27 Jul 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - किक

बसते; पण उशिरा...! 
--------------------------

सलमान खानच्या प्रत्येक सिनेमात त्याला एक टर्रेबाज संवाद असतो. ‘मेरे बारे में जादा मत सोचना; दिल में आता हूँ, समझ में नहीं...’ असा सलमान सरांचा नवा डायलॉग ‘किक’ या त्यांच्या नव्या सिनेमात आहे. ठीक आहे, म्हणून सिनेमा पाहायला सुरुवात केली, तर इंटरव्हल झाला तरी सर ‘समझ में’सुद्धा आले नाहीत आणि ‘दिल में’सुद्धा! सुदैवाने उत्तरार्धात काहीशा नाट्यपूर्ण, ‘पोलिश’ आणि ‘बालिश’ वळणांमुळं कथेला ‘किक’ बसते आणि आपल्यालासुद्धा! त्यामुळंच एकूण निकालही ‘बरा, ठीकठाक’पासून ते ‘एकदा पाह्यला चांगला’पर्यंत पोचू शकतो.
मूळ याच नावाच्या तेलगू सिनेमाचा रिमेक असलेल्या ‘किक’चा प्रॉब्लेम झालाय तो नवं काय द्यायचं या गोंधळात! निर्माताही असलेला दिग्दर्शक साजिद नाडियादवालानं या वेगळेपणापायी सिनेमाच्या पूर्वार्धात अनेक प्रयोग केले आहेत. तरीही महानायकाच्या एंट्रीचा प्रसंग शेवटी अन्य सिनेमांत आहे, तसाच यातही आहे. (म्हणजे सलमानला त्याच्या ‘दबंग’गिरीतून बाहेर तर काढलं आहे; पण एका दृश्यात ‘पांडेजी’ दाखवण्याचा मोहही टाळता आलेला नाही.) तसंच आणखी एकदा संभाव्य हाणामारीचा प्रसंग असेल, असं दाखवताना प्रत्यक्षात नायकाला एकदम ‘यू टर्न’ करताना दाखवलं आहे. तर अन्य एका प्रसंगात असं काही होणार नाही, असं वाटताना सर एकदम त्यांच्या पठडीतली हाणामारी करताना दिसतात. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे नायकाचं सगळं दर्शन हे नायिकेच्या सहनायकाबरोबरच्या संवादातून (अर्थात फ्लॅशबॅकमधून) उलगडत जातं. नायकाचं हे पूर्वीचं आयुष्य फ्लॅशबॅकमध्ये दाखवणं म्हणजेच आताच्या काळात येणारा नायक वेगळ्या रूपात येणार आहे, हे आता हिंदी सिनेम पाहणारं शेंबडं पोरही सांगू शकेल. पोरावरून आठवलं, या सिनेमात एक गोग्गोड छकुली आहे. पूर्वार्धात दर्शन देऊन जाणाऱ्या या छकुलीमुळं उत्तरार्धात बऱ्यापैकी उतमात घडतो, एवढं सांगितलं तरी पुरे. या ‘ईक्यू’मुळं सिनेमाला शेवटच्या अर्ध्या तासात वेगळंच वळण लागतं आणि ‘किक’मागचं ‘प्रयोजन’ही कळतं. हे प्रयोजन साधारणतः ‘जय हो’च्या धर्तीवरच आहे. (लोकांना चांगल्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करणारं, अशा अर्थानं!) पण सलमान सरांची एकूण इमेज आणि त्याद्वारे काही चांगल्या गोष्टी, भले त्या फिल्मी पद्धतीनं का होईना, सांगण्याचा आणि त्यातून आपल्या चाहत्यांना काही धडे देण्याचा दिग्दर्शकाचा हा प्रयत्न स्तुत्यच म्हटला पाहिजे.
गोष्ट गुंतागुंतीची किंवा वेगळी करण्याच्या नादात सलमान सरांच्या टिपिकल एंटरटेन्मेंटचे फंडे दिग्दर्शक विसरलेला नाही. त्यामुळं सरांची (या गोष्टीतली) सर्व कारकीर्द अॅनिमेशनच्या रूपात आपल्या समोर झळकते. त्यातच रेस्तराँ अॅक्शन येते. अगदी सुरुवातीला एका आमदारणीच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने (गुज्जू) गाड्यांच्या पळवापळवीची कॉमेडीही होऊन जाते. नायिका शायना (जॅकलिन फर्नांडिस) एक सायकिअॅट्रिस्ट डॉक्टर आहे. (तरीही) तिच्यासोबत सरांचं एक गाणं येतं. पिताजींबरोबरचं प्रेम (विनोद खन्नाच्या तारखा मिळाल्या नसाव्यात; मिथुनवर भागवू चला!), माताजी का (अर्चना पूरणसिंह, बस्स सिर्फ नाम ही काफी है!) प्यार... (तरी नशीब, ‘गाजर का हलवा’ नाहीय) हे सगळं सगळं एकत्र पॅकेज येतं. फ्लॅशबॅक तर सुरुवातीपासून इंटरव्हलपर्यंत सुरूच आहे. नायिकेचे वडीलही (सौरभ शुक्ला) कॉमेडीचा उर्वरित कोटा पूर्ण करतात. पूर्वार्ध हा असा हसत-खेळत संपताना लक्षात येतं, हा काही सरांचा ‘वाँटेड’ ते ‘जय हो’ व्हाया ‘दबंग’ टाइपचा सिनेमा नाही. त्यामुळंच अपेक्षाभंग होतो आणि त्या पद्धतीचा फुल्ल टाइमपास सिनेमा बघायला येणाऱ्यांना ‘किक’ बसतच नाही.
उत्तरार्धात नायक (सर), सहनायक एसीपी हिमांशू त्यागी (रणदीप हुडा) आणि ऐन वेळी प्रकट होणारा तिसराच खलनायक शिव (नवाझुद्दीन सिद्दिकी) यांच्यातला पाठशिवणीचा खेळ रंगतो. तोही थेट पोलंडमध्ये. एरवीच्या युरोपीय देशांतली आणि त्याच त्या शहरांतली दृश्यं पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकांनाही या वेगळ्या (आणि कदाचित प्रमोशनल रेटमध्ये मिळालेल्या) स्थळामुळं बरंच वाटतं. तर या पोलंडमध्ये आपले सर सर्व प्रकारचा धिंगाणा घालतात. अशक्य करामती करतात, उंच बिल्डिंगीवरून उडी मारतात, डबल डेकर बस भन्नाट चालवतात (आणि लहान मुलाला घेऊन चाललेल्या एका बाईस वाचवतातही!) आणि शेवटी एका भव्य पुलावर येऊन सहनायकाची फजिती करीत ही बस स्वतःसकट नदीत पाडूनही घेतात.
शेवट तर खूपच हृदयस्पर्शी आहे. तो प्रत्यक्ष पडद्यावरच पाहायला हवा. सलमान सरांनी नेहमीप्रमाणेच याही सिनेमात जोरदार काम केलंय. (फक्त शेवटचा रिळात शर्ट न काढून त्यांनी चाहत्यांना फार नाराज केलंय.) 
जॅकलीन फर्नांडिसकडून जे अपेक्षित होतं, ते तिनं केलंय. सहनायकाच्या भूमिकेत रणदीप हुडा फिट्ट आहे. नवाझुद्दीन सिद्दिकी नेहमीच वेगळ‍ं काही तरी देण्याचा प्रयत्न करीत असतो. याही सिनेमात त्यानं एक अत्रंगी खलनायक झकास साकारला आहे. बाकी मिथुनदांना फार वाव नाही. सौरभ शुक्ला, संजय मिश्रा या ताकदीच्या कलाकारांना तर वाया घालवलंय. विपीन शर्मा, रजित कपूर, अर्चना पूरणसिंह छोट्या भूमिकांत दिसतात.
हिमेश रेशमियाचं कंठाळी संगीत आहे. त्यातली ‘जुम्मे की रात को’ हे मिकाचं आणि हँगओव्हर ही गाणी बऱ्यापैकी गाजताहेत. पण ती वाईटच आहेत. नर्गिस फाकरी एका आयटेम साँगमध्ये दर्शन देऊन जाते. तेव्हा उशिरा बसणारी ही ‘किक’ एकदा अनुभवायला हरकत नाही.
---
निर्माता : साजिद नडियादवाला
दिग्दर्शक : साजिद नडियादवाला
संगीत : हिमेश रेशमिया
पटकथा : रजत अरोरा, साजिद नडियादवाला, कीथ गोम्स, चेतन भगत
प्रमुख भूमिका : सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस, रणदीप हुडा, नवाझुद्दीन सिद्दिकी, मिथुन चक्रवर्ती, सौरभ शुक्ला इ.
कालावधी : दोन तास २६ मिनिटे
दर्जा : ***

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, २६ जुलै २०१४)
---
---

19 Jul 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - हेट स्टोरी २ (A)

हॅट... सॉरी...
---------------

‘एक उगीचच सूडकथा’ असं ‘हेट स्टोरी २’ या नव्या हिंदी चित्रपटाचं एका वाक्यात वर्णन करता येईल. मुंबई आणि गोवा या दोन स्थळांत प्रेक्षकांना अक्षरशः नाचवून त्यांच्यावर उगीचच सूड उगवणारा दिग्दर्शक विशाल पंड्या कथेतही अशा अनेक गोष्टी उगीचच करतो. शेवटी प्रेक्षकांना स्वतःला ‘उगी उगी...’ म्हणत आणि दिग्दर्शकाला ‘हॅट... सॉरी...’ असं म्हणत बाहेर पडावं लागतं. एक मात्र आहे. पहिल्या ‘हेट स्टोरी’पेक्षा हा वाईट होता, की तो याच्यापेक्षा यावर मात्र क्विझ कन्टेस्टच घ्यावी लागेल.
खरं तर पहिल्या ‘हेट स्टोरी’ला काही तरी स्टोरी तरी होती. या ‘हेट स्टोरी’ला काहीच स्टोरी नाही. त्यामुळं यात सगळं उगीचच आहे. उदा. या सिनेमाचा खलनायक मंदार म्हात्रे (सुशांतसिंग) हा एक टिपिकल राजकारणी आहे. सोनिका प्रसाद (सुरवीन चावला) ही त्याची ‘कीप’ असते. ती तशी का असते, याला काही उत्तर नाही. असते आपली उगीचच! हा मंदार म्हात्रे मुंबईतला बडा राजकारणी दाखवला आहे. मात्र, तो बहुतेक वेळा गोव्यातच असतो. सोनिका गोव्याची असते. मंदारची तिच्यावर विलक्षण दहशत असते. पण तरी ती फोटोग्राफीचा कोर्स करायला मुंबईला जाते. का? उगीचच! तिथंच तिला नायक अक्षय बेदी (जय भानुशाली) भेटतो. का? आता विचारायचं नाही. तर बिचारी नायिका नायकाला ओरडून सांगते, की मी अशी अशी आहे म्हणून. तर महात्माच जणू असलेला नायक खांदे झटकत म्हणतो, बस एवढीशी गोष्ट. रखेलच आहेस ना तू कुणाची तरी! मला वाटलं, की काही तरी सीरियस सांगतेयस म्हणून... धन्य तो नायक, धन्य ती नायिका आणि अतिधन्य तो दिग्दर्शक... मग पुढं काय होणार हे सांगायची गरज आहे का? नायक महाराज हकनाक मरतात आणि गाडीसह धरणाच्या तळाशी जातात. नायिकेला मंदार शवपेटीत बांधून ग्रेव्हयार्डमध्ये पुरून टाकतो. संपला खेळ. पण छे! आत्ता कुठं खेळ सुरू झालेला असतो... उत्तरार्धात नायिकेची सूडकथा सुरू झाल्यावर खेळ थोडा रंजक बनतोही. नक्कीच! पण मंदारच्या एकेका साथीदाराला यमसदनी पाठवताना नायिका वापरत असलेल्या युक्त्यांमध्येही फार काही नावीन्य नसल्यानं शेवट काय होणार हे कळून चुकतं. नाही म्हणायला मंदारच्या काकाला मारायच्या वेळी एक ट्विस्ट येतो आणि तो नायिकेवरच उलटतो हेही चांगलं जमलंय. मात्र, नंतर मंदार नायिकेला किती घाबरतो हे दाखवण्यात दहा मिनिटं गेल्यानं आणि नायिकेचा प्रियकर सारखा (पांढुरक्या पार्श्वभूमीतून) प्रकट होऊन नायिकेसोबत गाणं वगैरे म्हणत बसल्यानं शेवटाबद्दलची उत्सुकता पार नाहीशी होते. शेवटी एकदाची नायिका मंदारला मारते आणि खेळ संपतो...
‘हेट स्टोरी’सारख्या सिनेमाला चांगल्या मजबूत कथेची आणि पटकथेची गरज होती. इथं कथेनंच मार खाल्ला आहे. पटकथाही संकलनाच्या वेड्यावाकड्या प्रयोगांत पार भरकटत गेली आहे. गोष्ट मुंबईत घडतेय की गोव्यात या कोड्यानं प्रेक्षक इतका गोंधळून जातो, की नंतर नंतर त्याचा विचारच करायचं सोडतो. अख्ख्या सिनेमात एकदा फक्त गोवा अशी पाटी येते. बाकी सर्व मामला दिग्दर्शकानं आणि संकलकानं आपल्या सोयीनुसार घेतला आहे. गोष्ट इतक्या वेळा फ्लॅशबॅकमध्ये जाते आणि परत आत्ताच्या काळात येते, की त्याचं व्यवधान सांभाळण्यातच प्रेक्षक बेजार होऊन जातो. नायिकेसोबत आपणही (दिग्दर्शकाबाबत) सूडाच्या विचारानं पेटून उठतो, हे या चित्रपटाच्या संकलनाचं मोठंच यश मानलं पाहिजे. माधुरी बॅनर्जी यांच्या पटकथेतही अनेक कच्चे दुवे राहिले आहेत. सोनिकाची आजी गोव्यात असते की मुंबईत? ती एकाच प्रसंगात दर्शन देऊन जाते. सगळं काही उगाचच आहे. अतुल म्हात्रे या खलनायकाच्या भावाचा किंचित ट्विस्ट सोडला, तर बाकी कशाचीच तर्कसंगती लागत नाही. गोव्यातल्या इन्स्पेक्टर वर्गीसचं पात्रही असंच सोयिस्कर वापरलं आहे. तोही घटकेत गोव्यात, तर घटकेत मुंबईत हजेरी लावून जातो. सिनेमाच्या सुरुवातीलाच येणारा ग्रेव्हयार्डचा आणि नंतर हॉस्पिटलमधून नायिका पळून जाते तो, हे दोन्ही प्रसंग इतके अतर्क्य झाले आहेत, की त्यावरच आधारित पुढचा सगळा डोलारा अविश्वसनीय वाटू लागतो. नायिकेच्या सूडाबद्दल प्रेक्षकाला सहानुभूती वाटायला हवी. इथं नायिकेपेक्षा मंदार म्हात्रेच्या बायकोबद्दल जास्त सहानुभूती वाटते, याला काय म्हणावं?
 सिनेमातले संवाद मात्र खटकेबाज आहेत. विशेषतः खलनायकाच्या तोंडी असलेले ‘बाबा कहते थे...’ या प्रस्तावनेनं सुरू होणारे काही वनलायनर भारी आहेत. (ते ॲडल्ट असल्यानं इथं सांगता येत नाहीत...) अभिनयात सर्वांत भाव खाऊन जातो तो खलनायक मंदार म्हात्रे साकारणारा सुशांतसिंग. बऱ्याच दिवसांनी त्याला तोलामोलाची भूमिका मिळाली आहे आणि त्यानं ती झकास केली आहे. नायिका सुरवीन चावला हिनंही चांगलं काम केलं आहे. मात्र, तिची संवादफेक आणि बहुतांश वेळा झोपाळलेला दिसणारा चेहरा या नकारात्मक बाजू आहेत. (बाकी या सिनेमात तिला मुख्य काम जे करायचं होतं, ते तिनं व्यवस्थितच केलं आहे.) तरी पहिल्या ‘हेट स्टोरी’च्या तुलनेत यात ‘तशी’ दृश्यं कमीच आहेत. (की आता आपली नजर सरावलीय, कोण जाणे.) जय भानुशालीनंही चांगलं काम केलंय. पण त्याला फार वाव नाही. आपला शशांक शेंडे काकाच्या भूमिकेत दमदार हजेरी लावून जातो. सिनेमाचं संगीत चांगलंय. विशेषतः ‘आज फिर तुम पे प्यार आया है’ हे ‘दयावान’मधलं गाणं रिमेक म्हणून वापरलं आहे आणि त्यानं चांगलीच हवा केलीय. (त्याचं पिक्चरायझेशनही गरजूंची अपेक्षापूर्ती करणारं असंच आहे.) सनीताई लिऑन यांचं ‘पिंक लिप्स’ हे आयटेम साँग म्हणजे आइसिंग ऑन द केक! तेव्हा एकदा पाहायला हरकत नाही. अगदी नंतर हॅट आणि सॉरी म्हणायचं असलं तरी!
--
निर्माते : भूषणकुमार, विक्रम भट्ट
दिग्दर्शक : विशाल पंड्या
पटकथा : माधुरी बॅनर्जी
प्रमुख भूमिका : सुरवीन चावला, जय भानुशाली, सुशांतसिंग, शशांक शेंडे इ.
कालावधी : दोन तास नऊ मिनिटे
दर्जा : ** १/२
---




-----------------------------------------------------------------------------------

21 Jun 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - हमशकल्स

आचरटपणाची ‘नऊ’लाई
-------------------------------
स्वतःवर हसण्यासाठी मनाचा दिलदारपणा, खेळकरपणा आणि चांगली विनोदबुद्धी असावी लागते. साजिद खानकडं ती असावी, अशी शंका घेण्यास वाव ठेवणारी काही अपवादात्मक दृश्यं ‘हमशकल्स’मध्ये आहेत. उदा. एका दृश्यात वेड्यांच्या जेलचा जेलर सतीश शाह समोर बांधून ठेवलेल्या सैफ आणि रितेशला सांगतो, की मी तुम्हाला जगातील सर्वांत भयानक टॉर्चर करणार आहे. मागे हिटलरपासून सद्दाम, गडाफी ते किम जोंगपर्यंत सर्व ‘दुष्ट’ हुकूमशहांचे फोटो आदर्श म्हणून लावलेले असतात. आणि अचानक समोर येतो एक टीव्ही. मग सतीश शाह म्हणतो, की आता तुम्हाला पाहावा लागणार आहे साजिद खानचा ‘हिम्मतवाला’... आणि ते हात-पाय-तोंड बांधलेले दोन कैदी जिवाच्या आकांताने सुटण्याची धडपड करू लागतात... यावर हाइट म्हणजे एंड स्क्रोलला हेच दृश्य पुन्हा येतं आणि त्यात सतीश शाह म्हणतो, तुम्हाला पाहावा लागणार आहे (साजिदची बहीण) फराह खानचा ‘तीसमार खान’...
अशा काही दृश्यांमुळे ‘हमशकल्स’ पाहताना नक्कीच गंमत येते. किशोरकुमार, जिम केरी आणि पीटर सेलर्ससारख्या कॉमेडीतील महान कलावंतांना हा सिनेमा अर्पण केला आहे, असं साजिद खान सुरुवातीला म्हणतो. आपल्याला शहाणपण द्यायला देव विसरला आहे, हेही सुरुवातीलाच कबूल करतो. (प्रेक्षकांनी ही गोष्टही गमतीने घ्यावी, अशीच त्याची स्वाभाविक इच्छा असणार...) पण पुढे १६० मिनिटे ‘हमशकल्स’च्या नावाखाली तीन तीन जोड्यांचा धुमाकूळ घालून साजिद खाननं केवळ प्रेक्षकांचाच नाही, तर सुरुवातीला नावं घेतलेल्या सर्व महान कलावंतांचा घोर अपमानच केलेला आहे. त्यामुळं पुढच्या सिनेमात त्याला ‘हिम्मतवाला’च्या जागी ‘हमशकल्स’चं नाव घालावं लागणार आहे, यात शंका नाही.
मॅड कॉमेडी म्हणजे वेचक आणि वेधक पाचकळ विनोद, छचोरपणा दर्शविणारे कायिक विक्षेप आणि जोडीला तर्कबुद्धी खुंटीला टांगून ठेवायला लावणारे कथानक अशी काहीशी साजिद खानची समजूत झालेली दिसते. दोन सारख्या दिसणाऱ्या जोड्या, त्यातील एक शहाणी, हिरो वगैरे आणि दुसरी वेडी, सहानुभूती मिळवणारी... हे प्रकार आपण शेकडो वेळा पाहिले आहेत. त्यात साजिदनं नावीन्य काय आणलं, तर आणखी एक जोडी पैदा केली. जोडीला खलनायकाचाही तिहेरी रोल हवाच. त्यामुळं एकूण नऊ पात्रांच्या माध्यमातून विनोदाचा महापूर आणून दाखवतो, अशी पैज त्यानं मारलेली दिसते. प्रत्यक्षात झालंय असं, की या नऊ पात्रांनी आचरटपणाची एवढी चढाओढ लावली आहे, की या सर्व सर्कशीला फार तर आचरटपणाची ‘नऊ’लाई असं म्हणता येईल. या आचरटपणाचं एकच उदाहरण दिलं तरी पुरेसं आहे. यात सैफची कंपनी हडप करण्यासाठी त्याचा ‘कंस’मामा आपल्या एका शास्त्रज्ञ मित्राला काही तरी करायला सांगतो. तर हा शहाणा डॉक्टर एक असं औषध तयार करतो, की ते पाण्यात घालून प्यायल्यावर माणूस २४ तास कुत्रा होतो...! पुन्हा ऐका, चक्क कुत्रा होतो!! 
 आता एवढं सांगितल्यावर साधारणतः या सिनेमातील विनोदाची जातकुळी आणि एकूण पातळी लक्षात येईल. मॅड कॉमेडी म्हणजे वेड्यासारखं हसू येईल अशी कॉमेडी! कथेतील पात्रं अनाहूतपणाने किंवा प्रसंगवशात काही तरी चुकीचं (थोडक्यात वेड्यासारखं) करतात आणि त्यातून जो काही गोंधळ उडतो अन् पाहणाऱ्याला मजा येते ती दाखवणारी कॉमेडी म्हणजे मॅड कॉमेडी. मग त्यात विक्षेप आले, तरी ते पात्रांवर गुदरलेल्या प्रसंगामुळे निर्माण झालेले असावेत. इथं मॅड कॉमेडी म्हणजे वेड्यासारखी किंवा खुद्द वेड्यानं केलेली कॉमेडी असा काहीसा अर्थ दिग्दर्शकानं घेतलेला दिसतो. त्यामुळं त्यानं या चक्क वेड लागलेली पात्रंच घेतली आहेत. अशा सिनेमांत पुरुष पात्रांनी स्त्रियांचं सोंग घेऊन आचरट चाळे केलेच पाहिजेत... अशा सिनेमांत ‘गे’सदृश पात्रं आणि त्यांच्या ओठांची ती विविक्षित हालचाल आणि कंबर हलवणं असलंच पाहिजे, ना! नाही तर ‘फाउल’ धरला जाईल. तथाकथित ‘कुत्री’ झाल्यावर सैफ आणि रितेश जे काही करतात, त्याला विनोद म्हणायचं असेल, तर या विनोदावर प्रेक्षकांनीही तंगडी वर केल्यास साजिदला राग येण्याचं कारण नाही. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे कथेला प्रेक्षकांशी जोडणारा काही तरी प्रयोजनात्मक धागा हवा की नको? प्रेक्षकांनी त्या गोष्टीत गुंतून पडण्यासारखं काही तरी सत्त्व त्यात हवं ना! अगदी मॅड कॉमेडी झाली तरी ती प्रयोजनानं युक्त असतेच. असावी. साजिदनं ज्या महान कलावंतांची नावं घेतली आहेत त्यांच्या कलाकृतीतील हा सर्वांत महत्त्वाचा भाग तो विसरला. की सोयिस्करपणे त्यानं तिकडं डोळेझाक केली?
माणसाच्या जगण्यात त्याच्या वागण्याच्या, स्वभावाच्या विसंगती भरपूर आढळतात. सर्वांनाच कुठलं तरी एक लक्ष्य गाठायचं असतं. त्या प्रवासात या विसंगतींमुळं कधी अडचणी निर्माण होतात आणि कधी त्यातून हास्यनिर्मिती होते. असा विनोद टिपायचा तर मूलतः जगण्याकडं खूप उदार, सहृदय दृष्टीनं पाहता यायला हवं. विसंगतींची संगती लावता यायला हवी. ती सुसूत्रपणे कथेत गुंफता यायला हवी आणि या कथेला दर्जेदार विनोदाचं गोड वेष्टण बांधून ती प्रेक्षकांसमोर सादर करता यायला हवी. हे काम निःसंशय सोपं नाही. अनेकांना ते जमत नाही. पण मग किमान मोठमोठ्या लोकांची नावं तरी घेऊ नयेत, एवढंच आमचं म्हणणं!
एका गोष्टीचं श्रेय मात्र साजिदला द्यावं लागेल. त्यानं सिनेमाची एक विशिष्ट पातळी शेवटपर्यंत राखली आहे. तो वरही जात नाही आणि (आणखी खाली जाता येत नाही, म्हणून) खालीही जात नाही! असो.
सैफ अली खान आणि रितेश देशमुख या दोघांनीही आपापल्या परीनं भरपूर अंगमेहनत केली आहे. पण आपल्याला कॉमेडीचा कंटाळा आला आहे, असं रितेशनंच कुठं तरी मुलाखतीत सांगितलं आहे. (एका अर्थाने प्रेक्षक आणि तोही सुटला बिचारा!) मात्र, हा कंटाळा त्यानं पडद्यावर येऊ दिलेला नाही. राम कपूर हे या सिनेमातलं सरप्राइझ पॅकेज आहे. रामनं तिन्ही भूमिका ज्या पद्धतीनं साकारल्या आहेत, त्याला तोड नाही. विशेषतः शिंक आली की समोरच्या माणसावर हल्ला करणारा आणि लॉलीपॉप दिला, की शांत होणारा वेडा जॉनी त्यानं अफलातून रंगवला आहे. हेच पात्र सर्वाधिक हशे वसूल करतं. बिपाशा बसू, तमन्ना आणि ईशा गुप्ता यांना नायकांच्या जोडीनं वावरण्याचं आणि भरपूर अंगप्रत्यंगदर्शनाचं काम आहे. ते तिघींनीही चोख बजावलं आहे. विशेषतः तिघींमधली ‘ज्येष्ठ महिला’ बिपाशाच सर्वांत हॉट दिसते. पण तिची रितेशबरोबर जोडी काही तरीच! असो.
 तेव्हा लाल फ्रॉकमधल्या आणि ‘९६, ८४, ९६’ असे व्हायटल स्टॅट्स असलेल्या राम कपूरचा दुसऱ्या (पुरुष) राम कपूरबरोबरचा रोमान्स (विनोद म्हणूनसुद्धा) आवडत असेल, तर ‘हमशकल्स’ फक्त तुमच्यासाठीच तयार झाला आहे, असं समजून बिनधास्त जा...
--
निर्माते : वाशू भगनानी
दिग्दर्शक : साजिद खान
संगीत : साजिद अली-वाजिद अली, हिमेश रेशमिया
प्रमुख भूमिका : सैफ अली खान, रितेश देशमुख, राम कपूर, बिपाशा बसू, तमन्ना, ईशा गुप्ता, सतीश शाह, चंकी पांडे
दर्जा : **
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, २१ जून २०१४)
---

31 May 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - सिटीलाइट्स

‘शहर’ नावाचा चक्रव्यूह
-----------------------------

 
दूर राजस्थानातून मुंबईसारख्या महानगराच्या चक्रव्यूहात शिरणाऱ्या एका ‘अभिमन्यू’ची एक अत्यंत संवेदनशील, तरीही रंजक कथा दिग्दर्शक हंसल मेहतानं ‘सिटीलाइट्स’च्या रूपानं सादर केली आहे. शॉन एलिसच्या ‘मेट्रो मनिला’ या सिनेमावर ‘सिटीलाइट्स’ आधारित आहे. (म्हणजे रीतसर फ्रेम टु फ्रेम रिमेक आहे.) गोष्टीचं रंजनमूल्य कायम ठेवून, पात्रांच्या अंतःकरणातले सर्व पापुद्रे सोलवटून दाखवण्याची किमया दिग्दर्शकानं यात साधली आहे. गोष्टीतलं मध्यवर्ती सूत्र व्यक्तिकेंद्री ठेवूनही तिला प्रतीकात्मक, व्यापक आशय देण्यात मेहता यशस्वी झाले आहेत. त्यामुळंच काही त्रुटी असल्या, तरी ‘सिटीलाइ्टस’ हा मेंदूला खाद्य देणारा एक सुखद अनुभव ठरतो.
जगात सर्वच ग्रामीण भागातून शहरांकडे, कमी विकसित भागाकडून विकसित महानगरांकडे नागरिकांचा लोंढा वाहत असतो. हे स्थलांतर सोपं नसतं. एक आख्खी पिढी, एक संस्कृती यात खर्ची पडत असते. त्या स्थलांतराची वेळ आलेल्या व्यक्तिविशेषांवर तर फारच बिकट प्रसंग आलेला असतो. एखादं जुनं झाड मुळासकट उपटून दुसरीकडं रुजवण्याचा प्रयत्न करण्याएवढंच हे अवघड असतं. हा संघर्ष अस्सल असतो; त्या त्या पिढीच्या मूल्यांची, नीतिमत्तेची, तत्त्वनिष्ठेची परीक्षा पाहणारा असतो. पोटात आग पडलेली असताना, डोक्यावर छत नसताना, कुठलाच आसरा नसताना जगणं टिकवायचं असतं. त्यासोबत जन्मापासून आलेल्या सर्व रुढी-परंपरांची, तथाकथित प्रतिष्ठेची बूजही राखायची असते. हा सनातन झगडा ज्यांच्या वाट्याला येतो, त्यांची त्यात पार होरपळ होते. शहर नावाच्या चक्रव्यूहात अनेक जण शिरतात. पण त्यातून बाहेर पडणं त्यांना कधीच जमत नाही. अशी हजारो, लाखो माणसं गिळून, त्यांचं ‘शहरवासीय’ नावाच्या एका बिनचेहऱ्याच्या महान गर्दीत रूपांतर करण्याचं काम ‘महानगर’ नावाची चेटकीण वर्षानुवर्षं करीत आली आहे. तिचा हा भेसूर चेहरा सर्वांनाच दिसतो; पण आपला चेहरा नाहीसा झाल्यानं तो दिसूनही काहीच करता येत नाही. तिला शरण जाऊन, पोटासाठी तिच्याच पोटात आश्रय घेऊन, जगणं धुंडाळायची पाळी सर्वांवर येते.
हा संघर्ष अनेक प्रतिभावंतांना प्रेरणा देत आला आहे. २०१३ मध्ये आलेल्या शॉन एलिसच्या ‘मेट्रो मनिला’त (फिलिपिन्सच्या राजधानीसाठी रूढ असलेला शब्द म्हणजे ‘मेट्रो मनिला’) हा संघर्ष दिसतो. हंसल मेहतानं त्याला भारतीय रूपडं देऊन ‘सिटीलाइट्स’ सादर केला आहे. तिथला ऑस्कर रामीरेझ इथं राजस्थानातला दीपकसिंह (राजकुमार राव) झाला आहे. माई रामीरेझ इथं राखी (पत्रलेखा) झाली आहे. तिथला आँग इथं विष्णू (मानव कौल) झाला आहे. कर्जाच्या विळख्यात बुडालेल्या दीपकचं दुकान जप्त होतं. त्यामुळं पोटापाण्यासाठी महानगरी मुंबईचा रस्ता धरण्याचा निर्णय तो घेतो आणि बायको व मुलीसह मुंबईत येतो. दाखल झालेल्या दीपकला शहरातील फसवणुकीचा फटका प्रारंभीच बसतो. अखेर त्याला एका खासगी सिक्युरिटी कंपनीत विष्णूच्या मदतीनं नोकरी लागते. या विष्णूला एका कामासाठी हवा असाच माणूस दीपकच्या रूपानं मिळतो. काय असतं त्याचं काम? राखी काय करते? या कुटुंबाचं पुढं काय होतं, हे प्रत्यक्षच पाहायला हवं.
हंसल मेहतांनी हा संघर्ष चांगला रंगवला असला, तरी दोन तासांच्या या सिनेमात काही क्षण कंटाळवाणे येतात. विशेषत: पूर्वार्धात. मुंबईत आल्यानंतर ज्या पद्धतीनं हे कुटुंब फसतं आणि स्वतःचे सर्व पैसे घालवून बसतं, ते पटत नाही. उलट शहरी माणसांपेक्षा ग्रामीण भागातील माणसं अधिक चतुर असतात. त्यांच्याकडं व्यावहारिक शहाणपण अधिक असतं. पण एखाद्या परदेशी सिनेमाची कथा ‘जशीच्या तशी’ सादर करताना हे दुवे दिग्दर्शकाकडून निसटले असावेत. शिवाय दीपकला आपली पत्नी डान्सबारमध्ये कामाला जाते, हे आधी कसं कळत नाही? तो स्वतः विष्णूबरोबर जेव्हा तिथं जातो तेव्हाच त्याला हे कळतं. हेही पटत नाही. कारण त्याआधी एकदा त्यानं पत्नीला ‘पैसे कुठून आणलेस,’ असं विचारलेलं असतं. त्यावर ती रडते आणि तो प्रसंग तिथंच संपतो. शिवाय क्लायमॅक्स अगदीच अतर्क्य नसला, तरी ‘फिल्मी’ आहे. तोपर्यंत कथेनं राखलेलं एक जिवंतपण, सच्चेपण या शेवटामुळं मार खातं, असं वाटून जातं. शिवाय या सिनेमाच्या ‘लूक’मध्येही प्रॉब्लेम आहे. अनेक फ्रेममधील लाइट आणि एकूणच त्या फ्रेमची रचना मार खाणारी झाली आहे.

या त्रुटी असल्या, तरी राजकुमार राव या अभिनेत्यासाठी हा सिनेमा पाहावा. यापूर्वी राव-मेहता जोडीनं ‘शाहिद’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेला आहेच. या सिनेमातही राजकुमार रावनं कमाल केली आहे. दीपकसिंहची भूमिका त्यानं खूपच तन्मयतेनं साकारली आहे. कर्जात बुडालेला, कुटुंबाची काळजी असलेला, सुरुवातीला सदैव खांदे पाडून चालणारा, नंतर सूडाच्या भावनेनं पेटून उठलेला असा दीपक रावनं जबरदस्त उभा केला आहे. पत्रलेखा या नवोदित अभिनेत्रीचं कामही उल्लेखनीय. विशेषतः डान्सबारमध्ये नोकरी मागायला जाण्याचा प्रसंग आणि मोबाइलवरील गाण्यावर नृत्य करायला लागण्याचा करुण प्रसंग तिनं फारच प्रभावीपणे साकारला आहे. हल्ली हिंदी सिनेमांत नायक-नायिकांची शारीर जवळीक अफाट असते आणि याही सिनेमात सुरुवातीलाच तो प्रसंग दाखवून दिग्दर्शकानं आपला एक ‘केआरए’ पूर्ण केला आहे. पत्रलेखाही या रोमँटिक चुंबनदृश्यात अत्यंत सहजरीत्या वावरली आहे. असो. या सिनेमातलं खरं सरप्राइज पॅकेज ठरला आहे तो मानव कौल. दीपकला नोकरी देणाऱ्या विष्णू या सुपरवायझर सिक्युरिटी ऑफिसरच्या भूमिकेत मानवला खूपच फुटेज मिळालं आहे आणि त्यानंही हा रोल चांगला साकारला आहे. नायकाचा मित्र ते (जवळपास) खलनायक अशी चांगली रेंज त्याला मिळाली आहे.
सिनेमाला संगीत जित गांगुली यांचं संगीत आहे. ‘सोने दो’ हे गाणं लक्षात राहतं. बाकीचीही गाणी चांगली असली, तरी ती अनेकदा मध्येच येऊन रसभंग करतात. त्यांचं प्रमाण कमी ठेवायला हवं होतं.
एक चांगली गोष्ट म्हणजे, परकीय सिनेमावरून थेट ढापण्यापेक्षा भट्ट मंडळींनी ‘मेट्रो मनिला’चे रीतसर हक्क घेऊन आणि सिनेमाच्या नामावलीत मूळ सिनेमाचं श्रेय देऊन प्रेक्षकांप्रती पुरेशी पारदर्शकता राखली आहे.
थोडक्यात, एक वेगळा, डोक्याला झिणझिण्या आणणारा अनुभव घ्यायचा असल्यास या सिनेमाच्या वाट्याला जावं. ज्यांनी ‘मेट्रो मनिला’ पूर्वीच पाहिला आहे, त्यांनीही किमान राजकुमारसाठी एकदा हा सिनेमा पाहायला हरकत नाही.
---
निर्माता : मुकेश भट्ट
दिग्दर्शक : हंसल मेहता
पटकथा : रितेश शाह
संगीत : जित गांगुली
प्रमुख कलाकार : राजकुमार राव, पत्रलेखा, मानव कौल
कालावधी : दोन तास सहा मिनिटे
दर्जा : *** १/२
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, ३१ मे २०१४)
---

3 May 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - सलाम

साध्या-सच्च्या जगण्याचा कानमंत्र
 ---------------------------------------------------------------------
 किरण यज्ञोपवीतच्या कलाकृती दर वेळी आपल्याला जगण्याविषयीचं एक नवं भान देऊन जातात. म्हणजे त्या खूप काही वेगळं, या जगाबाहेरचं, अतर्क्य सांगतात असं नाही. उलट आपल्याच मातीतून रुजलेल्या, ज्यावर आपला पिंड घडला आहे, पोसला आहे अशा साध्या-सोप्या मूल्यांची आठवण करून देतात. ही मूल्यं आपण सध्या वेगानं विसरत चाललो आहोत, म्हणूनच त्यांची आठवण मनात पुन्हा जागवणाऱ्या या कलाकृतींचं मोल अधिक! या दिग्दर्शकाच्या ‘ताऱ्यांचं बेट’ किंवा ‘सुखान्त’ यासारख्या कलाकृती पाहिल्या म्हणजे याची कल्पना येते. आता किरणनं ‘सलाम’ या आपल्या नव्या सिनेमाद्वारे मैत्रीसारख्या चिरंतन नात्याचा नवा अर्थ उलगडून सांगितला आहे. पोलिस आणि लष्करात काम करणाऱ्या दोन तरुणांची दोन मुलं सिनेमाचे नायक असल्यानं त्यांच्या गोष्टीला या दोन मिती आपसूकच लाभल्या आहेत. या अनोख्या नात्यांच्या गोष्टीला गावाचं, शेताचं, नदीचं आणि हिरव्यागार निसर्गाचं डौलदार नेपथ्य असल्यानं गोष्ट केवळ प्रशंसनीयच नव्हे, तर प्रेक्षणीयही झाली आहे.
‘सलाम’ ही गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडू शकते, घडलेली असतेच. अल्लड बालपण संपून आपण किंचित मोठे झालो, की आपल्याला आजूबाजूचं जग दिसायला लागतं. घर नावाच्या छोटेखानी, सुरक्षित, ऊबदार घरट्यातून आपण जगाच्या उघड्या आकाशात उडायला बघतो, तेव्हा गांगरून, बावरून जायला होतं. घरातल्या मूल्यव्यवस्थेला जग धडका द्यायला लागतं. प्रश्न पडू लागतात. स्पर्धा उभी ठाकते. जगण्यातून तरण्याची आणि तरून टिकण्याची दुर्दम्य इच्छा जन्म घेते. संघर्ष सुरू होतो. पडत-धडपडत-लढत ही अपरिहार्य लढाई आपण लढू लागतो... अशा वेळी आपल्या माता-पित्यांनी आपल्यावर केलेले संस्कारच बळ देतात. उभं राहायला मदत करतात. ‘सलाम’चे नायक रघू आणि सदा यांच्या आयुष्यातही हीच वेळ आली आहे. त्यातही गोष्टीचा फोकस रघूच्या जगण्यावर अधिक आहे. रघूच्या डोळ्यांतूनच आपण ही सगळी गोष्ट पाहतो. सातवीत असलेला रघू (विवेक चाबूकस्वार) आणि त्याचा मित्र सदा (अभिषेक भराटे) यांचं मौजे पारगाव हे गाव पोलिस आणि लष्करातल्या लोकांचं. घरटी एक तरी माणूस पोलिसांत किंवा लष्करात आहेच. रघूचे वडील शंकर पालकर (गिरीश कुलकर्णी) मुंबई पोलिसांत असतात, तर सदाचे वडील लष्करात जवान. रघू आणि सदाच्या मित्रांचा एक ग्रुप आहे. त्यांच्यात सदैव पोलिसांपेक्षा मिलिटरी कशी भारी, याची चर्चा रंगलेली असते. रघूच्या मनात कायम आपल्याच वडिलांच्या पेशाविषयी न्यूनगंड भरलेला असतो. एकदा त्याचे वडील सुट्टीत घरी येतात. रघू त्यांना आपल्या शंका विचारतो. तेव्हा, कुठलाही पेशा लहान किंवा मोठा (भारी) नसतो, अशी समजूत त्याचे वडील काढतात. त्यानंतर रघूच्या शाळेत मुख्याध्यापक चौखुरे (किशोर कदम) गरजू विद्यार्थ्यांसाठी एक जनाधार निधी गोळा करण्याचा कार्यक्रम जाहीर करतात. रघू आणि सदा दोघेही हिरिरीनं या कामाला लागतात. मात्र, काही कारणांनी त्यांच्यात ‘स्पर्धा’ निर्माण होते. पुढं आणखी एका गंभीर प्रसंगानं सर्वच गोष्टीला कलाटणी मिळते... रघू आणि सदाच्या मैत्रीची परीक्षा पाहिली जाते... त्यात नक्की काय होतं, हे पडद्यावरच पाहणं इष्ट.
‘सलाम’मधून आपल्याला नक्की काय सांगायचंय, हे दिग्दर्शकाच्या डोक्यात स्पष्ट आहे. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठेही प्रचारकी न होता, तो आपल्याला या हरवत चाललेल्या मूल्यांची आठवण करून देतो. गाव, निसर्ग, तिथली साधी-भोळी माणसं यांच्या माध्यमातून तो आपले मुद्दे ठसवत राहतो. अशा प्रकारची हाताळणी आपण माजिदी किंवा अन्य इराणी दिग्दर्शकांच्या सिनेमांतून पाहिली आहे. अर्थात ‘सलाम’ला खास गावरान मराठी वातावरणाचा आणि मराठी मातीचा स्पर्श आहेच! याशिवाय किरणचे संवाद थेट भिडणारे असतात. तेही आपल्या रोजच्या जगण्यातूनच आलेले असल्यानं अधिक जिवंत, अधिक खरे वाटतात.
सदा आणि रघूच्या पात्रांसोबतच गिरीश कुलकर्णीने रंगवलेले रघूचे वडील म्हणजे या सिनेमाचे सूत्रधार म्हणायला हवेत. (दिग्दर्शकानं ‘प्रिन्सिपल रोल’ असा नेमका शब्द वापरला आहे.) गिरीशच्या वडिलांच्या तोंडी त्यांच्या जगण्याची सर्व मूल्यव्यवस्था येते. गिरीशनं ही छोटीशीच, पण अत्यंत महत्त्वाची भूमिका फार सुंदर केली आहे. त्यात त्यानं प्राण ओतल्यानं सर्व सिनेमा तोलून धरणारी ‘बॅकबोन’ अशी ही भूमिका ठरली आहे. याशिवाय नंदप्पा (शशांक शेंडे) हे पात्रही असंच सूचक आहे. गावापासून अलिप्त राहणारा, पण सर्वांवर लक्ष ठेवणारा हा नंदप्पा म्हणजे आपल्या बदलत चाललेल्या संस्कृतीचा मूक निषेध करणाऱ्या मोठ्या समुदायाचं प्रतीकच वाटतो. याशिवाय यातील पोस्टमन, मुख्याध्यापक, नाटकाची तालीम घेणारे सर किंवा जनाई किंवा बबन किंवा मधूकाका अशा छोट्या छोट्या व्यक्तिरेखांनाही दिग्दर्शकानं पुरेशी स्पेस देऊन, त्या प्रेक्षकांच्या मनावर व्यवस्थित ठसविल्या आहेत.
विवेक चाबूकस्वार या छोट्या नायकाचं तर करावं तेवढं कौतुक कमीच. त्यानं रघूच्या भूमिकेत खूप समज दाखवली आहे. या वयातल्या मुलांचं संभ्रमित जगणं, नंतर एकदा उद्दिष्ट सापडल्यावर जिद्दीनं त्यात उडी घेणं हे सगळं त्यानं अचूक पकडलं आहे. अभिषेक आणि अन्य मुलांनीही छान कामं करून त्याला चांगली साथ दिली आहे. ज्योती चांदेकर आणि अतिशा नाईक यांनीही आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत. संजय खापरे, किशोर कदम, प्रवीण तरडे यांनीही आपापल्या कामांत मजा आणली आहे. राहुल रानडेंचं संगीत आणि विशेषतः पार्श्वसंगीत या गोष्टीतल्या मोक्याच्या आणि महत्त्वाच्या जागा फार छान अधोरेखित करतं. अभिजित अब्देच्या कॅमेऱ्यानं गावातला निसर्ग आणि तिथलं स्वच्छ, नितळ जीवन सुंदर टिपलंय.
तेव्हा, कृत्रिम, बनावट जगण्याचे मुखवटे फेकून आपला आतला निर्मळ, झऱ्यासारखा स्वच्छ चेहरा पाहायला आणि या शोधाबद्दल दिग्दर्शकाला सलाम करायला ‘सलाम’ पाहायलाच हवा.
---
निर्माता : डॉ. गौरव सोमाणी
कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शक : किरण यज्ञोपवीत
संगीत व पार्श्वसंगीत : राहुल रानडे
सिनेमॅटोग्राफी : अभिजित अब्दे
प्रमुख भूमिका : विवेक चाबूकस्वार, गिरीश कुलकर्णी, अतिशा नाईक, ज्योती चांदेकर, संजय खापरे, किशोर कदम इ.
कालावधी : एक तास ५७ मिनिटे
दर्जा - *** १/२
---
(पूर्वप्रसिद्धी - मटा, पुणे - ३ मे २०१४)
---

24 Feb 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - हायवे


प्रेमाच्या जगाकडं नेणारा महामार्ग
---------------------------------------------------------------


 माणसाचं आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे. आपलं रोजचं जगणं म्हणजे या प्रवासाचा रस्ता. कुणाच्या नशिबात सुंदर, गुळगुळीत महामार्ग येतो, तर कुणाच्या नशिबी नुसते खाचखळगे. प्रत्येकाचं नशीब सारखं नसतं, त्यामुळं प्रत्येकाच्या आयुष्याचा रस्ताही सारखा नसतो. माणसाच्या आयुष्यातले सुखाचे क्षण म्हणजे या रस्त्यावरची हिरवाई. त्याचं दुःख म्हणजे या रस्त्यावरचे कठीण चढणीचे अवघड घाट. इतर प्राणी आणि माणूस यांच्यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे तहान, भूक, झोप, मैथुन, उत्सर्जन या मूलभूत गरजा भागल्या, की माणसाचा माणूसपणाकडचा प्रवास सुरू होतो. माणूस विचार करू शकतो, हसू शकतो, रडू शकतो, भावना व्यक्त करू शकतो. माणसाच्या माणूसपणाकडच्या प्रवासात या सर्व अभिव्यक्तींचे मुक्काम कधी ना कधी तरी येतात. यातही माणसाला अनिवार ओढ असते ती प्रेमाची, मायेची. कुठलीही अपेक्षा न ठेवता केल्या जाणाऱ्या निर्व्याज, मनःपूत प्रेमाची. ही साधी अपेक्षाही अनेकदा पूर्ण होत नाही आणि या प्रेमाऐवजी वाट्याला येते ती फसवणूक... शिवाय शोषण आणि दमन. वरकरणी नशिबानं सर्व काही बहाल केलंय, पण तरीही हाती काहीच गवसत नाही आणि दुसरीकडं फाटक्या दिसणाऱ्या नशिबाच्या खाली अनिवार प्रेमाचा खळाळता झरा. अशी दोन नशिबं चुकून एखाद्या चौकात भेटली आणि त्यांनी बरोबर प्रवास करायचा, असं ठरवलं तर...?
...तर इम्तियाज अली दिग्दर्शित 'हायवे' हा सिनेमा तयार होतो. हो, हायवे या आपल्या नव्या हिंदी सिनेमात अलीनं हेच तर सांगितलंय. अपहरणाची गोष्ट आणि रोड मूव्हीचा मसाला घालून त्यानं हा दोन आयुष्यांचा प्रवास नितांतसुंदर मांडलाय. माणूस ज्याचा निरंतर शोध घेतो आहे अशा काही मूलभूत मूल्यांचा वेध दिग्दर्शक घेऊ पाहतोय. मांडणीतला सहजपणा आणि आशयातला प्रामाणिकपणा यामुळं हायवेची ही सफर रमणीय ठरते. हे नुसतं मनोरंजन नाही, तर मनाचं तेल-पाणी आहे. गोष्टीतल्या पात्रांसोबत आपणही आपल्या जगण्यातल्या 'हे सारं कशासाठी?' या सनातन प्रश्नाचा शोध घेऊ लागतो, आपलं जगणं पुन्हा तपासायला घेतो हे या कलाकृतीचं यश.
दोन दिवसांवर लग्न असलेली दिल्लीतील उच्चभ्रू घरातली तरुणी वीरा त्रिपाठी (अलिया भट) होणाऱ्या नवऱ्यासोबत घराबाहेर पडते आणि पहाटे तीनच्या सुमारास दिल्लीच्या बाहेर असलेल्या पेट्रोलपंपावर काही गुंड तिचं अपहरण करतात. गोळीबारातून वाचण्यासाठी तिला ओलीस ठेवणं हा त्यांचा उद्देश असतो. महावीर भाटी (रणदीप हुडा) हा नामचीन गुंड त्या टोळीत असतो. वीरा एका बड्या बापाची मुलगी आहे आणि तिला पळवणं आपल्याला महागात पडेल, असा सल्ला भाटीचे इतर गुंड साथीदार त्याला देतात. मात्र, तो कुणालाही न जुमानता वीराला घेऊन टेम्पोमधून सुसाट निघतो. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश या राज्यांतून तो फिरत राहतो. दोघांच्या या प्रवासात अशा काही गोष्टी घडतात, की वीराला हे अपहरण दुःखद न वाटता, आपली चौकटीतल्या जगण्यातून झालेली सुटकाच वाटते. महावीरच्याही आयुष्यात पूर्वी काही घटना घडून गेलेल्या असतात. दोघांच्याही नशिबानं त्यांच्या जगण्यातलं साधंसं सुख ओरबाडून घेतलेलं असतं. अनोळखी रस्त्यांवरून फिरत असताना दोघांनाही एकमेकांविषयी सहानुभूती वाटणं आणि मूलतः आपण नशिबाची एकाच प्रकारची शिकार आहोत, हे जाणवणं हा या सिनेमाचा हायपॉइंट आहे. किंबहुना तोच सिनेमा आहे.
वीराचं लहानपणी झालेलं लैंगिक शोषण आणि महावीरनं पाहिलेलं त्याच्या पित्याकडून आईचं झालेलं वेगळ्या प्रकारचं शोषण या समान धाग्यानं वीरा आणि महावीर जोडले जातात. हा धागा दिग्दर्शकानं कमालीच्या संयमानं आणि अलवारपणानं जोडला आहे. महावीरची आई म्हणत असलेली लोरी वीरानं म्हणणं आणि त्याच्या आईसारखाच ड्रेस तिच्या अंगात असणं, त्यानंतर टेम्पोत झोपलेल्या महावीरला वीरानं आईच्या मायेनं थोपटणं हे सगळं एवढ्या सहजपणानं दिग्दर्शकानं सूचित केलं आहे, की त्याला द्यावी तेवढी दाद कमीच. वास्तविक भाटीसारखा गुंड आणि त्याची टोळी वीरासारख्या सुंदर तरुणीला पळवते, तेव्हा सर्वप्रथम ती टोळी तिचं काय करील, याचा कोणीही सहज अंदाज करू शकेल. या सिनेमातही सुरुवातीला तसंच वाटतं. मात्र, तसं काही न घडता, नंतर थेट महावीरच्या आईचा संदर्भ येणं आणि त्याअनुषंगानं त्याची तिच्याकडं पाहण्याची दृष्टी बदलणं इथपर्यंतचा प्रवास खरं तर खूपच न पटण्यासारखा वाटू शकतो. मात्र, या सिनेमात आपल्याला तसं वाटत नाही, हे दिग्दर्शकाचं यश आहे. दोघांच्या बालपणाचा संदर्भ देऊन दिग्दर्शकानं त्यांच्या जगण्यातल्या हरवलेल्या वाटा सूचित केल्या आहेत. या वाटा दोघांनाही हायवेच्या प्रवासात मिळतात. माणसाची सगळी धडपड ही शेवटी सुखाच्या, मायेच्या, आपुलकीच्या त्या चार-दोन क्षणांसाठी चाललेली असते, हे दिग्दर्शक फार सहजपणे सांगून जातो.
या सिनेमाला गती नाही, असं अनेक जणांनी लिहिलंय. मला स्वतःला तसं काही जाणवलं नाही. कारण दुसऱ्या भागातला दोन्ही प्रमुख पात्रांचा स्वतःकडं सुरू झालेला प्रवास आहे. तो उलगडत जाताना पाहणं हा एक आनंददायक अनुभव आहे. हिमालयाच्या कुशीत गेलं, की माणसाला स्वतःचा शोध लागतो, असा आपल्याकडं फार जुना, पारंपरिक समज आहे. हिमालयाची अनुभूती घेतलेल्यांना तो पटलाही आहे. दिग्दर्शकानं आपल्या पात्रांनाही शेवटी याच देवभूमीत आणलं आहे. वीराचं हळूहळू ओपन-अप होणं आणि महावीरचंही अगदी हळूहळू, पण निश्चितपणे मोकळं होणं इथं दिसतं. त्या दृष्टीनं वीराचा इंग्लिश गाण्यावरच्या डान्सचा सिक्वेन्स पाहण्यासारखा आहे. महावीर आणि वीरा शेवटी बसच्या टपावर बसून प्रवास करतात, हेही खूपच सूचक. शेवटी दोघांना ते एक मातीचं घर मिळणं, तिथं वीरानं लुटुपुटीचा संसार सुरू करणं, शेवटी महावीरच्या अंगावर जाऊन झोपणं... हे सगळं खूप हृदयस्पर्शी झालंय. त्यामुळं आपली प्रमुख पात्रं एक स्त्री आणि एक पुरुष आहेत आणि त्यांच्यात लैंगिकतेच्या अनुषंगानं काही घडतं आहे, असं कुठंही जाणवत नाही. आपल्या पात्रांना त्या मूलभूत भावनेच्या पार नेऊन, त्यांचा प्रेमासारख्या अंतिम सत्याचा शोध सुरू झाल्याचं दाखवणं यातून दिग्दर्शक हायवेला वेगळ्या उंचीवर नेतो. 
 अलिया भट आणि रणदीप हुडा या दोघांच्याही अभिनयानं हाय-वे जमला आहे. अलियानं लैंगिक शोषणानं दबलेली, अपहरण झाल्यावर घाबरलेली, पण हळूहळू खुललेली वीरा झकास साकारली आहे. या भूमिकेसाठी आवश्यक असलेला अल्लडपणा तिच्याकडं पुरेपूर आहे. काही वेळेला तिचे उच्चार मात्र खटकतात. क्वचित ती तोतरं बोलतेय की काय, असंही वाटतं. पण ते तसं नसेल तर बरं. रणदीप हुडानं महावीरची भूमिका अगदी जिवंत केलीय. भूमिकेत शिरणं म्हणतात, तसं तो या पात्रात घुसला आहे. बाकी नामवंत कलाकार कुणीही नसले, तरी या दोघांनीही ही प्रेमाची गोष्ट मस्त तोलून धरलीय.
ए. आर. रेहमानचं त्या त्या राज्याच्या लोकसंगीताच्या बाजानं जाणारं अप्रतिम संगीत, रसूल पोकुट्टीसारख्या मास्टरचं अफलातून साउंड डिझायनिंग आणि प्रत्येक रस्त्याचा नूर टिपत जाणारी अनिल मेहतांची अव्वल दर्जाची सिनेमॅटोग्राफी यामुळं सिनेमाचा परिणाम कित्येक पटींनी वाढला आहे.
तेव्हा ही सफर चुकवू नका. कम ऑन बोर्ड द टेम्पो...
---
निर्मिती - यूटीव्ही मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक - इम्प्तियाज अली
संगीत - ए. आर. रेहमान
ध्वनी आरेखन - रसूल पोकुट्टी
सिनेमॅटोग्राफी - अनिल मेहता
प्रमुख कलाकार - अलिया भट, रणदीप हुडा
दर्जा - ****
---


15 Feb 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - गुंडे

थोडा कोळसा, पण बराचसा हिरा...
 ----------------------------------------
साचेबद्धपणा किंवा पठडीबाजपणा (ज्याला इंग्रजीत क्लिशे म्हणतात) याला जर कोळसा म्हटलं, तर ‘गुंडे’ या नव्या हिंदी सिनेमात दिग्दर्शक अली अब्बास जफरनं तो भरपूर उगाळला आहे. इतका, की ऐंशीच्या दशकातल्या सिनेमासारखा सिनेमा काढून दाखवा, अशी कुणी स्पर्धा ठेवली असती, तर जफरच्या या सिनेमानं नक्कीच पहिला नंबर मिळवला असता. पण ‘गुंडे’चा विशेष हा, की तो या पठडीबाजपणाच्या घासाघाशीतून पुढं जातो. चांगली पटकथा, खटकेबाज संवाद, खणखणीत अभिनय, ठेकेदार संगीत, प्रेक्षणीय सिनेमॅटोग्राफी या मूलभूत गोष्टींवर काम केल्यानं आणि त्या जमून आल्यानं या उगाळलेल्या कोळशाच्या खाणीतून एका चांगल्या कलाकृतीचा हिरा बाहेर पडतो.
‘गुंडे’ची गोष्ट आहे विक्रम (रणवीरसिंह) आणि बाला (अर्जुन कपूर) या दोन जीवश्चकंठश्च मित्रांची. १९७१ मध्ये बांगलादेश मुक्तियुद्धानंतर तेथून कलकत्त्यात आलेल्या अनेक निर्वासित मुलांपैकी ही दोन मुलं. मात्र, दोघांच्याही अंगात रगेलपणा आणि मस्ती पुरेपूर. कलकत्त्यात आल्यानंतर कोळशाच्या रूपानं त्यांना जगण्याचा मार्ग सापडतो आणि त्या जीवावर हे दोघं त्या महानगरातले सर्वांत मोठे गुंड बनतात. १९७३ च्या ‘जंजीर’पासून ते १९८७ च्या ‘मि. इंडिया’पर्यंत त्यांचा बालपण ते तरुणपणाचा प्रवास घडतो. (या दोन्ही सिनेमांचे सूचक संदर्भ यात आहेत.) या काळात देशातील आर्थिक, सामाजिक व राजकीय स्थितीही एखाद्या कोळशाच्या भट्टीसारखीच अखंड धगधगती होती. ‘गुंडे’मधल्या प्रत्येक प्रसंगाला या स्थितीचं पूरक व पुरेसं बोलकं नेपथ्य आहे. बांगलादेश युद्धातील विजयानंतर देशाभिमानाचं वारं जोरदार होतं. तिथपासून ते ऐंशीच्या दशकातल्या अशांत, विस्फोटक स्थितीपर्यंत या सिनेमातल्या प्रमुख पात्रांचाही प्रवास घडतो. या दोघांच्या दोस्तीत फूट पाडणारी एक नायिका येते. या दोघांच्या मागावर असलेला एक पोलिस अधिकारी अवतरतो. त्यानंतर उंदीर-मांजराच्या खेळाचाच एक वेगळा अवतार दाखवीत पुढचा सिनेमा पार पडतो.
क्लिशेचा उल्लेख वर झालाच आहे. या सिनेमाच्या लेटरिंगपासून ते पहिल्या अर्ध्या तासाचा भाग पाहताना, दिग्दर्शकाच्या मनावर असलेली ‘शोले’ची तीव्र पकड लक्षात येते. विशेषतः रेल्वेतल्या मारामारीचे प्रसंग पाहताना तर हे प्रकर्षानं जाणवतं. त्यानंतरही अनेक हिंदी सिनेमांत पाहिलेले प्रसंग आणि त्यांच्या नकला एकेक करून समोर येऊ लागतात. कलकत्त्यात सिनेमा घडत असल्यानं अगदी ‘परिणीता’पासून ते ‘कहानी’ ते ‘बर्फी’पर्यंत आणि धनबादमध्ये एक भाग घडताना ‘काला पत्थर’पासून ते ‘गँग्ज ऑफ वासेपूर’पर्यंत सर्व सिनेमांची भेळ पाहत असल्यासारखं वाटायला लागतं. अगदी मध्यंतराची टिपिकल स्टाइल आणि शेवटाकडे नायिकेबाबत होणारा गौप्यस्फोट हे सगळं सराइत प्रेक्षक अगदी सहज ओळखू शकतो. पण हा अखंड क्लिशेचा मारा ठेवूनही हा सिनेमा आपल्याला खिळवून ठेवील, एवढी काळजी दिग्दर्शकानं घेतल्यानं पैसे वसूल झाल्याशिवाय राहत नाहीत. याचं कारण म्हणजे चांगल्या पटकथेसोबत दिग्दर्शकानं प्रमुख पात्रांवर केलेलं काम. रणवीर, अर्जुन, इरफान आणि प्रियांका चोप्रा या चौघांनीही जबरदस्त काम करून हा सिनेमा तोलला आहे. विशेषतः रणवीर आणि प्रियांका यांचा परफॉर्मन्स झकास झाला आहे. त्यामुळं तोचतोचपणा असूनही सिनेमा कंटाळवाणा होत नाही. 

 विक्रम आणि बाला यांच्यातील मैत्रीचा घट्ट धागा हाही या सिनेमाचा कणा आहे. हा धागा अगदी सुरुवातीच्या प्रसंगात लहानग्या विक्रमला बांगलादेशी लष्करी अधिकाऱ्याच्या लैंगिक शोषणापासून बाला वाचवतो, तेथपासून ते शेवटच्या दृश्यापर्यंत कायम राहतो. हे दोघंही परिस्थितीवश गुंड झालेले असतात आणि मूलतः ते निर्मळ मनाचे, अगदी लहान मुलांसारखे निरागस असतात म्हणे. अर्थात हे एकदा म्हणून झालं, की गुंडांचे बाकी सर्व ‘नाजायज’ उद्योग दाखवायला सिनेमावाले मोकळे होतात. अब्बास जफरनं या सिनेमातही हेच केलंय. अर्थात शेवटी गुंडांचं निर्दालन होतंच, तो भाग वेगळा.
या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी उत्कृष्ट दर्जाची आहे. कोळसा हा सर्व कथानकाच्या पार्श्वभूमीवर येत असल्यानं काळा आणि प्रेमाचा, हाडवैराचा आणि पराकोटीच्या पॅशनचा रंग म्हणून लाल (रक्तवर्णी) हे दोन रंग पडद्यावर प्राधान्यानं दिसत राहतात. याला आगीच्या धगीचा पिवळा रंग जोड म्हणून येतो. ही अफलातून रंगसंगती या सिनेमाला ‘एक्सेप्शनली’ प्रेक्षणीय बनवते. याशिवाय सोहेल सेनचं ठेकेदार संगीत आहे. त्यातही ‘दिल की बजी घंटी यार’ हे गाणं जमलेलं आहे. या गाण्यातील बॉस्को-सीझरची कोरिओग्राफी अफलातून आहे. विशेषतः त्यातली ती घंटी हातात घेऊन लेझीमसारखी घेतलेली स्टेप एकदम खास!
रणवीर आणि अर्जुन या दोघांचीही कामं चांगली आहेत. त्३यातही रणवीर अधिक प्रभावी आहे. अर्जुन अजून थोडा तयार व्हायचा आहे. पण त्याचे प्रयत्न चांगलेच आहेत. प्रियांका या सिनेमात नेहमीपेक्षा अधिक छान दिसली आहे. तिची वेशभूषाही अप्रतिम आहे. दिल की घंटी गाण्यात तिघांनीही केलेला डान्स मस्त आहे. इरफान यांनी साकारलेला ‘सत्यजित सरकार’ नेहमीप्रमाणे झकास. पण त्याला ‘स्पेशल अॅपिअरन्स’ का म्हटलं आहे, कुणास ठाऊक!
थोडक्यात, हा ‘गुंडे’ एकदा पाहायला हरकत नाही.
---
निर्माता : यशराज फिल्म्स
दिग्दर्शक : अली अब्बास जफर
संगीत : सोहेल सेन
सिनेमॅटोग्राफी : असीम मिश्रा
प्रमुख : रणवीरसिंह, अर्जुन कपूर, प्रियांका चोप्रा, इरफान, सौरभ शुक्ला
दर्जा : *** १/२
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, १५ फेब्रुवारी २०१४)
----

8 Feb 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - हँसी तो फँसी

पाहाल तर हसाल...
----------------------- 
 
फर्स्ट थिंग फर्स्ट. विनिल मॅथ्यू दिग्दर्शित ‘हँसी तो फँसी’ हा एक अवखळ, खेळकर अन् निखळ प्रसन्न असा सिनेमा आहे. सध्याच्या ताण-तणावाच्या काळात दोन तास साधं-सरळ मनोरंजन करणाऱ्या आणि त्याचबरोबर कुठं तरी मनाला भिडणाऱ्या अशा कलाकृतींची फार गरज आहे. हँसी तो फँसी ही अपेक्षा नक्कीच पूर्ण करतो. सुमारे १४१ मिनिटांच्या या प्रेमळ खेळात कुठंही एक सेकंदभरही कंटाळा येणार नाही, याची शंभर टक्के तजवीज करतो. तेव्हा ‘पाहाल तर हसाल...’ असं या सिनेमाबाबत खात्रीनं सांगता येईल.
आपला पहिलाच सिनेमा दिग्दर्शित करणाऱ्या विनिलनं या साध्या-सोप्या गोष्टीची हाताळणीही तशीच साधी-सरळ केली आहे. विषय तोच असला, तरी त्याला नावीन्याचा टवटवीतपणा आहे. आपल्या इवल्याशा आयुष्यात आपण आपल्याच हाताने किती प्रॉब्लेम करून ठेवतो. आपल्या जीवाभावाच्या माणसांशी भांडतो, अबोला धरतो, दुरावा निर्माण करतो. साध्या गोष्टी गुंतागुंतीच्या करून ठेवतो. त्याऐवजी आयुष्य खूप छान आहे, ते देवानं तुम्हाला जसं दिलं आहे तसं मस्त, हसत-खेळत जगा, असा खूप सकारात्मक संदेश हा सिनेमा (तसा कुठलाही संदेश देण्याचा आविर्भाव न आणता) सुरेख पद्धतीनं देतो.
सिनेमा या कलाकृतीचा जीव तिच्या कथेत, पटकथेत, संवादात आणि मग कलाकारांच्या अभिनयात असतो. विनिलनं या सर्व टप्प्यांवर उत्तम काम केलं आहे. हर्षवर्धन कुळकर्णीची कथा आणि पटकथा मुळात दमदार आहे. यात अगदी छोटीशी व्यक्तिरेखाही सशक्तपणे लिहिली गेली आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेला तिच्या अस्तित्वाचं प्रयोजन आहे. त्यामुळं ही छोटी छोटी पात्रंही सिनेमा घट्ट विणीसारखा बांधून ठेवतात.
निखिल (सिद्धार्थ) आणि मिता (परिणीती चोप्रा) या दोघांची ही गोष्ट आहे. निखिलचं लग्न मिताच्या बहिणीशी - करिश्माशी (अदा शर्मा) ठरलं आहे. त्यापूर्वीच त्याची मिताशी भेट होते. मिता आपल्या होणाऱ्या बायकोची बहीण आहे, हे त्याला अर्थातच माहिती नाही. मिता घराबाहेर का पडली आहे, याचीही एक मोठी कहाणी आहे. प्रत्यक्ष भेटीत वेड्यासारखं वागणारी, ड्रग अॅडिक्ट भासणारी, चित्र-विचित्र तोंडं करणारी, मध्येच मँडरिन भाषेत बोलणारी ही मुलगी प्रत्यक्षात आयआयटीची केमिकल इंजिनीअर आहे, हे कळल्यावर निखिलला अर्थातच धक्का बसतो. मिताच्या आयुष्यात काही पेच निर्माण झालेला असतो. तिचा पेच सोडवता सोडवता निखिलही तिच्यात गुंतत जातो.
जाहिरात क्षेत्राकडून सिनेमा दिग्दर्शनाकडं वळलेल्या विनिलनं, आपले दोन्ही नायक-नायिका पहिल्यापासूनच कसे वांड आहेत, हे दाखवण्यासाठी १९९२ मधील दोघांच्या घरातील एका प्रसंगाची सुरुवातीलाच योजना केली आहे. त्यानंतर २००६ मध्ये तरुण झाल्यानंतर हे दोघं पहिल्यांदा कसे भेटतात, तो प्रसंग येतो. त्यानंतर थेट सात वर्षांनी गोष्ट पुढं जाते आणि मग आजच्या काळात सुरू होते. असं असलं, तरी प्रमुख व्यक्तिरेखांसह दोघांच्या घरच्या व्यक्तिरेखा आणि त्यांचा वावर यांना दिग्दर्शक बऱ्यापैकी वाव देतो आणि त्यामुळं एखादी कादंबरी उलगडत जावी, तसतसं या गोष्टीतलं नाट्य उलगडत जातं. संपूर्ण सिनेमाला विनोदाचं एक प्रसन्न नेपथ्य आहे. परिणीतीचं सुरुवातीचं वागणं, निखिलचे मित्र, त्यांच्या गमतीजमती यातून हा हसरा झरा खळाळत वाहत राहतो. हाराच्या चोरीचा प्रसंग आणि परिणीतीनं वठवलेलं सीआयडीचं बेअरिंग हा संपूर्ण सीनच हास्यस्फोटक झाला आहे. परिणीती सर्वांना कपडे खरेदीला घेऊन जाते, तो प्रसंगही जमलेला. या सिनेमात दिग्दर्शकानं दाखवलेल्या मुंबईचा खास उल्लेख करायला हवा. मुंबईतला पाऊस, तिथले ओले रस्ते, समुद्र, चाळी, टोलेजंग इमारती, टॅक्सी, लोकल, विमानतळ ते कोपऱ्यावरची वडापावची गाडी इथपर्यंतच्या मनमौजी मुंबईची सफर मस्तच.
 मूळ कथा आणि त्यानंतर पटकथेची बांधणी घट्ट आणि नेटकी असल्याचा हा परिणाम. त्यानंतर येणारी बाब म्हणजे प्रमुख कलाकारांचा अभिनय. सिद्धार्थ आणि परिणीती या दोघांनीही छानच काम केलं आहे. विशेषतः परिणीतीनं तर हा सिनेमा खाऊन टाकला आहे, असं म्हटलं तरी चालेल. एवढा सहज अभिनय करणारी, बोलक्या डोळ्यांची ही लहान चणीची अभिनेत्री मोठ्या क्षमता बाळगून आहे, यात शंका नाही. या सिनेमात तिनं घेतलेलं सिनिकल बेअरिंग आणि सिद्धार्थशी मैत्री झाल्यानंतर त्याच्यासमोर उलगडत जाणारी खरी मिता तिनं फार सुंदर सादर केली आहे. सिद्धार्थ हा उमदा, देखणा तरुण अभिनेता निखिलच्या भूमिकेत छान शोभून दिसला आहे. या दोघांना अदा शर्मा, नीना कुळकर्णी, शरद सक्सेना, मनोज जोशी आदींनी उत्तम साथ दिली आहे.
सिनेमात काही वाईट बाबी अर्थातच आहेत. विशेषतः मिता आणि तिचे वडील यांच्या काही प्रसंगांत तर तर्काला पूर्ण फाटा दिल्यासारखा वाटतो. शिवाय शेवटही अगदीच फिल्मी. पण या त्रुटींकडं डोळेझाक करून आवर्जून पाहावी, अशीच ही प्रसन्न विनोदी गोष्ट आहे.
----
 निर्माते : करण जोहर, अनुराग कश्यप, विकास बहल, विक्रमादित्य मोटवानी
दिग्दर्शक : विनील मॅथ्यू
कथा-पटकथा : हर्षवर्धन कुलकर्णी
संगीत : विशाल-शेखर
पार्श्वसंगीत : अमर मंगरुळकर
प्रमुख भूमिका : परिणीती चोप्रा, सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज जोशी, अदा शर्मा, शरद सक्सेना, नीना कुळकर्णी, समीर खक्कर आदी.
दर्जा : *** १/२

---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे. ८-२-२०१४)
----

25 Jan 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - जय हो


हिंसक, बटबटीत ‘आम’रस...
----------------------------------- 


सलमान खानचा ‘जय हो’ हा नवा सिनेमा सर्वसामान्य माणसात असलेल्या सुप्त ताकदीची महती (‘आम आदमी सोया हुआ शेर है... उंगली मत कर; वरना चीरफाड देगा’ या भेदक शब्दांत) सांगतो. एखाद्यानं आपल्याला मदत केली, तर त्याला ‘थँक्यू’ न म्हणता आपणही आणखी तीन जणांना मदत करावी, असा चांगला सल्ला देतो. भ्रष्ट अन् बाहुबली राजकारणी लोकांविषयी सामान्यांच्या मनात असलेली तिडीक स्पष्टपणे मांडतो....
कौतुकाची ही तीन वाक्यं सोडली, तर सोहेल खान दिग्दर्शित हा नवा सिनेमा म्हणजे ‘आम आदमी’च्या नावाखाली मांडलेली एक हिंसक अन् बटबटीत करमणूक आहे. हल्ली खऱ्या आमरसाऐवजी फ्लेवर घातलेला खोटा आमरस खाण्याचीच फॅशन आहे. त्या हिशेबाने हा ‘आम’रसही दोन-अडीचशे कोटींचा गल्ला गोळा करणार, यात शंका नाही. अर्थात सिनेमाचा दर्जा आणि त्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन यांच्यातच फारसा संबंध न उरल्यानं त्याविषयी न बोललेलं बरं...
आपल्या भावाच्या सध्याच्या ‘लार्जर दॅन लाइफ’ इमेजचा पुरेपूर वापर करण्यासाठीच सोहेल खाननं हा सिनेमा निर्माण केलाय, हे पहिल्या फ्रेमपासून जाणवतं. मात्र, तब्बल १४५ मिनिटांचा हा खेळ दिग्दर्शकानं अकारण खूपच ताणला आहे आणि नायकाच्या सर्व कलागुणांना वाव देण्याच्या नादात कुठल्या कुठं वाहवत नेला आहे! जय अग्निहोत्री (सलमान) (सिनेमात भगिनीप्रेमाचं अलोट दर्शन घडविणाऱ्या सलमाननं सिनेमातलं आडनावही आपल्या खऱ्या बहिणीचं - अलविरा खान अग्निहोत्रीचंच - घेतलं आहे...) नामक तरुणाच्या आयुष्यावरचा हा सिनेमा सादर करताना सोहेलनं यात काय दाखवलेलं नाही? सर्वसामान्यांना पिडणारा राजकारणी गृहमंत्री, त्याचा मस्तवाल मुलगा व जावई, अतिशहाणी मुलगी, काळे गॉगल घालून मिरवणारे भ्रष्ट पोलिस, परीक्षेत यश मिळविण्याच्या जिद्दीनं दोन्ही हात नसतानाही लढणारी व नंतर आत्महत्या करणारी तरुणी, नायकाची गुजराती प्रेयसी, तिची उडाणटप्पू आई (आणि त्यांचे ‘गंदे’ विनोद), नायकाची गोग्गोड आई, तिच्याशी भांडून लग्न करून गेलेली थोरली ताई, ताईंचे (किडनीदाते असे) अतिप्रेमळ यजमान, त्यांचा अत्यंत आगाऊ (आणि पुलंच्या भाषेत ज्या कार्ट्याच्या उगाचच कानफटात मारावीशी वाटते, असा) चोंबडा ‘उंदीरमामा’ मुलगा, नायकाचा एक डॉक्टर आणि एक पोलिस मित्र (क्लायमॅक्सला दोघे उपयोगी पडणार असतात), एक विनाकारण सच्छील रिक्षावाला, एक नाहक बेवडा (अपना खोपडी), एक सज्जनसा (चक्क) मुख्यमंत्री... आणि हो, नायक पूर्वाश्रमीचा मिलिटरी मॅन असल्यानं वेळेला त्याच्या मदतीला थेट रणगाडा घेऊन धावणारा त्याचा साहेब... आणि यंव आणि त्यंव...
‘स्टॅलिन’ या ए. आर. मुरुगदॉसच्या तेलगू सिनेमावरून (जो मुळात अर्थातच हॉलिवूडचा रिमेक होता...) घेतलेली ही सगळी भेळ कालवून, रांधून कितीही वाईट डिश बनवली तरी ती किमान प्रेझेंटेबल होते, यात वाद नाही. तद्वतच ‘जय हो’ आपण एका विशिष्ट क्षणानंतर एंजॉय करायला लागतोही! पण सद्सद्विवेकबुद्धी ही चीज अशी आहे, की ती कुशनच्या सीटमध्ये बरोबर मध्यभागी लपलेल्या स्प्रिंगच्या खिळ्यासारखी आपल्याला सदैव टोचणीही लावते, की नाही, नाही... हे काय चाललंय? मी का पाहतोय हे? मध्यंतरापर्यंत तरी नक्कीच सोहेल आपल्याला या दोन विचारांच्या ‘सी-सॉ’वर बसवून झुलव झुलव झुलवतो.. मध्यंतरानंतर गृहमंत्री दशरथ सिंह (डॅनी) यांचं आगमन होतं आणि सिनेमाही तिथूनच सुरू होतो. मात्र, हा उत्तरार्ध एवढा टोकाचा हिंसक आणि अंगावर येणारा आहे, की बस्स...
दिलीप शुक्ला यांनी लिहिलेली पटकथा बरीच विस्कळित आणि नको त्या तडजोडी करून लिहिलेली दिसते. सिनेमा लांबीला बराच झाला असावा आणि नंतर वेडावाकडा कापला असावा, अशी शंका येते. कारण सुरुवातीच्या काही प्रसंगांची संगती लागत नाही. विशेषतः सलमान तबू आणि डेसी शाहला घेऊन वंडरलँडमध्ये जातो, तेव्हा तिथं आलेले गुंड आधीच्या प्रसंगाचा संदर्भ देतात. पण ते आधी कुठंच दिसलेले नसतात. (अर्थात यातले बव्हंशी गुंड सारखेच दिसतात, तेव्हा हा दृष्टिभ्रमही असू शकेल. असो.) शिवाय पूर्वार्धात एक पंडितजी, नायकाची आई, नायकाची प्रेयसी, तिची आई आणि नायकाचा चोंबडा उंदीरमामा भाचा यांच्या बाष्कळ विनोदांनी एवढा कहर केला आहे, की हा सगळा भाग कॉमेडी सर्कसचा एपिसोड म्हणून सहज खपून जाईल. विनोदाचा मारा असह्य होऊ नये, म्हणून मध्येच सलमानच्या विविध फायटिंग दृश्यांची योजना केली आहे. सुरुवातीलाच ब्रूना अब्दुल्लाच्या अपहरणाचा प्रसंग येतो तेव्हा जी ही मारामारी सुरू होते, ती थेट शेवटच्या रिळाला सल्लूभायचा शर्ट फाडूनच थांबते. दर वेळेला खांब फोडून नरसिंह बाहेर येतो, तसा शर्ट फाडून उघडा सल्लू बाहेर येणं हा आता त्याचा पेटंट शॉट झाला आहे. (अर्थात पब्लिकही याच क्षणाची वाट पाहत असतं, हे खरं आहे.) समोरचं गिऱ्हाइक फक्त दर वेळेला बदलतं. गेल्या वेळी प्रकाश राज होता, या वेळी हरून काझीची बारी आहे. असो.
अभिनयात म्हणण्यापेक्षा अॅक्शन दृश्यांत सलमान बाजी मारतो. (सलमान मारामारीत करताना गुंडांना चावतो... हो, चक्क चावतो! शिवाय तो हिंस्त्र प्राण्यासारखा वस्सकन अंगावर येतो, हे तर ‘सिंघम’मधलं कॉपी केलंय. हे दोन मुद्दे मायनसमध्ये जातात.)
  त्याची नायिका म्हणून डेसी शाह ही नवी अभिनेत्री आहे. या कोरिओग्राफर मुलीला नायिका म्हणून घेण्याची वेळ सलमानवर का आली, हा मोठ्या संशोधनाचा विषय आहे. तिचं नशीब थोर, बाकी काय... ते ‘नैना’वालं एक गाणं, त्याची ती विविक्षित चाल आणि त्याचं तेच ते टिपिकल शूटिंग (उदा. एक हॉटेल, एक स्टुडिओ, एक निसर्गदृश्य, एक कार, एक मिठी) हेही आता अनेकांना पाठ झालं आहे. तसं ते यातही आहे. पुढच्या वेळी कुणीही प्रेक्षक सलमानच्या या नैना गाण्याचं शूटिंग करून देऊ शकेल, एवढं ते पठडीबाज झालं आहे. प्रमुख खलनायकाच्या भूमिकेत डॅनी असले, तरी त्यांना फारच मर्यादित वाव आहे. इथंही ‘कुत्ता’वाला एक प्रसंग त्यांच्या वाट्याला आलाय खरा; पण यापेक्षा ‘घातक’मधला कातिया आणि त्याचा अमरीश पुरीबरोबरचा सीन किती तरी पटींनी सरस होता. असो. त्याच्या आगाऊ मुलीच्या म्हणजे कविता पाटीलच्या भूमिकेत सना खान जोरदार काम करून गेलीय. बाकी मुकुल देव, हरून काझी वगैरे मंडळी इमाने-इतबारे नायकाचा मार खाण्याचं काम पार पाडतात. तबूचं अनेक दिवसांनी झालेलं दर्शन सुखावह आहे. नादिरा बब्बर आणि रेशम टिपणीसही आपापल्या भूमिकांत छान. महेश मांजरेकर आणि ‘नुक्कड’फेम खोपडीचा अर्थात समीर खक्करचा एक ट्रॅक आहे. तोही इमोशनल आणि चांगला वठलाय. (एवढ्या वर्षांनंतरही समीर खक्करने खोपडीच्याच स्टाइलमध्ये हा रोल केलाय, हे पाहून बरंही वाटलं आणि वाईटही!) भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आदित्य पांचोलीला वाया घालवलंय. मुख्यमंत्र्याच्या भूमिकेत मोहनीश बहल ओके ओके. मिलिटरी बॉसच्या रोलमध्ये सुनील शेट्टी दर्शन देऊन जातो. त्याची एकूण इमेज पाहता, तो शेवटी रणगाडा घेऊन नायकाच्या मदतीला येतो, हेही ठीकच म्हणायचं! दोन्ही हात नसलेल्या तरुणीची भूमिका स्वीकारून जेनेलिया देशमुखनं खरं तर धाडस केलं आहे; पण तिनं हा रोल का केला, असंही वाटून गेलं.
यात ‘थँक्यू’ न म्हणता तीन जणांना मदत करा, या संदेशाचाही एवढा भडीमार केला आहे, की शेवटी आवरा म्हणायची वेळ येते. अर्थात सिनेमा संपताना एक गोष्ट एकदम लक्षात येते, की अरेच्चा, आपण कायमच तीन जणांना मदत करीत आलोय... ते तिघं म्हणजे सलमान, अरबाझ आणि सोहेल खान...!
अरे, थँक्यू म्हणा... थँक्यू!!!
---
निर्माता : सुनील लुल्ला, सोहेल खान
दिग्दर्शक : सोहेल खान
कथा : ए. आर. मुरुगदॉस
पटकथा : दिलीप शुक्ला
संगीत : साजिद-वाजिद, देवीश्री प्रसाद, अमल मलिक
प्रमुख भूमिका : सलमान खान, तबू, डॅनी, सुनील शेट्टी, मुकुल देव, महेश मांजरेकर, मोहनीश बहल, आदित्य पांचोली, डेसी शाह, रेशम टिपणीस, जेनेलिया देशमुख, नादिरा बब्बर, महेश ठाकूर, अश्मित पटेल, शरद कपूर, यश टोंक, हरून काझी, सना खान आदी.
दर्जा - ***
 -----------------
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, २५ जानेवारी २०१४)
----
-------------------------------------------------------------