20 Oct 2015

राजवाडे अँड सन्स

'पेढी'जात संघर्ष
-------------------

राजवाडे अँड सन्स हा सचिन कुंडलकरचा नवा मराठी सिनेमा पाहताना सर्वांत जास्त कोणती गोष्ट अपील होत असेल, तर ते या सिनेमाचं तारुण्य. हा सिनेमा तरुण आहे, आजचा आहे, आजच्या मुलांचा आहे... त्यांची भाषा बोलतो. त्यांच्या नजरेतून जग दाखवतो. एके काळी पुण्यातल्या वाडा संस्कृतीत राहणाऱ्यांची तिसरी पिढी आता (कुठल्या) कुठं गेली आहे, हे सांगतो. हे सगळं आपल्या आजूबाजूला घडताना आपण पाहतोच आहोत. त्यामुळं आपल्याच जगण्यातला आरसा समोर धरला आहे असं वाटावं इतपत हे सगळं वास्तवदर्शी आणि मनाला भिडणारं झालं आहे.
रमेश राजवाडे (सतीश आळेकर) हे पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक. त्यांची दुसरी पिढीही याच व्यवसायात आहे आणि व्यवसाय आता चांगलाच बहरला आहे. कडक स्वभावाचे, शिस्तशीर असे रमेश राजवाडे घरातल्या सर्वांनी या व्यवसायात साथ द्यावी, यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, त्यांच्या नातवंडांना या व्यवसायात रस नाही. त्यांना त्यांचं आपलं जग खुणावतंय. एकीला मॉडेल व्हायचंय, एकीला परदेशी भाषा शिक्षणात शिक्षिका व्हायचंय, एकाला वेगवेगळ्या रंगांचे शूज घालायला आवडत असतात आणि त्याची खरी पॅशन अजून कुणालाच कळलेली नाही. मात्र, आपण आजोबांना एके दिवशी हेडलाइन मिळवून देणार, असं तो खात्रीनं सांगत असतो. (आणि शेवटी पोलिस घरी येतात, तेव्हा तसं करूनही दाखवतो.) या सगळ्यांचं आपापलं एक व्हर्चुअल जग आहे. त्यात प्रेम, पॅशन, सेक्स, इंटिमसी, वेगळं काही करण्याची ओढ असं सगळं काही आहे. आपल्या आई-वडिलांनी आपल्या खोलीत येताना दारावर टकटक करूनच यावं, अशा विचारांची ही पिढी आहे. रमेश राजवाडे आणि त्यांच्या पत्नी (इम्पेकेबल ज्योती सुभाष) आता बदलण्याच्या पलीकडं गेले आहेत. त्यामुळं खरी घुसमट होतेय ती राजवाडेंच्या मधल्या पिढीची - अर्थात त्यांच्या तीन मुलांची, म्हणजेच विद्याधर (सॉलिड सचिन खेडेकर), लक्ष्मी (मार्व्हलस मृणाल कुलकर्णी) आणि शुभंकर (अतुल्य अतुल कुलकर्णी) यांची. यांना वडिलांचंही मन जपायचंय आणि मुलांनाही दुखवायचं नाहीये. एके दिवशी राजवाडेंचा पुण्यातला पेठांमधला वाडा रिडेव्हलपमेंटला निघतो आणि हे सगळं कुटुंब गावाबाहेर एका मोठ्या इमारतीत स्थलांतरित होतं. हे स्थलांतर एका अर्थानं प्रतीकात्मकही आहे. आपल्या मुळांपासून किंचितही सुटून येताना जुन्या पिढीला खूपच त्रास होतोय. मधल्या पिढीची संभ्रमावस्था संपत नाहीये, तर तिसऱ्या पिढीला नवं आकाश गवसल्यागत झालंय. या सर्वांना एक जोड आहे ती या घरात येणाऱ्या एका अनाहूत पाहुण्याची. हा पाहुणा खरं तर त्यांच्यातलाच एक असतो; पण अनेक वर्षांनी तो परतलेला असतो. त्याच्या येण्यामुळं या कुटुंबात काहीशी खळबळ माजते. वडीलधारे अस्वस्थ होतात, मधले नेहमीप्रमाणे बिचकतात, तर मुलं खूश होतात. पुढं काय घडतं, हे प्रत्यक्ष पडद्यावरच पाहायला हवं. शिवाय यात अतुल कुलकर्णीनं साकारलेल्या पात्राचीही एक वेगळी गंमत आहे. ती गंमत पाहताना मजा येते.
'राजवाडे' प्रामुख्यानं तरून जातो तो त्याच्या यूथफुल अपीलमुळं. मराठी सिनेमात शहरी उच्च किंवा श्रीमंत वर्गाचं हे असं क्रॉस सेक्शन दाखवणारं चित्रण पूर्वी आल्याचं आठवत नाही. बाकी हा संघर्ष तसा नवा नाही. खरं तर यात दाखवलेल्या अतिश्रीमंत कुटुंबामुळं तो फारसा ताणाचाही वाटत नाही. तरी तो आहे. आपल्या जागी संघर्ष आहेच. हा सिनेमा पाहताना अनेकांना रेखाचा खूबसूरत किंवा आत्ताचा दिल धडकने दो किंवा यासारख्या काही सिनेमांची आठवण झाली तरी आश्चर्य वाटू नये. हे श्रीमंत सराफ कुटुंबांचं नेपथ्य निवडण्यामागं फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. फायदा म्हणजे यातल्या पात्रांना जगण्यासाठी करावा लागणारा मूलभूत संघर्ष माहिती नाही. त्यामुळं ते (आणि दिग्दर्शकही) त्यांच्या तुलनेत लहान, पण त्यांच्यासाठी मोठ्या असणाऱ्या समस्यांवरच लक्ष केंद्रित करायला मोकळे झाले आहेत. तोटा असा, की मराठीत या वर्गाची संख्या अजूनही मर्यादित असल्यानं उर्वरित फार मोठ्या प्रेक्षकवर्गाला त्याच्याशी रिलेट होणं अवघडच आहे. किंबहुना या कुटुंबाची श्रीमंती पाहून आपल्याविषयी न्यूनगंडच निर्माण होतो, हे नक्की.
'राजवाडे' आणखी तरून जातो तो यातल्या पात्र निवडीमुळं. सर्वांची कामं अगदी बावनकशी झाली आहेत. सचिन, मृणाल किंवा अतुल यांचं किंवा सतीश आळेकर वा ज्योती सुभाष यांचं आपण आता चांगल्या अभिनयाबद्दल कौतुक करणं हेही पिवळा पितांबर म्हणण्यासारखं होईल. पण विशेष उल्लेख करायला हवा तो सिद्धार्थ मेनन, मृण्मयी गोडबोले, आलोक राजवाडे अन् कृतिका देव यांनी केलेल्या भूमिकांचा. किंबहुना ही चार पोरं म्हणजेच या सिनेमाची खरी जान आहेत. यांचे लूक, त्यांचं स्टाइलिंग आणि त्यांचा अटिट्यूड पाहण्याजोगा आहे. शिवाय अमित्रियान पाटील असं विचित्र नाव असलेला एक नवा कलाकार यात आहे. त्याचा लूक आणि एकूण वावर सिनेमाच्या ग्लॅम कोशंटमध्ये भरच घालतो. 'तगमग... तगमग' हे या मुलांचं गाणं आणि त्याचं चित्रिकरण झक्कास आहे. शिवाय सचिनचं पुण्याविषयीचं प्रेम या सिनेमात ठायी ठायी दिसतं. रात्रीचं पुणं दाखवणारं एक गाणं यात आहे. ते पाहायला मस्त वाटतं.
'राजवाडे'विषयी तक्रारच करायची तर ती यातल्या ओव्हरब्रँडिंगची करता येईल. दुसरे एक नामांकित सराफ, एक बिल्डर, एक बँक, एक कार आणि एक.... ब्ला ब्ला ब्ला गोष्टींच्या एवढ्या जाहिराती केल्या आहेत आणि त्या एवढ्या भातातल्या खड्यासारख्या टोचतात की विचारू नका. हे ब्रँडिंग टाळून सिनेमा होणारच नाही का? एक मात्र आहे. सचिनचा हा सिनेमा 'ब्रँड पुणे'चा सिनेमा आहे. खासकरून पुणे-२, पुणे-३० आणि पुणे-२९ चा हाय-ब्रो ब्रँड!
---
दर्जा - साडेतीन स्टार
----

19 Oct 2015

नवा चित्रपट - अनाहत

स्त्रीच्या देहभानाची अनवट कहाणी
-----------------------------------------

स्त्री-पुरुष लैंगिक संबंध ही मानवाच्या अस्तित्वाशीच निगडित व तितकीच आदिम अशी बाब. अनाहतपणे चालत आलेली; स्त्री व पुरुष दोघांच्याही दृष्टीने आनंदाची, उत्कटतेची, आवेगाची! मात्र, दर वेळी या संबंधांत स्त्रीला तिची अशी काही आवड, तिची अशी काही निवड व्यक्त करण्याची संधी दिली जाते का? किंबहुना स्त्रीने असा आनंद घ्यावा, असं आजही किती पुरुषांना मोकळेपणानं मान्य होतं? स्त्रीला हा अधिकार आपण देणार आहोत की नाही? - अनाहत हा अमोल पालेकरांचा नवा मराठी चित्रपट अशा अनेक प्रश्नांना जन्म देणारा आणि त्यातून प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा.
सुरेंद्र वर्मा यांच्या 'सूर्य की अंतिम किरण से सूर्य की पहली किरण तक' या नाटकावर हा चित्रपट आधारलेला आहे. पालेकरांनी हा विषय निवडला, त्याच वेळी त्याची अंगभूत वैशिष्ट्ये आणि मर्यादाही स्पष्ट झाल्या होत्या. म्हणजे असं की, अशा सिनेमाचा भाषक प्रेक्षकवर्ग कदाचित मर्यादित असू शकतो आणि त्याचं भाषेपलीकडचं विषयाचं म्हणून जे अपील असतं, ते कदाचित एकदम जागतिक दर्जाचं असू शकतं. हे एकदा गृहीत धरलं, की स्वीकारलेल्या चौकटीत पालेकरांनी जी मांडणी केली आहे, ती प्रेक्षणीय करून दाखविली आहे, हे निश्चित.
चित्रपटाची कथा घडते इसवी सन पूर्व दहाव्या शतकात. कोण्या एका मल्लदेशाची श्रावस्ती ही राजधानी. तिथं या देशाचा राजा (अनंत नाग) व त्याची धर्मपत्नी महाराणी शीलवती (सोनाली बेंद्रे) सुखा-समाधानानं नांदत असतात. दुःख एकच असतं - राजाला मूल नसतं. याला कारणही राजाच; कारण दोष त्याच्यातच असतो. गादीवर बसल्यानंतर सात वर्षांनी वारस जाहीर करण्याची पद्धत असते. मात्र, आठ वर्षांनीही राजाला मूल होत नाही, म्हटल्यावर राणीनं शास्त्रसंमत अशा 'नियोग विधी'ला सामोरं जावं, असा निर्णय अमात्य सभा घेते. 'नियोग' म्हणजे राणीनं एका रात्रीपुरता उपपती निवडून त्याच्याशी संग करणे आणि राज्याला वारस देणे. राजा 'राजकर्तव्य' म्हणून या विधीला संमती देतो खरा; पण त्याच्यातला 'पती' कोसळून पडतो. त्याची बालमैत्रीण महत्तरिका (दीप्ती नवल) त्याला मानसिक आधार देते.
इकडं महाराणीला काही मूलभूत प्रश्न पडतात व ती ते महाअमात्यांना (प्रदीप वेलणकर) विचारतेही. हा विधी करण्याआधी माझी संमती विचारण्याची गरज तुम्हाला का भासली नाही? विधी केल्यानंतरही मूल झालं नाही किंवा मुलगीच झाली तर, तिला तुम्ही राजपद देणार काय? - शीलवतीच्या या प्रश्नांना अमात्यांकडं उत्तरं नसतात.
राणी नाइलाजानं 'नियोगा'ला सामोरी जाते. ती परत आल्यानंतर खचलेली असेल; पाप केल्याच्या भावनेनं तिचं मन सैरभैर झालं असेल, अशी सर्व जाणत्यांची अपेक्षा असते, पण होतं भलतंच. शीलवती महत्तरिकेला विचारते - 'असा असतो पुरुष? हे तू मला आधी का सांगितलं नाहीस? या रात्रीनं मला खूप काही दिलंय. हा देहाचा उत्सव मी मनसोक्त साजरा केलाय.'
शीलवतीला आलेलं हे (नसतं) भान बघून महत्तरिका, राजा, अमात्य सगळेच खचतात. मात्र, शीलवती अमात्यांना आज्ञा देते - 'हा विधी तीनदा करावा, असं शास्त्रात म्हटलंय ना! मग पुन्हा एकदा दवंडी द्या!'
नंतर शीलवती राजाकडे जाते व त्याला सांगते, 'मी माझ्या अनुभवांशी प्रामाणिक राहिले. मला जे काही तेव्हा वाटलं, ते मी मोकळेपणानं व्यक्त केलं. याचा अर्थ तुम्ही मला जे काही दिलं त्याच्याशी मी प्रतारणा केली असं नाही. तुमचं स्थान माझ्या हृदयात आधी जे होतं तेच राहील.' पार्श्वभूमीवर 'त्या' दवंडीचे स्वर ऐकू येत असतानाच चित्रपट संपतो...
...पालेकरांना जे काही सांगायचंय ते त्यांनी अतिशय नेमकेपणानं सांगितलंय. चित्रपटाचा कालावधी ९० मिनिटांचा आहे. चित्रपटाची निर्मिती-संकल्पना संध्या गोखले यांची. उच्च निर्मितीमूल्यं जपताना त्यांनी कोणतीही तडजोड केलेली नाही, हे जाणवतं. जयू पटवर्धन यांनी या 'पीरियड ड्रामा'ला योग्य अशी वेषभूषा केली आहे. तयार कपडेपट वापरण्याऐवजी त्यांनी स्वतंत्रपणे प्रत्येकाच्या वस्त्रांची निर्मिती केली आहे. हम्पी परिसरात केवळ १८ दिवसांत या चित्रपटाचं चित्रीकरण झालं. चित्रपटातील घटनांचा कालावधी केवळ एका रात्रीचा आहे. त्या दृष्टीनं देबू देवधर यांनी प्रत्येक प्रहरातील रात्रीचे बदलते रंग अप्रतिम चित्रित केलेत. चित्रपटाचील संगीत संकल्पना संध्या गोखले यांची. उदय भवाळकर यांच्या ध्रुपद गायकीचा समर्पक वापर त्यांनी करून घेतला आहे.
चित्रपटाची पटकथा व संवाद डॉ. समीर कुलकर्णी व संध्या गोखले यांच आहेत. 'त्या वेळची मराठी' म्हणून या चित्रपटात वापरलेली भाषा काहीशी क्लिष्टच आहे. मात्र, पटकथा बंदिस्त असल्याने चित्रपट आटोपशीर झालाय.
कलाकारांमध्ये सोनाली बेंद्रेसाठी हा चित्रपट 'माइलस्टोन' ठरावा. या चित्रपटात ती विलक्षण देखणी दिसली आहे. अर्थात केवळ तिच्या दिसण्याचा उल्लेख अपुरा ठरेल. सोनालीच्या अभिनयगुणांचंही दर्शन 'अनाहत'नं घडवलं आहे. राणीची आधीची असहायता, 'नियोग विधी'च्या निर्णयानंतरची उद्विग्नता, 'देहाचा उत्सव' अनुभवल्यानंतरचे चैतन्य आणि शेवटी राजावर असलेलं निखळ प्रेम या सर्व भावना सोनालीनं सुरेख व्यक्त केल्या. जयू पटवर्धन यांनी सोनालीसाठी केलेल्या वेषभूषेचा व तिच्या अलंकारांचाही खास उल्लेख करावा लागेल. एकूणच सोनालीच्या कारकिर्दीतील हा महत्त्वाचा चित्रपट म्हणावा लागेल. अनंत नाग हे रंगभूमीवरील जुने-जाणते कलावंत आहेत. त्यांनी राजाची घुसमट प्रभावीपणे दर्शवली आहे. राणी 'नियोग विधी'ला गेल्यानंतर राजाचं पती म्हणून कोसळणं त्यांनी नेमकेपणानं अभिनित केलं आहे. त्यांचं मराठीही प्रवाही व सुखद आहे. दीप्ती नवलसारख्या समर्थ अभिनेत्रीला मात्र फारसा वाव नाही. महत्तरिकेची भूमिकाच मुळात सहायक या स्वरूपाची आहे. ही भूमिका दीप्ती नवल यांनी पालेकरांच्या स्नेहाखातर स्वीकारली असावी, असं वाटतं. बाकी कलाकारांमध्ये प्रदीप वेलणकर, श्रीरंग गोडबोले, डॉ. विलास उजवणे यांनी आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत.
आणखी एक. चित्रपटाचा विषय बघता त्यात मसालेदार दृश्यं घेणं सहज शक्य होतं; पण पालेकरांनी ते जाणीवपूर्वक टाळलं, ही बाब अभिनंदनीय आहे. (कारण 'सूर्य की अंतिम किरण से...' हे नाटकर नीना गुप्तांनी अलीकडचं मुंबईच्या रंगमंचावर आणलं होतं; पण ते भलत्याच गोष्टींसाठी चर्चेत होतं.) सध्याच्या 'बूम'पटांच्या लाटेत असा निर्णय घेणं ही वेगळी गोष्ट आहे. मराठीत अशा प्रकारची भव्य निर्मिती होणं ही बाब मराठी चित्रपटसृष्टीसाठी दिलासादायक आहे.
---
(पूर्वप्रसिद्धी - सकाळ, पुणे, २९ सप्टेंबर २००३)
----

29 Sept 2015

कोर्ट आणि ऑस्करचं खटलं...


कोर्ट हा मराठी प्रमुख भाषा असलेला बहुभाषक चित्रपट यंदाच्या ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका ठरला आहे. चैतन्य ताम्हाणे या अवघ्या सव्वीस वर्षांच्या तरुणानं अत्यंत वेगळी हाताळणी करून तयार केलेला हा चित्रपट याआधीच भारतातील राष्ट्रीय पुरस्काराचा धनी ठरला आहे. त्यामुळं आता ऑस्करसारख्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेत या सिनेमाचं काय होणार, ही उत्सुकता आहे.
जगभरात अत्यंत प्रतिष्ठा मिळविलेल्या ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी जगभराचे सिनेमे येत असतात. भारतही गेल्या ४८ वर्षांपासून या स्पर्धेसाठी आपले सिनेमे पाठवतो आहे. यंदा कोर्ट या सिनेमाची निवड आपल्या निवड समितीनं केली आहे. अमोल पालेकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीनं सुमारे ३० चित्रपटांचं परीक्षण करून त्यातून 'कोर्ट'ची निवड केल्यानं आता हा सिनेमा भारताची अधिकृत प्रवेशिका मानला जाणार आहे.
चैतन्य ताम्हाणे या मराठी तरुणानं अवघ्या सव्वीसाव्या वर्षी हा सिनेमा तयार केला. भारतातल्या आधुनिक पिढीतील प्रयोगशील तरुणाईचं चैतन्य हे एक चैतन्यशील प्रतीक आहे, असं म्हणायला हरकत नाही. या सिनेमानं यापूर्वीच जगभरातल्या समीक्षकांची वाहव्वा मिळविली आहे आणि भारतानंही आपला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सर्वोच्च असा राष्ट्रीय पुरस्कार देऊन कोर्टचा यापूर्वीच गौरव केला आहे. आता ऑस्करसारख्या मोठ्या, आंतरराष्ट्रीय पातळीवर या सिनेमाकडं कसं पाहिलं जाईल, याची उत्सुकता आहे.
दर वेळी भारतातील सिनेमे 'ऑस्कर'ला पाठवायचा विषय निघाला, की मुळात ऑस्करला एवढं महत्त्व द्यायचं कारण काय, असा वाद उपस्थित केला जातो. त्यापेक्षा आपल्या चित्रकर्मींनी आपले राष्ट्रीय पुरस्कारच महत्त्वाचे मानावेत, असं म्हटलं जातं. अगदी आत्ताच्या ऑस्कर निवड समितीने अध्यक्ष अमोल पालेकर यांचीही अशीच भूमिका आहे. आपल्या पुरस्कारांविषयी आदरच आहे. पण केवळ तेवढ्यावरच थांबून कसं चालेल? ऑस्करकडं केवळ अमेरिकी किंवा हॉलिवूडच्या सिनेमांना पुरस्कार देणारी संस्था एवढ्याच मर्यादित दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ नये. मुळात आपण ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट विभागात भाग घेतो. त्यापलीकडं त्यांचे स्वतःचे अनेक कित्येक सिनेमे विविध गटांत नामांकनं मिळवून असतात. त्यामुळं आपला विभाग व तिथली स्पर्धा मुळात त्यांच्या लेखी फार दखल घेण्यासारखी असते, असंही नाही. पण तरीही या पुरस्काराचं एक महत्त्व आणि ग्लॅमर आहेच. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या सिनेमाला ओळख मिळवून देण्यासाठी या विभागातील निवडीचा निश्चितच फायदा होतो. जगभरातील सिनेमाप्रेमींपर्यंत पोचण्यासाठी ही प्रसिद्धी फार उपयोगी पडते. शिवाय ऑस्करच्या निवड प्रक्रियेचा पुष्कळ दबदबा आहे. राजकारण आणि पक्षपातीपणा सगळीकडंच सुरू असतो. ऑस्करही त्याला अपवाद नाही. मात्र, हे आरोप-प्रत्यारोप मुख्य अमेरिकी किंवा इंग्रजी भाषक सिनेमांसाठी होत असतात. परदेशी भाषा विभागासाठी एवढं राजकारण केलं जात असल्याची चर्चा नाही.
आता कोर्ट सिनेमाच्या संभाव्य अंतिम फेरीत जाण्याच्या शक्यतेबाबत पाहू. कोर्ट हा आपली वेगळी चित्रभाषा घेऊन आलेला सिनेमा आहे, यात शंका नाही. मराठी किंवा एकूणच जनरल भारतीय प्रेक्षकांना असा सिनेमा पाहण्याची सवय नाही. त्यामुळंच कोर्ट आपल्याकडं प्रदर्शित झाला, तेव्हा अपेक्षेप्रमाणेच त्याला फार प्रतिसाद मिळाला नाही. राष्ट्रीय पुरस्काराचं कौतुक ऐकून सिनेमा पाहायला गेलेल्या सामान्य प्रेक्षकांना समोर काय चाललंय, हेच झेपलं नाही. चित्रसाक्षरतेचा अभाव हेच यामागचं प्रमुख कारण होतं, यात शंका नाही. त्यात कोर्टचा किंवा त्याच्या दिग्दर्शकाचा दोष नाही. भारतातील न्यायव्यवस्थेवर आपल्या खास शैलीत उपहासात्मक टिप्पणी करणारा हा सिनेमा जोखण्यासाठी, दिग्दर्शकाला प्रत्येक चित्रचौकटीतून काय सांगायचंय हे जाणता येणं फार गरजेचं आहे. या सिनेमात चैतन्यनं केलेला कॅमेराचा वापर, पार्श्वसंगीत (किंवा त्याचा अभाव असं म्हणू), सिंक साउंड, संपूर्ण दृश्य कवेत घेणारे शॉट्स, कट्सचा कमीत कमी वापर, प्रत्येक फ्रेम फेडआउट होण्यापूर्वी दिलेला अवकाश, स्टार व्हॅल्यू असलेल्या कलाकारांचा अभाव, प्रत्येक पात्र नैसर्गिकरीत्या जी भाषा बोलतं आहे तिचाच वापर, कुठलीही नाट्यमयता निर्माण करण्याचा टाळलेला मोह या आणि अशा अनेक मुद्द्यांचा एकत्रित विचार केला, तर कोर्ट या कलाकृतीचं वेगळेपण लक्षात येतं. भारतातील न्यायव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या या सिनेमात या व्यवस्थेचा अंगभूत कोरडेपणा, तटस्थपणा (जो प्रसंगी कोडगेपणा वाटू शकतो) मूर्तिमंत दिसणं गरजेचं होतं. यासाठी दिग्दर्शकानं हेतुतः पात्रांचे मिड-शॉट, क्लोजअप्स किंवा एक्स्ट्रीम क्लोजअप घेण्याचं टाळलेलं दिसतं. त्याऐवजी आपल्याला बरीचशी दृश्यं पॅन स्वरूपात दिसतात. कोर्टाची बहुतांश दृश्यं एका कोपऱ्यात किंवा बाजूला कॅमेरा ठेवून स्थिरपणे घेतलेली आहेत. ही उंची साधारण कोर्टात खटला ऐकायला आलेल्या किंवा बाजूला उभं राहिलेल्या माणसांच्या आय-लेव्हलची आहे. यामुळं त्या वातावरणात भरून राहिलेला कोरडेपणा यामुळं प्रेक्षकाच्या मनात उतरायला सहज मदत होते. आणखी एक लक्षात राहणारं दृश्य म्हणजे कोर्टाला मोठी सुट्टी लागते, तेव्हा शिपाई एकेक करून दारं-खिडक्या बंद करून घेतो आणि निघून जातो. त्यानंतर त्या दालनात केवळ अंधार भरून राहतो. पडद्यावर सुमारे ३० सेकंद ते एक मिनिट एवढा कालावधीत केवळ अंधार दिसतो. हा काळ दिसायला लहान वाटत असला, तरी सिनेमातल्या दृश्याच्या मानानं तो खूप मोठा आहे. एवढा दीर्घ काळ पडदा ब्लँक पाहण्याचीही सवय आपल्या प्रेक्षकाला नाही. तेव्हा तो अंधार आपल्या आत घेण्याची संधी तो साधत नाही, तर चुळबूळ करू लागतो. वास्तविक याच दृश्यावर सिनेमा संपायला हवा होता, असं मला वैयक्तिकरीत्या वाटलं. पण दिग्दर्शकानं एपिलॉग किंवा उपसंहारासारखं पुढं न्यायाधीशांच्या ट्रिपचं दृश्य आणि शेवटी ते त्या मुलाला मारतात हा प्रसंग आणलाय. तोही पुरेसा सूचक आहे. या सिनेमात नारायण कांबळे, त्यांचे वकील, सरकारी वकिलीणबाई आणि शेवटी न्यायाधीश अशी चार प्रातिनिधिक पात्रं आणि त्यांचं वैयक्तिक जगणं दिग्दर्शकानं तपशीलवार दाखवलंय. माणसाचा पेशा आणि त्याचं वैयक्तिक आयुष्य एकमेकांपासून वेगळं काढता येत नाही. एखादी व्यक्ती ज्या पर्यावरणात, ज्या संस्कारात वाढते-जगते, त्याचा अपरिहार्य परिणाम त्याच्या पेशावर, त्याच्या विचारांवर, त्याच्या निर्णय प्रक्रियेवर होत असतो, हे दिग्दर्शक सांगतो.
यात न्यायालयीन कामकाज एका गतीनं सुरू असतं, तर त्यात सहभागी लोकांचं वैयक्तिक आयुष्य वेगळ्या गतीनं पळत असतं. सरकारी वकिलीणबाईंचा लोकलमधला प्रवास आणि त्यातली चर्चा किंवा नारायण कांबळेच्या वकिलाचं आई-वडिलांसोबत जेवण घेत असतानाचं दृश्य आणि नंतर तो बारमध्ये जातो तो प्रसंग यातून हे दिसतं. न्यायव्यवस्था ही तुमच्या-आमच्या माणसांमधूनच घडलेली आहे आणि कागदोपत्री नियमांनी बद्ध असली, तरी तिला मानवी जगण्यातल्या स्खलनशीलतेचा अपरिहार्य स्पर्श होतच असतो, हेच दिग्दर्शक अधोरेखित करू इच्छितो. यात मरण पावलेल्या सफाई कामगाराच्या बायकोचं पात्र दाखवून दिग्दर्शकानं सामान्य माणसाचा हतबलपणा आणि त्यातूनही सावरण्याची त्याची जिद्द प्रभावीपणे दाखवली आहे. न्यायाधीश सदावर्तेंचं पात्र आणि शेवटी ट्रिपच्या प्रसंगांतलं त्यांचं वागणं-बोलणं, ज्योतिषावरचा विश्वास या सगळ्या गोष्टी दाखवून दिग्दर्शक अनेक छुप्या सत्यांचं सूचन करतो. शिवाय नारायण कांबळे हे लोकपरंपरेतून आलेले शाहीर आणि त्यांचे जलसे दाखवताना दिग्दर्शक समाजातल्या एका वेगळ्या, उपेक्षित वर्गाकडं लक्ष वेधतो. या देशात न्यायापासून वंचित असा केवढा तरी मोठा समाज पसरलेला आहे आणि तो या व्यवस्थेच्या परिघातदेखील नाही, हे अत्यंत प्रखरतेनं आपल्या लक्षात आणून देतो. कोर्टचं यश आणि महत्त्व अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये दडलेलं आहे.
अशी पारंपरिक सिनेमाच्या रचनेपासून वेगळी शैली हे कोर्टचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळंच तो आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जागतिक सिनेमाच्या खांद्याला खांदा लावून उभा राहू शकतो. अर्थात ऑस्कर स्पर्धेचं स्वरूप पाहता, केवळ चित्रपटाच्या गुणवत्तेवर अवलंबून राहता येत नाही. तिथं सिनेमाचं जोरदार मार्केटिंग करावं लागतं. रीतसर एजन्सी नेमून लॉबिंग करावं लागतं. सिनेमांचे ज्युरी वेगवेगळ्या ठिकाणी हे सिनेमे पाहत असतात. जास्तीत जास्त ज्युरींपर्यंत आणि तेथील स्थानिक प्रेक्षकांपर्यंत (म्हणजे अमेरिकेत स्थित मराठी लोक नव्हेत, अमेरिकी प्रेक्षक...) पोचणं फार आवश्यक असतं. त्या सिनेमाची तिथं थोडी-फार चर्चा व्हावी लागते. कारण स्पर्धेत उतरणारे सगळे नसले, तरी किमान निम्मे सिनेमे चांगल्या गुणवत्तेचेच असतात. त्यामुळं त्यांच्या स्पर्धेत आपला सिनेमा टिकण्यासाठी तिथं या बाकीच्या आयुधांचीही गरज लागते. भारतानं गेल्या ५९ वर्षांत ४८ सिनेमे ऑस्करला पाठवले. त्यापैकी केवळ मदर इंडिया, सलाम बॉम्बे आणि लगान हे तीनच सिनेमे अंतिम पाच सिनेमांत नामांकन मिळवू शकले. या विभागातला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा प्रत्यक्ष पुरस्कार तर अद्याप एकाही भारतीय सिनेमाला मिळालेला नाही. ऑस्करची ती बाहुली आपल्याला अगदीच अप्राप्य का? ऑस्करची निवडपद्धत आणि अमेरिकी ज्युरी व तेथील प्रेक्षकांच्या मानसिकतेत दडलेलं आहे. ऑस्करसाठी निवडलेले जाणारे सिनेमे सुमारे अडीच हजार ज्युरींकडून पाहिले जातात. सर्वोत्कृष्ट सिनेमा निवडणारा, १) युनिव्हर्सल अपील असलेल्या सिनेमाच्या खास अशा चित्रभाषेचा परिणामकारक वापर, २) मानवी मूल्यांचा चिरंतनपणा सिद्ध करणारं कथानक, ३) जागतिक दर्जाचा अभिनय आणि ४) उत्कृष्ट तांत्रिक दर्जा यांना साधारणतः सर्वोच्च गुण मिळतात, असं एक निरीक्षण आहे. यापूर्वी भारतानं पाठवलेले चित्रपट हे सर्व निकष पूर्ण करीत होते, असं म्हणणं धार्ष्ट्याचं होईल. आता निवडलेला कोर्ट किमान यातल्या पहिल्या निकषात नक्कीच बसतो. या वेळी स्पर्धेत आणखी कोणते सिनेमे येतात, त्यावर बरंचसं अवलंबून असेल. पाश्चात्त्य देशांत न्यायप्रक्रिया अगदी जलद असते. त्या पार्श्वभूमीवर भारतीय न्यायव्यवस्थेचं चित्र त्यांना कसं वाटेल, हे सांगता येत नाही. सिनेमाचा विषय अपील होणं ही एक वेगळीच गोष्ट असते आणि ती अगदीच सापेक्ष असते. त्यामुळंच अनप्रेडिक्टेबल असे निकाल लागू शकतात. कोर्टची केस नक्कीच सशक्त आहे. त्याला विजेतेपदाच्या बाहुलीचा न्याय मिळतो का, हे बघणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.
---

गेल्या पाच वर्षांतील सर्वोत्कृष्ट सिनेमे 
(परदेशी भाषा विभाग या गटातील)

२०१५ - इडा (पोलंड, दिग्द. पावेल पावलीकोव्हस्की)
चित्रपटाचा कथाकाळ १९६२ चा. इडा ही तरुणी कॅथॉलिक नन होण्यापूर्वी तिच्या नातेवाइक असलेल्या न्यायाधीश वांडा हिला भेटायला जाते. तेव्हा तिला तिचा भूतकाळ समजतो आणि तिचे आई-वडील ज्यू असल्याचे आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मन लोकांकडून मारले गेल्याचे समजते. इडाचा वांडाकडे जाताना प्रवास यात दर्शविला आहे. पोलंडच्या चित्रपटाने प्रथमच या विभागात पुरस्कार मिळविला.

२०१४ - द ग्रेट ब्यूटी (इटली, दिग्द. पाओलो सोरेंटिनो)
जेप गँबरडेला नावाच्या एका लेखकाच्या आयुष्याची ही कथा आहे. आता पासष्टीत असलेल्या या लेखकाने त्याच्या तिशीत एक प्रसिद्ध कादंबरी लिहिली आहे. आता मात्र तो रोममध्ये सांस्कृतिक सदरं लिहिणे आणि पार्ट्यांना हजेरी लावणे असं सुखासीन आयुष्य जगत असतो. एके दिवशी तो घराबाहेर पडतो आणि शहराच्या रस्त्यांवर त्याला विविध पात्रं भेटतात. त्याची जुनी प्रेयसी भेटते... जगण्यातल्या अपूर्णतेची जाणीव मग त्याला होते.

२०१३ - अमूर (ऑस्ट्रिया, दिग्द. मायकेल हॅनिकी)

संगीत शिक्षक म्हणून निवृत्त झालेल्या अॅन आणि जॉर्जेस या वृद्ध दाम्पत्याची ही हळवी कथा. त्यांची एकुलती एक मुलगी परदेशात असते आणि अचानक एके दिवशी अॅनला पक्षाघाताचा झटका येतो आणि तिची उजवी बाजू लुळी पडते... हा ऑस्ट्रियाचा 'संध्याछाया' म्हणायला हरकत नाही. पण अर्थातच टेकिंग उत्कृष्ट!

२०१२ - ए सेपरेशन (इराण, दिग्द. असगर फरहादी)
नादेर आणि सिमिन हे इराणमधील मध्यमवर्गीय जोडपं १४ वर्षांच्या संसारानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतं. त्यानंतर नादेर आपल्या अल्झायमरनं त्रस्त असलेल्या वडिलांच्या देखभालीसाठी एका विवाहित, पण गरजू स्त्रीला कामावर ठेवण्याचा निर्णय घेतो आणि तेथून गुंतागुंत वाढत जाते.

२०११ - इन ए बेटर वर्ल्ड (डेन्मार्क, दिग्द. सुझॅन बायर)

अंतोन या स्वीडिश डॉक्टराच्या आयुष्याची ही कथा आहे. डेन्मार्कमधील घर आणि सुदानमधील निर्वासितांची छावणी यात ये-जा करणाऱ्या अंतोनचं वैवाहिक आयुष्य संकटात सापडलं आहे. त्याला दोन मुलगेही आहेत. त्यांनाही त्यांच्या आयुष्यात समस्या भेडसावताहेत. अखेर बऱ्याच संघर्षानंतर सर्व नातेसंबंध जुळून येतात.

---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे - २७ सप्टेंबर २०१५)
----

28 Sept 2015

आपले आनंदगाणे....



पहाटेची वेळ असते.. आपण कुठं तरी निसर्गाच्या कुशीत... टेकडीवर... सूर्योदय होतोय... पूर्व दिशा केशरिया रंगानं उजळलीय... अन् आपण एक गाणं सुरू करतो... इअरफोनमधून 'लेकिन'मधल्या 'सुनियो जी...' गाण्यापूर्वीची ती जोरदार तान कर्णपटलातून थेट शरीरातल्या प्रत्येक पेशीपेशीत घुसते... ती ऐकता ऐकताच डोळे घळघळा वाहू लागतात... काही तरी प्रचंड दैवी अनुभूती येते... मन भरून येतं... एकदम पवित्र, सुंदर भावनेनं आपण गद् गद् होतो... हे लताचं गाणं...! कित्येकदा ऐकलं, तरी हीच अनुभूती कायम देणारं... काय असेल ही लता मंगेशकर नावाची जादू? काही नावं उच्चारली, की मनात एकदम पवित्र, निर्मळ भाव उमटतात. चेहऱ्यावर हसू उमलतं. लता मंगेशकर हे सात अक्षरी नावही असंच. सप्तसूरच जणू... या नावानं आपल्या जगण्याला अर्थ दिला. आपल्या अस्तित्वाला सार्थकतेचा सूर दिला. आपल्या विरूप, क्षुद्र, क्षुल्लक आयुष्याचा गाभारा स्वरओंकाराच्या निनादानं भारून टाकला...
लता मंगेशकर या नावाच्या ख्यातनाम गायिकेविषयी बोलताना अशा अनेक विशेषणांची खैरात करता येईल. तरीही जे सांगायचंय ते पूर्णांशानं सांगता येईलच असं नाही. कारण सर्वोत्तमालाही व्यापून दशांगुळे उरलेली ही लता नावाची जिवंत दंतकथा आहे. अवकाशाच्या भव्यतेचं वर्णन करता येत नाही, महासागराच्या अथांगतेला लिटरचं माप लावून चालत नाही, सूर्याचं तेज थर्मामीटरनं मोजता येत नाही, तसंच लताच्या गाण्याला कशानं मोजता येत नाही. ही एक अनुभवण्याची गोष्ट आहे.
लहानपणापासून ते मृत्यू येईपर्यंत जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर लताचा स्वर आपल्याला साथ देत आलाय. तो ज्यांनी ज्यांनी प्रथम ऐकला, तेव्हाच सगळ्यांना जाणवलं, की हे नेहमीचं साधंसुधं गाणं नाहीय. हे त्यापलीकडं जाणारं काही तरी आहे. काळीज पिळवटून टाकणारी आर्तता त्यात आहे... काही तरी प्युअर, शुद्ध असं त्यात आहे... जे ऐकल्यावर हिंदीत ज्याला 'सुकून मिलना' म्हणतात, तसं काहीसं आपल्याला होतं. आत कुठं तरी शांत वाटतं, खूप आश्वासक वाटतं... अनेकदा अंतःकरण उचंबळून येतं, पोटात कुठं तरी हलतं, अंगावर रोमांच उभे राहतात... डोळे तर अनेकदा पाण्यानं भरतात. असं आपलं शरीर सतत या सूरांना दाद देत असतं. हा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे. काय आहे हे? आपला या स्वराशी असा जैव संबंध कसा जोडला गेला? हीच लताच्या आवाजाची जादू आहे, हे निखालस...
आणखी एक म्हणजे संगीत आपल्या श्वासातच आहे. लय-ताल आपल्या रोमारोमांत आहे. आपण गाणं आवडणारी, गाणारी, गुणगुणणारी माणसं आहोत. हे सात सूर हीच आपल्या हृदयाची अभिव्यक्ती आहे. आपण हसतो, रडतो, रागावतो, चिडतो, रुसतो सारं काही गाण्यांतून... आपल्या या प्रत्येक भावनेला लतानं स्वररूप दिलं. आणि ते एवढं उच्च होतं, की आपल्याला दुसऱ्या कशाची गरजच पडली नाही. लताचा आवाज आणि आपलं जगणं... साथ साथ! या स्वरानं आपला सच्चेपणा कधी सोडला नाही. त्यानं आपल्याला कधी फसवलं नाही. न मागता भरभरून दिलं. वर्षानुवर्षं तो स्वर न थकता, न कंटाळता, न चिडता आपल्याला फक्त देत राहिला... आपण घेत राहिलो आणि तृप्त होत राहिलो. आपली झोळी कायमच दुबळी राहिली... एखाद्या उंच पर्वतशिखरावर उभं राहून अजस्र घनांतून सहस्रधारा दोन हातांनी कवेत घेण्याचा प्रयत्न करण्यासारखंच होतं ते. आपण त्या सूराच्या वर्षावात अक्षरशः बुडून जात राहिलो...
एवढं निखळ, नितळ, स्फटिकासारखं पारदर्शक असं या जगात दुसरं काय आहे? लताचा स्वर मात्र आहे तसाच आहे. त्यामुळं नातीच्या वयाच्या नायिकेलाही तो स्वर सहज शोभून जातो. आपल्या देशात एवढं वैविध्य आहे... एवढे भेद आहेत... पण सगळ्या भिंती मोडून एकच सूर सर्वांना बांधून ठेवतो - तो म्हणजे लतास्वर. याचं कारण त्या आवाजात अशी काही जादू आहे, की तो थेट तुमच्या हृदयात उतरतो. एकदा म्हणजे एकदाही, अगदी चुकूनही तो बेसूर होत नाही. त्याचा कधी कंटाळा येत नाही... एक वेगळंच आत्मिक समाधान मिळतं ते सूर कानी पडल्यावर!
आपण देव कधी पाहिलेला नाही, पण अनेकांना त्याचं अस्तित्व जाणवतं. लताचा आवाज ऐकल्यावर अशीच काहीशी अनुभूती येते. यापेक्षा सर्वोच्च, श्रेष्ठ काही असू शकणार नाही, असं वाटतं.
आपलं भाग्य म्हणून आपण या काळात आहोत. आपण अभिमानानं सांगू शकतो, की आम्ही सरस्वती पाहिली नाही, आम्ही स्वर्ग पाहिला नाही... पण आम्ही लताला ऐकलंय...
लता मंगेशकर नाव धारण करणारा देह आज कागदोपत्री ८४ वर्षांचा झाला... पण लता मंगेशकर नावाची स्वरसम्राज्ञी आपल्या मनात कायमच चिरतरुण राहणार आहे... आजन्म...!
---

(पूर्वप्रसिद्धी - २८ सप्टेंबर २०१३, मटा, पुणे आवृत्ती)

----

30 Aug 2015

रिव्ह्यू - हायवे : एक सेल्फी आरपार




स्वतःकडे नेणारा महामार्ग
-------------------------------


उमेश कुलकर्णी हा श्वासोत्तर मराठी सिनेमाच्या प्रमुख बिनीच्या शिलेदारांपैकी एक महत्त्वाचा चित्रकर्मी आहे. वळू, विहीर आणि देऊळ या त्याच्या तिन्ही मराठी चित्रपटांतून त्यानं स्वतःची अशी एक खास चित्रभाषा, शैली विकसित केली आहे. लेखक गिरीश कुलकर्णी त्याचा या प्रक्रियेतील महत्त्वाचा जोडीदार. त्यामुळंच या जोडगोळीचा नवा सिनेमा येतोय म्हटल्यावर अनेकांना त्याची उत्सुकता लागलेली असते. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या चित्रपटातून काही तरी महत्त्वाचं, सकस असं आशयसूत्र गवसेल, अशी अनेकांना अपेक्षा असते. हायवे - एक सेल्फी आरपार हा त्यांचा नवा चित्रपट या दृष्टीनं आपली निराशा करीत नाही. किंबहुना उमेश-गिरीश यांच्या आधीच्या वाटचालीकडं पाहता, ती शैली आणि तो आशय पुढं नेणारीच कलाकृती त्यांच्याकडून तयार झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही.
मुंबईकडून पुण्याला निघालेली वेगवेगळ्या स्वभावाची, वयाची, पेशाची माणसं आणि त्यांचा एकाच वेळी सुरू असलेला, पण तरीही एकमेकांशी अनभिज्ञ असलेला प्रवास आणि अचानक या वेगवान प्रवासात खंड पडल्यानंतर त्यांचं थबकणं आणि त्यातून स्वतःकडं त्यांचा वेगळा प्रवास सुरू होणं ही या चित्रपटाची ‘वनलायनर’ सांगता येईल. चित्रपटाचा प्रारंभ होतो तो एका वैशिष्ट्यपूर्ण फ्रेममधून. मुंबईत चाळीत राहणारा एक तरुण मुलगा बाहेर पडतो आहे, आणि तो चाळ सोडून रस्त्यावर येतोय तेव्हा मागे एक टोलेजंग इमारत जणू त्या चाळीला विळखा घालून तिचा घास घ्यायला टपलेली अशी. या एकाच दृश्यचौकटीमधून दिग्दर्शक किती तरी गोष्टी न बोलता सांगून जातो. 


महानगरांमधले वेगवान बदल, त्यात राहणाऱ्या लोकांचं बदललेलं जीवनमान आणि रस्त्यावर वाढलेली गर्दी अशा अनेक गोष्टींवरचं हे बोलकं भाष्य. त्यानंतर एकेका पात्राची ओळख होत जाते. यात सुनील बर्वे आणि व वृषाली कुलकर्णी (सौ. गिरीश कुलकर्णी) या उच्चभ्रू जोडप्यासह एक फडात नाचणारी तरुणी (मुक्ता बर्वे), तिची आई (शकुंतला नगरकर), एक एनआरआय इंजिनीअर (गिरीश कुलकर्णी), एका सीरियलमधल्या लोकप्रिय नटीला (हुमा कुरेशी) राजकीय कार्यक्रमासाठी पुण्याला घेऊन चाललेला कार्यकर्ता (श्रीकांत यादव), एक श्रीमंत पण एकटी महिला (टिस्का चोप्रा), तिच्यासोबत ‘मसाज’ (!) करण्यासाठी लोणावळ्याला निघालेला तरुण,  एक निम्नमध्यमवर्गीय भांडणारं जोडपं (किशोर कदम व छाया कदम), गिरीश कुलकर्णीनं गाडीतून खाली उतरवलेला तरुण (निपुण धर्माधिकारी), किरकोळ अॅक्सिडेंट झाल्यामुळं गिरीश कुलकर्णीच्या गाडीत (पोलिसांच्या मध्यस्थीनंतर) बसलेलं जोडपं (विद्याधर जोशी व रेणुका शहाणे), एका गाडीत बसलेले सगळेच अनोळखी लोक (सतीश आळेकर आणि धीरेश जोशी आदी) आणि ट्रकमधून लिफ्ट घेणारे नागराज मंजुळे व त्याचे दोन संशयास्पद साथीदार अशी अनेक पात्रं भेटत राहतात. या प्रत्येकाची ओळख आणि त्यांच्या प्रत्येकाच्या वैचित्र्यपूर्ण तऱ्हा हे मांडण्यातच सिनेमाचा पूर्वार्ध जवळपास संपतो. पण या काळात अनेक पात्रं आपल्यासमोर येत असल्यानं आणि वेगवान घडामोडी घडत असल्यानं मध्यंतरापर्यंत हा सिनेमा चांगलाच खिळवून ठेवतो. या सर्व मांडणीत गिरीशचे चटपटीत संवाद, सर्वच अभिनेत्यांनी केलेला कमाल अभिनय आणि दृश्यमांडणीतले वेगळे प्रयोग (गाडीच्या वेगवेगळ्या कोनांतून दिसणारी पात्रं आणि त्यामुळं आपणच गाडीत बसलो आहोत असा येणारा फील किंवा हायवेवरच्या वेगाची अनुभूती देणारे प्रसंग इ.) यामुळं हा पूर्वार्ध पाहताना आपण दंग होऊन जातो. यात सगळ्यांत जमलेले प्रसंग आहेत ते सुनील बर्वे आणि वृषाली कुलकर्णी यांचे. व्यारूती असं नाव असलेली ही गर्भवती तरुणी गडबडीत लिफ्टमध्ये अडकते इथून पुढच्या सर्व प्रवासात या जोडप्याच्या आयुष्यातल्या सर्व प्रकारच्या विसंगती विनोदी पद्धतीनं समोर येत राहतात. 
या तुलनेत उत्तरार्ध संपूर्ण वेगळा आहे. हायवेवर घाटात ट्रॅफिक जॅम होतं आणि आपले हे सगळे लोक एकाच ठिकाणी अडकून पडतात. त्यानंतर जे काही होतं, तो या सिनेमाचा कळसाध्याय आहे. सगळे जण वेगानं कुठं तरी निघाले आहेत आणि त्यांना त्यांची इच्छा नसतानाही अडकून पडावं लागलं आहे. यामुळं सगळेच जण आधी उद्विग्न, मग चिडचिडे, नंतर हतबल आणि शेवटी अगदी शांत होतात. त्यांचा हा जो स्वतःकडं जाण्याचा प्रवास आहे, तोच हा सिनेमा आहे. यातलं मर्म ज्याला कळलं, त्याला सिनेमा कळला! शेवटी रेणुका शहाणे ‘घनतमी शुक्र बघ राज्य करी’ या भा. रा. तांब्यांच्या कवितेच्या ओळी म्हणते आणि मग त्या अनुषंगानं जे जे काही घडतं, ते या सगळ्या खटाटोपाचं सार आहे. आपलं आत्ताचं आयुष्य म्हणजे असाच एक वेगवान प्रवास आहे आणि तो करत असताना आपल्याला कुठंही थांबायचं नाहीये, कुणासाठीही थांबायचं नाहीये. कुठल्याही अज्ञात शक्तीनं जादू केल्याप्रमाणं आपण फक्त तिच्या दिशेनं वेगानं खेचले जात आहोत. हे करताना आपण स्वतःशी बोलायचंही विसरून जात आहोत. कुणी आपल्याला हा अवसर मिळवून दिलाच तर त्याचं महत्त्व कळण्याऐवजी आपण वेळ घालविल्याबद्दल त्याच्यावर चिडचिड करू, अशी आत्ताची स्थिती आहे. हे सगळं या सिनेमात नीट आलं आहे.
एक मात्र झालंय. कितीही समजून घ्यायचं म्हटलं तरी उत्तरार्धाचा अत्यंत कमी झालेला पेस प्रेक्षकांना लवकर झेपत नाही, हे खरं आहे. आत्तापर्यंत सुरू असलेला सगळा गोंधळ, सगळा केऑस एकदम थांबतो. त्यानंतर सिनेमा थेट पात्रांच्या एकमेकांशी सुरू होणाऱ्या संवादावर भर द्यायला लागतो. हा सांधेबदल अलवारपणे न होता, अगदी आघात केल्याप्रमाणं होतो. त्यामुळं त्या बदललेल्या गतीशी प्रेक्षक म्हणून आपल्याला मॅच करणं काहीसं कठीण जातं. शिवाय ट्रॅफिक जॅमचं चित्रिकरण (अर्थातच) स्टुडिओत किंवा इनडोअर झालंय हे स्पष्ट दिसतं. त्यामुळं पूर्वार्धातल्या हायवेवरच्या दृश्यांमुळं कथावस्तूला मिळालेली एक ऑथेंटिसिटी इथं मार खाते. आणि एकदा का नेपथ्याला भगदाड पडलं, की पात्रांमधील आपली गुंतवणूक आपोआपच कमी व्हायला लागते. इथं काही पात्रांच्या गोष्टीला लॉजिकल शेवट मिळतो आणि तो आपल्यालाही समजून घेता येतो. मात्र, काही दृश्यं यात का आहेत, हे शेवटपर्यंत कळत नाही. म्हणजे मुक्ता बर्वे आणि तिची आई एका दाक्षिणात्य ट्रकड्रायव्हरला उभं करून निसर्गाच्या हाकेला साद द्यायला जातात तो, किंवा शशांक शेंडेचा मुलगा हरवतो तो प्रसंग किंवा श्रीकांत यादवचा कार्यकर्ता दारू पिऊन स्वतःची उद्विग्नता व्यक्त करतात तो, किंवा तो पक्षी पाळणारा मतिमंद माणूस आणि एक मुलगी यांचा संवाद यांचे धागेदोरे नीट जुळत नाहीत. मुक्ता बर्वेशी आधी भांडण करणारा माणूस, नंतर त्याला फीट आल्यावर याच दोघी त्याची शुश्रूषा करतात, तेव्हा मुक्ताच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो हा प्रसंग जबरदस्त आहे. मात्र, घनतमी गाण्याच्या पार्श्वभूमीवर हे दृश्य दिसतं तेव्हा प्रेक्षकांत हशा पिकतो. (जो अगदीच अस्थानी आहे. वास्तविक या दृश्यातलं कारुण्य अंगावर येतं...) टिस्का चोप्राची कथाही यथातथाच आहे आणि त्या मसाजवाल्या मुलाचा सगळा भाग किंवा हुमा कुरेशीचा सगळा भाग हा सिनेमात ग्लॅम कोशंट अॅड करण्यासाठीच आला असावा, असं वाटतं. दोघींनी कामं मात्र झकास केलीयत. सगळ्यांत ठसतात वृषाली कुलकर्णी, छाया कदम आणि मुक्ता बर्वे. या तिन्ही बायकांनी (आणि अर्थात टिस्का व हुमा) कमाल केली आहे. गिरीश कुलकर्णीनं यात साकारलेला एनआरआय इंजिनीअर आणि त्याची भाषा बघण्या-ऐकण्यासारखी आहे. रेणुका शहाणेनं अगदी छोटया रोलमध्ये कमाल केली आहे आणि ती दिसलीयसुद्धा छान!
सिनेमाचं संगीत अमित त्रिवेदीचं आहे. ते फार काही लक्षात राहत नाही. मात्र, सिनेमॅटोग्राफी (सुधाकर रेड्डी) अप्रतिम. विशेषतः पहिल्या भागात तर झक्कासच.
तेव्हा स्वतःकडं जाणाऱ्या या महामार्गाची सफर न चुकता कराच.

दर्जा - साडेतीन स्टार

------------------

2 Aug 2015

मोबाइल क्रांतीची दोन दशकं....

भारताच्या आधुनिक इतिहासात मोबाइल क्रांतीमुळं मोठाच आर्थिक, सामाजिक बदल घडवून आणला आहे, हे वाक्य काहीसं गुळगुळीत वाटत असलं, तरी वास्तव मांडणारं आहे. मला तर वाटतं, इसवी सन पूर्व आणि इसवी सन अशी जुन्या काळाची आपण विभागणी केली आहे, तशीच आता मोबाइलपूर्व आणि मोबाइलोत्तर अशी आधुनिक काळाची वाटणी करायला हवी. १९९५ मध्ये किंवा त्यानंतर जन्मलेली पिढी आता वीस वर्षांची झालीय. त्यांना मतदानाचाही अधिकार मिळाला आहे. प्रौढांसाठीचे सिनेमे पाहण्याचा अधिकार मिळालाय. एका अर्थानं ही भारताची खरी आधुनिक पिढी आहे. तंत्रज्ञानामुळं प्रत्येक पुढील पिढीला फायदा होतो, ही गोष्ट खरी असली, तरी मोबाइलमुळं समाजातल्या वर्गविग्रहांचं जे सपाटीकरण झालं आहे, ते अभूतपूर्व आहे. भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशाला तंत्रज्ञानानं दिलेली ही फार मोठी देणगी आहे. त्या अर्थानं मोबाइल हा आपल्या देशासाठी ग्रेट इक्वलायझर ठरला आहे.
भारतात मोबाइलचं आगमन होण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली ती १९९१ या वर्षामुळं. भारतानं याच वर्षात आर्थिक उदारीकरणाच्या राजमार्गावर पाऊल ठेवलं. काही विपरीत आर्थिक व राजकीय परिस्थितीमुळं तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांना हा निर्णय घ्यावा लागला. मात्र, तो भारताच्या दीर्घकालीन फायद्यासाठी पथ्याचाच ठरला. भारताची प्रचंड मोठी बाजारपेठ जगासाठी खुली झाली. राजीव गांधींच्या काळात एसटीडी, आयएसडीच्या माध्यमातून टेलिफोन क्रांती झालीच होती आणि आता मोबाइलच्या आगमनासाठी देश सज्ज झाला होता. तेव्हा बिर्ला एटी अँड टी, बीपीएल, हच आणि एअरटेल अशा काही मोजक्या कंपन्यांनी देशात मोबाइल सेवा सुरू केली. (पहिली व्यावसायिक मोबाइल सेवा सुरू झाली ती कोलकत्यावरून - तारीख होती १५ ऑगस्ट १९९५.) तेव्हा वृत्तपत्रांत या मोबाइल कंपन्यांच्या मोठमोठ्या पानभर ब्लॅक अँड व्हाइट जाहिराती येत असत. मोटोरोला कंपनीचे वॉकीटॉकीसारखे मोठ्या आकाराचे हँडसेट तेव्हा मिळत. आणि तेव्हाचे २४ रुपये प्रतिमिनिट आउटगोइंग आणि १६ रुपये इनकमिंग हे दर अनेकांना आठवत असतील. या महागड्या दरांमुळं मोबाइल लगेचच सर्वव्यापी झाला नाही. तेव्हा अनेकांकडं लँडलाइन फोन होते आणि ते बऱ्यापैकी उपयुक्त होते. शिवाय तुलनेनं स्वस्त होते. शिवाय मोबाइलला पर्याय म्हणून तेव्हा पेजर वापरले जायचे. हे उपकरण तर अगदी झपाट्यानं कालबाह्य झालं. छोट्या चौकोनी डबीसारखं हे उपकरण केवळ संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी वापरलं जायचं. त्यासाठी लँडलाइनवरून हा मेसेज द्यावा लागायचा. किचकट तंत्रामुळं ते लगेच वापरातून बाहेर गेलं. तरीही मोबाइल ही मूठभर श्रीमंतांची मिराशी होती पहिली काही वर्षं... 
एकविसावं शतक उजाडायच्या काळात म्हणजे १९९९-२००० मध्ये देशात अचानक डॉट कॉम कंपन्यांचं आणि बीपीओंचं पेव फुटलं. जगभराला तेव्हा वायटूकेच्या समस्येनं ग्रासलं होतं. जगभरातल्या संगणकांमध्ये तेव्हा वर्षाच्या जागी दोनच आकडे (म्हणजे १९९९ च्या ऐवजी ९९) वापरले जात. तेव्हा २००० हे वर्ष संपून २००१ हे वर्ष सुरू सुरू होईल, तेव्हा संगणक गडबडणार आणि अनेक व्यवहार गोत्यात येणार, अशी भीती होती. या समस्येवर मात करण्यासाठी अमेरिकी कंपन्यांनी जगभरातलं कुशल मनुष्यबळ हायर केलं. त्यात भारतीय आघाडीवर होते. काही का असेना, आपल्या देशात अनेकांना अचानक रोजगार उपलब्ध झाला आणि तुलनेनं बरे पैसेही मिळू लागले. मोबाइलच्या प्रसाराला ही स्थिती अनुकूल होती. दरम्यानच्या काळात अनेक कंपन्या या व्यवसायात उतरू लागल्यानं स्पर्धेचा परिणाम म्हणून कॉलचे दर झपाट्यानं कमी होत गेले. विशेषतः इनकमिंग कॉल लवकरच मोफत झाले. (यानंतर मिस कॉलचं फॅड आलं.) 

या काळापर्यंत भारतीय बाजारपेठेत नोकिया या हँडसेट बनवणाऱ्या कंपनीचं निर्विवाद वर्चस्व होतं. मोबाइल घ्यायचा तर तो नोकियाचाच, हे अगदी पक्कं असायचं. नोकियाची ती विशिष्ट कॉलर ट्यून जिथं जाऊ तिथं ऐकू यायची. कित्येक नाटकांत, सिनेमांत मोबाइल वाजलाय हे दाखवण्यासाठी कॉमनली हीच ट्यून वापरली जाऊ लागली. तरीही या काळात म्हणजे २००१ पर्यंत भारतातील मोबाइलधारकांची संख्या ५५ लाखांपर्यंतच मर्यादित होती. 
एकविसाव्या शतकात प्रवेश करताना भारतानं बऱ्याच क्षेत्रांत कात टाकली. महानगरांमध्ये पायाभूत सुविधा उभ्या राहू लागल्या, सुवर्ण चतुष्कोनसारख्या प्रकल्पांनी देशभरातले महामार्ग मोठे होऊ लागले, एक्स्प्रेस-वे उभारले जाऊ लागले, महानगरांपासून ते टु-टिअर शहरांपर्यंत सर्वत्र मॉल उभे राहिले, सिनेमांमध्ये मल्टिप्लेक्स संस्कृती आली, तरुण एम-एट्या विकून बाइक घेऊ लागले, दिल चाहता हैसारख्या सिनेमांतून वेगळ्या स्वरूपाची तरुणाईची अभिव्यक्ती समोर आली, कौन बनेगा करोडपतीसारख्या मेगास्टार अमिताभ बच्चनला छोट्या पडद्यावर आणणाऱ्या कार्यक्रमानं तर (मेसेज करण्यासाठी) हातात मोबाइल असणं ही एक मस्ट गोष्ट करून टाकली. अशक्य वाटणारा विमानप्रवास आवाक्यात आला, तर परदेशप्रवास हे मध्यमवर्गीयांसाठी केवळ स्वप्न न राहता, एक सुखद वास्तव बनलं. एका अर्थानं इंडिया शायनिंग होतंच हे! (फक्त त्याचा राजकीय अर्थ आणि राजकीय गणित पार चुकलं...) या सर्व प्रवासात मोबाइल हाती धरून भारतीय जनता एका पातळीवर येण्यासाठी धडपडत होती.
भारताची अवाढव्य बाजारपेठ आणि नित्य वाढत जाणारा येथील मध्यमवर्ग यामुळं जगभरातील हँडसेट कंपन्यांना भारताचं आकर्षण न वाटतं तरच नवल! नोकियापाठोपाठ सॅमसंग, मायक्रोमॅक्स, कार्बन, मोटो, एलजी अशा किती तरी कंपन्या या बाजारपेठेत उतरल्या. हँडसेटचा आकारही वॉकीटॉकीपासून ते तळहातावर मावणाऱ्या छोट्या डबीएवढ्या आकारापर्यंत बदलत गेला. आता प्रत्येक घरात एक मोबाइल नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीकडं एक मोबाइल असण्याचे दिवस आले होते. एसएमएसचं मार्केट प्रचंड होतं. त्यामुळंच टीव्ही शोवर मागवल्या जाणाऱ्या एसएमएसच्या स्पर्धांना सुरुवात झाली. झीवरच्या सारेगमपचं उदाहरण यासाठी पुरेसं ठरावं. जवळपास प्रत्येक रिॲलिटी शोचा विजेता हा या एसएमएसच्या माध्यमातून ठरवला जाऊ लागला. या एसएमएससाठी जास्त पैसे मोजावे लागायचे. शिवाय एरवी तुम्हाला विशिष्ट एसएमएस फ्री असले, तरी सणांच्या दिवशी प्रत्येक मेसेजला पैसे आकारण्याची टूम मोबाइल कंपन्यांनी काढली. मोबाइल कंपन्यांचा सगळा व्यवहार चालतो तो हवेतल्या तरंगपट्ट्यावर, अर्थात स्पेक्ट्रमवर. (या स्पेक्ट्रमच्या लिलावातूनच पुढं ए. राजा प्रकरण घडलं. पण इथं तो विषय नाही.) या स्पेक्ट्रमच्या ताब्यासाठी मोठमोठ्या मोबाइल कंपन्यांची युद्धं सुरू झाली. महानगरांची वेगळी सर्कल आहेत. त्यांच्यासाठी तर अधिकचे पैसे मोजण्याची वेळ आली. पाहता पाहता कॉलच्या रेटचंही युद्ध सुरू झालं आणि ग्राहकराजाची चांदी झाली. जगभरातल्या दरांच्या तुलनेत भारतीयांना फारच स्वस्तात सेवा मिळू लागली. इथल्या मार्केटचा अवाढव्य आकार हे त्याचं उघड गुपित होतं.
मार्केट वाढत चाललं, तसं ग्राहकांना नवीन काही देण्याची गरज कंपन्यांना भासू लागली. त्यातूनच मग जन्मला स्मार्टफोन. भारतात सॅमसंग या कोरियन कंपनीनं सर्वांत प्रथम स्मार्टफोन आणला आणि पाहता पाहता बाजारपेठ या फोनच्या प्रेमात पडली. 
काय नव्हतं या फोनमध्ये? चांगला कॅमेरा होता, संगीत होतं, भरपूर स्पेस होती, सर्वांत महत्त्वाचं म्हणजे इंटरनेट होतं, त्यामुळं फेसबुक होतं अन् व्हॉट्सॲपही... बघता बघता खिशातल्या स्मार्टफोननं अनेकांना आपल्या खिशात टाकलं. त्या प्रसिद्ध कंपनीच्या जाहिरातीत म्हटल्याप्रमाणं खरोखर सगळी दुनिया आता मुठीत आली होती. भारतात साधारणतः २००५-०६ मध्ये स्मार्टफोन मिळू लागले. पण २००८ नंतर ते सार्वत्रिक झाले. नोकिया कंपनी या स्पर्धेत फार मागं पडली आणि पुढं तर ही एके काळची बलाढ्य फिनिश कंपनी बघता बघता 'फिनिश' झाली. सॅमसंगनं आपला दबदबा भारतीय बाजारपेठेत कायम ठेवला. स्मार्टफोन हातात आल्यानं आपल्याला वेडावल्यासारखं झालं, यात शंका नाही. सतत अपडेट पाहणं, बोटांना सतत काही तरी टाइप करायचा चाळा लागणं, दर अर्ध्या मिनिटानं फोन उघडून काही अपडेट किंवा काही मेसेज आलाय का हे पाहणं, कानात इयरफोन घालून किंवा खाली मान घालून टाइप करत करत जवळपास वेड्यासारखं सगळीकडं हिंडणं या सवयी आता अनेकांना वाईट पद्धतीनं जडल्या आहेत. आता सध्या सेल्फीचं फॅड आहे. एके काळी गरजेच्या मानल्या गेलेल्या या स्मार्टफोनच्या अतिसवयीचं रूपांतर व्यसनात होऊ लागलं आहे. आता लवकरच फोर-जी तंत्रज्ञान सर्वत्र बोकाळेल. तेव्हा काय होईल याची कल्पना करणं सहज शक्य आहे. 
मोबाइल नावाच्या या साधनानं संवाद वाढवला, पण जवळच्या नात्यांतला संवाद मात्र संपुष्टात आणला. आता काही जणांनी यावर उपाय म्हणून स्मार्टफोनविना आयुष्य काढायचं, असं ठरवायला सुरुवातही केलीय. कुठलंही तंत्रज्ञान मानवाच्या भल्यासाठीच असतं. आपण त्याचा उपयोग कसा करून घेतो यावर त्याचं यशापयश अवलंबून असतं. आपण तंत्रज्ञानावर स्वार व्हायचं की तंत्रज्ञानाला आपल्यावर स्वार होऊ द्यायचं हा निर्णय शहाण्या माणसांना अवघड जाऊ नये. मोबाइल क्रांतीची द्विदशकपूर्ती साजरी करत असताना या वास्तवाचं भान कायम राहो, एवढंच!
---

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, २ ऑगस्ट २०१५)

----

28 Jul 2015

मसान रिव्ह्यू




चुकवू नये असा ‘संगम’
--------------------------- 


‘मसान’ हा चित्रपट पाहिल्यावर माझ्या मनात पहिली प्रतिक्रिया अशी आली, की या सिनेमाचं शीर्षक ‘मसान’ (स्मशान) याऐवजी ‘संगम’ असं हवं होतं. अर्थात संगम नावाचा यापूर्वीचा राज कपूरचा गाजलेला सिनेमा आणि या सिनेमाचा आशय यांचा अजिबातच संबंध नाही आणि केवळ तशी अनाठायी तुलना होऊ नये म्हणूनच निर्मात्यांनी हे शीर्षक टाळलं असावं. अन्यथा संगम हेच अत्यंत उचित असं शीर्षक आहे या कलाकृतीला....!
चित्रपटाच्या सुरुवातीला ब्रिजनारायण चकबस्त यांच्या ओळी येतात -
ज़िंदगी क्या है अनासिर में जहुर-ए-तरतीब
मौत क्या है इन्ही अज़ा का परेशान होना
(जगणं म्हणजे काय, तर सगळ्या गोष्टी सुरळीत असणं आणि मृत्यू म्हणजे काय, तर त्या केवळ विखुरणं...) मरणाला अजिबात न घाबरणाऱ्या, किंबहुना गंगेच्या कुशीत मरण म्हणजे मोक्ष असं मानणाऱ्या काशीत हे कथानक घडतं. स्मशानाचा संदर्भ येतो तो इथं! गंगा म्हणजे भारताची आदिम काळापासून चालत असलेली संस्कृतीच. या गंगेच्या काठी काशीच्या घाटांवर मसानची गोष्ट घडते. किंबहुना दोन व्यक्तींच्या दोन समांतर चालणाऱ्या गोष्टी घडतात आणि शेवटी त्यांचा संगम होतो. माणसाचं जगणं असतं अगदीच क्षणभंगुर... पण या साध्या जगण्यातही त्याला किती ताणतणावांना सामोरं जावं लागतं. आपणच हे जगणं अनेकदा गुंतागुंतीचं करतो. कधी आपल्याला नशिबात अचानक काही तरी घडतं आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं. प्रेमाची गोष्ट असो की प्रेमभंगाची, काही तरी मिळतं आणि काही तरी निसटून जातं... अर्थात माणूस गेला तरी त्याचा आत्मा अमर असतो, या आपल्या तत्त्वज्ञानाप्रमाणेच गंगेच्या किनारीही तुम्ही काही तरी गमावता त्याच वेळी काही तरी तुम्हाला गवसलेलं असतं...
अनुराग कश्यपला ‘गँग्ज ऑफ वसेपूर’साठी साह्य करणाऱ्या नीरज घायवाननं मसान दिग्दर्शित केला आहे. त्याचं सांगणं अगदी स्पष्ट आहे. अविनाश अरुणनं अप्रतिम टिपलेल्या वाराणसीच्या माध्यमातून तो हे त्याचं सांगणं ठामपणे सांगत राहतो. वरुण ग्रोव्हरनं लिहिलेली पटकथा मुळात भक्कम आहे. त्यामुळं नव्या-जुन्या पिढ्यांचा संघर्ष, काशीसारख्या सनातन शहरात राहणाऱ्या आजच्या काळातल्या तरुण पिढीची भावनिक आंदोलनं, जातीपातींचा प्रभाव, पोलिस यंत्रणेचा भ्रष्टाचार आणि सेक्ससारख्या माणसाच्या मूलभूत प्रेरणांबाबत होत असलेली त्यांची कुचंबणा म्हणा किंवा त्यात वाहवत जाणं म्हणा... हे सगळं या गोष्टींतून दिग्दर्शक मांडत राहतो. पुन्हा या सगळ्या प्रवासाला गंगेच्या अथांग आणि अथकपणे सुरू असलेल्या संथ प्रवाहाचा एक अनाहत नाद पार्श्वभूमीसारखा सतत ऐकू येतो आहे. ते घाट, तिथं सतत सुरू असलेले अंत्यसंस्कार किंवा दशक्रियांसारखे विधी, गंगेच्या पाण्यातून पैसे काढणाऱ्या छोट्या पोरांच्या जीवावर सुरू असलेला जुगार... हे सगळं आपल्याला सतत काही ना काही सांगत राहतात. आपल्या मृत्यूनंतरही आपलं जगणं संपत नाही, तर अन्य कुणाच्या मृत्यूमुळं ते संपण्याचं कारणच काय, असं सांगत राहतो...
देवी पाठक (रिचा चढ्ढा) आणि दीपक चौधरी (विकी कौशल) यांच्या आयुष्यात घडणाऱ्या दोन गोष्टी समांतरपणे आपल्याला दिसत राहतात. देवीनं मोहाच्या एका क्षणी केलेली चूक तिला आणि तिच्या विद्वान पित्याला पोलिसांकडून ब्लॅकमेल केलं जाण्यापर्यंत गेली आहे, तर दुसरीकडं डोम जातीचा दीपक गंगेच्या घाटावर मृतदेहांना अग्नी देण्याच्या कामापासून सुटका करून घेण्यासाठी जिद्दीनं शिक्षण घेतोय. देवीच्या आयुष्यातलं एकमेव प्रेम अचानक नष्ट झालंय, तर दीपकच्या वैराण आयुष्यात शालूच्या (श्वेता त्रिपाठी) रूपानं नुकतंच एक प्रेम उमलू लागलंय. देवी सगळं विसरून आयुष्यात पुढं जाऊ पाहते, तर दीपकच्या आयुष्यात अचानक एक वज्राघात होतो. सगळं काही उलटपालट होतं. हे दोन्ही प्रवाह आपापलं प्राक्तन घेऊन पुढं वाहत राहतात. सिनेमाच्या शेवटी त्यांचा ‘संगम’ होणं अटळ असतं.
इंडो-फ्रेंच संयुक्त निर्मिती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती मूल्यं उच्च आहेत. दिग्दर्शकाची विषयावरची पकड जाणवतेच. अगदी साध्या साध्या प्रसंगांतून त्यानं यातलं नाट्य अधोरेखित केलं आहे. या दिग्दर्शकाला चित्रभाषा अवगत आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी शांतताच बोलते. देवी त्या प्रसंगानंतर घरी आल्यानंतर तिचे वडील ज्या पद्धतीनं व्यक्त होतात, तो प्रसंग किंवा देवी नंतर अलाहाबादमध्ये तिच्या दिवंगत मित्राच्या घरी जाते, तेव्हा फक्त दाराचं फाटक दाखवून आत काय घडलं असेल हे सूचित करणारा प्रसंग... किंवा दीपकचं त्या घाटावरचं उन्मळून पडणं असेल किंवा त्या छोट्या मुलाला अंगठी सापडण्याचा प्रसंग असेल... या सर्व जागा दिग्दर्शकानं सुरेख भरल्या आहेत.

अभिनयात सर्वांनीच उजवी कामगिरी केली आहे. रिचा चढ्ढाला तिच्या करियरमधला हा एक महत्त्वाचा रोल मिळाला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तिनं देवी मनापासून उभी केली आहे. संजय मिश्रांचा विद्याधर पाठक जबरदस्त. हा माणूस भूमिकेत कायाप्रवेश करून शिरतो आणि त्या पात्राचे अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म रंग दाखवतो. नवोदित कलाकार विकी कौशलनं दीपकच्या भूमिकेत कमाल केली आहे. श्वेता त्रिपाठीही गोड.
थोडक्यात, चुकवू नये असाच हा चित्रपट आहे.
---
निर्मिती :  दृश्यम फिल्म्स, फँटम फिल्म्स, मॅकॅस्सर प्रॉडक्शन्स आणि सिख्या एंटरटेन्मेंट
दिग्दर्शक : नीरज घायवान
पटकथा : वरुण ग्रोव्हर
संगीत : इंडियन ओशन
प्रमुख भूमिका : रिचा चढ्ढा, संजय मिश्रा, विकी कौशल, श्वेता त्रिपाठी, पंकज त्रिपाठी
दर्जा : चार स्टार
---