24 Jul 2016

जागतिकीकरण पंचवीस वर्षे - लेख

ये कहाँ आ गए हम...
-------------------



भारत. १९९१. 
राजीव गांधींच्या क्रूर हत्येनंतर नरसिंह राव यांचं सरकार केंद्रात जेमतेम बहुमतावर सत्तेत आलेलं. त्यांनी अर्थमंत्रिपदी नियुक्ती केली रिझर्व्ह बँकेच्या एका माजी गव्हर्नरची, एका जाणत्या अर्थतज्ज्ञाची. त्याचं नाव डॉ. मनमोहनसिंग. याच मनमोहनसिंगांनी २४ जुलै १९९१ रोजी लोकसभेत राव सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. देशाला एका वेगळ्या वाटेवर नेणारा, धाडसी अन् निर्णायक! 
भारतानं कोणत्या आर्थिक परिस्थितीत आर्थिक उदारीकरण स्वीकारलं याची चर्चा आणि माहिती अनेक वेळा झाली आहे. तो या लेखाचा हेतू नाही. मात्र, भारताच्या सामाजिक परिस्थितीवर या उदारीकरणानं काय परिणाम केले यावर एक ओझरती नजर टाकली तरी जावेद अख्तर यांच्या शब्दांत 'ये कहाँ आ गए हम...' असंच म्हणावंसं वाटतं.
भारतासाठी नव्हे तर एकूणच जगासाठी हा काळ फारच खळबळीचा आणि क्रांतिकारी बदलांचा होता. दोनच वर्षांपूर्वी शीतयुद्धाचं प्रतीक असलेली बर्लिनची भिंत उद्ध्वस्त झाली होती. रशियात मिखाइल गोर्बाचेव्ह यांच्या नेतृत्वाखाली 'ग्लासनोस्त' आणि 'पेरेस्त्रोइका'चं वारं वाहू लागलं होतं. आखातात कुवेतवर सद्दाम हुसेननं आक्रमण केलं होतं आणि आपणच उभ्या केलेल्या या भस्मासुराचा नायनाट करण्यासाठी युद्धखोर अमेरिकेला अगदी निमित्तच मिळालं होतं. भारतात या वेळी अस्थिर राजकीय स्थिती होती. व्ही. पी. सिंह आणि पाठोपाठ चंद्रशेखर यांची सरकारं कार्यकाळ पूर्ण करू शकली नव्हती. देशाची तिजोरी रसातळाला गेली होती आणि सोनं गहाण ठेवण्याची वेळ आली होती. देशात हिंदुत्ववादी विचारांची लाट आली होती. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी ठिकठिकाणी कारसेवा सुरू होती. वर्षापूर्वीच लालकृष्ण अडवानी यांनी राममंदिरासाठी रथयात्रा काढली होती आणि देश ढवळून टाकला होता. व्ही. पी. सिंह यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतल्यानं देशात कथित उच्चवर्णीयांमध्ये प्रचंड संताप धुमसत होता आणि सामाजिक दरी आणखी रुंदावून बसली होती. १९९० च्या विधानसभा निवडणुकांत बाळासाहेब ठाकऱ्यांच्या झंझावाती भाषणांनी महाराष्ट्र हलवून सोडला होता. रात्री उशिरापर्यंत राजकीय प्रचारसभा चालत. टी. एन. शेषन यांचा अद्याप उदय व्हायचा होता...
 १९९१ मध्ये उपग्रह वाहिन्यांना परवानगी मिळाली आणि झी ही पहिली खासगी वाहिनी केबलवरून दिसू लागली. रुपर्ट मरडॉक यांच्या स्टार समूहानं लगोलग भारतात शिरकाव केला आणि न्यूझीलंडमधील क्रिकेट सामने स्टार नेटवर्कवरून लाइव्ह दिसू लागले. याच उपग्रह वाहिन्यांनी आखाती युद्धही लाइव्ह दाखवलं आणि भारतीयांनी प्रथमच घरबसल्या 'युद्ध' पाहिलं. सचिन तेंडुलकर नावाचा तारा नुकताच उदयास येऊ लागला होता. तरी भारतीय संघात अद्याप कपिलदेव, मनोज प्रभाकर, रवी शास्त्री आदी सीनियर मंडळी खेळत होती. १९९१ पर्यंत दूरदर्शन हीच एकमेव वाहिनी दिसत होती आणि चार महानगरांतील रहिवाशांना डीडी मेट्रो ही दुसरी वाहिनी दिसत असल्यानं अन्य शहरांतील लोक त्यांच्यावर चक्क जळत होते. अमिताभ अद्याप भरात होता आणि 'जुम्मा चुम्मा दे दे'वर निम्म्या वयाच्या किमी काटकरसोबत रोमान्स करीत होता. असं असलं तरी सलमान खान, आमिर खान या खानांचा उदय झाला होता आणि १९९१ हे आणखी एका खानासाठी महत्त्वाचं वर्ष ठरणार होतं. त्याचं नाव होतं शाहरुख खान. त्याच्या 'बाजीगर'नं प्रेक्षकांना 'दिवाना' केलं होतं आणि पुढील कित्येक वर्षं या खानत्रयीचा दबदबा राहणार होता. अजय देवगण, अक्षयकुमार हे आणखी दोन 'लंबी रेस के घोडे' पुढच्याच वर्षी, म्हणजे १९९२ मध्ये रूपेरी पदार्पण करणार होते.
दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत या मालिकांचा प्रभाव होता. 'रंगोली' आवर्जून पाहिली जात होती. सुरभी हा सिद्धार्थ काक व रेणुका शहाणेचा कार्यक्रम लोकांनी तुफान लोकप्रिय केला होता. एवढा की, खास स्पर्धा पोस्ट कार्डची निर्मिती पोस्ट खात्याला करावी लागली. 
मल्टिप्लेक्स हा काय प्रकार असतो, हे माहिती नव्हतं. सिंगल स्क्रीन थिएटर हेच चित्रपट पाहण्याचं एकमेव साधन होतं. तेव्हा मराठी चित्रपटसृष्टीत महेश कोठारे, सचिन, स्मिता तळवलकर आदी मंडळींचा दबदबा होता. तरीही १९९१ हे वर्ष गाजवलं ते विजय कोंडके यांच्या 'माहेरच्या साडी'नं. कित्येक आठवडे हा चित्रपट थिएटरांत मुक्काम ठोकून होता.
महाराष्ट्रात १९९० च्या निवडणुकीनंतर शरद पवार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले होते. राज्यात तेव्हा मुंबई (किंवा खरं तर बॉम्बे) हेच एकमेव महानगर होतं. पुणं हे अद्याप एक शांत, निवांत शहर होतं. सांस्कृतिक वाद-चर्चा, गणेशोत्सवाची धूम आणि सवाई गंधर्व महोत्सवाची सुरेलता यात हे सुशेगाद शहर रमलेलं होतं. रविवारी रात्री सुरू झालेल्या शेवटच्या सत्राची भीमसेन जोशींच्या पहाडी आवाजानं सोमवारी सकाळी सांगता होत होती. युनिव्हर्सिटी रोडवर अद्याप दोन्ही बाजूंनी दाट झाडी होती आणि विद्यापीठ चौकातलं भलंमोठं कारजं संध्याकाळी डोळ्यांना सुखावत होतं. झेड ब्रिज आणि नदीपात्रातला रस्ता नसल्यानं प्रेमीजन अद्याप सारसबाग, पेशवेपार्कमध्येच प्रेमालाप करीत होते. सिंहगड मात्र तेव्हाही फेव्हरिट होता. सिंहगडला जाणारा रोड मात्र छोटासाच, पण दोन्ही बाजूला दाट झाडी असलेला असाच होता. एकूणच पुण्यातले बहुतेक रस्ते लहानसेच, पण दुहेरी होते आणि तरी फारसं ट्रॅफिक जॅम होत नसे. मंडई विद्यापीठ (पत्रकारांचं रात्री जमण्याचं ठिकाण) तेव्हा जोरात होतं. हिंजवडी हे नावही फारसं कुणाला माहिती नव्हतं. १९९४ ला बालेवाडीत क्रीडा संकुल उभं राहिलं आणि पुढच्या काही काळात कात्रज-देहूरोड बायपास रस्ता तयार झाला. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बहुतांश भाग निर्जन होता आणि झाडीझुडपं वाढली होती. नगर रोडचीही तीच स्थिती होती. गुंजन टॉकीजच्या पुढं वस्ती विरळ होत जायची आणि वाघोली हे नगरला जाताना पुण्यानंतर येणारं एक गाव होतं. 
मोबाइल हे नावही कुणी ऐकलं नव्हतं आणि इंटरनेटचा वापर फार म्हणजे फारच मर्यादित होता. एसटीडी बूथची चलती होती आणि गावोगावचे एसटीडी कोड क्रमांक पाठ असावे लागत. एकूणच तंत्रज्ञान माणसाच्या आयुष्यावर स्वार झालं नव्हतं आणि त्यामुळं त्यातून येणारी अपरिहार्य पळापळही नव्हती. उलट एसटीडी बूथ ही तेव्हा क्रांती मानली जात होती आणि राजीव गांधी व सॅम पित्रोदा यांना त्यांचं रास्त श्रेय देण्यात येत होतं. 
महाराष्ट्राची सांस्कृतिक श्रीमंती अद्याप अबाधित होती. कुसुमाग्रज-पुलं अद्याप हिंडते-फिरते होते आणि एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, ग. प्र. प्रधान, मोहन धारिया, बाळासाहेब भारदे या मंडळींचा सार्वजनिक वावर पुण्यातल्या जाहीर कार्यक्रमांना एका विशिष्ट पातळीच्या खाली येऊ देत नव्हता. फेसबुक नव्हतं, तरी दिवाळी अंकांतल्या विशिष्ट लेखांची राज्यभर चर्चा व्हायची. 
----
काळ भराभर पुढं सरकत गेला...
मग १९९५ मध्ये देशात पहिला मोबाइल आला. १९९७ मध्ये पहिलं मल्टिप्लेक्स उभं राहिलं. त्याच काळात कधी तरी पहिला मॉल उभा राहिला. तोवर सचिन नावाचा फिनॉमिना फारच मोठा झाला होता. मग राहुल द्रविड, सौरभ गांगुली, अनिल कुंबळे, लक्ष्मण, युवराजसिंग यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला. मॉल, मल्टिप्लेक्स आणि मेट्रो या तीन 'म'कारांनी महानगरांतलं आयुष्य आमूलाग्र बदलून गेलं. १९९९ च्या सुमारास आलेल्या वायटूके समस्येमुळं भारतातल्या बीपीओ उद्योगाला एकदमच ऊर्जितावस्था आली. अनेक आयटी कंपन्या सुरू झाल्या. पुणे, बेंगळुरू, हैदराबाद ही भारतातली नवी महानगरं उदयाला आली. या शहरांतल्या जागांच्या किमती अचानक वाढल्या. महागाई वाढली. मोबाइल तंत्रज्ञानात दर वर्षी क्रांती होत गेली. पुढच्या दशकभरात ती आणखीनच पुढं गेली. वृत्तपत्रांत पूर्वी सर्व पानं कृष्णधवल असायची. तिथं १९९९-२००० च्या सुमारास पहिलं पान रंगीत आणि नंतर पुढच्या दहा वर्षांत सर्व पानं रंगीत असा प्रवास फारच वेगानं झाला... 
एकूणच तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत भौतिक प्रगतीचा धबधबा वेगानं इथल्या समाजावर कोसळू लागला. दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या महानगरांची संख्या वेगानं वाढू लागली. खेड्यांतून शहरांमध्ये विस्थापन मोठ्या प्रमाणात सुरू झालं. गाव-खेड्यांतली सामाजिक, सांस्कृतिक चौकट फार वेगानं ढासळली आणि तिथं नवी सामाजिक समीकरणं आकार घेऊ लागली. शहरांमध्ये भौतिक सुखांची परमावधी झाली असली, तरी नियोजनाअभावी ही शहरं बेढब आणि कुरूप दिसू लागली. तिथल्या सोई-सुविधांचा बोजवारा उडाला आणि नवी बेशिस्त, कशालाच न जुमानणारी नागर संस्कृती उदयाला आली. ग्रामीण भागांतून भू-संपादन किंवा अन्य माध्यमांतून काही विशिष्ट वर्गाकडं पैसा आला. त्यातून वेगळ्या सामाजिक समस्या निर्माण झाल्या.
मध्यमवर्गानं वर्षानुवर्षं जपलेली (अभावाची गौरवगाथा गाणारी) मूल्यव्यवस्था अपरिमित भौतिक सुखांच्या उपलब्धतेनंतर काचेसारखी तडकली. या लाटेचा पहिला तडाखा बसला तो एकत्र कुटुंबपद्धतीला. दोन्ही हातांनी सुखं ओरबडताना हातांतून बरंच काही रेतीसारखं निसटून गेल्याची जाणीव लोकांना फार उशिरा झाली. आपल्याला कशाच्या बदल्यात काय मिळवायचं आहे, याचा विचार पुनश्च अनेकांना सतावू लागला. जिथं काही नव्हतंच तिथं पुन्हा एकदा काहीच नाही, अशी स्थिती झाली. 
 या सर्व बदलांची किंमत समाजव्यवस्था आणि वैयक्तिक अशा दोन्ही पातळ्यांवर एका पिढीनं चुकविली. पुढच्या पिढ्यांची वेगळी मूल्यव्यवस्था तयार होते आहे. या नव्या पिढीचे फंडे अगदी स्पष्ट आहेत. त्यांचे विचार निश्चितच वेगळे आहेत, पण किमान ती पिढी कमी दांभिक आहे. आमच्यासारख्या चाळिशीला आलेल्या पिढीनं या बदलांचे फायदेही उपभोगले आणि तोटेही! अशा वेळी दोन्ही डगरींवर पाय ठेवण्याची धडपड करणारी माझी पिढी मनात कुठं तरी म्हणते आहे - ये कहाँ आ गए हम... यूँही साथ चलते चलते!
----
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, संवाद पुरवणी, पुणे आवृत्ती - २४ जुलै २०१६)
----

11 Jul 2016

लेख - हिंदी सिनेमातील हिंसाचारावर


एवढी हिंसा कशासाठी? 
----------------------
काही काळापूर्वी 'मर्डर-२' नावाचा एक टुकार सिनेमा येऊन गेला. त्यातला विकृत खलनायक बायकांना पकडून त्यांचा अत्यंत निर्दयी पद्धतीनं खून करीत असतो. एका दृश्यात तो एका तरुण मुलीला बांधून ठेवतो आणि तिच्या डोक्यात हातोड्यानं खिळा ठोकून तिला मारतो. हे दृश्य इतकं भयंकर होतं, की मला भोवळ आली होती. अनुराग कश्यपचा 'गँग ऑफ वसेपूर' बघा. रक्ता-मांसाचा चिखल दाखवलाय त्यात. अनुष्का शर्माचा 'एनएच-१०' हा चित्रपट असाच. त्यात पळून गेलेल्या त्या मुलीला आणि तिच्या मित्राला जंगलात अत्यंत निर्घृणपणे मारलंय आणि हे सगळं सांगोपांग दाखवलंय सिनेमात. रामगोपाल वर्माचा अलीकडंच आलेला आणि पडलेला 'वीरप्पन' हा सिनेमा. वीरप्पनचं क्रौर्य आणि कसायासारखं त्याचं माणसं मारण्याचं कसब त्यातही अगदी तपशीलवार दाखवलंय. 
हे सगळे सिनेमे पाहताना प्रत्येक वेळी मला त्रास झालाय आणि अनेकांना तो होत असणार यात शंका नाही. या असल्या दृश्यांची चर्चा झाली म्हणून तर 'तितली' नावाचा अगदी अलीकडं आलेला एक चित्रपट पाहण्याचा धीर मी करूच शकलो नाही. तीच गोष्ट अनुराग कश्यपच्याच ताज्या 'रामन राघव'ची. हा सिनेमा मी पाहिला नाही. म्हणजे पाहण्याची इच्छा होती; पण पुन्हा धीर झाला नाही. पण त्याविषयी जे वाचलं, त्यावरून हा भयंकर सिनेमा अनेक जण पाहूच शकणार नाहीत, याची खात्री पटली आहे. 

 या सिनेमात नवाझुद्दीन सिद्दिकी एका दांपत्याचा निर्दयपणे खून करतो असं दृश्य आहे. त्यानंतर या जोडप्याच्या पाच ते सहा वर्षांच्या मुलाला तो एका खुर्चीला बांधून ठेवतो आणि त्याच्यासमोरच बिर्याणी आणि चिकन शिजवून खातो. त्यानंतर तो त्या मुलालाही मारतो, हे सांगायला नकोच. मला प्रश्न पडला आहे, की ही अशी दृश्यं पडद्यावर दाखवून हे सगळे दिग्दर्शक नक्की काय साध्य करीत आहेत? जास्तीत जास्त विकृती कोण पडद्यावर दाखवतो, याची त्यांच्या-त्यांच्यात तर शर्यत लागलेली नाही ना! 
जगात अनेक प्रकारचे सिनेमे बनत असतात. प्रत्येकाचा प्रेक्षकवर्गही वेगवेगळा असतो. जगात जपानी आणि कोरियन चित्रपट अशा हिंसक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहेत. तिथला समाज या गोष्टीची किंमत मोजतो आहे. दोन्ही देशांत रेल्वेत किंवा सार्वजनिक ठिकाणी हिंसेचे अनेक प्रकार घडले आहेत. अमेरिकेत तर ठायी ठायी हे प्रकार होताना आपण बघतो. पश्चिम आशियात तर अनेक दशकांपासून वांशिक हिंसाचार सुरू आहे. सिनेमाचा कळत-नकळत पडणारा प्रभाव यात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. सिनेमा हे मोठ्या जनमानसावर प्रचंड प्रभाव टाकू शकणारं माध्यम आहे. या माध्यमातून एवढी टोकाची आणि किळसवाणी हिंसा दाखवण्यामागं नेमका काय हेतू असू शकतो? टोकाच्या भीतीतून किंवा टोकाच्या न्यूनगंडातूनही माणूस हिंसाचार करू शकतो. मानसशास्त्रज्ञ सांगतात, की सिनेमासारखं माध्यम कळत-नकळत आपल्या अबोध मनावर मोठा प्रभाव टाकत असतं. अशा प्रभावाखाली येऊन अनेक गुन्हे घडल्याची उदाहरणं आपल्यासमोरच आहेत. मग पुन्हा हा विकृत हिंसेचा डोस कशासाठी? 
यावर कुणी म्हणेल, की समाजात जे घडतं तेच सिनेमात दाखवलं जातं. सिनेमा हा समाजाचाच आरसा आहे. तेव्हा समाजात विकृती फोफावली असेल, किंवा एवढ्या टोकाची हिंसा प्रत्यक्ष घडत असेल, तर ती सिनेमात दाखवायची नाही का? यावर उत्तर असं, की आपल्याकडं अनेक प्रतिभाशाली दिग्दर्शक होऊन गेले. जगभरातलीही उदाहरणं आहेत. मानवी जीवनातला प्रत्येक रस त्यांनी दाखवला. प्रेम दाखवलं, तसा द्वेषही दाखविला. करुणरस दाखविला, तसाच हास्यरसही प्रकट केला. शांतिरस दाखविला, तशीच हिंसाही दाखविली. पण हे करताना त्यांनी सिनेमा माध्यमाची खरी ताकद वापरली. हिचकॉकचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे. त्याचे अनेक सिनेमे तर कृष्णधवल आहेत. तरीही रक्ताचा एक थेंबही न दाखवता तो प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणत असे. 'बँडिट क्वीन' या चित्रपटातही फूलनदेवीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचं दृश्य असंच कुठलाही थेट प्रसंग न दाखवता शेखर कपूरनं प्रत्ययकारकरीत्या दाखवलं होतं. तेव्हा इच्छा असेल, तर हवा ते इफेक्ट साधता येतो हे नक्की. चित्र, ध्वनी आणि प्रकाश या माध्यमांचा वापर करून प्रतिभाशाली दिग्दर्शकांनी निर्जीव पडद्यावर अनेक चमत्कार घडविले आहेत. रक्तामांसाचा चिखल दाखवूनच आपण वेगळे दिग्दर्शक ठरतो, असा त्यांचा भ्रम नसावा.
मुद्दा म्हातारी मेल्याचा नसून, काळ सोकावत जातो याचा आहे. हल्ली अशा अनेक सिनेमांना यू-ए प्रमाणपत्र असतं. मग कित्येक कोवळी मुलं हे सिनेमे पाहतच असतात. त्यात दाखविली जाणारी हिंसा तेही पाहत असतात. मग कुणाच्या तरी डोक्यात दगड घालणं, मानेत स्क्रू-ड्रायव्हर खुपसणं, डोक्यात लोखंडी रॉड घालणं किंवा हात-पाय तोडणं या प्रकारांचं त्यांना काहीच वाटेनासं होतं. हल्लीच मराठवाड्यात उदगीरमध्ये एका टीनएजर मुलानं आपल्या मित्राला सुपारी देऊन आपल्या सख्ख्या आईचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही मुलं कशामुळं एवढी हिंसक झाली? असल्या सिनेमांचा प्रभाव हे त्यामागचं एक प्रमुख कारण आहे, असं अनेक पोलिस अधिकारीही सांगतात. हल्ली तर हे प्रकार काही प्रेक्षक एंजॉय करतात, असं एक निरीक्षण आहे. म्हणजे दाखवणारा आणि पाहणारा या दोघांच्या पातळीवर विकृतीचं असं अद्वैत झालं आहे. असं असेल तर आपण समाज म्हणून पुढं कुठं जाणार आहोत?
या विकृतीत अनुराग कश्यप आणि त्याचे शिष्योत्तम, महेश भट कॅम्प आदी मंडळी आघाडीवर आहेत. असं काही तरी दाखवून आपण नक्की काय साध्य करतो आहोत, याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं. सिनेमा ही धंदेवाइक कला आहे. इथं जे पिकतं तेच विकलं जातं. त्यामुळं मुळात प्रेक्षकांनी याविरुद्ध आवाज उठवला आणि अशा सिनेमांना जाणं टाळलं, तर या मंडळींचं फिरलेलं डोकं नक्कीच ताळ्यावर येईल. (अर्थात अतिगोडगोड सिनेमे दाखवणं हीसुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे, असं मी मानतो.) तेव्हा या मंडळींना असं सांगावंसं वाटतं, की सिनेमा माध्यमाची खरी ताकद वापरा आणि व्यक्त व्हा. वास्तविक रामगोपाल वर्मा आणि अनुराग कश्यप यांच्याकडं ते कसब आहेच. सुरुवातीच्या त्यांच्या अनेक सिनेमांतून त्यांनी ते छान दाखवलं आहे आणि म्हणूनच ते प्रेक्षकांचे लाडके दिग्दर्शक आहेत. मलाही हे दोघेही आवडतात. पण याचा अर्थ त्यांनी वाट्टेल ते दाखवावं आणि प्रेक्षकांनी खपवून घ्यावं असा होत नाही. गरज नसताना विकृत हिंसा सांगोपांग दाखवू नये आणि दाखवायची असेल तर त्यामागे ठोस कारण उभं असलं पाहिजे, एवढी अपेक्षा अवाजवी नसावी.
---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, ११ जुलै २०१६)
---

10 Jul 2016

आत्मानंदाची वारी

आत्मानंदाची वारी
-----------------------

पंढरीची वारी मी पहिल्यांदा केव्हा पाहिली, ते आठवत नाही. लहानपणी पेपरमध्ये माउलींची पालखी दिवेघाट चढतानाचे मोठमोठे फोटो यायचे. तेच वारीचं पहिलं दर्शन असावं. पुढं पुण्यात पत्रकारिता करू लागलो, तेव्हा वारीचा जवळून संबंध आला. वारी पुण्यात आली, की त्या वातावरणाच्या बातम्या करायचं काम सुरुवातीला केलं. ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्या पुण्यात आल्या, की या चैतन्यदायी शहराचं वातावरण कसं बदलून जातं हे पाहिलं. वारीविषयी कुतूहल वाढलं. पण ते कित्येक वर्षं कुतूहलाच्या पातळीवरच राहिलं. ऐहिक सुखाची परमावधी झाल्याशिवाय पारलौकिक सुखाची ओढ लागत नसावी. त्यामुळं तरुणपणाची कित्येक वर्षं संसाराचं बस्तान बसवण्यातच गेली आणि वारी फक्त बातम्या छापण्यापुरती अन् त्या वाचण्यापुरतीच आयुष्यात राहिली. 
पुण्यात 'मटा'त आल्यापासून गेली सहा वर्षं ओळीनं आमच्या फर्ग्युसन रोडवरच्या ऑफिससमोरून दोन्ही पालख्या जाताना पाहत आलो. तेव्हा वारीची ओढ अधिकच जाणवू लागली असावी. संसारातल्या ऐहिक सुखांच्या पलीकडची दृश्यं नजरेच्या टप्प्यात येण्याचा आयुष्यातलाही काळ आता आला होता. तेही एक कारण असावं. पाऊस सुरू झाला, पेरण्या आटोपल्या, की महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यांतली, शहरांतली हजारो संसारी माणसं सगळं घरदार टाकून त्या सावळ्या परब्रह्माच्या ओढीनं अडीचशे-तीनशे किलोमीटर पायपीट करीत का निघतात, हे जाणून घेण्याची अनिवार ओढ कुठं तरी मनात लागून राहिली होती. ते असं काय आहे, ज्याच्या ओढीनं माणसं सगळं विसरून, शारीरिक पीडा सहन करून एवढ्या लांब पायी चालत निघतात, हे तसं एका वारीच्या खेपेत कळणं अवघडच. पण या वेळी किमान सुरुवात करू या, असा निर्धार केला. कुटुंबातल्या सदस्यांनीही साथ दिली आणि श्वशुरगृहीच्या काही मंडळींसह आम्ही सात जण 'हम सात साथ है' म्हणत वारीच्या वाटेवर निघालो. 
पुण्यात खरं तर बाराही महिने उत्तम वातावरण असतं; पण जून-जुलैत पाऊस पडून गेला, की ते आणखी खास बनतं. अशा पावसाळी वातावरणात सकाळी सकाळी बाहेर पडून फिरण्यासारखं सुख नाही. वारीसाठी हाच काळ का निवडला गेला असावा, हे कळण्यासाठी हे वातावरण अनुभवायला हवं. सकाळी लवकर निघून आम्ही आळंदीच्या रस्त्यापर्यंत साडेसात वाजता पोचलो. भोसरीकडून पुणे-आळंदी रस्त्याला मिळणाऱ्या चौकाला मॅगझिन चौक असं नाव आहे. सहाआसनी रिक्षानं आम्हाला तिथं सोडलं. समोर डाव्या बाजूला आळंदी आणि उजव्या बाजूला पुण्याकडं जाणारा रस्ता वारकऱ्यांनी फुलून गेला होता. प्रत्यक्ष पालखी अजून गांधीवाड्यातून निघाली नव्हती. पण आळंदीत जमलेल्या हजारो वारकऱ्यांनी सकाळी आपापली आन्हिकं उरकताच पुण्याकडं प्रस्थान ठेवलं होतं. आम्ही थोडा विचार केला आणि या लोकांसोबतच पुण्याकडं निघायचं ठरवलं. आळंदीकडून पुण्याला येणारा रस्ता वाहतुकीसाठी पहाटेपासूनच बंद असतो. त्यामुळं हा रस्ता पूर्णपणे वारकऱ्यांसाठी मोकळा असतो. आम्ही थोडंसं खाऊन चालायला सुरुवात केली. अनेक लोक झपाझप चालत होते. पुण्यातून अनेक लोक आळंदी ते पुणे एवढी वारी करण्यासाठी येत असतात. हे लोक आणि मूळचे वारकरी लोक यांत फरक स्पष्ट दिसत होता. आमच्यासारख्या नवोदित वारकऱ्यांकडं पाठीला सॅक, पाण्याची बाटली, खाऊचे पुडे, पायी स्पोर्ट शूज, हातात स्मार्ट फोन असा जामानिमा होता, तर इतर 'ओरिजनल' वारकऱ्यांकडं एखादी शबनमसारखी पिशवी, कुणाकडं भगवा ध्वज, कुणाकडं टाळ, तर कुणाकडं मृदंग असा फरक दिसत होता. हे वारकरी बहुतांश गटागटानं चालत होते. मोबाइल फोन मात्र जवळपास सगळ्यांकडं होते. भले ते अगदी साधे असतील; पण होते! अगदी एखाद्या वृद्ध आजीसुद्धा याला अपवाद नव्हत्या. दुसरी जाणवणारी गोष्ट म्हणजे सगळ्यांच्या पायी कुठली ना कुठली वहाण होती. पूर्वी अनेक वारकऱ्यांकडं चपलाही नसायच्या आणि पुण्यातल्या काही स्वयंसेवी संस्था वारकऱ्यांना चप्पलवाटप करायच्या हे चांगलं आठवतंय. सुदैवानं आता तशी परिस्थिती दिसली नाही. महाराष्ट्राच्या खेडोपाड्यांत किमान आर्थिक सुबत्ता पोचल्याचं ते लक्षण होतं आणि त्यामुळं मला छानच वाटलं. 
आम्ही चालत निघालो तेव्हा पहिला मुद्दा होता, की आपल्याच्यानं एवढं अंतर चालवेल का? पण एकदा तुम्ही समूहाचा भाग झालात, की या गोष्टींची जाणीव हळूहळू नष्ट व्हायला लागते. मला रोज चालायची सवय असली, तरी एका सलग टप्प्यात एवढं अंतर काटण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. पण खरोखर त्या गोष्टीची जाणीवही नंतर लगेच झाली नाही. सुरुवातीला भोसरी परिसरात मोठमोठ्या राजकीय नेत्यांनी फ्लेक्स लावून वारकऱ्यांचं 'स्वागत' केलं होतं. पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत रस्ताही चांगला मोठा होता. त्यामुळं मोकळं चालता येत होतं. हवा कुंद होती. पण पाऊस पडत नव्हता. सकाळच्या वातावरणातला आल्हाददायकपणा सर्वत्र भरून राहिला होता. सोबतचे वारकरी भजनं म्हणत होते, गात होते, नाचत होते... मला असं वाटलं, की हे सगळे मस्त सहलीला निघाले आहेत. यांच्या रोजच्या रुटीन आयुष्यात असे नाचायचे, उड्या मारायचे, खेळण्याचे प्रसंग किती येत असतील? पुरुषमंडळी शेतात राबत असतात आणि बायका घरात... कंबर मोडेपर्यंत काम करायचं आणि तसंच गोधडीवर आडवं व्हायचं. असे कित्येक दिवस आणि रात्री निघून जात असतील. मग वारी येते आणि या सगळ्या चक्रातून पांडुरंगच तुमची सुटका करतो. त्यामुळं रोज शाळेत जाणाऱ्या मुलांना एखादे वेळी सहलीला नेलं, की जसा आनंद होतो तोच आनंद मला या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. शिवाय हा सगळा हौसेचा आणि श्रद्धेचा मामला! इथं कुणीही तुम्हाला निमंत्रण पत्रिका पाठवून बोलवत नाही. तुम्ही येता ते तुमच्या इच्छेनं... त्यामुळंच सगळा आनंदाचा आणि उत्साहाचा माहौल असतो.
आम्ही बघता बघता दिघीत पोचलो. हा सगळा लष्कराचा परिसर. डाव्या बाजूला आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि उजवीकडं पूर्वीच्या व्हीएसएनएलचे टॉवर. मोकळी जमीन बरीच. त्यामुळं वारकरी आडोसा शोधून शोधून निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला जात होते. वारीत ही नेहमीचीच समस्या आणि वारकऱ्यांनी त्यावर त्यांच्या पद्धतीनं काढलेला हा तोडगा! अर्थात एकदा शरीराचे लाड बंद करायचे ठरवले की मग कुठलीच अडचण येत नसते. मग रस्त्याच्या कडेला उभे केलेल्या टँकरच्या नळाखाली अंघोळ करण्याचा संकोच वाटत नाही आणि अंघोळीनंतर ओली अंतर्वस्त्रे एका हातावर घेऊन सर्वांसमक्ष चालत निघण्याचाही! आणि याला पुरुष आणि स्त्रिया दोघांचाही अपवाद नाही. कारण एकदा तुम्ही वारीत शिरलात, की इथं सगळेच 'माउली'... आणि आईसमोर कसली लाज!
पुढं दिघीत एका ठिकाणी वारकरी मंडळी गोल रिंगण करून भजनं म्हणत बसली होती. मग आम्ही जरा तिथं टेकलो. लोकप्रिय सिनेमा गीतांच्या चालींवर वेगवेगळे अभंग, भजनं म्हणणे ही काही वारकऱ्यांची खासियत दिसली. एकूण ती सगळी मंडळी आनंद लुटत होती. आम्ही पुढं निघालो. दिघीच्या हद्दीत रस्ता छोटा आहे. त्यातच मागून पुढं जाणारे वारकऱ्यांचे मोठमोठे ट्रक आणि उलट्या बाजूनं घुसणारे दुचाकीस्वार यामुळं रस्ता अपुरा पडू लागला. अर्ध्याच रस्त्यातून चालता येत होतं. त्यात पावसामुळं उरलेल्या जागेत सगळा चिखल झालेला. दिघीपासून ते कळसपर्यंतचा हा प्रवास असाच कष्टात झाला. कळसजवळ पुन्हा थोडा वेळ थांबलो. कळस-धानोरीच्या डाव्या हाताला लोहगावचा विमानतळ आहे. तिथून सुखोई विमानांचं उड्डाण सुरू होतं. काही वेळानं लष्करी वाहनांचा ताफाही शेजारून गेला. एका बाजूला वारकरी आणि एका बाजूला जवान असं हे दृश्य मोठं सुखावणारं होतं. 
कळसनंतर येते विश्रांतवाडी. माउलींची पालखी पूर्वापार इथं जरा विश्रांतीला टेकते, म्हणून या गावाचं नाव विश्रांतवाडी. आम्हीही इथं चहाला थांबलो. विश्रांतवाडीत नवा स्कायवॉक केला आहे. तिथं जाऊन वरून वारीचं दृश्य डोळे भरून पाहिलं. खाली उतरून पुढं चालू लागलो. पुण्यात आल्याबरोबर वातावरण बदललं. वारकऱ्यांसाठी सर्व शहर जणू स्तब्ध झालं होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनेक सेवाभावी संस्था, पोलिस, राजकीय संघटना आदींनी मोठमोठे मंडप टाकून वारकऱ्यांच्या स्वागताची सोय केलेली होती. काही जण पोह्यांचं मोफत वाटप करीत होते, तर कुणी केळ्यांचे घडच्या घड आणून वारकऱ्यांसाठी देत होतं. वातावरणातला भक्तिभाव कळसाला पोचला होता...
आता मात्र आमचे पाय 'बोलू' लागले होते. मग डेक्कन कॉलेजच्या आधीच आम्ही वारीतून बाजूला झालो आणि बसनं घरी परतलो. वारकऱ्यांसोबत १५ किलोमीटर चालताना मिळालेला एक अनामिक, अवर्णनीय आनंद आता वर्षभरासाठी आम्हाला पुरणार होता. मला या वारीतून काय मिळालं? असं वाटलं, की आपल्या संसारातून, व्याप-तापांतून, कमालीच्या सुखासीनतेतून, टोकाच्या उदासीनतेतून काही क्षण बाहेर यायला जमलं पाहिजे. संसारात राहून ही सकारात्मक विरक्ती अंगी बाणवता आली पाहिजे. सकारात्मक विरक्ती म्हणजे सगळ्यांत असून कशातच नसण्याची स्थिती! कुठलेही मोह नकोत, पाश नकोत, गुंतवणारे चिवट धागे नकोत. या सगळ्यांतून आपल्याला प्रसंगी चटकन बाहेर पडता आलं पाहिजे. असं बाहेर पडता आलं, तर 'झिरो ग्रॅव्हिटी'च्या पोकळीत तरंगत असल्याचा अनुभव येऊ शकतो. कुठलंच आकर्षण आपल्याला खाली खेचू शकत नाही. या स्थितीतून थोडं वर गेलं, की मग ते 'परब्रह्म' वगैरे भेटत असावं. पण सध्या तरी आपली यत्ता हीच... त्या पोकळीत तरंगण्याची! म्हणून माझी ही छोटी, साधी वारीच; पण आत्मानंदाची वारी! 
----

(पूर्वप्रसिद्धी : 'महाराष्ट्र टाइम्स'च्या संवाद पुरवणीत १० जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या संपादित लेखाचा मूळ तर्जुमा..)

6 Jul 2016

सुलतान रिव्ह्यू

लांबलेला डाव...
------------------
 

सलमान खानचा नवा चित्रपट म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. 'ईद'च्या मुहूर्तावर जवळपास दर वर्षी त्याचा एक नवा सिनेमा प्रदर्शित होत असतो आणि चाहतेही त्याची उत्सुकतेनं वाट बघत असतात.  मनोरंजनाचं संपूर्ण पॅकेज असं हल्ली सलमानच्या सिनेमांचं स्वरूप असतं. 'सुलतान'ही त्याला अपवाद नाही. पण तब्बल दोन तास ५० मिनिटांचा हा चित्रपट म्हणजे सलमाननं रंगविलेल्या 'सुलतान'पेक्षा प्रेक्षकांचीच स्वत:शी चाललेली लढाई वाटते. अत्यंत विस्कळित पटकथा, बांधणीचा अभाव असलेली कथा आणि अत्यंत प्रेडिक्टेबल मांडणी यामुळं अली अब्बास जफर दिग्दर्शित 'सुलतान'चा डाव रंगण्याऐवजी लांबलाच आहे.
या चित्रपटात सलमाननं हरियाणवी मुस्लिम कुस्तीगीर रंगवला आहे. कुस्तीगीर तरुणीच्या प्रेमाखातर पहिल्यांदाच आखाड्यात उतरून सुलतान त्या खेळावर अगदी लंडन अॉलिम्पिकमधे सुवर्णपदक मिळविण्याइतपत प्रभुत्व मिळवतो. त्याआधी तो त्या तरुणीचं - आरफाचं (अनुष्का शर्मा) - हृदय जिंकून तिच्याशी विवाहबद्धही झालेला असतो. मात्र, तो लंडनहून परतल्यावर अशी एक घटना घडते, की त्यामुळं त्याचं आयुष्यच बदलून जातं. सुलतान कुस्ती सोडतो. पण मग आठ वर्षांनंतर त्याच्यासमोर एक संधी चालून येते. एका परीनं ही त्याची स्वतःशीच लढाई असते. ती लढाई लढण्यास सुलतान सज्ज होतो आणि त्यातूनच सिनेमाचा (तुलनेनं आकर्षक असा) उत्तरार्ध उलगडत जातो.
सिनेमाचे दोन्ही भाग जवळपास दीड तासाचे आहेत. पूर्वार्ध अत्यंत विस्कळित आहे. त्यामुळं सुरुवातीपासूनच आपण गोष्टीत तल्लीन होत नाही. अनेकदा अशा सिनेमांत पूर्वार्ध हलका-फुलका आणि पुढच्या संघर्षाचा, लढाईचा पाया पक्का करणारा असतो. इथं सगळे प्रसंग सुटे सुटे समोर येतात. सलमान पतंग पकडायला धावतो हा प्रसंग त्याच्यातल्या चपळपणाची साक्ष देत असला, तरी तो पुष्कळच लांबला आहे. सुरुवातीचा हा सगळा भाग मग सुलतानचं कुस्तीच्या आखाड्यात शिरणं आणि एक अव्वल दर्जाचा कुस्तीगीर बनणं, मग त्याचा रोमान्स आणि लंडन अॉलिम्पिकपर्यंतचा प्रवास यानं व्यापला आहे. हा सगळा प्रवास एकात्म अनुभव देत नाही. तो विखंडित वाटतो. मध्यंतरातला धक्का कुस्तीशी संबंधित नसतो; तर कौटुंबिक असतो. तसा तो असायलाही हरकत नाही. पण त्या भावनिक आघाडीवरही सिनेमा निराशाच करतो. नायकाचं दुःख, त्याचं तुटलेपण, त्याची वेदना आपल्यापर्यंत त्या आवेगानं पोचतच नाही.
सिनेमाचा उत्तरार्ध तुलनेनं वेगवान आहे. पूर्वार्धातलं गावाकडचं वातावरण सोडून सिनेमा दिल्लीत येतो. इथं प्रो-टेकडाउन नावाची डब्ल्यूडब्ल्यूएफ सदृश लीग भरलेली आहे. गेली दोन वर्षं ही लीग तोट्यात आहे आणि तिच्या एका मालकाला आता ही लीग लोकप्रिय करण्याची शेवटची संधी आहे. त्यासाठी त्याच्या वडिलांच्या सूचनेनुसार तोे सुलतानला दिल्लीत घेऊन येतो. इथं सिनेमाचा लूक आणि एकूणच सगळी मांडणी बदलते. या स्पर्धेतल्या सुलतानच्या एकेक लढाया आणि त्याच्या आगेमागे त्याचा त्याच्या पत्नीशी पुन्हा जुळविण्याचा होत असलेला प्रयत्न अशा दोन गोष्टी समांतरपणे समोर येत राहतात. हा भाग नक्कीच प्रेक्षणीय आणि उत्कंठावर्धक आहे. विशेषतः सलमानचं शब्दशः 'बल'स्थान असलेली अॅक्शन दृश्ये या भागात येतात आणि ती खिळवून ठेवतात. अॅड्रनलिन पंप करणारीच ही सगळी दृश्यमालिका आहे, यात शंका नाही. पण सलमानच्या सिनेमात त्याच्या चाहत्यांना हे अगदी अपेक्षितच असतं. त्यामुळं पुढं हे हे असं असं होणार, हे अगदी सहज लक्षात येतं. त्यात कुठलाही धक्का नाही, की ट्विस्ट नाही. इथं सलमानचा प्रशिक्षक म्हणून एक पात्र येतं. रणदीप हुडानं ती भूमिका केलीय. गेस्ट अॅपिअरन्स म्हणे. पण या भूमिकेला काहीच शेंडा ना बुडखा! सलमानकडून गुरासारखी मेहनत करून घेण्याचं काम फक्त त्यानं इमानेइतबारे केलंय.
सलमाननं सुलतानची भूमिका चांगली केलीय, पण त्याच्यासाठी आता या अशा भूमिका म्हणजे हातखंडा आहेत. शिवाय त्याच्या सुजलेल्या चेहऱ्यावरून त्याचं वय चांगलंच जाणवतं. इमोशनल प्रसंगांत तो उणा पडतो आणि अॅक्शन दृश्यांत आता त्याचं कौतुक वाटत नाही. शिवाय यात पहिलवानाचीच भूमिका केली असल्यानं, सुरुवातीपासूनच तो शर्टलेस - उघडाच समोर येतो. त्यामुळे ते एक जे अॅट्रॅक्शन असतं बायकांच्या पब्लिकला, तेही इथं नाही. (अर्थात सतत बंब्या पाहण्याचं कथित नयनसुख मात्र त्यांना आहे.) असो. 
अनुष्काला काहीच काम नाही. ती कुस्तीगीर महिला म्हणून मुळीच शोभत नाही. तिची आणि सलमानची केमिस्ट्रीही जुळलेली नाही. (पीकेमध्ये आमीरबरोबर ती जुळलेली वाटली होती.) तिन्ही खानांसोबत सिनेमे करण्याचा तिचा एक 'केआरए' पूर्ण झाला एवढाच या भूमिकेचा अर्थ. आकाशच्या भूमिकेत अमित साढ यानं चांगलं काम केलं आहे. सलमानचा मित्र झालेला कलाकारही चांगलं काम करून गेलाय. संगीत फार काही लक्षात राहणारं नाही. हॅमरिंगमुळं एक-दोन गाणी सतत ऐकू येतात, ती सिनेमात ऐकू आल्यावर थोडी परिचयाची वाटतात, एवढंच.
तेव्हा हा लांबलेला डाव सलमानचे चाहते आवडीनं पाहतीलही कदाचित; पण इतरांसाठी मात्र तो कंटाळ्याचाच डाव ठरला आहे.

---
दर्जा - अडीच स्टार
---

26 Jun 2016

मटा वर्धापनदिन मराठी सिनेमा लेख

‘सांगत्ये ऐका’ ते ‘सैराट’...
----------------------------------

मराठी सिनेमाच्या इतिहासात ‘सैराट’ या चित्रपटानं आता अढळ स्थान मिळवलंय. लवकरच हा सिनेमा शंभर कोटी रुपये उत्पन्नाचं रेकॉर्ड गाठणार अशी चिन्हं आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच मराठी सिनेमा ठरेल. मराठी सिनेमानं मारलेली ही मजल मराठी माणसांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. या सिनेमाची केवळ भारतात नव्हे, तर जगभर चर्चा झाली. मराठी सिनेमाचा बोलबाला गेल्या काही वर्षांत वाढला आहेच. तो या निमित्तानं पुन्हा अधोरेखित झाला. यानिमित्तानं ‘मटा’च्या स्थापनेपासून ते आतापर्यंतचा मराठी सिनेमाचा प्रवास जाणून घेणं रंजक ठरेल. 
मुंबईत महाराष्ट्र टाइम्स सुरू झाला १८ जून १९६२ ला. त्याआधी तीन वर्षांपूर्वी म्हणजे १९५९ मध्ये पडद्यावर आलेला ‘सांगत्ये ऐका’ हा चित्रपट असाच सैराट धुमाकूळ घालत होता. अनंत माने दिग्दर्शित हा चित्रपट आणि त्यातलं जयश्री गडकरवर चित्रित झालेलं ‘बुगडी माझी सांडली गं’ हे आशा भोसलेंनी गायलेलं गाणं सर्वतोमुखी झालं होतं. पुण्याला विजयानंद टॉकीजमध्ये या सिनेमानं तब्बल १३१ आठवडे मुक्काम ठोकला होता. त्या काळात मराठी चित्रपटसृष्टी प्रामुख्यानं कोल्हापुरातच होती. पुण्यात प्रभात स्टुडिओ बंद पडल्यानंतर कोल्हापूर हेच मराठी चित्रपटांचं माहेरघर झालं होतं. बाकी इतर काही सिनेमे मुंबईत बनत. तेव्हा भालजी पेंढारकर, राजा परांजपे, अनंत माने हे दिग्दर्शक जोरात होते. ‘साधी माणसं’ आणि ‘जगाच्या पाठीवर’ हे दोन्ही सिनेमे १९६५चे. अत्यंत गाजलेले. राज्य सरकारनं मराठी चित्रपटांसाठी पुरस्कार सुरू केले ते १९६३ मध्ये. प्रपंच हा सिनेमा तेव्हा पहिला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा ठरला होता. व्ही. शांतारामही चित्रनिर्मितीत अग्रेसर होते. त्यांनी १९७२ मध्ये ‘पिंजरा’ सिनेमा केला. 
हा सिनेमा मराठीतला एक माइलस्टोन सिनेमा मानला जातो. डॉ. श्रीराम लागूंनी साकारलेली मास्तरांची अजरामर भूमिका, राम कदमांचं बहारदार संगीत, उषा मंगेशकरांनी गायलेल्या एक से फर्ड्या लावण्या आणि अनंत मानेंची भक्कम पटकथा या जोरावर ‘पिंजरा’ जबरदस्त हिट ठरला. ‘पिंजरा’च्या यशासोबतच आणखी एक नाव मराठी चित्रपटसृष्टीत झळकू लागलं होतं आणि ते म्हणजे दादा कोंडके. दादांचा ‘सोंगाड्या’ हा पहिला चित्रपट १९७० मध्ये प्रदर्शित झाला आणि तो प्रचंड गाजला. त्याआधी ‘विच्छा माझी पुरी करा’सारख्या वगनाट्यांतून दादा मराठी रसिकांना परिचित होते. मात्र, ‘सोंगाड्या’च्या यशानंतर दादांना राजमार्ग सापडला आणि त्यांनी ओळीनं नऊ रौप्यमहोत्सवी चित्रपट दिले. पुढचं ऐंशीचं पूर्ण दशक दादा मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य करीत होते. 
पांडू हवालदार, एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, तुमचं-आमचं जमलं, राम राम गंगाराम, ह्योच नवरा पाहिजे, बोट लावीन तिथं गुदगुल्या असे एक से एक हिट सिनेमे दादांनी दिले. पुढं दादांच्या सिनेमांचा दर्जा घसरला. ते द्व्यर्थी संवादांवरच अवलंबून राहू लागले. या जोडीला टिपिकल शहरी, मध्यमवर्गीय प्रेक्षकांना भावणारे सिनेमे तयार होतच होते. त्यात मुंबईचा जावई, अवघाचि संसार, अपराध, मानिनी, अरे संसार संसार, धाकटी जाऊ, वहिनीच्या बांगड्या, मुंबईचा फौजदार, देवता अशा सिनेमांचा समावेश होता. अरुण सरनाईक, कुलदीप पवार, रवींद्र महाजनी, अशोक सराफ हे नायक जोरात होते. नायिकांमध्ये जयश्री गडकर, रंजना, पद्मा चव्हाण, उषा चव्हाण, उषा नाईक, आशा काळे ते नव्यानं आलेली अलका कुबल या सगळ्या फॉर्मात होत्या. ऐंशीच्या दशकात दादांप्रमाणेच सुषमा शिरोमणीनं एकहाती किल्ला लढविला. त्यांनी काढलेले भिंगरी, फटाकडी, मोसंबी-नारंगी, गुलछडी आदी सिनेमेही जोरात चालले. पुढं १९८० ते १९८४ हा काळ हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणंच मराठीलाही वाईट गेला. याचं कारण व्हीसीआरचा लागलेला शोध आणि गावोगावी बोकाळेली व्हिडिओ पार्लर. 
यामुळं सिनेमांचा धंदा बसायला लागला. अर्थात याच काळात डॉ. जब्बार पटेल, अमोल पालेकर यांनी मराठी चित्रपटांची वेगळी वाट तोलून धरली होती. सामना, सिंहासन, जैत रे जैत आणि उंबरठा हे डॉ. पटेलांचे चारही चित्रपट खूप हिट झाले आणि चर्चेत राहिले. अमोल पालेकरांनी आक्रीत, तर डॉ. लागूंनी झाकोळ या चित्रपटाची निर्मिती याच काळात केली. शांतारामबापूही ‘चानी’सारखा वेगळा सिनेमा देत होते. साधारण १९८२-८३ च्या सुमारास आलेले गोंधळात गोंधळ, लेक चालली सासरला हे सिनेमे चांगले चालले होते. राजदत्त आणि कमलाकर तोरणे हे दिग्दर्शक तेव्हा जोरात होते.
व्हिडिओ पार्लरच्या गर्तेत सापडलेल्या मराठी सिनेमाला परत ऊर्जितावस्था मिळवून दिली ती दोन सिनेमांनी. हे दोन्ही सिनेमे १९८४ मध्ये झळकले. एक होता महेश कोठारेचा ‘धूमधडाका’ (हा शशी कपूरच्या ‘प्यार किये जा’चा रिमेक होता) आणि दुसरा होता सचिनचा ‘नवरी मिळे नवऱ्याला...’ हे दोन्ही चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत माइलस्टोन ठरले. पुढं या दोघांनीही अनेक हिट चित्रपट दिले. दोघांचेही सिनेमे एकाच वेळी येत आणि दोन्ही व्यवसाय करीत. 
सचिनचे सिनेमे शहरी तोंडवळा असलेले असत आणि महेशचे ग्रामीण. गंमत-जंमत, दे दणादण, अशी ही बनवाबनवी, थरथराट, एकापेक्षा एक, धडाकेबाज, आमच्यासारखे आम्हीच, झपाटलेला असे अनेक हिट चित्रपट या काळात आले. ‘आत्मविश्वास’सारखा गंभीर सिनेमाही सचिननं दिला. पुढं ‘कुंकू’ सिनेमा केल्यानंतर सचिननं दीर्घकाळ मराठी चित्रनिर्मितीतून संन्यास घेतला. (पुढं २००५ मध्ये ‘नवरा माझा नवसाचा’द्वारे त्यानं पुन्हा मराठी सिनेमांकडं लक्ष वळवलं.) लक्ष्मीकांत बेर्डे हा महेशचा हुकमी एक्का होता, तर अशोक सराफ हा सचिनचा. पुढची पाच-सात वर्षं या दोघांनीही मराठी चित्रपटसृष्टीवर अनिर्बंध राज्य केलं. केवळ लक्ष्या आणि अशोकमामांना घेऊन अनेक विनोदी चित्रपट तयार झाले. पण या ‘इनोदी’ चित्रपटांमुळं मराठी चित्रपटसृष्टीचं दीर्घकाळ नुकसानच झालं. प्रेक्षकांनी मराठी सिनेमांकडं पाठ फिरविली. 
याच काळात आणखी एक तरुण निर्माती-दिग्दर्शिका धाडसानं मराठी चित्रपटांची निर्मिती करीत होती. स्मिता तळवलकर तिचं नाव. ‘कळत-नकळत’पासून ते ‘तू तिथं मी’पर्यंत अनेक चित्रपट स्मितानं पुढील दशकभरात दिले आणि मरत्या मराठी इंडस्ट्रीमध्ये धुगधुगी कायम ठेवली. नव्वदच्या दशकात पुण्यातून सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयीनंही हेच केलं. ‘दोघी’पासून ते ‘वास्तुपुरुष’पर्यंत अनेक उत्तमोत्तम सिनेमे त्यांनी दिले. 
याच काळात सातत्यानं दर्जेदार चित्रपटनिर्मिती करणारं नाव म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी. त्यांच्या ‘बिनधास्त’ या पहिल्याच सस्पेन्स थ्रिलर चित्रपटानं खळबळ उडवून दिली. यातल्या सर्व प्रमुख भूमिका महिलांनीच केल्या होत्या, हे विशेष. पाठोपाठ भेट, कायद्याचं बोला, कदाचित, संत तुकाराम, आजचा दिवस माझा असे अनेक उत्तमोत्तम सिनेमे त्यांनी या काळात दिले. याच काळातलं आणखी एक नाव म्हणजे गजेंद्र अहिरे. ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ या चित्रपटापासून लक्ष वेधून घेणाऱ्या गजेंद्रनं त्यानंतर अनेक सिनेमे केले. सातत्यानं चित्रपट देण्याची त्याची हातोटी अचंबित करणारी आहे. शिवाय एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पेलून तो सिनेमे करीत असतो. सिनेमाच्या प्रती विलक्षण पॅशन असल्याशिवाय हे शक्य नाही.
एकविसावं शतक उजाडलं आणि पाठोपाठ मल्टिप्लेक्सचंही युग सुरू झालं. मल्टिप्लेक्समुळं सिनेमाच्या व्यवसायाचं परिमाणच बदलून गेलं. सिनेमानिर्मितीचं प्रमाण वाढलं. व्यावसायिकता वाढली.
नंतर २००४ मध्ये ‘श्वास’ आला आणि सगळंच चित्र बदललं. ‘श्वास’नंतर मराठी चित्रपटसृष्टीतलं सगळं चित्रच बदललं. अनेक दर्जेदार चित्रपट आले. तरुण मुलं दिग्दर्शनात आली. सचिन कुंडलकर, उमेश कुलकर्णी, सतीश राजवाडे, गिरीश मोहिते, सतीश मन्वर, मंगेश हाडवळे, सुजय डहाके यांनी खूप चांगले सिनेमे देण्याचा प्रयत्न केला. महेश मांजरेकर यांनी मराठी चित्रपटनिर्मितीत भव्यता आणली. ‘झी टॉकीज’नं मार्केटिंगचं प्रभावी तंत्र आणलं. जोगवा, नटरंग, बालगंधर्व, लोकमान्य टिळक, टाइमपास, शाळा ते अगदी अलीकडचा नटसम्राट असे किती तरी सिनेमे जोरात चालले. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’सारखा सिनेमा सर्वदूर पोचला. रितेश देशमुखनं मराठीत पदार्पण करून काढलेला ‘लय भारी’ही असाच कानाकोपऱ्यात पोचला आणि हिट झाला. ग्रामीण भागातून पुढं आलेले भाऊराव कऱ्हाडे, नागराज मंजुळे हे दिग्दर्शक जोमानं नवनव्या कलाकृती सादर करू लागले. त्यातून मराठी सिनेमाचा चेहरा बदलत गेला. नवे प्रयोग होत आहेत. आशयदृष्ट्या मराठी सिनेमा समृद्ध होताच; आता तो तंत्रदृष्ट्याही समृद्ध झाला आहे. बजेटही वाढलं आहे. आता मराठी चित्रपट नव्या वळणावर आहे. यापुढंही चांगले चांगले सिनेमे येत राहतील आणि मराठी चित्रपटसृष्टी नव्या उंचीवर जाईल, अशी खात्री वाटते.


---
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, मुंबई आवृत्ती, २५ जून २०१६)
----

24 Jun 2016

एक अलबेला - रिव्ह्यू




नाम बडे और दर्शन भी...
------------------------------

मा. भगवान म्हटलं, की अलबेला आणि अलबेला म्हटलं की मा. भगवान हीच नावं आठवतात, एवढं या नावांचं अद्वैत झालंय. भगवान पालव नावाच्या मराठमोळ्या माणसानं चाळीसच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत अक्षरशः थैमान घातलं. भगवान यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं नृत्य. कमरेखालचा भाग अजिबात न हलवता, केवळ हात आणि कमरेवरील भाग यांचा वापर करून ते ज्या पद्धतीनं नृत्य करीत असत, ती शैली लोकांनी डोक्यावर घेतली. भगवान स्टाइल डान्स या नावानंच तो नृत्यप्रकार ओळखला जाऊ लागला. अशा या अवलिया कलाकारावर 'एक अलबेला' हा मराठी चित्रपट आला आहे. मराठी कलाकारावर असा बायोस्कोपिक पद्धतीनं आलेला हा दुसरा मराठी सिनेमा. (आधीचा फाळकेंवरचा 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'.) शेखर सरतांडेल या दिग्दर्शकानं अत्यंत मेहनतीनं आणि प्रामाणिकपणे हा प्रयत्न आपल्यासमोर मांडला आहे. 
'एक अलबेला'मध्ये एक वाक्य आहे. भगवान यांना काही कारणानं नृत्य कलाकार मिळत नसतात. तेव्हा ते फाइट सीन करणाऱ्या कलाकारांकडून नृत्य करून घेतात. त्या वेळी ते म्हणतात, की प्रत्येकाच्या शरीरात नाचाची लय असते. तुम्ही ती फक्त ओळखायला हवी. हे वाक्य म्हणजे या सिनेमाचं भरतवाक्य म्हणायला हरकत नाही. कारण नंतर सिनेमाचा जवळपास संपूर्ण भाग भगवान तयार करीत असलेला 'अलबेला' हा सिनेमा आणि त्यातील गाणी व नृत्यं यांनीच व्यापला आहे. भगवान यांचा मूळ सिनेमा पाहताना आणि त्यातल्या 'शोला जो भडके'सारख्या गाण्यावर गीताबाली आणि भगवान यांचा (आणि त्यांच्या सहनृत्यकलाकारांचा) डान्स पाहताना आपणही नकळत ताल धरतो आणि नाचू लागतो. शेखर सरतांडेल यांनी या गाण्यांचं 'फ्रेम टु फ्रेम' रिक्रिएशन केलं आहे. ते पाहतानाही आपण तसाच ताल धरतो आणि (मनातल्या मनात का होईना) ते झिंग आणणारं नृत्य करू लागतो आणि हेच मला वाटतं, या सिनेमाचं यश आहे.
सरतांडेल यांनी सिनेमाचे सरळ सरळ दोन भाग केले आहेत. पहिला भाग भगवान यांचं सुरुवातीचं आयुष्य दाखविण्यात खर्च झाला आहे. त्यात अगदी १९३० च्या आंदोलनात भगवान यांनी शिवडीच्या मिठागारात केलेला 'सत्याग्रह' ते 'अलबेला'च्या निर्मितीपर्यंतचा प्रवास आला आहे. भगवान यांची कौटुंबिक परिस्थिती, त्यांना घर सोडावं लागणं, पानाच्या दुकानात काम करणं, त्या मोहल्ल्यातील शाहीन या तरुणीशी जुळलेले त्यांचे नाजूक भावबंध, मग तिचा विरह, त्यानंतर त्यांचं कुस्ती खेळायला जाणं, तिथल्या मित्रासोबत स्टुडिओत जाणं, मग अचानक सिनेमात काम करायची मिळालेली संधी, नंतर अॅक्शन हिरो म्हणून बी ग्रेड सिनेमांमध्ये त्यांनी कमावलेलं नाव आदी सर्व भाग तपशिलात येतो. सिनेमाचं संकलन झक्कास असल्यानं तो वेगानं पुढं सरकतो. कुठलंही दृश्य अकारण ताणलेलं नाही. अनेकदा तर नॅरेशनमधूनच गोष्ट पुढं जाते. प्रेक्षक सिनेमात गुंतून राहण्यासाठी हे असं वेगवान सादरीकरण पथ्यावर पडणारं आहे.
भगवान यांच्या आयुष्यात सी. रामचंद्र यांचं महत्त्वाचं स्थान होतं. त्यांची आणि भगवान यांची मैत्रीही सिनेमात दिसते. 'अलबेला'च्या यशात सी. रामचंद्र यांच्या संगीताचा आणि त्यांनी दिलेल्या तब्बल ११ गाण्यांचा मोठा वाटा आहे. 'भोली सुरत दिल के खोटे', 'शोला जो भडके', 'शाम ढले खिडकी तले तुम सिटी बजाना छोड दो' यासारखी सुपरहिट गाणी किंवा 'धीरे से आजा री अखियन में, निंदिया आजा री आजा'सारखी आजही सर्वश्रेष्ठ मानली जाणारी अंगाई ही सर्व अण्णा चितळकरांची कमाल होती. त्यांचा आणि लता मंगेशकरांचा आवाज, राम्बा-साम्बा म्युझिकच्या धर्तीवर दिलेलं ठेका धरायला लावणारं संगीत आणि पडद्यावर भगवान आणि गीताबालीचं अफलातून नृत्य हे कॉम्बिनेशन हिट होणारच होतं. पण तिथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. शेखर सरतांडेल यांनी 'एक अलबेला'च्या उत्तरार्धात हीच कहाणी मांडली आहे. 'अलबेला' सुपरहिट होण्यापर्यंतचाच प्रवास दाखवून त्यांनी या सिनेमासाठी नेमकी चौकट आखून घेतली आहे. सिनेमा केवळ एक तास ४७ मिनिटांचा आहे. वेगवान आणि क्रिस्पी मांडणीमुळं सिनेमाच्या वेधकतेत आणखी भरच पडली आहे.
उत्तरार्धाचं सर्वांत मोठं आकर्षण म्हणजे 'शोला जो भडके' आणि 'भोली सुरत दिल के खोटे' या गाण्याचं दिग्दर्शकानं केलेलं रिक्रिएशन आणि त्यातली मंगेश देसाई आणि विद्या बालन यांची जबरदस्त अदाकारी!  हे मूळचं सोनं एवढं बावनकशी आहे, की ते केवळ जसं आहे तसं मांडलं तरी भागणार होतं. सरतांडेल यांनी हे ओळखून या गाण्यांना व त्याच्या सादरीकरणाला धक्का लावलेला नाही. कुठलाही धोका न पत्करता ते 'फ्रेम टु फ्रेम' रिक्रिएट केलं आहे. हे करताना त्यांना मंगेश देसाई आणि विद्या बालन यांनी समरसून साथ दिल्यानं या दोन्ही गाण्यांचं सोनं पुनश्च झळाळून उठलं आहे, यात शंका नाही. विशेषतः विद्यानं गीताबाली खूपच तन्मयतेनं अंगी भिनवून घेतल्याचं जाणवतं. तिच्या प्रत्येक मुद्रेत, हावभावात आणि नृत्याच्या प्रत्येक स्टेपमध्ये तिनं गीताबाली पुन्हा आपल्यासमोर उभी केली आहे. (विशेषतः 'भोली सुरत' या गाण्यात पहिल्या अंतऱ्याच्या शेवटी तिच्या अत्यंत बोलक्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहावेत.) आज ही दोन्ही (म्हणजे आताची आणि मूळची) गाणी पाहताना त्या गाण्यांतला ठेका आणि नृत्यातली लय एवढी भावते, की त्याचं वर्णन करायला शब्द नाहीत. अगदी समूह नृत्यातील कलाकारही एवढ्या फ्रेश चेहऱ्यानं आणि तन्मयतेनं नाचले आहेत, की आयुष्यात कधीही नाच न केलेल्या माणसांनाही उठून त्यांचा हात हाती धरून नृत्य करावंसं वाटलं पाहिजे.
भगवान यांना त्या वेळी हा सिनेमा बनवताना आलेल्या अडचणी, अॅक्शन पटांतून सामाजिक सिनेमाकडे वळताना चित्रपटसृष्टीतील वितरक, इतर लोकांनी व्यक्त केलेला अविश्वास, गीताबालीला सिनेमासाठी साइन करताना झालेला त्रास, नंतरही तिच्या सेक्रेटरीनं दिलेला त्रास हा सगळा भाग उत्तरार्धात येतो. भगवान यांचं कणखर व्यक्तिमत्त्व समोर येतं. 'लायकीपेक्षा मोठी नसतील, तर ती स्वप्नं काय कामाची?' हा त्यांचा सिद्धान्त होता. तो ते अखेरपर्यंत जगले. 'अलबेला' तयार झाला. प्रदर्शितही झाला. सुरुवातीला प्रेक्षकांचा फार प्रतिसाद नव्हता. तेव्हा भगवानदादांनी स्वतःची सर्व संपत्ती गहाण ठेवून चित्रपट आणखी काही दिवस थिएटरमध्ये ठेवण्याची विनंती केली. त्या दिवशी ते इम्पिरियल थिएटरमध्ये जातात आणि दार उघडून हळूच आत पाहतात. त्यानंतर समोरच्या मोकळ्या जागेत एकटेच खास भगवान शैलीतलं नृत्य करतात हा शॉट जमून आलेला आहे. 'अलबेला' त्या दिवशी हिट झाला. लोकांनी 'शोला जो भडके' गाण्यावर पैसे उधळले. भगवान जिंकले...
प्रमुख व्यक्तिरेखेच्या जीवनात आपल्याला रस निर्माण झाला पाहिजे, त्याच्या सुख-दुःखाशी तो रममाण झाला पाहिजे, तर तो सिनेमा चांगला! 'एक अलबेला' या कसोटीला उतरला आहे, असं म्हटलं पाहिजे. हे दिग्दर्शक सरतांडेल यांचं जसं यश आहे, तसंच ते मंगेश देसाईचंही आहे. मंगेशचा चित्रपटसृष्टीतला प्रवास मी दीर्घकाळ पाहतो आहे. या गुणी कलाकाराला एकाच संधीची आवश्यकता होती. ती या सिनेमाच्या रूपानं त्याला मिळाली आहे आणि त्यानंही या संधीचं सोनं करून दाखवलं आहे. 'एक अलबेला' हा त्याच्या कारकि‍र्दीतला माइलस्टोन सिनेमा ठरणार, यात शंका नाही. भगवानदादांच्या नृत्य शैलीची नक्कल करणं तसं सोपं नाही. पण मंगेशनं मेहनतीनं ते जमवलं आहे.
या सिनेमात गीताबालीच्या भूमिकेच्या रूपानं विद्या बालन प्रथमच मराठीत अवतरली आहे. तिचा प्रसन्न वावर या सिनेमाला 'चार चाँद' लावणारा ठरला आहे. विद्याच्या चाहत्यांसाठी तिला गीताबालीच्या भूमिकेत बघणं ही एक पर्वणी ठरेल. विद्यानं गीताबालीच्या नृत्याची लय अंगी भिनवून घेतल्याचं पदोपदी जाणवतं. तिच्याच आग्रहावरून चित्रित करण्यात आलेला 'शाम ढले खिडकी तले'चा तुकडाही यात आहे.
एवढं सगळं सांगितल्यावर हा सिनेमा आवर्जून पाहाच, हे वेगळं सांगणं म्हणजे भगवानदादा अफलातून नृत्य करीत असत, हे आवर्जून सांगण्यापैकी झालं. जो मनापासून नाचतो, तो जास्त जगतो. (भगवानदादा दीर्घायुषी होते. नव्वदाव्या वर्षी गेले...)
जा, नृत्याची लय अंगी भिनवून घ्या....! कारण आपल्यातही 'एक अलबेला' वस्ती करून आहे... त्याला मस्ती करण्याची संधी कधी देणार?
---

दर्जा - साडेतीन स्टार
---

12 Jun 2016

उडता पंजाब लेख

सिनेमाला मुक्तपणे जगू द्या... 
----------------------------------


सेन्सॉर बोर्ड पुन्हा एकदा नव्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या वेळचं निमित्त आहे ‘उडता पंजाब’ या नव्या चित्रपटाचं. पंजाबमधील अंमली पदार्थांच्या व्यसनात तरुण पिढी कशी वाहून चालली आहे, यावर प्रकाश टाकणारा हा सिनेमा आहे म्हणे. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यानं या सिनेमाची निर्मिती केली आहे आणि अभिषेक चौबे यानं हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. यात शाहीद कपूर, आलिया भट, करिना कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १७ जूनला सर्वत्र प्रदर्शित व्हायचा होता. पण वादाला सुरुवात झाली ती सेन्सॉरनं हा चित्रपट अडविल्यामुळं. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं तब्बल ९४ कट सुचविले आणि शीर्षकातून पंजाब हे नाव आणि इतर बरंच काय काय कापायला लावलं. म्हणजे तसं केलं तरच हा सिनेमा सेन्सॉरकडून पास होईल, असं सांगितलं. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी यापूर्वी अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत आणि तसे निर्णयही घेतले आहेत. जेम्स बाँडच्या ताज्या चित्रपटातील एक चुंबनदृश्य ५६ सेकंदांवरून २० सेकंदांचं करणारे हेच ते महाशय! निहलानींवर त्या वेळी ‘संस्कारी निहलानी’ अशी टीका माध्यमांतून झाली होती. त्या वेळीही मी ‘हे संस्कार बोर्ड बुडवा’ या शीर्षकाचा लेख लिहिला होता, हे वाचकांना स्मरत असेल.
आता पुन्हा सेन्सॉर बोर्ड चर्चेत आलंय. या वेळी तर निहलानींनी निर्माता अनुराग कश्यपवर थेट आरोप केलाय. पंजाबमध्ये लवकरच विधानसभेची निवडणूक होऊ घातलीय. त्यात आम आदमी पक्षाला (आप) अनुकूल वातावरण आहे, असं आत्ताचं चित्र आहे. तर अनुराग कश्यप हा ‘आप’चा असून, त्यानं त्या पक्षाकडून पैसे घेऊन सध्याच्या सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्यासाठी हा चित्रपट तयार केलाय, असा गंभीर आरोप निहलानी यांनी केलाय. अनुरागनं हा आरोप हसण्यावारी नेलाय आणि निहलानींना खोटंही धड बोलता येत नाही, अशी टिप्पणी केलीय.
 यात सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांनी सरळ सरळ राजकीय भूमिका घेतली आहे. ‘मी नरेंद्र मोदींचा चमचा आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. मोदींचा नाही तर काय इटलीच्या पंतप्रधानांचा चमचा व्हायचं का?’ असे बाणेदार उद्-गार निहलानी साहेबांनी काढले आहेत. चमचा होण्याची एवढी असोशी आत्तापर्यंत कुणातच पाहिली नव्हती. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी आतापर्यंत जे जे लोक विराजमान झाले, ते सगळे काही या एकाच गुणामुळं तिथं पोचले नव्हते, याचं भान निहलानींना असण्याचं कारण नाही. बाकी निहलानींसारखे लोक सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी आणि गजेंद्र चौहान एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्त करून केंद्र सरकारनं एकूण आपली या विषयातली रुची आणि गती दाखवून दिलीच आहे. त्यामुळं निहलानींसारख्यांना रान मोकळंच मिळालं आहे. एवढे दिवस ते किमान सिनेमाशी संबंधित वाद निर्माण करीत होते. आता त्यांनी थेट राजकीय वाद निर्माण करून पुढचं पाऊल गाठलं आहे. ‘उडता पंजाब’ जात्यात आहे, पण बाकीचे सुपात आहेत आणि त्यांनाही कधी तरी या सेन्सॉरशाहीचा सामना करावा लागणार आहे, हे नक्की. कदाचित याची चाहूल लागल्यामुळेच की काय, बॉलिवूडमधले इतर निर्माते-दिग्दर्शकही अनुराग कश्यपसोबत उभे राहिले आणि या सर्वांनी सेन्सॉरविषयी आवाज उठविला. किमान वरकरणी तरी सगळे एक दिसत आहेत.
अर्थात हे सगळे बॉलिवूडवासी निर्माते आणि दिग्दर्शक सगळेच काही धुतल्या तांदळासारखे आहेत, असं मुळीच नाही. उगवत्या सूर्याला नमस्कार करणे आणि वारा पाहून टोपी फिरवणे यात ते पटाईत आहेत. शिवाय त्यांचं तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्य ‘सिलेक्टिव्ह’ असतं, हे वारंवार दिसून आलं आहे. बाकी कलात्मक मूल्यांशी निष्ठा, सहकलाकारांविषयी आस्था आणि संवेदनशीलतेविषयी न बोललेलंच बरं. आत्ताही या वादात बॉलिवूडमधले एरवी कायम नाकानं कांदे सोलणारे काही बडे लोक ‘अळीमिळी गुपचिळी’ बसले आहेत, हे लोकांच्या लक्षात आहे. या लोकांच्या राजकीय प्रेरणा काय आहेत, हे सर्वांना ठाऊक आहे. ‘पोलिटिकली करेक्ट’ असण्याची त्यांची धडपड लाजवाब असते. सर्वसामान्य लोकांचं एखाद्या गोष्टीविषयी एक मत असेल, तर यांचं नेमकं त्याविरुद्ध असणार, हे धरूनच चालावं. त्यामुळं अनुरागनंही उच्चरवात सेन्सॉरविरोधात डरकाळी फोडताना, आपल्याच व्यवसायबंधूंच्या दांभिकतेविषयीही कधी तरी बोलावं. सिनेमातले लोकही राजकीयदृष्ट्या प्रेरित असतात आणि स्वतःच्या फायद्यासाठीच ते आपली टोपी वारंवार फिरत असतात, हे सत्य आहेच. ‘उडता पंजाब’विषयी नक्की काय घडलंय हे समोर येईलच. पण कुणा राजकीय पक्षाची ‘सुपारी’ घेऊन असे सिनेमे कुणी काढू लागलं, तर उद्या तशा नसलेल्या सिनेमाकडंही लोक संशयानं पाहतील आणि एकूणच या व्यवसायाचंच दीर्घकालीन नुकसान होईल, यात दुमत नसावं.
सेन्सॉर बोर्ड, राजकारण आणि बॉलिवूडवाल्यांचे इगो यात सर्वांत भरडला जाणार आहे तो खरा, अस्सल सिनेमा. आपल्याकडचा सिनेमा मोकळा श्वास घेऊ लागलाय तो गेल्या १५-२० वर्षांत. त्यापूर्वी वेगळ्या सिनेमाचे प्रयत्न होतच नव्हते असं नाही. पण मल्टिप्लेक्सच्या आगमनानंतर या सिनेमाला हक्काची जागा मिळाली. त्यातून अनुराग कश्यप, दिबाकर बॅनर्जी, रीमा कागती, झोया अख्तर यांच्यापासून ते अभिषेक चौबेपर्यंत अनेक नवे दिग्दर्शक वेगळ्या प्रकारच्या कलाकृती घेऊन समोर येऊ लागले. हा सिनेमा प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारला. या सर्वांचे प्रयत्न प्रामाणिक होते, सच्चे होते हे जाणवत होतं. काही तरी मांडायची, सांगायची त्यांची असोशी प्रेक्षकांना कळत होती. ज्याला जे सांगायचंय ते सांगता येतंय आणि ज्याला ते पाहायचंय ते पाहता येतंय अशी ही सोयिस्कर आणि लोकशाहीयुक्त मांडणी होती. समाजातल्या विविध वर्गांतल्या गटांना, जातिसमूहांना हा सिनेमा साद घालत होता आणि आहे. इथल्या चुकीच्या प्रथांना, कथित संस्कारांना हा सिनेमा प्रश्न विचारू लागला होता आणि आहे. गेल्या २५ वर्षांत देशात आर्थिक उदारीकरण आल्यानंतर पुलाखालून पुष्कळच पाणी वाहून गेलं. त्यानंतर जन्मलेली पिढी आज पंचविशीत आहे. त्यातले अनेक जण या सिनेमासृष्टीत आहेत. नवे प्रयत्न करीत आहेत. हात-पाय हलवीत आहेत. आपल्या जाणिवा तपासून पाहत आहेत. नवं काही तरी शोधत आहेत. मांडत आहेत. अशा वेळी सेन्सॉर बोर्डानं प्रागतिक भूमिका घ्यायला हवी. या नव्या लाटेला, नवा आशांना, नव्या स्वप्नांना योग्य दिशा दाखवायला हवी. त्याउलट हे करू नका, ते करू नका, असं घरातल्या एखाद्या किरकिऱ्या आणि जुन्या काळासोबत गोठलेल्या आजोबांसारखं हे सेन्सॉर बोर्ड किरकिर करू पाहतंय. तुमचे राजकीय हितसंबंध काय असायचे ते असोत, तुम्हाला कुणाचे चमचे व्हायचंय की कुणाचे तळवे चाटायचेत हा तुमचा प्रश्न आहे. पण इथल्या नव्या दमाच्या तरुणांना, इथल्या अभिव्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केलात, तर ती तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही, हे या लोकांनी नीट लक्षात ठेवायला हवं. सत्ताधीशांपेक्षा कधी कधी सत्तेच्या आश्रयानं वाढणारी बांडगुळंच जास्त माज करतात, हे अनेकदा दिसून येतं. पण या बांडगुळांमुळं सत्ताधीशांच्या वृक्षातला जीवनरस शोषला जाऊन एके दिवशी तो महाकाय वृक्षही जमीनदोस्त होतो, हे सत्ताधीशांनी लक्षात घ्यावं.
सेन्सॉर बोर्डाला दादा कोंडके ‘शेणसार बोर्ड’ म्हणत. याचं कारण या सेन्सॉर बोर्डानं त्याला नेमून दिलेली कामं सोडून इतर गोष्टींत नाक खुपसण्याचे उद्योगच पुष्कळ केलेले बघायला मिळतात. सेन्सॉर बोर्ड नामक ही यंत्रणा अस्तित्वातच नको, असं काही लोक म्हणतात. एवढा टोकाचा विचार करायला नको; पण या बोर्डानं काळाप्रमाणं बदलावं आणि तिथं किमान आजच्या नव्या सिनेमाची नवी भाषा जाणणारी, तरुणांच्या आदरस्थानी असलेली ज्येष्ठ मंडळी कधी तरी बसावीत. सरकारनं आपल्या स्वतःच्या हितासाठी तरी हे करावं. म्हणजे मग ‘उडता पंजाब’सारखे वाद भविष्यात होणार नाहीत.
---

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र  टाइम्स, पुणे आवृत्ती; १२ जून २०१६)
---