30 Apr 2020

महाराष्ट्र हीरकमहोत्सव विशेष

बहु असोत सुंदर, संपन्न....
-----------------------------


आजच्या शुक्रवारी, म्हणजे एक मे २०२० रोजी महाराष्ट्र साठी पूर्ण करतोय. साठीसोबत येणारा वाक्प्रचार फार काही चांगला नाही. पण तो व्यक्तीच्या संदर्भात असल्यानं सहज दुर्लक्षिता येईल. महाराष्ट्र हे आपलं एक राज्य असल्यानं त्याची साठी म्हणजे आपणा सर्व महाराष्ट्रवासीयांसाठी सुखाचा, आनंदाचा, जल्लोषाचा क्षण! आत्ता ‘करोना’ साथीमुळं आपल्याला हा जल्लोष एकत्र येऊन करता येत नसला, तरी या महत्त्वाच्या टप्प्याची नोंद करायलाच पाहिजे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती सहजासहजी झाली नाही. त्यासाठी इथल्या जनतेला मोठं आंदोलन करावं लागलं. एकशे पाच हुतात्म्यांचे बलिदान द्यावे लागले. तो सर्व इतिहास आता नव्या पिढीला कदाचित माहितीही नसेल. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी; मात्र ती मिळविण्यासाठीही इथल्या नेत्यांना रक्ताचं पाणी करावं लागलं. आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे अशा नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा प्राणपणाने लढला. चिंतामणराव देशमुखांसारख्या महाराष्ट्रभक्त नेत्याने आपल्या केंद्रीय अर्थमंत्रिपदावर सहज पाणी सोडले. सेनापती बापट यांच्यासारखा वयोवृद्ध सेनानी या लढ्याच्या अग्रभागी उभा ठाकला. ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्राविण राष्ट्रगाडा न चाले’ असे अत्यंत अभिमानास्पद, ज्वलज्जहाल उद्गार त्यांनी काढले आणि मराठी जनतेला स्फुरण चढले. एकदा राज्य स्थापन झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांसारख्या दूरदृष्टीच्या नेत्याने या राज्याच्या प्रगतीची मुहूर्तमेढ रोवली. हा सगळा इतिहास इथे पुन्हा सांगण्याचे कारण म्हणजे राज्याच्या साठीनिमित्त या सर्व कालखंडात नक्की काय घडलं, काय घडणं अपेक्षित होतं आणि पुढे काय व्हायला हवं याची किमान चर्चा तरी व्हावी.
महाराष्ट्रात बहुसंख्य जनता मराठी बोलणारी असल्यानं या लेखापुरता तरी मराठी माणसांचाच विचार केला आहे. दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आले आणि इथलेच झाले असे सगळे लोक मराठीच आहेत. काहींची मातृभाषा कदाचित मराठी नसेल, पण अनेक वर्षं, अनेक पिढ्या इथं राहिल्यानं ते मराठीच आहेत. महाराष्ट्राचा स्वभाव रांगडा आहे; तिखट आहे, ग्रामीण आहे. (ग्राम्य नव्हे!) शेती करणं, कष्टाने पैसा मिळवणं, तमाशा आदी संगीत मनोरंजन प्रकारात मन रमवणं या त्याच्या आवडत्या गोष्टी आहेत. तीस-चाळीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावातलं जीवन कसं होतं, ते आठवून पाहा. पिठलं-खर्डा-भाकरी खाणे, गणपती आणि दिवाळी हे सण मनापासून साजरे करणे, संध्याकाळी गावातल्या देवळात कीर्तनाला जाणे आणि शनिवारी रात्री फडाला जाणे यात ग्रामीण जीवन सामावलं होतं. शहरी जीवनही तसं साचेबद्धच होतं. बँक, एलआयसी किंवा सरकारी कचेरीत सकाळी दहा ते पाच नोकरी करणं, शनिवारी एखादं नाटक बघणं आणि क्वचित कधी तरी हॉटेलांत जाऊन जेवणं यात शहरी मध्यमवर्ग खूश होता. साठच्या दशकात आलेल्या अनेक मराठी चित्रपटांत या दोन्ही जगण्याचं प्रतिबिंब दिसेल. साहित्यातही सापडेल. ग्रामीण महाराष्ट्राचं व्यक्तिचित्र कुणाला हवं असल्यास व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील यांच्या साहित्यात तो गवसेल. शहरी महाराष्ट्र व. पु. काळे यांच्यापासून शं. ना. नवऱ्यांपर्यंत अनेकांनी रेखाटला आहे. नैसर्गिक दुष्काळ आणि अभावग्रस्तता इथल्या जनतेच्या पाचवीला पुजली होती. पण तरी लोक असमाधानी नव्हते. अपेक्षा थोड्या होत्या, जगणं साधं-सोपं होतं.
साठच्या दशकात सहकार चळवळीनं ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात या कारखान्यांच्या सभोवती समृद्धीची बेटं तयार झाली. काही मोजक्या कारखानदारांनी आणलेल्या उद्योगांमुळे छोट्या छोट्या, स्वयंपूर्ण वसाहती उभ्या राहिल्या. या बेटांवरचं जगणं उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळं झालं. विदर्भ आणि मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाले असले, तरी त्यांचं भौगोलिक, सांस्कृतिक वेगळेपण कायम होतं. मराठी भाषेच्या दुव्यानं हा सगळा भाग एका धाग्यात सांधला गेला. शिवाय हे राज्य अस्तित्वात येण्याआधीपासून इथं असलेली संतपरंपरा, वारकरी संप्रदाय यामुळं अंतरीचा जिव्हाळा होताच. ग्रामीण महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजत असतानाच वसंतराव नाईकांसारख्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात हरितक्रांती, धवलक्रांतीची बीजं रोवली. एके काळचा दुष्काळी, रखरखाटी महाराष्ट्र निदान काही परिसरापुरता तरी हिरवागार झाला, दुधदुभत्यानं न्हाऊ लागला. याच वेळी शहरांमध्ये, विशेषत: मुंबई व पुण्याच्या परिसरात औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या. मुंबई अद्यापही गिरण्यांचं शहर होतं. इथल्या कापड गिरण्यांची आणि त्याला जोडून वस्ती असलेल्या लालबाग-परळची एक वेगळीच गिरणगाव संस्कृती त्या अवाढव्य महानगराच्या एका कुशीत सुखानं नांदत होती. मुंबई, पुण्याच्या जोडीनं नागपूर, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर ही शहरंही चांगलीच विस्तारत होती. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरचा हा दहा-पंधरा वर्षांचा काळ कदाचित सर्वोत्कृष्ट काळ असावा. या काळातलं राज्यातलं सामाजिक, सांस्कृतिक जीवन रसरशीत होतं. साहित्यातही विद्रोही, दलित, स्त्री असे विविध प्रवाह नव्याने एकत्र येत होते. पुलंच्या बहुरूपी प्रयोगांपासून ते विजय तेंडुलकरांच्या बहुस्पर्शी नाट्यप्रयोगांपर्यंत सारं काही घडत होतं. कलाकारांमध्ये, लेखकांमध्ये नवं काही सांगण्याची, करण्याची ऊर्मी होती; तसंच इथल्या सर्वसामान्य जनतेलाही ते जाणून घेण्यात रुची होती. गावोगावी ग्रंथालये होती आणि नवसाक्षरांचं प्रमाणही वाढत होतं. महाराष्ट्र हे सर्वच बाबतींत देशातलं अग्रेसर, क्रमांक एकचं राज्य अशी प्रतिमा होती.
मात्र, लवकरच या सगळ्या प्रगतीला ग्रहण लागलं. भ्रष्टाचाराचा कली भल्याभल्यांच्या अंगात शिरला. समाजकारणापेक्षा सत्तेचं राजकारण वरचढ ठरू लागलं. याच काळात विजय तेंडुलकरांच्या लेखणीतून उतरलेला ‘सामना’ हा चित्रपट आणि ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक यावं, यात आश्चर्य नव्हतं. पुढच्या काळात सर्वच क्षेत्रांत ही कीड पसरू लागली आणि सामाजिक अस्वस्थतेची ठिणगी पडली. गावोगावी नांदत असलेल्या सलोख्याला सुरुंग लागला. पुढच्या काळात देशात सुरू असलेल्या मंडल आयोग वाद, बाबरी मशिदीचं पतन, जातीय दंगली या सगळ्यांचा परिणाम राज्याच्या प्रकृतीवर झालाच. गिरणी कामगार संपानं मुंबईतलं गिरणगाव उद्ध्वस्त झालं. मुंबईत वाढत असलेल्या टोळीयुद्धाला यातले काही बेरोजगार तरुण बळी पडले. तस्करी, काळा बाजार याला ऊत आला. ताप आलेल्या माणसाचं तोंड कडवट व्हावं, तसं राज्याचं तोंड कडू होऊन गेलं.
नंतर १९९१ मध्ये देशानं जागतिकीकरणाच्या रूपानं मोठा बदल पाहिला. महाराष्ट्रही त्याला अपवाद नव्हता. इथली शहरं महानगरं झाली आणि महानगरं लोकांच्या लोंढ्यानं फुटून मरणासन्न झाली. ग्रामीण महाराष्ट्रातून बेरोजगारांचे तांडेच्या तांडे शहरांच्या दिशेनं धावू लागले. ऐंशीच्या दशकात सडलेल्या सामाजिक व्यवस्थेचं बेंड जागतिकीकरणाच्या इंजेक्शननं ‌फुटलं. जखम मात्र वाहतच राहिली. शहरांतलं वातावरण वेगानं बदलत गेलं. कुटुंबकेंद्री व्यवस्था कधी व्यक्तिकेंद्री झाली आणि मूल्याधारित सांस्कृतिक धारणा कधी ईहवादी झाल्या, याचा अनेकांना तपास लागला नाही. कला क्षेत्रापासून ते राजकारणापर्यंत आणि शिक्षणापासून ते साहित्यापर्यंत सर्वत्र सुमारांची सद्दी सुरू झाली. एकविसाव्या शतकात तर वेगानं होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीनं साऱ्या समाजाचीच फरपट चालविली. अनेकांच्या मनात ‘आयडेंटिटी क्रायसिस’ निर्माण झाला. राजकारणातल्या भोंदूपणाने नवनवे तळ गाठले. समाजात द्वेषाची पेरणी झाली. आता तिला महाभयंकर विषारी फळं लगडली आहेत.
हे सगळं असलं, तरी हा महाराष्ट्र इथल्या सर्वसामान्य माणसाच्या शहाण्या समजूतदारपणावर उभा आहे आणि इथून पुढंही उभाच राहील. संत परंपरेचा वारसा आणि छत्रपती शिवरायांच्या लोककल्याणकारी राज्याचा इतिहास इथल्या मातीच्या कणाकणात आहे. सह्याद्रीचे भक्कम कोट आणि गोदा-कृष्णेचे अमृततुल्य पाणी इथल्या माणसाच्या अणुरेणूत मुरले आहे. अशा भूमीवर नांदणारे राज्य आता साठ वर्षांचे होऊ घातले आहे. त्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होऊ या. आपल्या पूर्वसूरींना यापेक्षा कोणती चांगली भेट असू शकेल?

----

9 Apr 2020

अनंत दीक्षित स्मरण लेख

दीक्षितसाहेब...
------------------



आपल्या आयुष्यात काही माणसं अशी येतात, की आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना विसरू शकत नाही. आपल्या आयुष्याला आकार देण्यात, आपलं ‘कच्चं मडकं’ घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. दीक्षितसाहेबांचं माझ्या आयुष्यातील महत्त्व असंच आहे. मी १९९७ मध्ये ‘सकाळ’मध्ये ट्रेनी पत्रकार म्हणून रुजू झालो, तेव्हा माझा पहिला इंटरव्ह्यू घेणाऱ्या चौघांत दीक्षितसाहेब होते. मी त्यांना प्रथम पाहिलं ते तेव्हाच.
ते तेव्हा कोल्हापूर आवृत्तीचे संपादक होते. त्यामुळे रोज भेट व्हायची नाही. मात्र, १९९९ मध्ये मला अकल्पितपणे बेळगावचं साहित्य संमेलन कव्हर करायला जाण्याची संधी मिळाली. तेव्हा दीक्षितसाहेब पुन्हा भेटले. ते सहकुटुंब कोल्हापूरहून आले होते. अंजली मॅडम व त्यांच्या दोन्ही मुली यांना मी तेव्हाच प्रथम पाहिलं. त्या मुली तर अगदी लहान होत्या. बेळगावची प्रसिद्ध साडी खरेदी करायला त्यांच्यासोबत गेलो होतो. पुढच्याच वर्षी दीक्षितसाहेब पुण्यात संपादक म्हणून रुजू झाले. त्यांच्या संपादक म्हणून असलेल्या वैशिष्ट्यांची ओळख आम्हाला हळूहळू पटत गेली. मी आणि माझ्यासोबत असलेल्या अनेक नव्या सहकाऱ्यांना दीक्षितसाहेबांनी कायम प्रोत्साहन दिलं. अनेक संधी दिल्या. जसपाल भट्टींची मुलाखत घेण्याची संधी त्यांनीच मला दिली. यामुळंच पुढं माझा भट्टींसोबत दीर्घकाळ स्नेह निर्माण झाला. नंतर भट्टींचा एक कॉलमही आम्ही सुरू केला. तो मराठीत भाषांतरित करायची जबाबदारी माझी होती. दीक्षितसाहेबांनी तेव्हा गुलजार यांचंही एक सदर पुरवणीत सुरू केलं होतं. दोन्ही मजकूर अनेकदा शेजारीशेजारी प्रसिद्ध व्हायचे. माझ्या मजकुरावर नाव भट्टींचं असलं, तरी तो मीच लिहिलेला आहे या जाणिवेनं सुख वाटायचं. दीक्षितसाहेबांचं आमच्यावर बारकाईनं लक्ष होतं. अनेकांना त्यांनी दौऱ्यावर पाठवलं, लिहायला प्रोत्साहित केलं. २००१ च्या विधानसभा निवडणुका आल्या तेव्हा त्यांनी दीनदयाळ वैद्य, योगेश कुटे व सिद्धार्थ खांडेकर यांच्यासह मला या राज्यांच्या दौऱ्यावर पाठवलं. वयाच्या पंचविशीत मिळालेला हा अनुभव मोलाचा होता.
त्याच वर्षी जानेवारीत नगर जिल्ह्यात कोठेवाडीचं प्रकरण घडलं होतं. या बातमीचं तर संपूर्ण श्रेय दीक्षितसाहेबांना जातं. आमचे पाथर्डीचे बातमीदार अविनाश मंत्री यांना ही घटना घडल्यावर दोन-तीन दिवसांनी त्यातले भयानक तपशील समजले होते. त्यांनाही या बातमीचं गांभीर्य उमगलं. त्यांनी संपादकांना फोन केल्यावर त्यांनी मंत्रींना पुण्यातच बोलवून घेतलं. सर्व तपशील जाणून घेतले व स्वत: ती बातमी लिहिली. मी तेव्हा नेमका मित्राच्या लग्नाला लातूरला गेलो होतो. तिथल्या अंकात दुसऱ्या दिवशी ही आठकॉलमी बातमी बघितली आणि हादरलो. नंतर पुण्यात आल्यावर रीतसर या बातमीचा फॉलोअप साहेब घेताना मी बघितलंय. काही काळानंतर मीही कोठेवाडीला जाऊन आलो.
२००२ मध्ये संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत होतं. त्या वेळी दीक्षितसाहेबांनी मला दिल्लीला जाऊन या हल्ल्यात मरण पावलेल्या पोलिस जवानांच्या नातेवाइकांच्या मुलाखती करायला सांगितलं. ही माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय असाइनमेंट होती. मी दिल्लीत राहून हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या या लोकांच्या नातेवाइकांना भेटून ‘सप्तरंग’मध्ये दोन भागांत ती स्टोरी केली. या संपूर्ण असाइनमेंटनं मला खूप काही शिकवलं. त्याचं संपूर्ण श्रेय सरांनाच!
मी दिल्लीहून आलो आणि माझं लग्न ठरलं. ती बातमी सांगायला मी साहेबांकडं गेलो. माझ्या सासुरवाडीच्या सर्व लोकांना साहेब दीर्घकाळ ओळखत होते. ‘जतकर’ म्हटल्यावरच ‘श्यामची मुलगी का?’ असं त्यांनी विचारताच मी खरं तर आश्चर्यचकित झालो होतो. मी ‘हो’ म्हटल्यावर सरांनी सर्वांची नावं सांगितली. बार्शीच्या ओळखी सांगितल्या. माझ्या लग्नाला साहेब आले होते आणि माझ्या सासुरवाडीच्या मंडळींसोबत बराच वेळ गप्पागोष्टींमध्ये रमले होते.
पुढे २००४ मध्येही लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी मला ओडिशात पाठवलं. तिथला अनुभवही कायम लक्षात राहणारा होता. त्या काळात मी नगर आवृत्तीचं काम काही काळ बघत होतो. नगर जिल्ह्यात त्यांच्यासोबत केलेला दौराही असाच संस्मरणीय ठरला. राजस्थानमध्ये प्रिन्स चार्ल्स आले होते, तेव्हा त्यांनी सुभाष खुटवडला तिकडं पाठवलं. वीरप्पन मारला गेला, तेव्हा सुनील मानेला तिकडचं वार्तांकन करण्याची संधी साहेबांनी दिली. त्सुनामी आली होती, तेव्हा अरविंद तेलकरांना अंदमानला जाण्याची संधीही त्यांनीच दिली.
मांढरदेवीची दुर्घटना घडली त्या दिवशी मी डेस्कवर होतो. साहेब डेस्कवर आले व मला म्हणाले, काय करतोयस? मी डेस्कवर मी तेव्हा करीत असलेलं काम सांगितलं. मला म्हणाले, चल लगेच. आपल्याला साताऱ्याला जायचंय. मग साहेबांच्या गाडीतून ते, मी आणि त्यांचे पीए चंद्रकांत आणि ड्रायव्हर असे चौघे लगेच सातारा ऑफिसमध्ये दाखल झालो. आमचे सातारा प्रतिनिधी श्रीकांत कात्रे मांढरदेवीला गेले होते. पुण्याहून पराग करंदीकर, मिलिंद वाडेकर हेही थेट मांढरदेवीला पोचले होते. अशा वेळी त्या छोट्याशा ऑफिसमध्ये बसून सर्व सूत्रं हलवायला साहेब निघाले होते. रात्री आठच्या आत सर्व आवृत्त्यांना आपली मुख्य बातमी गेली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. कात्रेंकडून त्यांनी स्वत: बातमी घेतली आणि स्वत: डिक्टेट करून, मला एकदा वाचायला सांगितली. आठच्या ठोक्याला आमची बातमी सगळीकडे पोचली होती. नंतर मग आम्ही निवांत ‘राधिका पॅलेस’मध्ये जेवून पुण्याला परतलो. तोवर पुण्याच्या मुख्य आवृत्तीची वेळ झाली होती. मग ती सगळी पानं बघूनच आम्ही ऑफिस सोडलं.
बातमीवर, कामावर प्रेम असणारा असा झपाटलेला संपादक आम्ही पाहिला. माणूस पाहत पाहत शिकतो. आम्हीही त्यांच्याकडून हे गुण घेण्याचा प्रयत्न केला. मी आणि माझे काही सहकारी ग्रामीण भागातून आलो होतो. साहेबही ग्रामीण भागातूनच आले असल्यानं त्यांना बहुदा आमच्याबद्दल विशेष आस्था वाटत असावी. शिवाय साहेबांचं माणसांवर प्रेम होतं. माणूस जपला पाहिजे, असं ते नेहमी म्हणत. याशिवाय त्यांचं पुस्तकप्रेमही अफाट होतं. मात्र, ते खरे रंगायचे ते गप्पांच्या फडात आणि जाहीर भाषणांत. त्यांचं ओघवतं वक्तृत्व ऐकणं हा एक समृद्ध करणारा अनुभव असायचा. पुण्यात नवीन आले, तेव्हा पुण्यावर व पुणेकरांवर ते खूप टीका करायचे, टोमणे  मारायचे; पण त्यांनी आम्हा सगळ्यांना जिव्हाळाही तितकाच दिला. माझ्या लग्नात आलेल्या ऑफिसच्या सहकाऱ्यांनी साहेबांचं आणि आमच्या सासुरवाडीच्या लोकांचं जमलेलं मेतकूट बघितलं आणि मला ‘साहेबांचा जावई’ अशी पदवी देऊन टाकली. मी ती गमतीत घेतली; कारण साहेबांनी कधीही मला विनाकारण झुकतं माप दिलं नाही. सर्वच नवीन मुलांवर त्यांचा लोभ होता. २००४ नंतर मात्र ऑफिसमधलं वातावरण बदलू लागलं. साहेबांना त्याचा त्रास होऊ लागला. साहेबांनी राजीनामा देण्याच्या काही दिवस आधी मंदारचं (कुलकर्णी) साताऱ्यात लग्न होतं. नीलचा पहिला वाढदिवसही त्याच दिवशी होता. सरांनी तोवर त्याला पाहिलं नव्हतं. नंतर माझ्या हातातल्या नीलला बघून म्हणाले, ‘त्याला सांग, मोठा होऊन काहीही हो, पण संपादक होऊ नकोस!’ साहेबांचं ते बोलणं ऐकून आम्ही तिथे उपस्थित असलेले सगळेच वरकरणी हसलो, पण मनातून चरकलो.
अखेर जे व्हायचं तेच झालं. काही दिवसांतच साहेब राजीनामा देऊन संस्थेतून बाहेर पडले. माझ्या पत्नीच्या आजोबांवर, दादांवर त्यांचा विशेष लोभ होता. काही काळानंतर दादा गेले, तेव्हा मी साहेबांना फोनवर कळवलं. त्या वेळी त्यांच्या मुलीचं आजारपण सुरू झालं होतं. त्यामुळं ते अस्वस्थ होते. पण तरीही त्यांनी समाचाराचा फोन केला.... मधल्या काळात अधूनमधून फोनवर बोलणं व्हायचं आणि कधी तरी त्यांचं टीव्हीतील चर्चेत दर्शन घडायचं. अस्मिता गेली त्या दिवशी ‘वैकुंठ’मध्ये साहेबांना पाहिलं. हातात डायलिसिसच्या सुया होत्या. दोन जणांनी आधार देऊनच साहेबांना तिथं बसवलं. साहेबांकडं बघवत नव्हतं. भडभडून आलं... मी निघताना गाडीत त्यांचा हात हातात घेतला. ते सर्वांनाच शून्यवत नजरेनं ‘थँक्यू थँक्यू’ म्हणत होते... मला फार वेळ तिथं उभं राहता आलं नाही...साहेब आठवतात ते दिलखुलास हसणारे, मोठ्यांदा गप्पांचा फड रंगवणारे, एकही शब्द न बोलता आमच्यावर माया करणारे... आमच्या प्रगतीसाठी, उत्कर्षासाठी होता होईल ते सगळं करणारे... असे संपादक होणे आता दुर्मीळच...त्यांचं ऐहिक अस्तित्व संपलं, त्याला आज बरोबर एक महिना झाला... होळीच्या दिवशी सर गेले... त्या वेळी खूप जणांनी खूप काही लिहिलं... मग मी मुद्दामच मागं थांबलो... आज मात्र लिहिल्याशिवाय राहवलं नाही.साहेब, तुम्ही कायम स्मरणात राहाल... मनातल्या कृतज्ञभावासह!


---



27 Mar 2020

मटा लेख - करोना कसोटीचा काळ

कसोटीचा काळ
--------------------

मानवी जीवनाच्या अस्तित्वापासून आतापर्यंत प्रत्येक विशिष्ट टप्प्यानंतर एक कसोटीचा काळ मानवी जमातीच्या वाट्याला आला आहे. नैसर्गिक आपत्ती, साथीचे रोग, महायुद्धे यात हजारो, लाखो माणसे जिवानिशी गेली आहेत. अगदी गेल्या शतकाच्या पूर्वार्धातही आपल्या राज्यात, देशात प्लेगच्या साथीने हजारो माणसे मरण पावली. महाराष्ट्र व कर्नाटकात इ. स. १३९६ ते १४०७ या बारा वर्षांत सलग पडलेला व हजारो लोकांचा प्राण घेणारा ‘दुर्गादेवीचा दुष्काळ’ही कुख्यात आहे. पानिपतची तिन्ही युद्धं आणि एकूण मध्ययुगात झालेली सगळीच युद्धं कित्येक हजार माणसांचे जीव घेऊनच संपली. विसाव्या शतकात झालेल्या पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाची प्रत्यक्ष नसली, तर अप्रत्यक्ष झळ आपल्याला बसलीच होती. फाळणीच्या वेळी तर पंजाब व बंगाल या प्रांतांना सर्वाधिक झळ बसली व हजारोंचं रक्त सांडलं. याशिवाय भारतात त्सुनामी, भूकंप, महापूर अशा नैसर्गिक संकटांनी ठरावीक काळानंतर शेकडो-हजारो माणसं हे जग सोडून जातात. एकविसाव्या शतकात सर्वांत स्मार्ट तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे आपल्याला अगदी सुरक्षित समजून चाललो होतो. एखाद्या वेगवान घोड्यावर स्वार होऊन स्वैरपणे दौडत निघावं, तसे आपण सगळेच जण पत्ता माहिती नसलेल्या सुखाच्या शोधात बेफाम दौडत होतो. अचानक घोड्याच्या पायात ‘करोना विषाणू’चा अडथळा येऊन आपण धाडकन आपटलो आहोत. पुरते जखमी झालो आहोत. त्यामुळे गती थांबली आहे व मती गुंग झाली आहे!
सध्याचा काळ कसोटीचा आहे. आपल्यातल्या ‘माणसा’ची ही कसोटी आहे. माणसं म्हटली, की वेगवेगळे स्वभाव आले. प्रत्येक जण या संकटाला वेगळ्या पद्धतीने सामोरा जातो आहे. या संकटाला तोंड देण्याची प्रत्येकाची रीत वेगळी आहे. कुणी खूप घाबरलंय, तर कुणी खूप बेफिकिरी दाखवतंय. कुणी मनातून घाबरलंय, पण उसनं अवसान आणतंय; तर कुणी खरोखर खंबीरपणे उभे आहेत. अशा वेळी आपल्यातल्या मनोधैर्य, संयम, चिकाटी, निग्रह आदी गुणांची कसोटी लागणार आहे. हे शब्द कधी तरी विशेषणं म्हणून शिकलो असू, पण आज आपल्यात त्या विशेषणांची रुजवण करणं आवश्यक झालंय. संकटकाळात सर्वाधिक कसोटी लागते ती माणुसकीची. जीव वाचविण्यासाठी आपल्या पिलाला पायाखाली धरून पाण्याबाहेर येणाऱ्या माकडिणीची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. आजूबाजूला जरादेखील सामाजिक संकटांची चाहूल लागली, की आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावणारे या माकडिणीच्या कुळातले अनेक जण आता दिसतील. आपल्या घरी अन्नधान्याचा गरज नसताना भरपूर साठा करून ठेवणारे, रांगा मोडून मॉलमधल्या वस्तू हडप करणारे, क्वचित दुसऱ्याच्या हातातल्या वस्तू ओरबाडणारे लोक आपल्याला आजूबाजूला दिसतातच. दुसऱ्या बाजूला स्वत:चं घरदार विसरून आजारी रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी, सार्वजनिक वाहतूक सेवांचे ड्रायव्हर-कंडक्टर, अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलिस, मेडिकल दुकानदार असे किती तरी लोक या संकटाचा निर्धाराने सामना करतानाही दिसत आहेत. आपण कुठल्या बाजूला असावं हे ठरविण्याची, आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला आवाहन करण्याची हीच ती वेळ!
एखाद्या आपत्तीतून चांगलं काही तरी निघतं, असं म्हणतात. आत्ताच्या या आपत्तीची एकूण व्याप्ती व भयावहता अजून तरी आपल्याला पूर्णपणे समजली आहे का, हा प्रश्नच आहे. मात्र, अगदी नजीकच्या काळात तरी ती संपुष्टात येईल अशी चिन्हे आत्ता तरी दिसत नाहीत. तेव्हा आता या आपत्तीला इष्टापत्ती मानून आपल्याला आपल्या सगळ्या जगण्याचाच फेरविचार करण्याची ही उत्तम संधी आहे. आपल्या भयंकर वेगाने निघालेल्या महानगरी जगण्याला सक्तीने मिळालेली ही विश्रांती आहे. हा ‘पॉज’, हा अल्पविराम समजून घ्यायला हवा. आपण आपल्या जगण्यात केवळ ‘पीअर प्रेशर’नं कित्येक गोष्टी करीत आलो आहोत का, याचाही पुन्हा एकदा आढावा घ्यायची गरज आहे. भौतिक सुखांच्या मागे अनावर ओढीनं तुफान धावत सुटलेलो आपण... गेल्या किमान दहा वर्षांत किती वेळा हा वेग स्वत:हून कमी केला आहे, हे तपासून पाहायला हवं. अधिक हवे, अजून अधिक हवे या हव्यासापोटी आपण बेभान झालो. आपली महानगरं वाढत्या लोकसंख्येमुळं रोगटपणे सुजली, फुगली. रस्त्यांवरच्या चारचाकी वाढल्या, प्रदूषण वाढलं. वाहतूक कोंडी तर रोजचीच डोकेदुखी झाली.
महानगरांत रोजगार मिळाला, हातात पैसा आला. मग तो खर्च करण्याची वेगवेगळी ठिकाणं आली. मॉल, मल्टिप्लेक्स, स्पा, रिसॉर्ट, परदेश प्रवास अशा एक ना दोन मार्गांनी खर्चाचा ओघ वाढू लागला. पैशाची पाकिटं जाडजूड होती. त्यामुळं हे खर्चही काहीच वाटेनासे झाले. मग सोशल आउटिंग, मग त्या नावाखाली मद्यपान, महागड्या गाड्या, सुपर हाय-वे... अशी सगळी मस्त धुंदी चढली डोळ्यांवर! याच काळात आजूबाजूला सगळेच एवढे भाग्यवान नाहीत, याचंही भान सुटलं. पूर्वीच्या काळी सगळ्यांमध्येच एक प्रखर सामाजिक जाणीव असायची. आता ती धूसर होत चालली. कुटुंबातलाच संवाद संपत चालला, तिथं बाकी समाजाची काय कथा! आपण अधिकाधिक स्वकेंद्रित, आत्ममग्न होत चाललो. मी, माझं, मला यापलीकडे काही सुचेनासं झालं. आपलं वर्तुळ आपण आकसत आकसत स्वत:च्या केंद्रबिंदूपुरतं छोटं करून टाकलं. तिथं अन्य कुणालाही प्रवेश नव्हता. त्यामुळं अलीकडच्या काळात नैसर्गिक आपत्ती आल्या, तरी त्याला आपण दिलेला प्रतिसाद बघण्यासारखा होता. मागच्याच वर्षी पुण्यात दोन वेळा प्रचंड पूर आला होता. त्या वेळी पहिल्यांदाच अशी भीती वाटली होती. दहा-बारा वर्षांपूर्वी ‘स्वाइन फ्लू’चं संकट आपण झेललं. तेव्हाच्या आणि आताच्या प्रतिसादात निश्चितच फरक पडला होता. आता आपल्याला स्वत:पलीकडं पाहायला फुरसतच नाही, अशी स्थिती आहे.
‘करोना’नं जे जागतिक संकट आणलंय, त्यामुळं या सगळ्या सुखासीनतेला खाडकन शॉक बसावा तसा जोरदार धक्का बसला आहे. सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या तशा, आपल्याला वाटेल तशा होणार नाहीत, याची जळजळीत जाणीव या संसर्गजन्य विषाणूनं करून दिली आहे. आपल्याला निसर्गाचे नियम पाळावेच लागतील आणि माणूस म्हणून, समाज म्हणून जगण्यासाठी जे सर्वमान्य नियम केले आहेत, तेही कसोशीनं पाळावे लागतील, हे या संकटानं पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. संगणकाच्या भाषेत सांगायचं तर जगणं कदाचित पुन्हा ‘रिसेट’ केलं गेलंय. आता सगळ्याच धारणा पुन्हा तपासून पाहायची वेळ आली आहे. वैयक्तिक आयुष्यात आपल्यावर अचानक एखादं संकट कोसळलं, तर आपण भांबावून जातो, घाबरून जातो, खचतो. इथं संपूर्ण मानवजातीवरच हे संकट घोंघावतं आहे. त्यामुळं जी काही भीती आहे ती जागतिक आहे. आपल्या जिवाची काळजी प्रत्येकालाच आहे. उद्या या विषाणूवरही लस नक्कीच निघेल. सगळं काही पूर्वीसारखं होईल. पण आपण त्यानिमित्ताने आपल्या या भयावह वेगवान जीवनशैलीत बदल केला तर ते सगळ्यांच्याच फायद्याचं होईल, यात शंका नाही. मृत्यू समोर दिसला, की भलेभले गारठतात. माणसाला आपला जीव सर्वांत प्यारा असतो. आता आपलाच नाही तर सगळ्यांचाच जीव वाचविण्याची वेळ आहे. हा एक इशारा आहे, असं समजून आपल्या सगळ्या जगण्यालाच वेगळं वळण देता येतं का पाहूया. कमीत कमी वस्तूंमध्ये भागविण्याची ‘मिनिमलिस्ट’ जीवनशैली अंगिकारता येईल का? पुन्हा खेड्याकडे जाता येईल का? सर्वत्र धान्य किंवा भाजीपाला नैसर्गिक पद्धतीनेच पिकविता येईल का? किमान शहरांतील प्रदूषण कमी करता येईल का? थुंकण्यासारख्या अनारोग्यकारक विकारांतून कायमची सुटका करून घेता येईल का? रोजच्या जगण्याला आवश्यक तेवढी किमान कामं आपण करू शकतो का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधता येतील.
देव करो आणि हे संकट लवकर टळो. पण त्यानिमित्तानं हे काही बदल आपण केले आणि नंतर काही काळानंतर पाहिलं, तर कदाचित आपलं जगणं अधिक स्वच्छ, सुंदर, निरोगी झालेलं दिसेल!

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, २२ मार्च २०२०)

---

16 Mar 2020

मटा - करोना लेख

सकारात्मक, तत्पर...
-------------------------


करोना विषाणूनं सध्या आपल्या जगण्यात ‘जंतुप्रवेश’ करून हलकल्लोळ उडवून दिलाय. जग कितीही प्रगत, पुढारलेलं झालं असलं, तरी एक साध्या डोळ्यांनीही दिसू न शकणारा विषाणू आपल्या सगळ्या मानवजातीला कसा मुळापासून हादरवून सोडू शकतो, याचा करुण अनुभव आपण घेत आहोत. माणसाचं जगणं किती ‘व्हल्नरेबल’ आहे, याची पदोपदी जाणीव होते आहे. आपल्या देशात आधीच कमी समस्या होत्या जणू, म्हणून या नव्या साथरोगाची भर त्यात पडली! असं काही झालं, की आपल्याकडं स्वाभाविकच त्याच गोष्टीवर सगळीकडं चर्चा सुरू होते. हल्ली सोशल मीडियामुळं सल्ला आणि शहाणपण यांचं मोफत वितरण सगळीकडं सुरू असतं. त्यातून अफवा नावाचा एक नवाच व्हायरस धुमाकूळ घालायला लागतो. अशा वेळी खरोखरच या ‘करोना’नं आपल्या देशात जास्त प्रमाणात शिरकाव केला तर काय होईल, या विचारानं झोप उडते. आपल्या देशातील खूप जास्त लोकसंख्या, गर्दीची ठिकाणं, लोकांच्या अनारोग्यकारक सवयी, स्वच्छतेचा अभाव, आरोग्य सुविधांची वानवा आणि एकूणच प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता यामुळं साथरोगासारख्या एखाद्या मोठ्या संकटाला तोंड देण्यात आपण कमी पडू की काय, असं सतत वाटत राहतं.
आताचं चित्र मात्र सुदैवानं तसं नाही. आपल्या देशाला कुणी कितीही नावं ठेवली, तरी इथं काही-एक व्यवस्था आहे आणि ती कुठल्याही संकटाला समर्थपणे तोंड देऊ शकते, असा विश्वास प्रत्येकाच्या मनात निर्माण होईल, एवढं चांगलं काम आपल्या सरकारकडून आणि प्रशासनाकडून होतंय. अशा आपत्तीच्या काळात सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ठोस निर्णय घेणारं सरकार आणि त्याची कार्यक्षमतेनं अंमलबजावणी करणारी नोकरशाही! या दोघांनाही अर्थातच देशभरातल्या सर्वच सामान्य नागरिकांची मनापासून साथ असणंही तितकंच महत्त्वाचं आणि आवश्यक असतं. या वेळी आपल्याकडं या तिन्ही गोष्टींचा चांगला मिलाफ झालेला दिसतो. त्यामुळं ‘करोना’चा मुकाबला आपण आत्मविश्वासाने आणि यशस्वीपणे करू शकू, असं म्हणायला हरकत नाही. आरोग्य, औषधनिर्माण व प्रशासन या क्षेत्रांत काम करणाऱ्या काही तज्ज्ञांशी याविषयी चर्चा केल्यानंतर तर याची खात्रीच पटली!
अशा जागतिक संकटाच्या वेळी कुठल्याही प्रसंगाला त्वरित प्रतिसाद देणं गरजेचं असतं. या वेळी सरकारनं तशी पावलं उचलली. ‘करोना’कडं दुर्लक्ष केल्यास काय होतं, याचं उदाहरण इटली आणि इराणच्या रूपानं आपल्या समोर आहे. ‘करोना’ची बाधा झालेल्या लोकांचं तातडीनं विलगीकरण करणं आणि त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू करणं या गोष्टी तिथं त्वरेनं झाल्या नाहीत. त्यामुळं आपल्यापेक्षा किती तरी आधुनिक आरोग्य सुविधा असूनही त्या देशातील मृतांची संख्या किती तरी पटींनी जास्त आहे. तीच गोष्ट इराणची. आपल्याकडं आपल्याला असं दुर्लक्ष करणं परवडणार नाही. मुळात हा विषाणू किती लोकांच्या अंगात भिनलाय आणि ते लोक आणखी किती लोकांना संसर्ग पोचवू शकतात, हे लक्षात यायला किमान १४ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळं अशा रुग्णांना तातडीनं शोधणं, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवणं व त्वरित उपचार सुरू करणं हे अत्यावश्यक असतं. आपल्याकडं पहिल्या टप्प्यात या गोष्टी झाल्या नसल्या, तरी केरळमध्ये पहिला रुग्ण सापडल्यापासून मात्र केंद्र सरकार व संबंधित राज्य सरकारांनी त्वरित हालचाली केल्या. मार्च उजाडल्यानंतर महाराष्ट्रात पहिले रुग्ण नोंदविले गेले. लवकरच ही संख्या ८० च्या घरात गेली. तुलनेनं हे प्रमाण कमी असलं तरी प्रसार रोखण्यासाठी व्यापक उपाययोजनांची गरज होती. ते उपाय सरकारनं त्वरित केले. एक तर आपण इतर देशांच्या नागरिकांचा व्हिसा स्थगित केला. त्यामुळे बाहेरचे नागरिक आपल्या देशात येणं बंद झालं. हे करणं आवश्यक होतं. कारण भारतात आत्तापर्यंत झालेला संसर्ग हा परदेशातून इथे आलेल्या लोकांनाच झालेला दिसतो. याशिवाय विमानतळांवर स्क्रीनिंगची व्यवस्था उभारण्यात आली. परदेशांतून आलेल्या ज्या लोकांना संसर्ग झाल्याचा संशय आहे किंवा ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशा सर्व रुग्णांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची व्यापक शोधमोहीम प्रशासनाच्या पातळीवर सुरू करण्यात आली. ही कार्यतत्परता अभूतपूर्व होती. या जोडीनं रुग्णांची संख्या वाढीला लागल्याबरोबर विविध राज्य सरकारांनी सार्वजनिक ठिकाणांवरील माणसांचा वावर कमी करण्यासाठी सक्तीच्या ‘बंदी’च्या घोषणा केल्या. त्या योग्यच होत्या. या उपाययोजनांमुळं नागरिकांत काहीशी घबराट पसरल्यासारखी वाटली, तरी अंतिमत: हे उपाय सर्वांच्या हिताचेच आहेत, यात शंका नाही.
परदेशांत राहणाऱ्या आपल्या नागरिकांची काळजी घेणारा भारत हा जगातील सर्वांत अग्रणी देश आहे, यात दुमत नसावं. चीनमधल्या वुहान या शहरातून आणि इतरही ठिकाणांहून भारताने सर्वाधिक विमानफेऱ्या करून आपली माणसं परत देशात आणली. केवळ भारतीयच नव्हेत, तर बांगलादेशच्या नागरिकांनाही भारताने तेथून परत आणले. इराणमध्येही आपण लष्करी विमान पाठवून तेथील भारतीय नागरिकांना आणण्याची तत्परता दाखवलीय. एवढेच नव्हे, तर इराणमध्येच मेडिकल सेटअप उभारून तपासणीची सोय करण्याचीही तयारी भारताने दर्शविली होती. मात्र, इराणच्या आडमुठेपणामुळे ते काही होऊ शकलं नाही.
आपल्याकडच्या विषाणू शास्त्रज्ञांचं आणि डॉक्टरांचंही कौतुक करायला हवं. त्यांनी ‘करोना’च्या तपासणीसाठी लागणारा वेळ प्रयत्नपूर्वक कमी केला आहे. विकसित देशांपेक्षाही वेगाने ही तपासणी आपल्याकडे होते आहे. याखेरीज देशभरात अल्पावधीत आणखी मोठ्या प्रमाणात या प्रयोगशाळा उभारण्याचा निर्धार केंद्र सरकारनं केला आहे. त्यामुळं इतर विकसनशील देश अशा प्रयोगशाळा उभारून देण्याची मागणी आपल्या देशाकडे करू लागले आहेत. मालदीवसारख्या छोट्या देशात तर आपण मदतीसाठी वैद्यकीय पथकही पुरेशा तयारीनं पाठवलं आहे. मास्क आदी वस्तूंचा पुरवठा करण्यात चीन आघाडीवर असतो. मात्र, तेथे आता या वस्तूंचा तुटवडा जाणवू लागल्यावर भारतानेच या वस्तूंचा पुरवठा त्या देशाला सुरू केला आहे. आपल्याकडे औषधांच्या किमतीही तुलनेनं स्वस्त आहेत. आपल्याकडे अनेक सेवाभावी डॉक्टर आणि स्वयंसेवी संस्था अशा वेळी सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला पुढं येतात, हेही आपण कायम अनुभवत असतो.
आपल्या देशात काहीएक व्यवस्था आहे आणि प्रसंग पडला, की ती खंबीरपणे काम करून आपलं कर्तव्य निभावत असते. लोकांच्या प्रश्नांचं भान असलेले लोकप्रतिनिधी, प्रशासनातील मेहनती अधिकारी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे लाखो कर्मचारी-अधिकारी व डॉक्टर यांच्या कार्यतत्परतेचं कौतुक करायलाच हवं. अशा वेळी मला आपला देश गावाकडच्या जुन्या-जाणत्या, अनुभवी शहाणपण असलेल्या समजूतदार वडीलधाऱ्यासारखा भासतो. विकसित देश म्हणजे ‘शहरं’ म्हटलं, तर आपला देश म्हणजे ‘गाव’च आहे, यात दुमत नसावं. आपल्या देशात अनेक त्रुटी आहेत, कमतरता आहे, बेशिस्त आहे.... हे सगळं मान्य करूनही इथले बहुसंख्य कष्टाळू, ‘जुगाडू’ आणि शहाणपण असलेले लोक जगातल्या कुठल्याही संकटावर मात करू शकतील, यावर माझा ठाम विश्वास आहे. ‘करोना’चं आव्हानही असंच परतवून लावू, यात काहीच शंका नाही.

---
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; १५ मार्च २०२०)

---

15 Feb 2020

मटा मैफल लेख

चाळिशीतला ‘व्हॅलेंटाइन’
------------------------------



आमचा एक मित्र आहे. कथनाच्या सोयीसाठी आपण त्याला कान्हा म्हणू या. तर हा कान्हा आता चाळिशीच्या पार पोचला आहे. तरीही फेब्रुवारीचा दुसरा आठवडा उजाडला, की त्याला छातीत उगाचच धडधड वगैरे व्हायला लागते. वास्तविक ही धडधड हाय बीपी किंवा ॲसिडिटीची असू शकेल, असा पोक्त सल्ला आम्ही मित्र त्याला कायमच देत असतो. मात्र, तो आमच्या या जुलमाच्या फुकटच्या सल्ल्याकडे मुळीच लक्ष देत नाही. ही नाजूक धडधड ‘व्हॅलेंटाइन डे’च्या चाहुलीमुळेच निर्माण झालेली आहे, यावर त्याची नितांत श्रद्धा आहे.
अशा वेळी मग कान्हाला भेटणं क्रमप्राप्त ठरतं. चोवीस तास तारुण्य वाहत असलेल्या रस्त्यावरचं एक स्त्रीलिंगी नाव असलेलं रेस्टॉरंट कान्हा निवडतो, हे सांगायला नकोच. इथं आल्यावर आमच्यासारख्यांचं वयही दहा वर्षांनी कमी होतं, तिथं कान्हाला सोळाव्या वर्षाचा उत्साह यावा, यात नवल नाही. इथं कान्हाचं ठरलेलं कोपऱ्यातलं टेबल आहे. त्याला कधीच वेटिंग करावं लागत नाही. इथं बसल्यानंतर कान्हा ज्या नजरेनं त्या रेस्टॉरंटमधील यच्चयावत बायका स्कॅन करतो, ती नजर केवळ देवलोकीच्या गंधर्वांनाच लाभलेली असू शकते. ती इहलोकीची नजर नव्हे. आम्ही कधी चुकून नजरानजर करायला गेलो, तर संबंधित पात्रासोबत आलेलं थोराड पुरुषपात्र आमच्याकडं विनाहेल्मेटवाल्याकडं ट्रॅफिकवाला पाहतो तशा नजरेनं पाहतं. आमची पात्रता, अर्थात लायकी लगेच सिद्ध होते. कान्हाच्या राशीत मात्र टॉम क्रूझ किंवा मिलिंद सोमण आदी ग्रह उच्चस्थानी असावेत. कारण तो त्या कोपऱ्यात बसलाय आणि आसमंतातून एकही ओळखीची स्त्री येऊन त्याला भेटून गेली नाही, असं एकदाही झालेलं नाही. तर अशा रीतीनं हा सगळा सोहळा साग्रसंगीत पार पडल्यानंतर कान्हा माझ्याकडं वळाला.
‘हं, बोल... काय म्हणतोय तुमचा व्हॅलेंटाइन डे?’
‘आमचा व्हॅलेंटाइन डे संपला कधीच... दहा वर्षं झाली त्याला... तुमचं घोडं फुरफुरतंय पण अजून...’ मी वैतागानं म्हणालो.
‘मला तुझ्यासारख्या पुरुषांचं हेच आवडत नाही,’ कान्हा म्हणाला. ‘तुम्हाला व्हॅलेंटाइन डे’ म्हणजे अजूनही ती गुलाबाची फुलं, ते एकाच स्ट्रॉनं कोका-कोला पिणं, अर्धं अर्धं चॉकलेट खाणं, गुडघ्यावर बसून प्रपोज मारणं हेच वाटतं ना?’
‘मग अजून काय वाटायचंय? आणि हे सगळे प्रकार करण्याचं काही एक वय असतं. आपलं ते वय उलटून गेलंय महाराज. वेळेत लग्न केलं असतंस तर आज मुलगा कॉलेजात असता... आणि त्यानं व्हॅलेंटाइन डे साजरा केला असता... आपण नव्हे...’
‘अरे, मुलगा असता तर त्याच्यासोबत मीही व्हॅलेंटाइन डे साजरा केलाच असता. कारण प्रेमाला फक्त ‘प्रेम’ माहिती असतं, वय नाही...’
‘हे डायलॉग सिनेमात ठीक आहेत रे कान्हा... प्रत्यक्ष आयुष्यात आम्ही आता १५-१५, २०-२० वर्षं संसार झालेले काका लोक झालो आहोत. आम्हाला कसला आलाय व्हॅलेंटाइन डे?’
‘तेच म्हणतोय मी! तुम्हाला ‘व्हॅलेंटाइन डे’चा फारच मर्यादित अर्थ दिसतो आणि जाणवतो ना, म्हणून हा सगळा घोटाळा आहे. आणि काय रे, आता तुम्ही ‘काका’ झाला आहात, तर तुमच्या बायकाही काकवा झाल्याच आहेत की...’
कान्हाचं हे वाक्य ऐकून मी दचकलो. याला चारचौघांत काय बोलावं आणि काय उच्चारावं याचं काही भानच नाही. विशेषत: ‘तुमच्या बायका’ हा बहुवचनी उल्लेख अस्मादिकांना किंचित सुखावून, पण बराचसा दुखवून गेला होता. वर हा आमच्या बायकांना काकूबाई म्हणत होता. मुळात असली वाक्यं मोठ्यानं कशाला बोलावीत? मार खाण्याची लक्षणं... पण कान्होबाचं अजिबात तिकडं लक्ष नव्हतं.
‘कामिनी...’ कान्हा थंडपणे उच्चारता झाला. तेवढ्यात शेजारून एक स्वयंघोषित रूपगर्विता जाता जाता ठेचकाळली.
‘कामिनी’त काना जास्त पडला की काय, असा एक भयंकर व्याकरणी विचार मनात येऊन गेला. पण बाई इंग्लिशमधून दोन-तीन उच्चविद्याविभूषित शिव्या हासडून पुढं गेल्या, तेव्हा दोष कान्हाच्या उच्चाराचा नसावा, हे कळलं. कान्हा स्थितप्रज्ञ होता.
‘अरे, हळू बोल. कोण कामिनी?’
‘समोरून तिसरं टेबल. डावा कोपरा... थर्ड इयरला सेकंड सेमिस्टरला भेटली होती.... गोव्याच्या सहलीत हिनं पम्याचा पाय आणि पापड एकदमच मोडला होता...’
एखाद्या ज्ञानकोशानं स्वत:हून माहिती सांगावी तसा कान्हा त्या कोणा कामिनीची कुंडली माझ्यासमोर उलगडता झाला. कान्हाच्या एकूण आयुष्यात आलेल्या, गेलेल्या, टिकून राहिलेल्या, मधल्याच स्टेशनवर चढलेल्या, स्प्रेसारख्या काही काळ सुगंध पसरवून विरून गेलेल्या, मुरलेल्या लोणच्यासारख्या, सर्दीसारख्या सात दिवस टिकलेल्या अशा समस्त बायकांची यादी त्यानंच केली असती, तर महाराष्ट्राला वेगळा स्त्रीकोश करायची गरजच भासली नसती. एवढा अनुभव गाठीशी असलेला कान्हा पाहून मला त्याच्याच नावाने एक मराठमोळा ‘कान्हा डे’ सुरू करावा, अशी कल्पना चाटून गेली.
कान्हा बोलतच होता, ‘आता ही कामिनीच बघ. तेव्हा हजार जण हिच्या मागे असावेत. तेव्हा हिनं भाव दिला नाही. आता ही किमान हजार जणांच्या मागे असेल. पण हिला कुणी भाव देत नाही... त्यामुळं आपला व्हॅलेंटाइन योग्य वयातच पार पडला पाहिजे...’
हे वर्णन खरं तर कान्हालाही लागू होत होतं. पण मी त्याला ऐकवायचं धैर्य करू शकलो नाही. (आमचं बिल नेहमी तोच देतो.) मात्र, दांडग्या अनुभवाच्या जोरावर कान्हा मला वाट्टेल ते ऐकवू शकत होता. माझं काम फक्त ऐकून घेण्याचं होतं.
कान्होबा महाराज प्रवचन देते जाहले, ‘प्रेम करण्यासाठी वयाची गरज नसते. उलट आता चाळिशीत आपल्या जोडीदाराची जास्त गरज असते. करिअरमध्ये विशिष्ट टप्पा आलेला असतो. मुलं मोठी झालेली असतात. आर्थिक स्थैर्य आलेलं असतं. अशा वेळी एकच गोष्ट आपल्याजवळ नसते, ती म्हणजे एकमेकांना द्यायचा वेळ. तेव्हा व्हॅलेंटाइन डेची गिफ्ट म्हणून तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमचा वेळ दिला पाहिजे. या वयात तुम्ही समाजात काही-एक स्थान मिळवलेलं असतं. काही वेळा तुमचं नावही होतं. अनेक लोक तुम्हाला ओळखू लागतात. तुमच्या पदाला, प्रतिष्ठेला समाजात किंमत असते, मान असतो, प्रतिष्ठा असते. मग त्या पदासाठी, प्रतिष्ठेसाठी अनेक जण तुमच्याशी ओळख वाढवू लागतात. त्यात अनेक जणीही आल्याच. मग गुंते होण्याची शक्यता वाढते. तेव्हा हे सगळं मायाजाल नक्की काय आहे, हे समजून घ्यावं लागतं. आकर्षण नक्की कोणाचं आहे? तुमचं की तुमच्या वलयाचं, हे कळून घ्यावं लागतं.’
कान्हा फारच विलक्षण काही तरी बोलत होता. मला चक्क त्याच्याविषयी आदर वाटू लागला. एवढ्या बायका त्याच्या ओळखीच्या कशा, याचं कोडं सुटतंय असं वाटू लागलं. तेवढ्यात एक ‘सुंदर, खाशी, सुबक ठेंगणी’ येऊन कान्हाला कॅडबरी देऊन गेली. अजून एक काकूसदृश महिला येऊन कान्हाचा चक्क गालगुच्चा घेऊन गेल्या. पण मला आता त्याचं विशेष काही वाटेनासं झालं होतं.
‘मुळात प्रेम ही संकल्पना किती व्यापक आहे! चराचरांत व्यापून प्रेम दशांगुळे उरतंच...’ कान्हा आता छताकडे पाहून बोलत होता. तेव्हा त्यानं बोलण्यातली आध्यात्मिक पातळी गाठली, हे मी ओळ‌खलं. कान्होमहाराज वदले, ‘अशा प्रेमाला कुठल्या तरी ‘डे’ किंवा आठवड्यात अडकवणं मला हास्यास्पद वाटतं. मात्र, प्रतीकात्मक म्हणून तुम्हाला हा सण साजरा करायचाच असेल, तर त्याचं मर्म आधी समजावून घ्या. उगाच फुलं, कॅडबऱ्या आणि सेंटच्या बाटल्या यांच्यावर खर्च करू नका. आता तसंही तुमच्याकडून जरा जास्तीची अपेक्षा असते. तेव्हा जरा हिरे, प्लॅटिनमचं बघा... गमतीचा भाग सोड, पण अरे, खरंच, जरा वेगळा विचार करून पाहा. आता या वयातल्या प्रेमाला घेण्यापेक्षा देण्याची जास्त गरज असते. तुम्ही तुमच्या जोडीदाराला द्यायचा असतो तो वेळ, विश्वास आणि कुठल्याही अडचणीत पाठीशी उभं राहण्याचा खंबीर पाठिंबा... मग बघ... प्रेम कसं मुरंब्यासारखं मुरत मुरत गोड होत जातं ते...’
कान्हाच्या या व्याख्यानानंतर मी वेळ, विश्वास आणि पाठिंबा घेऊन घरी निघालो, तर कान्हानं रस्त्यात आल्या आल्या समोरच्या एका देखण्या अंगाकडं बघून जोरात शिट्टी मारली. मी पळायच्या बेतात होतो तोच मला पकडून कान्हा म्हणाला, ‘नीट बघ हिच्याकडं... रश्मी आठवतेय का अकरावी सायन्सची?’
मी कान्हाच्या पाया पडलो आणि त्या तारुण्य वाहत असलेल्या रस्त्यातून, जरा अधिक तरुण होऊन वाहत निघालो...

---

(पूर्वप्रसिद्धी : मटा मैफल पुरवणी, पुणे आवृत्ती; १५ फेब्रुवारी २०२०)

---

13 Feb 2020

सुषमा स्वराज लेख - समतोल दिवाळी अंक १९

सुभाषिणी, रणरागिणी...
-----------------------------




राजकारणी लोकांकडं बघण्याचा आपला भारतीय लोकांचा दृष्टिकोन जरा तिरकस आणि तुच्छतेचाच. आदर वाटावा असे फार कमी चेहरे आता राजकारणात उरले आहेत, हेही खरंच. पण सुषमा स्वराज यांच्याकडं पाहिलं की, कसं प्रसन्न वाटायचं! अत्यंत शालीन, सोज्ज्वळ आणि तेजस्वी असा त्यांचा चेहरा पाहिला, की एखाद्या देवीचंच मूर्त रूप आपण पाहतो आहोत, असं वाटायचं. कधी कधी आपल्या आईचा, मावशीचा किंवा प्रेमळ आत्याचाही भास त्यांच्यात व्हायचा. त्यांचं हे असं थेट लोकांशी जोडलं जाणं खूप गोड होतं. त्यामुळंच पक्षाची मर्यादा ओलांडून सर्व जनतेला त्या आपल्याशा वाटायच्या. सुंदर गोल चेहरा, त्यावरचं ठसठशीत कुंकू, आदबशीर पद्धतीनं शरीर झाकून घेतलं जाईल अशी नेसलेली साडी, त्यावर स्वेटर अशा रूपातल्या सुषमा स्वराज प्रथमदर्शनी राजकारणी व्यक्ती वाटायच्याच नाहीत. त्यांचं हे 'अस्सल भारतीय नारी'चं रूप अनेकांना मोहवून टाकणारं आणि त्यांच्याकडं सहज आकर्षून घेणारं होतं. विशेष म्हणजे हे आकर्षण आदरयुक्त असे. त्यात असलाच तर भक्तिभावाचा अंश असे. स्त्रीकडं एरवी बघितलं जातं, तशा आकर्षणाचा त्यात लवलेशही नसे. याचं कारणही पुन्हा सुषमा स्वराज यांनी सार्वजनिक जीवनात वावरताना कायमच पाळलेली एक सभ्यतेची मर्यादा! त्यामुळं त्यांचा कथित शत्रूदेखील त्यांच्याकडं वावग्या भावनेनं बघू शकायचा नाही. राजकारणाच्या पलीकडं जाऊन आपल्या ऋजू, पण कणखर स्वभावाच्या आधारे सुषमा स्वराज यांचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व उभं राहिलं होतं. या सर्व व्यक्तिमत्त्वाच्या वर दशांगुळे उरेल असं होतं ते त्यांचं वक्तृत्व! 'सुहासिनी, सुमधुरभाषिणी' या 'वंदे मातरम्'मधल्या ओळी जणू ज्यांच्यासाठी लिहिल्या असाव्यात असं वाटावं, अशा सुषमा स्वराज होत्या.
भारतीय राजकारणात महिलांनी एवढं उत्तुंग स्थान गाठणं तसं नवं नव्हतं. याचं कारण इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होऊन गेल्या होत्या. मात्र, इंदिरा गांधींचा वारसा वेगळा होता. त्या जवाहरलाल नेहरूंची कन्या होत्या. सुषमा स्वराज यांच्यामागे एवढा उत्तुंग वारसा नव्हता. मात्र, तरीही त्यांनी आपल्या कर्तृत्वानं राजकारणात मोठं स्थान मिळवलं. परराष्ट्रमंत्रिपदापर्यंत मजल मारली. या पदावर काम करताना केवळ राजकारणात नव्हे, तर देश-परदेशांतील भारतीयांच्या मनात त्यांनी खास स्थान मिळवलं. म्हणून तर त्यांचं निधन झालं, तेव्हा अवघ्या देशातच आपल्या घरातलं कुणी तरी गेलंय, अशी भावना निर्माण झाली होती.
सुषमा स्वराज यांच्या जीवनपटाकडं एक दृष्टिक्षेप टाकला असता, त्यांच्या यशोगाथेची काहीशी कल्पना येऊ शकेल. त्यांचा जन्म व्हॅलेंटाइन डेचा. जगाला प्रेम अर्पण करण्याचा संदेश देणाऱ्या संत व्हॅलेंटाइनच्या जन्मदिनीच सुषमा स्वराज यांचा जन्म व्हावा, हा आगळा योगायोग म्हणावा लागेल. याचं कारण पुढील सर्व आयुष्यात सुषमा यांनी जनतेचं भरपूर प्रेम मिळवलं आणि आपल्या देशावर, धर्मावर, पक्षावर मनःपूत प्रेम केलं. हरियाणातल्या अंबाला कँटोन्मेंट या शहरात १४ फेब्रुवारी १९५२ रोजी हरदेव शर्मा आणि लक्ष्मीदेवी या दाम्पत्याच्या पोटी सुषमांचा जन्म झाला. हे शर्मा कुटुंब मूळचं लाहोरमधील धरमपुरा परिसरातलं. फाळणीनंतर हे कुटुंब भारतात स्थलांतरित झालं आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साधारण पाच वर्षांनी सुषमांचा जन्म झाला. अंबाला कँटोन्मेंट येथील सनातन धर्म कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं. संस्कृत आणि राज्यशास्त्र हे मुख्य विषय घेऊन त्यांनी पदवी प्राप्त केली. पुढील आयुष्यात सुषमा यांनी अतिशय शुद्ध, तुपात घोळलेल्या संस्कृतप्रचुर हिंदी भाषेवर जी पकड मिळविली, तिचं मूळ त्यांच्या या संस्कृतच्या अभ्यासात असावं. चंडीगडच्या पंजाब विद्यापीठात त्यांनी पुढचं, कायद्याचं शिक्षण घेतलं. याच काळात सुषमा यांच्यामधला वक्ता बहरू लागला होता. कॉलेजात असताना सलग तीन वर्षं उत्कृष्ट हिंदी वक्ता हा पुरस्कार त्यांनी पटकावला होता.
मुळात अत्यंत बुद्धिमान असलेल्या या मुलीनं कायद्याची पदवी संपादन केल्यावर थेट दिल्लीत सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस सुरू केली. याच काळात तिची भेट झाली ती स्वराज कौशल या भावी जोडीदाराशी. तत्पूर्वी सुषमा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारणात कार्यरत झाल्याच होत्या. स्वराज कौशल यांचे तेव्हाचे फायरब्रँड समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. स्वराज यांच्यामुळे सुषमाही जॉर्ज फर्नांडिस यांच्या वकिलांच्या टीममध्ये काम करू लागल्या. इंदिरा गांधी यांच्या सरकारविरुद्ध तेव्हा जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली 'संपूर्ण क्रांती' आंदोलन सुरू होतं. जॉर्ज या आंदोलनात सक्रिय होते. भूमिगत राहून ते अनेक कारवाया करीत होते. रेल्वे कर्मचाऱ्यांचा देशातला सर्वांत मोठा संप याच काळात त्यांनी घडवून आणला होता. इंदिरा गांधी यांचं सरकार हात धुऊन फर्नांडिस यांच्या मागे लागलं होतं. फर्नांडिस यांनी सगळ्या सरकारी यंत्रणांना सळो की पळो करून सोडलं होतं. देशभर त्यांच्याविरुद्ध ठिकठिकाणी अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. या सर्व काळात सुषमा जॉर्ज यांच्या लीगल टीमच्या सभासद म्हणून सक्रिय कामगिरी बजावत होत्या. त्यांचा स्वतःचा स्वभावही स्वस्थ बसणारा नव्हता. त्यांनीही जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात उडी घेतली. देशाची पंतप्रधान एक महिला होती. तिच्या 'हुकूमशाही'विरुद्ध अनेक जण एकवटले होते. अवघ्या पंचविशीची सुषमा हे सगळं बघत होती. तिच्या राजकीय कारकिर्दीची दिशा अगदी स्पष्ट होती. तिचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठे कार्यकर्ते होते. घरात काँग्रेस विरोधाची परंपराच होती. देशाच्या राजकारणात हे ऐंशीचं दशक अत्यंत धगधगतं आणि अस्वस्थ दशक मानलं जातं. सुषमा स्वराज यांच्या ऐन तरुणाईची वर्षं याच दशकात गेली. आणीबाणीचा स्फोटक काळही त्यांनी अनुभवला. देशाच्या प्रमुखांची देशातील जनतेशी नाळ तुटली की काय होतं, याचं दर्शन त्या जवळून घेत होत्या. पुढील काळात सुषमा यांनी ही गोष्ट कायम लक्षात ठेवली आणि देशातील सामान्य जनतेशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही.
अखेर आणीबाणी संपली आणि निवडणुकांची घोषणा झाली. सुषमा यांनी अवघ्या पंचविशीत अंबाल्यातून निवडणूक लढविली आणि त्या हरियाणा विधानसभेत आमदारही झाल्या. हरियाणात देवीलाल यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार आलं. या तरुण, तडफदार मुलीचं कर्तृत्व आणि वक्तृत्व पाहून देवीलाल यांनी तिला लगेच आपल्या मंत्रिमंडळात घेतलं. अशा रीतीनं सुषमा केवळ पंचविशीत मंत्री झाल्या. जुलै १९७७ मध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. पुढं जनता पक्ष विखुरला. केंद्रातील सत्ताही गेली. जनता पक्षाच्या फुटीनंतर मूळ जनसंघाचे नेते एकत्र आले आणि त्यांनी १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. सुषमा स्वराज यांचा निर्णय ठरलेला होता. त्या भाजपमध्ये दाखल झाल्या. सुरुवातीचा समाजवादी धागा आता गळून पडला आणि त्यांना आपली नेमकी दिशा ठरविता आली. भाजपची सगळी सूत्रं आता अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी या दोघा धुरिणांकडं आली होती. पक्षात नकळत वाजपेयींचा नेमस्त, तर अडवाणींचा जहाल असे दोन गट असल्यासारखे होते. सुषमा प्रथमपासून अडवाणी गटाच्या म्हणून ओळखल्या जात. भाजपची स्थापना १९८० मध्ये झाली आणि त्यानंतर चारच वर्षांत इंदिरा गांधींची हत्या झाली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळालं. भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या. ही त्या पक्षाची सर्वांत वाईट कामगिरी. त्यानंतर मात्र पक्षाची कामगिरी दर निवडणुकीगणीक सुधारत गेली. सुषमा स्वराज या सर्व प्रवासात पक्षासोबत होत्या. पक्षाने जी जबाबदारी दिली ती त्यांनी पार पाडली. राजीव गांधींचं सरकार १९८९ च्या निवडणुकीत पराभूत झालं आणि देशात पुन्हा एक अस्वस्थतेचं, अशांततेचं पर्व सुरू झालं. सुषमा १९८७ ते १९९० या काळात हरियाणात भाजप-लोकदल युतीच्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री होत्या. मात्र, १९९० मध्ये पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवून राष्ट्रीय राजकारणात आणलं. सुषमा स्वराज, अरुण जेटली, प्रमोद महाजन, अनंतकुमार, वेंकय्या नायडू ही तेव्हाची भाजपची दुसरी फळी तयार होत होती. अडवाणींनी राममंदिरासाठी १९९० मध्ये रथयात्रा काढली. तेव्हा अडवाणी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शिखरावर होते. देशभर त्यांना प्रचंड पाठिंबा व लोकप्रियता लाभत होती. या आंदोलनाची परिणती पुढं बाबरी मशीद पाडण्यात झाली आणि देशाच्या राजकारणाची चौकट कायमची बदलून गेली. सुषमा स्वराज हे सगळं पाहत होत्या. देशात अस्थिरता होतीच, पण आर्थित सुधारणांचंही पर्व सुरू झालं होतं. नरसिंह राव सरकारनं १९९६ मध्ये आपली पाच वर्षं पूर्ण केली आणि देशात पुन्हा निवडणुका आल्या. या वेळी सुषमा दक्षिण दिल्ली मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळविला आणि वाजपेयी यांच्या तेरा दिवसांच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना माहिती व प्रसारण मंत्री म्हणून कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद लाभलं. सुषमा स्वराज लोकसभेत आल्या आणि त्याच काळात लोकसभेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण 'दूरदर्शन'वरून दाखवायला सुरुवात झाली. सुषमा यांच्यातील वक्त्याला ही मोठीच संधी मिळाली. त्यांनी या संधीचं पुरेपूर सोनं केलं आणि आपल्या बुलंद आवाजात, आत्मविश्वासानं त्या पक्षाची भूमिका संसदेत मांडू लागल्या. आजच्या भाषेत सांगायचं तर त्यांच्या भाषणांना 'टीआरपी' मिळू लागला. लोकसभेत त्या बोलणार म्हटल्यावर घरोघरी लोक, विशेषतः स्वयंपाकघरातील महिलाही, काम बाजूला ठेवून टीव्हीपुढं बसू लागल्या. 'वाजपेयी हा भला माणूस आहे, त्यांना पंतप्रधानपदावर बसण्याची एक संधी तरी मिळाली पाहिजे,' अशी जी सामूहिक जनभावना त्या काळात देशात तयार झाली, त्यात सुषमा स्वराज यांच्या तळमळीनं केलेल्या अनेक भाषणांचा नक्कीच सिंहाचा वाटा आहे.
पक्ष आदेश देईल ती भूमिका पार पाडायची, हे तत्त्व सुषमा स्वराज यांनी कायम पाळलं. त्यामुळं १९९८ मध्ये त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार अगदी अल्पकाळ दिल्लीचं मुख्यमंत्रिपदही सांभाळलं. तेव्हा दिल्लीत कांद्याच्या भावानं उच्चांक गाठला होता. त्याचा फटका भाजपला बसला आणि त्यांना हे राज्य गमवावं लागलं. पुढं शीला दीक्षितांनी पुढची १५ वर्षं दिल्लीवर आपली पकड कायम ठेवली. या पराभवामुळं एकच झालं. सुषमा परत केंद्रीय राजकारणात आल्या. त्यांची क्षमता, वकूब, आवाका बघता त्यांनी राष्ट्रीय राजकारणातच असायला हवं होतं. यानंतर त्या कायम केंद्रातच राहिल्या. वाजपेयींना १३ दिवसांनंतर सत्ता गमवावी लागली, त्यानंतर आलेल्या देवेगौडा सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात सुषमांनी केलेलं घणाघाती भाषण आजही लोकांच्या लक्षात आहे. विरोधकांच्या दुटप्पीपणाचा, दांभिकपणाचा त्यांना आलेला सात्त्विक संताप त्यांच्या वाक्यावाक्यातून एखाद्या अंगारासारखा बाहेर पडत होता. शरद पवारांना त्यांनी 'ललिता पवारां'ची दिलेली उपमा ऐकून सभागृहात एकच हशा पिकला होता. पुढं देवेगौडा व गुजराल ही दोन्ही सरकारं पडली आणि वाजपेयींचं तेरा महिन्यांचं सरकार अस्तित्वात आलं. या सरकारमध्येही त्यांना माहिती व प्रसारण खातं मिळालं. जोडीला दूरसंचार खात्याचा अतिरिक्त भारही त्यांनी काही महिने सांभाळला. या काळात त्यांनी घेतलेला महत्त्वाचा निर्णय म्हणजे चित्रपटसृष्टीचा त्यांनी दिलेला उद्योगाचा दर्जा. त्यामुळं वित्तीय कंपन्यांकडून चित्रपट निर्माता कंपनीला कर्ज घेणं शक्य झालं. चित्रपटसृष्टीतील काळ्या पैशाचं प्रमाण कमी झालं आणि बरेचसे व्यवहार लेखापरीक्षणाच्या देखरेखीखाली आले. यामुळं छोट्या निर्मात्यांनाही फायदा झाला आणि उत्तम आशय असलेले, पण छोट्या बजेटचे अनेक चित्रपट पुढं येऊ लागले. स्वराज यांची ही कामगिरी आपल्या चित्रपटसृष्टीनं कधीही विसरता कामा नये. याच काळात स्वराज यांनी विद्यापीठं आणि इतर बड्या शैक्षणिक संस्थांमध्ये कम्युनिटी रेडिओ केंद्रं सुरू करण्याचा निर्णय घेतला.
वाजपेयी यांचं तेरा महिन्यांचं सरकार पडलं आणि १९९९ मध्ये पुन्हा लोकसभा निवडणूक जाहीर झाली. या वेळेपर्यंत सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून सूत्रं हाती घेतली होती. सोनियांनी रायबरेलीसोबतच कर्नाटकातील बळ्ळारीमधूनही निवडणूक लढविण्याचं जाहीर केलं, तेव्हा भाजपनं त्यांच्याविरुद्ध सुषमा स्वराज यांना बळ्ळारीतून लढायला सांगितलं. पक्षाचा आदेश शिरोधार्य मानून सुषमांनी बळ्ळारीत तळ ठोकला. अगदी थोड्या काळात त्यांनी कन्नड भाषा शिकून घेतली आणि सोनियांना जोरदार लढत दिली. ही निवडणूक त्या हरणार होत्या, हे त्यांनाही माहिती होतं. मात्र, त्यांच्या झंझावाती प्रचार सभांनी काही काळ विरोधकांनाही स्तिमित केलं होतं. याच काळात बळ्ळारीतील खाणसम्राट व कुख्यात रेड्डीबंधूंबाबत बोलताना सुषमा स्वराज 'ते आपल्या भावासारखे आहेत,' असं बोलून गेल्या. पुढं या रेड्डी बंधूंचे एकेक प्रताप उघडकीस आल्यावर त्यांच्याबरोबरचे जवळिकीचे संबंध सुषमा स्वराज यांना त्रासदायक ठरले. अर्थात त्या त्यातून लवकरच बाहेर पडल्या. लोकसभा निवडणुकीत हरल्यावर पक्षानं त्यांना तेव्हा नव्यानं निर्माण झालेल्या उत्तराखंड राज्यातून राज्यसभेवर आणलं. वाजपेयींनी त्यांच्याकडे पुन्हा त्यांचं आवडतं माहिती व प्रसारण खातं सोपवलं. हे खातं त्यांनी जवळपास अडीच वर्षं पाहिलं. जानेवारी २००३ मध्ये वाजपेयींनी त्यांना आरोग्य, कुटुंबकल्याण व संसदीय कामकाज या खात्यांची जबाबदारी सोपविली. आरोग्यमंत्री असताना त्यांनी देशात सहा ठिकाणी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) उभारल्या. तोवर ही संस्था केवळ दिल्लीतच होती.
वाजपेयींच्या सरकारला 'शायनिंग इंडिया' मोहिमेचा फटका बसला आणि हे सरकार २००४ च्या निवडणुकीत पराभूत झालं. काँग्रेसला मित्रपक्षांच्या मदतीने बहुमत मिळालं, तेव्हा सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हावं, अशी मागणी काँग्रेसजनांनी सुरू केली. तेव्हा त्यांच्या विदेशी मूळ असल्याचा मुद्दा जोरदार चर्चेत होता. सुषमा स्वराज यांनी तेव्हा अचानक, त्यांच्या संयमित स्वभावाच्या विरुद्ध भूमिका घेऊन, 'सोनिया पंतप्रधान झाल्या, तर मुंडण करीन,' अशी घोर प्रतिज्ञा जाहीररीत्या करून सर्वांनाच धक्का दिला. पुढं सोनिया गांधींनी 'आतला आवाज' ऐकून पंतप्रधानपद न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान झाले. स्वराज यांच्यावर मुंडण करण्याची वेळ काही आली नाही. पुढं कालांतरानं सोनिया आणि त्यांच्यातला दुरावा कमी होत गेला आणि नंतर त्या चांगल्या मैत्रिणीही झाल्या. पुढं २००६ मध्ये त्या तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून गेल्या आणि पुढची लोकसभा निवडणूक होईपर्यंत त्या राज्यसभेत विरोधी उपनेत्या म्हणून कार्यरत राहिल्या.
सन २००९ ची लोकसभा निवडणूक आली, तेव्हा वाजपेयी प्रकृती अस्वास्थ्यामुळं राजकीय जीवनातून बाहेर पडले होते. ही निवडणूक पक्षानं लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वाखाली लढविली. मात्र, भाजपला अपयश आलं आणि पुन्हा काँग्रेस पक्षच सत्तेवर आला. मनमोहनसिंग पुन्हा पंतप्रधान झाले. या निवडणुकीत सुषमा स्वराज वाजपेयींच्या मध्य प्रदेशातील विदिशा या मतदारसंघातून उभ्या राहिल्या आणि मोठ्या मताधिक्यानं निवडूनही आल्या. लोकसभेत अडवाणींच्या जागी सुषमा स्वराज यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या हे अत्यंत महत्त्वाचं पद पक्षानं दिलं. ती पाच वर्षं त्यांनी 'यूपीए-२' सरकारला आपल्या घणाघाती भाषणांनी सळो की पळो करून सोडलं. कॉमनवेल्थ, टूजी स्पेक्ट्रम असे अनेक घोटाळे याच काळात उघडकीस येत होते आणि सुषमा स्वराज एखाद्या रणरागिणीच्या थाटात आपली मुलूखमैदान तोफ विरोधकांवर सतत डागत होत्या. या सरकारला आपल्या तीव्र टीकास्त्रांनी त्यांनी सर्वाधिक घायाळ केलं.
तोवर पुढची निवडणूक येऊन ठेपली होती. भाजपकडून पंतप्रधानपदाची उमेदवारी आता नरेंद्र मोदींना मिळाली होती. मोदींच्या झंझावातामुळं २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा पुरता धुव्वा उडाला आणि भाजप स्वबळावर सत्तेवर आला. मोदींच्या मंत्रिमंडळात सुषमा स्वराज यांना परराष्ट्रमंत्री म्हणून महत्त्वाचं स्थान मिळालं. इंदिरा गांधींनंतर हे पद भूषविणाऱ्या त्या केवळ दुसऱ्या महिला ठरल्या. सुषमा स्वराज यांनी पाच वर्षं अतिशय उत्तम पद्धतीनं हे पद सांभाळलं. सामान्य जनतेपासून दूर असणारं हे खातं त्यांनी सामान्यांना आपलंसं वाटेल, असं बदलवून टाकलं. ट्विटरसारख्या सोशल मीडियमचा उत्कृष्ट वापर करून घेत, त्यांनी जनतेशी संवाद सुरू केला. आपल्या प्रश्नाला परराष्ट्रमंत्र्यांकडून तातडीनं प्रतिसाद मिळतो हे पाहून परदेशात अडीअडचणीत सापडलेल्या अनेक लोकांनी थेट ट्विटरवर सुषमांशी संपर्क साधायला सुरुवात केली. सुषमा स्वराज स्वतः त्यांना उत्तरं देत आणि त्यांच्या अडचणींचं तातडीनं निराकरण करीत. यामुळं अनिवासी किंवा सदैव परदेशांत प्रवास करणाऱ्या भारतीयांत त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. पाकिस्तानात अडकलेल्या २३ वर्षीय गीता या मूकबधीर तरुणीला भारतात परत आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक लोकांशी त्यांनी वैयक्तिक स्नेहाचे संबंध प्रस्थापित केले. युनोपासून ते अमेरिका, युरोप आदी सर्व देशांत, खंडांत त्या फिरल्या. भारताची बाजू कायम खणखणीत, सुस्पष्ट आणि संयमित भाषेत मांडण्याचं त्यांचं कसब सर्वांची मनं जिंकून घेत असे.
अशा रीतीनं कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्यांना आजारपणानं गाठलं. त्यांना मधुमेह होताच. सन २०१६ मध्ये त्यांची किडनी बदलण्यात आली. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळतच गेली. मोदी सरकारनं २०१९ मध्ये पुन्हा प्रचंड विजय मिळविला. मात्र, सुषमांनी मोदींना पत्र लिहून आपल्याला प्रकृती अस्वास्थ्यामुळं मंत्रिपद नको असल्याचं कळवलं. मंत्रिपद सोडताच त्यांनी सरकारी बंगला सोडला व त्या आपल्या खासगी निवासस्थानी राहायला गेल्या. आयुष्यभर पाळलेली नीतिमत्ता, तत्त्वे त्यांनी शेवटपर्यंत सोडली नाहीत. ऑगस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरमधील ३७० वे कलम रद्द करण्याचे विधेयक राज्यसभेत मांडलं आणि ते मंजूरही झालं. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी ट्विट करून मोदी व शहांचे अभिनंदन केलं. 'मी आयुष्यभर या दिवसाची वाट पाहिली,' असं भावपूर्ण निवेदन त्यांनी केलं होतं. कदाचित त्यांचे प्राण यासाठीच थांबले असावेत. कारण थोड्याच वेळात त्यांना हृदयविकाराचा झटका आला व काही तासांतच त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. अगदी अकाली त्या हे जग सोडून गेल्या.
त्यांच्या निधनानंतर सर्व देश हळहळला. आपल्या घरातील जवळची मावशी, आई, काकू, आत्या असं कुणी तरी गेल्याचं दुःख सगळ्यांना झालं. सुषमा स्वराज यांच्या जाण्यानं आपण काय गमावलं? सुसंस्कृत पद्धतीनं राजकारण करता येतं, हे सप्रमाण सिद्ध करणारे लोक फार थोडे उरले आहेत. त्यापैकी सुषमा एक होत्या. अत्यंत अभ्यासपूर्ण, संयमित रीतीनं वक्तृत्व गाजवून लोकशाहीत विरोधकांना नामोहरम करता येतं, हे दाखवणारी हे रणरागिणी आपल्यातून निघून गेली. आपण राजकारणात जावं, कर्तृत्व गाजवावं, असं जिच्याकडून बघून आजच्या तरुणाईला वाटू शकतं, अशी एक व्यक्ती गेली. एका व्यक्तीच्या जाण्यानं एवढा फरक पडू शकतो. सुदैवानं सुषमा स्वराज यांची बरीचशी भाषणं आता इंटरनेटच्या साह्यानं बघता येतात. ती भाषणं पाहताना कधी तरी डोळे ओलावले, तर राजकारणापलीकडं पोचलेल्या त्यांच्या उत्तुंग, शालीन व्यक्तिमत्त्वाला आपल्यातल्या माणुसकीनं केलेला तो सलाम असेल...

----

(पूर्वप्रसिद्धी : समतोल दिवाळी अंक, २०१९)

---

4 Feb 2020

रिव्ह्यू - १९१७

युद्धाकडून बुद्धाकडे...
---------------------------



युद्ध म्हणजे हिंसा, युद्ध म्हणजे अविश्वास, युद्ध म्हणजे दुसऱ्याला अंकित करण्याची भावना, युद्ध म्हणजे माणसातलं माणूसपण संपविणारी विखारी गोष्ट! माणसाच्या अस्तित्वापासून युद्ध त्याच्या राशीला बसलंच आहे. स्वरूप बदलत गेलं असेल, पण प्रत्येक पिढीला युद्धाचा भोग अटळ आहे. सिनेमाची कला अस्तित्वात आली तेव्हापासून माणसाला युद्धाचा, युद्धामागच्या मानसिकतेचा, युद्धातील थराराचा आणि त्यातल्या विद्धतेचा अनुभव शोधावासा वाटतो आहे. त्यामुळेच गेल्या शंभर वर्षांत अनेक युद्धपट आले, आजही येत आहेत आणि पुढंही येत राहतील. मात्र, यातले फारच थोडे आपल्या मन:पटलावर कोरले गेले आहेत. सॅम मेंडिसचा ‘१९१७’ हा आत्ता प्रदर्शित झालेला युद्धपट निर्विवादपणे या मोजक्या चित्रपटांच्या यादीत जाऊन बसतो.

SPOILER ALERT

नावावरूनच आपल्याला समजतं, की पहिल्या महायुद्धाच्या काळात, म्हणजे ६ एप्रिल १९१७ रोजी घडलेली ही कथा आहे. ब्रिटिश आणि फ्रेंच फौजांचे जर्मनांबरोबर युद्ध सुरू आहे. ब्रिटिशांच्या एका तुकडीत असलेल्या टॉम ब्लेक आणि विल्यम श्कोफिल्ड या दोघा लान्स नाईक असलेल्या सैनिकांवर एक कामगिरी सोपविली जाते. टेलिफोनच्या वायर तुटलेल्या असल्याने काही अंतरावर असलेल्या दुसऱ्या ब्रिटिश पलटणीला हल्ला थांबविण्यासाठीचा हा निरोप असतो. जर्मन सैन्याच्या जाळ्यात ब्रिटिशांची पलटण फसू नये आणि १६०० सैनिकांचे प्राण धोक्यात येऊ नयेत म्हणून तातडीने हा निरोप तिकडे पोचवणं गरजेचं असतं. टॉम आणि विलचे वरिष्ठ अधिकारी या दोघांवर ही जबाबदारी सोपवतात. ‘नो मॅन्स लँड’ ओलांडून जर्मनांनी कब्जा केलेल्या फ्रान्सच्या भागातून त्यांना हा प्रवास करायचा असतो. या प्रवासाची कथा म्हणजे हा सिनेमा....
सॅम मेंडिस पहिल्या फ्रेमपासून आपल्याला १९१७ च्या त्या युद्धकाळात नेतो. एक सेकंदही फ्रेमवरून नजर ढळत नाही, एवढी पकड हा सिनेमा घेतो. हा प्रवास म्हणजे केवळ त्या दोन सैनिकांचा प्रवास उरत नाही, तर त्यांच्यासोबत आपणही तो प्रवास करू लागतो. यासाठी ‘वन शॉट’मध्ये हा सिनेमा चित्रित केल्याचा आभास दिग्दर्शकानं तयार केला आहे. त्यामुळं पडद्यावरच्या प्रवासाची सलगता आपल्या मनातही कायम राहते. याला सोबत आहे ती अत्यंत प्रभावी अशा पार्श्वसंगीताची. थॉमस न्यूमनचं संगीत आपल्याला त्या प्रत्येक क्षणामध्ये ‘‌फ्रीज’ करून ठेवतं. त्या प्रवासातली संकटं, समोर पावलापावलावर उभा असलेला साक्षात मृत्यू, आसपास पडलेले सैनिकांचे, घोड्यांचे मृतदेह या सगळ्या भयावह दृश्यांचा परिणाम त्या पार्श्वसंगीताच्या अफाट जोडीमुळं अक्षरश: मेंदूत घुसतो.
या चित्रपटात संवाद खूपच कमी आहेत. जे आहेत ते अगदी मोजके. त्याउलट युद्धभूमीचं अक्राळविक्राळ रूप दाखविणाऱ्या दृश्यांची अगदी रेलचेल! खंदक, बंकर, भूसुरुंग, ठिकठिकाणी उद्ध्वस्त झालेली घरं वा इमारती, खचलेले रस्ते, पडलेले पूल आणि यातून आपला जीव वाचवत चाललेले हे दोन ताठ कण्याचे ब्रिटिश सैनिक... दिग्दर्शक एकेका दृश्यातून आपल्या मनावर अशी पकड बसवत जातो, की नंतर पडदा आणि आपला सभोवताल यातलं अद्वैत नष्ट होऊन जावं. पहिल्या बंकरमध्ये झालेला स्फोट आणि नंतर एक जर्मन विमान या दोघांच्या अगदी शेजारी येऊन आदळतं, ती दोन्ही दृश्यं म्हणजे सिनेमॅटोग्राफीची कमाल आहे.
इतर युद्धपटांतला आणि या चित्रपटातला फरक म्हणजे दिग्दर्शकानं या कथेला दिलेला मानवी चेहरा. युद्धाची निरर्थकता सतत ठसवत, माणसातल्या माणूसपणाचा गजर यात दिसत राहतो. यातले सगळे सैनिक मानवी चेहरा असलेले आहेत. समोर शत्रू दिसला, की फक्त गोळी घालून त्याला ठार करणारे नाहीत. म्हणून तर आपल्या दोन नायकांपैकी एक त्या जर्मन पायलटला वाचवायला जातो. त्याचा परिणाम भयंकर होतो तो भाग निराळा. नंतर विलला ही लढाई एकट्यानं लढावी लागते, तेव्हाही त्या फ्रेंच गावात तो पोचल्यावर तिथल्या एका बंकरमध्ये लपलेली ती एक स्त्री आणि ती सांभाळत असलेली आणखीनच कुणाची तरी अगदी छोटी तान्हुली यांच्यातलं दृश्य कमालीचं ठसतं. विशेषत: वर जमिनीवर युद्ध सुरू असताना, जमिनीच्या खाली, बंकरमध्ये मिणमिणत्या प्रकाशात का होईना, माणसाचं माणूसपण रुजून आलं आहे, हे सांगणारं ते दृश्य मोहक आहे! अगदी सुरुवातीला पहिल्या बंकरमध्ये हे दोघं जातात तेव्हाही तिथल्या रिकाम्या बेडवर कुणा अनाम सैनिकानं ठेवलेला त्याच्या पत्नीचा व मुलीचा फोटो असाच लक्ष वेधून घेतो आणि काळीज हलवून जातो.
या सर्व चित्रपटभर दिग्दर्शकानं करडी छटा वापरली आहे. निरर्थकतेचा भकास रंग सगळीकडं भरून राहिला आहे. क्वचित कुठे युरोपातली ती सुंदर हिरवाई, झाडं, पानं-फुलं दिसतात. आजूबाजूला रक्ताचा लाल आणि हिंसेचा काळाकरडा रंग सांडलेला असताना त्या चेरीफुलांचं ते नैसर्गिक फुलणं अगदी मनावर ठसतं. चित्रपटाच्या पहिल्या फ्रेममध्येही तो फ्रेश हिरवा, पिवळा रंग आहे आणि शेवटच्या दृश्यातही एका भक्कम झाडाखाली विल बसतो, तेव्हाही सकारात्मकतेचा हा हिरवा रंग सभोवती दिसतो. मुळात आपल्या कुटुंबासाठी त्या झाडाच्या भक्कम खोडासारखा आधार असलेला विल खिशातून आपल्या पत्नीचा व दोन मुलीचा फोटो काढून पाहतो, तेव्हा त्यामागं लिहिलेला ‘कम बॅक टु अस’ हा संदेश अक्षरश: डोळ्यांत पाणी आणतो.
याच फ्रेमवर चित्रपट संपतो आणि ‘युद्धाकडून बुद्धाकडे’ जाण्याचा आपलाही प्रवास पूर्ण झाल्याची एक संवेदनशील जाणीव मनाला होते. जॉर्ज मॅके या अभिनेत्यानं यातली विलची, तर डीन चार्ल्स चॅपमन या अभिनेत्यानं टॉमची भूमिका केली आहे. दोघेही आपापल्या भूमिका जगले आहेत, असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. अन्य अभिनेत्यांनीही या दोघांना पूरक साथ दिली आहे. (ब्रिटिश सैनिकांच्या तुकडीत एक शीख सैनिकही दिसतो. त्याचे मोजके संवादही यात आहेत.)
हल्ली जगात सदैव युद्धाची, हिंसेची, एकमेकांचे प्राण घेण्याची भाषा केली जाते. विशेषत: युद्धाचा मुळीच अनुभव नसलेल्यांनाच ही खुमखुमी फार असते. एकदा तरी अशा महाभयंकर महायुद्धाचा अनुभव घेतलेला माणूस पुन्हा हिंसेची भाषा आयुष्यात करील, याची शक्यता नाही. अशा युद्धाचा जवळपास थेट, पण आभासी अनुभव घेण्यासाठी आणि आपल्या विवेकी बुद्धीवरचा आणि ‘बुद्धा’वरचा विश्वास दृढ करण्यासाठी ‘१९१७’ पाहायलाच हवा.

----

दर्जा - साडेचार स्टार
--- 

10 Jan 2020

साहित्य शिवार दिवाळी २०१९ - अजय देवगण लेख

मनुष्यगणातला अभिनेता
------------------------------



अजय देवगण नामक अभिनेत्यानं १९९१ मध्ये 'फूल और काँटे' अशा टिपिकल नावाच्या टिपिकल सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं, तेव्हा आणखी एक 'बडे बाप का बेटा' वशिल्यानं रूपेरी पडद्यावर झळकला, अशीच प्रतिक्रिया उमटली होती. नव्वदचं ते दशक भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवं स्थित्यंतर घेऊन येत होतं. आधीची सुमारे ४०-५० वर्षं हिंदी चित्रपटसृष्टी गाजविणारी एकेक दिग्गज मंडळी एक तर काळाच्या पडद्याआड गेली होती किंवा निवृत्त तरी झाली होती. राज कपूरचं १९८८ मध्ये निधन झालं आणि त्याच वर्षी आमिर खानचा 'कयामत से कयामत तक' प्रदर्शित झाला. अमिताभ राजकारणाच्या अपयशी खेळीनंतर पुन्हा चित्रपटसृष्टीतलं आपलं सिंहासन पुन्हा बळकट करण्याच्या मागे होता. देवआनंदची जादू केव्हाच लोप पावली होती. राजेश खन्ना जवळपास निवृत्त झाला होता. सनी देओलचं बस्तान बसल्यानंतर धरमपाजींनीही मुख्य भूमिका करणं सोडलंच होतं. दिलीपसाब केवळ सुभाष घईसारख्या बड्या दिग्दर्शकांकडं मोजक्या चरित्र भूमिकांकडं वळले होते. तेव्हा चलती होती ती अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, गोविंदा, ऋषी कपूर, मिथुन चक्रवर्ती या जुन्या-नव्या हिरोंची! मात्र, लवकरच तीन 'खान'मंडळी रूपेरी पडद्यावर येऊन पुढची किती तरी वर्षं आपलं साम्राज्य निर्माण करणार होती. त्यापैकी आमिरचा पहिला चित्रपट तर १९८८ मध्ये पडद्यावर आलाही होता आणि जोरदार हिटही झाला होता. पुढच्याच वर्षी पटकथा लेखक सलीम खानचा सलमान नावाचा धाकटा पोरगा 'मैंने प्यार किया'मधून दमदार पदार्पण करता झाला. तिसरा खान तेव्हा 'दूरदर्शन'वर 'फौजी'सारख्या मालिका करत होता. तोही दोन-तीन वर्षांतच 'दिवाना', 'बाजीगर'मधून धमाकेदार एंट्री घेणार होता. पण हे सगळं जरा नंतर... ऐंशीचं दशक हे तसं अस्वस्थतेचं, बदलांचं, कमअस्सलतेचं दशक होतं. तेव्हा डिस्कोची क्रेझ होती. व्हिडिओ पार्लरांची चलती होती. एकपडदा थिएटरबाहेर ब्लॅकवाल्यांची दादागिरी होती. चित्रपट संगीताचं सुवर्णयुग संपलं होतं. देशाला स्वातंत्र्य मिळून चाळिशी उलटून गेली होती आणि चाळिशी उलटलेल्या मध्यमवर्गीय पुरुषासारखीच देशाची केविलवाणी अवस्था झाली होती. धड ना तरुण, धड ना म्हातारा... जबाबदारीच्या ओझ्यानं वाकलेला आणि सभोवतीच्या परिस्थितीनं गांजलेला... काही तरी नवं, क्रांतिकारक घडायला हवं होतं. देशाचं राजकीय क्षितिज योग्य संधीची वाट पाहत होतं... आणि ते वर्ष उजाडलं... ते होतं १९९१.
भारताच्या आयुष्यात 'जागतिकीकरण' नावाच्या देखण्या स्त्रीनं प्रवेश केला आणि चाळिशीत देशाचं नवं अफेअर सुरू झालं. अजय देवगणचा 'फूल और काँटे' याच वर्षी झळकला. तो तुफान चालला. वास्तविक 'हिरो'च्या पारंपरिक व्याख्येत बसणारं रंग-रूप अजयकडं नव्हतं. तो सावळा होता. चेहरा मख्ख वाटत होता. मात्र, तरीही त्यानं दोन मोटारसायकलींवर पाय ठेवून उभं राहून घेतलेली एंट्री तुफान हलकल्लोळ माजवून गेली. कॉलेजच्या पोरा-पोरींनी 'फूल और काँटे' डोक्यावर घेतला. त्यातली सगळीच गाणी गाजली. अजयबरोबरच मधू या दाक्षिणात्य अभिनेत्रीचाही हा पहिलाच हिंदी चित्रपट होता. हिंदी चित्रपटसृष्टीत तोवर एक बडं प्रस्थ होऊन बसलेले फाइटमास्टर वीरू देवगण यांचा अजय हा मुलगा असल्यानं, 'वशिल्यानं आलेला आणखी एक नट' अशी त्याची संभावना होण्याची शक्यता होतीच. मात्र, अजय देवगणनं हे सगळे अंदाज खोटे ठरविले. पुढची तीन दशकं हा पठ्ठ्या हिंदी चित्रपटसृष्टीत केवळ पाय रोवून उभाच राहिला नाही, तर त्यानं अव्वल पाच हिरोंमध्ये आपलं स्थान कायम ठेवलं. सुरुवातीला ठोंब्या चेहरा व अभिनयात ठोकळा वाटणाऱ्या या माणसानं पुढं सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी दोनदा राष्ट्रीय पुरस्कार आणि चार वेळा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. त्याच्यात झालेला हा बदल सोपा नव्हता. हा आतला लढा असतो. आपला आपल्यालाच लढावा लागतो. अजय त्याच्या आयुष्यात कायमच हा लढा देत आला आहे. त्यामुळंच आज पन्नाशी पार केली तरी तो तगड्या नायकाच्या भूमिकेत उभा राहू शकतो. येत्या २२ नोव्हेंबरला त्याचा 'तानाजी - द अनसंग हिरो' हा महत्त्वाकांक्षी चित्रपट येतोय.
(लेख लिहितेवेळी प्रदर्शनाची ही तारीख जाहीर झाली होती. नंतर ती पुढं ढकलली व आता हा चित्रपट आत्ता, आज, १० जानेवारीला प्रदर्शित झाला आहे.) 
या चित्रपटात अजय स्वतः नरवीर तानाजी मालुसरेंची भूमिका करतोय. 'लोकमान्य टिळक' चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत हाच या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन करतो आहे. त्यानिमित्तानं अजय देवगणच्या गेल्या तीन दशकांच्या यशस्वी कारकिर्दीचा आणि एक माणूस म्हणून त्याच्या झालेल्या प्रगतीचा वेध घ्यायला हरकत नाही.
ही देवगण मंडळी पंजाबी. मूळची अमृतसरची राहणारी. वीणा आणि वीरू देवगण हे अजयच्या आई-वडिलांचं नाव. त्यांच्या पोटी दोन एप्रिल १९६९ रोजी दिल्लीत अजयचा जन्म झाला. त्याचं जन्मनाव खरं तर विशाल. पण चित्रपटात नायक म्हणून पदार्पण करताना त्यानं विशाल हे नाव टाकून 'अजय' हे नाव धारण केलं. हे सगळं कुटुंबच चित्रपट व्यवसायाशी संबंधित आहे. वीरू देवगण फाइट मास्टर म्हणून नाव कमवून होते, तर आई वीणा निर्माती होती. अजयचा भाऊ अनिल देवगण हाही पटकथा लेखक आहे. अजयचा जन्म दिल्लीत झाला असला, तरी तो वाढला मुंबईतच. जुहू येथील सिल्व्हर बीच हायस्कूलमध्ये तो शिकला. त्यानंतर मिठीबाई कॉलेजातही गेला. मात्र, पहिला चित्रपट मिळाल्यानंतर अजयचं पुढचं औपचारिक शिक्षण थांबलंच. 'फूल और काँटे' नुसता सुपरहिट ठरला नाही, तर अजयला त्या वर्षीचं 'सर्वोत्कृष्ट पदार्पण - पुरुष' हा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. त्यानंतर त्याच्याकडं भरपूर चित्रपटांच्या ऑफर आल्या, यात नवल नाही. त्यातले 'जिगर', 'संग्राम', 'विजयपथ', अक्षयकुमारसोबतचा 'सुहाग', 'हकीकत', 'नाजायज', 'दिलजले' आणि इंद्रकुमारचा 'इश्क' हे चित्रपट चांगले चालले. 'जिगर' चित्रपटादरम्यान नायिका करिश्मा कपूरसोबत अजयचं सूत जुळलं. पण हे अफेअर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ टिकलं नाही आणि १९९५ मध्ये त्यांचा 'ब्रेकअप' झाला. त्याच्या आदल्याच वर्षी म्हणजे १९९४ मध्ये आलेल्या 'विजयपथ' चित्रपटात तबू त्याची नायिका होती.
अजयचे हे उपरोल्लेखित चित्रपट चांगले चालले असले, तरी अजयच्या नावावर खणखणीत असं काही जमा नव्हतं. अभिजन प्रेक्षकांच्या दृष्टीनं तो अजूनही पिटातल्या प्रेक्षकांचाच, बी ग्रेडचा हिरो होता. त्याचा चेहरा कमालीचा थंड वाटायचा. बोलायचे ते त्याचे डोळे. त्या काहीशा निस्तेज चेहऱ्यावरचे ते डोळे गूढ, खोल असं काही तरी सांगायचे. अजयच्या या सुप्त ताकदीचा प्रत्यय लवकरच आला. वर्ष होतं १९९८ आणि चित्रपट होता - महेश भट यांचा 'जख्म.' अजयच्या कारकिर्दीतलं पहिलं महत्त्वाचं वळण आलं होतं. अजयच्या डोळ्यांतला 'दर्द' महेश भट यांच्यासारख्या अनुभवी दिग्दर्शकाला जाणवला असावा. 'जख्म' ही महेश भट यांच्या स्वतःच्या आयुष्याचीच गोष्ट होती. त्यात त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना अजयला निवडावंसं वाटलं, हीच अजयमधल्या अभिनेत्याला मोठी दाद होती. मुस्लिम आई आणि हिंदू वडिलांच्या पोटी जन्मलेल्या अजय या संगीत दिग्दर्शकाची व्यथा आणि कथा हा सिनेमा मांडतो. हिंदू-मुस्लिम दंगलीच्या पार्श्वभूमीवर दोन व्यक्तींमधलं अतूट प्रेम आणि त्यांच्या अपत्यांना बसणारी त्याची झळ याचं प्रत्ययकारी दर्शन महेश भट यांनी या चित्रपटातून केलं होतं. या चित्रपटासाठी संवेदनशील अभिनयाची गरज होती. महेश भट यांनी अजयकडून तसा अभिनय काढून घेतला म्हणा, किंवा अजयमधल्या सुप्त अभिनयगुणांना एकदम वाट सापडली म्हणा... या चित्रपटातून वेगळाच अजय देवगण प्रेक्षकांसमोर आला. यातलं त्याचं काम सगळ्यांना अतिशय आवडलं. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही चालला नाही. मात्र, अजयला या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानं त्याच्या या अभिनयक्षमतेवर राजमान्यतेचं शिक्कामोर्तबही झालं. या चित्रपटात लहानपणच्या अजयचं काम कुणाल खेमूनं केलं होतं. या चित्रपटातली गाणीही गाजली. विशेषतः अलका याज्ञिक यांच्या आवाजातल्या 'गली में आज चाँद निकला' या अप्रतिम गाण्यानं तर सर्वांना वेड लावलं. आजही हे गाणं तितकंच लोकप्रिय आहे. कुमार सानूनं म्हटलेलं 'हम यहाँ तुम कहाँ' हे गाणंही लोकप्रिय ठरलं. या चित्रपटात अजयची नायिका होती सोनाली बेंद्रे. अजयच्या कारकिर्दीला महत्त्वाचं वळण देण्याचं काम या चित्रपटानं केलं, यात शंका नाही. या चित्रपटानंतर अजय 'अ' श्रेणीतला कलाकार गणला जाऊ लागला. त्याला चित्रपटसृष्टीत गांभीर्यानं घेतलं जाऊ लागलं. हा 'लंबी रेस का घोडा' आहे, हे काही जाणत्या दिग्दर्शकांच्या लक्षात आलं. यापैकीच एक होता संजय लीला भन्साळी. भन्साळींनी त्यांच्या पुढच्या चित्रपटात अजयला महत्त्वपूर्ण भूमिका देऊ केली. अन्य प्रमुख कलाकार होते ऐश्वर्या राय व सलमान खान. वर्ष होतं १९९९ आणि चित्रपट होता - हम दिल दे चुके सनम! या चित्रपटाच्या तुफान यशानं अजयचं नशीबच बदलून गेलं. सुंदर, सुस्वरूप पत्नीचं लग्नाआधी दुसऱ्याच कुणावर तरी प्रेम होतं, हे लक्षात आल्यावर तिला त्या प्रियकराची पुन्हा भेट घडवून आणण्यासाठी तडफड करणारा वनराज अजयनं अतिशय आत्मविश्वासानं साकारला. अजयची भूमिका सहानुभूती मिळविणारी होती. पण त्यात अजयच्या त्या गूढ वेदना वागविणाऱ्या डोळ्यांचा आणि सहज अभिनयाचा वाटा मोठा होता. 'हम दिल दे चुके सनम' तुफान गाजला. यातली सर्वच्या सर्व गाणी सुपरहिट ठरली. सलमान आणि ऐश्वर्याचं प्रेमप्रकरण त्या वेळी बहरात होतं. अजयनं मात्र 'इश्क'च्या सेटवर भेटलेल्या काजोलबरोबर जोडी जमवून टाकली होती. आदल्याच वर्षी आलेला दोघांचाही 'प्यार तो होना ही था' (फ्रेंच किस या १९९५ मध्ये आलेल्या हॉलिवूडपटाचा रिमेक) चांगला चालला होता. खरं तर या दोघांची जोडी कुणालाच 'मेड फॉर इच आदर' वाटत नव्हती. प्रथमदर्शनी तरी ती विसंगत, कृत्रिम जोडी वाटायची. पण नियतीच्या मनात वेगळंच असतं. त्याच दोघांना एकमेकांच्या सान्निध्यात आयुष्याचा जोडीदार सापडला. दोघांनीही २४ फेब्रुवारी १९९९ रोजी महाराष्ट्रीय पद्धतीनं लग्न करून चित्रपटसृष्टीला एक धक्काच दिला. वयाच्या तिशीत अजय खऱ्या अर्थानं स्थिरावला होता. त्याचं करिअर आणि वैयक्तिक आयुष्य एका 'एक्स्प्रेस वे'च्या तोंडाशी येऊन उभं राहिलं होतं. इथून पुढचा प्रवास सुसाटच असणार होता...
रामगोपाल वर्माच्या 'कंपनी'त अजयला हाजी मस्तानची भूमिका करायला मिळाली. टिपिकल रामगोपाल वर्मा शैलीतील या गुन्हेपटात अजय चांगलाच शोभून दिसला. या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा समीक्षक पुरस्कार मिळाला. याच वर्षी आलेल्या 'दिवानगी'मधली त्याची खलनायकी ढंगाची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली. 'फिल्मफेअर'नं सर्वोत्कृष्ट व्हिलन म्हणून त्याचा गौरव केला. एकूणच २००२ ते २००४ ही वर्षं अजयच्या कारकिर्दीतील सुवर्णकाळ म्हणता येईल. राजकुमार संतोषीसारख्या ख्यातनाम दिग्दर्शकानं आपल्या 'द लिजंड ऑफ भगतसिंग' (२००३) या चित्रपटात अजयला प्रमुख भूमिका दिली. भगतसिंगांच्या भूमिकेचं अजयनं सोनं केलं. 'जख्म'पाठोपाठ या चित्रपटासाठीही त्याला दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याच वर्षी आलेल्या रामगोपाल वर्माच्या 'भूत' या गाजलेल्या चित्रपटातही अजय होता. अजय देवगणचं नाव इंडस्ट्रीत आता एक ताकदवान अभिनेता म्हणून दुमदुमू लागलं होतं. म्हणूनच पुढच्या वर्षी म्हणजे २००४ मध्ये ऋतुपर्ण घोष, प्रकाश झा आणि मणिरत्नम यांसारख्या बड्या दिग्दर्शकांना आपल्या चित्रपटात अजय हवासा वाटला. ऋतुपर्णचा 'रेनकोट' हा चित्रपट म्हणजे पडद्यावरची कविता होती. ओ. हेन्रीच्या 'द गिफ्ट ऑफ मॅगी' या कथेवर आधारित या चित्रपटात अजयची नायिका होती ऐश्वर्या राय. 'हम दिल दे चुके सनम'नंतर पुन्हा एकदा या जोडीनं उत्कृष्ट काम केलं आणि समीक्षकांची वाहवा मिळविली. प्रकाश झा यांनी 'गंगाजल'मध्ये अजयला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका दिली. भागलपूर इथल्या ॲसिड टाकून डोळे काढण्याच्या प्रकारावर हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटात अजयनं एसएसपी अमितकुमार ही भूमिका प्रभावीपणे केली होती. 'गंगाजल' सुपरहिट झाला. इथूनच प्रकाश झा आणि अजय देवगण ही नवी दिग्दर्शक-अभिनेता जोडी जमली. या जोडीनं पुढं 'अपहरण' (२००५), 'राजनीती' (२०१०) असे काही चांगले चित्रपट दिले. सन २००४ मध्ये मणिरत्नम यांनी त्यांच्या 'युवा' या चित्रपटात अजयला मायकेल मुखर्जी ही विद्यार्थी नेत्याची भूमिका दिली. अजयनं ही भूमिकाही जोरदार केली. विशाल भारद्वाजनं शेक्सपीअरच्या नाट्यत्रयीवर आधारित आपल्या दुसऱ्या 'ओंकारा' या चित्रपटात अजयला स्थान दिलं. हा चित्रपट 'ऑथेल्लो'वर आधारित होता. यात ओंकारा शुक्ला उर्फ ओमीची शीर्षक भूमिका अजयनं केली होती. या वेळेपर्यंत त्याची ताकदवान अभिनेता ही प्रतिमा जनमानसातही रुजली होती. 'ओंकारा'नं या प्रतिमेलाही न्याय दिला. याच वर्षी अजयनं राजकुमार संतोषीच्या 'खाकी'मध्ये अमिताभ, ऐश्वर्या व अक्षयकुमारसोबत काम केलं.
हे सर्व सुरू असतानाच रोहित शेट्टी नावाचा एक अवलिया दिग्दर्शक अजयला भेटला. त्यानं 'गोलमाल : फन अनलिमिटेड' या आपल्या चित्रपटात अजयला चक्क विनोदी भूमिका दिली. तोवर अजयची गंभीर भूमिका करणारा नट अशी प्रतिमा झाली होती. इंद्रकुमारचा 'इश्क' आला त्यालाही जवळपास दहा वर्षे होत आली होती. मात्र, रोहित शेट्टीला काय वाटलं कुणास ठाऊक! त्यानं अजयला यात विनोदी भूमिकेत पुढं आणलं. आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. इथंही रोहित शेट्टी आणि अजय देवगण ही आणखी एक सुपरहिट दिग्दर्शक-अभिनेता जोडी पुढं आली. या 'गोलमाल' फ्रँजायजीनं पुढची दहा वर्षं काय धमाल केली हे सगळ्यांना माहिती आहे. पुढच्या चार वर्षांत 'गोलमाल'चे आणखी दोन भाग ('गोलमाल रिटर्न्स' आणि 'गोलमाल ३') आले. दोन वर्षांपूर्वी २०१७ मध्ये 'गोलमाल अगेन' हा चौथा चित्रपट आला. यातली अजयची 'गोपाल' ही भूमिका आणि त्यातले अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू हे सगळे कलाकार हिट आहेत. रोहित शेट्टी आणि अजय या जोडीनं २०११ मध्ये आणखी एका सुपरहिट फ्रँचायजीला जन्म दिला. तिचं नाव होतं - सिंघम. यातली अजयची बाजीराव सिंघम ही पोलिस अधिकाऱ्याची भूमिका कमालीची हिट झाली. तीन वर्षांनी, २०१४ मध्ये 'सिंघम रिटर्न्स' आला. तोही चांगला चालला. अजय देवगणला कणखर पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला प्रेक्षकांना आवडतं. रोहित शेट्टीच्या चित्रपटात बाकी सगळा मालमसालाही ठासून भरलेला असल्यानं हे चित्रपट चांगली गर्दी खेचतात, असा अनुभव आहे. पहिल्या 'सिंघम'नंतर २०१२ मध्ये अजयनं रोहित शेट्टीचाच 'बोलबच्चन' हा चित्रपट केला. हा चित्रपट व त्यातली गाणीही गाजली. याच वर्षी दिवाळीत त्यानं 'सन ऑफ सरदार' हा त्याचा चित्रपट करण जोहर-शाहरुख जोडीच्या 'जब तक है जान'समोर प्रदर्शित करण्याचं धाडस दाखवलं होतं. तेव्हा त्याचा करणशी जाहीर वादही झाला होता. थिएटर वितरणावरून दोघा बड्या स्टारची जुंपली होती. अजयची पत्नी काजोल ही करण व शाहरुख दोघांचीही चांगली मैत्रीण. मात्र, या वादामुळं काजोलची करणशी असलेली मैत्री काही काळ तुटली होती, अशी कबुली करणनंच नंतर त्याच्या पुस्तकात दिली. 'सन ऑफ सरदार' हा चित्रपट तसा ठीकठाकच होता. पण या वादामुळं त्यालाही मोठा प्रेक्षकवर्ग लाभला आणि चित्रपटानं चांगला गल्ला गोळा केला.
यानंतर अजयचा आणखी एक महत्त्वाचा चित्रपट २०१५ मध्ये आला, त्याचं नाव 'दृश्यम'. मूळ मल्याळी चित्रपटाचा सर्व दक्षिणी भाषांत रिमेक झाला होता. तसाच तो हिंदीत आला, तेव्हा निशिकांत कामतकडं त्याचं दिग्दर्शन आलं. मूळ चित्रपटाची पटकथा एवढी बांधीव व घट्ट होती, की निशिकांतला फार वेगळं काही करावंच लागलं नाही. हिंदीत हा चित्रपट गोव्यात घडताना दाखविण्यात आला होता. यात कुटुंबाच्या पाठीशी उभा राहणाऱ्या विजय साळगावकर या चौथी पास, व्हिडिओ कॅसेटचं दुकान चालविणाऱ्या, पण अत्यंत डोकेबाज, हुशार माणसाची भूमिका अजयनं फार सुंदर साकारली होती. हिंदीतही हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि अजयच्या नावावर आणखी एका चांगल्या भूमिकेची नोंद झाली.
त्यानंतर पुढच्या वर्षी अजयनं स्वतः दिग्दर्शित केलेला 'शिवाय' हा महत्त्वाकांक्षी चित्रपट दिवाळीत प्रदर्शित झाला. (यापूर्वी त्यानं २००८ मध्ये 'यू, मी और हम' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं.) 'शिवाय' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं असलं, तरी आधी ज्या प्रकारची हवा निर्माण करण्यात आली होती, ती पाहता, प्रेक्षक काहीसे निराशच झाले, असं म्हणता येईल. या चित्रपटातील साहसदृश्ये चांगली होती. 'क्लिफहँगर'सारख्या अनेक हॉलिवूडपटांचा त्यावरचा प्रभाव स्पष्ट जाणवत होता. मात्र, असं असलं तरी हा काही अजयचा सर्वोत्तम सिनेमा नव्हता. अजय पुन्हा फॉर्मात आला तो २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या राजकुमार गुप्ताच्या 'रेड' या चित्रपटामुळं. उत्तर प्रदेशात ऐंशीच्या दशकात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात अजयनं आयआरएस ऑफिसर अभय पटनाईक ही भूमिका केली होती. केवळ ३० कोटी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तब्बल दीडशे कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर या वर्षी अजय पुन्हा इंद्रकुमारच्या 'टोटल धमाल' या 'धमाल' फ्रँजायजीमध्ये प्रथमच दिसला. याशिवाय 'दे दे प्यार दे' या अकीव अली दिग्दर्शित रोमँटिक कॉमेडीतही अजय झळकला. यात त्यानं तब्बूसोबत अनेक वर्षांनी काम केलं. वयानं खूप लहान असलेल्या तरुणीच्या प्रेमात पडणाऱ्या नायकाची भूमिका त्यानं यात केली होती. यापूर्वी मधुर भांडारकरच्या 'दिल तो बच्चा है जी' (२०११) या चित्रपटातही अशाच प्रकारची भूमिका केली होती आणि ती प्रेक्षकांना आवडली होती. याशिवाय 'काल'सारख्या (२००५) भयपटात त्यानं केलेली कालीची छोटीशी भूमिकाही वेगळी आणि त्याच्या चाहत्यांना भावलेली होती. 'सन ऑफ सरदार'चा दिग्दर्शक अश्वनी धीर यानं त्यापूर्वी २०१० मध्ये काढलेल्या 'अतिथी तुम कब जाओगे?' या विनोदी चित्रपटातही अजयनं कोंकणा सेनशर्मा व परेश रावल यांच्यासोबत धमाल केली होती. याच वर्षी आलेल्या मिलन लुथ्राच्या 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई' या चित्रपटात अजयनं सुलतान मिर्झाची साकारलेली भूमिका अशीच प्रेक्षकपसंती मिळवून गेली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही सुपरहिट ठरला.
आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती 'तानाजी' या चित्रपटाची. या चित्रपटात ओम राऊतच्या दिग्दर्शनाखाली अजयनं नरवीर तानाजी मालुसरेंच्या भूमिकेला न्याय दिला असेल, अशी खात्री वाटते. दिवाळीनंतर प्रदर्शित होणारा हा चित्रपट लोकप्रिय ठरेल, असा अंदाज आहे. याशिवाय 'मैदान' नावाच्या एका चित्रपटात अजय फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका करणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी, म्हणजे २०२० मध्ये प्रदर्शित होईल. याशिवाय 'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' या मल्टिस्टारर चित्रपटातही संजय दत्त, राणा दुगुबत्ती, परिणिती चोप्रा, सोनाक्षी सिन्हा यांच्यासह अजय झळकणार आहे.
तब्बल तीन दशकांपूर्वी, म्हणजे १९९१ मध्ये सुरू झालेली अजयची कारकीर्द आगामी काळातही बहरत जाईल, यात शंका नाही. केंद्र सरकारने २०१६ मध्ये 'पद्मश्री' सन्मान देऊन त्याच्या कारकिर्दीचा गौरव केला आहेच. काजोलसोबत गेली दोन दशके तो सुखाचा संसार करतोय, याचंही त्याच्या चाहत्यांना कौतुक आणि अप्रूप आहे. त्यांना न्यासा ही मुलगी आणि युग हा मुलगा आहे. अजयनं त्याच्या कारकिर्दीत फार वाद कधी ओढवून घेतलेले दिसत नाहीत. आपण बरं आणि आपलं काम बरं, अशी त्याची एकूण वृत्ती दिसते. त्याचं आडनाव 'देवगण' असलं, तरी त्याच्या बहुतेक भूमिका 'मानवी' आहेत. त्या अर्थानं तो 'मनुष्यगणातला अभिनेता' आहे. त्याच्या पुढील कारकिर्दीकडं चित्रपट रसिकांचं लक्ष राहील. त्यासाठी त्याला शुभेच्छा!

----

(पूर्वप्रसिद्धी : साहित्य शिवार दिवाळी अंक २०१९)

---

8 Jan 2020

रिव्ह्यू - धुरळा

‘वुई, द राजकारणी...’
--------------------------

आपण सगळेच राजकारणी असतो. राजकारणात प्रत्यक्ष भाग घेत असू वा नसू! आपल्या रोजच्या जगण्यात आपण राजकारण करतच असतो. अगदी शाळेत असल्यापासून ते अगदी मृत्युपत्र लिहायची वेळ येईपर्यंत... आपण पक्के राजकारणी असतो. गंमत म्हणजे राजकारण करणारे तेच राजकारणी आणि आपण मात्र त्यांच्यापासून वेगळे कुणी तरी गरीब, भाबडे, सर्वसामान्य माणसं अशी आपण स्वत:ची पक्की समजूत करून घेतलेली असते. पण प्रत्यक्षात तसं नसतं. आपण जगण्यातल्या प्रत्येक क्षणाला अगदी पक्के, मुरलेले, बेरकी, जहाँबाज, कावेबाज, पाताळयंत्री राजकारणी असतो. कुठे प्रमाण कमी असेल, तर कुठे अधिक, इतकंच! आपल्या कुटुंबात, नातेवाइकांत, ऑफिसमध्ये, बिझनेसमध्ये आपण सदैव राजकारणच करत पुढं जात असतो. म्हणून तर आपल्याला राजकारण आणि राजकारणी मंडळी यांच्याविषयी प्रचंड कुतूहल असतं. अशी माणसं दिसली, की त्यांच्या थेट चालणाऱ्या राजकारणाला नावं ठेवत, आपण स्वत:ही तसंच वागत असल्याचा ‘गिल्ट’ कमी करण्याची संधी आपल्याला मिळते, हे त्या कुतूहलामागचं प्रमुख कारण असतं. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे आजच पाहिलेला ‘धुरळा’ हा नवा मराठी चित्रपट! समीर विद्वांस दिग्दर्शित व क्षितिज पटवर्धन लिखित हा चित्रपट आपल्याला हरघडी आपल्यातल्या राजकारणी व्यक्तीची आठवण करून देतो आणि हेच त्याचं सर्वांत मोठं यश आहे.
शेक्सपिअरच्या अनेक शोकांतिका किंवा मारिओ पुझोच्या ‘गॉडफादर’सारख्या कलाकृती कालातीत दर्जा गाठण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्या कलाकृतींमध्ये मानवी जगण्याचे असे अनेक पदर दृग्गोचर झाले. माणसाच्या स्वभावातले अनेक कंगोरे, उत्क्रांतीच्या ओघातही टिकून राहिलेलं त्याच्यातलं पशुत्व, सदैव दुसऱ्यावर विजय मिळविण्याची, दुसऱ्याला टाचेखाली ठेवण्याची लालसा, त्याचं स्खलनशील असणं अशा अनेक गोष्टींचे पापुद्रे उलगडत या कलाकृती आपल्याला माणसाच्या जगण्याचं विराट दर्शन घडवतात. त्यातून मानवी स्वभावाविषयी काही मूलभूत स्वरूपाचं भाष्य आपल्याला बघायला मिळतं, अवगत होतं! समीर आणि क्षितिजची ही कलाकृती पाहून अशा कालातीत कलाकृतींची किमान आठवण व्हावी, हेदेखील या जोडीचं मोठं यशच म्हणावं लागेल. (तुलना करण्याचा प्रश्नच नाही; पण किमान मार्ग तरी योग्य निवडला हे म्हणायला हरकत नाही. भविष्यात ते तिथवर पोचतीलही, कुणी सांगावं...)
उत्तम पेपरवर्क, प्रतिपाद्य विषयाची स्पष्ट कल्पना, कल्पनाबीज-विस्तार-संघर्ष-सांगता या चतु:सूत्रीच्या साह्यानं बांधलेली घट्ट पटकथा, खटकेबाज-चुरचुरीत संवाद आणि त्याला अभिनयाची जोड या कुठलाही चित्रपट यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टी! ‘धुरळा’ने यातील बहुतांश गोष्टींचे बॉक्स अचूक ‘टिक’ केले आहेत. अर्थात काही त्रुटीही त्यात आहेत. मात्र, चांगल्या गोष्टींचं पारडं जड आहे आणि त्यामुळंच हा चित्रपट पाहणं हा एक चांगला अनुभव ठरतो.
आपण सगळे राजकारणीच असतो आणि जगण्यातल्या कुठल्याही क्षेत्रात आपण राजकारण करत असतो, ही मध्यवर्ती थीम धरली, तर या थीमचा विस्तार करणारे अनेक चित्रपट, नाटकादी कलाकृती आपण यापूर्वीही पाहिल्या आहेत. ‘धुरळा’ही याच यादीतला सिनेमा आहे. यात दिग्दर्शकानं माणसातला ‘राजकारणी’ दाखविण्यासाठी गोष्टीचं नेपथ्य निवडलंय ते राजकारणाचंच! एका अर्थानं हे सुलभीकरण आहे. मात्र, या सुलभीकरणामुळं गोष्ट क्लिष्ट किंवा बोजड न होता, सगळ्यांना समजेल अशी सोपी-सरळ झालीय हा तिचा गुणच म्हणायला हवा.
आंबेगाव नामक छोट्या गावातलं सरपंचपद मिळवण्याची एका घराण्यातील, रक्ताच्या नात्यातील तीन लोकांची स्पर्धा हे या चित्रपटाचं एका ओ‌‌ळ‌ीतलं कथासूत्र! सत्तेचं पद किंवा खुर्ची - मग ती सरपंचपदाची असो की पंतप्रधानपदाची - ती मिळवण्यासाठी जगात सगळीकडं जे राजकारण चालतं, ते सारख्याच प्रमाणात क्रूर असतं आणि ‘राजकारणात सगळं क्षम्य’ या उक्तीला साजेसंच असतं. त्यामुळं इथं महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावाचं नेपथ्य दिग्दर्शकानं घेतलं असलं, तरी त्यातला सत्तासंघर्ष हा जगातील कोणत्या माणसाला परका वाटणार नाही. त्या अर्थानं ही ‘युनिव्हर्सल अपील’ असणारी गोष्ट आहे. मात्र, या गोष्टीचा विस्तार करताना त्यातील माणसांचं बाह्य द्वंद्व दाखवण्याच्या मोहात दिग्दर्शक पडल्यानं, माणसाच्या नेणिवेच्या पातळीवरचे काळेकरडे मनोव्यापार किंवा त्यांच्यातलं ते आदिम ‘पाशवी’ इन्स्टिंक्ट आपल्याला यात फारसं बघायला मिळत नाही. त्या पातळीवरचा एक धागा जरी यात ओवला गेला असता, तरी ही महान कलाकृती ठरली असती.
अर्थात, आत्ताही जे समोर येतं, ते कमी मनोरंजक किंवा कमी उत्तम दर्जाचं आहे, असं मुळीच नाही. मुळात इथं प्रत्येक पात्रावर खूप बारकाईनं काम झाल्याचं दिसतं. उभे कुटुंबातील अक्का, नवनाथ, हनुमंत, नीलेश, हर्षदा उर्फ बुरगुंडा आणि मोनिका या सर्व व्यक्तिरेखांचे आलेख आपल्यासमोर ठसठशीतपणे ‘उभे’ राहतात. या कुटुंबाला आव्हान देणारा हरीश गाढवे, त्याचे पित्ते, शिवाय या कुटुंबावर कृपादृष्टी ठेवणारा आमदार ही बाकीची पात्रंही अगदी नीट उभी राहतात. प्रत्येक पात्राला एक व्यक्तिमत्त्व आहे आणि ते लिखाणातून त्या अभिनेत्यापर्यंत किंवा अभिनेत्रीपर्यंत नेमकेपणानं पोचलंय. चित्रपटाचा सुरुवातीचा काही काळ ही सगळी पात्रं उभी राहण्यात खर्च होतो, त्यामुळं चित्रपट सुरुवातीला काहीसा संथ वाटू शकतो. पण चित्रपटाचा एकूण कालावधी बराच मोठा (१७० मिनिटं) असल्यानं हा सुरुवातीचा वेळ सर्व पात्रं प्रस्थापित होण्यासाठी योग्यच आहे.
या चित्रपटात महिलांचं घरातलं, राजकारणातलं आणि एकूणच समाजातलं स्थान यावर सविस्तर भाष्य येतं. तसं ते यापूर्वीही ‘घराबाहेर’सारख्या चित्रपटांतून आलेलं आहे. मात्र, वीस वर्षांनंतरही आपल्याकडची परिस्थिती फारशी बदललेली नसल्यानं दिग्दर्शकाला हा ट्रॅक जोडणं आवश्यक वाटलं, यातच सारं काही आलं.  किंबहुना चित्रपटाच्या उत्तरार्धात हा संघर्ष संपूर्णपणे या कुटुंबातील तीन बायकांमध्ये विभागला जातो. या तिघींच्याही व्यक्तिरेखांमधले अनेक सूक्ष्म ‘पदर’ विद्वांस यांनी फार नजाकतीनं दाखवले आहेत. याशिवाय या चित्रपटात येणारी अन्य स्त्री पात्रंही ठळकपणे लक्षात राहतात, हे या कलाकृतीचं वैशिष्ट्य. चित्रपटाचा शेवट काहीशा अनपेक्षित नोटवर संपत असला, तरी या सगळ्याची अपरिहार्य परिणती ती असूच शकते, हे पटतं.
या चित्रपटाची पात्रयोजना आणि प्रमुख कलाकारांची कामं अगदी चोख जमली आहेत. अक्काच्या भूमिकेत अलका कुबल-आठल्ये अगदी फुल फॉर्मात आल्या आहेत. अंकुश चौधरी नवनाथच्या भूमिकेत शोभून दिसतो. या भूमिकेसाठी आवश्यक तो बेरकीपणा त्यानं चष्म्याआडच्या नजरेतून नेमका दाखवला आहे. हनुमंत उर्फ सिमेंट शेठच्या भूमिकेतील सिद्धार्थ जाधव हा यातलं सरप्राइझ पॅकेज आहे. सिद्धार्थच्या इमेजपेक्षा खूप वेगळा रोल त्याला मिळाला असून, त्यानं या संधीचं सोनं केलं आहे. या रोलबाबत फार काही सांगत नाही. तो प्रत्यक्ष पडद्यावरच पाहा. नीलेश ऊर्फ भाऊज्याच्या भूमिकेत अमेय वाघनं तडफदार कामगिरी केली आहे. हरीश गाढवेच्या भूमिकेत प्रसाद ओकनं एकदम तगडं काम केलंय. त्यानं ही भूमिका करून दिग्दर्शकावर आणखी एक ‘फेवर’च केला म्हणायचं! सई ताम्हणकरनं यातली हर्षदा ऊर्फ बुरगुंडा चांगली उभी केलीय. प्रचारसभेतील पहिल्या भाषणाचा तिचा सीन उत्तम जमलाय. मात्र, या सगळ्यांत भाव खाऊन गेलीय ती मोनिका साकारणारी सोनाली. दबून राहण्यापासून ते बंडखोरीपर्यंतचा या व्यक्तिरेखेचा सगळा प्रवास सोनालीनं फार प्रभावीपणे मांडलाय. या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत, अनेक शेड्स आहेत. लिखाणात सर्वांत भाव खाऊन जाणारी ही भूमिका सोनालीनं जोरदार वठवून आणखीनच भाव खाल्लाय! तिच्या काही संस्मरणीय भूमिकांत या भूमिकेचा नक्कीच समावेश होईल. सुलेखा तळवलकर, उदय सबनीस यांनीही चांगली साथ दिलीय. अलका कुबल व सुलेखा तळवलकर प्यायच्या सीनमध्ये छानच ‘रम’ल्या आहेत! अगदी एकाच सीनमध्ये प्राजक्ता हणमघर धमाल उडवून गेलीय.
गावाकडचा चित्रपट आणि त्यातही राजकारण म्हटल्यावर देवेंद्र गायकवाड, श्रीकांत यादव, नितीन धंदुके आदी कलाकारांची उपस्थिती हल्ली अनिवार्य असते. हे लोक पडद्यावर दिसले, की आपोआपच त्या चित्रपटाला एक ऑथेंटिसिटी येत असावी.
अलीकडं आपल्या जगण्यातल्या जवळपास प्रत्येक बाबीत राजकारण शिरलेलं असताना आणि आपणही प्रत्येक गोष्टीत जोरदार राजकारण करीत असताना, गावच्या राजकारणावरचा हा ‘धुरळा’ अंगावर उडवून घ्यायलाच हवा; कारण ती धूळ साफ झाल्यानंतर आपल्याला आपल्यातला ‘राजकारणी’ लख्ख दिसू लागतो...

---

दर्जा : साडेतीन स्टार

---

30 Dec 2019

मटा - रविवार लेख

‘२०-ट्वेंटी’ची ‘कसोटी’
--------------------------

एकविसाव्या शतकातलं दुसरं दशकही संपत आलं आणि आता आपण ‘२०२०’ या वर्षात पदार्पण करीत आहोत. आपले दिवंगत माजी राष्ट्रपती - अन् कदाचित सर्वाधिक लोकप्रियही - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ‘महासत्ता’ होण्यासाठी ज्या वर्षाचं लक्ष्य आपल्याला दिलं होतं, तेच हे वर्ष! आपण ‘२०२०’मध्ये महासत्ता होऊ की नाही, याचं उत्तर आता आपल्याला मिळालेलंच आहे. तरीही वर्षाच्या सुरुवातीलाच नकारात्मक विचार कशाला मनात आणायचा? याच वर्षात म्हणजे २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात ‘२०-२०’ची, अर्थात टी-२० ची विश्वचषक स्पर्धा होते आहे. ती स्पर्धा जिंकून आपण याच वर्षात ‘२०-२०’मधील महासत्ता तर नक्कीच होऊ शकतो. आपल्या संघाला त्यासाठी शुभेच्छा...
क्रिकेट संघाचं तसं बरं चाललंय. पण आपल्या ‘भारत’ नावाच्या १३७ कोटी जनतेच्या संघाचं काय? एकविसावं शतक सुरू होण्याच्या वेळी म्हणजे २००१ मध्ये आपल्या देशाची लोकसंख्या एक अब्जाचा टप्पा ओलांडून गेली होती. त्या जनगणनेत आपली लोकसंख्या १०७ कोटी नोंदली गेली होती. ही लोकसंख्या १९ वर्षांनंतर तब्बल ३० कोटींनी वाढून १३७ कोटी झाली आहे. लोकसंख्या नियोजनाचे सर्व प्रयत्न करूनही आपली लोकसंख्या एका दशकात १५ ते २० टक्क्यांनी वाढते आहे. त्यामुळंच आपण लवकरच चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरणार आहोत. डॉ. कलाम यांच्या मनातल्या ‘महासत्ते’शी आपल्या आत्ताच्या परिस्थितीची तुलना केली तर हाती काय येतं? गेल्या दोन दशकांत आपण कुठून कुठं आलो? यापुढं कुठं जाणार? आपल्या पुढच्या पिढीच्या हाती आपण कोणता वारसा सोपवत आहोत? या गोष्टींचा धांडोळा घेण्यासाठी ‘२०२०’मध्ये पदार्पण यापेक्षा चांगला मुहूर्त नसेल.
एकविसाव्या शतकाच्या आगमनाची पहिली ग्वाही आपल्याला मिळाली ती माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या भाषणांमधून. एका अनपेक्षित परिस्थितीत थेट देशाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारावी लागलेल्या या तरुण पंतप्रधानाच्या डोळ्यांत पुढच्या शतकाची स्वप्नं होती. ‘हमें देखना हैं’ या त्यांच्या सानुनासिक उच्चारातील भाषणांची चेष्टा खूप झाली; पण ‘इक्कसवीं सदी’ हा शब्द सतत ऐकायला मिळाला तो त्यांच्याकडूनच. मोठमोठ्या आकाराचे कम्प्युटर सगळ्या कार्यालयांत विराजमान होण्याचा तो काळ होता. काय दुर्दैवी योगायोग... एकविसाव्या शतकाचं स्वप्न दाखविणाऱ्या राजीव गांधींची १९९१ मध्ये हत्या झाली आणि तेच वर्ष आपल्या इतिहासातलं एक वेगळं वळण देणारं वर्ष ठरलं. पुढच्या दशकात आपला देश कुठं जाणार आहे त्या रस्त्याची दिशा याच वर्षी निश्चित झाली. आपल्या देशाची अर्थव्यवस्था खुली झाली आणि पुढच्या दहाच वर्षांत देश एका वेगळ्या वळणावर येऊन उभा राहिला. या आर्थिक धोरणांतील बदलांची फळं आता दिसू लागली होती. देशातील तरुणांना नवनव्या संधी उपलब्ध होत होत्या आणि देशाचा चेहरामोहराच बदलत होता. केबल टीव्हीपासून ते ‘कोकाकोला’पर्यंत आणि खासगी नोकऱ्यांपासून ते घराघरांत वाढू लागलेल्या आर्थिक सुबत्तेपर्यंत हा बदललेला चेहरा स्पष्टच जाणवत होता. वीस वर्षांपूर्वी म्हणजे २००० हे वर्ष उजाडण्याच्या वेळी सगळ्या जगात एक वेगळाच जोष संचारला होता. एका महत्त्वाच्या कालखंड बदलाचे आपण साक्षीदार आहोत, असं प्रत्येकाला वाटत होतं. ‘वायटुके’ नावाच्या कम्प्युटर प्रॉब्लेमचा तेव्हा बोलबाला होता. ‘इंटरनेट’ ही ‘इन थिंग’ व्हायला सुरुवात झाली होती. महानगरांमध्ये मॉल आणि मल्टिप्लेक्स संस्कृती रुजू लागली होती आणि महामार्गांचा चेहरा जरा गुळगुळीत होऊ लागला होता. सनदशीर मार्गानं, बुद्धीचा वापर करून भरपूर पैसे मिळविता येतात आणि संपत्ती निर्माण करता येते, याचा नवमध्यमवर्गीय तरुणांना झालेला साक्षात्कार ही त्या दशकाची सर्वांत मोठी देणगी होती. पैसा आल्यानं पारंपरिक मूल्यव्यवस्थेला हादरे बसण्याचाही हाच काळ होता. थोडक्यात, भौतिक सुखाची गंगा भारतभूमीवर अवतरली आणि लवकरच या ‘गंगे’चं पात्र आसेतुहिमाचल असं विस्तारलं.
पुढच्या दोन दशकांत हाच प्रवास अधिक वेगानं, अधिकाधिक वेगानं होत गेला. नेपथ्यरचना थोडीफार बदलली, तरी मूळ नाटकाचा संच तोच होता. एकीकडं संपत्तीनिर्माणाची संधी आणि दुसरीकडं पारंपरिक मूल्यव्यवस्थेशी संघर्ष असा हा जोडप्रवास काही काळ चालू राहिला. नंतर तंत्रज्ञानातील अफाट वेगवान बदलानं जगण्याची सगळी मितीच बदलवून टाकली. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकाअखेर आपल्याकडं ‘स्मार्टफोन’ आले आणि आपलं जगणं खरंच पहिलं राहिलं नाही! त्यामुळं काय काय झालं आणि काय कमावलं-गमावलं हे आपल्याला आता सगळं ठाऊक झालं आहे. आता पुढं काय, हा प्रश्न आहे.
आता लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा, की २००० मध्ये जन्मलेली मुलंही आता १९ वर्षांची झाली आहेत. प्रौढ आहेत. त्यांनी मतदानही केलेलं आहे. त्याच्या लेखी विसावं शतक म्हणजे केवळ इतिहास आहे. त्यांच्यासमोर हे सगळं शतक उभं आहे. अजून ८० वर्षं आहेत. ही मुलंच हे शतक घडवणार आहेत. (विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा शेवटी जन्मलेल्यांचाही ठसा या शतकावर असेलच!) या मुलांसाठी आपण ‘वारसा’ म्हणून काय देणार आहोत, याचा विचार करू लागलो तर मात्र काहीशी निराशा दाटून आल्याखेरीज राहत नाही. यात सगळ्यांत महत्त्वाचा असेल तो पर्यावरणाचा प्रश्न. पर्यावरणाचे घातक परिणाम पुढील पिढ्यांना भोगायला लागू शकतात. याची जाणीव आता जागतिक पातळीवर सगळीकडं होऊ लागली आहे. ऋतुचक्र बदलत चाललं आहे, हे आपणही आत्ता अनुभवतोय. निसर्गाचा समतोल ढासळला तर माणसानं बसवलेली घडी विस्कटायला अजिबात वेळ लागणार नाही. हा प्रश्न आपल्या अस्तित्वाशीच निगडित असल्यानं त्यावर पुढच्या काळात अधिकाधिक काम करावं लागणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक प्रगतीचा. देशासमोर बेरोजगारी, मंदी, घटलेला वृद्धिदर हे सगळंच मोठं आव्हान आहे. या तरुण पिढीच्या हाताला काम मिळालं नाही, तर त्यांच्यातील ऊर्जास्रोताला विघातक वळण मिळण्यास वेळ लागत नाही. आपण आत्ताही आजूबाजूला याची लागण झालेली पाहतोच आहोत. तेव्हा पुढच्या काळात तातडीनं या प्रश्नावर सगळ्यांनी मिळून मार्ग काढलाच पाहिजे. तिसरा प्रश्न आहे तो महानगरांमधील पायाभूत सुविधांचा. आपली खेडी ओस पडत चालली आहेत आणि शहरं अतिभयानक पद्धतीनं फुगत चालली आहेत. ही नैसर्गिक वाढ नाही. ही आपल्या फसव्या नियोजनामुळं आलेली सूज आहे. महानगरांमध्ये आत्ताच वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, महागाई आणि बेशिस्त या दुर्गुणांचा सर्वत्र संचार दिसतो. भविष्यात ही स्थिती सुधारली नाही तर रस्त्यारस्त्यावर खून पडायला वेळ लागायचा नाही. हे अराजक टाळण्यासाठी शहरांमधली गर्दी नियंत्रित केलीच पाहिजे.
सगळं जगणंच ‘टी-२०’सारखं वेगवान होत चाललेलं असताना आणि सगळ्याच प्रश्नांवर झटपट उत्तरं शोधण्याचा जमाना असताना, काही गोष्टींकडं दीर्घ पल्ल्याच्या कसोटी क्रिकेटसारखं बघितलं पाहिजे. टिकून राहणं एवढंच आव्हान केवळ पुरेसं नाही, तर टिकून राहून जगण्याचा आणि मानव्याचा दर्जा टिकवणं ही खरी ‘कसोटी’ आहे!

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; २९ डिसेंबर २०१९)

---