मराठीत श्वासपूर्व आणि श्वासोत्तर अशा सिनेमाच्या पिढ्या मानल्या जाऊ लागल्या. नव्वदच्या दशकात आलेल्या सुमार विनोदी सिनेमांच्या लाटेनंतर मराठी चित्रपट अत्यंत मरगळलेल्या स्थितीत होता. स्मिता तळवलकर, सुमित्रा भावे किंवा अमोल पालेकर असे काही अपवाद वगळले, तर चांगले सिनेमे तयार होत नव्हते. वर्षाला तयार होणाऱ्या सिनेमांची संख्या १०-१२ पर्यंत खाली आली होती. 'उरला अनुदानापुरता' अशी एकूण मराठी सिनेमाची भीषण अवस्था होती. अशा वेळी संदीप सावंत दिग्दर्शित श्वास या सिनेमानं जणू या मृतवत इंडस्ट्रीत पंचप्राणांचा श्वास फुंकला. मराठी सिनेमाला संजीवनी मिळाली. पुढं अनेक दर्जेदार सिनेमे निघाले. अनेक तरुण मुलं सिनेमा निर्मितीत, दिग्दर्शनात उतरली... आज मराठी सिनेमांच्या निर्मितीची संख्या वर्षाला शंभरच्या वर गेली आहे. 
अशा या काही आपल्या सिनेमा जगतातल्या कलाटणी देणाऱ्या महत्त्वाच्या घटना. आणखीही अनेक आहेत, असू शकतील. त्याबद्दल पुन्हा केव्हा तरी...
 
 
-----------------------------------------------
(पूर्वप्रसिद्धी : चिंतन आदेश दिवाळी अंक २०१५ - कलाटणी विशेषांक)
----

2 Dec 2015

माझे 'पत्र-मित्र'


वृत्तपत्रांतील वाचकांच्या पत्रव्यवहाराचं मला कळत्या वयापासूनच आकर्षण होतं. अगदी पुढं आयुष्यात मी पत्रकारच होईन आणि माझं रोजचं आयुष्य वृत्तपत्राशीच जोडलं जाईल, याची मला अजिबात कल्पना नव्हती, तेव्हापासून हे आकर्षण होतं. वाचकांच्या पत्रव्यवहारातील अनेक नावं वाचून वाचून माहिती झाली होती. मी वृत्तपत्रं वाचायला सुरुवात केली ती वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षापासून. तो काळ होता १९८१-८२ चा. तेव्हा वाचलेल्या काही बातम्या, उदा. आशियाई क्रीडा स्पर्धा किंवा अजहरुद्दीन नावाच्या नव्या खेळाडूचं रणजी स्पर्धेतील शतक वगैरे मला आजही आठवतात. क्रिकेट हा आवडता खेळ असल्यानं क्रिकेटपटूंचे फोटो कापून ठेवायचा छंदही होता. या काळात प्रामुख्यानं सकाळ, तरुण भारत किंवा केसरी ही वृत्तपत्रं आमच्या गावी (जामखेडला) जास्त वाचली जात. लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स किंवा नवा काळ ही मुंबईची वृत्तपत्रं ग्रंथालयात क्वचित पाहायला मिळायची. पुढं मी नगरला राहायला गेलो आणि तेव्हा नगरमध्ये स्वतंत्र आवृत्ती सुरू झालेला 'नगर केसरी' हा पेपर आम्ही घरी घ्यायला सुरुवात केली. अगदी सहाच पानांचा हा पेपर असायचा आणि त्याची किंमत पन्नास की साठ पैसे एवढीच होती. मात्र, तो भल्या पहाटे म्हणजे सहा वाजताच घरी यायचा. जामखेडमध्ये आम्हाला एवढ्या सकाळी पेपर घरी येण्याची सवय नव्हती. आपण शहरात आलो, याची ती पहिली सुखद जाणीव होती, असं म्हणायला हरकत नाही. तर या 'केसरी'मध्ये मी सर्वांत पहिल्यांदा एक पत्र पाठवलं. अजहरुद्दीनच्या संदर्भातच होतं, एवढंच आता आठवतंय. त्यानंतर 'सकाळ'मध्येही मी काही पत्रं पाठवली. मात्र, 'सकाळ'मध्ये एकदाही माझं पत्र छापून आलं नाही. (पुढं पत्रच काय, माझे अनेक लेख, बातम्या, परीक्षणं 'सकाळ'मध्ये छापून यायची होती, हे तेव्हा माहिती नव्हतं.) पुढं नगरला 'लोकसत्ता' सुरू झाला आणि आम्ही हा पेपर घरी लावला. मग मी 'लोकसत्ता'तही पत्रं पाठवू लागलो. तिथंही एक-दोन पत्रं प्रसिद्ध झाली. तोपर्यंत अनेक पत्रलेखकांची नावं पाठ झाली होती. उदा. रा. चिं. दाते (राजगुरुनगर), वसंत देवधर (बार्शी), धोंडीरामसिंह राजपूत (वैजापूर), अशोक कोर्टीकर (पंढरपूर), अशोक आफळे (कोल्हापूर), सुधाकर डोईफोडे (नांदेड), डॉ. प्रकाश कवळी (दादर) आदी लोक नियमितपणे विविध वृत्तपत्रांना पत्रं पाठवीत असत. त्यातली ही फक्त काही वानगीदाखल, सहज आठवलेली नावं. (चु. भू. दे. घे.) 
पुढं मी १९९७ मध्ये 'सकाळ'मध्ये रुजू झालो आणि वाचकांच्या पत्रव्यवहाराचं विराट स्वरूप माझ्या लक्षात आलं. आम्ही जर्नालिझममध्ये शिकलो, त्याप्रमाणं किमान असिस्टंट एडिटर (सहसंपादक) दर्जाची व्यक्ती वाचकांचा पत्रव्यवहार हाताळत असे. त्यावरून या गोष्टीला वृत्तपत्रांत किती महत्त्व दिलं जातं, हे लक्षात आलं. 'सकाळ'मध्ये काम करीत होतो, तोपर्यंत वाचकांच्या पत्रव्यवहाराचं काम मला प्रत्यक्ष कधीच पाहायला मिळालं नाही. कारण तिथं संपादकीय पानाची एक वेगळी टीम होती आणि त्यात सर्व सीनियर सहकारी असत. मात्र, मुक्तपीठ पुरवणीच्या निमित्तानं मी आणि माझा सहकारी अभिजित पेंढारकरनं एकूण वाचकांचे लेख आणि त्यांचा प्रतिसाद हा काय प्रकार असतो, हे जवळजवळ दोन-तीन वर्षं नीटच अनुभवलं. आमच्या आधी दीनदयाळ वैद्य या पुरवणीचं काम पाहत असे. त्यानं 'मुक्तपीठ'ची नीट घडी बसवली होती आणि सदरंही सुरळीत सुरू होती. मात्र, त्याच्यानंतर आम्हाला या पुरवणीचं काम पाहायला सांगण्यात आलं तेव्हा वाचकांच्या प्रतिसादाची नेमकी कल्पना आली. आम्हाला आमचं ऑफिसमधलं नियमित उपसंपादकी काम सांभाळूनच हे काम पाहायचं होतं. एक आठवडा मी आणि एक आठवडा अभिजितनं हे काम पाहावं, असं ठरलं. दीनदयाळनं शिस्तीत सर्व सदरांच्या फायली करून ठेवल्या होत्या. मात्र, या फायली आता अक्षरशः ओसंडून वाहत होत्या. 'मुक्तपीठ'सारखं व्यासपीठ मिळाल्यानं पुणेकरांच्या प्रतिभेला विलक्षण पान्हा फुटला होता. ही प्रतिभा आमच्याकडच्या फायलींमधून ओसंडून वाहत होती. 'लिहिणाऱ्यांचे हात हजारो, दुबळी माझी पुरवणी...' असं म्हणायची बारी आली होती. तरीही आम्हाला हे काम करण्यात आनंद होत होता. या पुरवणीनं अनेक लोकांना लिहितं केलं. अनेकांमधली उपजत साहित्य प्रतिभा उफाळून आणली. त्यामुळं आम्हालाही अनेकांच्या आयुष्यातले चित्तथरारक प्रसंग समजले. जगाची भटकंती करणारे हौशी लोक अन् त्यांचे तेथील नानाविध अनुभव कळले. प्रवासाचे नमुनेदार किस्से वाचून हसलो. डोळ्यांत पाणी आणणारे, भावनाशील व्हायला लावणारेही काही लेखन असायचे. या सर्वांच्या वाचनातून माणूस म्हणून मी जास्त घडत गेलो, असं आता वाटतं. आयुष्य किती गुंतागुंतीचं आहे किंवा त्यात केवढ्या शक्यता दडलेल्या आहेत, याचा उलगडा स्तंभित करायला लावणारा होता. नाना प्रकारच्या व्यक्ती, त्यांचे स्वभाव, नातेसंबंध, त्यातले ताण, माणसांचे निरनिराळे पैलू, जगण्यातलं अफाट वैविध्य हे सारं पाहून जगण्याच्या या विशाल रहाटगाडग्याकडं पाहण्याचा एक उदार दृष्टिकोन आपोआप तयार झाला. 
'मुक्तपीठ'मध्ये आलेले दोन अनुभव विशेष लक्षात राहिले. एक लेख होता 'चक्रव्यूह' नावाचा. पिंपरी-चिंचवड परिसरात राहणाऱ्या एका मध्यमवयीन गृहस्थांनी तो लिहिला होता. आर्थिक ताणामुळं आयुष्यात निर्माण झालेल्या चक्रव्यूहाचं वर्णन त्यात त्यांनी केलं होतं. या लेखावर खूप मोठ्या प्रमाणावर वाचकांचा प्रतिसाद आला. त्यांना मदत करायची तयारी अनेकांनी दाखवली. काही उद्योजकांनी त्यांना नोकरी देऊ केली. काहींनी हे लिहिणारे गृहस्थ कसे पैसे बुडवण्यात पटाईत आहेत, हेही सुनावलं. एकूणच असे उलट-सुलट अनुभव लक्षात घेता, आम्ही त्या गृहस्थांना ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. त्यांच्या पत्नीसह ते आले. आमच्या वरिष्ठांकडं त्यांना घेऊन गेलो. वरकरणी तरी हा माणूस सभ्य व खरा वाटत होता. त्यामुळं त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचं ठरवलं. या लेखाला आलेल्या प्रतिसादामुळं त्यांचं जगणंच बदलून गेलं होतं आणि त्यांना आता जगण्याची पुष्कळ उमेद वाटू लागली होती. खरं तर आम्ही असे लेख प्रसिद्ध केले, तेव्हा त्या लिहिणाऱ्या माणसानं केलेलं प्रतिपादन सत्य आहे की नाही, हे ताडून पाहण्याची कोणतीच यंत्रणा आमच्याकडं नव्हती. लोक खरं लिहितील, या गृहितकावर, विश्वासावर हे सगळं चाललं होतं. सुदैवानं आम्हाला फार वाईट अनुभव आले नाहीत. शिवाय आपल्याला नैसर्गिकरीत्याच एक सेन्स असतो. कोण खरा, कोण लफंगा हे अनुभवी नजरेतून सहज कळू शकतं. त्यातून आम्हाला तर आमच्या व्यवसायामुळं रोज अनेक लोकांना भेटण्याचा अनुभव आणि प्रत्येकाचे वेगळे किस्से. त्यामुळं फार अडचण आली नाही. या उपरोक्त लेखाबाबतही आमची धारणा सकारात्मकच होती आणि त्या गृहस्थांना मदत झाल्याचं समाधान वाटलं.
दुसरा अनुभव तर फारच भन्नाट होता. तळेगाव दाभाडे येथील शिरीष जोशी यांचा 'कोण म्हणतं बेरोजगारी आहे?' या शीर्षकाचा एक लेख छापून आला. जोशीबुवा स्वतः खाद्यपदार्थांची फिरती गाडी घेऊन या पदार्थांची विक्री करीत. ते रोज सकाळी तळेगावातून औंध परिसरात येत आणि तिथून हिंजवडी आयटी पार्क आणि लगतच्या परिसरात हे पदार्थ विकत असत. आयटी कंपन्यांतील मराठी मुलांना पोळी-भात, भाजी असं साधं जेवण पुरवणारे डबे हवे आहेत आणि तिथं प्रचंड मागणी असूनही पुरवठा त्या मानानं कमी आहे, असं त्यांचं निरीक्षण होतं. तेव्हा ज्यांची कष्ट करायची तयारी आहे, त्यांनी ही पुरवठ्याची जबाबदारी घ्यावी आणि बऱ्यापैकी पैसे कमवावेत, असं आवाहन त्यांनी त्या लेखात केलं होतं. हा लेख प्रसिद्ध झाला आणि त्यावर प्रतिक्रियांची एवढी धो-धो बरसात सुरू झाली, की आम्ही थक्क झालो. रोजगार आणि रोजगारनिर्मिती हा आपल्या समाजातला केवढा ज्वलंत प्रश्न आहे, याची त्या निमित्तानं जाणीव झाली. अनेक बेरोजगार तरुणांना जोशींना भेटायचं होतं. त्यांच्याशी संवाद साधायचा होता. आम्ही पुढच्या आठवड्यात या प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या. जोशींच्या फोनला तर विश्रांतीच नव्हती. पुढच्या आठवड्यात त्यांनी हा भारावून टाकणारा अनुभव पुन्हा शब्दबद्ध केला. त्यानंतरही हा ओघ थांबेना. शेवटी जोशींनी आमच्या वरिष्ठांना विनंती केली आणि या सगळ्या लोकांसाठी एखादा मेळावा भरवता येईल का, अशी विचारणा केली. त्यानंतर प्रत्यक्षात असा एक मेळावा झालादेखील. त्यातून काही जणांनी तरी निश्चित रोजगारनिर्मितीच्या दिशेनं पाऊल टाकलं. एका लेखाचा हा क्रांतिकारक परिणाम होता. आपल्या कामाचं समाधान मिळणारे जे काही मोजके क्षण असतात त्यातलाच हा एक क्षण होता. 
असं असलं, तरी संपादकीय पानावरील वाचकांच्या पत्रव्यवहाराचं संपादन करण्याचं माझं स्वप्न हे स्वप्नच राहिलं होतं. पुढं मी २०१० मध्ये 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये रुजू झाल्यानंतर मात्र अचानक माझं हे स्वप्न पूर्ण झालं. इथं पहिल्या दिवसापासून मला 'बहुतांची अंतरे' हे 'मटा'तलं वाचकांच्या पत्रव्यवहाराचं सदर हाताळता आलं. 'मटा'ला पुण्यात पहिल्या दिवसापासूनच उदंड प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला मूळ मुंबईतले किंवा कोकणातले किंवा नोकरीच्या कारणाने अनेक वर्षे मुंबईत राहिलेले असे लोक मटा प्राधान्यानं घेऊ लागले. त्याचबरोबर नवा पर्याय हवा असणारे अनेक पुणेकरही मटा घेऊ लागले. हे सर्व वाचक मटाला भरभरून पत्रं पाठवून प्रतिसाद देऊ लागले. 'महाराष्ट्र टाइम्स'मधील पत्रव्यवहाराला एक गंभीर चर्चेचं स्वरूप सुरुवातीपासून होतं. अनेक विषयांवर चर्चा इथं झडल्या. अगदी आत्म्याच्या अस्तित्वापासून ते बुद्धिप्रामाण्यवादापर्यंत आणि संघाच्या विचारधारेपासून ते कम्युनिस्टांच्या पोथिनिष्ठतेपर्यंत अनेक विषयांवर वाद-विवादाच्या फैरी झडल्या. अनेकदा बहुतांची अंतरे या सदरातील लहान जागा पुरत नसे. त्यामुळं मी संपादकीय पानासमोरच्या पानावर (ज्याला 'ऑप-एड' म्हणतात) 'मतमतांतरे' नावाचं सदर सुरू केलं. यात सविस्तर पत्र छापता येत असे. वाचकांच्या लक्षात हे आल्यानंतर खास 'मतमतांतरे'साठी पत्रं यायला सुरुवात झाली. गेल्या पाच वर्षांत यातील अनेक लेखकांची व माझी प्रत्यक्ष भेट नसली, तरी त्यांच्या लिखाणातून एक नातं तयार झालं आहे. जवळपास रोज नेमानं एक पत्र पाठवणारे दिलीप कुलकर्णी, बँकेत काम करणारे व आता सेवानिवृत्त झालेले सुरेश परांजपे, चिंचवडचे जीवनधर जबडे, प्रा. य. ना. वालावलकर, अनिल अगावणे, प्रभा वझे, वासंती सिधये, स्वाती देशपांडे, गजानन कुलकर्णी, बाळासाहेब कुंभार, गंगाराम ताटी, काशिनाथ देवस्थळी, विजय वामन आगाशे, धनंजय अवसरीकर, सुबोध पारगावकर, कुमार करकरे, शुभा देव, प्रतिभा मुळ्ये, शरद कौलगेकर, श्री. रा. पुरंदरे, अरविंद करंदीकर, अनिल तोरणे, म. वि. अकोलकर, सुहास मुंगळे मास्तर, पंडित हिंगे, विजय प्रभू, मनोहर जोशी, अभिनंदन कासार, राजन भोसले असे अनेक पत्रलेखक आता त्यांच्या पत्रांद्वारे परिचयाचे झाले आहेत. कोण कुठल्या विषयावर पत्र पाठवील, याचाही अंदाज असतो. धनकवडीचे अश्विनकुमार जोशी फक्त क्रीडा विषयावरच पत्र पाठवतात. आकाशवाणीचे सिद्धार्थ बेंद्रेही नियमितपणे पत्रं पाठवतात. त्यांचे विषय सहसा क्रिकेट व सिनेमा हेच असतात. काही जणांचं पत्र आलं नाही तर चुकल्याचुकल्यासारखं होतं. यातले काही जण प्रत्यक्ष ऑफिसमध्ये येऊनही भेटतात. प्रतिभा मुळ्ये यांच्याशी माझी 'सकाळ'मध्ये असताना मुक्तपीठच्या निमित्तानं ओळख झाली होती. मी 'मटा'त आल्यानंतरही त्यांनी ती कायम ठेवली आणि त्या नियमितपणे पत्रं पाठवू लागल्या. एवढंच नव्हे, तर आमच्या मटा हेल्पलाइन या उपक्रमातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. एका वर्षी त्यांनी सर्व मानकरी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी फराळाला बोलावलं. मलाही त्यांनी निमंत्रित केलं. त्यांचे अनेक पाहुणे या मुलांना भेटायला खास तिथं आले होते. तो सोहळा अगदीच भावपूर्ण झाला होता. असेच माझे आणखी एक सीनियर मित्र म्हणजे मधुसूदन ढेकणे! ढेकणे काकांचा व माझा परिचय मी 'सकाळ'मध्ये अगदी ट्रेनी असताना झाला. तेव्हापासून आजपर्यंत तो स्नेह टिकून आहे. ढेकणेकाका तेव्हा कसबा पेठेत राहत असत. काही कारणाने मी त्यांना भेटायला गेलो होतो. अनेक चांगल्या गुणवंत लोकांना प्रसिद्धी मिळावी यासाठी काका निरपेक्षपणे धडपडत असतात. ते स्वतः दोन्ही पायांनी अपंग आहेत. सध्या ते निवारा वृद्धाश्रमात असतात. मात्र, तेथूनही त्यांच्या पत्रांचा ओघ सुरूच आहे. प्रत्येकाला फोन करून त्या विषयाचा मागोवा घेत राहणं हा त्यांचा छंद आहे. काका हक्कानं आम्हा सर्वांना फोन करून प्रत्येक पत्राचा फॉलोअप घेत असतात. त्यांच्या निरपेक्ष भावनेमुळं त्यांना नाही म्हणणं किंवा दुखावणं खूप जड जातं. 
अर्थात चांगल्यासोबत काही वाईट अनुभवही येतात. एक पत्रलेखक दर वेळी त्यांच्या पत्रात आमच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करणारी काही वाक्यं हमखास लिहून पाठवतात. कधी कधी ती भाषा सभ्यतेची पातळीही ओलांडते, तेव्हा वाईट वाटतं. आधी रागही यायचा, पण नंतर मी त्याकडं सहिष्णू वृत्तीनं पाहायला शिकलो. त्यामुळंच त्यांची चांगल्या विषयावरची पत्रं मी प्रसिद्ध करतोच. काही जण आम्हाला मूर्ख समजतात. त्यामुळं ते वेगवेगळ्या खोट्या नावांनी पत्रं लिहून पाठवतात. अर्थात अशी दोन-तीन पत्रं एकाच वेळी हाती पडल्यानं त्यांचं बिंग फुटतं आणि ते कायमचे ब्लॅक लिस्टमध्ये जातात. पण हे त्यांना कळत नाही. असो. काही पत्रांमध्ये विनाकारण एखाद्या समाजाची, व्यक्तीची किंवा समूहाची बदनामी केलेली असते. अशी पत्रांना मग केराची टोपली दाखवावी लागते. काही जणांची अपेक्षा असते, की त्यांनी पाठवलेलं प्रत्येक पत्र प्रसिद्ध व्हावं. काही जण प्रत्येक पत्र पाठवलं, की फोन करून विचारतात. असं हे सगळं सुरू असतं रोज. एकूण हा एक थँकलेस जॉब आहे, यात शंका नाही. माझ्या मागे मी किती जणांच्या शिव्या-शापांचा धनी होत असेन, याची मला पूर्ण कल्पना आहे. माझ्याविषयी खोटे-नाटे समज-गैरसमजही पसरवले जातात, हेही ठाऊक आहे. पण मी हे सगळं व्यवसायातील उपद्रवता (ऑक्युपेशनल हॅझार्ड) म्हणून घेतो आणि गप्प बसतो. कारण मला मूलतः माणसांमध्ये रस आहे... आणि जगात वाईटापेक्षा चांगल्याचं पारडं कायमच जड असेल, याची खात्रीही आहे! त्यामुळंच मी माझं हे काम अत्यंत रुची घेऊन, आनंदानं करतो. यातून मला मिळालेले अनेक 'पत्र-मित्र' ही आता माझी आयुष्यभराची ठेव झाली आहे.
---
(पूर्वप्रसिद्धी : चपराक, दिवाळी २०१५)
----

29 Nov 2015

हे ‘संस्कार’ बोर्ड बुडवा!

हे ‘संस्कार’ बोर्ड बुडवा! 
----------------------------

 जेम्स बाँड (00७) हा जगातला सर्वाधिक बुद्धिमान, ताकदीचा आणि चलाख असा माणूस असावा, असा एक आपला माझा समज होता. मात्र, साक्षात जेम्सच्या ‘तोंडचा’ मोनिका बेलुची नामक मदनिकेच्या चुंबनरूपातला घास हा हा म्हणता पळविणारा पहलाज निहलानी (१०१) हाच जगातला सर्वांत बुद्धिमान, ताकदीचा, चलाख आणि वर अत्यंत संस्कारी असा महापुरुष आहे, हे आता मला आणि या देशातल्या सगळ्या सिनेमाप्रेमींना मान्यच करावे लागेल. पहलाज निहलानींच्या पुढ्यात लिहिलेला ‘१०१’ हा क्रमांक म्हणजे अग्निशामक दलाचा क्रमांक आहे, हे आपल्याला ठाऊक आहेच; पण निहलानींनी सध्या पडद्यावर लागलेल्या कथित अश्लीलतारूपी आगीचे तांडव विझविण्यासाठी सेन्सॉर संस्कारांचा जो फवारा सध्या सुरू केलाय, तो पाहता हा क्रमांक त्यांच्या पुढ्यात कायमचा विराजमान करायला हरकत नाही. त्यामुळे आता यापुढे पडद्यावर चुंबनदृश्य आले, की ते अमुक एवढे सेकंद चालले तरच ‘संस्कारक्षम’ ठरेल. त्यापेक्षा जास्त चालले, तर ते पाहणारे प्रेक्षक बिथरून कदाचित आजूबाजूला त्या प्रयोगाची अंमलबजावणी करतील, अशी भीती सेन्सॉर बोर्डाला वाटते आहे की काय! अन्यथा दहा सेकंदांचे चुंबन योग्य आणि चाळीस सेकंदांचे म्हणजे संस्कृती बुडाली, हे कसे काय ठरले? नपेक्षा यापुढील काळात भारतात प्रदर्शित होणाऱ्या बाँडपटात जेम्स आणि त्याची मदनिका यांचे ओठ एकमेकांजवळ आले रे आले, की सरळ दोन सूर्यफुलं एकमेकांवर आपटून किंवा पोपट-पोपटीण किंवा कबुतर-मैना चोचीत चोच घालताना दाखवून काय ते सूचित करावं म्हणजे झालं! अरे, काय चाललंय काय!
सेन्सॉर बोर्डाचे नक्की काम काय आहे? आजच्या काळात त्याची उपयुक्तता खरोखर राहिली आहे काय? विशेषतः सोशल मीडियाच्या आजच्या जमान्यात वेगवेगळ्या प्रकारची माहिती आणि कित्येक प्रकारच्या चित्रफिती सहजी उपलब्ध असताना सेन्सॉर बोर्ड कशाकशाला कात्री लावणार आहे? माहितीचा विस्फोट होत असताना आणि सामाजिक स्तरावर आपण प्रचंड व्यक्तिस्वातंत्र्यवादी होत चाललो असताना सेन्सॉर बोर्ड बरोब्बर दुसऱ्या दिशेला का निघाले आहे? सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे कोणाच्या इशाऱ्यावरून सेन्सॉर बोर्डाचे हे संस्कार वर्ग सुरू आहेत? सध्या असे अनेक प्रश्न आणि प्रश्न अनेकांना पडले आहेत.
आपल्या विशालकाय आणि वैविध्यानं भरलेल्या देशात अनेक रूढी-परंपरा, चाली-रीती, प्रथा अस्तित्वात आहेत. नकळत त्यांना धक्का लागू नये आणि देशाच्या सामाजिक ऐक्याला तडे बसू नयेत याची काळजी घेतली जाते. देशाचे सार्वभौमत्व आणि देशासाठी महत्त्वाची प्रतीकं असलेल्या गोष्टींना धक्का बसू नये हेही पाहावं लागतं. हे सगळं मान्य. त्यातूनच सेन्सॉर बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांची मांडणी झाली. गेल्या ६४ वर्षांपासून या नियमावलीचा आधार घेऊन आपल्याकडे सिनेमे प्रदर्शित केले जात आहेत. एकूण चार गटांत सिनेमाची वर्गवारी केली जाते. म्हणजेच चार प्रकारची प्रमाणपत्रे दिली जातात. यातील ‘यू’ (युनिव्हर्सल) म्हणजे सर्व प्रकारच्या प्रेक्षकांसाठी, ‘ए’ (अॅडल्ट) म्हणजे केवळ प्रौढांसाठी, ‘यूए’ म्हणजे मोठ्यांच्या मार्गदर्शनाखालीच मुलांनी पाहायचे आणि ‘एस’ म्हणजे काही विशिष्ट व्यक्ती किंवा समुदायासाठीच मान्य असलेले!
सेन्सॉर बोर्डाचे सदस्य संबंधित सिनेमा पाहतात आणि त्याला कुठले प्रमाणपत्र दिले जाऊ शकते, हे ठरवतात. त्यासाठी त्यांनी मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेणे गरजेचे आहे. वादाचा मुद्दा असा आहे, की यातील अनेक मार्गदर्शक तत्त्वे अत्यंत ढोबळ स्वरूपात लिहिलेली आहेत. त्यामुळे त्याचा अन्वयार्थ लावणे ही गोष्ट अगदीच व्यक्तिसापेक्ष होऊन जाते. उदा. ‘चित्रपटात लैंगिक दृश्ये दाखवूच नयेत; पण कथाभागात अनिवार्य म्हणून दाखवायचेच असतील, तर कमीत कमी असावीत आणि कुठलेही तपशील दाखवू नयेत,’ अशी एक मार्गदर्शक सूचना आहे. आता कमीत कमी म्हणजे किती आणि तपशील दाखवू नयेत म्हणजे कुठले दाखवू नयेत, हे कोण कसं ठरवणार? थोडक्यात, तेव्हा बोर्डावर संबंधित सिनेमा पाहणारे जे सदस्य असतील, ते त्यांच्या आकलनानुसार, त्यांच्यावरील ‘संस्कारां’नुसार हे ठरवणार. थोडक्यात, एका राजवटीत ‘पुरोगामी’ सदस्यांना सुंदर दिसलेले प्रणयदृश्य पुढच्या राजवटीतील ‘संस्कारी’ सदस्यांना भयंकर अश्लील वाटणार!
सेन्सॉर बोर्डाच्या दुटप्पीपणाची उदाहरणे तरी किती द्यावीत! जेम्स बॉँडच्या सिनेमातले चुंबनदृश्य खटकणाऱ्या संस्कार बोर्डाला ‘डबलसीट’ या मराठी सिनेमात धाडकन अन् अगदी अनपेक्षितपणे येणारे अंकुश-मुक्ता बर्वेचे चुंबनदृश्य कसे खटकले नाही? खरं तर बाँडपट पाहायला जाणारा प्रेक्षक आणि ‘डबलसीट’ सारखा मराठी चित्रपट पाहायला येणारा प्रेक्षक यात काही फरक आहे, हे तरी सेन्सॉर बोर्डाने मान्य करावे. ‘फक्त प्रौढांसाठी’ असे सर्टिफिकेट असलेले इंग्लिश सिनेमे पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांना त्यात कसली दृश्यं असणार हे नीटच माहिती असतं. मात्र, ‘डबलसीट’सारख्या (‘यू’ सर्टिफिकेट होतं त्याला!) मराठी सिनेमाला लहान मुले घेऊन आलेली कित्येक मंडळी अंकुश-मुक्ताच्या त्या मुक्त चुंबनदृश्यानंतर बसल्या जागी थिजली होती, हे मी स्वतः अनुभवलं आहे. याचा अर्थ तुमची कात्री जिथं चालायला हवी तिथं चालत नाही आणि बाँडचा कसला किस पाडताय? 
 शिवाय ही कात्री फक्त प्रणय किंवा चुंबनदृश्यांवरच चालायला हवी असं काही नाही. मर्डर-२ नावाच्या एका हिंस्र सिनेमात खलनायक एका तरुणीचा डोक्यात खिळा ठोकून खून करतो, हे दृश्य आणि त्यातले अगदी ओंगळवाणे, हिडीस तपशील पाहून (अगदी जागतिक सिनेमे पाहणारा) माझ्यासारखा माणूसही गरगरून गेला होता. त्या सिनेमाला फक्त प्रौढांसाठी असं प्रमाणपत्र असलं, तरी काय झालं?
बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्व क्र. २ (x) मध्ये, ‘महिलांविरुद्ध लैंगिक अत्याचाराचे उदा. बलात्काराचा प्रयत्न, बलात्कार किंवा अन्य कुठल्याही स्वरूपाचा अत्याचार किंवा तत्सम स्वरूपाचे कुठलेही दृश्य टाळण्यात यावे, कथेची गरज म्हणून ते आवश्यकच असल्यास ते अगदी कमीत कमी ठेवावे आणि तपशील दाखवू नयेत,’ असं स्पष्टपणे म्हटलं आहे. या तत्त्वाचा त्या ठिकाणी सरळ भंग झाला होता. याशिवाय ‘गज़नी’सारख्या सिनेमात नायक-नायिकेच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार आघात करून खलनायकाने त्यांना मारलं होतं, ते कुठले संस्कार होते? अलीकडेच ‘तितली’ नावाचा सिनेमा आला होता. तो मला पाहायचा होता; पण जाणकारांनी केलेलं त्यातल्या हिंसेचं टोकाचं वर्णन वाचूनच मला शहारा आला आणि मी तो अद्याप पाहण्याचं धैर्य करू शकलेलो नाही. ‘एनएच-१०’ या अनुष्का शर्माच्या सिनेमातही त्या जोडप्याला ज्या पद्धतीनं जंगलात मारलेलं दाखवलं आहे, हे कसं काय सेन्सॉर बोर्डाला चालतं? की या हिंसेच्या मार्गावरच त्यांची पुरेपूर श्रद्धा आहे?
 अगदी काल-परवा पाहिलेल्या ‘तमाशा’ या सिनेमातही काही संवादांच्या जागी ‘बीप बीप’ ऐकू आलं आणि हसूच आवरेना. एका विनोदी दृश्यात दीपिका रणबीरसमोर कॉलगर्ल असल्याचं नाटक करते आणि काही संवाद म्हणते. त्या प्रत्येक संवादाला ‘बीप’ वाजलं. नंतर रणबीर कपूरच्या काही संवादांना ‘बीप’ वाजलं. हे शब्द सेन्सॉर करायचे तर त्या दृश्यांमधील गंमतच निघून जाते, हे ‘संस्कार बोर्डा’ला कळत नाही काय! शिवाय यातून प्रेक्षकांवर कुसंस्कार घडणार असतील, तर ते दृश्यच काढून टाकायचे ना! आता ‘अपना हाथ (बीप बीप)...’ किंवा ‘दिन में सिस्टर और रात में (बीप बीप)...’ असं रणबीर म्हणाला, तेव्हा तो ‘बीप बीप’च्या जागी काय म्हणाला, ते सर्व प्रेक्षकांना कळलंच. मग ‘बीप’ला अर्थ काय उरला? तेव्हा हे असलं दुटप्पी वागणं सेन्सॉर बोर्डानं तातडीनं थांबवायला हवं.
सेन्सॉर बोर्डाच्या नियमांचा नव्यानं विचार करण्याची गरज आहे. वास्तविक बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समाजाच्या बदलत्या अभिरुचीशी सुसंगत निर्णय घेण्यासंबंधी एक वाक्य आहे. शिवाय कुठल्याही परिस्थितीत कलात्मक अभिव्यक्ती दबता कामा नये, याचीही काळजी घेण्याची सूचना आहे. पूर्वीच्या काळी कुणी तरी जाणत्या, शहाण्या माणसांनीच ही तत्त्वं तयार केली असणार. खरं तर स्वतःची थोडी बुद्धी, थोडं तारतम्य वापरून ती तत्त्वं पाळली तरी पुरेसं आहे. परंतु प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देऊन आपण आपल्या संस्थांच्या स्वायत्तपणाचा जो काही चुथडा करीत आहोत, तो केवळ अलौकिक आहे.
स्वतःचे राजकीय कार्यक्रम कुणी या चित्रपट माध्यमाचा किंवा त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या सेन्सॉरसारख्या संस्थेच्या माध्यमाचा वापर करून राबवीत असेल, तर त्यांना वेळीच रोखण्याची आवश्यकता आहे. अन्यथा संस्कार बोर्डाचे बकवास ‘बीप बीप’ ऐकत बसण्याशिवाय जाणत्या चित्ररसिकांच्या हाती दुसरं काहीच उरणार नाही.
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे; २९ नोव्हेंबर २०१५)
---

14 Nov 2015

चाळिशी नामक 'बुंदीचा लाडू'...

चाळिशी नामक 'बुंदीचा लाडू'...
------------------------------------




माणसाला विशी आणि मिशी बरोबरच येते म्हणतात. तशी सोळाव्या वर्षी लव फुटते. पण भरघोस मिशी विशीतच येऊ शकते. चाळिशीबरोबर काय येतं हे ठाऊक नाही. पूर्वी या वयात जो चष्मा लागायचा त्याला चाळिशी असंच म्हणत. हल्ली चार वर्षे वयाच्या मुलालाही चष्मा लागतो. त्यामुळं त्या चाळिशीचा या चाळिशीशी आता संबंध जोडणं योग्य नाही. माझ्यासाठी तरी ही चाळिशी म्हणजे एक नवी ट्वेंटी-२० आहे.
विशीत आपण जसे असतो, तसेच चाळिशीत असतो म्हणतात. विशीत उत्साहानं सळसळणारं यौवन शरीरातून उसळ्या मारत असतं. सगळं जग आपण पादाक्रांत करू शकतो, अशी भावना मनात असते. मन बंडखोर असतं. प्रस्थापित गोष्टी मान्य नसतात. नवं काही तरी करावंसं वाटत असतं. पंधरा ते पंचवीस या वयोगटाला विशीचा वयोगट म्हटलं पाहिजे. या वयोगटात आपण भलतेच स्वप्नाळू तरी असतो किंवा अतिशहाणे तरी असतो. शरीरातून तथाकथित अकलेचे कोंब नको तिथून फुटून बाहेर डोकावत असतात. पण तरी शारीरिकदृष्ट्या आपला हा सर्वोत्तम काळ असतो, असं म्हणायला हरकत नाही. आपण काहीही खाऊ शकतो, पिऊ शकतो, पचवू शकतो. कुठंही हिंडू शकतो, कुठंही राहू शकतो.... एकटं भटकू शकतो. कशाची भीती म्हणून वाटत नाही. पहिलेपणाचे अनेक अनुभव या काळात आपल्या गाठोड्यात जमा होत असतात. वयात येण्याच्या पहिल्या अनुभवापासून ते पहिल्या चुंबनापर्यंत (काहींच्या बाबतीत तर त्याहीपुढे) पहिलेपणाचं नवथर संचित साचत जातं या काळात. आपण आयुष्यात पुढं काय होणार, याचा थोडा फार अंदाज येतो. तरीही जगाच्या दृष्टीनं अजून आपण 'सेटल' झालेले नसल्यानं आपण 'लहान बाळं'च असतो. तरी आयुष्यातला हा सर्वांत धमाल काळ म्हणायला हरकत नाही. थोडक्यात आयुष्य हे माउंट एव्हरेस्ट असेल, तर हा काळ म्हणजे आपला बेस कॅम्प असतो, असं म्हणायला हरकत नाही. (क्रिकेटच्या भाषेत सांगायचं, तर या काळात आपण किमान रणजी सामने खेळू लागतो. 'कसोटी' अजून दूर असते!)
मग येते तिशी... म्हणजे माझ्यासाठी २५ ते ३५ हा वयोगट. आयुष्यात तुम्हाला सर्वार्थानं स्थिर करणारा, सेटल करणारा कालखंड. आपण कोण होणार आयुष्यात, हे याच काळात नक्की ठरतं. करिअर एक तर मार्गी लागतं किंवा त्याची वाट तरी लागते. पण काही तरी निश्चित होतं. करिअर मार्गी लागलं, असं वाटलं, की मग लग्न होतं. एकाचे दोन होतात. दोनाचे चार हात होतात. आपलं जगणं फक्त आपलं राहत नाही. तिथं आयुष्यभराचा जोडीदार साथीला येतो. मग सगळी सुखं-दुःखं दोघांची होतात. आपलं घरही याच काळात होतं. गावभर पाखरांमागं उंडारणारं लेकरू संध्याकाळच्याला गपचिप घरला येऊ लागतं. पोळी-भाजी, आमटी-भात खाऊन गप पडून राहतं. पण त्याला घराकडं चुंबकासारखी खेचणारी त्याची फॅमिली नावाची संस्था तिथं अस्तित्वात आलेली असते हे महत्त्वाचं. थोडक्यात, हा काळ उभारणीचा असतो. विशी म्हणजे घराचं जोतं असेल, तर तिशी म्हणजे भिंती आणि वरचा स्लॅब असते. त्यामुळं या काळात विश्रांती घ्यायला वाव नसतो. आपण अथकपणे पळत असतो. ऑफिसात किंवा व्यवसायात आता आपण थोडे सीनियर झालेलो असतो. त्यामुळं स्वाभाविकच आपल्याकडून अधिक जबाबदारीची अपेक्षा केली जाते. तिथली आव्हानं आणि स्वतःचं घर घेणं, स्वतःची फॅमिली सुरू करणं हे सगळे उभारणीचे प्रयोग याच काळात केले जातात. गिर्यारोहणाच्या भाषेत सांगायचं तर बेस कॅम्पनंतरचा हा मुक्काम असतो. अजून शिखर दूर असतं... पण निम्मा रस्ता आपण जवळपास पादाक्रांत केलेला असतो.
यानंतर येते ती चाळिशी. म्हणजे माझ्या लेखी ३५ ते ४५ हा टप्पा. प्रत्यक्ष वयाची ४० वर्षं पूर्ण होणं म्हणजे या टप्प्यातलाही निम्मा प्रवास संपणं. पण चाळिशी या गटात राहायला अजून पाच वर्षं नक्की हातात असणं. मी ट्वेंटी-२० चा मघाशी उल्लेख केला तो याच कारणासाठी. पूर्वीचं आयुष्यमान जमेस धरलं असतं, तर चाळिशी पूर्ण केलेला माणूस आयुष्याचा निम्मा टप्पा निश्चितच पार केलेला माणूस असं आपण म्हटलं असतं. पण सध्याचं वाढतं आयुष्यमान पाहता मी आणखी पाच वर्षं या टप्प्यात ग्रेस म्हणून देऊ शकतो. थोडक्यात, ४५ वयाचे होईपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्याचा निम्मा टप्पा संपला आहे, असं समजायचं कारण नाही. शिवाय आपण त्याकडं कसं पाहतो, यावरही हे अवलंबून आहेच. तर ही पाच वर्षं जमेची हातात आहेत, असं धरलं तर मात्र पुढचा काळ अक्षरशः टी-२० सारखाच खेळावं लागणार आहे, हे निश्चित.
तिशीतल्या आयुष्यानं आपल्याला सेटल केल्यानंतर पुन्हा एक थोडी आरामाची, निश्चिंततेची फेज येते आयुष्यात. तेव्हा असं वाटतं, की विशीमध्ये जे जगायला मिळालं नाही, ते आता जगू या. कारण तारुण्य कायम असतं आणि सेटल होण्यातले महत्त्वाचे टप्पेही पार झालेले असतात. मुलं असतील, तर तीही मोठी झालेली असतात. आपणही करिअरच्या अशा टप्प्यावर आलेले असतो, की तिथून फक्त पुढची शिखरं दिसत असतात. परतीचा मार्ग बंदच झालेला असतो. तेव्हा या काळात ट्वेंटी-२० सारखी तुफान फटकेबाजी करून आयुष्यात जे काही अल्टिमेट साध्य करायचंय त्या ध्येयाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करावा. यासाठी ही चाळिशी आणि पुढची पाच वर्षं महत्त्वाची. पंचेचाळिशीनंतर मात्र आपण निश्चितपणे उताराला लागतो, असं म्हणायला हरकत नाही. अर्थात त्यानंतरही तुम्ही कर्तृत्व गाजवू शकताच. बोमन इराणीचं उदाहरण आपल्यासमोर आहेच. इतरही अनेक उदाहरणं असतील.
आणखी एक सांगायचं तर चाळिशीची एक मजा काही वेगळीच आहे. या वयात विवाहबंधनाच्या गाठी पुन्हा पुन्हा घट्ट करण्याचेही प्रसंग येत असतात. पस्तिशीतल्या स्त्रीला एका मराठी चित्रपटात 'बर्फी' असं संबोधण्यात आलं होतं. (आणि ते किती चपखल आहे, हे सांगायला नकोच.) मग पुरुषांनीच काय घोडं मारलंय? पस्तिशीतल्या किंवा चाळिशीतल्या पुरुषाला बुंदीचा लाडू म्हणण्यात यावं. हा लाडू चांगला मुरलेला असतो आणि चवीला तर माशाल्लाह!
हल्लीचा काळ तर असा आहे, की लोक घरचे पदार्थ सोडून बाहेरच बर्फी आणि लाडू खात बसले आहेत की काय, असं वाटावं. चाळिशीतल्या 'प्रमुख आकर्षणां'मधलं हे एक आकर्षण आहे. (फक्त अशा वेळी आपल्या घरच्या बर्फीवरही बाहेरचे बोके ताव मारू शकतात एवढं लक्षात ठेवावं.) बाकी यातला गमतीचा भाग सोडला, तर जेंडर बायस न ठेवता सर्वांशीच मैत्री करण्याचे आणि ती करता करता बर्फीवरून किंवा लाडवावरून घसरून पडण्याचेही हे दिवस असतात. माणसाला असा घसरणीचा मोह होऊ नये, यासाठीच या वयोगटासाठी खास डायबेटिसची योजना झाली असावी. फार गोड खाल्लंत तर पुढं आयुष्यभर ते वर्ज्य करावं लागतं, एवढा सूचक संदेश इथं पुरे.
आता थोडं स्वतःविषयी. चाळिशी आली तरी अस्मादिकांना अद्याप 'चाळिशी' लागलेली नाही. ('टच वूड'! मेल्याची 'नजर' आणि 'दृष्टी' दोन्ही चांगली आहे आणि तशीच राहो!) 'कृतान्तकटकामलध्वजा दिसो लागली' असली, तरी त्यामुळं चेहऱ्यावर एक विनाकारण मॅच्युअर व्यक्ती वगैरे असल्याचा भाव आलेला आहे. साखरेची बाधा झाली असली, तरी अस्मादिक भयंकर शिस्तीचे वगैरे असल्यानं ती बाजू भक्कमपणे लढतील यात शंका नाही.
आता महत्त्वाचं... जगण्याचं प्रयोजन शोधण्याचा प्रयत्न गेलं दशकभर तरी सुरू आहे. शेवटी अशा निष्कर्षाप्रत आलो आहोत, की लेखणी हेच आपलं भागधेय आणि लेखन हेच आपल्या जगण्याचं प्रयोजन. आपल्या लेखणीतून सर्वांना निखळ आनंद मिळावा एवढीच इच्छा. अशाच इच्छेतून झालेल्या पहिल्या-वहिल्या लिखाणाचं पहिलं-वहिलं पुस्तक - कॉफीशॉप - लवकरच, म्हणजे येत्या २० डिसेंबरला पुण्यात प्रकाशित करतोय. जगण्याचा उत्सव साजरं करणारं हे लिखाण आहे, असं मला वाटतं. निराशा, दुःख, चिंता, द्वेष आदी गोष्टींना माझ्या व्यक्तिमत्त्वात थारा नाही. तसाच तो माझ्या लिखाणातही नाही. त्यामुळं ते वाचून कुणाला चार घटका निर्भेळ आनंद मिळाला असेल (आणि तो मिळतो असं सांगणारे सुदैवानं खूप जण भेटले...) तर आणखी काय हवं?
आता मी 'वैशाली'तल्या आमच्या लाडक्या कडक कॉफीसारखं ताजतवानं जगायला या टप्प्यावर पुन्हा सिद्ध झालो आहे. माझ्या हातात हात गुंफून, माझे लेख वाचत वाचत तुम्हीही या आनंदसफरीवर यायचंच आहे...
आज इतकंच...
----

12 Nov 2015

कट्यार काळजात घुसली

'कट्यार' काळजात घुसलीच!
----------------------------------


'कट्यार काळजात घुसली...' हे मराठी रसिकांच्या काळजात घुसून तिथंच अजरामर झालेलं संगीत नाटक. रंगभूमीचे 'मास्तर' पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि प्रतिभाशाली, प्रयोगशील संगीतकार पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या अद्वितीय संगीतानं नटलेलं हे नाटक त्यातल्या अंगभूत नाट्यमयतेनं आणि वेगळ्या धर्तीच्या संगीतामुळं रसिकांच्या पसंतीस उतरलं. याच नाटकावर आधारित 'कट्यार काळजात घुसली' याच शीर्षकाचा सुबोध भावे दिग्दर्शित नवा मराठी चित्रपटही या नाटकाप्रमाणंच आपल्या काळजात घुसतोच! नव्या-जुन्यांचा सुरेख मिलाफ करीत, सुबोधनं माध्यमांतराचं हे आव्हान यशस्वीरीत्या पेलल्याचं, सिनेमा संपल्यानंतर पडणाऱ्या उत्स्फूर्त टाळ्यांच्या कडकडाटानं सिद्ध होतं.

विश्रामपूर या ब्रिटिशकालीन संस्थानात राजाश्रय मिळालेले ज्येष्ठ-श्रेष्ठ गायक पं. भानुशंकर शास्त्री आणि त्यांनीच मिरजेहून विश्रामपूरला आणलेले दुसरे गायक उस्ताद आफताब हुसेन बरेलीवाले उर्फ खाँसाहेब यांच्यातील संघर्षाची, घराण्यांतल्या स्पर्धेची, वैमनस्याची ही कथा आहे. त्याहीपेक्षा ती कलाकाराच्या 'अहं'शी त्याची स्वतःचीच चाललेली स्पर्धा आहे. एक सच्चा, अंतःकरणापासून उमटलेला सूरच हा अहं मिटवू शकतो. त्याला प्रत्यक्षातल्या कट्यारीची गरज नसते, असा संदेश हा सिनेमा देतो. गायक आणि दोन घराण्यांची कथित स्पर्धा असा विषय असल्यानं या नाटकात वैविध्यपूर्ण संगीताला वाव होता. पं. जितेंद्र अभिषेकींनी त्यांच्या प्रयोगशील वृत्तीने यात रंग भरले. पं. वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या कसलेल्या गायकाने तेव्हा खाँसाहेबांची भूमिका करून रसिकांना भरभरून आपल्या गायकीचा आनंद दिला. नंतरही या नाटकाचे आव्हान अनेक रंगकर्मींना खुणावत राहिले. अजूनही या नाटकाचे प्रयोग धडाक्यात सुरू असतात. अशा या नाटकाचं माध्यमांतर करताना दोन आव्हानं होती. एक तर भूमिकांना न्याय देणारे योग्य कलाकार निवडणं आणि दुसरं म्हणजे या कलाकृतीचा आत्मा असलेलं संगीत त्याच दर्जाचं कायम ठेवणं. सुबोध या दोन्ही परीक्षांना उतरला आहे.
खाँसाहेबांच्या भूमिकेत सचिनची निवड अनेकांना आश्चर्यकारक आणि काहीशी अनपेक्षित वाटली होती. मीही त्याला अपवाद नव्हतो. मात्र, प्रत्यक्ष पडद्यावर सचिनचं काम पाहिल्यावर आपलं हे मत सपशेल चुकलं, हे मी कबूल करतो. सचिननं खाँसाहेबांच्या भूमिकेला योग्य तो न्याय दिला आहे. सचिन मूळचा गायक असल्यानं त्याला ही भूमिका साकारताना फायदा झाला असणार. शिवाय या भूमिकेला आधी न्यूनगंडाची आणि नंतर त्यातून आलेल्या अहंगंडाची जी गडद छटा आहे, ती साकारणं सचिनला सोपंच गेलं असणार. अर्थात कारणं काहीही असली, तरी प्रत्यक्ष पडद्यावरचा त्याचा परफॉर्मन्स त्याच्या सर्व टीकाकारांना गप्प बसवणारा आहे, यात वादच नाही. दुसरी महत्त्वाची भूमिका पं. शास्त्रींची. याही भूमिकेसाठी शंकर महादेवन या गुणी गायकाची निवड अशीच अनपेक्षित होती. मात्र, शंकरनंही ही भूमिका तन्मयतेनं साकारलीय आणि त्याची ही पहिलीच भूमिका आहे, हे कुठंही जाणवू दिलेलं नाही. हेही दिग्दर्शकाचंच यश. तिसरी महत्त्वाची भूमिका अर्थातच सदाशिवची. ती स्वतः सुबोधनं केली आहे. या भूमिकेच्या सर्व बारीकसारीक छटा त्यानं प्रत्ययकारकतेनं सादर केल्या आहेत.
यातला सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे संगीताचा. सुबोधनं यातही प्रयोग केला आहे. त्यानं काही रचना चालीसकट मूळ नाटकातल्या ठेवल्या आहेत, तर काही रचना पूर्णपणे नव्यानं केल्या आहेत. 'कट्यार...'ला जन्मापासूनच या सर्जनशील प्रयोगशीलतेची सवय आहे. त्यामुळं हा नवा प्रयोगही या कलाकृतीच्या स्वभावधर्माला धरूनच झाला. आणि सांगायला आनंद होतो, की तो प्रयोगही अत्यंत सुरेल ठरला आहे. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीताएवढंच प्रयोगशील संगीत शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटानं दिलं आहे. उदा. मूळ नाटकात असलेल्या या भवनातील गीत पुराणे या पदाऐवजी सिनेमात सचिनच्या तोंडी एक हिंदी-उर्दू रचना देण्यात आली आहे. याशिवाय 'सूर निरागस हो' हे छान गाणं आणि कव्वालीही वेगळी. लागी कलेजवां कटार ही रचना यात अभिषेकीबुवांच्याच आवाजात पार्श्वसंगीतासारखी वापरण्यात आली आहे. शंकर महादेवन यांच्या भूमिकेला अर्थातच त्यांचा स्वतःचा आवाज, सचिन यांना राहुल देशपांडे यांचा, तर सदाशिवला महेश काळे यांचा आवाज वापरण्यात आला आहे. हे तिघेही आजचे तयारीचे, कसदार, सुरेल गळ्याचे गायक असल्यानं सिनेमा पाहताना (किंवा खरं तर ऐकताना) मूळ नाटकाएवढाच श्रवणानंद मिळतो, हे आवर्जून सांगायला हवं.

नाटकाचं माध्यमांतर करताना अनेकदा पडद्यावर नाटकच पाहत असल्याचा भास होतो. सुबोध हा दोन्ही माध्यमांत संचार करणारा असल्यानं त्यानं हे पडद्यावरचं नाटक वाटणार नाही, याची काळजी घेतली आहे. एक तर कट्यार स्वतःच या गोष्टीचं निवेदन (आवाज रिमा यांचा) करते, असं दाखवून सुबोधनं बरंच काम सोपं केलं आहे. मूळ नाटकात नसलेलं खाँसाहेबांच्या बेगमचं पात्र इथं प्रत्यक्ष दाखवण्यात आलं आहे. शिवाय पं. शास्त्री आणि छोटा सदाशिव काजवे पकडायला जातात, तो प्रसंग आणि शास्त्रीबुवा त्या काजव्यांनी भरलेली मशाल छोट्या सदाशिवच्या हाती देतात, हा सूचक प्रसंग दिग्दर्शकाला दाद द्यावी असाच. याशिवाय खाँसाहेब शास्त्रीबुवांच्या हवेलीत राहायला जातात, तेव्हा ते झरीनाला एकेक दार-खिडकी बंद करायला सांगतात तो प्रसंगही सिनेमा माध्यमाची ताकद सांगणारा. तलावाच्या काठी कविराज (पुष्कर श्रोत्री) सदाशिवला विद्या आणि कला यातला फरक समजावून सांगतो, तो प्रसंगही असाच दाद मिळविणारा झाला आहे. 'वाह...' म्हणायला लावणारे असे अनेक छोटे-मोठे प्रसंग यात आहेत.
सिनेमाचा पूर्वार्ध शास्त्रीबुवा आणि खाँसाहेब यांच्यातील मैत्री, मग जुगलबंदी आणि मग खाँसाहेबांची वाढती ईर्षा यामुळं अत्यंत वेगवान झाला आहे. मध्यंतराच्या काही वेळापूर्वी सदाशिवचं आगमन होतं आणि मग नव्या संघर्षाची नांदी होऊन मध्यांतर होतो. इथपर्यंत सिनेमा विलक्षण उंचीवर जातो. त्रुटीच काढायची तर उत्तरार्ध ही उंची आणखी फार वाढवत नाही, एवढीच म्हणावी लागेल. शिवाय उत्तरार्धात काही ठिकाणी सिनेमा थबकतो, संथ होतो. दीर्घकाळ खाँसाहेबांचं दर्शन होत नाही. पण शेवटी तो लवकरच पुन्हा पूर्वपदावर येतो आणि शेवटपर्यंत रंगत जातो.
चित्रपटाची निर्मितीमूल्ये अत्यंत उच्च दर्जाची आहेत. राजदरबारातील सर्व दृश्ये अप्रतिम. सिनेमॅटोग्राफी (सुधीर पलसाने) आणि ध्वनिसंयोजन (अनमोल भावे) अव्वल दर्जाचं. सर्व कलाकारांची कामं उत्तम झाली आहेत. शंकर, सचिन आणि सुबोधचा वर उल्लेख झालाच आहे. अमृता खानविलकरनंही झरीनाच्या भूमिकेत जान ओतली आहे. उमाच्या भूमिकेत मृण्मयी देशपांडेनं सदाशिववरचं अव्यक्त प्रेम छान दर्शवलं आहे.
तेव्हा अजिबात न चुकवावा असाच हा देखणा स्वरानुभव आहे.

--
दर्जा - चार स्टार
---

20 Oct 2015

राजवाडे अँड सन्स

'पेढी'जात संघर्ष
-------------------

राजवाडे अँड सन्स हा सचिन कुंडलकरचा नवा मराठी सिनेमा पाहताना सर्वांत जास्त कोणती गोष्ट अपील होत असेल, तर ते या सिनेमाचं तारुण्य. हा सिनेमा तरुण आहे, आजचा आहे, आजच्या मुलांचा आहे... त्यांची भाषा बोलतो. त्यांच्या नजरेतून जग दाखवतो. एके काळी पुण्यातल्या वाडा संस्कृतीत राहणाऱ्यांची तिसरी पिढी आता (कुठल्या) कुठं गेली आहे, हे सांगतो. हे सगळं आपल्या आजूबाजूला घडताना आपण पाहतोच आहोत. त्यामुळं आपल्याच जगण्यातला आरसा समोर धरला आहे असं वाटावं इतपत हे सगळं वास्तवदर्शी आणि मनाला भिडणारं झालं आहे.
रमेश राजवाडे (सतीश आळेकर) हे पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक. त्यांची दुसरी पिढीही याच व्यवसायात आहे आणि व्यवसाय आता चांगलाच बहरला आहे. कडक स्वभावाचे, शिस्तशीर असे रमेश राजवाडे घरातल्या सर्वांनी या व्यवसायात साथ द्यावी, यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, त्यांच्या नातवंडांना या व्यवसायात रस नाही. त्यांना त्यांचं आपलं जग खुणावतंय. एकीला मॉडेल व्हायचंय, एकीला परदेशी भाषा शिक्षणात शिक्षिका व्हायचंय, एकाला वेगवेगळ्या रंगांचे शूज घालायला आवडत असतात आणि त्याची खरी पॅशन अजून कुणालाच कळलेली नाही. मात्र, आपण आजोबांना एके दिवशी हेडलाइन मिळवून देणार, असं तो खात्रीनं सांगत असतो. (आणि शेवटी पोलिस घरी येतात, तेव्हा तसं करूनही दाखवतो.) या सगळ्यांचं आपापलं एक व्हर्चुअल जग आहे. त्यात प्रेम, पॅशन, सेक्स, इंटिमसी, वेगळं काही करण्याची ओढ असं सगळं काही आहे. आपल्या आई-वडिलांनी आपल्या खोलीत येताना दारावर टकटक करूनच यावं, अशा विचारांची ही पिढी आहे. रमेश राजवाडे आणि त्यांच्या पत्नी (इम्पेकेबल ज्योती सुभाष) आता बदलण्याच्या पलीकडं गेले आहेत. त्यामुळं खरी घुसमट होतेय ती राजवाडेंच्या मधल्या पिढीची - अर्थात त्यांच्या तीन मुलांची, म्हणजेच विद्याधर (सॉलिड सचिन खेडेकर), लक्ष्मी (मार्व्हलस मृणाल कुलकर्णी) आणि शुभंकर (अतुल्य अतुल कुलकर्णी) यांची. यांना वडिलांचंही मन जपायचंय आणि मुलांनाही दुखवायचं नाहीये. एके दिवशी राजवाडेंचा पुण्यातला पेठांमधला वाडा रिडेव्हलपमेंटला निघतो आणि हे सगळं कुटुंब गावाबाहेर एका मोठ्या इमारतीत स्थलांतरित होतं. हे स्थलांतर एका अर्थानं प्रतीकात्मकही आहे. आपल्या मुळांपासून किंचितही सुटून येताना जुन्या पिढीला खूपच त्रास होतोय. मधल्या पिढीची संभ्रमावस्था संपत नाहीये, तर तिसऱ्या पिढीला नवं आकाश गवसल्यागत झालंय. या सर्वांना एक जोड आहे ती या घरात येणाऱ्या एका अनाहूत पाहुण्याची. हा पाहुणा खरं तर त्यांच्यातलाच एक असतो; पण अनेक वर्षांनी तो परतलेला असतो. त्याच्या येण्यामुळं या कुटुंबात काहीशी खळबळ माजते. वडीलधारे अस्वस्थ होतात, मधले नेहमीप्रमाणे बिचकतात, तर मुलं खूश होतात. पुढं काय घडतं, हे प्रत्यक्ष पडद्यावरच पाहायला हवं. शिवाय यात अतुल कुलकर्णीनं साकारलेल्या पात्राचीही एक वेगळी गंमत आहे. ती गंमत पाहताना मजा येते.
'राजवाडे' प्रामुख्यानं तरून जातो तो त्याच्या यूथफुल अपीलमुळं. मराठी सिनेमात शहरी उच्च किंवा श्रीमंत वर्गाचं हे असं क्रॉस सेक्शन दाखवणारं चित्रण पूर्वी आल्याचं आठवत नाही. बाकी हा संघर्ष तसा नवा नाही. खरं तर यात दाखवलेल्या अतिश्रीमंत कुटुंबामुळं तो फारसा ताणाचाही वाटत नाही. तरी तो आहे. आपल्या जागी संघर्ष आहेच. हा सिनेमा पाहताना अनेकांना रेखाचा खूबसूरत किंवा आत्ताचा दिल धडकने दो किंवा यासारख्या काही सिनेमांची आठवण झाली तरी आश्चर्य वाटू नये. हे श्रीमंत सराफ कुटुंबांचं नेपथ्य निवडण्यामागं फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. फायदा म्हणजे यातल्या पात्रांना जगण्यासाठी करावा लागणारा मूलभूत संघर्ष माहिती नाही. त्यामुळं ते (आणि दिग्दर्शकही) त्यांच्या तुलनेत लहान, पण त्यांच्यासाठी मोठ्या असणाऱ्या समस्यांवरच लक्ष केंद्रित करायला मोकळे झाले आहेत. तोटा असा, की मराठीत या वर्गाची संख्या अजूनही मर्यादित असल्यानं उर्वरित फार मोठ्या प्रेक्षकवर्गाला त्याच्याशी रिलेट होणं अवघडच आहे. किंबहुना या कुटुंबाची श्रीमंती पाहून आपल्याविषयी न्यूनगंडच निर्माण होतो, हे नक्की.
'राजवाडे' आणखी तरून जातो तो यातल्या पात्र निवडीमुळं. सर्वांची कामं अगदी बावनकशी झाली आहेत. सचिन, मृणाल किंवा अतुल यांचं किंवा सतीश आळेकर वा ज्योती सुभाष यांचं आपण आता चांगल्या अभिनयाबद्दल कौतुक करणं हेही पिवळा पितांबर म्हणण्यासारखं होईल. पण विशेष उल्लेख करायला हवा तो सिद्धार्थ मेनन, मृण्मयी गोडबोले, आलोक राजवाडे अन् कृतिका देव यांनी केलेल्या भूमिकांचा. किंबहुना ही चार पोरं म्हणजेच या सिनेमाची खरी जान आहेत. यांचे लूक, त्यांचं स्टाइलिंग आणि त्यांचा अटिट्यूड पाहण्याजोगा आहे. शिवाय अमित्रियान पाटील असं विचित्र नाव असलेला एक नवा कलाकार यात आहे. त्याचा लूक आणि एकूण वावर सिनेमाच्या ग्लॅम कोशंटमध्ये भरच घालतो. 'तगमग... तगमग' हे या मुलांचं गाणं आणि त्याचं चित्रिकरण झक्कास आहे. शिवाय सचिनचं पुण्याविषयीचं प्रेम या सिनेमात ठायी ठायी दिसतं. रात्रीचं पुणं दाखवणारं एक गाणं यात आहे. ते पाहायला मस्त वाटतं.
'राजवाडे'विषयी तक्रारच करायची तर ती यातल्या ओव्हरब्रँडिंगची करता येईल. दुसरे एक नामांकित सराफ, एक बिल्डर, एक बँक, एक कार आणि एक.... ब्ला ब्ला ब्ला गोष्टींच्या एवढ्या जाहिराती केल्या आहेत आणि त्या एवढ्या भातातल्या खड्यासारख्या टोचतात की विचारू नका. हे ब्रँडिंग टाळून सिनेमा होणारच नाही का? एक मात्र आहे. सचिनचा हा सिनेमा 'ब्रँड पुणे'चा सिनेमा आहे. खासकरून पुणे-२, पुणे-३० आणि पुणे-२९ चा हाय-ब्रो ब्रँड!
---
दर्जा - साडेतीन स्टार
----

19 Oct 2015

नवा चित्रपट - अनाहत

स्त्रीच्या देहभानाची अनवट कहाणी
-----------------------------------------

स्त्री-पुरुष लैंगिक संबंध ही मानवाच्या अस्तित्वाशीच निगडित व तितकीच आदिम अशी बाब. अनाहतपणे चालत आलेली; स्त्री व पुरुष दोघांच्याही दृष्टीने आनंदाची, उत्कटतेची, आवेगाची! मात्र, दर वेळी या संबंधांत स्त्रीला तिची अशी काही आवड, तिची अशी काही निवड व्यक्त करण्याची संधी दिली जाते का? किंबहुना स्त्रीने असा आनंद घ्यावा, असं आजही किती पुरुषांना मोकळेपणानं मान्य होतं? स्त्रीला हा अधिकार आपण देणार आहोत की नाही? - अनाहत हा अमोल पालेकरांचा नवा मराठी चित्रपट अशा अनेक प्रश्नांना जन्म देणारा आणि त्यातून प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा.
सुरेंद्र वर्मा यांच्या 'सूर्य की अंतिम किरण से सूर्य की पहली किरण तक' या नाटकावर हा चित्रपट आधारलेला आहे. पालेकरांनी हा विषय निवडला, त्याच वेळी त्याची अंगभूत वैशिष्ट्ये आणि मर्यादाही स्पष्ट झाल्या होत्या. म्हणजे असं की, अशा सिनेमाचा भाषक प्रेक्षकवर्ग कदाचित मर्यादित असू शकतो आणि त्याचं भाषेपलीकडचं विषयाचं म्हणून जे अपील असतं, ते कदाचित एकदम जागतिक दर्जाचं असू शकतं. हे एकदा गृहीत धरलं, की स्वीकारलेल्या चौकटीत पालेकरांनी जी मांडणी केली आहे, ती प्रेक्षणीय करून दाखविली आहे, हे निश्चित.
चित्रपटाची कथा घडते इसवी सन पूर्व दहाव्या शतकात. कोण्या एका मल्लदेशाची श्रावस्ती ही राजधानी. तिथं या देशाचा राजा (अनंत नाग) व त्याची धर्मपत्नी महाराणी शीलवती (सोनाली बेंद्रे) सुखा-समाधानानं नांदत असतात. दुःख एकच असतं - राजाला मूल नसतं. याला कारणही राजाच; कारण दोष त्याच्यातच असतो. गादीवर बसल्यानंतर सात वर्षांनी वारस जाहीर करण्याची पद्धत असते. मात्र, आठ वर्षांनीही राजाला मूल होत नाही, म्हटल्यावर राणीनं शास्त्रसंमत अशा 'नियोग विधी'ला सामोरं जावं, असा निर्णय अमात्य सभा घेते. 'नियोग' म्हणजे राणीनं एका रात्रीपुरता उपपती निवडून त्याच्याशी संग करणे आणि राज्याला वारस देणे. राजा 'राजकर्तव्य' म्हणून या विधीला संमती देतो खरा; पण त्याच्यातला 'पती' कोसळून पडतो. त्याची बालमैत्रीण महत्तरिका (दीप्ती नवल) त्याला मानसिक आधार देते.
इकडं महाराणीला काही मूलभूत प्रश्न पडतात व ती ते महाअमात्यांना (प्रदीप वेलणकर) विचारतेही. हा विधी करण्याआधी माझी संमती विचारण्याची गरज तुम्हाला का भासली नाही? विधी केल्यानंतरही मूल झालं नाही किंवा मुलगीच झाली तर, तिला तुम्ही राजपद देणार काय? - शीलवतीच्या या प्रश्नांना अमात्यांकडं उत्तरं नसतात.
राणी नाइलाजानं 'नियोगा'ला सामोरी जाते. ती परत आल्यानंतर खचलेली असेल; पाप केल्याच्या भावनेनं तिचं मन सैरभैर झालं असेल, अशी सर्व जाणत्यांची अपेक्षा असते, पण होतं भलतंच. शीलवती महत्तरिकेला विचारते - 'असा असतो पुरुष? हे तू मला आधी का सांगितलं नाहीस? या रात्रीनं मला खूप काही दिलंय. हा देहाचा उत्सव मी मनसोक्त साजरा केलाय.'
शीलवतीला आलेलं हे (नसतं) भान बघून महत्तरिका, राजा, अमात्य सगळेच खचतात. मात्र, शीलवती अमात्यांना आज्ञा देते - 'हा विधी तीनदा करावा, असं शास्त्रात म्हटलंय ना! मग पुन्हा एकदा दवंडी द्या!'
नंतर शीलवती राजाकडे जाते व त्याला सांगते, 'मी माझ्या अनुभवांशी प्रामाणिक राहिले. मला जे काही तेव्हा वाटलं, ते मी मोकळेपणानं व्यक्त केलं. याचा अर्थ तुम्ही मला जे काही दिलं त्याच्याशी मी प्रतारणा केली असं नाही. तुमचं स्थान माझ्या हृदयात आधी जे होतं तेच राहील.' पार्श्वभूमीवर 'त्या' दवंडीचे स्वर ऐकू येत असतानाच चित्रपट संपतो...
...पालेकरांना जे काही सांगायचंय ते त्यांनी अतिशय नेमकेपणानं सांगितलंय. चित्रपटाचा कालावधी ९० मिनिटांचा आहे. चित्रपटाची निर्मिती-संकल्पना संध्या गोखले यांची. उच्च निर्मितीमूल्यं जपताना त्यांनी कोणतीही तडजोड केलेली नाही, हे जाणवतं. जयू पटवर्धन यांनी या 'पीरियड ड्रामा'ला योग्य अशी वेषभूषा केली आहे. तयार कपडेपट वापरण्याऐवजी त्यांनी स्वतंत्रपणे प्रत्येकाच्या वस्त्रांची निर्मिती केली आहे. हम्पी परिसरात केवळ १८ दिवसांत या चित्रपटाचं चित्रीकरण झालं. चित्रपटातील घटनांचा कालावधी केवळ एका रात्रीचा आहे. त्या दृष्टीनं देबू देवधर यांनी प्रत्येक प्रहरातील रात्रीचे बदलते रंग अप्रतिम चित्रित केलेत. चित्रपटाचील संगीत संकल्पना संध्या गोखले यांची. उदय भवाळकर यांच्या ध्रुपद गायकीचा समर्पक वापर त्यांनी करून घेतला आहे.
चित्रपटाची पटकथा व संवाद डॉ. समीर कुलकर्णी व संध्या गोखले यांच आहेत. 'त्या वेळची मराठी' म्हणून या चित्रपटात वापरलेली भाषा काहीशी क्लिष्टच आहे. मात्र, पटकथा बंदिस्त असल्याने चित्रपट आटोपशीर झालाय.
कलाकारांमध्ये सोनाली बेंद्रेसाठी हा चित्रपट 'माइलस्टोन' ठरावा. या चित्रपटात ती विलक्षण देखणी दिसली आहे. अर्थात केवळ तिच्या दिसण्याचा उल्लेख अपुरा ठरेल. सोनालीच्या अभिनयगुणांचंही दर्शन 'अनाहत'नं घडवलं आहे. राणीची आधीची असहायता, 'नियोग विधी'च्या निर्णयानंतरची उद्विग्नता, 'देहाचा उत्सव' अनुभवल्यानंतरचे चैतन्य आणि शेवटी राजावर असलेलं निखळ प्रेम या सर्व भावना सोनालीनं सुरेख व्यक्त केल्या. जयू पटवर्धन यांनी सोनालीसाठी केलेल्या वेषभूषेचा व तिच्या अलंकारांचाही खास उल्लेख करावा लागेल. एकूणच सोनालीच्या कारकिर्दीतील हा महत्त्वाचा चित्रपट म्हणावा लागेल. अनंत नाग हे रंगभूमीवरील जुने-जाणते कलावंत आहेत. त्यांनी राजाची घुसमट प्रभावीपणे दर्शवली आहे. राणी 'नियोग विधी'ला गेल्यानंतर राजाचं पती म्हणून कोसळणं त्यांनी नेमकेपणानं अभिनित केलं आहे. त्यांचं मराठीही प्रवाही व सुखद आहे. दीप्ती नवलसारख्या समर्थ अभिनेत्रीला मात्र फारसा वाव नाही. महत्तरिकेची भूमिकाच मुळात सहायक या स्वरूपाची आहे. ही भूमिका दीप्ती नवल यांनी पालेकरांच्या स्नेहाखातर स्वीकारली असावी, असं वाटतं. बाकी कलाकारांमध्ये प्रदीप वेलणकर, श्रीरंग गोडबोले, डॉ. विलास उजवणे यांनी आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत.
आणखी एक. चित्रपटाचा विषय बघता त्यात मसालेदार दृश्यं घेणं सहज शक्य होतं; पण पालेकरांनी ते जाणीवपूर्वक टाळलं, ही बाब अभिनंदनीय आहे. (कारण 'सूर्य की अंतिम किरण से...' हे नाटकर नीना गुप्तांनी अलीकडचं मुंबईच्या रंगमंचावर आणलं होतं; पण ते भलत्याच गोष्टींसाठी चर्चेत होतं.) सध्याच्या 'बूम'पटांच्या लाटेत असा निर्णय घेणं ही वेगळी गोष्ट आहे. मराठीत अशा प्रकारची भव्य निर्मिती होणं ही बाब मराठी चित्रपटसृष्टीसाठी दिलासादायक आहे.
---
(पूर्वप्रसिद्धी - सकाळ, पुणे, २९ सप्टेंबर २००३)
----