29 Jun 2021

फिरकीचा ठोंब्या - भाग १

वाचण्यापूर्वी
--------------

(नोंद - पाच वर्षांपूर्वी ‘साहित्य सूची’ या मासिकात संपादक योगेश नांदुरकर यांच्या सूचनेनुसार ‘फिरकीचा ठोंब्या’ नावाचं सदर मी लिहिलं होतं. राज्यातल्या, त्यातही पुण्यातल्या साहित्यविषयक घडामोडींची हलकीफुलकी दखल घेणं, टोप्या उडवणं, टपल्या मारणं असं त्याचं स्वरूप होतं. साधारण दीड वर्षं मी हे सदर चालवलं. मला लिहायला फारच मजा आली. वाचकांनाही तेव्हा हे सदर आवडलं होतं... तशा प्रतिक्रिया मला तेव्हा मिळत असत... या सदरासाठी रेश्मा बर्वे हिनं सुंदर व्यंगचित्रं काढली होती. तिनं ‘ठोंब्या’ फारच सुरेख साकारला होता. आता या सदरातले सर्व भाग मी ब्लॉगवर उपलब्ध करून देतोय... त्यातला हा पहिला भाग...)

----

१.

मसाप... साप... साप...
---------------------------

पुण्यनगरीच्या हृदयस्थानातून जाणाऱ्या टिळक रस्त्यावर महाराष्ट्र साहित्य परिषदेची वास्तू वसली आहे. त्या ऐतिहासिक वास्तूत जावयास आम्हास नेहमीच भय वाटते. अगदी 'भय इथले संपत नाही,' अशी अवस्था होऊन जाते. साहित्य आदी निरुपद्रवी गोष्टींत रमणाऱ्या लोकांपासून कसले हो भय, असे कुणी म्हणेल. पण मग त्या कुणाला या साहित्यवास्तूची खरी ओळखच नाही, असे म्हणावे लागेल. वास्तूमधल्या खजिन्याचे संरक्षण करावयास वास्तुपुरुष कसा नागाचे वा सापाचे रूप घेऊन डौलानं त्या खजिन्यावर बसलेला असतो, तसेच दृश्य येथे नजरेस पडेल, असे भय आम्हास वाटते. साहित्याच्या खजिन्याचे संरक्षण करावयास एक नव्हे, तर चांगले पंधरा-सतरा पदाधिकारी हातात साहित्यदंडुका घेऊन बसले आहेत, हे पाहून धडकी भरेल नाही तर काय!
वास्तविक स्वतःचा वेळ आणि पैसा घालवून दुसऱ्याच्या मालाचे (सॉरी, सॉरी... साहित्याचे) संरक्षण करणे हा घरचे खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजण्याच्या धंद्याइतकाच पवित्र धंदा होय. असे काम करावयास माणसे मिळणे मुश्कील. पण पुण्यपत्तनस्थ मसाप खजिन्याचे संरक्षण करावयास लोक निवडणूक वगैरे लढवून पुढे येतात, हे पाहून आम्हाला अश्रू आवरेनासे झाले. क्वचित प्रसंगी माधवराव पटवर्धन सभागृहात भिंतीवर मुक्कामास असलेले थोर्थोर साहित्यिकही अशीच टिपे गाळत आहेत, हे दृश्यही जाता-येता दिसू लागले. एकदा आमचा अश्रुपात आवरल्यानंतर साहित्यसेवेसाठी आपणही उभे ठाकावे, ऐसे सहज मनात आले. एखादा विचार मनात आला, की तो लगेच अमलात आणायचा हे आमचे धोरण आहे. त्यानुसार, लगेच निवडणूक लढवावयास गेलो. आधी तेथील सफारी गुरुजींनी आम्हाला आपादमस्तक न्याहाळले. आम्ही कुठल्याही अंगाने साहित्यिक, प्रकाशक सोडाच; पण चार बुके शिकलेलेदेखील वाटत नाही. चेहराच तसा आहे. आम्ही आमची मनीषा सांगितल्यावर तेथील गृहस्थ अकटोविकट हसले. इतर चार कारकून हसले. मसापच्या भिंतीही हसल्या. 'सभासद आहात काय,' असा प्रश्न मागून तीरासारखा आला. आता हे आम्हास ठाऊकच नव्हते. हे अज्ञान प्रकट करून झाल्यावर गृहस्थांशेजारच्या काकू म्हणाल्या, 'अरे बाळा, जा. पुढल्या वेळेस ये हो...' आता त्या त्यांच्या डब्यातून काढून सुंठवडी देतील, असे वाटले. त्यातला पूर्वार्ध खरा ठरला. पण उत्तरार्ध चुकला. त्यांनी सुंठवडी की आलेपाक काढला आणि स्वतःच खाल्ला. एकूणच इथं आपले खाद्य आपणच आणायचे असा प्रकार दिसतोय तर! हात हलवीत परतलो.
आम्हाला उभे राहता येणार नाही, म्हटल्यावरही आम्ही जिद्द न हरता, एका सभासद मित्राला गाठले. या मित्राच्या काकांचे पुस्तकाचे दुकान होते. काकांनी एकदा चुकून मित्राचीही पावती फाडल्यानं मित्र सदस्य झाला होता. तो सध्या डिजिटल फ्लेक्स बनवण्याच्या धंद्यात होता. त्याला अमाप बरकत होती. पण त्याला धंदा सोडून साहित्यसेवा करायची नव्हती. त्यामुळं तोही प्रश्न मिटला. पण पाहिजे तेव्हा फ्लेक्स बनवून देतो, एवढं आश्वासन या मित्रानं दिलं.
त्यानंतर आम्ही आणखी एका जाणकार मित्राकडं गेलो. हा पत्रकार होता. याची तिथं उठबस होती. त्याला विचारल्यावर तोंडातला गुटखा न थुंकता, त्यानं त्रासिक मुद्रेनं विचारलं, 'कोव्वं प्यायय'? त्याला खोबरं पाहिजे असेल असं वाटलं म्हणून धावलो, तो सन्मित्र पचकन बाजूला थुंकून विचारते जाहले - कोणते पॅनेल? हां... आत्ता कळलं त्याला काय म्हणायचंय ते. पण कार्पोरेशनच्या इलेक्शनप्रमाणं इकडंही प्यानेल वगैरे भानगड असते, हे आमच्या गावीही नव्हते. (एकूणच आमच्या गावी अनेक गोष्टींचा अभाव असल्याचा एक भावपूर्ण निष्कर्ष इथं निघू शकतो.) असो. पण मग आता आपण कोणता झेंडा घ्यावा हाती, असा प्रश्न पडला. कालांतराने असे कळले, की आमचे आणखी एक मित्र या रिंगणात उतरले आहेत. हे गृहस्थ उत्साही होते. त्यांनी ते राहत होते, त्या गल्लीच्या तोंडावर भावी उमेदवार म्हणून फ्लेक्सही लावला होता. पण त्या वॉर्डातल्या सर्व इच्छुक पैलवानांनी तो रात्रीतच शहीद केला. पण आमच्या मित्राचा कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत उतरायचा कोणताही इरादा नाही, हे कळल्यावर त्यांनी पुन्हा तो उभा केला आणि मित्राला भरपूर शुभेच्छाही दिल्या.
हा मित्र फारच उत्साही निघाला. त्यानं मतदारांची यादी पैदा केली. गावात दोन-अडीच हजार मतदार आहेत, असं कळलं. मित्रानं काम-धंदा सोडला. रोज काही मतदारांना फोन करायचा, तर काहींना प्रत्यक्ष भेटायचं असा घाट त्यानं घातला. अनेक मतदारांचे फोन लागेनात, तेव्हा ते (फोन नव्हे; मतदार) स्वर्गवासी झाल्याचं कळायचं. एकदा लेखिका समजून त्यानं फोन लावला, तर तो आडते बाजारातील दलालाचा निघाला. दुसऱ्या एकाला प्रकाशक समजून फोन केला, तर त्यानं आजचा आकडा काय, असा प्रश्न विचारल्यावर याला आकडीच आली. असे सगळे चुकीचे फोन जाऊ लागल्यावर त्यानं ती मोहीम गुंडाळून ठेवली आणि प्रत्यक्ष मतदारांच्या घरीच धडक मारायची ठरवलं. एक तर पुणेकरांच्या घरी जायचं हे धाडस... त्यात हा नेमका दुपारी एक ते चार या वेळेत जायचा. अनेकांनी दारच उघडलं नाही. काहींनी दारावर दुपारी एक ते चार बेल वाजवू नये, वाजविल्यास तुमच्या कानाखाली घंटा वाजविण्यात येईल, असं स्पष्ट लिहिलं होतं. दुपारच्या वेळी झोप न येणाऱ्या काही लोकांनी दार उघडलं खरं, पण जाळीच्या दारातूनच मतदान वगैरे काही करणार नसल्याचं सांगून टाकलं. काही मूळ पुणेकर नव्हते, त्यामुळं त्यांनी दार उघडलं. पण आपण मतदार असल्याचं त्यांना माहितीच नव्हतं. तुम्हीच देऊन टाका ना आमचं मत, असं म्हणून आणि एक मारीचं बिस्कीट देऊन त्यांनी मित्राला बोळवलं. एका असहाय साहित्यिकांनी, 'आमच्या घरी चार मतं आहेत; मी एका मताचे अमुक तमुक हजार एवढे मानधन घेतो, तुम्ही किती देणार बोला,' असा रोकडा सवाल टाकून मित्रास फेफरं आणलं होतं.
असं करता करता मित्राला शेवटी डोक्यात काहीच राहिना. कोण मतदार, कोण उमेदवार काहीच लक्षात येईना. एकदा तर रात्री स्वतःच्या बायकोस झोपेत 'मलाच मत द्या बरं का, ताई,' असं म्हणाला आणि तिचा महिनाभराचा अबोला ओढवून घेतला. साहित्यसेवेचा दंडुका हाती धरण्यास कोण ही धावपळ सुरू होती. आमच्या मित्राप्रमाणेच गावातले तीस-चार लोक या कार्यी मग्न झाल्याचे कळले. करता करता निवडणुकीचा दिवस उजाडला. बारकोडवाल्या मतपत्रिका कार्यालयात येऊन पडल्या. निकालही जाहीर झाला. जुने गेले; नवे आले. ताई गेल्या; दादा आले! मॅडम गेल्या; सर आले!
आम्ही लगेच सरांना जाऊन भेटलो. सर स्वभावानं खूपच चांगले. अगदी गोड गोड! त्यांनी प्रेमानं आमचा गालगुच्चा घेतला आणि त्यांनाच आम्ही मत दिल्याबद्दल आमचे मनभरून आभार मानले. आम्ही मतदारच नव्हतो, ही गोष्ट सर विसरले. पण सध्या ते प्रत्येकालाच मतदार समजून आलिंगन देत आहेत किंवा गालगुच्चा घेत आहेत, असे कळले. छान वाटले. आता कारभार गोडीगोडीनं, जोडीजोडीनं होणार याची खात्री पटली. 'मसाप साप' म्हणून भुई धोपटण्यात काही अर्थ नसतो, हे कळले... आम्ही शांतपणे पायऱ्या उतरून बाहेर पडलो आणि शेजारच्या मिसळीकडं वळलो...

---


(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, मे २०१६)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

26 May 2021

दिठी - रिव्ह्यू

 पल्याडचं दाखवणारी...
----------------------------

सुमित्रा भावेंचा ‘दिठी’ हा नवा मराठी सिनेमा म्हणजे साध्या डोळ्यांना दिसतं, त्याही पल्याडचं दाखवणारी ‘दिठी’ (दृष्टी) देणारा सिनेमा आहे. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर असं जोडीनं नाव नसलेला आणि दिग्दर्शक म्हणून सुमित्रा भावे यांचं एकटीचंच नाव असलेला हा पहिला (आणि दुर्दैवानं शेवटचा) चित्रपट. हा सिनेमा दोन वर्षांपूर्वी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) कोथरूडच्या सिटीप्राइडमध्ये एक नंबरच्या स्क्रीनमध्ये पाहिला होता. माझे आवडते लेखक दि. बा. मोकाशी यांच्या ‘आता आमोद सुनासिं आले...’ या कथेवर हा सिनेमा आधारित आहे, हे कळल्यामुळं तेव्हा आवर्जून रांगेत उभं राहून सिनेमा पाहिला होता. पाहिल्यानंतरच ते रांगेत उभे राहण्याचे कष्ट भरून पावले, हे कळलं होतं. तेव्हापासून तो कधी प्रदर्शित होतोय, याची वाट पाहत होतो. सध्या थिएटर्स बंदच असल्यानं अखेर ‘दिठी’ आता ‘सोनी लिव्ह’वर प्रदर्शित झाला आहे. मी पाहिला त्याला बरेच दिवस झाले होते. म्हणून आज परत एकदा पाहिला आणि मग लिहायचं ठरवलं. सिनेमा संपल्यावर दोन गोष्टींसाठी डोळ्यांत पाणी जमा झालं. एक तर त्यातल्या आशयामुळं सिनेमाला मिळालेली डोळ्यांची ती खास दाद होती. दृष्टीपलीकडचं दाखविणाऱ्या या सिनेमाला नेहमी अलीकडचं दाखवणाऱ्या डोळ्यांनी अशी दाद द्यावी, हे मला विलक्षण वाटलं. दुसरं कारण म्हणजे हे असं दृष्टीपलीकडचं दाखविणाऱ्या सुमित्रा भावे आपल्यात नाहीत, याची अचानक झालेली ऐहिक जाणीव. आपण काय गमावलंय हे लक्षात येऊन पोटात खड्डाच पडला. पण परत मनाला समजवायला हा सिनेमाच धावून आला. आपल्याकडं डोळे आहेत, पण ‘दृष्टी’ सुमित्रामावशीच्या ‘दिठी’नं दिली आहे की... 
आपल्या साध्या-सरळ जगण्यातले तितकेच साधे-सरळ पेच सोडवण्यासाठी संतसाहित्याने फार मोठा आधार दिला आहे. ज्ञानेश्वर माउलींच्या ‘अमृतानुभवा’तील नवव्या प्रकरणातील...

आतां आमोद सुनांस जाले। श्रुतीसि श्रवण रिघाले।

आरिसे उठिले। लोचनेंसी।।

आपलेंनि समीरपणे। वेल्हावती विंजणे।

कीं माथेंचि चांफेपणें। बहकताती।।

जिव्हा लोधली रासे। कमळ सूर्यपणे विकासे।

चकोरचि जैसे। चंद्रमा जालें ।।

फुलेंचि जालीं भ्रमर। तरुणीची जाली नर।

जाले आपुलें शेजार। निद्राळुची ।।

चूतांकुर जाले कोकीळ। आंगचि जाले मलयनिळ।

रस जाले सकळ। रसनावंत ।।

तैसे भोग्य आणि भोक्ता। दिसे आणि देखता ।

हे सारले अद्वैता। अफुटामाजी ।।

यातील पहिल्या ओळीचा आधार घेऊन मोकाशींनी कथा लिहिली आहे. आमोद म्हणजे सुवास आणि सुनांस म्हणजे नाक. जेव्हा सुवासच नाक होतो आणि स्वत:ला भोगू शकतो, तेव्हाची अद्वैताची अवस्था म्हणजे अमृतानुभव. पुढीस सर्व दृष्टान्त याच धर्तीवरचे आहेत. मोकाशींच्या कथेतील केंबळं गावातील रामजी लोहाराचा तरुण मुलगा भोवऱ्यात बुडून मरण पावला आहे. पाच-सहा दिवस झाले, पाऊस हटायला तयार नाही. रामजी गेली तीस वर्षं पंढरीची नियमित वारी करणारा वारकरी आहे. विठ्ठलाचा भक्त आहे. विठ्ठलाची एवढी भक्ती करूनही तरुण मुलगा अचानक देवानं का ओढून नेला, या असीम दु:खात रामजी बुडाला आहे. गावात संतू वाण्याकडे रोज होणाऱ्या पोथीवाचनालाही जाण्याचा उत्साह त्याला नाही. सून बाळंत झाली आणि तिला मुलगी झाली, म्हणून तो तिच्यावरही राग धरून आहे. गावातल्या शिवा नेमाणेची गाय सगुणा व्यायला झाली आहे. शिवा आणि त्याची बायको तुळसा यांना सगुणेची तगमग पाहवत नाहीय. अशा अडल्या गाईला मोकळं करणारी एकच व्यक्ती गावात असते - ती म्हणजे रामजी. मात्र, मुलगा गेल्याच्या दु:खात बुडालेल्या रामजीला कसं बोलवणार? अखेर तुळसा धीर धरून रामजीला बोलावायला जाते... गाय अडली आहे, म्हटल्यावर रामजी सगळं दु:ख विसरून शिवाच्या घरी धाव घेतो... वि-सर्जनाच्या क्षणापासून ते सर्जनाच्या क्षणापर्यंतचा प्रवास पूर्ण होतो आणि रामजीला आपल्या दु:खावर एकदम उतारा सापडतो... त्याच्या या प्रवासाची कथा म्हणजे हा चित्रपट.

मोकाशींची कथाच मुळात खूप चित्रदर्शी आहे. सुमित्रा भावेंना त्या कथेचा आत्मा गवसला आहे. त्यांनाही या कथेत जे दिसतं, त्याच्यापलीकडचं दिसलं आहे. माणसाचं आयुष्य, त्याची सुख-दु:खं, त्यातलं आपलं अडकत जाणं आणि एका दिव्य साक्षात्काराच्या क्षणी त्या सर्व मोहमायेतून सुटका करणारं पल्याडचं काही तरी गवसणं हे सर्व त्यांनी फार नेमकेपणानं या सिनेमात आणलं आहे. या सिनेमातला धुवाँधार पाऊस, फुसांडत वाहणारी नदी आणि ओलागच्च आसमंत ही एक मिती आहे. यात वावरणारी गावातली साध्या पांढऱ्या कपड्यांतली, देवभोळी माणसं, चिखलात फसणारी चप्पल नदीत फेकून देणारी माणसं, टपरीवर विडी ओढत पावसाच्या गप्पा मारणारी माणसं, घरांत कंदिलाच्या प्रकाशात नित्यकर्मं करत राहणारी माणसं ही दुसरी मिती आहे. तिसरी मिती आहे ती शिवाच्या बायकोला दिसणाऱ्या शंकर-पार्वतीच्या व सुग्रास अन्नाच्या स्वप्नाची, गाईच्या पोटात ढुशा देणाऱ्या वासराची अमूर्त आणि रामजीचं मन व्यापून काळ्याभोर आभाळागत उरणाऱ्या ऐहिक दु:खाची अगोचर मिती! कॅमेरा पॅन होत होत मुख्य वस्तूवर स्थिर व्हावा, तसं सुमित्रा भावे आपल्याला पहिल्या मितीकडून तिसऱ्या मितीकडून नेतात. या मितीत आपल्याला रामजीप्रमाणेच ‘आमोद सुनांस जाले’ या अद्वैताचा अमृतानुभव येतो. सपाट पडद्यावर दिसणाऱ्या चित्रांतून असा त्रिमिती अनुभव द्यायला सुमित्रा भावेंसारखे ‘ज्ञात्याचे पाहणे’ असावे लागते. आपल्या क्षणभंगुर आयुष्यातल्या तितक्याच क्षणभंगुर दु:खांचा आपण किती सोस करतो! कितीही देव देव केला तरी पोटच्या मुलाच्या मरणाचं दु:ख कसं पेलणार? मग मोकाशी आणि सुमित्रा भावे आपल्या कथेतून व कलाकृतीतून याचं उत्तर देतात - ते म्हणजे विसर्जनाला, विलयाला उत्तर असतं ते फक्त नव्या सर्जनाचं... कुठल्याही परिस्थितीत माणसाच्या हातांनी हे सर्जन सोडता कामा नये. रामजी जेव्हा त्याला येत असलेलं सर्वोत्कृष्ट काम पुन्हा करतो, त्याच क्षणी त्याच्यातल्या अपार दु:खाचा विलय होतो. तिथं सर्जन जन्माला येतं... माणूस फारच लेचापेचा, स्खलनशील प्राणी खरा; मात्र त्याच्या ठायी असलेल्या बुद्धीचं सामर्थ्यही तेवढंच अचाट, अफाट! माउलींनी ज्ञाता आणि ज्ञेय (जाणणारा व जे जाणायचे आहे ती गोष्ट) यातल्या अद्वैतासाठी जशी रूपकं वापरली, तशीच रूपकं मोकाशींनी आपल्या कथेत वापरली. सुमित्रा भावे यांनीही आपल्या कलाकृतीत ही रूपकं वापरली. वर म्हटल्याप्रमाणे तिन्ही मितींत त्यांनी ही कथा फिरविली आणि प्रेक्षकांनाही हा ‘आमोद सुनांस जाले’ अनुभव दिला. अगदी पोथी वाचण्याचा प्रसंग संतू वाण्याच्या घरात वरच्या माळ्यावर घडतो, या छोट्या प्रसंगातूनही या रूपकांचं दर्शन होतं. 

धनंजय कुलकर्णी यांच्या छायाचित्रणाचा यात मोठा वाटा आहे. यातलं केंबळं गाव त्यांनी अगदी जिवंत केलं आहे. सासवड व आळंदीची वारीची सर्व दृश्यं उच्च आध्यात्मिक अनुभूती देणारी. पार्थ उमराणी यांचं संगीत नेमकं व अपेक्षित परिणाम साधणारं. या कलाकृतीच्या यशात महत्त्वाचा वाटा अर्थातच कलाकारांचा. किशोर कदम, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, उत्तरा बावकर, गिरीश कुलकर्णी, शशांक शेंडे, अमृता सुभाष, अंजली पाटील या सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट कामं केली आहेत. मात्र, खास उल्लेख करावा लागेल तो रामजी झालेल्या किशोर कदम यांचा. केवळ डोळ्यांतून त्यांनी रामजीचं आभाळाएवढं दु:ख उभं केलं आहे. पोथी म्हणताना, सुनेशी बोलताना, गाईला धीर देताना अशा सर्व प्रसंगांत हा माणूस त्या पात्राशी कमालीचा तादात्म्य पावतो. या भूमिकेत ते अगदी चपखल बसले आहेत. उत्तरा बावकर छोट्या भूमिकेतही छाप पाडतात. शेवटचा अभंग खासच!

‘दिठी’ का बघायचा तर आपल्याला साध्या डोळ्यांनी जे दिसतं, त्यापेक्षा वेगळं काही जाणवतं का हे चाचपून बघण्यासाठी! त्यासाठी आपण आणि इतर यातला भेद नष्ट व्हायला पाहिजे. आपल्या आत डोकावून बघता आलं पाहिजे. आपलं दु:ख मोठं असं म्हणत बसण्यापेक्षा ते दु:ख निवारण करणारं काही सर्जन आपल्या हातून होतंय का हे तपासता आलं पाहिजे. जेव्हा आपले डोळेच आपली ‘दृष्टी’ होतील, तेव्हा हे सगळं दिसेल. मग ‘मीपण’ गळून पडेल आणि त्या अफाट, अथांग, उत्तुंग अशा गोष्टीशी अद्वैत साधता येईल.

---

ओटीटी - सोनी लिव्ह

दर्जा - चार स्टार


----


8 May 2021

द डिसायपल - रिव्ह्यू

कणसुराची सुरेल मैफल
----------------------------- 

चैतन्य ताम्हाणे या तरुण दिग्दर्शकाचा ‘कोर्ट’नंतर आलेला ‘द डिसायपल’ हा नवा चित्रपट म्हणजे एका कणसुराची सुरेल मैफल आहे. आयुष्यात सगळ्यांचेच तंबोरे सुरेल लागतात, असं नाही. प्रत्येकाला आपल्या जगण्याची मैफल रंगवता येतेच असं नाही. किंबहुना असं रंगलेल्या मैफलीसारखं जीवन लाभणारे फार थोडे. बाकीच्यांच्या आयुष्यात कमअस्सलतेचे, कमकुवतपणाचे, कचखाऊपणाचे कणसूरच अधिक! या कणसुरांना सुरेल जगात स्थान नाही. त्यांचं गाणं कोणी गात नाही. चैतन्यचं कौतुक अशासाठी, की त्यानं या कणसुराचं गाणं गायलं. त्याला भरल्या मैफलीत स्थान दिलं. शास्त्रीय संगीत हा तसा मोठा विषय. या विषयाची पार्श्वभूमी असलेला एकही मराठी चित्रपट अद्यापपर्यंत आलेला मला तरी आठवत नाही. चैतन्यनं हे आव्हान पेललंय. अर्थात त्याचा हा चित्रपट केवळ शास्त्रीय संगीतापुरता मर्यादित राहत नाही, तर कोणत्याही कलेला किंवा जगण्यातल्या कुठल्याही प्रांताला लागू होईल, अशा व्यापक अर्थापर्यंत पोचतो. कला, साधना, गुरु-शिष्य परंपरा, माणसाची स्खलनशील वृत्ती या सर्वांवर नेमकेपणानं बोट ठेवतो आणि प्रत्येक प्रेक्षकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडतो.
शरद नेरुळकर (आदित्य मोडक) या तरुणाची कथा ‘द डिसायपल’ आपल्याला सांगतो. शरद आपले गुरू पं. विनायक प्रधान (पं. अरुण द्रविड) यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवतो आहे. त्यालाही मोठा गायक व्हायचंय, मैफली गाजवायच्या आहेत. त्याचे वडील शास्त्रीय गायक होते. मात्र, त्यांना त्यांच्या आयुष्यात फार यश मिळवता आलेलं नाही. शरद जेव्हा या प्रवासाला सुरुवात करतो तेव्हा हळूहळू त्यालाही त्याची मर्यादा समजत जाते. एका अर्थानं त्याला झालेला हा साक्षात्कार आहे. त्याला निराळ्या अर्थाने आलेली ही ‘उपज’ आहे. आपल्याला काय येत नाही, हेही अनेकदा लोकांना कळत नाही. आपल्याला काय जमत नाही आणि आपण आयुष्यात काय होऊ शकत नाही, याचं वेळेवर भान येणं हेही एका अर्थानं यशस्वी आयुष्याचं गमक आहे. याचं कारण हे भान आल्यानंतर माणूस आपल्याला ज्या गोष्टी येतात, जमतात त्या करण्याच्या मागे लागतो. लौकिकार्थाने यशस्वी होतो. तरीही आयुष्यभर एक टोचणी लागून राहतेच. पुलंच्या लेखात एक प्रख्यात गायक वृद्धापकाळी गाताना म्हणतात - मला ती जागा दिसते आहे; पण आता तिच्यापर्यंत पोचता येत नाही. या सिनेमातल्या नायकाला कधीच त्या जागेपर्यंत जाता येत नाही, हाच काय तो फरक! आपण तिथं जाऊ शकत नाही, हे समजण्यापर्यंतचा त्याचा एका तपाचा प्रवास म्हणजे हा चित्रपट!
या चित्रपटाची मांडणी मोठी वेधक आहे. चैतन्यला चित्रभाषेची केवळ उत्तम जाणच नाही, तर त्याची तिच्यावर मांड आहे. ‘कोर्ट’मध्येही त्यानं वैशिष्ट्यपूर्ण कॅमेरावर्क दाखवलं होतं. ‘द डिसायपल’ त्या तुलनेत एवढा गुंतागुंतीचा नसला, तरी यातल्या नायकाचे पेच आहेतच. पहिल्या सिनेमात समाजविषयक भाष्य होतं, तर ते इथं एका व्यक्तीपुरतं मर्यादित आहे. अर्थात, गोष्ट एका व्यक्तीची असली, तरी त्यातला आशय वैश्विकच असेल, याची काळजी दिग्दर्शक घेतो. यातलं त्याचं कॅमेरावर्कही पाहण्यासारखं आहे. इथेही ‘कोर्ट’सारखे लाँग शॉट आहेत. पण ते प्रामुख्यानं मैफलीच्या दृश्यांचे आहेत. इतर वेळी चौकटीतले तपशील अधोरेखित करण्यावर त्याचा भर आहे. त्याच्या गुरूंचं चाळीतलं घर, नायकाचं घर, नाट्यगृहं किंवा सार्वजनिक संस्थांची छोटी सभागृहं, हॉटेल्स, दुकानं हे सगळं कथेच्या ओघात दिसत राहतं. त्याहून सर्वांत महत्त्वाचं पात्र आहे ते मुंबई शहर व इथले रात्रीतले एकांडे रस्ते! नायक आपल्या मोटारसायकलवरून हे शहर हिंडत असतो आणि त्याच वेळी त्याच्या गुरूंच्या गुरू माई उर्फ सिंधूताई जाधव यांनी दिलेली व्याख्यानं तो इअरफोनवरून ऐकत असतो. माईंचे हे संगीतविषयक विचार हा या सगळ्या चित्रपटाचा गाभा आहे. सुमित्रा भावे यांच्या आवाजात आपल्याला ती ऐकायला येतात. या आवाजासाठी सुमित्रा भावेंचा आवाज वापरणं हा दिग्दर्शकाचा ‘मास्टरस्ट्रोक’ आहे. आयुष्यभर एखाद्या विषयाला वाहून घेतलेल्या, साधना केलेल्या व्यक्तीचा आवाज याहून निराळा असणार नाही, असं आपल्याला तो आवाज ऐकताना जाणवतं. सुमित्रा भावेंच्या किंचित कातर आवाजात समजावणीचा समंजस सूर आहे. तो आवाज या चित्रपटाचा मध्यवर्ती टोन सेट करतो.

कथानकाच्या दृष्टीने चित्रपटाचे सरळ दोन भाग आहेत. साधारण २००६ च्या आसपास, जेव्हा नायक २४ वर्षांचा असतो, तेव्हा घडणाऱ्या घटना आणि मग थेट २०१८ मध्ये नायक ३६ वर्षांचा झाला असतानाचा दुसरा काळ समोर येतो. या बारा वर्षांत आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात भौतिक बदल खूप झाले. बटनवाल्या मोबाइलपासून ते स्मार्टफोनपर्यंत आणि छोट्या सभागृहातील मैफलींपासून ते रिॲलिटी शोपर्यंतचे हे सगळ‌े बदल दिग्दर्शकानं फार चाणाक्षपणे टिपले आहेत. अगदी शरद रात्री मुंबईत रस्त्याने फिरत असताना पार्श्वभूमीवर दिसणाऱ्या इमारतीही उत्तुंग व चकचकीत झाल्या आहेत. निऑन साइन्समधून आवाहन करणाऱ्या जाहिरातीही बदलल्या आहेत. रिॲलिटी शोमधून देशभर लोकप्रिय झालेल्या एका बंगाली गायिकेची यशोगाथाही नायकाला व आपल्याला समांतर दिसते आहे. क्लासमध्ये मुलाला कॉलेजच्या बँडमध्ये गायला परवानगी मागायला येणाऱ्या गुजराती बाईचा प्रसंगही उत्तरार्धात येतो. या सगळ्यांत शरदही बदलतो. अगदी स्वत:चं फोटोशूट करून वेबसाइट तयार करतो. त्याची मैफल ऐकायला येणाऱ्या आणि पहिल्या रांगेत बसून स्मार्टफोनवर मेसेज चेक करणारे ‘शो ॲरेंजर’ही  दिसतात. शरदही आता यू-ट्यूबवर आपल्या मित्र-मैत्रिणींचे व्हिडिओ बघतो. ते लौकिकार्थाने यशस्वी झालेले दिसतात. अगदी परदेशातही मैत्रिणीच्या मैफली झालेल्या दिसतात. हा सर्व बदल एकाच दृश्यात आपल्याला सहज दिसतो. या सर्व काळात होत चाललेलं संगीत क्षेत्राचं बाजारीकरण, श्रोत्यांची विशिष्ट अपेक्षा, ‘सगळ्यांना भावगीतंच ऐकायची असतात,’ हा सीडी विकतानाचा संवाद, पूर्वी चांगलं वाजविणाऱ्या आणि आता ‘प्लेइंग टु द गॅलरी’ वाजविणाऱ्या सतारवादकाची मैफल (‘कानातून रक्त येईल!’ ही शरदच्या मित्राची प्रतिक्रिया धमाल आहे!) असे सगळे प्रसंग येत राहतात. पूर्वार्धात शरदचे वडील त्यांच्या दोन मित्रांसह ‘तीन तासांवर असलेल्या’ एका शहरात रेल्वेने एक मैफल ऐकायला चालले आहेत. तेव्हाचे त्यांचे संवाद भारी आहेत. मुंबईहून पुण्याला सवाई गंधर्व महोत्सव ऐकायला येणारे हे श्रोते असणार, यात शंका नाही. चित्रपटात हे सरोदवादन एका धरणाच्या काठी निसर्गरम्य ठिकाणी होतं, हा भाग वेगळा. पण श्रोत्यांची सर्व चर्चा ‘सवाई’च्या श्रोत्यांची आठवण करून देते. अशा सर्व गोष्टींवर हा चित्रपट जाता जाता प्रभावी भाष्य करतो. शरदच्या तरुणपणी घडलेला, पण चित्रपटाच्या उत्तरार्धात येणारा एका अतरंगी समीक्षकासोबतचा प्रसंग पण असाच प्रभावी आहे. या सर्व बदलांत एकच गोष्ट बदललेली नसते, ती म्हणजे त्याच्या गुरुजींचं घर. हे फारच सूचक व प्रतीकात्मक आहे. बाकी शरदच्या धारणांना हादरा देणारे असे प्रसंग किंवा घटना घडत असतात, त्यावर शरद त्याच्या परीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. बारा वर्षांनंतर त्याला ‘हे आपल्याला जमणे नाही,’ याचा साक्षात्कार होतो. त्यानंतर तो काय निर्णय घेतो, हे चित्रपटातच पाहायला हवे.

यात आदित्य मोडक या तरुणानं नायक शरद नेरुळकरची भूमिका समजून केली आहे. सीए असलेला आदित्य स्वत: शास्त्रीय गायक आहे. त्याचा रूपेरी पडद्यावरचा हा पहिलाच वावर असावा. या भूमिकेत अनुस्यूत असलेलं एक अवघडलेपण, वैफल्य ही भावना दाखवण्यासाठी आदित्यच्या नवखेपणाचाही उपयोग झाला असावा. त्याचे गुरू पं. विनायक प्रधान यांची भूमिका ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. अरुण द्रविड यांनी केली आहे. तेही स्वत: गायक असल्यानं गाण्याच्या मैफलींचे सर्व प्रसंग जिवंत झाले आहेत. शरदच्या वडिलांच्या छोट्याशा भूमिकेत किरण यज्ञोपवित आणि राजन जोशी या समीक्षकाच्या भूमिकेत प्रसाद वनारसे लक्षात राहतात. अन्य कास्टिंगही उत्तम. चित्रपटातली लोकेशन्स अभ्यासण्यासारखी आहेत. सर्व मैफलींचं चित्रिकरण अगदी ऑथेंटिक आहे.

गेल्या काही वर्षांत आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात वैयक्तिक सुख-समृद्धी खूप आली. पण आपण त्यासाठी कशाची किंमत मोजली, हे बरेचदा आपल्या लक्षात येत नाही. आता सगळं काही झटपट हवंय आपल्याला! एका प्रसंगात शरदचे गुरुजी त्याला म्हणतात, ‘कसली घाई आहे? कुठे पोचायचं आहे?’ हे ऐकताना हे आपल्यालाच उद्देशून म्हटलंय की काय, असं वाटत राहतं. आपण फार जीव तोडून कशाच्या तरी मागे लागलो आहोत आणि त्यासाठी फार महत्त्वाचं, शाश्वत असं काही तरी गमावत चाललो आहोत, असं चित्र आहे. सध्याच्या करोनाकाळात तर या वेगवान व कथित भौतिक प्रगतीचं वैयर्थ पदोपदी जाणवतं आहे. अशा वेळी शाश्वत, दीर्घकाळ टिकणारं काय आहे हे सांगणारा आणि त्याच वेळी तिथं पोचण्यापर्यंतची आपली मर्यादा जाणवून देणारा असा हा चित्रपट आहे. चुकवू नका!

----

ओटीटी : नेटफ्लिक्स 

दर्जा : चार स्टार 

----

29 Apr 2021

दादासाहेब फाळके लेख

‘हलत्या चित्रां’चा जादूगार

------------------------------


भारतात चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारे दादासाहेब फाळके यांचं आयुष्य चित्रपटासारखंच अद्भुतरम्य आणि नाट्यमय होतं. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस फ्रान्समध्ये ल्युमिए बंधू चलतचित्रांचा यशस्वी प्रयोग करतात काय, जगभरात या विज्ञानाधिष्ठित कलेला अल्पकाळात अफाट लोकप्रियता मिळते काय आणि अवघ्या दोन दशकांच्या आत दादासाहेबांसारखा हरहुन्नरी माणूस ही कला शिकून ती भारतात आणतो काय! सगळंच स्तिमित करणारं... डोळे विस्फारायला लावणारं...! आज शंभर वर्षांहून अधिक काळ झाल्यानंतर चित्रपट या माध्यमानं जगभर आणि विशेषतः भारतात पसरलेले हात-पाय पाहता, दादासाहेबांचं द्रष्टेपण अधिकच मनावर ठसतं. 

नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर इथं ३० एप्रिल १८७० रोजी जन्मलेल्या धुंडिराज गोविंद फाळके या माणसानं आपल्या ७३ वर्षांच्या आयुष्यात, सर्वसामान्यांना थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी केल्या. भारतीय सिनेमा ही त्यांची सर्वांत गाजलेली आणि देशवासीयांना अभिमान वाटावा अशी देणगी! भारतात १९१३ मध्ये त्यांनी तयार केलेला ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला पूर्ण लांबीचा भारतीय चित्रपट मानला जातो. तेव्हापासून ते १९३७ पर्यंत, म्हणजे सुमारे २४ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी तब्बल ९५ चित्रपट व २६ लघुपट तयार केले. ‘सिनेमाचं वेड घेतलेला अफाट माणूस’ अशाच शब्दांत त्यांचं वर्णन करावं लागेल. 

वास्तविक त्र्यंबकेश्वरच्या गोविंद फाळके या व्युत्पन्न देशस्थ ब्राह्मणाच्या पोटी जन्मलेला धुंडिराज हा मुलगाही शास्त्रपारंगत होऊन वडिलांचा वारसा पुढं चालवायचा; मात्र दादासाहेबांच्या ललाटी नियतीनं काही वेगळेच भाग्यसंकेत रेखून ठेवले असावेत. कलेची ओढ असलेल्या दादासाहेबांचं सुदैव इतकंच, की त्यांना त्या क्षेत्रात योग्य ते शिक्षण घेता आलं. वयाच्या पंधराव्या वर्षी ते मुंबईत ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये दाखल झाले. पाच वर्षांत तिथलं शिक्षण संपवून ते १८९० मध्ये बडोद्याला महाराजा सयाजीराव विद्यापीठातील कला भवनात पुढील शिक्षणासाठी आले. बडोद्यातील वास्तव्यात दादासाहेबांनी शिल्पकला, इंजिनीअरिंग, चित्रकला, रंगकाम आणि फोटोग्राफी आदी विपुल नैपुण्ये प्राप्त केली. त्यानंतर जवळच असलेल्या गोध्रा या शहरात फोटोग्राफर म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. पण फाळकेंचं नशीब काही वेगळंच सांगत होतं. गोध्रात लवकरच प्लेगचा उद्रेक झाला आणि त्यांची पहिली पत्नी व मूल त्या साथीत दगावले. या दुःखद प्रसंगानंतर त्यांनी गोध्रा सोडलंच. लवकरच त्यांची भेट कार्ल हर्ट्झ या जर्मन जादूगाराशी झाली. सिनेमाचा शोध लावणारे ल्युमिए बंधू यांच्याकडं कामाला असलेल्या ४० जादूगारांपैकी हर्ट्झ हे एक होते. फाळकेंना त्यानंतर ‘आर्किऑलॉजी सर्व्हे ऑफ इंडिया’मध्ये नोकरी लागली. पण त्या सरकारी नोकरीत त्यांचं मन रमेना. म्हणून एक दिवस ती नोकरी सोडून त्यांनी प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू केला. लिथोग्राफी आणि ओलिओग्राफ तंत्रात त्यांनी हुकूमत मिळविली. प्रख्यात चित्रकार राजा रविवर्मा यांच्यासोबत त्यांनी काम केलं. फाळके मुळात हुन्नर असलेलं व्यक्तिमत्त्व होतं. एकाच वेळी त्यांना अनेक गोष्टी शिकायला आवडत. लवकरच त्यांनी स्वतःची प्रिटिंग प्रेस सुरू केली. या व्यवसायामुळं लवकरच त्यांना परदेशी म्हणजे जर्मनीला जाण्याचा योग आला. तिथं आधुनिक युरोपीय तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि अर्थातच कला यांचं अनोखं दर्शन त्यांना घडलं.

परत आल्यानंतर त्यांनी मुंबईत ‘हलत्या चित्रांचा खेळ’ अर्थात ‘द लाइफ ऑफ ख्राइस्ट’ हा मूकपट पाहिला. हा मूकपट त्यांनी वारंवार पाहिला. सिनेमा ज्या यंत्रातून दाखवला जातोय, त्याविषयी त्यांना अतोनात जिज्ञासा निर्माण झाली. आपणही असा सिनेमा का तयार करू नये आणि भारतीय देवदेवतांचं दर्शन का घडवू नये, या विचारानं त्यांना अक्षरशः झपाटून टाकलं. फाळक्यांचा स्वभाव असा होता, की त्यांनी एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर ती पूर्ण केल्याशिवाय ते स्वस्थ राहत नसत. त्यांनी मग पाच पौंडाचा एक स्वस्तातला कॅमेरा खरेदी केला आणि वेगवेगळ्या चित्रपटगृहांत जाऊन ते परदेशी सिनेमांचा अभ्यास करू लागले. दिवसातील २० तास ते काम करीत असत. वेड लागल्यासारखं झालं. त्यातून त्यांची तब्येत बिघडली. डोळे जायची वेळ आली. अखेर डॉक्टरांनी तंबी दिल्यावर त्यांनी काही काळ आराम केला. पण सिनेमाचं वेड गेलं नव्हतंच. पत्नी सरस्वती यांचे दागिने गहाण ठेवून त्यांनी सिनेमासाठी लागणारे पैसे उभे केले. घरातल्या अनेक वस्तू विकाव्या लागल्या. सामाजिक बहिष्कार सोसावा लागला. सिनेमाविषयी अनेक गैरसमजुती प्रचलित होत्या. मात्र, दादासाहेबांनी हिंमत सोडली नाही. आपल्या रामायण, महाभारतासारख्या पौराणिक महाकाव्यांत अनेक नाट्यमय प्रसंग आहेत आणि ते सिनेमाद्वारे लोकांना दाखवता येतील, यावर दादासाहेब ठाम होते. त्यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ ही गोष्ट निवडली. मुंबईत दादर भागात तेव्हा ते राहत होते. त्या बंगल्याच्या आवारात तालमी सुरू झाल्या. त्या काळात तारामतीच्या भूमिकेसाठी स्त्री मिळणं कठीण. या भूमिकेसाठी त्यांनी वेश्यावस्तीतही जाऊन कुणी मिळतंय का याची चाचपणी केली. तेव्हा एका वेश्येने ‘सिनेमा नटी? असलं वाह्यात काम करू आम्ही? आम्ही वेश्या आहोत,’ असं उत्तर दिलं होतं. अखेर साळुंके नावाच्या कलाकाराला दादासाहेबांनी उभं केलं. त्याची मिशी छाटण्याचा प्रसंग आला तेव्हा गहजब झाला. बाप जिवंत असताना मिशी का काढायची, असा प्रश्न उपस्थित झाला. अखेर मोठ्या मिनतवारीनं दादासाहेबांनी सगळ्यांची समजूत काढली. अशा अनेक संकटांना तोंड देत, अखेर दादासाहेबांचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला चित्रपट तयार झाला. मुंबईतील कॉरोनेशन थिएटरला तीन मे १९१३ रोजी त्याचा पहिला खेळ झाला. हीच भारतातील चित्रपटयुगाची सुरुवात मानली जाते. (त्यापूर्वी एक वर्ष आधी दादासाहेब तोरणे या गृहस्थांनी ‘पुंडलिक’ हे नाटक चित्रित करून त्याचा सिनेमा याच कॉरोनेशन थिएटरमध्ये दाखवला होता. मात्र, एक तर ते नाटकाचं चित्रण होतं आणि दुसरं म्हणजे त्यासाठी ब्रिटिश सिनेमॅटोग्राफर त्यांनी वापरले होते. त्यामुळं संपूर्णपणे भारतात तयार झालेला पहिला चित्रपट हा मान ‘राजा हरिश्चंद्र’लाच दिला गेला.) 

फाळकेंच्या इतर उद्योगांप्रमाणे हाही अपयशी ठरतो की काय, अशी भीती त्यांच्या कुटुंबीयांना वाटत होती. पण तसं झालं नाही. हळूहळू सिनेमाला गर्दी होऊ लागली. बघता बघता ‘राजा हरिश्चंद्र’ पाहण्यासाठी लोकांच्या रांगा लागू लागल्या. त्यानंतर फाळकेंना सिनेमाचा मंत्रच गवसला. त्यांनी अनेक मूकपट तयार केले. त्यात ‘राजा हरिश्चंद्र’नंतर ‘मोहिनी भस्मासुर’ (१९१३), ‘सत्यवान सावित्री’ (१९१४), ‘लंकादहन'’ (१९१७), ‘श्रीकृष्णजन्म’ (१९१८), ‘कालियामर्दन’ (१९१९), ‘बुद्धदेव’ (१९२३), ‘सेतू बंधन’ (१९३२), ‘गंगावतरण’ (१९३७) हे ठळक व गाजलेले मूकपट होत. याशिवाय त्यांनी शैक्षणिक, विनोदी असे अनेक लघुपट, माहितीपट तयार केले. चित्रपट या माध्यमाची शक्तिस्थळे जाणून घेऊन त्याचा अधिकाधिक उपयोग करण्याची त्यांची धडपड होती. 

‘राजा हरिश्चंद्र’ यशस्वी झाल्यानंतर दादासाहेबांकडं श्रीमंत व्यापारी, वित्तपुरवठादार, व्यावसायिक यांच्या रांगा लागल्या. सगळ्यांना या नव्या माध्यमातून पैसे कमवायचे होते. सुरुवातीला दादासाहेबांनी पाच व्यावसायिकांसोबत भागीदारीत ‘हिंदुस्थान फिल्म्स’ नावाची कंपनी स्थापन केली. आता भागीदार पैशांची व्यवस्था पाहतील आणि आपण सिनेमाच्या सर्जनशील अंगांकडं लक्ष देऊ शकू, असं त्यांना वाटलं. तंत्रज्ञ, कलाकार यांना प्रशिक्षण देण्यासाठी दादासाहेबांनी मुंबईत एक स्टुडिओही सुरू केला. मात्र, भागीदारांबरोबर वितुष्ट आल्यानं दादासाहेबांनी या कंपनीतून राजीनामा दिला. एवढंच नव्हे, तर चित्रपट क्षेत्रातूनही संन्यास घेण्याची घोषणा त्यांनी केली. त्यानंतर ‘रंगभूमी’ नावाचं नाटक त्यांनी लिहिलं. मात्र, दादासाहेब बाहेर पडल्यानं कंपनीचं दिवाळं निघायची वेळ आली. त्यामुळं भागीदारांनी दादासाहेबांना परत बोलावलं. पण आणखी काही चित्रपट केल्यानंतर दादासाहेब तिथून पुन्हा बाहेर पडलेच.

दादासाहेबांनी स्वतः भरपूर मूकपट तयार केले. मात्र, १९३२ मध्ये बोलपटांचा जमाना सुरू झाला. नव्या तंत्रज्ञानाशी मैत्री करणारे, नव्या कल्पना स्वीकारणारे दादासाहेब बोलपटांच्या झंझावातापुढे मात्र काहीसे गांगरले. त्यांचा ‘सेतू बंधन’ हा १९३२ मध्ये आलेला मूकपट डब करून पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. मात्र, हे तंत्र काही दादासाहेबांच्या पचनी पडले नाही. ‘गंगावतरण’ या १९३७ मध्ये आलेल्या मूकपटानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून निवृत्ती पत्करली आणि ते नाशिकला जाऊन राहिले. तिथंच १६ फेब्रुवारी १९४४ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

अत्यंत कलंदर, सर्जनशील, द्रष्ट्या अशा या व्यक्तिमत्त्वामुळं भारतात सिनेमाचा जन्म झाला. त्यामुळंच त्यांना ‘भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक’ असं म्हटलं जातं. त्यांच्या सन्मानार्थ केंद्र सरकारने १९६९ मध्ये चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च योगदानाबद्दल दिला जाणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ सुरू केला. मुंबईतील गोरेगाव येथील राज्य सरकारच्या चित्रनगरीसही त्यांचंच नाव देण्यात आलं आहे. नाशिक येथेही तेथील महापालिकेने पांडव लेण्यांच्या पायथ्याशी फाळके यांचं उत्कृष्ट स्मारक केलं आहे. दिग्दर्शक परेश मोकाशी यानं २००९ मध्ये दादासाहेबांच्या जीवनावर आधारित ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा चित्रपट तयार केला होता. हा सिनेमा त्या वर्षी भारतातर्फे ‘ऑस्कर’लाही पाठविण्यात आला होता.

भारतात जोवर सिनेमा तयार होत राहील, तोवर दादासाहेब फाळके हे नावही कायमच स्मरणात राहील, यात वाद नाही.

---

(काही वर्षांपूर्वी एका वेबसाइटसाठी लिहिलेला लेख)

---

19 Apr 2021

सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर लेख

संवेदनशील, 'विचित्र' निर्मिती
----------------------------------



सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर हे दोघेही सध्याचे मराठीतील आघाडीचे चित्रकर्मी आहेत. दोघे मिळून सिनेमा दिग्दर्शित करतात, त्यामुळे जोडीनेच त्यांचा उल्लेख करावा लागतो. त्यांचे सिनेमे 'विचित्र निर्मिती' या शीर्षकाखाली तयार होतात. ही निर्मिती खरंच 'विचित्र' आहे. म्हणजे वेगळी... स्वतंत्र... स्वतःची ठळक ओळख घेऊन येणारी! या जोडीच्या चित्रपटांबाबत कुणी एकाच शब्दात वर्णन करायला सांगितलं, तर मी 'संवेदनशील' हा शब्द निवडीन. याचं कारण या जोडीचे सर्व चित्रपट कमालीचे संवेदनशील आहेत. ही संवेदना या माध्यमाबद्दल आहे, प्रतिपाद्य विषयाबद्दल आहे, एकूण समष्टीबद्दल आहे आणि त्याहीपलीकडे जाऊन निखळ माणूसपण जपणारी अशी आहे. त्यामुळं सुमित्रा भावेंचे चित्रपट पाहताना प्रेक्षक स्वतः उन्नत होत जातो. त्याला काही तरी नवं मिळतं. निखळ मनोरंजनापलीकडं विचारांना काही तरी खाद्य मिळतं. एका अर्थानं हा प्रेक्षकांकडूनही किमान प्रगल्भतेची, बुद्धिमत्तेची अपेक्षा करणारा, बुद्धिवादी, पण तरल-संवेदनशील असा सिनेमा आहे. याशिवाय स्किझोफ्रेनिया किंवा अंगावरचं कोड किंवा विस्मरण असा एखादा विषय घेऊन त्यावर चित्रपट तयार करणं हेही या जोडीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळंच त्यांचा असा एक खास चाहता वर्ग आहे आणि त्याला राज्याची किंवा देशाची सीमा नाही.
सुमित्रा भावे या मूळच्या उमराणी. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९४३ चा. त्यांनी नुकतीच वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. नंतर राज्यशास्त्र व सामाजिक विकास विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. मुंबईत 'टाटा समाजविज्ञान संस्थे'तून त्यांनी ग्रामीण विकासाबाबतचा डिप्लोमा पूर्ण केला. विविध संस्थांतून त्यांनी सामाजिक विकासासाठी कामे केली. पुण्याच्या कर्वे समाजविज्ञान संस्थेत त्या सुमारे दशकभर अध्यापन करीत होत्या. त्यामुळं त्यांचा पिंड सामाजिक कार्यकर्तीचा आणि शिक्षिकेचा आहे. समाजविज्ञानाचा अभ्यास व अध्यापन करीत असताना सुमित्रामावशींना जो समाज दिसला, जी माणसं दिसली, त्याचे प्रतिबिंब पुढे त्यांच्या सिनेमात दिसते. म्हणूनच त्यांचा सिनेमा 'नो नॉनसेन्स' सिनेमा असतो. त्यांनी सुरुवातीला कामाचा भाग म्हणून काम लघुपटांचे दिग्दर्शन केले. 'बाई', 'पाणी' हे त्यातले गाजलेले काही. या लघुपटांना मोठा प्रतिसाद लाभला. त्यातूनच सुमित्रा भावेंना अभिव्यक्तीसाठी चित्रपट या माध्यमाची वाट गवसली, असं म्हणता येईल.

सुनील सुकथनकर हे मूळचे कराडचे. त्यांचा जन्म ३१ मे १९६६ चा. पुण्यातील बीएमसीसीमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी चित्रपट दिग्दर्शन शिकण्यासाठी पुण्यातीलच 'एफटीआयआय'मध्ये प्रवेश घेतला. सुकथनकर यांनी रंगकर्मी म्हणूनही काम केलं. त्यांनी अनेक नाटकं, पथनाट्यं लिहिली व दिग्दर्शित केली. सुमित्रा भावे 'बाई' हा लघुपट तयार करीत असताना त्यांच्या मुलीमुळे - सतीमुळे - सुनील यांची सुमित्रा भावेंशी ओळख झाली. त्यातून पुढे १९९५ मध्ये या दोघांनी 'दोघी' हा पूर्ण लांबीचा पहिला मराठी चित्रपट तयार केला. तिथून त्यांच्या संयुक्त दिग्दर्शकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. आतापर्यंत या दोघांनी १४ चित्रपट, पन्नासहून अधिक लघुपट आणि चार टीव्ही मालिका तयार केल्या आहेत. या सर्व कलाकृतींचं लेखन सुमित्रामावशींनीच केलं आहे. 'दोघी'मध्ये सोनाली कुलकर्णी आणि रेणुका दफ्तरदार यांनी काम केलं होतं. सामाजिक बंधनांच्या जाचात सापडलेल्या दोन बहिणी आणि त्यांची आई (उत्तरा बावकर) यांची करुण कहाणी या चित्रपटातून भावे-सुकथनकर यांनी मांडली होती. सोनाली कुलकर्णीच्या अभिनयक्षमतेची सुरुवातीच्या काळात सर्वांना ओळख करून देणारा चित्रपट म्हणून 'दोघी'चं नाव आवर्जून घ्यावं लागेल. त्यानंतर या दोघांनी 'जिंदगी जिंदाबाद' (१९९७) हा हिंदी चित्रपट तयार केला. एका तरुणाच्या आयुष्यात घडलेल्या सत्यघटनेची पार्श्वभूमी या चित्रपटाला होती. तेव्हा एड्सची समस्या खूप चर्चेत होती. या सिनेमानं एड्स आणि तद्अनुषंगिक समस्यांवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला होता. हा सिनेमा फार चालला नाही; मात्र एखादी समस्या किंवा आजार/विकार घेऊन सिनेमा करण्याची या जोडीची परंपरा या सिनेमापासून सुरू झाली होती, असं म्हणता येईल.
त्यानंतर २००२ मध्ये या जोडीचे एकदम दोन चित्रपट आले आणि दोन्ही खूप गाजले. या दोन्ही चित्रपटांनी भावे-सुकथनकरांना नाव मिळवून दिलं. हे चित्रपट होते 'दहावी फ' आणि 'वास्तुपुरुष'! 'दहावी फ' हा सिनेमाही पुण्यातील सत्यघटनेवर आधारित होता. वृत्तपत्रात आलेल्या एका बातमीनं सुमित्रामावशींचं लक्ष वेधून घेतलं होतं. एका शाळेतील दांडगाई, उनाडक्या करणाऱ्या मुलांनी शाळेचं केलेलं नुकसान स्वतः काम करून भरून दिलं आणि त्यासाठी एका शिक्षकांनी कसा पुढाकार घेतला, अशी ती बातमी होती. याच बातमीवरून प्रेरणा घेऊन 'दहावी फ' हा सिनेमा तयार करण्यात आला होता. यात अतुल कुलकर्णीने केलेली शिक्षकाची भूमिका गाजली. यातील निमिष काठाळे, वृषसेन दाभोळकर या मुलांनीही चांगलं काम केलं होतं. हा चित्रपट चिल्ड्रन फिल्म सोसायटीने काढावा, यासाठी भावे-सुकथनकर सोसायटीकडे गेले होते. मात्र, या चित्रपटाची कथा त्यांच्या 'मार्गदर्शक तत्त्वां'त बसत नसल्याने त्यांनी या चित्रपटाची निर्मिती करण्यास नकार दिला होता. नंतर भावे-सुकथनकर यांनी मित्रांकडून पैसे गोळा करून हा चित्रपट तयार केला. 'विचित्र निर्मिती'ची सुरुवातही हीच. या चित्रपटाला चांगलं यशही मिळालं.
या जोडीचा मला (व त्यांनाही) सर्वांत आवडणारा चित्रपट म्हणजे 'वास्तुपुरुष'! हा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने तयार केला होता. साठच्या दशकातील ग्रामीण महाराष्ट्रातील सामाजिक स्थित्यंतराचा उभा-आडवा छेद अत्यंत प्रभावीपणे या चित्रपटात घेण्यात आला आहे. भास्कर देशपांडे (सिद्धार्थ दफ्तरदार/महेश एलकुंचवार) या मुलाची ही कथा आहे. विपरीत परिस्थितीला तोंड देत तो डॉक्टर कसा होतो, याची ही कथा आहे. पण मला भास्करसोबतच ही त्याच्या आईची - सरस्वतीचीही (उत्तरा बावकर) - कथा वाटते. काळाची पावलं ओळखणारी, खोट्या वतनदारीला न भुलणारी, स्वतः कष्ट करून पैसे कमावण्यावर विश्वास असलेली, गुप्तधनासारख्या भाकड कथांना थारा न देणारी, मुलानं डॉक्टर होऊन जनतेची सेवा केली म्हणजेच आपली वास्तू 'शांत' होईल, असं मानणारी यातली 'सरस्वती' ही मराठी रूपेरी पडद्यावर आलेल्या सर्वांत ताकदवान, प्रभावी पात्रांपैकी एक आहे. उत्तरा बावकरांनी ही सरस्वती खूप जबरदस्त उभी केली आहे. या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम न् फ्रेम, प्रत्येक संवाद कसा जमून आला आहे! साठच्या दशकात ज्यांचं बालपण गेलंय, अशी पिढी तर या चित्रपटाशी रिलेट करू शकतेच; पण माझ्यासारखी त्यानंतर किती तरी काळाने जन्मलेली पिढीही या पात्रांशी, त्यातील पर्यावरणाशी एकजीव होऊ शकते, हे या चित्रपटाचं मोठं यश आहे. याचं कारण ग्रामीण महाराष्ट्रातील परिस्थितीत १९६० ते १९९० या काळात फार प्रचंड फरक पडला नव्हता, हेच असावं. या चित्रपटात मोठ्या भास्करच्या भूमिकेसाठी सुमित्रामावशींनी चक्क महेश एलकुंचवार यांनाच घेतलं. त्यांचा या चित्रपटातला वावर सुखद आहे. स्वतः एलकुंचवार ग्रामीण महाराष्ट्रातील सामाजिक जीवनावर, स्थलांतरावर, स्थित्यंतरावर किती तरी खोल, अर्थपूर्ण असं लिहीत आले आहेत. त्यांची 'त्रिनाट्यधारा' याचंच प्रतीक आहे. त्या तिन्ही नाटकांचा आणि या 'वास्तुपुरुष'चा एक जैव संबंध आहे, असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. 'वास्तुपुरुष'मधील एलकुंचवारांची उपस्थिती हे त्यांचं दृश्य प्रतीक आहे. या चित्रपटातील सगळेच कलाकार जबरदस्त होते. सिद्धार्थ दफ्तरदार, महेश एलकुंचवार व उत्तरा बावकरांच्या जोडीला सदाशिव अमरापूरकर, रवींद्र मंकणी, अतुल कुलकर्णी, रेणुका दफ्तरदार, रेखा कामत, तुषार दळवी, निमिष काठाळे अशी सगळी नामवंत मंडळी होती. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जामगाव येथील शिंदेशाही वाड्यात या चित्रपटाचं चित्रीकरण झालं होतं. दर वेळी हा चित्रपट पाहताना डोळे झरतात. अशा कित्येक 'सरस्वतीं'नी ग्रामीण महाराष्ट्रातील किती वास्तू पेलल्या आहेत आणि निभावल्या आहेत, या विचारानं मन त्या अज्ञात माउल्यांसाठी कृतज्ञतेनं भरून येतं...
या दोन्ही सिनेमांनंतर भावे-सुकथनकर जोडीचा एका परीनं आपल्या सिनेमाचा आत्मा गवसला, असं म्हणायला हरकत नाही. मग २००४ मध्ये आलेल्या 'देवराई'नं यावर शिक्कामोर्तबच केलं. स्किझोफ्रेनियासारख्या तोपर्यंत मराठी सिनेमात अपवादानंच आलेली समस्या यात हाताळण्यात आली होती. अतुल कुलकर्णीनं यात साकारलेली शेषची भूमिका ही त्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकांपैकी एक आहे. या चित्रपटालाही अनेक पुरस्कार मिळाले. मग २००६ मध्ये या जोडीचा 'नितळ' हा आणखी एक नितांतसुंदर चित्रपट आला. कोडासारख्या आपल्याकडं सामाजिक समस्या होऊन बसलेल्या विषयावर या सिनेमात फार सुंदर मांडणी होती. 'वास्तुपुरुष'मध्ये भावे-सुकथनकरांनी एलकुंचवारांना कॅमेऱ्यासमोर उभं केलं होतं, तसं या सिनेमात त्यांनी विजय तेंडुलकरांना रूपेरी पडद्यावर आणलं. या सिनेमात देविका दफ्तरदार, अमृता सुभाष यांच्या भूमिका अप्रतिम होत्या. श्रीरंग उमराणींनी दिलेलं संगीत आणि यातली गाणीही खूप मस्त आणि वेगळी होती. 'अंधाराच्या भोवती आहे नवा नवा अंधार' हे गाणं विशेष गाजलं. याच वर्षी या जोडीचा 'बाधा' हा चित्रपटही आला. मात्र, तो सर्वत्र प्रदर्शित होऊ शकला नाही. मी स्वतः तो चित्रपट महोत्सवातच पाहिला. अमृता सुभाष आणि राजेश मोरे यात प्रमुख भूमिकांत होते. धनगर समाजातील अंधश्रद्धेचा विषय यात हाताळण्यात आला होता. फलटण परिसरातील धनगर तांड्यांवर जाऊन केलेलं चित्रीकरण हेही याचं वैशिष्ट्य. 
या जोडीचं चित्रपट निर्मितीतील सातत्य या काळात वाखाखण्याजोगं होतं. कारण २००९ मध्ये त्यांचे दोन चित्रपट आले. एक होता 'एक कप च्या' आणि दुसरा 'घो मला असला हवा!' यातला 'एक कप च्या' मला वैयक्तिकरीत्या आवडला होता. माहिती अधिकार कायदा नुकताच आला होता. या कायद्याची मदत घेऊन कोकणातला एक कंडक्टर आपला लढा कसा लढतो, याची ही छान, प्रेरणादायी गोष्ट होती. यात किशोर कदमनं त्या कंडक्टरची भूमिका अफलातून केली होती. एलकुंचवार आणि तेंडुलकरांना रूपेरी पडद्यावर झळकवल्यानंतर या चित्रपटात भावे-सुकथनकरांनी कमल देसाईंना रूपेरी पडद्यावर आणलं होतं. त्यांनी आजीची भूमिका पण खूप गोड केली होती. शिवाय अश्विनी गिरी, देविका दफ्तरदार, ओम भुतकर, पर्ण पेठे आदी कलाकार यात होते. दुर्दैवानं हा सिनेमा फार चालला नाही. 'घो मला असला हवा' या सिनेमाद्वारे या जोडीनं प्रथमच आपली मळवाट सोडून विनोदाची कास धरली. कोकणच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही एक हलकीफुलकी कॉमेडी होती. राधिका आपटेचा हा पहिला चित्रपट. यातला नर्मविनोद उत्कृष्ट होता. पण याही चित्रपटाला मर्यादित प्रतिसाद लाभला. नंतर २०११ मध्ये आलेला 'हा भारत माझा' हा चित्रपट तेव्हा देशात सुरू असलेल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने प्रेरित होता. हा चित्रपट प्रयोगशील असला, तरी प्रेक्षकांनी त्याची फार दखल घेतली नाही. मात्र, २०१३ मध्ये आलेला 'संहिता' हा या जोडीचा एक उत्कृष्ट चित्रपट होता. या चित्रपटाची उत्कृष्ट पटकथा, रंगभूषा, संगीत यांचं कौतुक झालं.
पुढच्याच वर्षी म्हणजे २०१४ मध्ये आलेला 'अस्तु' हा विस्मरणाच्या आजारावर आधारित चित्रपट होता. डॉ. मोहन आगाशे यांनी यातली प्रा. चक्रपाणींची भूमिका सुंदर साकारली आहे. एकूणच हा चित्रपट म्हणजे अविस्मरणीय असा अनुभव आहे. यातली इरावती हर्षेची भूमिकाही पाहण्यासारखी आहे. 'अस्तु' चित्रपट चांगला असला, तरी सुरुवातीला तो मर्यादित ठिकाणीच प्रदर्शित झाला. नंतर त्याला अनेक पुरस्कार मिळाल्यानंतर काही संस्थांनी 'क्राउड फंडिंग' करून तो पुन्हा प्रदर्शित केला. 
या जोडीचा शेवटचा आलेला चित्रपट म्हणजे गेल्या वर्षी आलेला 'कासव'. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार व सुवर्णकमळ मिळालं, यातच काय ते आलं. मनाचा आजार या एरवी आपल्याकडं दुर्लक्षित विषयाला हा 
चित्रपट फार हळुवारपणे स्पर्श करतो. यात आलोक राजवाडे, इरावती हर्षे यांचं काम सुंदर आहे. 
या जोडीच्या प्रत्येक सिनेमावर सविस्तर लिहावं, एवढं त्यांचं काम आणि तो आशय महत्त्वाचा आहे. या लेखात एकूण या जोडीच्या कामाचा धावता आढावा घेणंच शक्य आहे. मी त्यांचे सगळे चित्रपट बघितले आहेत आणि बहुतेकांवर लिहिलं आहे. मला या जोडीच्या सिनेमाविषयीच नव्हे, तर एकूण जीवनविषयक दृष्टिकोनाचं कौतुक आहे. अपार आदर आहे. त्यांचं जगणं त्यांच्या कलाकृतीतून झिरपतं आणि ते खूप छान आहे. 
यापुढील काळातही त्यांच्याकडून उत्तमोत्तम कलाकृती तयार होतील आणि आपल्याला त्यांच्या आस्वादाचा आनंद मिळेल, यात मला तरी शंका नाही.

---

(एका वेबसाइटसाठी मार्च २०१८ मध्ये लिहिलेला लेख.) 

(ता. क. हा लेख लिहिल्यानंतर सुमित्रा भावे यांचे वेलकम होम आणि दिठी हे आणखी दोन चित्रपट आले. दोन्ही मला पाहता आले. दिठी अद्याप प्रदर्शित होऊ शकलेला नाही. सुमित्रा भावे यांचे १९ एप्रिल २०२१ रोजी पुण्यात निधन झाले. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा लेख ब्लॉगवर प्रसिद्ध करतोय.)
---

31 Mar 2021

ग्राहकहित दिवाळी अंक २०२० लेख

 ‘श्वासा’ला ग्रहण...

----------------------


यंदाचं हे २०२० हे वर्ष उजाडलं, तेव्हा पुढचं संपूर्ण वर्ष ‘न भूतो न भविष्यति’ अशा एका साथरोगाच्या मुकाबल्यात आपल्याला घालवावं लागणार आहे आणि त्यामुळं संपूर्ण जगात उलथापालथ होणार आहे, असं आपल्याला कुणी सांगितलं असतं, तर विश्वास बसला नसता. पण आता आपण प्रत्यक्षात ही ‘न भूतो...’ अशी अवस्था जगतो आहोत. ‘करोनाव्हायरस डिसीझ १९’ किंवा ‘कोव्हिड १९’ नावाच्या या आजारानं आपलं सगळं जगणंच बदलवून टाकलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांवर त्याचा वेगवेगळा परिणाम झालाय. प्रामुख्यानं चित्रपट, मालिका व नाटक या क्षेत्रांवर त्याचा काय परिणाम झाला व पुढे काय वाढून ठेवलंय, याचा थोडक्यात आढावा या लेखाच्या माध्यमातून घेण्याचा हा प्रयत्न आहे.

करोनाच्या साथरोगाचा चित्रपट, नाटक आणि मालिका या सगळ्यांना सर्वाधिक फटका बसला. या तिन्ही गोष्टी वास्तविक आपल्याला अत्यंत प्रिय! अगदी आपल्या श्वासाइतक्या महत्त्वाच्या! मात्र, करोनामुळं त्याच्यावरच घाव बसला. गर्दीची ठिकाणं टाळायची असल्यामुळं चित्रपटगृहं बंद करावी लागली. नाट्यगृहांचीही तीच अवस्था झाली. मालिकांचं चित्रीकरण बंद पडलं. या तिन्ही क्षेत्रांत काम करणाऱ्या अनेक मंडळींवर बेरोजगार व्हायची वेळ आली. मुंबईसारख्या मायानगरीचं चलनवलन पूर्ण ठप्प झालं. मुंबईत रोज काम करून पैसे मिळविणारी लाखो मंडळी आहेत. हे सगळे, एका फटक्यात काम गेल्यानं, अक्षरश: हतबल झाले. शूटिंगचं काम थंडावलं. चित्रनगरी एकदम शांत झाली. एवढी अवाढव्य, अव्याहत सुरू असलेली मोहनगरी एकदम निपचित झाली. करोनापूर्व काळात मुंबई अशी एकदम बंद होईल, असं कुणी सांगितलं असतं, तर त्यावर कुणीही विश्वास ठेवला नसता. मात्र, करोना या साध्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या छोट्याशा विषाणूनं हा ‘पराक्रम’ करून दाखवला. अर्थात सर्व जगावरच संकट आल्यामुळं कलाकारांनीही धीरानंच घेतलं. काम गेलं असलं, तरी इतर क्षेत्रांतील मंडळींचीही तीच अवस्था होती. त्यामुळं केवळ आपल्याच क्षेत्रावर हे संकट आलंय अशी भावना कुणाच्या मनात आली नाही. लॉकडाउनचा पहिला टप्पा सगळ्या देशानंच अत्यंत काटेकोरपणे पार पाडला. मात्र, हे प्रकरण काही तीन-चार आठवड्यांत संपणारं नाही, हे लवकरच सगळ्यांच्या लक्षात आलं. मात्र, हातावर हात ठेवून तरी किती काळ बसणार? अनेकांनी मग रोजगारासाठी दुसरा मार्ग स्वीकारला. कुणी रिक्षा चालविली, कुणी भाजी विकली, तर कुणी कॅब चालविली! 

मखमली पडदा रुसला...

नाटकासारख्या जिवंत कलेचे या करोनाकाळात सर्वाधिक हाल झाले. समोर प्रेक्षकांच्या जिवंत प्रतिसादावर चालणारी ही रसरशीत कला! मराठी माणसाचं नाट्यवेड नव्यानं सांगायला नकोच. मात्र, एका ठिकाणी गर्दी करायची नाही, या करोनाच्या मूलभूत नियमाचा फार मोठा दणका नाट्य क्षेत्राला बसला आणि नाटकं बंदच झाली. नाट्यप्रयोग बंद पडले आणि पुण्या-मुंबईसह राज्यभरातील मोठमोठी नाट्यगृहं अचानक सुनसान झाली. नाटक हाच श्वास असलेल्या अनेक कलावंतांना गुदमरल्यासारखं झालं. एकीकडे करोना आणि दुसरीकडं ही नाटकबंदी! दोन्हीकडून ‘श्वास’ कोंडू लागला. राज्यात बॅकस्टेजला काम करणारे हजारो कामगार आहेत. त्यांच्यावर त्यांची कुटुंबं अवलंबून आहेत. या कामगारांचे करोनाकाळात मोठे हाल झाले. मात्र, नाट्य परिषद आणि तत्सम संस्थांनी संस्थात्मक, तसेच वैयक्तिक पातळीवर मोठी मदत गोळा केली आणि कृतज्ञतेचा भाव म्हणून या कामगारांना ते पैसे दिले. मात्र, ती मदत तरी किती दिवस पुरणार? नाटक पुन्हा सुरू होणं हेच या कामगारांसाठी आवश्यक ठरलंय. या कामगारांप्रमाणेच छोट्या छोट्या भूमिका करणाऱ्या अनेक कलावंतांचीही अडचण झाली आहे. अनेकांसाठी पैसे तर महत्त्वाचे असतातच; पण रंगभूमीवर सतत वावर असणं हीदेखील काही जणांसाठी नशा असते. मात्र, प्रयोग बंद झाल्यानं अशा कलावंतांची विलक्षण मानसिक कोंडी झालीय.

या काळात काही कलावंतांनी वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. वैभव मांगले हा लोकप्रिय अभिनेता! तो उत्तम गातो, हे आपल्याला माहिती आहेच. पण लॉकडाउनच्या काळात त्याला स्वत:मधील चित्रकाराचा शोध लागला. आपल्या कोकणातील गावी जाऊन वैभवनं झपाटल्यासारखी चित्रं काढली. ती सगळी चित्रं कुठल्याही उत्तम दर्जाच्या चित्रकाराएवढीच उत्कृष्ट होती. तो केवळ चित्रं काढून थांबला नाही, तर त्यानं यातल्या काही चित्रांची विक्री करून ते पैसे बॅकस्टेज कलाकारांच्या मदतीसाठी दिले. वैभवचा हा गुण या काळामुळंच लखलखीतपणे समोर आला. दुसरा एक लोकप्रिय कलाकार हृषीकेश जोशी याने दिग्दर्शित केलेला ‘नेटक’ हा असाच एक प्रयोग होता. यात एक ऑनलाइन नाटक सादर करण्यात आलं. पाच वेगळ्या ठिकाणी असलेल्या पाच अभिनेत्रींनी हे नाटक सादर केलं. या प्रयोगाला अंगभूत मर्यादा होत्या व तंत्रज्ञानावर बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या. मात्र, तरीही नाटकवेड्या रसिकांनी या प्रयोगाचंही उत्स्फूर्त स्वागत केलं. मराठी माणसाचं नाटकवेड यातून लखलखीतपणे समोर आलं. प्रायोगिक नाटकवाल्यांचेही प्रयोग या काळात बंद पडले. पुण्यात सुदर्शन, ज्योत्स्ना भोळे नाट्यगृह या ठिकाणी चालणारे समीप रंगमंचावरचे प्रयोग बंद पडल्यानं नाट्यरसिक हळहळले. हे प्रयोग पुन्हा कधी सुरू होणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. नाटक ही काही जीवनाश्यक बाब नाही, अशी सरकारची बहुतेक समजूत असल्याने करोनाकाळात या कलेकडे, तिच्या पुनरुज्जीवनाकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नसावा. मात्र, माणसाला जगण्यासाठी कलाही तितकीच महत्त्वाची असते; अन्यथा माणसाचं जगणं आणि अन्य जनावरांचं जगणं यात फरक तो काय राहिला? आपल्याकडे नाटकाचं स्थान आपल्या सांस्कृतिक भावविश्वात फार मोठं आहे. मराठी माणूस नाटक केवळ बघत नाही, तर तो ते ‘जगतो’. नाटकातली पात्रं त्याच्या जगण्यातली अविभाज्य भाग होऊन जातात. मग ती गडकऱ्यांची सिंधू असो की पुलंची ‘फुलराणी’; कानेटकरांचा ‘लाल्या’ असो, की तात्यासाहेबांचे ‘अप्पासाहेब बेलवलकर... नटसम्राट’! या सगळ्या व्यक्तिरेखांनी मराठी मनांवर राज्य केलंय. प्रायोगिक नाटकांतून पुढं व्यावसायिक नाटकांत आलेल्या आणि नंतर चित्रपटसृष्टीत गेलेल्या कलावंतांना फार मान मिळतो. याचं कारण तो किंवा ती ‘थिएटर’ करून आलेले आहेत हेच असतं! गेल्या सहा महिन्यांत मराठी माणसाची नाटकं बघायला न मिळाल्यानं जी सांस्कृतिक उपासमार झालीय ती केवळ दुर्दैवी आहे. नाटकाची ती तिसरी घंटा लवकरच वाजो आणि मराठी प्रेक्षकांना त्यांची आवडीची नाटकं नाट्यगृहांत पुन्हा पाहायला मिळोत, एवढंच आपण म्हणू शकतो.

मालिकांचं जग गोठलं...

टीव्हीवर येणाऱ्या दैनंदिन मालिका हाही आपल्या बऱ्याच प्रेक्षकांच्या रोजच्या जगण्याचा अगदी अविभाज्य भाग झाला आहे. करोनाकाळात आलेल्या लॉकडाउननं या मालिकांवरही संक्रांत आणली. शूटिंगच बंद झाल्यामुळं काही दिवसांतच या मालिकांचं प्रक्षेपणही थांबलं. महत्त्वाच्या वाहिन्यांना आपले जुनेच कार्यक्रम पुन्हा दाखवण्याची वेळ आली. मालिकेचा एक भाग साधारणत: चार-पाच दिवस आधी चित्रित करतात. त्यामुळे अचानक लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर अनेकांकडं पुढील दीर्घकाळ पुरतील एवढे मालिकेचे भाग तयार नव्हतेच. मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलावंतांना प्रतिदिन कामाचे पैसे मिळतात. शूटिंग थांबल्यामुळे सगळ्यांचं हे उत्पन्नही थांबलं. लॉकडाउनचा पूर्ण काळ, म्हणजे जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळ मालिकांचं चित्रीकरण बंद होतं. त्यामुळं प्रेक्षकांना हा संपूर्ण काळ जुन्या मालिका किंवा चालू मालिकांचे जुनेच भाग पाहावे लागले आणि दुसरीकडं मालिकेशी संबंधित बहुतेकांचं रोजचं उत्पन्न बुडालं. रोजच्या कामावर पोट अवलंबून असणाऱ्या अनेक कामगारांचे यामुळं अतिशय हाल झाले. अनेकांचं काम गेलं. जूनमध्ये लॉकडाउन हळूहळू शिथिल झाल्यानंतर मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी मिळाली. मात्र, अनेक नियम, अटी, शर्ती व बंधने घालून! एका दृश्यात अधिक व्यक्ती दिसू नयेत याची काळजी घ्यावी लागली. चित्रीकरणाच्या ठिकाणीही मर्यादितच स्टाफला परवानगी देण्यात आली. एखाद्या सेटवर पूर्वी दोन मेकअपमन असतील, तर तिथं आता एकाच मेकअपमनला परवानगी मिळू लागली. स्वाभाविकच एकाचं काम गेलं. असं अनेक बाबतींत झालं. विशेषत: तंत्रज्ञांना मिळणारी कामं घटत गेली.

मधल्या काळात जुन्या लोकप्रिय कार्यक्रमांचा, मालिकांचा रतीब या वाहिन्यांवरून सुरू झाला. नाट्य क्षेत्रात जसे ‘नेटक’सारखे प्रयोग झाले, तसे मालिकांमध्येही काही प्रयोग झाले. ‘सोनी मराठी’वर ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’सारखी संपूर्णपणे घरी चित्रित केलेली मालिका ‘लॉकडाउन स्पेशल’ म्हणून सादर झाली. इतरही काही छोटे-मोठे प्रयोग झाले; पण ते ‘प्रयोग’ या पातळीवरच मर्यादित राहिले. अर्थात, लॉकडाउनच्या काळात बिघडलेल्या मानसिक स्वास्थ्यावर या प्रयोगांची फुंकरही सुखावह ठरली, ही बाब अलाहिदा! 

करोनापूर्व काळात बहुतेक मालिकांचं चित्रिकरण मुंबईतच - गोरेगावच्या चित्रनगरीत - होत असे. करोनानंतरच्या काळात मात्र मुंबईतील निर्बंध पाहून काही निर्मात्यांनी मुंबईबाहेर शूटिंग युनिट हलवलं आणि बाहेर चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. काही जण गुजरातमध्ये गेले, तर काहींनी कोल्हापूर, सातारा परिसरात तळ ठोकला. अशाच एका मालिकेचं सातारा परिसरात चित्रीकरण सुरू असताना तेथे काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांना करोनाचा संसर्ग झाला आणि त्यातच काही दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी सर्वांसाठीच फार धक्कादायक होती. विशेषत: मालिकांचे चित्रीकरण पुन्हा पूर्वीसारखे सुरू होणार, अशा अपेक्षेत असलेल्या इंडस्ट्रीला या बातमीने मोठाच धक्का बसला. यानंतर निर्बंध काही प्रमाणात पुन्हा कडक झाले. आता पुन्हा ही स्थिती पूर्वपदावर येण्यास किती काळ लागेल, हे सांगणं कठीण होऊन बसलं आहे. सुमारे तीन महिन्यांचं उत्पन्न बुडाल्यानं मालिकांचं बजेटही घटविण्यात आलं आहे. बड्या वाहिन्या किंवा निर्माता संस्था पाठीशी असलेल्या मालिकांची फार हानी झालेली नाही; मात्र असा आधार ज्यांच्यापाशी नाही अशा मालिकांचं बजेट कोलमडलं आहे आणि तेथे काम करणाऱ्या सर्वांनाच मोठा आर्थिक फटका बसला आहे, यात वाद नाही. मालिकांचं बजेट घसरल्यानं या इंडस्ट्रीशी संबंधित सर्वच घटकांना आता आर्थिकदृष्ट्या त्याचा फटका बसणार आहे. विशेषत: दिग्दर्शक, लेखक आदी असंघटित मंडळींना याची मोठी झळ बसते आहे. त्या तुलनेत तंत्रज्ञ आदी मंडळी संघटित असल्यानं त्यांच्या हितांचं थोडं फार संरक्षण होण्यात मदत झालेली दिसते. अर्थात एकूणच आर्थिक झळ मात्र या व्यवसायातील सर्वच घटकांना बसली, ही वस्तुस्थिती उरतेच. 

मालिकांमध्ये अनेक लहान-मोठे कलाकार काम करत असतात. मोठा व्याप असतो. विशेषत: मराठीपेक्षाही हिंदी मालिकांचा पसारा व बजेट मोठं असतं. यापैकी बहुतांश मालिकांचं काम मुंबईतच चालत असल्यानं स्थानिक तंत्रज्ञ व कलाकारांना तिथं काम मिळतंच. करोनामुळं या सर्व घटकांवर प्रतिकूल परिणाम झाला. अनेकांचं काम गेलं. याखेरीज मालिकांमध्ये आज केलेल्या कामाचे पैसे तीन महिन्यांनी देण्याची पद्धत आहे. यातही काही ठिकाणी चोख व्यावसायिकता दिसते, तर काही ठिकाणी ढिला कारभार पाहायला मिळतो. त्यामुळं आपले हक्काचे पैसे मिळविण्यासाठी अनेकांना उगाचच रक्त आटवावं लागतं, असा अनुभव आहे. करोनाकाळात तीन महिने पूर्णपणे थांबलेलं काम आणि तीन महिने उशिरा मिळणारे पैसे यांचा एकत्रित परिणाम मोठा आहे. त्यामुळं मालिकांचं चित्रीकरण जून व जुलैत पुन्हा पूर्वीसारखं सुरू झालं, तेव्हा या इंडस्ट्रीतील अनेकांना अगदी हायसं वाटलं. मात्र, बजेट आणि प्रायोजक कमी झाल्यानं पैशांची आवक पूर्वीसारखी राहिलेली नाही, असंही चित्र आहे. ते सुधारायला अर्थातच काही काळ जावा लागेल. त्यानंतर मात्र या मालिका परत पूर्वीसारख्या जोरदार सुरू होतील; याचं कारण या मालिकांचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. मालिकांचं अर्थकारण मोठं आहे. त्यामुळं ही इंडस्ट्री पुन्हा जोमानं सुरू होईल, अशी सर्वांनाच अपेक्षा आहे. प्रायोगिक रंगभूमी किंवा व्यावसायिक रंगभूमीवरून ज्यांना चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर जायचं आहे, अशा बहुतेक लहान-मोठ्या कलाकारांना मधली पायरी म्हणून मालिकांमध्ये काम करण्याचा फायदा होतो. याशिवाय पैसे चांगले मिळत असल्यानं उपजीविकेचा मोठा प्रश्न मिटतो. शिवाय मालिका हिंदीतील आणि चांगला टीआरपी मिळविणारी असेल तर देशभरात, कदाचित जगभरात तुमचा चेहरा प्रेक्षकांच्या ओळखीचा होतो. (अर्थात फक्त चेहराच; कारण अनेक मालिकांमध्ये कलाकाराचं नावच दिलं जात नाही. तो एक वेगळाच मुद्दा आहे. असो.) त्यामुळे मालिकांमध्ये काम करण्यासाठी कलाकारांमध्ये, तर मालिकेचे तांत्रिक काम मिळविण्यासाठी तंत्रज्ञांमध्ये मोठी चुरस असते. या इंडस्ट्रीवरही हजारो लोक अवलंबून आहेत. लॉकडाउनचा फटका मोठा असला, तरी ‘शो मस्ट गो ऑन’ या न्यायाने मालिका पुन्हा एकदा बहरू लागतील, यात शंका नसावी.

रूपेरी पडदा मूक झाला...

करोनाचा सर्वाधिक फटका नाटके व मालिकांसोबतच बसला तो चित्रपटांना! लॉकडाउन सुरू झाल्यानंतर सार्वजनिक वर्दळीची जी ठिकाणे सर्वांत प्रथम बंद झाली त्यात चित्रपटगृहांचा समावेश होता. करोनाचा संसर्गजन्य आजार भीतीदायक वेगाने पसरत असताना मॉल व मल्टिप्लेक्स सुरू राहणार नव्हतेच. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात चित्रपटगृहे बंद राहणार, हे सर्वांनीच मनोमन मान्य केलं होतं. वास्तविक मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दहावीच्या परीक्षा संपल्या. यानंतर येणारा काळ म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी. फिल्म इंडस्ट्रीसाठी वर्षातला सर्वांत मोठा सीझन! नेमका हा सीझन सुरू होतानाच करोनानं घाला घातला आणि चित्रपटगृहांना टाळं लागलं. आता सहा महिन्यांहून अधिक काळ ही फिल्म इंडस्ट्री ठप्प झाली आहे. हिंदी चित्रपटसृष्टी ही जगातील काही बड्या फिल्म इंडस्ट्रींपैकी एक आहे. भारतात दर वर्षी सरासरी दीड ते दोन हजार चित्रपट तयार होतात. त्यांचे वार्षिक उत्पन्न (बॉक्स ऑफिस) साधारण साडेतीन हजार कोटी रुपये एवढं असतं. या इंडस्ट्रीचा एकूण आकार साधारणत: २० हजार कोटी रुपयांचा आहे. त्यातील बहुतांश महसूल आणि उत्पन्न मुंबई शहरातून मिळतं. भारतात साधारणपणे साडेसहा हजार सिंगल स्क्रीन थिएटर आहेत, तर तब्बल २१०० मल्टिप्लेक्स आहेत. या मल्टिप्लेक्समध्ये सरासरी तीन स्क्रीन धरले, तर जवळपास साडेसहा हजार स्क्रीन केवळ मल्टिप्लेक्समध्ये आहेत. देशभरात चित्रपटांचा जो व्यवसाय होतो, त्यातले जवळपास ४५ टक्के उत्पन्न हिंदी चित्रपटांमधून मिळते, तर तेलगू व तमिळ चित्रपट तब्बल ३५ टक्के एवढा वाटा उचलतात. बाकी सर्व भाषांतील चित्रपट मिळून उर्वरित २० टक्के व्यवसाय मिळवतात. या वर्षी मार्च महिन्याच्या मध्यात ही चित्रपटगृहं बंद पडली आणि हे सर्व आर्थिक चक्र ठप्प झालं.

मुंबईत चित्रपटसृष्टीशी निगडित अनेक लहान-मोठे व्यवसाय आहेत. या व्यवसायांची संख्या शंभरहून अधिक आहे. उदा. विग तयार करणारे आणि पुरवणारे लोक किंवा सेटसाठी कपडे शिवणारे व पुरवणारे शिंपी. चित्रपटांसाठी सेट आदी तयार करणारे सुतार किंवा प्लंबर, इलेक्ट्रिशन आणि यासारखे साधारण शंभरहून अधिक व्यवसाय हिंदी चित्रपटसृष्टीशी निगडित आहेत. मुंबईत तर हजारो जण यात काम करतात आणि रोजी-रोटी कमावतात. यातले अनेक जण वर्षानुवर्षं केवळ चित्रपटांसाठीच काम करतात. त्यांना मागणीच एवढी असते, की अन्य कोणासाठी व्यवसाय करण्याची वेळच त्यांच्यावर येत नाही. अशा हजारो लोकांचं उत्पन्न मार्चमध्ये क्षणार्धात थांबलं. एकपडदा चित्रपटगृहांची अवस्था आधीच बिकट होती. करोनानं आता जणू काही त्यांच्या अस्तित्वावरच घाला घातला. आता हे चक्र पुन्हा कधी सुरू होईल; झाले तरी सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये लोक येणार का, असे अनेक मुद्दे आहेत. विशेषत: महानगरांमध्ये मल्टिप्लेक्समध्येच चित्रपट पाहायची सवय लागलेला प्रेक्षक सिंगल स्क्रीन थिएटरकडे पुन्हा येईल की नाही, अशी भीती आहे. याखेरीज मधल्या काळात अनेक प्रेक्षकांना मोबाइलमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमे बघायची सवय लागली आहे. घरबसल्या हवे ते सिनेमे बघण्याची सोय सहज उपलब्ध असताना, ट्रॅफिक जॅममधून मल्टिप्लेक्सला जाणं, तेथील पार्किंगचा प्रश्न, पार्किंगला मोजावे लागणारं अवाजवी शुल्क, मल्टिप्लेक्सला असलेले जादा तिकीटदर, तेथील खाण्याच्या वस्तूंचे असलेले अवास्तव दर या सगळ्यांना कंटाळा येऊन सिनेमाप्रेमी प्रेक्षक स्वत:च्या घरी एकटा आपल्या मोबाइलवर, आपल्या वेळेनुसार, आपल्या आवडीनुसार सिनेमे पाहू शकतो. हा फार मोठा धोका चित्रपटसृष्टीसमोर तयार झाला आहे. यावर पर्याय म्हणून ओटीटीवरही नव्या रिलीज झालेल्या चित्रपटाला वेगळं शुल्क घ्यायचं, अशी संकल्पना समोर येत आहे. तसं झालं, तर लोक पुन्हा त्याही पर्यायाचा विचार करतील. भारतीय प्रेक्षकांची मानसिकता कमी खर्चात (किंवा शक्यतो फुकट) काय मिळेल ते बघण्याची आहे. त्यामुळे मोफत किंवा अगदी माफक किमतीत सेवा देऊ शकणारे बलाढ्य प्लेअर्सच या खेळात टिकतील, यात शंका नाही. 

अर्थात काही बडे चित्रपट असे असतील, की ते मोठ्या पडद्यावर पाहण्याशिवाय पर्यायच असणार नाही. तेव्हा प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहांवर गर्दी करतीलच. पुढील काळात तिकीटदर मात्र वाढलेले असतील, हे सांगायला नकोच. त्यामुळे थिएटरमध्ये जाणं किंवा न जाणं ही पुन्हा प्रेक्षकांसाठी निवडीची संधी देणारी बाब असेल. सिंगल स्क्रीनमधला दंगा, पिटातलं ते वातावरण हे मात्र आता कदाचित ग्रामीण किंवा निमशहरी भागांतच बघायला मिळेल.

नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही गोष्टी वरकरणी जीवनावश्यक नसल्या, तरी आपण फार काळ त्यापासून दूर राहू शकत नाही. तसं झालं तर आपलं सांस्कृतिक संचित आटत जातं, हे आपल्या लक्षात येईल. आपल्याला जगण्यासाठी केवळ निरोगी श्वासच लागतो, असं नाही तर आपलं सांस्कृतिक भरणपोषण करणाऱ्या ललितकलाही लागतात. त्यांच्या आस्वादनाने आपण माणूस म्हणून जगण्याची एक वेगळी पातळी गाठू शकतो. आपल्या साध्याशा आयुष्यात विलक्षण आनंद निर्माण करण्याची ताकद या कलांमध्ये आहे. त्यामुळं त्या लवकरात लवकर पूर्ववत सुरू होवोत आणि आपल्याला पूर्वीप्रमाणेच त्याचा भरभरून आनंद लुटायला मिळो, अशीच प्रत्येक रसिकाची इच्छा आहे.

----

(पूर्वप्रसिद्धी : ग्राहकहित दिवाळी अंक, २०२०)

----


26 Mar 2021

मटा लॉकडाउन वर्षपूर्ती लेख

अज्ञाताच्या वळणावर...

----------------------------



आपल्या देशात लॉकडाउन सुरू झाला, त्याला आज (२५ मार्च) बरोबर एक वर्ष पूर्ण झालं. ‘कोव्हिड-१९’ किंवा करोना नावाच्या विषाणूनं आपल्या जगण्यात प्रवेश करून सगळा खेळच बिघडवून टाकला. या एका वर्षात आपल्या आयुष्यात ‘न भूतो...’ असे बदल घडून आले. ‘...न भविष्यति’ असं मुद्दाम म्हटलं नाही, कारण भविष्याच्या पोटात काय वाढून ठेवलं आहे, हे आपल्याला माहिती नाही. त्या अर्थानं एका अज्ञाताच्या वळणावर आपण सारे उभे आहोत. संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वाला मुळापासून हादरे देणाऱ्या ज्या काही गोष्टी हजारो वर्षांपासून घडत आल्या आहेत, त्यातली ही एक असू शकेल का, हेही आपल्याला माहिती नाही. तसं असेल तर मात्र आपण आपल्या मानवजमातीच्या इतिहासातल्या एका महत्त्वाच्या टप्प्याचे साक्षीदार आपोआपच होत आहोत. आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या उलथापालथीकडे या व्यापक परिप्रेक्ष्यातून पाहिलं, तर सगळं जगणं कवेत घेणं कदाचित सुलभ होऊ शकेल. आपल्या जगण्याचा फेरविचार करता येईल. आपल्या गरजांकडे, वाढीकडे, अपेक्षांकडे आणि आकांक्षांकडे नव्याने पाहता येईल.

गेल्या वर्षी करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनचा, अर्थात टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयाच्या योग्यायोग्यतेची चर्चा होत राहील. मात्र, त्या वेळी हे संकट सर्वांसाठीच नवीन असल्याने जे जे उपाय केले गेले, ते ‘हे करून तर पाहू’ अशा दृष्टीनेच केले गेले. व्यापक जनहितासाठी काही गैरसोयी सहन करण्याची तयारी सर्वांनीच ठेवली. मात्र, अशा प्रकारची परिस्थिती जगाने यापूर्वी कधीही अनुभवली नसल्याने, अशा निर्णयांतून येणारी अपरिहार्य होरपळ बऱ्याच मोठ्या जनसमुदायाच्या वाट्याला आली. या सगळ्यांतून ज्यांच्या जगण्यावर काहीच प्रतिकूल परिणाम झाला नाही, असे फारच थोडे. ते भाग्यवान! मात्र, बहुसंख्यांना या ना त्या प्रकारे या भीषण संकटाची झळ बसली. ‘आयुष्यात सगळं काही सुरळीतच चालणार आहे,’ या आपल्या मनात नकळत तयार झालेल्या गृहीतकालाच धक्का बसला. त्याची जागा ‘आज, आत्ता, उद्या काहीही होऊ शकतं’ या भावनेने घेतली. अशी भावना सातत्याने मनात राहणं म्हणजे दीर्घकाळाच्या नैराश्याला आश्रय! गेल्या वर्षभरात जगभरात अनेकांना अशा नैराश्याचा सामना करावा लागला. रोजीरोटीचं साधन हरपल्यामुळं खूप जणांना सैरभैर व्हायला झालं. करोनामुळं आपल्या जवळच्या आप्तांचा थेट मृत्यूच बघावा लागलेल्यांच्या दु:खाची तर गणनाच नाही. सर्वांत जास्त हाल तर हातावर पोट असलेल्या लाखो श्रमिकांचे झाले.

लॉकडाउननंतर भारतातलं फाळणीनंतरचं कदाचित सर्वांत मोठं असं स्थलांतर घडून आलं. मनात इच्छा नसताना करावं लागणारं स्थलांतर वेदनादायक असतं. भारतातल्या मोठ्या महानगरांमधून असे अनेक अभागी जीव आपापल्या गावांकडं निघाले. रस्ते बंद होते, वाहने नव्हती. अशा वेळी अगदी दुचाकी गाड्यांवरून, सायकलवरून आणि ज्यांच्याकडे ही वाहनेही नव्हती ते तर चालत चालत हजारो किलोमीटर दूर असलेल्या आपल्या गावांकडे निघाले. या स्थलांतराची वृत्तवाहिन्यांवरून पाहिलेली दृश्ये काळजाला पीळ पाडणारी होती. ज्या शहरांवर आपण अवलंबून होतो, त्यांनी अचानक आपल्याला दूर लोटल्याने एक प्रकारे अनाथ झाल्याची भावना या श्रमिकांच्या चेहऱ्यावर दाटली होती. सगळेच जण संकटात होते. एरवी मदतीला धावून येणाऱ्या हातांनाही इथे मागे सरावे लागले होते. तरीही अनेक स्वयंसेवी संस्थांनी, माणसांनी आपल्यातली माणुसकी शाबूत असल्याचे दाखवून, या श्रमिकांना होता होईल ती मदत केली. मात्र, ती फारच अपुरी होती. स्थलांतरितांच्या वेदनांना अंत नव्हता. 



शहरांमध्ये जे राहिले आणि ज्यांना रोजीरोटी उपलब्ध होती, त्यांचेही हाल सुरूच होते. लहान हॉटेल चालविणारे, छोट्या खाणावळी किंवा मेस चालविणारे, केशकर्तनालय चालविणारे, पर्यटन व्यावसायिक, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे अशा अनेकांचे धंदे या लॉकडाउनमुळं बंद पडले. अनेकांना रोजच्या जेवणासाठी दुसऱ्यांकडे मदतीचा हात पसरावा लागला. अनेकांनी नवे उद्योग-व्यवसाय सुरू केले. केस कापणाऱ्या कारागिरांनी रस्त्यावर बसून कलिंगड विकले. कुणी घरोघरी अन्नपदार्थ पोचविण्याचे काम सुरू केले. ज्याला जसे जमेल तसे त्याने हात-पाय हलवले आणि जीव तगविला. प्रत्येक प्राणिमात्रांत ‘सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट’ असतंच. मनुष्यप्राणी सर्वांत हुशार; त्यामुळे त्याच्यात तर ते असतंच. त्यामुळं आपण सगळेच तगून राहिलो. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी मागच्या वर्षी ‘हे वर्ष फक्त तगून राहण्याचे आहे,’ असे रास्तपणे म्हटले होते, ते त्यामुळेच! अर्थात आपल्या जगण्याच्या गुणवत्तेवर त्याचा मोठा परिणाम झाला. अनेकांच्या धारणा बदलल्या, अनेकांच्या मूल्यव्यवस्थेला तडे गेले, अनेकांना आपले प्राधान्यक्रम तपासून पाहावेसे वाटले, तर अनेक नातेसंबंधांत वितुष्ट आले किंवा दुरावा तरी आला. दुसरीकडे, संकटांमुळे माणूस जोडलाही गेला. सामान्य माणसातले असामान्यत्व कित्येकदा दिसून आले. जिथे आपले दूर गेले, तिथे ओळखपाळख नसलेलेही मदतीला धावून आले. प्लाझ्मादान करण्यापासून ते करोना झालेल्या कुटुंबीयांना अन्नधान्य पोचविण्यापर्यंत अनेक हात मदतीसाठी पुढे आले. जगण्यावरची श्रद्धा दृढ व्हावी, असे क्षण अनेकांच्या वाट्याला आले. विशेषत: डॉक्टर, नर्स, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी यांना हे क्षण अधिक लाभले. त्यांच्या अविश्रांत कष्टांमुळे कित्येक जीव जगले, वाचले! 

मध्यमवर्गीय घरांमध्ये अनेकांना पूर्वीचे दिवस पुन्हा जगता आले. सर्व कुटुंब संध्याकाळच्या जेवणासाठी एकत्र आले आहे, हे दृश्यही अनेक घरांत दिसून आले. ‘वर्क फ्रॉम होम’ हा नव्या जगण्याचा मंत्र झाला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात (मूळ अभ्यासक्रमात नसलेला) ‘ऑनलाइन शिक्षण’ नावाचा नवाच धडा आला. विद्यार्थ्यांसोबतच पालकांची आणि शिक्षकांचीही कसोटी या काळाने बघितली. ती ‘परीक्षा’ अजूनही सुरू आहे आणि कदाचित आता नव्या जगण्याचा तो अविभाज्य भागच असू शकेल. माणसाला माणसाची सोबत किती महत्त्वाची आहे, हे या काळात बहुतेकांना नव्याने उमगलं. लॉकडाउनमुळे आपली अतिवेगवान जीवनशैली एकदम थांबल्याने अनेकांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा झाला. कामासाठी दूर अंतरापर्यंत प्रवास करून जाण्याचे कष्ट टळले. त्यामुळे अनेकांची तब्येत सुधारली. अनेकांनी घरकामांत मदत करायला सुरुवात केली. आपल्या  धावपळीच्या, ताणाच्या जगण्यात आपण काय गमावत होतो, हेही अनेकांना कळून चुकलं.

आज लॉकडाउनला एक वर्ष पूर्ण होत असताना, दुर्दैवाने आपण पुन्हा गेल्या वर्षी जिथं होतो तिथंच उभे आहोत. साथीने पुन्हा नव्याने तोंड वर काढले आहे. लसी आल्या असल्या तरी सर्वांना लस मिळेपर्यंत बराच काळ जाईल. त्यामुळे ही साथ आणि ही सगळी बंधनं किती काळ पुढं चालणार आहेत, हे कुणीच सांगू शकत नाही. आपण गेल्या वर्षी या साथीला जेवढं गांभीर्यानं घेतलं, तेवढं आता घेत नाही आहोत, हे स्पष्टच दिसतं आहे. याचे परिणाम काय होणार आहेत, हे सांगता येत नाही. अज्ञाताच्या या वळणावर, सगळं काही अनिश्चित, धूसर दिसत असताना एक गोष्ट मात्र शाश्वत आहे - माणसाचं जगण्यावरचं चिवट प्रेम! आपल्याला जगायचं आहे आणि चांगल्या दर्जाचं आयुष्य जगायचं आहे, ही माणसाची मूलभूत प्रेरणाच त्याला या संकटातून तारून नेईल, हे नक्की!

---


(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; २५ मार्च २०२१)

---

गेल्या वर्षी लिहिलेला लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा...

----

28 Feb 2021

दृष्टी-श्रुती डिजिटल दिवाळी अंक लेख २०२०

नवी दृष्टी देणारा ‘राशोमान’

---------------------------------


काही वर्षांपूर्वी मी पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आयोजित केलं जाणारं (आणि महत्त्वाचं म्हणजे मराठीतून चालणारं) एक आठवड्याचं रसास्वाद शिबिर अटेंड केलं होतं. माझ्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा व मोलाचा अनुभव होता. त्यातही या शिबिरात आम्हाला दाखवला गेलेला अकिरा कुरोसावाचा ‘राशोमान’ हा चित्रपट पाहून मी थरारून गेलो. तब्बल ७० वर्षांपूर्वी निघालेला हा सिनेमा मी आठ वर्षांपूर्वी प्रथम पाहिला. त्यानंतर अनेकदा पाहिला. दर वेळी मला या चित्रपटानं वेगळी अनुभूती दिली आहे; माझ्या धारणा बदलल्या आहेत. ‘सत्य म्हणजे काय?’, ‘जगात एकच एक सत्य असतं का?’, ‘ज्याला जसं दिसतं तसं सत्य असतं का?’ या आणि अशा अनेक मूलभूत प्रश्नांना हात घालणारा हा चित्रपट म्हणूनच माझ्या मनावर खोलवर ठसा उमटवून गेला आहे.
त्यामुळंच १९५० मध्ये प्रदर्शित झालेला ‘राशोमान’ (याचे उच्चार राशोमोन, राशोमन असेही केले जातात!) हा चित्रपट जागतिक अभिजात चित्रपटांमध्ये गणला जातो. मानवी जीवनावर, वर्तनावर मूलभूत चिंतन करणारे चित्रपट नेहमीच कलात्मक आणि वैचारिक उंची गाठताना दिसतात. ‘राशोमान’ हा याच वर्गातला चित्रपट. रायुनोसुक अकुतागावा यांच्या ‘राशोमान’ याच नावाच्या लघुकथेवरून या चित्रपटाचं शीर्षक घेण्यात आलं असलं, तरी प्रत्यक्षात अकुतागावा यांच्यात ‘इन ए ग्रोव्ह’ या दुसऱ्या लघुकथेवर आधारित या चित्रपटाचं कथानक रचण्यात आलं आहे.

जपानमधील ग्रामीण भागात असलेल्या 'राशोमान' या भग्नावस्थेत असलेल्या, भव्य लाकडी प्रवेशद्वाराच्या दृश्यानं चित्रपटाची सुरुवात होते. दर वेळी हा सिनेमा सुरू झाला की हे दृश्य आणि त्या वेळी कोसळत असलेला भयंकर पाऊस आपलं लक्ष वेधून घेतात. आपण अगदी सावरून पुढं काय होणार ते बघू लागतो. या लाकडी प्रवेशद्वाराच्या खाली असलेल्या जागेत एक लाकूडतोड्या आणि एक तरुण धर्मगुरू बसलेला आहे. त्या दोघांनीही तीन दिवसांपूर्वी एक भयानक घटना बघितली आहे. प्रचंड पाऊस कोसळत असल्यामुळं आणखी एक माणूस तिथं आश्रयाला येतो. हे दोघं मग त्या माणसाला त्या घटनेविषयी सांगतात. ती घटना असते जंगलात झालेल्या एका खुनाची. त्या लाकूडतोड्यानं एका माणसाच्या मृतदेहाचे हात बघितलेले असतात. त्यानंतर तो घाबरून तिथून पळून जातो. नंतर त्या खुनाचा खटला सुरू होतो, तेव्हा कोर्टासमोर सगळी हकीकत आपल्यासमोर उलगडत जाते. त्या दिवशी जंगलात घोड्यावरून एक सुंदर तरुणी आणि सोबत चालत तिचा सैनिक (समुराई) पती जात असताना ‘ताजोमारू’ नावाचा त्या भागातला कुख्यात दरोडेखोर त्यांना पाहतो. त्याच वेळी किंचित वारा येतो आणि त्या तरुणीच्या चेहऱ्यावरील पडदा हलतो. तेव्हा तिच्या अप्रतिम सौंदर्याचं दर्शन त्या दरोडेखोराला होतं. त्याच्या मनात तिच्याविषयी अभिलाषा उत्पन्न होते. त्यानंतर जे काही घडतं, त्याची तीन वेगवेगळी रूपं तिथल्या आपल्याला पाहायला मिळतात. दरोडेखोराचं, त्या तरुणीचं आणि मृत सैनिकाचं... (मृत सैनिकाचं म्हणणं प्लँचेटद्वारे ऐकायला मिळतं.) हे तिघेही कोर्टासमोर आपला जबाब देत असतात. या तिघांचंही म्हणणं ऐकल्यावर लाकूडतोड्या स्वतःचं चौथं (आणि आधीच्या तीन कहाण्यांपेक्षा वेगळंच) म्हणणं सांगतो. हे पाहिल्यावर नक्की काय घडलं, याविषयी आपल्याही मनात संभ्रम उत्पन्न होतो. सत्य नक्की काय, याविषयी आपण विचार करू लागतो. चित्रपटाच्या शेवटाकडं दिग्दर्शक याचं सकारात्मक उत्तर देतो. चित्रपट संपल्यानंतरही आपण त्या कथानकात आणि महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शकानं उपस्थित केलेल्या मूलभूत प्रश्नाचं चिंतन करण्यात गुंग होऊन जातो, हे या कलाकृतीचं सर्वांत मोठं यश!
मी हा सिनेमा पाहिल्यानंतर आपल्यावर असा, एवढा खोलवर परिणाम याआधी कुठल्या चित्रपटानं केला आहे, हे आठवू लागलो. ‘संत तुकाराम’पासून ते ‘वास्तुपुरुष’पर्यंत आणि ‘पथेर पांचाली’पासून ‘गँग्ज ऑफ वासेपूर’पर्यंत अनेक चित्रपट डोळ्यांसमोरून गेले. जागतिक चित्रपट महोत्सवांत मी यापूर्वीही अनेक परकीय भाषांतले चित्रपट पाहिले होते. मात्र, एवढा खोल परिणाम अन्य कुठल्याही चित्रपटाचा माझ्यावर झालेला मला आठवत नाही. ‘राशोमान’नंतर मात्र माझी विचारांची दिशाच बदलून गेली. मानवी आयुष्याकडं, जगण्याकडं बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मला या कलाकृतीनं दिला.
याबाबत अधिक विचार केल्यावर लक्षात येतं, की या विचारांचं मूळ त्या कलाकृतीतच दडलेलं आहे. कुरोसावा यांनी या चित्रपटाची मांडणी मोठी वेधक केली आहे. चित्रपट माध्यमाची ताकद त्यातून लक्षात येते. चित्रपटाचं पार्श्वसंगीत अप्रतिम आहे. किंबहुना संपूर्ण चित्रपटात या पार्श्वसंगीतानं एखाद्या पात्रासारखी भूमिका बजावली आहे. चित्रपट जुन्या काळातला आणि कृष्णधवल असला, तरी 'राशोमान' गेटवर प्रचंड कोसळणारा पाऊस आणि तिथं बसलेली तीन माणसं हे दृश्य अंगावर काटा आणतं. चित्रपटाची सुरुवात आणि शेवट वेधक आहे. सुरुवातीला भरून आलेलं आभाळ आणि कोसळणारा पाऊस, तर शेवटच्या दृश्यात मोकळं झालेलं आकाश आणि स्वच्छ पडलेलं ऊन हे अगदीच प्रतीकात्मक आणि सहज लक्षात येण्यासारखं आहे.
या चित्रपटात तोशिरो मिफुने या प्रख्यात जपानी अभिनेत्यानं ताजोमारू या दरोडेखोराची भूमिका केली आहे. मिफुने यांनी कुरोसावा यांच्या एकूण १६ चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. त्यापैकी ही दरोडेखोराची भूमिका खास समजली जाते. याशिवाय तकाशी शिमुरा यांनी लाकूडतोड्याची, मिनोरू चिआकी यांनी तरुण धर्मगुरूची, तर माचिको क्यो हिनं तरुणीची भूमिका केली आहे. या सर्वांनी आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत. चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असताना यापैकी कुणाही कलाकाराला चित्रपटाचा शेवट काय आहे, हे माहिती नव्हतं, म्हणे! त्यामुळे ते कुरोसावा यांच्याकडं चित्रपटाचा शेवट सांगण्यासाठी हट्ट करीत असत. चित्रपट तयार झाल्यानंतर कुरोसावा यांना एकच एक असं सत्य सांगायचंच नव्हतं; तर सत्य नावाची गोष्ट मुळात अस्तित्वात आहे का; की ती व्यक्तिपरत्वे बदलते, याच मुद्द्यावर लक्ष वेधायचं होतं, हे सर्वांच्या लक्षात आलं.
या चित्रपटाचं महत्त्व म्हणजे या चित्रपटामुळेच जपानी चित्रपट जागतिक स्तरावर पोचला. या चित्रपटाने व्हेनिस चित्रपट महोत्सवात (१९५१) प्रतिष्ठेचा गोल्डन लायन पुरस्कार पटकावला. याशिवाय १९५२ च्या ऑस्कर सोहळ्यात या चित्रपटाला अॅकॅडमी ऑनररी पुरस्कारानं गौरविण्यात आलं. मुळात हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा जपानमध्ये त्याचं फार काही जोरदार स्वागत झालं नव्हतं. किंबहुना काही टीकाकारांनी या चित्रपटावर टीकाच केली होती. मात्र, अमेरिकेत व पाश्चात्त्य जगात या चित्रपटाचे कौतुक झाल्यावर जपानमधील समीक्षकही गोंधळले होते. हा चित्रपट म्हणजे दुसऱ्या महायुद्धात जपानच्या झालेला पराभवाचं समर्थन करण्याच्या मानसिकतेतून आलेली कलाकृती आहे, असाही काही समीक्षकांनी या चित्रपटाचा अर्थ लावला होता. अर्थात सत्याचा शाश्वत शोध हाच हा सिनेमाचा मूलाधार असल्यानं तो जगभरातल्या प्रेक्षकांना आवडला आणि आज तो जगातील काही सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो.

मला स्वत:ला हा चित्रपट याच कारणासाठी भावला, आवडला, पटला! हा चित्रपट पहिल्यांदा पाहणारा माणूस ‘सत्य’ या संकल्पनेविषयी आपल्या मनात चित्रपट पाहण्यापूर्वी असलेल्या धारणा नक्कीच तपासून बघितल्याशिवाय राहणार नाही, याची मला अगदी खात्री वाटते. ‘सत्यमेव जयते’ हे आपलं राष्ट्रीय वचन आहे. अगदी लहानपणापासून आपल्याला नेहमी खरं बोलावं, खरं वागावं अशी शिकवण दिली जाते. पण हे खरं म्हणजे काय, सत्य म्हणजे नक्की काय, याचा उलगडा काही होत नाही. आयुष्यात पुढं आपण मोठे झालो, टक्केटोणपे खाऊन शहाणे झालो, तरी या विचाराचा पिच्छा काही सुटत नाही. जसजसे आपण मोठे होत जातो, आपलं अनुभवविश्व समृद्ध होत जातं तसतसं सत्य नावाच्या ‘साक्षात्कारा’ची वेगवेगळी ओळख पटू लागते. त्यातून संभ्रम वाढतच जातो. एकच घटना दोन वेगळ्या ठिकाणांहून बघणाऱ्या लोकांना वेगळी दिसते. त्यांना जे दिसतं, तेच त्यांच्यापुरतं सत्य असतं. असं असेल तर मग एकच एक, शाश्वत असं सत्य असतं तरी काय? आपली जडणघडण, आपल्या विचारांची बैठक, धारणांचा पाया नक्की कुठल्या गृहीतकांवर आधारित आहे? मग जर हा पायाच ठिसूळ असेल तर त्यावर आधारलेली सगळी नीतिमूल्यं झूठ ठरवायची का? की मुळात हे सगळे मनाचे खेळ आहेत? आपल्या कृत्यांचं समर्थन करण्यासाठी माणसाचा अत्यंत हुशार मेंदू तर या वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधून काढत नाही ना? याला हे म्हणायचं, त्याला ते म्हणायचं हे सगळं ठरवलं कुणी? आदिम प्रेरणांपासूनचा हा प्रवास नक्की कुठल्या घटकांवर आधारलेला आहे? संस्कृती म्हणजे तरी नक्की काय? आदिम प्रेरणांचं नियमन करणाऱ्या या चौकटी मोडण्यासाठी तर मानवी मनाचे हे निरनिराळे खेळ सुरू नाहीत ना? आपण जे काही वागतो, बोलतो त्याला एक प्रामाणिकपणाचं, सत्याचं कथित अधिष्ठान दिलं, की मग माणूस मोकळा होतो. त्याला या कृत्यांविषयी लाज वाटत नाही, की पश्चात्ताप होत नाही. पण मग स्वत:च्या मनालाही फसवू शकेल अशी कुठली ‘सत्य’ नावाची बाब अस्तित्वात तरी असू शकते काय? एक ना दोन... अशा नाना प्रश्नांनी मन भोवंडून जातं. ‘राशोमान’मधली कथा आणि त्यातल्या पात्रांचं वर्तन पाहून सतत हेच विचार मनात पिंगा घालायला लागतात.
मग लक्षात येतं, की दिग्दर्शकानं या सर्व कथेतून हाच मूलभूत विचार उपस्थित केला आहे. तो वाचून आपले सत्य या संकल्पनेविषयीचे सर्व पूर्वग्रह गळून पडतात आणि आपण तिचा नव्यानं विचार करायला लागतो. माझ्या मते, एखाद्या कलाकृतीचं हे यश फार मोठं मानायला हवं. कलाकृतीचा आस्वाद घेताना ती केवळ पंचेद्रियांना सुखावणारी न राहता, मेंदूपर्यंत घुसून तिथल्या विचार केंद्रांना चालना देत असेल, तर ती कलाकृती निखालस मोठी! ‘राशोमान’ ही अशीच कलाकृती आहे. हा सिनेमा पुन:पुन्हा बघताना त्यातले अर्थ नव्यानं उलगडत जातात. आपलं वय वाढतं, आपली विचारक्षमता वाढते, अनुभवविश्व वाढतं, तसं या कलाकृतीचा आवाकाही नव्यानं समजू लागतो. तब्बल ७० वर्षांपूर्वी तयार झालेला हा कृष्णधवल चित्रपट आपल्याला अजूनही नवनवे विचार देत आहे, आपल्या धारणांना धक्का लावतो आहे. त्या अर्थानं आता ‘राशोमान’चा आयुष्यावर पडलेला कायमस्वरूपी प्रभाव हेही एक निखळ ‘सत्य’च आहे! 

----

(पूर्वप्रसिद्धी : दृष्टी-श्रुती डिजिटल दिवाळी अंक २०२०)

---

22 Feb 2021

समदा दिवाळी अंक २०२० लेख

 अन्नपूर्णा आणि अन्नपूर्णा २.०

-----------------------------------

आमचं गावाकडचं जुनं धाब्याचं घर आहे... सलग सात खणांचं... त्यातल्या एका कोपऱ्यात स्वयंपाकघराचा उंचवटा आहे... त्या उंचवट्याच्या कोपऱ्यात चूल आणि वैल आहे. चूल धडाडून पेटली आहे. त्यावर तापलेला तवा आहे. मी त्या उंचवट्याच्या खाली ताट समोर घेऊन बसलो आहे. माझी आजी त्या चुलीशेजारी हातात फुंकणी घेऊन चुलीत फूंक मारते आहे. चुलीतल्या धुरामुळं तिचे डोळे तर चुरचुरताहेतच, पण मलाही एवढ्या लांब ती धग लागते आहे... पण पोटातली भुकेची धग त्याहून मोठी आहे... म्हणून मी दटून तिथंच बसलो आहे... मग तव्यावरची गरमागरम भाकरी पुढच्या मिनिटाला माझ्या ताटात येते आहे आणि ताटातल्या ताकातल्या पिठल्यासोबत मी ती पेढ्यासारखी अत्यंत रुचकर भाकरी खातो आहे...

आजी आणि आईच्या हातचं जेवण हा विषय प्रत्येकालाच प्रिय असा! आपला शब्दश: पिंड ज्यावर पोसला आहे असं हे खाण्याचं नातं... या दोघींशी जसा आपला रक्ताचा संबंध असतो, तसा आणि तितकाच लहान आतड्याचा, मोठ्या आतड्याचा, जठराचा, यकृताचा, अन्ननलिकेचा, स्वादुपिंडाचा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जिभेचाही संबंध असतो. शेतात पडलेलं बीज आणि त्यातून वर आलेल्या धान्याच्या कोंभाइतकंच हे नातं जैव असतं... त्यामुळंच बालपणीच्या या दोघींशी संबंधित सगळ्या आठवणी त्यांच्या हातून खाल्लेल्या पदार्थांच्याच जास्त आहेत. बायकोच्या हातच्या पदार्थांना आईच्या हातची चव येत नाही आणि आईच्या हाताला ती चव यायला आजीच्या हाताखाली अनेक वर्षं उमेदवारी करावी लागते, असं आपल्याकडं म्हणतात त्यामागं हेच कारण असावं. वर्षानुवर्षं हाताला चटके सोसत या माउल्यांनी आपल्या जिभेचे चोचले पुरवले. त्याची सर आता कशाला येणं शक्य नाही...

आमच्या आजीचं नाव काशीबाई. ती माहेरची देशमुख. जामखेडच्या गढीवरच्या देशमुखांचं तालेवार माहेर. त्यामुळं तिच्या अंगात तो ‘देशमुखी’ तोरा शेवटपर्यंत होता. आमचं गाव तसं दुष्काळी! बऱ्याच गोष्टींचा अभाव... पण या जामखेडच्या मातीत ज्वारी उत्कृष्ट दर्जाची पिकते. आमच्या शेतातून घरी ज्वारी यायची आणि आमच्या बाहेरच्या घरात निम्म्या भागात पोती ओतली जायची. शेजारी आधाराला उरलेली पोती लावली जायची. आम्ही भावंडं त्या पोत्यावर चढून त्या ज्वारीत उड्या मारायचो. ज्वारीत खेळून खेळून पाय पांढरेफटक व्हायचे. ‘अन्नधान्याने घर भरू दे,’ ही म्हण आमच्या घरात शब्दश: मूर्त व्हायची. अर्थात ज्वारी घरातली खूप असली, तरी आमच्या रोजच्या जेवणात भाकरी नसायची. पोळी, भाजी, कोशिंबिरी, चटण्या, भात आणि वरण असाच सर्वसाधारण घरांत असतो, तसा रोजचा मेनू असायचा. 

आमच्या आजीमधली सुगरण खऱ्या अर्थानं दिसायची ती सणावाराला. तेव्हा तिचा कडक सोवळ्यात स्वयंपाक असायचा. होळी, श्रावणातले चारही शुक्रवार, पोळा, नवरात्र, दसरा, खंडोबाचं नवरात्र हे प्रमुख सण घरात साजरे व्हायचे. त्यात दोन्ही नवरात्रांत आणि श्रावणात कुळधर्म, कुळाचार चाले. श्रावणातल्या चारही शुक्रवारी घरात पुरणावरणाचा ज्याचा ‘चारी ठाव’ म्हणतात तसा स्वयंपाक असायचा. माझी आजी तिच्या साठीपर्यंत सगळा स्वयंपाक एकहाती करायची. नंतर सुना आल्यावर तिनं फक्त पुरणपोळ्यांचं काम स्वत:कडं घेतलं आणि बाकी स्वयंपाक माझी आई व काकू मिळून करू लागल्या. ती सवाष्ण बारा वाजता जेवायला यायच्या आत हा सगळा स्वयंपाक तयार असायचा. त्यासाठी या बायका पहाटेच उठून कामाला लागायच्या. पुरणाचा घाट मोठा असायचा. मी जरा मोठा झाल्यावर कधी कधी पुरणयंत्रांतून पुरण हाटण्याचं काम मला मिळे. पण हे खूप नंतर! त्यापूर्वी आजी पाटा-वरवंट्यावरच पुरण घालत असे. मात्र, आजीची पुरणपोळी कमाल असायची. अगदी रेशमासारखी नाजूक, नेमकी गोड आणि अजिबात पुरण बाहेर न सांडणारी अशी बांधीव पोळी आजी करायची. तांबूस, लालसर रंगाची ती पोळी वरून साजूक तूप घातल्यावर आणखीनच देखणी दिसायची. तिचा पहिला घास तोंडात गेला, की चटका बसायचाच. पण तो चटका सोसत सोसत ती पोळी घशाखाली उतरवण्याच्या आनंदाला ‘स्वर्गीय’ एवढा एकच शब्द मला सुचतो. खरं सांगायचं, तर त्या लहान वयात या अन्नपदार्थांचं मोल आम्हाला कितपत कळलं होतं कोण जाणे. तो दर्जा आम्ही जणू गृहीतच धरला होता. नंतर आयुष्यात घराबाहेर पडायची, होस्टेलवर राहण्याची, मेसमधला गार डबा खाण्याची वेळ आली, तेव्हा डोळे खाडकन उघडले. आजी आपल्याला काय उत्तम दर्जाचं जेवण करून खायला घालत होती, हे समजलं. आजीसारखीच तिची मोठी मुलगी, म्हणजे माझी थोरली आत्या सुगरण होती. अक्षरश: अन्नपूर्णाच ती! तिच्या हाताला जी चव होती, त्याचं वर्णन करणं अशक्य आहे. कुठलाही पदार्थ सांगा, तिला तो जमत नाही किंवा तिचा तो बिघडलाय, हे मी कधीच पाहिलेलं नाही. या माझ्या आत्यानंही आमच्या जिभेचे भरपूर चोचले पुरवले. वास्तविक पुरणपोळी खावी तर माझ्या आजीच्या हातचीच! (हे प्रत्येक जण म्हणत असतो, हे मला ठाऊक आहे आणि ते प्रत्येकाच्या बाबतीत तेवढंच खरं आहे. याचं कारण आपल्यावर लहानपणी त्या खाण्याचा झालेला संस्कार!) पण खरोखरच आमच्या आजीची पुरणपोळी रेशमासारखी असायची. त्या काळातल्या बहुतेक बायका अशाच सुगरण असायच्या. पण प्रत्येकीच्या हातची चव वेगळी! आमच्या आत्यानं तिच्या आईचा हा गुण केवळ उचललाच होता असं नाही तर तिनं त्या गुणाचा भरपूर विस्तारही केला. माझे आजी-आजोबा शिरूरला अनेक वर्षं राहिले. आत्या ही त्यांची सर्वांत थोरली मुलगी. तिचं लग्न पुण्यात मकाशीर कुटुंबात झालं आणि ती पुणेकर झाली. आधी कसबा गणपतीजवळ आणि नंतर साततोटी हौदाजवळ फुलंब्रीकर वाड्यात तिनं अनेक वर्षं संसार केला. वाड्यातली खोली होती दहा बाय दहाची... आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत गावावरून तिच्याकडं यायचो आणि आठ-आठ दिवस मुक्काम ठोकायचो. आत्या, तिचे यजमान, माझी दोन्ही आत्येभावंडं यांनी कधीही पाहुणे आले म्हणून कुरकुर केल्याचं मला आठवत नाही. उलट त्या वाडासंस्कृतीची मला लहानपणीच (पुण्यात राहत नसूनही) ओळख झाली. त्या छोट्याशा खोलीत आत्याचा संसार आणि तिचा सुगरणीच्या वरताण स्वयंपाक चालायचा. 

आम्ही देशस्थ आणि त्यात गावाकडचे! आमच्याकडं तळणीच्या मोदकांची पद्धत! उकडीचा मोदक हा पदार्थ मी सर्वप्रथम खाल्ला तो या आत्याच्या हातून... तिच्या हातचे उकडीचे मोदक कधीही बिघडले नाहीत. उलट, तिच्यासारखे उत्कृष्ट मोदक मी आजतागायत कुणाचेच खाल्ले नाहीयेत. मी नंतर पुण्यात शिकायला आलो, तरी सणावाराचं माझं गोडधोड खाणं आत्यानं कधी चुकू दिलं नाही. मी जेवायला आपला कायम त्यांच्याकडे! ती गरमागरम उकडीचे मोदक वाढायची, तुपाची धार सोडायची... बाकी काही खाऊ नकोस; फक्त मोदक खा, म्हणायची. मी वेड्यासारखा एखादा मोदक शेवटी खायचो. बाकी भाजी-पोळी खात बसायचो. जेव्हा आपल्याला मिळत असतं, तेव्हा आपल्याला त्याची किंमत नसते, हेच खरं. माझी ही आत्या दहा वर्षांपूर्वी कर्करोगानं गेली. तिला अन्ननलिकेचा कर्करोग झाला होता. तिला शेवटी शेवटी एक घासही खाता यायचा नाही. आयुष्यभर दुसऱ्याला खाऊ घालण्यात आनंद मानणाऱ्या माझ्या या ‘मोठ्या आई’ला शेवटी शेवटी काहीही खाता येत नव्हतं... तिला अन्नच घेता येत नव्हतं... दैवानं केलेला यापेक्षा क्रूर विनोद माझ्या पाहण्यात नाही! 

आजी आणि मोठ्या आत्याच्या तालमीत तयार झालेल्या माझ्या आईच्या हातचा स्वयंपाकही असाच उत्कृष्ट असतो. आईचं माहेर मराठवाड्यातलं. त्यामुळं तिच्या आईच्या हातचे मराठवाडी पदार्थ ती सहज करते. त्यात एसर आमटी किंवा शेंगोळ्यांसारखे पदार्थ तिचे खास फेव्हरिट. आईचा असाच एक पेटंट पदार्थ म्हणजे गव्हाची खीर. आईच्या हातून ज्यांनी ज्यांनी हा पदार्थ खाल्लाय त्यांनी कायमच तिच्याकडं वारंवार त्या खिरीची फर्माईश केलीय. आईचा कधीही न बिघडणारा आणखी एक पदार्थ म्हणजे ओल्या नारळाच्या वड्या. खरं तर आईचा कोकणाशी काहीही संबंध नाही. मात्र, तिच्या सर्व जमणाऱ्या पदार्थांमध्ये नारळाचा समावेश असतो. गव्हाच्या खिरीतही त्या नारळाचं दूध लागतंच. माझ्या लहानपणी आम्ही एकत्र कुटुंबात राहिलो. आजी-आजोबा, माझी धाकटी आत्या (तिचं लग्न होईपर्यंत), माझा काका, नंतर काकू आणि आम्ही एकूण सहा भावंडं... आई प्रत्येकाची आवड-निवड जपत स्वयंपाक करायची. आत्याला लसूण चालायचा नाही. मग तिची भाजी वेगळी... बाकीच्यांची वेगळी. काकाला दही-साखर जेवणात आवडायचं. मग आवर्जून त्याच्यासाठी ती वेगळी दही-साखरेची वाटी काढून ठेवायची... (यावरून एक आठवलं. मला लहानपणी एक विचित्र म्हणावी अशी सवय होती. मला मध्यरात्री जाग यायची व तेव्हा प्यायला मला दूध लागे. आई माझ्या उशाशी दुधाचा कप वर बशी पालथी घालून ठेवायची. मी मध्यरात्री उठून बशीत ते गार दूध ओतून प्यायचो. मला त्यातली साखर ढवळलेली चालायची नाही. मी ती साखर नंतर चमच्याने खायचो.) घरी आलेले पाहुणे सकाळच्या एसटीनं परत जाणार असले, तरी सकाळी सात वाजता त्यांना साग्रसंगीत जेवू घालायचा कार्यक्रम घरी चालायचा. शक्यतो बाहेरचं खाणं टाळण्याकडं कल असायचा. त्यामुळं बाहेर कुठंही जायचं झालं, तरी घरून डबा नेणं ही सर्वमान्य रीत होती. नाही तर दुसऱ्याकडं मेहुण म्हणून, मुंजा म्हणून वा कुमारिका म्हणून जेवायला जाणे हे सर्वांत सोपं होतं!

गावी शाळेत डबा नेण्याची पद्धत नव्हती. सकाळी तीन तास आणि दुपारी तीन तास शाळा भरे. मधला वेळ सरळ घरी यायचं. नंतर माध्यमिक शाळेतसुद्धा घर एवढं जवळ होतं, की दुपारच्या वीस मिनिटांच्या मधल्या सुट्टीत दुपारचा चहा प्यायला घरी यायचो. पुढं नगरमध्ये शाळेत जायला लागल्यावर डबा हा प्रकार आयुष्यात आला. तिथं पोळी, लोणचं आणि एक भाजी हा ठरलेला मेनू असायचा. इतर मित्रांचे डबे उघडले, की मग त्यासोबत त्यांचं सगळं जगणंच नकळत समोर उलगडायचं. काही काही मित्र डबाच आणायचे नाहीत. टाइमपास करत बसायचे. ते डबा का आणत नसतील, हा प्रश्न तेव्हा पडलाच नाही. आता पोटात तुटतं! अर्थात शाळेतल्या वयात असलेला निरागसपणा अंगी होता. तेव्हा कुणीही कुणाच्याही डब्यात हात घालून सहज काहीही खाऊ शकत होता. मीही आपल्या घरी होणाऱ्या भाजीपेक्षा वेगळ्या चवीच्या भाज्या पहिल्यांदा या डब्यांतूनच चाखल्या. तिखटाची ‘गोडी’ लागली ती तिथपासून! एरवी आमच्या घरचं जेवण म्हणजे टिपिकल मध्यमवर्गीय, ब्राह्मणी आणि अळणी! पण आई त्या पदार्थांनाही अशी चव आणते, की विचारू नका. साधी फोडणीची पोळी किंवा फोडणीचा भात असू देत. मला तर वाटतं, महाराष्ट्रातील काही पिढ्याच्या पिढ्या फोडणीची पोळी वा फोडणीचा भात या ब्रेकफास्टवर लहानाच्या मोठ्या झाल्या असतील.

आईच्या हातचं खाणं हा कुठल्याही मुलासाठी 'वीक पॉइंट' असतो आणि त्या भावनेभोवतीच्या सर्व भावनोत्कट बाबी बाजूला ठेवल्या, तरी आमची पिढी घरच्या खाण्याबाबत आजच्या पिढीपेक्षा जास्त समृद्ध होती आणि म्हणूनच जास्त फिट आहे, असं आवर्जून सांगावंसं वाटतं. 

आमच्या लहानपणी गावात बेकरी नव्हतीच. तेव्हा पाव किंवा मैद्याचे अन्य पदार्थ फार उशिरा आयुष्यात आले. अगदी बिस्कीटही खाण्याची फार क्रेझ नव्हती. हे सगळं बालपण संपल्यावर, शहरात गेल्यावर मनसोक्त खायला मिळालं. मात्र, त्यामुळं घरचं सकस अन्न खाऊन लहानपणी जी सुदृढता लाभली ती आजही उपयोगी पडते आहे. आमच्या शेतात पेरूच्या झाडावर बसून, तिथले पेरू तोडून तिथंच खाण्याचं भाग्य मला व माझ्या भावंडांना लाभलं. घरच्या शेतातला गहू, ज्वारी, बाकीचा भाजीपाला खाण्याचं सुख अनुभवता आलं. खूप श्रीमंती होती असं नाही, पण कधी काही कमी पडलं नाही. खाण्या-पिण्यात तर मुळीच नाही. साधं-सुधं, पण सकस व महत्त्वाचं म्हणजे गरमागरम जेवण दोन्ही-तिन्ही वेळांना पोटात जात होतं.

संक्रांतीच्या आधी, ऐन थंडीत धुंधुरमासाचं जेवण हा एक सोहळा असायचा. सकाळी आई लवकर उठून बाजरीची भाकरी, लोणी, वांग्याचं दही कालवलेलं भरीत, तिळाची चटणी असं ताट समोर ठेवी. भावंडांत गप्पागोष्टी करता करता हे जेवण सकाळी कधी संपायचं ते कळायचंही नाही. तीच परिस्थिती भोगीची. ती भोगीची टिपिकल मिक्स भाजी घरात व्हायचीच. आमच्याकडं महालक्ष्म्या यायच्या, तेव्हाही पुरणा-वरणाचा नैवेद्य असायचाच; पण जोडीला  त्या सोळा भाज्या साग्रसंगीत घरी केल्या जायच्या. महालक्ष्मीच्या नैवेद्याचं ताट संपवणं हे एक आव्हान असायचं. घरात अनेकदा मुंजा मुलगा म्हणून मलाच नैवेद्याचं ताट मिळायचं. त्यात काहीही टाकून द्यायचं नाही, अशी अट असायची. पहिल्यांदा कंटाळा यायचा. विशेषत: पंचामृत वगैरे प्रकार भातात कालवून वगैरे शेवटी एकत्र संपवायचे हे मला अजिबात आवडायचं नाही. पण आजूबाजूचे सगळे ज्येष्ठ तसंच जेवतात, हे पाहून मीही तसंच करायला लागलो. त्या अटीमुळं एक मात्र झालं. ताट स्वच्छ करायची सवय लागली. कुठलाही पदार्थ कुरकुर न करता खायची चांगली सवयही लागली. मुळात आई सुगरण असल्यानं ती करत असलेलं काहीही आम्ही मिटक्या मारीत खायचोच आणि आजही खातो. त्यामुळं तिथं अमुक एक आवडत नाही वगैरे प्रश्नच उपस्थित व्हायचा नाही.

माझी आजी मी १८ वर्षांचा असतानाच गेली. म्हणजे तसा तिचा फार सहवास मला लाभला नाही. मात्र, तिनं तिचा सगळा वारसा तिच्या थोरल्या मुलीकडं आणि माझ्या आईकडं सोपवला होता, असं म्हणायला हरकत नाही. या तिन्ही माउल्यांनी माझं केवळ शारीरिक भरणपोषण केलं असं नाही, तर माझ्या संपूर्ण आयुष्याचा निरोगी, सुदृढ पायाही भक्कमपणे रचला. आज मी जो काही आहे, तो त्यांच्या हातचं चवीष्ट अन्न खाऊन आणि पचवून...!

---


(पूर्वप्रसिद्धी : समदा दिवाळी अंक २०२०)

--------