28 Feb 2021

दृष्टी-श्रुती डिजिटल दिवाळी अंक लेख २०२०

नवी दृष्टी देणारा ‘राशोमान’

---------------------------------


काही वर्षांपूर्वी मी पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आयोजित केलं जाणारं (आणि महत्त्वाचं म्हणजे मराठीतून चालणारं) एक आठवड्याचं रसास्वाद शिबिर अटेंड केलं होतं. माझ्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा व मोलाचा अनुभव होता. त्यातही या शिबिरात आम्हाला दाखवला गेलेला अकिरा कुरोसावाचा ‘राशोमान’ हा चित्रपट पाहून मी थरारून गेलो. तब्बल ७० वर्षांपूर्वी निघालेला हा सिनेमा मी आठ वर्षांपूर्वी प्रथम पाहिला. त्यानंतर अनेकदा पाहिला. दर वेळी मला या चित्रपटानं वेगळी अनुभूती दिली आहे; माझ्या धारणा बदलल्या आहेत. ‘सत्य म्हणजे काय?’, ‘जगात एकच एक सत्य असतं का?’, ‘ज्याला जसं दिसतं तसं सत्य असतं का?’ या आणि अशा अनेक मूलभूत प्रश्नांना हात घालणारा हा चित्रपट म्हणूनच माझ्या मनावर खोलवर ठसा उमटवून गेला आहे.
त्यामुळंच १९५० मध्ये प्रदर्शित झालेला ‘राशोमान’ (याचे उच्चार राशोमोन, राशोमन असेही केले जातात!) हा चित्रपट जागतिक अभिजात चित्रपटांमध्ये गणला जातो. मानवी जीवनावर, वर्तनावर मूलभूत चिंतन करणारे चित्रपट नेहमीच कलात्मक आणि वैचारिक उंची गाठताना दिसतात. ‘राशोमान’ हा याच वर्गातला चित्रपट. रायुनोसुक अकुतागावा यांच्या ‘राशोमान’ याच नावाच्या लघुकथेवरून या चित्रपटाचं शीर्षक घेण्यात आलं असलं, तरी प्रत्यक्षात अकुतागावा यांच्यात ‘इन ए ग्रोव्ह’ या दुसऱ्या लघुकथेवर आधारित या चित्रपटाचं कथानक रचण्यात आलं आहे.

जपानमधील ग्रामीण भागात असलेल्या 'राशोमान' या भग्नावस्थेत असलेल्या, भव्य लाकडी प्रवेशद्वाराच्या दृश्यानं चित्रपटाची सुरुवात होते. दर वेळी हा सिनेमा सुरू झाला की हे दृश्य आणि त्या वेळी कोसळत असलेला भयंकर पाऊस आपलं लक्ष वेधून घेतात. आपण अगदी सावरून पुढं काय होणार ते बघू लागतो. या लाकडी प्रवेशद्वाराच्या खाली असलेल्या जागेत एक लाकूडतोड्या आणि एक तरुण धर्मगुरू बसलेला आहे. त्या दोघांनीही तीन दिवसांपूर्वी एक भयानक घटना बघितली आहे. प्रचंड पाऊस कोसळत असल्यामुळं आणखी एक माणूस तिथं आश्रयाला येतो. हे दोघं मग त्या माणसाला त्या घटनेविषयी सांगतात. ती घटना असते जंगलात झालेल्या एका खुनाची. त्या लाकूडतोड्यानं एका माणसाच्या मृतदेहाचे हात बघितलेले असतात. त्यानंतर तो घाबरून तिथून पळून जातो. नंतर त्या खुनाचा खटला सुरू होतो, तेव्हा कोर्टासमोर सगळी हकीकत आपल्यासमोर उलगडत जाते. त्या दिवशी जंगलात घोड्यावरून एक सुंदर तरुणी आणि सोबत चालत तिचा सैनिक (समुराई) पती जात असताना ‘ताजोमारू’ नावाचा त्या भागातला कुख्यात दरोडेखोर त्यांना पाहतो. त्याच वेळी किंचित वारा येतो आणि त्या तरुणीच्या चेहऱ्यावरील पडदा हलतो. तेव्हा तिच्या अप्रतिम सौंदर्याचं दर्शन त्या दरोडेखोराला होतं. त्याच्या मनात तिच्याविषयी अभिलाषा उत्पन्न होते. त्यानंतर जे काही घडतं, त्याची तीन वेगवेगळी रूपं तिथल्या आपल्याला पाहायला मिळतात. दरोडेखोराचं, त्या तरुणीचं आणि मृत सैनिकाचं... (मृत सैनिकाचं म्हणणं प्लँचेटद्वारे ऐकायला मिळतं.) हे तिघेही कोर्टासमोर आपला जबाब देत असतात. या तिघांचंही म्हणणं ऐकल्यावर लाकूडतोड्या स्वतःचं चौथं (आणि आधीच्या तीन कहाण्यांपेक्षा वेगळंच) म्हणणं सांगतो. हे पाहिल्यावर नक्की काय घडलं, याविषयी आपल्याही मनात संभ्रम उत्पन्न होतो. सत्य नक्की काय, याविषयी आपण विचार करू लागतो. चित्रपटाच्या शेवटाकडं दिग्दर्शक याचं सकारात्मक उत्तर देतो. चित्रपट संपल्यानंतरही आपण त्या कथानकात आणि महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शकानं उपस्थित केलेल्या मूलभूत प्रश्नाचं चिंतन करण्यात गुंग होऊन जातो, हे या कलाकृतीचं सर्वांत मोठं यश!
मी हा सिनेमा पाहिल्यानंतर आपल्यावर असा, एवढा खोलवर परिणाम याआधी कुठल्या चित्रपटानं केला आहे, हे आठवू लागलो. ‘संत तुकाराम’पासून ते ‘वास्तुपुरुष’पर्यंत आणि ‘पथेर पांचाली’पासून ‘गँग्ज ऑफ वासेपूर’पर्यंत अनेक चित्रपट डोळ्यांसमोरून गेले. जागतिक चित्रपट महोत्सवांत मी यापूर्वीही अनेक परकीय भाषांतले चित्रपट पाहिले होते. मात्र, एवढा खोल परिणाम अन्य कुठल्याही चित्रपटाचा माझ्यावर झालेला मला आठवत नाही. ‘राशोमान’नंतर मात्र माझी विचारांची दिशाच बदलून गेली. मानवी आयुष्याकडं, जगण्याकडं बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मला या कलाकृतीनं दिला.
याबाबत अधिक विचार केल्यावर लक्षात येतं, की या विचारांचं मूळ त्या कलाकृतीतच दडलेलं आहे. कुरोसावा यांनी या चित्रपटाची मांडणी मोठी वेधक केली आहे. चित्रपट माध्यमाची ताकद त्यातून लक्षात येते. चित्रपटाचं पार्श्वसंगीत अप्रतिम आहे. किंबहुना संपूर्ण चित्रपटात या पार्श्वसंगीतानं एखाद्या पात्रासारखी भूमिका बजावली आहे. चित्रपट जुन्या काळातला आणि कृष्णधवल असला, तरी 'राशोमान' गेटवर प्रचंड कोसळणारा पाऊस आणि तिथं बसलेली तीन माणसं हे दृश्य अंगावर काटा आणतं. चित्रपटाची सुरुवात आणि शेवट वेधक आहे. सुरुवातीला भरून आलेलं आभाळ आणि कोसळणारा पाऊस, तर शेवटच्या दृश्यात मोकळं झालेलं आकाश आणि स्वच्छ पडलेलं ऊन हे अगदीच प्रतीकात्मक आणि सहज लक्षात येण्यासारखं आहे.
या चित्रपटात तोशिरो मिफुने या प्रख्यात जपानी अभिनेत्यानं ताजोमारू या दरोडेखोराची भूमिका केली आहे. मिफुने यांनी कुरोसावा यांच्या एकूण १६ चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. त्यापैकी ही दरोडेखोराची भूमिका खास समजली जाते. याशिवाय तकाशी शिमुरा यांनी लाकूडतोड्याची, मिनोरू चिआकी यांनी तरुण धर्मगुरूची, तर माचिको क्यो हिनं तरुणीची भूमिका केली आहे. या सर्वांनी आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत. चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असताना यापैकी कुणाही कलाकाराला चित्रपटाचा शेवट काय आहे, हे माहिती नव्हतं, म्हणे! त्यामुळे ते कुरोसावा यांच्याकडं चित्रपटाचा शेवट सांगण्यासाठी हट्ट करीत असत. चित्रपट तयार झाल्यानंतर कुरोसावा यांना एकच एक असं सत्य सांगायचंच नव्हतं; तर सत्य नावाची गोष्ट मुळात अस्तित्वात आहे का; की ती व्यक्तिपरत्वे बदलते, याच मुद्द्यावर लक्ष वेधायचं होतं, हे सर्वांच्या लक्षात आलं.
या चित्रपटाचं महत्त्व म्हणजे या चित्रपटामुळेच जपानी चित्रपट जागतिक स्तरावर पोचला. या चित्रपटाने व्हेनिस चित्रपट महोत्सवात (१९५१) प्रतिष्ठेचा गोल्डन लायन पुरस्कार पटकावला. याशिवाय १९५२ च्या ऑस्कर सोहळ्यात या चित्रपटाला अॅकॅडमी ऑनररी पुरस्कारानं गौरविण्यात आलं. मुळात हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा जपानमध्ये त्याचं फार काही जोरदार स्वागत झालं नव्हतं. किंबहुना काही टीकाकारांनी या चित्रपटावर टीकाच केली होती. मात्र, अमेरिकेत व पाश्चात्त्य जगात या चित्रपटाचे कौतुक झाल्यावर जपानमधील समीक्षकही गोंधळले होते. हा चित्रपट म्हणजे दुसऱ्या महायुद्धात जपानच्या झालेला पराभवाचं समर्थन करण्याच्या मानसिकतेतून आलेली कलाकृती आहे, असाही काही समीक्षकांनी या चित्रपटाचा अर्थ लावला होता. अर्थात सत्याचा शाश्वत शोध हाच हा सिनेमाचा मूलाधार असल्यानं तो जगभरातल्या प्रेक्षकांना आवडला आणि आज तो जगातील काही सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो.

मला स्वत:ला हा चित्रपट याच कारणासाठी भावला, आवडला, पटला! हा चित्रपट पहिल्यांदा पाहणारा माणूस ‘सत्य’ या संकल्पनेविषयी आपल्या मनात चित्रपट पाहण्यापूर्वी असलेल्या धारणा नक्कीच तपासून बघितल्याशिवाय राहणार नाही, याची मला अगदी खात्री वाटते. ‘सत्यमेव जयते’ हे आपलं राष्ट्रीय वचन आहे. अगदी लहानपणापासून आपल्याला नेहमी खरं बोलावं, खरं वागावं अशी शिकवण दिली जाते. पण हे खरं म्हणजे काय, सत्य म्हणजे नक्की काय, याचा उलगडा काही होत नाही. आयुष्यात पुढं आपण मोठे झालो, टक्केटोणपे खाऊन शहाणे झालो, तरी या विचाराचा पिच्छा काही सुटत नाही. जसजसे आपण मोठे होत जातो, आपलं अनुभवविश्व समृद्ध होत जातं तसतसं सत्य नावाच्या ‘साक्षात्कारा’ची वेगवेगळी ओळख पटू लागते. त्यातून संभ्रम वाढतच जातो. एकच घटना दोन वेगळ्या ठिकाणांहून बघणाऱ्या लोकांना वेगळी दिसते. त्यांना जे दिसतं, तेच त्यांच्यापुरतं सत्य असतं. असं असेल तर मग एकच एक, शाश्वत असं सत्य असतं तरी काय? आपली जडणघडण, आपल्या विचारांची बैठक, धारणांचा पाया नक्की कुठल्या गृहीतकांवर आधारित आहे? मग जर हा पायाच ठिसूळ असेल तर त्यावर आधारलेली सगळी नीतिमूल्यं झूठ ठरवायची का? की मुळात हे सगळे मनाचे खेळ आहेत? आपल्या कृत्यांचं समर्थन करण्यासाठी माणसाचा अत्यंत हुशार मेंदू तर या वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधून काढत नाही ना? याला हे म्हणायचं, त्याला ते म्हणायचं हे सगळं ठरवलं कुणी? आदिम प्रेरणांपासूनचा हा प्रवास नक्की कुठल्या घटकांवर आधारलेला आहे? संस्कृती म्हणजे तरी नक्की काय? आदिम प्रेरणांचं नियमन करणाऱ्या या चौकटी मोडण्यासाठी तर मानवी मनाचे हे निरनिराळे खेळ सुरू नाहीत ना? आपण जे काही वागतो, बोलतो त्याला एक प्रामाणिकपणाचं, सत्याचं कथित अधिष्ठान दिलं, की मग माणूस मोकळा होतो. त्याला या कृत्यांविषयी लाज वाटत नाही, की पश्चात्ताप होत नाही. पण मग स्वत:च्या मनालाही फसवू शकेल अशी कुठली ‘सत्य’ नावाची बाब अस्तित्वात तरी असू शकते काय? एक ना दोन... अशा नाना प्रश्नांनी मन भोवंडून जातं. ‘राशोमान’मधली कथा आणि त्यातल्या पात्रांचं वर्तन पाहून सतत हेच विचार मनात पिंगा घालायला लागतात.
मग लक्षात येतं, की दिग्दर्शकानं या सर्व कथेतून हाच मूलभूत विचार उपस्थित केला आहे. तो वाचून आपले सत्य या संकल्पनेविषयीचे सर्व पूर्वग्रह गळून पडतात आणि आपण तिचा नव्यानं विचार करायला लागतो. माझ्या मते, एखाद्या कलाकृतीचं हे यश फार मोठं मानायला हवं. कलाकृतीचा आस्वाद घेताना ती केवळ पंचेद्रियांना सुखावणारी न राहता, मेंदूपर्यंत घुसून तिथल्या विचार केंद्रांना चालना देत असेल, तर ती कलाकृती निखालस मोठी! ‘राशोमान’ ही अशीच कलाकृती आहे. हा सिनेमा पुन:पुन्हा बघताना त्यातले अर्थ नव्यानं उलगडत जातात. आपलं वय वाढतं, आपली विचारक्षमता वाढते, अनुभवविश्व वाढतं, तसं या कलाकृतीचा आवाकाही नव्यानं समजू लागतो. तब्बल ७० वर्षांपूर्वी तयार झालेला हा कृष्णधवल चित्रपट आपल्याला अजूनही नवनवे विचार देत आहे, आपल्या धारणांना धक्का लावतो आहे. त्या अर्थानं आता ‘राशोमान’चा आयुष्यावर पडलेला कायमस्वरूपी प्रभाव हेही एक निखळ ‘सत्य’च आहे! 

----

(पूर्वप्रसिद्धी : दृष्टी-श्रुती डिजिटल दिवाळी अंक २०२०)

---

22 Feb 2021

समदा दिवाळी अंक २०२० लेख

 अन्नपूर्णा आणि अन्नपूर्णा २.०

-----------------------------------

आमचं गावाकडचं जुनं धाब्याचं घर आहे... सलग सात खणांचं... त्यातल्या एका कोपऱ्यात स्वयंपाकघराचा उंचवटा आहे... त्या उंचवट्याच्या कोपऱ्यात चूल आणि वैल आहे. चूल धडाडून पेटली आहे. त्यावर तापलेला तवा आहे. मी त्या उंचवट्याच्या खाली ताट समोर घेऊन बसलो आहे. माझी आजी त्या चुलीशेजारी हातात फुंकणी घेऊन चुलीत फूंक मारते आहे. चुलीतल्या धुरामुळं तिचे डोळे तर चुरचुरताहेतच, पण मलाही एवढ्या लांब ती धग लागते आहे... पण पोटातली भुकेची धग त्याहून मोठी आहे... म्हणून मी दटून तिथंच बसलो आहे... मग तव्यावरची गरमागरम भाकरी पुढच्या मिनिटाला माझ्या ताटात येते आहे आणि ताटातल्या ताकातल्या पिठल्यासोबत मी ती पेढ्यासारखी अत्यंत रुचकर भाकरी खातो आहे...

आजी आणि आईच्या हातचं जेवण हा विषय प्रत्येकालाच प्रिय असा! आपला शब्दश: पिंड ज्यावर पोसला आहे असं हे खाण्याचं नातं... या दोघींशी जसा आपला रक्ताचा संबंध असतो, तसा आणि तितकाच लहान आतड्याचा, मोठ्या आतड्याचा, जठराचा, यकृताचा, अन्ननलिकेचा, स्वादुपिंडाचा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जिभेचाही संबंध असतो. शेतात पडलेलं बीज आणि त्यातून वर आलेल्या धान्याच्या कोंभाइतकंच हे नातं जैव असतं... त्यामुळंच बालपणीच्या या दोघींशी संबंधित सगळ्या आठवणी त्यांच्या हातून खाल्लेल्या पदार्थांच्याच जास्त आहेत. बायकोच्या हातच्या पदार्थांना आईच्या हातची चव येत नाही आणि आईच्या हाताला ती चव यायला आजीच्या हाताखाली अनेक वर्षं उमेदवारी करावी लागते, असं आपल्याकडं म्हणतात त्यामागं हेच कारण असावं. वर्षानुवर्षं हाताला चटके सोसत या माउल्यांनी आपल्या जिभेचे चोचले पुरवले. त्याची सर आता कशाला येणं शक्य नाही...

आमच्या आजीचं नाव काशीबाई. ती माहेरची देशमुख. जामखेडच्या गढीवरच्या देशमुखांचं तालेवार माहेर. त्यामुळं तिच्या अंगात तो ‘देशमुखी’ तोरा शेवटपर्यंत होता. आमचं गाव तसं दुष्काळी! बऱ्याच गोष्टींचा अभाव... पण या जामखेडच्या मातीत ज्वारी उत्कृष्ट दर्जाची पिकते. आमच्या शेतातून घरी ज्वारी यायची आणि आमच्या बाहेरच्या घरात निम्म्या भागात पोती ओतली जायची. शेजारी आधाराला उरलेली पोती लावली जायची. आम्ही भावंडं त्या पोत्यावर चढून त्या ज्वारीत उड्या मारायचो. ज्वारीत खेळून खेळून पाय पांढरेफटक व्हायचे. ‘अन्नधान्याने घर भरू दे,’ ही म्हण आमच्या घरात शब्दश: मूर्त व्हायची. अर्थात ज्वारी घरातली खूप असली, तरी आमच्या रोजच्या जेवणात भाकरी नसायची. पोळी, भाजी, कोशिंबिरी, चटण्या, भात आणि वरण असाच सर्वसाधारण घरांत असतो, तसा रोजचा मेनू असायचा. 

आमच्या आजीमधली सुगरण खऱ्या अर्थानं दिसायची ती सणावाराला. तेव्हा तिचा कडक सोवळ्यात स्वयंपाक असायचा. होळी, श्रावणातले चारही शुक्रवार, पोळा, नवरात्र, दसरा, खंडोबाचं नवरात्र हे प्रमुख सण घरात साजरे व्हायचे. त्यात दोन्ही नवरात्रांत आणि श्रावणात कुळधर्म, कुळाचार चाले. श्रावणातल्या चारही शुक्रवारी घरात पुरणावरणाचा ज्याचा ‘चारी ठाव’ म्हणतात तसा स्वयंपाक असायचा. माझी आजी तिच्या साठीपर्यंत सगळा स्वयंपाक एकहाती करायची. नंतर सुना आल्यावर तिनं फक्त पुरणपोळ्यांचं काम स्वत:कडं घेतलं आणि बाकी स्वयंपाक माझी आई व काकू मिळून करू लागल्या. ती सवाष्ण बारा वाजता जेवायला यायच्या आत हा सगळा स्वयंपाक तयार असायचा. त्यासाठी या बायका पहाटेच उठून कामाला लागायच्या. पुरणाचा घाट मोठा असायचा. मी जरा मोठा झाल्यावर कधी कधी पुरणयंत्रांतून पुरण हाटण्याचं काम मला मिळे. पण हे खूप नंतर! त्यापूर्वी आजी पाटा-वरवंट्यावरच पुरण घालत असे. मात्र, आजीची पुरणपोळी कमाल असायची. अगदी रेशमासारखी नाजूक, नेमकी गोड आणि अजिबात पुरण बाहेर न सांडणारी अशी बांधीव पोळी आजी करायची. तांबूस, लालसर रंगाची ती पोळी वरून साजूक तूप घातल्यावर आणखीनच देखणी दिसायची. तिचा पहिला घास तोंडात गेला, की चटका बसायचाच. पण तो चटका सोसत सोसत ती पोळी घशाखाली उतरवण्याच्या आनंदाला ‘स्वर्गीय’ एवढा एकच शब्द मला सुचतो. खरं सांगायचं, तर त्या लहान वयात या अन्नपदार्थांचं मोल आम्हाला कितपत कळलं होतं कोण जाणे. तो दर्जा आम्ही जणू गृहीतच धरला होता. नंतर आयुष्यात घराबाहेर पडायची, होस्टेलवर राहण्याची, मेसमधला गार डबा खाण्याची वेळ आली, तेव्हा डोळे खाडकन उघडले. आजी आपल्याला काय उत्तम दर्जाचं जेवण करून खायला घालत होती, हे समजलं. आजीसारखीच तिची मोठी मुलगी, म्हणजे माझी थोरली आत्या सुगरण होती. अक्षरश: अन्नपूर्णाच ती! तिच्या हाताला जी चव होती, त्याचं वर्णन करणं अशक्य आहे. कुठलाही पदार्थ सांगा, तिला तो जमत नाही किंवा तिचा तो बिघडलाय, हे मी कधीच पाहिलेलं नाही. या माझ्या आत्यानंही आमच्या जिभेचे भरपूर चोचले पुरवले. वास्तविक पुरणपोळी खावी तर माझ्या आजीच्या हातचीच! (हे प्रत्येक जण म्हणत असतो, हे मला ठाऊक आहे आणि ते प्रत्येकाच्या बाबतीत तेवढंच खरं आहे. याचं कारण आपल्यावर लहानपणी त्या खाण्याचा झालेला संस्कार!) पण खरोखरच आमच्या आजीची पुरणपोळी रेशमासारखी असायची. त्या काळातल्या बहुतेक बायका अशाच सुगरण असायच्या. पण प्रत्येकीच्या हातची चव वेगळी! आमच्या आत्यानं तिच्या आईचा हा गुण केवळ उचललाच होता असं नाही तर तिनं त्या गुणाचा भरपूर विस्तारही केला. माझे आजी-आजोबा शिरूरला अनेक वर्षं राहिले. आत्या ही त्यांची सर्वांत थोरली मुलगी. तिचं लग्न पुण्यात मकाशीर कुटुंबात झालं आणि ती पुणेकर झाली. आधी कसबा गणपतीजवळ आणि नंतर साततोटी हौदाजवळ फुलंब्रीकर वाड्यात तिनं अनेक वर्षं संसार केला. वाड्यातली खोली होती दहा बाय दहाची... आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत गावावरून तिच्याकडं यायचो आणि आठ-आठ दिवस मुक्काम ठोकायचो. आत्या, तिचे यजमान, माझी दोन्ही आत्येभावंडं यांनी कधीही पाहुणे आले म्हणून कुरकुर केल्याचं मला आठवत नाही. उलट त्या वाडासंस्कृतीची मला लहानपणीच (पुण्यात राहत नसूनही) ओळख झाली. त्या छोट्याशा खोलीत आत्याचा संसार आणि तिचा सुगरणीच्या वरताण स्वयंपाक चालायचा. 

आम्ही देशस्थ आणि त्यात गावाकडचे! आमच्याकडं तळणीच्या मोदकांची पद्धत! उकडीचा मोदक हा पदार्थ मी सर्वप्रथम खाल्ला तो या आत्याच्या हातून... तिच्या हातचे उकडीचे मोदक कधीही बिघडले नाहीत. उलट, तिच्यासारखे उत्कृष्ट मोदक मी आजतागायत कुणाचेच खाल्ले नाहीयेत. मी नंतर पुण्यात शिकायला आलो, तरी सणावाराचं माझं गोडधोड खाणं आत्यानं कधी चुकू दिलं नाही. मी जेवायला आपला कायम त्यांच्याकडे! ती गरमागरम उकडीचे मोदक वाढायची, तुपाची धार सोडायची... बाकी काही खाऊ नकोस; फक्त मोदक खा, म्हणायची. मी वेड्यासारखा एखादा मोदक शेवटी खायचो. बाकी भाजी-पोळी खात बसायचो. जेव्हा आपल्याला मिळत असतं, तेव्हा आपल्याला त्याची किंमत नसते, हेच खरं. माझी ही आत्या दहा वर्षांपूर्वी कर्करोगानं गेली. तिला अन्ननलिकेचा कर्करोग झाला होता. तिला शेवटी शेवटी एक घासही खाता यायचा नाही. आयुष्यभर दुसऱ्याला खाऊ घालण्यात आनंद मानणाऱ्या माझ्या या ‘मोठ्या आई’ला शेवटी शेवटी काहीही खाता येत नव्हतं... तिला अन्नच घेता येत नव्हतं... दैवानं केलेला यापेक्षा क्रूर विनोद माझ्या पाहण्यात नाही! 

आजी आणि मोठ्या आत्याच्या तालमीत तयार झालेल्या माझ्या आईच्या हातचा स्वयंपाकही असाच उत्कृष्ट असतो. आईचं माहेर मराठवाड्यातलं. त्यामुळं तिच्या आईच्या हातचे मराठवाडी पदार्थ ती सहज करते. त्यात एसर आमटी किंवा शेंगोळ्यांसारखे पदार्थ तिचे खास फेव्हरिट. आईचा असाच एक पेटंट पदार्थ म्हणजे गव्हाची खीर. आईच्या हातून ज्यांनी ज्यांनी हा पदार्थ खाल्लाय त्यांनी कायमच तिच्याकडं वारंवार त्या खिरीची फर्माईश केलीय. आईचा कधीही न बिघडणारा आणखी एक पदार्थ म्हणजे ओल्या नारळाच्या वड्या. खरं तर आईचा कोकणाशी काहीही संबंध नाही. मात्र, तिच्या सर्व जमणाऱ्या पदार्थांमध्ये नारळाचा समावेश असतो. गव्हाच्या खिरीतही त्या नारळाचं दूध लागतंच. माझ्या लहानपणी आम्ही एकत्र कुटुंबात राहिलो. आजी-आजोबा, माझी धाकटी आत्या (तिचं लग्न होईपर्यंत), माझा काका, नंतर काकू आणि आम्ही एकूण सहा भावंडं... आई प्रत्येकाची आवड-निवड जपत स्वयंपाक करायची. आत्याला लसूण चालायचा नाही. मग तिची भाजी वेगळी... बाकीच्यांची वेगळी. काकाला दही-साखर जेवणात आवडायचं. मग आवर्जून त्याच्यासाठी ती वेगळी दही-साखरेची वाटी काढून ठेवायची... (यावरून एक आठवलं. मला लहानपणी एक विचित्र म्हणावी अशी सवय होती. मला मध्यरात्री जाग यायची व तेव्हा प्यायला मला दूध लागे. आई माझ्या उशाशी दुधाचा कप वर बशी पालथी घालून ठेवायची. मी मध्यरात्री उठून बशीत ते गार दूध ओतून प्यायचो. मला त्यातली साखर ढवळलेली चालायची नाही. मी ती साखर नंतर चमच्याने खायचो.) घरी आलेले पाहुणे सकाळच्या एसटीनं परत जाणार असले, तरी सकाळी सात वाजता त्यांना साग्रसंगीत जेवू घालायचा कार्यक्रम घरी चालायचा. शक्यतो बाहेरचं खाणं टाळण्याकडं कल असायचा. त्यामुळं बाहेर कुठंही जायचं झालं, तरी घरून डबा नेणं ही सर्वमान्य रीत होती. नाही तर दुसऱ्याकडं मेहुण म्हणून, मुंजा म्हणून वा कुमारिका म्हणून जेवायला जाणे हे सर्वांत सोपं होतं!

गावी शाळेत डबा नेण्याची पद्धत नव्हती. सकाळी तीन तास आणि दुपारी तीन तास शाळा भरे. मधला वेळ सरळ घरी यायचं. नंतर माध्यमिक शाळेतसुद्धा घर एवढं जवळ होतं, की दुपारच्या वीस मिनिटांच्या मधल्या सुट्टीत दुपारचा चहा प्यायला घरी यायचो. पुढं नगरमध्ये शाळेत जायला लागल्यावर डबा हा प्रकार आयुष्यात आला. तिथं पोळी, लोणचं आणि एक भाजी हा ठरलेला मेनू असायचा. इतर मित्रांचे डबे उघडले, की मग त्यासोबत त्यांचं सगळं जगणंच नकळत समोर उलगडायचं. काही काही मित्र डबाच आणायचे नाहीत. टाइमपास करत बसायचे. ते डबा का आणत नसतील, हा प्रश्न तेव्हा पडलाच नाही. आता पोटात तुटतं! अर्थात शाळेतल्या वयात असलेला निरागसपणा अंगी होता. तेव्हा कुणीही कुणाच्याही डब्यात हात घालून सहज काहीही खाऊ शकत होता. मीही आपल्या घरी होणाऱ्या भाजीपेक्षा वेगळ्या चवीच्या भाज्या पहिल्यांदा या डब्यांतूनच चाखल्या. तिखटाची ‘गोडी’ लागली ती तिथपासून! एरवी आमच्या घरचं जेवण म्हणजे टिपिकल मध्यमवर्गीय, ब्राह्मणी आणि अळणी! पण आई त्या पदार्थांनाही अशी चव आणते, की विचारू नका. साधी फोडणीची पोळी किंवा फोडणीचा भात असू देत. मला तर वाटतं, महाराष्ट्रातील काही पिढ्याच्या पिढ्या फोडणीची पोळी वा फोडणीचा भात या ब्रेकफास्टवर लहानाच्या मोठ्या झाल्या असतील.

आईच्या हातचं खाणं हा कुठल्याही मुलासाठी 'वीक पॉइंट' असतो आणि त्या भावनेभोवतीच्या सर्व भावनोत्कट बाबी बाजूला ठेवल्या, तरी आमची पिढी घरच्या खाण्याबाबत आजच्या पिढीपेक्षा जास्त समृद्ध होती आणि म्हणूनच जास्त फिट आहे, असं आवर्जून सांगावंसं वाटतं. 

आमच्या लहानपणी गावात बेकरी नव्हतीच. तेव्हा पाव किंवा मैद्याचे अन्य पदार्थ फार उशिरा आयुष्यात आले. अगदी बिस्कीटही खाण्याची फार क्रेझ नव्हती. हे सगळं बालपण संपल्यावर, शहरात गेल्यावर मनसोक्त खायला मिळालं. मात्र, त्यामुळं घरचं सकस अन्न खाऊन लहानपणी जी सुदृढता लाभली ती आजही उपयोगी पडते आहे. आमच्या शेतात पेरूच्या झाडावर बसून, तिथले पेरू तोडून तिथंच खाण्याचं भाग्य मला व माझ्या भावंडांना लाभलं. घरच्या शेतातला गहू, ज्वारी, बाकीचा भाजीपाला खाण्याचं सुख अनुभवता आलं. खूप श्रीमंती होती असं नाही, पण कधी काही कमी पडलं नाही. खाण्या-पिण्यात तर मुळीच नाही. साधं-सुधं, पण सकस व महत्त्वाचं म्हणजे गरमागरम जेवण दोन्ही-तिन्ही वेळांना पोटात जात होतं.

संक्रांतीच्या आधी, ऐन थंडीत धुंधुरमासाचं जेवण हा एक सोहळा असायचा. सकाळी आई लवकर उठून बाजरीची भाकरी, लोणी, वांग्याचं दही कालवलेलं भरीत, तिळाची चटणी असं ताट समोर ठेवी. भावंडांत गप्पागोष्टी करता करता हे जेवण सकाळी कधी संपायचं ते कळायचंही नाही. तीच परिस्थिती भोगीची. ती भोगीची टिपिकल मिक्स भाजी घरात व्हायचीच. आमच्याकडं महालक्ष्म्या यायच्या, तेव्हाही पुरणा-वरणाचा नैवेद्य असायचाच; पण जोडीला  त्या सोळा भाज्या साग्रसंगीत घरी केल्या जायच्या. महालक्ष्मीच्या नैवेद्याचं ताट संपवणं हे एक आव्हान असायचं. घरात अनेकदा मुंजा मुलगा म्हणून मलाच नैवेद्याचं ताट मिळायचं. त्यात काहीही टाकून द्यायचं नाही, अशी अट असायची. पहिल्यांदा कंटाळा यायचा. विशेषत: पंचामृत वगैरे प्रकार भातात कालवून वगैरे शेवटी एकत्र संपवायचे हे मला अजिबात आवडायचं नाही. पण आजूबाजूचे सगळे ज्येष्ठ तसंच जेवतात, हे पाहून मीही तसंच करायला लागलो. त्या अटीमुळं एक मात्र झालं. ताट स्वच्छ करायची सवय लागली. कुठलाही पदार्थ कुरकुर न करता खायची चांगली सवयही लागली. मुळात आई सुगरण असल्यानं ती करत असलेलं काहीही आम्ही मिटक्या मारीत खायचोच आणि आजही खातो. त्यामुळं तिथं अमुक एक आवडत नाही वगैरे प्रश्नच उपस्थित व्हायचा नाही.

माझी आजी मी १८ वर्षांचा असतानाच गेली. म्हणजे तसा तिचा फार सहवास मला लाभला नाही. मात्र, तिनं तिचा सगळा वारसा तिच्या थोरल्या मुलीकडं आणि माझ्या आईकडं सोपवला होता, असं म्हणायला हरकत नाही. या तिन्ही माउल्यांनी माझं केवळ शारीरिक भरणपोषण केलं असं नाही, तर माझ्या संपूर्ण आयुष्याचा निरोगी, सुदृढ पायाही भक्कमपणे रचला. आज मी जो काही आहे, तो त्यांच्या हातचं चवीष्ट अन्न खाऊन आणि पचवून...!

---


(पूर्वप्रसिद्धी : समदा दिवाळी अंक २०२०)

--------

31 Jan 2021

बिंगोस्कोप - भाग १९ ते २१

बिंगोस्कोप

-------------

स्वाती यादवाडकर या मैत्रिणीनं दोन-तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बिंगोकिड्स’ या लहान मुलांच्या पाक्षिकात मी ‘बिंगोस्कोप’ या सदरात जगभरातील काही उत्तम चित्रपटांची ओळख मुलांना करून दिली. ही रूढार्थाने परीक्षणं नाहीत. साधारण दहा ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी, त्यांना समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत सिनेमांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकूण २१ सिनेमांवर मी या सदरात लिहिलं आहे. हे लिखाण इथं एकत्रित राहील म्हणून तीन-तीन परिचय एकत्र करून एक ब्लॉग अशा रीतीनं प्रसिद्ध करीत आहे. हा सातवा व शेवटचा भाग...

----


१९. हरिश्चंद्राची फॅक्टरी
-----------------------------

हलत्या चित्रांची अद्भुतरम्य सफर...
---------------------------------------

मुलांनो, आपल्या महाराष्ट्रात, या मराठी भूमीत अनेक थोर, कर्तबगार माणसं होऊन गेली. तुम्ही ‘बिंगोस्कोप’ हे सिनेमाचं सदर वाचताय ना, तो सिनेमा भारतात सर्वांत आधी कुणी तयार केला माहिती आहे का? ते एक मराठी गृहस्थ होते आणि त्यांचं नाव होतं दादासाहेब धुंडिराज फाळके. सिनेमाला फाळके ‘हलती चित्रे’ असं म्हणत असत. या ‘हलत्या चित्रांच्या दुनियेचा जादूगार’ असलेल्या फाळकेंच्या जीवनावर ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा सुंदर मराठी चित्रपट २०१० मध्ये आला होता. तुम्ही तो अद्याप पाहिला नसेल, तर नक्की पाहा. भारतात पहिला सिनेमा तयार करणाऱ्या या माणसाची कर्तबगारी तुम्हाला त्यातून समजून येईल. 

परेश मोकाशी या रंगभूमी गाजवून आलेल्या रंगकर्मीनं दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट आहे. दादासाहेब फाळके यांनी तयार केलेल्या पहिल्या मूकपटाचं (तेव्हा चित्रपट ‘बोलत’ नसत; केवळ चित्रे दिसत असत. त्यामुळे त्यांना तेव्हा मूकपट म्हणत असत.) नाव ‘राजा हरिश्चंद्र’ असं होतं. त्यावरून मोकाशींनी आपल्या चित्रपटाचं नाव ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ असं का ठेवलं हे आपल्या लक्षात येईल. सिनेमातही स्वत: दादासाहेब आपल्या या उद्योगाला ‘फॅक्टरी’ असंच संबोधत असत. फाळके हे अतिशय हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होतं. ते जादूचे खेळही करायचे. जगात सर्वप्रथम पॅरिस येथे ल्युमिए बंधूंनी मूकपट सादर केला. त्यानंतर तो वर्षभरातच मुंबईतही दाखविला गेला. त्यानंतर मुंबईत पाश्चात्त्यांनी तयार केलेले मूकपट नेहमी दाखविण्यात येऊ लागले. दादासाहेबांनी असाच एक मूकपट पाहिला व ते भारावून गेले. त्यांना जात्याच नवनव्या गोष्टींचं आकर्षण होतं. त्या आपण शिकून घ्याव्यात असं त्यांना वाटे. त्यांनी तो मूकपट वारंवार पाहिला. अगदी त्यांचे डोळे बिघडून दृष्टी जायची वेळ आली. फाळकेंची पत्नी सरस्वती यांनी दादासाहेबांना कायम साथ दिली. आपल्या पतीमध्ये काही तरी असामान्य करण्याची धमक आहे, हे त्यांनी ओळखलं होतं. दादासाहेबांना दोन मुलगे होते. असं हे सुखी कुटुंब, पण दादासाहेबांच्या चित्रपट तयार करण्याच्या वेडापायी त्या कुटुंबाला आपली सर्व संपत्ती गमावायची वेळ आली. मात्र, दादासाहेब डगमगले नाहीत. ते मुंबईतील काही धनाढ्य व्यापाऱ्यांकडून पैसे घेऊन परदेशात चित्रपटाचं तंत्र शिकण्यासाठी गेले. तिथून परत आल्यावर त्यांनी पहिला मूकपट तयार करायला घेतला. त्याचंच नाव - राजा हरिश्चंद्र. हा सिनेमा तयार करताना त्यांना अतोनात अडचणी आल्या. अखेर हा सिनेमा १९१३ मध्ये तयार झाला आणि भारतातील लोकांनी त्याचं प्रचंड स्वागत केलं. भारतातील ‘चित्रपट युगा’ची ती सुरुवात होती.
हा अतिशय रोमहर्षक, अद्भुत प्रवास परेश मोकाशी  यांनी ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटात अतिशय खेळीमेळीनं मांडला आहे. दादासाहेबांची भूमिका नंदू माधव यांनी केली आहे. दादासाहेबांचं सिनेमाचं वेड, त्यांचा विक्षिप्त स्वभाव, जिद्दी वृत्ती हे सगळं नंदू माधव यांनी फार अप्रतिमपणे सादर केलं आहे. त्यांची या भूमिकेतील निवड एवढी चपखल आहे, की त्यांच्या या भूमिकेवरच सिनेमाचं निम्मं यश निश्चित झालं. विभावरी देशपांडे यांनीही सरस्वतीबाईंची भूमिका छान केली आहे. अथर्व कर्वे आणि मोहित गोखले या दोन बालकलाकारांनीही फाळके यांच्या मुलांची कामं मस्त केली आहेत. इतर सर्व सहकलाकारही उत्तम साथ देतात.
मुळात विसाव्या शतकातील तो सुरुवातीचा काळ, भारतातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील व मुंबईतील तत्कालीन समाजजीवन, तत्कालीन रुढी-परंपरा हे सगळं उभं करणं हे दिग्दर्शकासमोर आव्हान होतं. विशिष्ट काळातील गोष्ट सांगणाऱ्या सिनेमांना ‘पीरियड फिल्म’ म्हणतात. ‘हरिश्चंद्रांची फॅक्टरी’ हा तसाच चित्रपट आहे. त्यामुळं या चित्रपटासाठी कलादिग्दर्शन ही महत्त्वाची गोष्ट ठरते. या चित्रपटात वापरलेले नेपथ्य, सेट्स आणि वेशभूषा आवर्जून पाहा. ही सगळी माणसं १९००-१९१३ या काळात साधारणपणे वावरत आहेत हे गृहीत धरून तसे कपडे वापरावे लागतात. तेव्हाची मुंबई कशी दिसत होती, याचा अभ्यास करून तसे सेट्स तयार करावे लागतात. गिरगावात राहणारी मंडळी ‘तिकडे लांब दादरला कुठं जंगलात राहताय,’ असं बोलत असत, असा उल्लेख चित्रपटात आहे. आज हा उल्लेख ऐकताना आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. तेव्हा महिलांनी चित्रपटात काम करणं समाजमान्य नव्हतं. त्यामुळं फाळकेंना तारामतीच्या भूमिकेसाठी काय काय दिव्य करावं लागलं, हे या सिनेमात पाहायला मिळतं. शेवटी एका पुरुषाला या भूमिकेसाठी फाळके तयार करतात. मात्र, त्याचे वडील जिवंत असल्यानं तो मिशी काढायला तयार होत नाही. तेव्हा वडील जिवंत असताना मिशी काढायची नाही, अशी पद्धत होती. अशा अनेक गमती-जमती यात पाहायला मिळतात.
मुळात  ‘पीरियड फिल्म’ बघताना मनोरंजनासोबत आपल्याला त्या त्या काळाची सफर करता येते. त्यामुळे असे चित्रपट आवर्जून बघावेत. या चित्रपटात परेश मोकाशींनी दादासाहेब फाळक्यांचं चित्रपटाचं वेड हर प्रकारे उतरवलं आहे. त्यामुळंच आपल्याला तो चित्रपट पाहताना फाळक्यांविषयीचं कुतूहल आणखी जागृत होतं. त्या व्यक्तीविषयीची उत्सुकता वाढवतं. कुठलीही चांगली कलाकृती हेच काम करत असते. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’सारखा चित्रपट पाहायचा तो यासाठीच. त्यातही एका मराठी माणसाची ही कर्तबगारी बघताना आपणा मराठी लोकांची कॉलर जरा टाइट होणारच ना!

---

हरिश्चंद्राची फॅक्टरी/भारत/२०१०/मराठी/रंगीत/ ९७ मिनिटे

निर्माते : रॉनी स्क्रूवाला, स्मिती कनोदिया, परेश मोकाशी
कथा व दिग्दर्शक : परेश मोकाशी, संगीत : आनंद मोडक
सिनेमॅटोग्राफी : अमलेंदू चौधरी, संकलन : अमित पवार
प्रमुख भूमिका : नंदू माधव, विभावरी देशपांडे, मोहित गोखले, अथर्व कर्वे, संदीप पाठक

---

२०. बॉर्डर
-----------

सीमेच्या रक्षणास तळहातावर शिर
-----------------------------------------

बालमित्रहो, या महिन्यात आपला ७३ वा स्वातंत्र्यदिन येईल. येत्या १५ ऑगस्टला आपण हा स्वातंत्र्यदिन उत्साहानं साजरा करू. त्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असल्याने आपण तो दिवस कसा सेलिब्रेट करायचा, याचं आधीच नियोजन केलं असेल. आपण कुठे तरी सहलीला जाऊ, मित्रांकडे गप्पा मारायला जाऊ, नाही तर मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहायला जाऊ किंवा मॉलमध्ये खरेदीची मजा करायला जाऊ. आपल्याला हे आनंदाचे, स्वातंत्र्याचे दिवस उपभोगायला मिळत आहेत, याचं कारण पूर्वी कुणी तरी आपल्यासाठी जिवाचा त्याग करून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलंय. आपण १५ ऑगस्टच्या दिवशी मजा जरूर करू; पण ती मजा करताना मनात कुठे तरी या अनाम वीरांविषयी आदराची भावनाही जपू.

या दिवशी सिनेमेच पाहायचे तर आपल्या देशाविषयीचा अभिमान आणखी वृद्धिंगत होईल, असे किती तरी सिनेमे पाहता येतील. आज आपण ‘बॉर्डर’ या चित्रपटाविषयी जाणून घेणार आहोत. आपल्या देशाच्या सीमेचे शत्रूपासून रक्षण करण्यासाठी आपले लष्कर, हवाई दल आणि नौदल किती शौर्याने पराक्रम गाजवते, हे आपल्याला हा चित्रपट पाहून कळते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत तीन मोठी युद्धे झाली, तर लहान-मोठे संघर्ष अनेक झाले. यापैकी १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला. याच युद्धानंतर पूर्व पाकिस्तान हा पाकिस्तानचा भाग मूळ पाकिस्तानपासून फुटून स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली. हे युद्ध सुरुवातीपासून पूर्वेला लढले गेले असले, तरी पश्चिम आघाडीवरही पाकिस्तानने भारताच्या कुरापती काढल्याने त्या भागातही (म्हणजे राजस्थान, पंजाब, काश्मीर) दोन्ही देशांदरम्यान युद्ध भडकले. यापैकी ‘लोंगेवालाची लढाई’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या युद्धातील लढाईवर आधारित हा चित्रपट आहे. प्रामुख्याने युद्धविषयक चित्रपटांचीच निर्मिती करणारे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांनी या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केलं आहे. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात, म्हणजे १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्या वर्षी भारतात बॉक्स ऑफिसवरही सर्वाधिक कमाई केली होती. या चित्रपटात सनी देओल, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, सुदेश बेरी, कुलभूषण खरबंदा, पुनीत इस्सार, राखी, पूजा भट यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाला अनू मलिक यांनी संगीत दिले असून, यातले ‘संदेसे आते है’ हे गाणं अतिशय गाजलं.
‘लोंगेवाला’ हे राजस्थानच्या थर वाळवंटात असलेली भारत व पाकिस्तान यांच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरचे एक प्रमुख ठाणे आहे. चार ते सात डिसेंबर १९७१ च्या दरम्यान इथं दोन्ही देशांदरम्यान मोठी चकमक झडली. युद्धच होतं एक प्रकारे ते! यात भारताच्या बाजूने होते केवळ १२० जवान आणि नंतर त्यांच्या मदतीला आलेली चार ‘हंटर’ लढाऊ विमाने; तर पाकिस्तानकडे होते ४० ते ४५ रणगाडे आणि सुमारे दोन ते तीन हजार सैनिक. तरीही या लढाईत अत्यंत शूर अशा भारतीय जवानांनीच बाजी मारली आणि पाकिस्तानी रणगाडे उद्ध्वस्त करून त्यांच्या सैन्याला पार सीमेपार पिटाळून लावले. येथे प्रमुख होते लष्कराच्या २३ व्या बटालियनचे, पंजाब रेजिमेंटच्या कंपनीचे प्रमुख मेजर कुलदीपसिंग चाँदपुरी. मेजर कुलदीपसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून आपले हे ठाणे कसे वाचविले आणि शत्रूचा पराभव केला याची अत्यंत प्रेरणादायी, रोमांचकारक कथा या चित्रपटातून आपल्यासमोर उलगडते. या चित्रपटात मेजर कुलदीपसिंग यांचे काम सनी देओलनं अत्यंत प्रभावीपणे केलं आहे. सेकंड लेफ्टनंट धरमवीर भान या तरुण अधिकाऱ्याचे काम अक्षय खन्नाने केले आहे. विंग कमांडर आनंद बाजवा यांची भूमिका जॅकी श्रॉफने केलीय. नायब सुभेदार मथुरा दासच्या भूमिकेत सुदेश बेरी आहे, तर सीमा सुरक्षा दलाचे सहायक कमांडंट भैरवसिंग यांचं काम सुनील शेट्टीनं केलंय. याव्यतिरिक्त पुनीत इस्सार, कुलभूषण खरबंदा, राखी या ज्येष्ठ कलाकारांसह तबू, पूजा भट या अभिनेत्रींनीही या चित्रपटातील त्यांच्या भूमिका संस्मरणीय केल्या आहेत.
जवळपास तीन तासांच्या या चित्रपटात केवळ युद्धाची थरारक दृश्ये नाहीत, तर युद्धाला तोंड द्यावं लागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मानसिक स्थितीचाही वेध दिग्दर्शकानं यात घेतला आहे. या अधिकाऱ्यांनाही घर असतं, कुटुंब असतं, त्यांच्यासाठी वाट पाहणारे त्यांचे जीवनसाथी असतात. या सगळ्यांचा विचार बाजूला ठेवून त्यांना फक्त समोर ठाकलेल्या शत्रूला नेस्तनाबूत करण्याचं एकमेव लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवायचं असतं. विपरीत परिस्थिती असली, तरी त्यातून मार्ग काढायचा असतो. कुठल्याही क्षणी प्राणाची आहुती पडण्याची शक्यता असते. हे सगळं डोक्यात ठेवूनही शत्रूवर मात करण्याची लढाई लढायची असते. या सगळ्या नातेसंबंधांचा, मानसिक ताणतणावांचा वेध दिग्दर्शकानं या चित्रपटातून घेतला आहे.
पंधरा ऑगस्टच्या दिवशी ‘बॉर्डर’सारखे चित्रपट जरूर पाहा. दोन गोष्टी साध्य होतील. चित्रपट पाहिल्याने एक प्रकारे मनोरंजनही होईल आणि देशासाठी आपले जवान काय करू शकतात, याचे भारावणारे दर्शनही घडेल. आपल्या हातूनही देशासाठी अशी काही तरी सेवा घडावी, ही भावना यातून तुमच्या मनात प्रबळ झाल्यास हा स्वातंत्र्यदिन सार्थकी लागला, असेच म्हणावे लागेल.

---

बॉर्डर/भारत/१९९७/हिंदी-पंजाबी-उर्दू/रंगीत/१७७ मिनिटे

निर्माते : जे. पी. दत्ता, दिग्दर्शक : जे. पी. दत्ता
संगीत : अनू मलिक, पार्श्वसंगीत : आदेश श्रीवास्तव
सिनेमॅटोग्राफी : ईश्वर बिद्री, निर्मल जानी, संकलन : दीपक वीरकूड
प्रमुख भूमिका : सनी देओल, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, सुनील शेट्टी, सुदेश बेरी, पुनीत इस्सार, कुलभूषण खरबंदा, राखी, तबू, पूजा भट, श्राबनी मुखर्जी

---

२१. ताऱ्यांचे बेट
-------------------

मोरपीस : मोहवणारे अन् शिकवणारेही!
-----------------------------------------------

बालमित्रहो, दिवाळीच्या सुट्टीची तुमची धमाल सुरू झाली असेल ना! दिवाळी म्हणजे मज्जाच! भरपूर शॉपिंग, ट्रिप,सिनेमे आणि मित्र-मंडळींबरोबर हँगआउट... आहे ना मज्जा? आपण अगदी सहज ही मजा करू शकतो, याचे कारण आपल्या आई-वडिलांकडे पुरेसे पैसे आहेत. त्या दृष्टीने आपण अगदी सुदैवी आहोत. पण अनेक मुलांची ही परिस्थिती नसते. आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टींचा हव्यास धरताना आपल्या घरच्यांची, विशेषत: आपल्या बाबांची आपण अडचण तर करीत नाही आहोत ना, याचा विचार मुलांनी करायला हवा. ‘ताऱ्यांचे बेट’ हा किरण यज्ञोपवित दिग्दर्शित चित्रपट आपल्याला नेमकी हीच शिकवण अगदी साध्या-सोप्या प्रसंगांतून करून देतो. तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल, तर या सुट्टीत आवर्जून पाहा. 

कोकणातील एका गावात राहणाऱ्या निम्नमध्यमवर्गीय मुलाला मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये एक दिवस का होईना, पण राहण्याचे पिसे (वेड) लागते. त्याचं हे म्हटलं तर साधंसं; पण त्याच्या पालकांच्या दृष्टीनं विचार केला तर प्रचंड अवघड असं स्वप्न आणि वास्तवाचा पाठशिवणीचा रंगलेला खेळ म्हणजे हा चित्रपट.
श्रीधर सुर्वे (सचिन खेडेकर) हा कोकणामधल्या एका गावात ग्रामपंचायतीत नोकरी करणारा सरळ माणूस. त्याची दोन मुलं ओंकार (ईशान तांबे) व मीरा (अस्मिता जोगळेकर), बायको इंदिरा (अश्विनी गिरी) आणि मुलांची आजी (शुभांगी जोशी) असं हे कुटुंब मजेत जगत असतं. मुलांना सायकलवरून शाळेत सोडवणं, गावातल्या गणपतीशी रोज सुख-दुःखाच्या गप्पा मित्रत्वाच्या नात्यानं बोलणं आणि रात्री भजनात रंगणं असं त्याचं आयुष्य सुरू आहे. मात्र, त्याच्या या आयुष्यात अचानक मुंबई नावाचं ‘ताऱ्यांचं बेट’ येतं. त्याला कामानिमित्त वारंवार मुंबईला जावं लागतं.
एकदा तो बायको आणि मुलांनाही मुंबई दाखवायला घेऊन जातो. मात्र, जवळ फार पैसे नसल्याने मुलांच्या आवडत्या वस्तूही तो खरेदी करू शकत नाही. त्यातच ओंकारला एक पंचतारांकित हॉटेल दिसतं. या हॉटेलात राहण्याचा हट्ट तो करतो. श्रीधर अर्थातच तो पूर्ण करू शकत नाही. मात्र, गावी परत आल्यावर, शाळेत पहिला नंबर काढलास, तर त्या हॉटेलमध्ये राहायला नेईन, अशी पैज तो मुलाबरोबर लावतो. व्रात्य ओंकार पहिला येऊ शकणार नाही आणि त्याचं हे फाइव्ह-स्टार हॉटेलचं वेड कमी होईल, असा त्याचा अंदाज असतो. मात्र, त्या राजमहालासारख्या हॉटेलात राहायला जायचंच, या वेडानं पछाडलेला ओंकार खूप अभ्यास करतो आणि चक्क पहिला नंबर मिळवतो. आता कसोटी श्रीधरची असते. तो मुंबईला जाऊन त्या हॉटेलची चौकशी करून येतो. एका रात्रीसाठी २२ हजार रुपये मोजावे लागणार असतात. श्रीधरची अर्थातच तेवढी ऐपत नसते. त्यामुळं घरासमोरची होडी विकण्याचा निर्णय तो घेतो. तरीही पैसे कमी पडतात. अखेर सच्छिल श्रीधर त्याच्या स्वभावाला न साजेशा गोष्टीही करू लागतो. शेवटी तो आपल्या मुलाचं स्वप्न साकार करण्यात यशस्वी होतो का? स्वप्नांचा हा प्रवास नेमका कसा पूर्ण होतो? या आणि अशा सर्व प्रश्नांची अपेक्षित उत्तरं देत चित्रपट संपतो.
सौरभ भावे यांच्या मूळ कथेवर किरण, सौरभ आणि शैलेश दुपारे यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. या चित्रपटाची सगळी रचना आणि प्रवास बघितला तर ही एक रूपककथा असल्याचं जाणवतं. मूळ लेखक आणि दिग्दर्शक यांना या प्रवासातून काय सुचवायचं आहे, याचा अत्यंत ठळक आणि नेमका संदेश आपल्यापर्यंत पोचतो. या कथेतला ओंकार म्हणजे सध्याच्या जागतिकीकरणानंतरच्या पिढीचं प्रतीक आहे. ही पिढी त्यांच्या आयुष्यातल्या गोलविषयी अत्यंत स्पष्ट आणि नेमकी भूमिका बाळगून आहे.त्यांच्यात कुठलाही गंड नाही, भय नाही. सत्-असत् किंवा भल्या-बुऱ्याच्या त्यांच्या कल्पना वेगळ्या आहेत. आपल्याला काय मिळवायचं आहे, याचं त्यांचं भान नेमकं आहे. मुंबई किंवा पंचतारांकित हॉटेल म्हणजे या पिढीसमोर असलेल्या मटेरियलिस्टिक, ऐहिक गोष्टींचं प्रतीक म्हणायला हरकत नाही. अर्थात या गोष्टी मिळविण्यासाठी प्रचंड कष्ट करायचीही या पिढीची तयारी आहे.
सचिन खेडेकर आणि अश्विनी गिरी यांनी सहज-सोपा अभिनय करून सुर्वे दांपत्य जिवंत केलंय. ईशान तांबे आणि अस्मिता जोगळेकर या बालकलाकारांनीही खूप छान काम केलंय. विशेषतः ईशानचं खास कौतुक करायला हवं. किशोर कदम, विनय आपटे, जयवंत वाडकर छोट्या भूमिकांतही छाप पाडतात. नंदू घाणेकरांचं संगीतही दाद देण्याजोगं. विशेषतः मुग्धा वैशंपायन हिच्या आवाजातलं ‘पिसे लागले मोरपिसांचे...’ हे रत्नाकर मतकरींचं गीत खासच‌! सुरेश वाडकरांच्या आवाजातला अभंगही जमून आलेला.
थोडक्यात, आपल्या जगण्याचं हे रूपकात्मक प्रतिबिंब जरूर पाहा.  

---

ताऱ्यांचे बेट/भारत/२०११/मराठी/रंगीत/१२१ मिनिटे

निर्माते : शोभा कपूर,एकता कपूर, शीतल भाटिया
दिग्दर्शक : किरण यज्ञोपवित, पटकथा-संवाद : किरणयज्ञोपवित, सौरभ भावे, शैलेश दुपारे
संगीत : नंदू घाणेकर, सिनेमॅटोग्राफी : सुधीर पलसाने
भूमिका : सचिन खेडेकर,अश्विनी गिरी, ईशान तांबे, अस्मिता जोगळेकर, किशोर कदम, विनय आपटे, जयवंत वाडकर

---

(समाप्त)

---

29 Jan 2021

बिंगोस्कोप - भाग १६ ते १८

बिंगोस्कोप

--------------

स्वाती यादवाडकर या मैत्रिणीनं दोन-तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बिंगोकिड्स’ या लहान मुलांच्या पाक्षिकात मी ‘बिंगोस्कोप’ या सदरात जगभरातील काही उत्तम चित्रपटांची ओळख मुलांना करून दिली. ही रूढार्थाने परीक्षणं नाहीत. साधारण दहा ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी, त्यांना समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत सिनेमांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकूण २१ सिनेमांवर मी या सदरात लिहिलं आहे. हे लिखाण इथं एकत्रित राहील म्हणून तीन-तीन परिचय एकत्र करून एक ब्लॉग अशा रीतीनं प्रसिद्ध करीत आहे. हा सहावा भाग...

----

१६. बालशिवाजी

------------------

राज्यसाधनाची लगबग...

----------------------------

बालमित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं, मराठी माणसांचं आराध्य दैवत. महाराजांचं जीवन अगदी विलक्षण, अद्‌भुत होतं. अवघ्या ५० वर्षांच्या जीवनात महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, बलाढ्य शत्रूंना तोंड देत स्वराज्य उभारणी करण्याचं अशक्यप्राय कार्य शक्य करून दाखवलं. केवळ महाराष्ट्र किंवा मराठी माणूस नव्हे, तर जगभरातील इतिहासकारांना, अभ्यासकांना, शूरवीरांना महाराजांचं चरित्र नेहमीच भुरळ घालतं. अशा या महापराक्रमी राजाच्या जीवनावर मराठीत अनेक चित्रपट आले. जुन्या जमान्यातील ज्येष्ठ व श्रेष्ठ दिग्दर्शक भालजी पेंढारकर यात आघाडीवर होते. शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग घेऊन हे चित्रपट तयार करण्यात आले. मात्र, शिवबांच्या जडणघडणीचा काळ कुठल्याही चित्रपटात फारसा आला नव्हता. ती उणीव ‘बालशिवाजी’ या चित्रपटाने भरून काढली. विशेष म्हणजे भालजी यांचे चिरंजीव प्रभाकर पेंढारकर यांनीच हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. 

भारतात लहान मुलांसाठी चित्रपट तयार करण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली बाल चित्र समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीतर्फे या चित्रपटाची निर्मिती केली गेली. १९८१ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट अजूनही लहान मुलांसाठीच्या महोत्सवांत आवर्जून दाखवला जातो आणि तो लोकप्रियही आहे. तुम्ही तो बघितला नसेल, तर जरूर पाहा. ‘यू-ट्यूब’वर या चित्रपटाची उत्तम प्रत उपलब्ध आहे. शिवरायांनी अगदी लहान वयातच संघटन, नेतृत्व, शौर्य आणि जिद्द या गुणांच्या जोरावर स्वराज्य स्थापनेचं आव्हान कसं पेललं हे प्रभाकर पेंढारकर यांनी या सिनेमात प्रभावी पद्धतीनं दाखवलं आहे.
मावळातील काही मुले विटी-दांडू खेळत असतात आणि त्यांची विटी खोपडे नावाच्या आदिलशहाच्या सरदाराला लागते, या प्रसंगाने चित्रपटाची सुरुवात होते. या वेळी तिथून जाणारे लहानगे शिवाजीराजे खोपडेंच्या दादागिरीला अटकाव करून, मुलांची विटी त्यांना परत मिळवून देतात. या मुलांमधूनच महाराजांना नंतर स्वराज्याच्या कार्यास वाहून घेणारे, तन-मन-धन अर्पून शिवरायांच्या चरणी निष्ठा वाहून घेणारे अनेक सहकारी मिळाले. ओसाड पडलेल्या पुण्यात शिवराय व जिजामातेने सोन्याच्या नांगराने भूमी नांगरून ही भूमी पुन्हा नांदती केली. तिथून जिजाबाई व दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली बालशिवाजी लहान वयातच पुण्याच्या जहागिरीचा कारभार बघू लागले. गोरगरीब जनतेवर होणारा अन्याय राजे स्वत: निवाडा करून दूर करू लागले. महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या रांझे गावच्या पाटलाला शिवबांनी हात-पाय तोडण्याची कठोर दिली. साध्या-भोळ्या, गरीब शेतकरी कुटुंबांतील मुलांच्या मनगटांत राजांनी देशप्रेमाचा जो अलौकिक जोर भरला, त्याचे प्रभावी चित्रण प्रभाकर पेंढारकरांनी अशा अनेक प्रसंगांतून या चित्रपटात केले आहे. परक्या सत्तेची सेवा करून आपल्याच लोकांना त्रास देणाऱ्या तेव्हाच्या काही अडेलतट्टू सरदारांना शिवबा आपल्या छोट्या सवंगड्यांच्या मदतीने कसा धडा शिकवतात, हेही या चित्रपटात गमतीदार पद्धतीनं दाखवलं आहे.
उत्तरार्धात मग याच मित्रांच्या मदतीनं वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवबा तोरणा किल्ला कसा सर करतात, याची चित्तथरारक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. हा गड सर करण्यासाठी या मुलांसह शिवबांनी केलेल्या हिकमती प्रत्यक्षच पाहायला हव्यात.
हा चित्रपट बघताना आपल्या महाराष्ट्राचा उज्ज्वल इतिहास घडविणारे शिवरायांसारखे व्यक्तिमत्त्व लहानपणापासून कसे घडत गेले, याचे फार सुंदर दर्शन आपल्याला घडते. या दृष्टीने दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर यांनी लिहिलेली या चित्रपटाची पटकथा आणि प्रसंगयोजना पाहण्यासारखी आहे. प्राधान्याने बालप्रेक्षकच डोळ्यांसमोर ठेवून हा चित्रपट निर्मिलेला असल्याने तो मुलांना पाहायला आवडेल, अशीच त्याची एकूण रचना आहे.
या चित्रपटात बालशिवाजीची भूमिका आनंद जोशी या पुण्यातील मुलाने केली आहे. (आता हे डॉ. आनंद जोशी पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर आहेत.) बालशिवाजीचा सगळा रुबाब आनंदनं फार जिवंतपणे साकारला आहे. जिजाबाईंची भूमिका जान्हवी खांडेकर यांनी, तर दादोजींची भूमिका भालचंद्र कुलकर्णी यांनी साकारली आहे. या चित्रपटाला ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीत दिलं आहे.
मुलांनो, काही चित्रपट फक्त मनोरंजनासाठी पाहायचे नसतात. काही चित्रपटांतून आपल्याला आपला इतिहास समजतो. या भूमीसाठी उत्तुंग कार्य करणारी व्यक्तिमत्त्वे समजतात. त्यांचं कार्य पाहून त्यातून आपल्या आयुष्यात आपणही काही भरीव करू शकतो का, हे पाहायचं असतं. ‘बालशिवाजी’ हा असाच एक प्रेरणादायी चित्रपट आहे. तो बघितला नसेल, तर सुट्टीत आपल्या सर्व मित्रांना घेऊन नक्की पाहा.

---

बालशिवाजी/भारत/१९८१/मराठी/रंगीत/१२० मिनिटे

निर्माते : बाल चित्र समिती, दिग्दर्शक : प्रभाकर पेंढारकर
कथा, पटकथा व संवाद : सुधाकर घोलकर व प्रभाकर पेंढारकर
संगीत : दत्ता डावजेकर, गीते : योगेश, वसंत निनावे
संकलन : मनोहर चौबळ, सिनेमॅटोग्राफी : त्यागराज पेंढारकर
प्रमुख भूमिका : आनंद जोशी, जान्हवी खांडेकर, भालचंद्र कुलकर्णी, बापूसाहेब गावडे, माणिकराज, मधू आपटे

----


१७. तारे जमीं पर...
-----------------------

तो राजहंस एक...
---------------------

मित्रांनो, बारा वर्षांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता आमीर खान यानं निर्मिलेला व दिग्दर्शित केलेला ‘तारे जमीं पर’ हा चित्रपट खूप गाजला. तुम्ही तो पाहिलाय का? पाहिला नसेल तर या सुट्टीत आपल्या मित्रांसोबत नक्की पाहा. आपण वरकरणी इतरांपेक्षा वेगळे दिसत असलो किंवा आपल्यात काही तरी कमी आहे, असं भासत असलं, तरी त्या गोष्टीचा न्यूनगंड बाळगण्याचं कारण नसतं. आपल्याकडं काय चांगलं आहे, त्याचा शोध घ्यावा लागतो आणि जगासमोर तो अभिमानानं मिरवावा लागतो. आपण लहान असताना आपल्याला चांगला, म्हणजे आपल्यातले गुण पारखणारा शिक्षक लाभणं फार महत्त्वाचं असतं. आपल्याला पैलू पाडणारे शिक्षक मिळाले, तर आपलं आयुष्य संपूर्ण बदलून जातं.

आमीर खाननं नेमका हाच विषय घेऊन २००७ मध्ये आणला ‘तारे जमीं पर’ हा चित्रपट. हा चित्रपट तेव्हा प्रचंड गाजला. याचं कारण म्हणजे आपल्याकडच्या शिक्षणपद्धतीमध्ये असलेल्या दोषांवर या चित्रपटानं नेमकं बोट ठेवलं होतं. ईशान अवस्थी हा आठ वर्षांचा मुलगा या चित्रपटाचा नायक आहे. ईशान अभ्यासात कच्चा आहे. मात्र, त्याला चित्रे काढण्याची अत्यंत आवड आहे. त्याचे आई-वडील मात्र त्याचा हा वेगळेपणा ओळखण्यात अयशस्वी ठरतात. मोठ्या भावाप्रमाणे ईशाननेही शाळेत उत्तम गुण मिळविलेच पाहिजेत, असं त्यांना वाटत असतं. मात्र, ईशानमध्ये ‘डिसलेक्सिया’ नावाने ओळखली जाणारी एक शारीरिक स्थिती अस्तित्वात असते. यात त्याला अक्षरांचे क्रम उलटसुलट दिसत असतात. आकड्यांचंही तसंच. त्यामुळं शाळेत सगळे त्याची टर उडवत असतात. एके दिवशी त्याच्या शाळेचा निकाल पाहून त्याचे आई-वडील त्याला पाचगणीला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतात. तिथे ईशानची अवस्था आणखीनच बिकट होते. राजू दामोदरन नावाचा एक अपंग मुलगा त्याचा मित्र होतो. मात्र, ईशान आईच्या आठवणीनं व्याकुळ झालेला असतो. आता ईशानचं काही खरं नाही, असं वाटत असतानाच त्या शाळेत एका आगळ्यावेगळ्या शिक्षकांचं आगमन होतं. राम शंकर निकुंभ असं त्यांचं नाव.
हे सर नेहमीच्या शिक्षकांसारखे नसतातच मुळी. ते वर्गावर येतात तेच विदूषकाची टोपी घालून आणि गाणं म्हणत... एरवी सदैव दुर्मुखलेल्या ईशानची कळी या सरांना पाहून खुलते. निकुंभ सरांना हळूहळू ईशानविषयी समजू लागतं. ईशानचा नक्की प्रॉब्लेम काय आहे आणि त्याच्यासाठी नक्की काय केलं पाहिजे, हे त्यांना नेमकं माहिती असतं. मग निकुंभ सर ईशानमधले गुण कसे ओळखतात, त्याला नैराश्यातून कसे बाहेर काढतात, याची ही कथा आहे.
हा चित्रपट तेव्हा खूप चालला, लोकप्रिय झाला याचं कारण पाहणाऱ्या प्रत्येकाला ईशानमध्ये आपलं बालपण दिसलं. आपल्यापैकी बहुतेक जण सर्वगुणसंपन्न कधीच नसतात. आपल्यात काही ना काही त्रुटी नक्कीच असतात. मात्र, आपल्यावर सर्वोत्कृष्ट होण्याचा, उत्तम गुण मिळविण्याचा, सगळीकडं पहिलंच येण्याचा प्रचंड दबाव असतो. हा दबाव आपण सहन करू शकत नाही. यातल्या ईशानसारखीच आपली अवस्था होते. म्हणून हा चित्रपट पाहताना आपण त्या मुलाशी सहज जोडले जाऊ शकतो.
दर्शिल सफारी या मुलाने यात ईशानचं काम खूप छान केलंय. पुढचे दोन दात सशासारखे पुढं असलेला हा गोड मुलगा ईशानच्या भूमिकेत खूप सहजतेनं वावरलाय. यातलं ‘मैं कभी बतलाता नहीं, पर अंधेरे से डरता हूँ मैं माँ’ हे शंकर महादेवन यांनी गायलेलं अत्यंत अप्रतिम गाणं ऐकून ज्याचे डोळे पाणावत नाहीत, असा माणूस नसेल.
आमीरने यातील निकुंभ सरांची भूमिका फारच समरसून केलीय. आमीरचं स्टारडम त्यानं या चित्रपटापुरतं बाजूला ठेवलं. यात त्याचा प्रवेश मध्यंतराच्या आसपास होतो. मात्र, त्यानं स्वत:वर फोकस न ठेवता तो संपूर्णपणे ईशानच्या भावविश्वावरच ठेवला. त्यामुळंच चित्रपट यशस्वी झाला. ईशानच्या आई-वडिलांच्या भूमिकेत आमीरने तोवर फारसे माहिती नसलेले टिस्का चोप्रा व विपिन शर्मा या दोघांना घेतलं. त्या दोघांचा चेहरा परिचित नसणं त्यांना या भूमिकांसाठी उपयुक्तच ठरलं. दोघांच्याही कामाचं खूप कौतुक झालं.
चित्रपटाची मूळ कथा अमोल गुप्ते यांची होती. आधी या चित्रपटाचे दिग्दर्शनही आधी तेच करणार होते. मात्र, नंतर स्वत: आमीरनेच या चित्रपटाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली. या चित्रपटातील बरेचसे चित्रिकरण पाचगणी येथील एका शाळेत झालं आहे. असा हा अतिशय सुंदर चित्रपट तुम्ही अद्याप पाहिला नसेल, तर पाहायलाच हवा. नक्की पाहा आणि आम्हालाही कळवा.

---

तारे जमीं पर/भारत/२००७/हिंदी/रंगीत/१६४ मिनिटे

निर्माता : आमीर खान, दिग्दर्शक : आमीर खान
कथा, पटकथा व संवाद : अमोल गुप्ते, संगीत : शंकर-एहसान-लॉय
गीते : प्रसून जोशी, संकलन : दीपा भाटिया
सिनेमॅटोग्राफी : सेतू (सत्यजित पांडे)
प्रमुख भूमिका : दर्शिल सफारी, आमीर खान, टिस्का चोप्रा, विपिन शर्मा

----

१८. द कप
-----------

दुनिया ‘गोल’ है...
---------------------

मुलांनो, आपण एका विशिष्ट प्रदेशात, वातावरणात राहतो. आपल्याभोवती असलेल्या नैसर्गिक गोष्टींचा आपल्यावर परिणाम होत असतो आणि त्याच वेळी आपल्या समाजात असलेल्या रुढी-परंपरा किंवा संस्कारांचाही एक परिणाम आपल्यावर होत असतो. आपण जेव्हा आपल्याकडे तयार झालेले चित्रपट पाहतो, तेव्हा त्यात आपल्याला आपल्या सभोवती असलेलं वातावरण आणि एकूणच सांस्कृतिक पर्यावरण पाहायला मिळतं. मात्र, जेव्हा आपण जगभरात तयार झालेले चित्रपट पाहतो, तेव्हा आपल्याला या वातावरणापेक्षा भिन्न स्थितीत राहत असलेल्या लोकांबद्दल कळतं. त्यांचं जगणं, ते राहतात तो भूभाग, तिथलं पर्यावरण आणि त्यांची सांस्कृतिक जडणघडण आपल्यापेक्षा वेगळी असते. अशा जगभरातील विविध प्रदेशांत राहणाऱ्या लोकांची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. ‘हे विश्वचि माझे घर’ हा भाव आपल्यात निर्माण होण्यास यामुळे मदत होते. जगभरात विविध भाषा बोलल्या जात असल्या, किंवा धार्मिक वा सांस्कृतिक धारणा वेगवेगळ्या असल्या, तरी प्रेम, विश्वास, राग, लोभ, मत्सर अशांसारख्या काही मूलभूत भावना जगभरात एकच आहेत, हे आपल्या लक्षात येतं. एकूणच जग समजावून घेण्यासाठी मदत होते आणि आपला दृष्टिकोन विशाल, उदार होतो. जागतिक सिनेमा पाहायचा तो यासाठीच. 

‘द कप’ हा चित्रपट तुम्ही यासाठी नक्की पाहा. भुतान या भारताच्या शेजारच्या चिमुकल्या देशाचा हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटातील भाषा तिबेटी आहे. बौद्ध धर्माचे मठ असतात व तिथे लहान मुलांना भिख्खू म्हणून शिक्षण घेण्यासाठी ठेवतात. तिबेटमधील अनेक लोक भारतात येऊन राहतात. भारतातील अशाच एका मठात या चित्रपटाची कहाणी घडते. फुटबॉल हा जगभरातील सर्वांत लोकप्रिय खेळ. सन १९९८ मध्ये या फुटबॉलचा वर्ल्ड कप फ्रान्समध्ये भरला होता. या स्पर्धेची पार्श्वभूमी या चित्रपटाला आहे.
मठातलं वातावरण मोठ्या शिस्तीचं असतं. तिथं शिकायला राहणाऱ्या मुलांना बाहेरच्या जगाशी अजिबात संपर्क साधता येत नाही. तिथल्या अत्यंत कडक शिक्षकांच्या पहाऱ्यात त्यांना अभ्यास करावा लागतो. मात्र, कितीही कडेकोट बंदोबस्त असला, तरी बाहेरच्या जगातील झुळुका तिथं येत असतातच. त्यामुळं फुटबॉल वर्ल्ड कपची चर्चा हळूहळू या मठातील मुलांमध्येही सुरू होतेच. त्यातही ऑर्ग्येन आणि लोडो या दोन मुलांचं फुटबॉलप्रेम विशेष असतं. गेको या मठातील प्रमुख पर्यवेक्षकाला ऑर्ग्येन आणि लोडोचं हे बेशिस्त वागणं अजिबात आवडत नसतं. मात्र, तरीही एकदा त्याचा डोळा चुकवून ही दोन मुलं मठाच्या बाहेर पडून, टीव्हीवर चोरून फुटबॉलची मॅच बघून येतात. त्या वर्षी ब्राझील आणि फ्रान्स हे दोन संघ अंतिम फेरीत येतात. ही फायनल मॅच टीव्हीवर लाइव्ह बघण्याची इच्छा या मुलांमध्ये जागृत होते. काहीही करून मठातच टीव्ही आणून हा सामना बघायचाच, असा निश्चय ही मुलं करतात. त्यासाठी ते मठाच्या प्रमुखांनाच साकडं घालतात. आश्चर्य म्हणजे, त्यांची ही मागणी मान्य होते. मात्र, मठात बाहेरून टीव्ही आणायचा कसा आणि थेट प्रक्षेपण पाहायचं कसं, असा प्रश्न या मुलांसमोर असतो. त्यावर ते कशी मात करतात, याची रंजक कहाणी या चित्रपटात आहे.
या कथाभागावरून आपल्या असं लक्षात येईल, की या अशा काही मूलभूत भावना जगभरात सारख्याच असतात. त्यांना कुठल्याही बंधनात अडकवून ठेवता येत नाही. आपल्या मूळ देशापासून दूर, निर्वासितांसारखं जगणं जगत असताना या मठातील सर्व मुलांना तिकडं दूर युरोपात सुरू असलेल्या फुटबॉल स्पर्धेविषयी प्रचंड आकर्षण वाटतं. खेळ माणसांना जोडतो म्हणतात ते असं! एका अर्थानं दुनिया ‘गोल’ है... हे सत्य या सिनेमात सर्व तऱ्हेनं सिद्ध होतं. या चित्रपटाचा दिग्दर्शक ख्येन्त्से नोर्बू हा स्वत: एका तिबेटी मठात ‘लामा’ (धर्मगुरू) म्हणून काम करीत होता. त्याला सिनेमाचं वेड होतं. त्यानं नंतर न्यूयॉर्कमधील चित्रपट विद्यालयात जाऊन सिनेमाविषयक शिक्षण घेतलं. सिनेमाविषयीच्या या आत्यंतिक वेडातूनच त्यानं भुतानचा पहिलावहिला चित्रपट तयार केला. एका अर्थानं हा ‘द कप’ चित्रपट म्हणजे या दिग्दर्शकालाही मिळालेला ‘कप’च आहे. या चित्रपटाचं जगभरातून स्वागत झालं. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांतून तो दाखविला गेला. तुम्हीही नक्की पाहा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा... 

---

द कप/भुतान/१९९९/तिबेटी/रंगीत/९३ मिनिटे

निर्माते : जेरेमी थॉमस, रेमंड स्टेइनर, माल्कम वॉटसन
कथा व दिग्दर्शक : ख्येन्त्से नोर्बू
प्रमुख भूमिका : ऑर्ग्येन टोबग्याल, नेतेन चोकलिंग, जामयांग लोड्रो

----

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

19 Dec 2020

बिंगोस्कोप - भाग १३ ते १५

बिंगोस्कोप
---------------

स्वाती यादवाडकर या मैत्रिणीनं दोन-तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बिंगोकिड्स’ या लहान मुलांच्या पाक्षिकात मी ‘बिंगोस्कोप’ या सदरात जगभरातील काही उत्तम चित्रपटांची ओळख मुलांना करून दिली. ही रूढार्थाने परीक्षणं नाहीत. साधारण दहा ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी, त्यांना समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत सिनेमांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकूण २१ सिनेमांवर मी या सदरात लिहिलं आहे. हे लिखाण इथं एकत्रित राहील म्हणून तीन-तीन परिचय एकत्र करून एक ब्लॉग अशा रीतीनं प्रसिद्ध करीत आहे. हा पाचवा भाग...

----

१३. साउंड ऑफ म्युझिक
-----------------------------

जगण्याचं सुरेल गाणं
-------------------------

मित्रांनो, आपल्याला गाणी ऐकायला, म्हणायला, गुणगुणायला आवडतात ना? संगीत आवडत नाही, सूर आवडत नाहीत अशी माणसं फारशी नसतात. आपल्याला सगळ्यांनाच संगीत आवडतं. गाणी आवडतात. पण कल्पना करा, हे संगीत, हे सूर, ही गाणी आपल्या आयुष्यात नसती तर? आयुष्य किती नीरस झालं असतं, ना! अगदी गद्य, रुक्ष अशा त्या ‘बोअर’ जगण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. मात्र, अशा काही नीरस लोकांच्या जगण्यात संगीताचे सूर भरण्याची एक कथा म्हणजेच ‘साउंड ऑफ म्युझिक’ हा अत्यंत गाजलेला इंग्लिश चित्रपट. सुमारे ५३ वर्षांपूर्वी आलेला हा चित्रपट जगभरात अतिशय नावाजला गेला. त्यातल्या संगीताचं, गाण्याचं, ज्यूली अँड्र्यूज या प्रमुख अभिनेत्रीचं सगळीकडं खूप कौतुक झालं. यातली ‘डो रे मी’, ‘साउंड ऑफ म्युझिक’, ‘आय ॲम सिक्स्टीन, गोइंग ऑन सेव्हन्टीन’ आदी गाणी प्रचंड गाजली. अजूनही ती ऐकली जातात.

मारिया (ज्यूली) आणि निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन जॉर्ज व्हॉन ट्रॅप (ख्रिस्तोफर प्लमर) यांची ही कथा आहे. ही कथा साल्सबर्ग (ऑस्ट्रिया) येथे सन १९३८ मध्ये घडते. मारिया नन म्हणून काम करण्यासाठी जाते. मात्र, तिची संगीताची आवड, पर्वतांविषयीचं प्रेम, एकूणच खळाळत्या उत्साहानं जगणं आणि काहीशी बेशिस्त, स्वैर जीवनशैली यामुळं ती हे शिक्षण पूर्ण करू शकणार नाही, असं तिच्या शिक्षिकेला वाटतं. ती तिला कॅप्टन ट्रॅप यांच्याकडं पाठवते. त्यांच्या सात मुलांची आया म्हणून तिला काम करायचं असतं. या मुलांना आई नसते. कॅप्टनसाहेबांच्या कडक शिस्तीखाली ही सगळी मुलं अतिशय दबलेली असतात. कॅप्टनसाहेब व्हिएन्नाला जातात, तेव्हा मारिया या मुलांना गायला, मोकळेपणाने जगायला शिकवते. ते परत येतात, तेव्हा त्यांना मुलांचं हे वागणं बिलकुल रुचत नाही. मात्र, हळूहळू त्यांच्यात बदल होत जातो. तेही अनेक वर्षांनी गायला लागतात. नंतर या मुलांना प्रसिद्ध अशा साल्सबर्ग फेस्टिव्हलमध्ये गाण्याच्या स्पर्धेत पाठवावं, अशी टूम निघते. मात्र, कॅप्टनसाहेब त्यास नकार देतात. पुढे अशा काही गोष्टी घडत जातात, की संगीतच या कुटुंबाला एकत्र आणते. त्या गोष्टींचा आनंद प्रत्यक्ष सिनेमा पाहताना लुटणेच योग्य.
रॉबर्ट वाइज या दिग्दर्शकानं काही सत्य घटनांवरून हा सिनेमा तयार केला आहे. मारिया व्हॉन ट्रॅप यांच्या ‘द स्टोरी ऑफ द ट्रॅप फॅमिली सिंगर्स’ या नावाच्या पुस्तकावरून ‘साउंड ऑफ म्युझिक’ नावाची संगीतिका १९५९ मध्ये रंगमंचावर आली होती. ऑस्कर हॅमरस्टाइन II यांनी यातली गीते लिहिली होती, तर रिचर्ड रॉजर्स यांनी त्या संगीतिकेचं संगीत दिग्दर्शन केलं होतं. नंतर रॉबर्ट वाइज यांनी हा चित्रपट तयार केला, तेव्हा त्या चित्रपटाचं संगीतही रॉजर्स यांनीच दिलं. हा चित्रपट अमेरिकेत २ मार्च १९६५ रोजी फारसा गाजावाजा न होता, मर्यादित स्वरूपात प्रदर्शित झाला होता. मात्र, लवकरच या चित्रपटानं तुफान लोकप्रियता मिळविली आणि अवघ्या चार आठवड्यांत तो त्या वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. पुढील वर्षभरातच या चित्रपटाने उत्पन्नाचे आणखी विक्रम मोडले आणि (‘गॉन विथ द विंड’ला मागे टाकून) तो सार्वकालिक सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. हा विक्रम या चित्रपटाच्या नावावर पुढील पाच वर्षे राहिला. या चित्रपटातील मारियाच्या भूमिकेमुळं ज्यूली अँड्रयूज ही अभिनेत्री अजरामर झाली. या चित्रपटामुळे आपल्या चित्रकर्मींनाही प्रेरणा मिळाली. प्रख्यात गीतकार-दिग्दर्शक गुलजार यांनी या चित्रपटावरून काहीसा बेतलेला ‘परिचय’ हा चित्रपट १९७२ मध्ये तयार केला होता.
पुढे तर ‘साउंड ऑफ म्युझिक’ हा चित्रपट म्हणजे एक दंतकथा ठरला. या चित्रपटाने त्या वर्षी पाच ऑस्कर पुरस्कार पटकावले. त्यात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट चित्रपट या पुरस्कारांचा समावेश होता. जगभरातील लोकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला. याचं कारण म्हणजे हा चित्रपट सांगत असलेली संगीताची भाषा सर्वांना समजणारी होती. सूरांनी साधल्या जाणाऱ्या संवादाला भाषेचं बंधन नसतंच. शिवाय या चित्रपटातून केवळ संगीताची महती सांगितली आहे असं नाही. किंबहुना कुठलंही आनंददायी जगणं सुरेलच असतं, असा मंत्र हा सिनेमा आपल्याला देतो. या सिनेमात दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीचा काळ आहे. या महायुद्धामुळे युरोपातील अनेक देशांची मोठी होरपळ झाली. माणसामाणसांत द्वेष असू नये, प्रेमानं-एकोप्यानं सर्वांनी गाणं गात, गुणगुणत, हसत जगावं, असा साधासोपा संदेश देणारा हा सिनेमा युद्धाच्या क्रौर्याच्या पार्श्वभूमीवर त्या काळी सर्वांना अत्यंत आवडावा, यात आश्चर्य नव्हतं. या सिनेमाने सांगितलेली मानवी मूल्यं चिरंतन आहेत. त्यामुळंच आजही हा सिनेमा पाहताना कंटाळा येत नाही. तुम्ही तो अजून पाहिला नसेल, तर नक्की पाहा. तब्बल तीन तास सूरांच्या सहवासात हरवून जा...

----

साउंड ऑफ म्युझिक (अमेरिका/इंग्लिश/१९६५/रंगीत/१७४ मिनिटे)

निर्माते : रॉबर्ट वाइज, दिग्दर्शक : रॉबर्ट वाइज, कथा : मारिया व्हॉन ट्रॅप, पटकथा : अर्नेस्ट लेहमन
प्रमुख भूमिका : ज्यूली अँड्र्यूज, ख्रिस्तोफर प्लमर, एलिनॉर पार्कर, पेगी वूड
संगीत : रिचर्ड रॉजर्स, ऑस्कर हॅमरस्टाइन II
सिनेमॅटोग्राफी : टेड डी मॅक्कॉर्ड
संकलन : विल्यम रेनॉल्ड्स

---

१४. एलिझाबेथ एकादशी
-----------------------------

गजर मूल्यांचा...
------------------

मुलांनो, २०१४ मध्ये बालदिनाच्या म्हणजेच १४ नोव्हेंबरच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘एलिझाबेथ एकादशी’ या गमतीशीर नावाचा मराठी सिनेमा तुम्ही पाहिला आहे का? नसेल, तर नक्की पाहा. लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून, त्यांच्या भावविश्वाची सुंदर गुंफण असलेले फार मोजके सिनेमे मराठीत तयार झाले आहेत. त्यापैकी हा एक महत्त्वाचा चित्रपट आहे. या सिनेमाच्या गमतीशीर नावाचा उलगडा पटकन होत नाही. सिनेमाचं पोस्टर पाहिल्यावर लक्षात येतं, की त्यात एक मस्त, वेगळ्या डिझाइनची सायकल दिसते आहे. या सायकलचंच नाव ‘एलिझाबेथ’ असतं. आता सायकलला असं वेगळंच नाव का असतं, ते सिनेमा पाहिल्यावरच कळेल. शिवाय ‘एकादशी’ का म्हटलंय, तर ही कथा पंढरपूरमध्ये घडते आणि तिथं आषाढी एकादशीच्या दिवशी जी मोठी यात्रा भरते, तिला या कथेत महत्त्व आहे. 

दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी ही अत्यंत साधी, सरळ, हृदयस्पर्शी गोष्ट अत्यंत सुंदररीत्या सांगितली आहे. ज्ञानेश व मुक्ता ही दोन मुलं आपल्या आई व आजीसोबत पंढरपूरमध्ये राहत असतात. (या मुलांची नावं संत ज्ञानेश्वर व मुक्ताबाई यांच्यावरून प्रेरित आहेत, हे आपल्या लक्षात आलंच असेल.) या मुलांच्या वडिलांचं निधन झालेलं असतं आणि आई मशिनवर स्वेटर तयार करून संसार चालवत असते. ज्ञानेश शाळेत अतिशय हुशार असतो, पण त्याच्याकडे फीसाठीही पैसे नसतात. त्याचे शिक्षकच त्याच्या फीचे पैसे भरत असतात. कर्ज फेडता न आल्याने त्याच्या आईचे मशिनही बँकेचे लोक घेऊन जातात. आता ते सोडवून आणण्यासाठी आईकडं एकच उपाय असतो. तो म्हणजे ज्ञानेशची सायकल - ‘एलिझाबेथ’ विकणे. ही सायकल ज्ञानेशच्या विज्ञाननिष्ठ वडिलांनी त्याला खास तयार करून दिलेली असते. त्यामुळे त्याला ती मुळीच विकण्याची इच्छा नसते. मग ही सायकल वाचवण्यासाठी ही भावंडं आणि त्यांचे मित्र काय युक्ती करतात, याची ही कथा आहे.
परेशची पत्नी व मूळची पंढरपूर निवासी असलेल्या मधुगंधा कुलकर्णी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. त्यांच्या अस्सल अनुभवांची जोड असल्यानं हा चित्रपट अगदी वास्तववादी झाला आहे. पंढरपूरमधील जुने वाडे, गल्ल्या, यात्रेच्या आधी त्या गावात सुरू होणारी लगबग, वारकऱ्यांचे आगमन, तीर्थक्षेत्र असलेल्या गावाची अर्थव्यवस्था अशा अनेक गोष्टी कळत-नकळत सिनेमात दिसत राहतात. अत्यंत साध्या-साध्या, पण हृदयाला भिडणाऱ्या प्रसंगांतून चित्रपट पुढं सरकत राहतो. परेशच्या या सिनेमावर इराणी सिनेमाचा प्रभाव अगदी स्पष्ट दिसतो. साध्या माणसांचं साधंच जगणं त्यातल्या हळव्या-नाजूक क्षणांसह टिपणं ही इराणी दिग्दर्शकांची खासियत! परेशही या सिनेमात हे साधतो. शिवाय कथानकाला इथल्या अस्सल मातीची जोड असल्यानं हा सिनेमा वेगळीच उंची गाठतो. 
या चित्रपटात ज्ञानेशच्या कुटुंबाच्या माध्यमातून दिग्दर्शक या मातीत रुजलेल्या संस्कारांची, नीतिमूल्यांची शिकवण देतो. तीही कुठलाही आविर्भाव न आणता! त्यामुळंच हा चित्रपट मनाला भिडतो. या चित्रपटात श्रीरंग महाजन या मुलानं ज्ञानेशची, तर सायली भंडारकवठेकर या मुलीनं मुक्ताची भूमिका केली आहे. या दोन मुलांनी फारच सुंदर काम केलं आहे. मुलांच्या आईच्या भूमिकेत नंदिता धुरी, तर आजीच्या भूमिकेत वनमाला किणीकर यांनीही फार समजून-उमजून काम केलंय. मुळात हे सगळे अभिनय करताहेत, असं कुठंच वाटत नाही. आपण पंढरपुरातील एखाद्या घरातील प्रसंग पाहतो आहोत, असंच वाटतं. या चित्रपटातून पंढरपूरचं सामाजिक दर्शन तर घडतंच, पण त्यानिमित्तानं महाराष्ट्राचं, इथल्या मराठी समाजाचं एक हृद्य चित्रण पाहायला मिळतं. या कारणासाठी हा सिनेमा नक्की बघा.
यात ‘दगड दगड’ असं एक गाणं स्वत: दिग्दर्शकानंच लिहिलं आहे. त्याला दिवंगत संगीतकार आनंद मोडक यांनी संगीत दिलंय. शरयू दातेनं गायलेलं हे गाणंही मस्त जमलं आहे. याशिवाय ज्ञानेश घरी पाहुणे म्हणून आलेल्या वारकऱ्यांसमोर कीर्तन करतो, तो प्रसंगही खूप रंगला आहे. या चित्रपटात पुष्कर लोणारकर या मुलानं ज्ञानेशच्या मित्राच्या, म्हणजे गण्याच्या भूमिकेत धमाल केली आहे. यातले मुलांचे सगळेच प्रसंग खूप गमतीदार, हसवणारे, तर प्रसंगी डोळ्यांत पाणी आणणारे झाले आहेत.
या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा ‘संत तुकाराम’ पुरस्कारही मिळाला. या चित्रपटाला मोठी लोकप्रियताही लाभली. असा हा चित्रपट तुम्ही अद्याप पाहिला नसल्यास मित्र-मैत्रिणींसह जरूर पाहा.

----

एलिझाबेथ एकादशी (भारत/मराठी/२०१४/रंगीत/९० मिनिटे)

निर्माते : निखिल साने, नितीन केणी, मधुगंधा कुलकर्णी
दिग्दर्शक : परेश मोकाशी, कथा : मधुगंधा कुलकर्णी, पटकथा : परेश मोकाशी
संगीत : आनंद मोडक, सिनेमॅटोग्राफर : अमोल गोळे, संकलन : अभिजित देशपांडे
प्रमुख भूमिका : नंदिता धुरी, श्रीरंग महाजन, सायली भंडारकवठेकर, वनमाला किणीकर, पुष्कर लोणारकर

---

१५. मकडी

--------------

भयाचं गमतीदार जाळं!
---------------------------

मुलांनो, तुम्ही कोळ्याचं जाळं कधी पाहिलं आहे का? एखाद्या कसबी कारागिरासारखं विणलेलं हे भक्कम जाळं म्हणजे कोळ्याच्या भक्ष्याचं साक्षात मरणच! कुणी त्या जाळ्यात अडकला, तर त्याची सुटका नाहीच. कधी संधी मिळाली तर त्या छोट्याशा कीटकानं बारकाईनं विणलेलं हे जाळं जरूर पाहा. याशिवाय ‘स्पायडरमॅन’ तर तुम्हाला माहिती आहेच. स्पायडर म्हणजे कोळीच! हिंदीत या कोळ्याला ‘मकडी’ असं म्हणतात. विशाल भारद्वाज या प्रतिभावंत दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेला याच नावाचा हिंदी सिनेमा तुम्ही पाहिला आहे का? नसेल तर नक्की पाहा. लहान मुलांना आवडणाऱ्या सर्व गोष्टी यात आहेत. परीची, राक्षसाची, भुताची किंवा पडक्या वाड्यातील रहस्याची गोष्ट आपल्याला वाचायला आवडते. हा चित्रपटही अशाच अद्‘भुत’रम्य दुनियेची सैर घडवितो.

उत्तर भारतातल्या एका छोट्या गावात ही गोष्ट घडते. यात चुन्नी आणि मुन्नी नावाच्या दोन जुळ्या बहिणी आहेत. चुन्नी ही अत्यंत खोडकर, तर मुन्नी ही तिची बहीण गरीब. चुन्नी जुळेपणाचा फायदा घेऊन गावकऱ्यांची नेहमी गंमत करीत असते. ‘मुघले आझम’ या गमतीशीर नावाचा त्यांचा एक छोटा मित्रही असतो. याच गावात एक जुना ओसाड महालवजा वाडा असतो. या वाड्यात ‘मकडी’ नावाची गूढ स्त्री राहत असते. ही ‘मकडी’ जादूगार असून, तिच्या तावडीत कुणी सापडलं, तर ती त्या व्यक्तीचं रूपांतर कुठल्याही प्राण्यात किंवा पक्ष्यात करते, असा समज गावकऱ्यांमध्ये असतो. त्यामुळं त्या वाड्याकडं लहान मुलंच काय, मोठ्यांनाही फिरकायला खूप भीती वाटत असते. या गावात राहणाऱ्या कल्लू नावाच्या खाटकाशी चुन्नी-मुन्नी व मुघले आझम या तिघांचंही मुळीच पटत नसतं. एकदा चुन्नी नेहमीप्रमाणे कल्लूची काही तरी खोडी काढते. कल्लू तिच्या मागे धावतो. मात्र, तो गडबडीत चुकून मुन्नीलाच चुन्नी समजतो आणि तिचा पाठलाग करायला लागतो. घाबरलेली मुन्नी चुकून त्या ‘मकडी’च्या वाड्यात शिरते. चुन्नीला जेव्हा हे कळतं, तेव्हा ती तिला शोधायला त्या वाड्याकडे धावते. मुन्नीला आपण कोंबडी केलं, असं ‘मकडी’ तिला सांगते. चुन्नीला जेव्हा त्या लाल कापडाखाली खरोखर एक कोंबडी दिसते, तेव्हा तिला जबरदस्त धक्का बसतो. ती ‘मकडी’च्या पाया पडून, रडून तिला आपल्या गरीब बहिणीला परत माणूस करण्याची विनंती करते. मात्र, ‘मकडी’ त्याला नकार देते. अखेर ती चुन्नीपुढं एक अट ठेवते. चुन्नीनं तिला शंभर कोंबड्या आणून दिल्या, तरच ती मुन्नीला परत माणूस करणार असते. आता चुन्नीपुढं ‘मकडी’साठी शंभर कोंबड्या गोळा करायचं आव्हान उभं राहतं... पुढं चुन्नी काय करते, मुन्नी खरंच कोंबडी झालेली असते का, ‘मकडी’ नक्की कोण असते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायला ‘मकडी’ चित्रपट पाहायलाच हवा.

विशाल भारद्वाज या संगीतकार-दिग्दर्शकानं या चित्रपटाद्वारे आपण उत्कृष्ट बालचित्रपट देऊ शकतो, हे सिद्ध केलं. या चित्रपटाचं आकर्षण होतं ते ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी यात साकारलेली ‘मकडी’ची प्रमुख भूमिका. आझमी यांच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट भूमिकांपैकी ही एक भूमिका म्हणता येईल. त्यांना या भूमिकेसाठी चेटकिणीची जी वेषभूषा केली आहे, तीही बारकाईने पाहा. श्वेता बसू प्रसाद या चुणचुणीत मुलीनं यातल्या चुन्नी व मुन्नीची भूमिका अगदी झकास रंगविली आहे. तिला या भूमिकेसाठी २००३ चा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मकरंद देशपांडे या रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंतानं यातील कल्लू खाटकाची भूमिका केली आहे. या चित्रपटातील ‘मकडी’चा जुनाट भयावह वाडा आणि तिची एंट्री पाहताना लहान मुलं हमखास दचकतात. उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि पार्श्वसंगीत हेही या चित्रपटाचं वैशिष्ट्य होय.
‘मकडी’ चित्रपट २२ नोव्हेंबर २००२ रोजी भारतात सर्वत्र प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शिकागो आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे दुसरे पारितोषिक मिळाले. याशिवाय प्रतिष्ठेच्या कान्स चित्रपट महोत्सवातही हा चित्रपट दाखविला गेला. या संपूर्ण चित्रपटाचं चित्रिकरण अलिबागजवळ वाघोली नावाच्या गावात व गोव्यात करण्यात आलं आहे. सिनेमा संपल्यावर येणारं ‘छुट्टी है छुट्टी’ हे गाणं खूप लोकप्रिय आहे. अनेक स्नेहसंमेलनांमध्ये तुम्ही ते ऐकलंही असेल.
विशाल भारद्वाज या दिग्दर्शकाचा हा उत्कृष्ट बालचित्रपट तुम्ही नक्की पाहा आणि मोठे झाल्यावर या दिग्दर्शकाच्या अन्य महत्त्वाच्या कलाकृतीही आवर्जून पाहा. 

---

मकडी (भारत/हिंदी/२००२/रंगीत/९० मिनिटे)

निर्माता : विशाल भारद्वाज, दिग्दर्शक : विशाल भारद्वाज
कथा : अब्बास टायरवाला, विशाल भारद्वाज, पटकथा : विशाल भारद्वाज, संगीत : विशाल भारद्वाज
गीते : गुलजार, सिनेमॅटोग्राफर : हेमंत चतुर्वेदी, संकलन : आरिफ शेख
प्रमुख भूमिका : शबाना आझमी, श्वेता बसू प्रसाद, मकरंद देशपांडे, आलाप माजगावकर, दयाशंकर पांडे

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

10 Dec 2020

बिंगोस्कोप - भाग १० ते १२

बिंगोस्कोप

--------------

स्वाती यादवाडकर या मैत्रिणीनं दोनेक वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बिंगोकिड्स’ या लहान मुलांच्या पाक्षिकात मी ‘बिंगोस्कोप’ या सदरात जगभरातील काही उत्तम चित्रपटांची ओळख मुलांना करून दिली. ही रूढार्थाने परीक्षणं नाहीत. साधारण दहा ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी, त्यांना समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत सिनेमांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकूण २१ सिनेमांवर मी या सदरात लिहिलं आहे. हे लिखाण इथं एकत्रित राहील म्हणून तीन-तीन परिचय एकत्र करून एक ब्लॉग अशा रीतीनं प्रसिद्ध करीत आहे. हा चौथा भाग...

----

१०. स्वदेस

-------------

यह जो बंधन है कभी टूट नहीं सकता...

----------------------------------------------

बालदोस्तांनो, १५ ऑगस्ट हा आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्यदिन! याच दिवशी १९४७ मध्ये आपला देश ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाला. यंदा आपला देश स्वतंत्र झाला, त्याला ७१ वर्षे होतील. आपल्या देशावर, आपल्या स्वातंत्र्यलढ्यावर किंवा स्वातंत्र्यसैनिकांच्या आयुष्यावर अनेक सिनेमे आले. ते आपल्यापैकी अनेकांनी पाहिले असतील किंवा यंदाच्या १५ ऑगस्टला वेगवेगळ्या चॅनेलवर पाहायलाही मिळतील. पण आपण मात्र या वेळी देशप्रेमावरच्याच, पण थोड्या वेगळ्या सिनेमाची ओळख करून घेणार आहोत. हा सिनेमा आहे आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘स्वदेस’!

स्वातंत्र्यानंतर काही वर्षांतच भारतातील उच्चशिक्षित तरुण अमेरिका किंवा युरोपात जाऊन स्थायिक होण्याचं प्रमाण वाढलं. या देशाच्या प्रगतीत योगदान देण्याऐवजी या प्रशिक्षित मनुष्यबळाचा फायदा परदेशांनाच जास्त होत होता. ‘स्वदेस’ चित्रपटाचा नायक मोहन भार्गव (शाहरुख खान) हा मात्र अपवाद ठरतो. मोहन अमेरिकेत ‘नासा’मध्ये काम करीत असतो. तो त्याच्या आजीला अमेरिकेला घेऊन जाण्यासाठी भारतात येतो. मात्र, आजीच्या गावाची परिस्थिती पाहून तो भारतातच राहण्याचा निर्णय घेतो आणि गावाच्या प्रगतीसाठी सर्वांना एक करतो, असं हे कथानक आहे. हा चित्रपट २००४ मध्ये आला. एकविसाव्या शतकातही भारतातील खेड्यांची स्थिती फारशी चांगली नाही आणि तिथे पिण्याचे पाणी, वीज, चांगले रस्ते, शाळा अशा अनेक मूलभूत स्वरूपाच्या सेवासुविधाही उपलब्ध नाहीत, याची विदारक जाणीव हा सिनेमा आपल्याला करून देतो. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरनं यात उत्तर प्रदेशातील चरणपूर नामक काल्पनिक खेड्याची व तेथे राहणाऱ्या साध्या-सुध्या लोकांची गोष्ट अतिशय प्रभावीपणे सांगितली आहे.
ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रख्यात कन्नड साहित्यिक शिवराम कारंथ यांनी लिहिलेल्या ‘चिगुरिदा कनासू’ या कन्नड चित्रपटावरून ‘स्वदेस’ बेतलेला आहे. अरविंद पिल्ललामरी आणि रावी कुचिमानची या एनआरआय दांपत्याच्या सत्य जीवनावर कारंथ यांनी हा चित्रपट लिहिला होता. हे दांपत्यही परदेशातील चांगली नोकरी सोडून भारतात परतले आहे आणि त्यांनी दुर्गम भागांतील शाळांमध्ये वीज पोचविण्यासाठी पायाभूत स्वरूपाचे काम केले आहे. हा चित्रपट तयार करण्यापूर्वी दिग्दर्शक गोवारीकर यांनी अरविंद व रावी या दांपत्यासोबत काही काळ घालविला. यासोबतच नर्मदा खोऱ्यातील बिळगाव या गावालाही गोवारीकर यांनी भेट दिली. या गावाने श्रमदानातून स्वयंपूर्ण ऊर्जानिर्मितीचा आदर्श घालून दिला आहे.
या चित्रपटात सुपरस्टार शाहरुख खानने मोहन भार्गव या तरुण, देशप्रेमी शास्त्रज्ञाची भूमिका अत्यंत तन्मयतेनं केली आहे. नायिकेची भूमिका गीता जोशी यांनी, तर मोहनच्या आजीची भूमिका किशोरी बल्लाळ यांनी केली आहे. या चित्रपटाला संगीत ए. आर. रेहमान यांनी दिले आहे, तर यातील गीते प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी लिहिली आहेत. यातलं ‘ये जो देस है मेरा, स्वदेस है मेरा, ये जो बंधन है जो कभी टूट नही सकता’ हे शीर्षकगीत स्वत: रेहमाननं गायलं असून, ते अतिशय गाजलं. याशिवाय ‘ये तारा वो तारा हर तारा’ आणि ‘यूँ ही चला चल राही’ ही गाणीही लोकप्रिय ठरली.
या चित्रपटाचं बरंचसं चित्रिकरण वाई (जि. सातारा) तालुक्यातील मेणवली या गावी झालं. पुण्यातल्या एका पुस्तकाच्या दुकानातही या चित्रपटाचा काही भाग चित्रित करण्यात आला आहे. तेव्हा यंदाच्या १५ ऑगस्टला ‘स्वदेस’ नक्की पाहा. आपला देश अधिक चांगला समजून घेण्यासाठी त्याची नक्कीच मदत होईल.

---

स्वदेस, हिंदी/भारत/रंगीत/२००४

दिग्दर्शक : आशुतोष गोवारीकर, संगीत : ए. आर. रेहमान

प्रमुख भूमिका : शाहरुख खान, गीता जोशी, किशोरी बल्लाळ

---

११. गांधी

------------

'महात्मा' माणूस...

-----------------------

मित्र हो, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी, म्हणजेच दीडशेव्या जयंती वर्षाला दोन ऑक्टोबर २०१८ रोजी सुरुवात होत आहे, हे तुम्ही जाणताच. महात्मा गांधींचं आयुष्य आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व एवढं प्रेरक होतं, की विसाव्या शतकाच्या पूर्वार्धावर त्यांचा अमीट असा ठसा उमटला आहे. गांधीजी गेले, तेव्हा विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन म्हणाले होते, 'असा एका महात्मा या भूतलावर होऊन गेला, यावर पुढच्या पिढ्यांचा कदाचित विश्वास बसणार नाही.' अशा या थोर व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट दाखवणारे अनेक चित्रपट येऊन गेले. त्यातला सर रिचर्ड अटनबरो दिग्दर्शित 'गांधी' हा चित्रपट सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. सर रिचर्ड ॲटनबरो हे ब्रिटिश अभिनेते व दिग्दर्शक. त्यांनी महात्मा गांधींवरील चित्रपटाचा भव्य प्रकल्प हाती घेतला आणि अनेक वर्षं त्यावर काम करून तो १९८२ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट आपल्यापैकी अनेकांनी 'दूरदर्शन'वर पाहिला असेल. नसेल पाहिला तर तो अवश्य पाहा. 

या चित्रपटातून आपल्याला महात्मा गांधींचे जीवन तर उमगतेच; त्या जोडीला तत्कालीन भारत, तेव्हाचा समाज, इतर राजकीय नेते, स्वातंत्र्यलढा या सगळ्यांविषयी बरीच माहिती समजते. महात्मा गांधी सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत काम करीत होते. तेथेही इंग्रजी राजवट होती. एकदा रेल्वेतून प्रथम वर्गातून प्रवास करीत असताना गांधींना तेथील गोऱ्या लोकांनी खाली उतरवले होते. हा वर्णद्वेष गांधीजींच्या मनावर खोल घाव करून गेला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाच्या विरोधात लढा उभारला. 'गांधी' चित्रपटाची सुरुवात या प्रसंगापासून होते. (अगदी सुरुवातीला त्यांच्या हत्येचा प्रसंग येतो. मात्र, कथानकाची सुरुवात आफ्रिकेतील प्रसंगाने होते.) नंतर आफ्रिकेतून त्यांचे भारतात झालेले आगमन, टिळकांनंतर गांधीजींकडं आलेली काँग्रेसची धुरा, जालियनवालाबाग हत्याकांड, असहकार आंदोलन, चले जाव चळवळ, स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यानंतर गांधीजींची झालेली भीषण हत्या... हे सर्व कथानक या सिनेमात तपशीलवार येतं. प्रख्यात ब्रिटिश अभिनेते बेन किंग्जले यांनी यात महात्मा गांधींची भूमिका साकारली आहे. मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना यात महात्मा गांधींच्या पत्नीची, म्हणजेच कस्तुरबा गांधींची भूमिका करण्याची संधी मिळाली. रोशन सेठ यांनी पंडित नेहरूंची भूमिका केली होती. सईद जाफरी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची, तर अलेक पदमसी यांनी महंमद अली जीना यांची भूमिका साकारली आहे. डॉ. श्रीराम लागू यात महात्मा गांधींचे गुरू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या छोट्याशा भूमिकेत दिसतात.
या सिनेमात अनेक भव्य समूहदृश्ये आहेत. जालियनवालाबाग हत्याकांडाचे दृश्य अंगावर काटा आणते. महात्मा गांधींच्या भूमिकेत बेन किंग्जले यांनी खरोखर कमाल केली आहे. महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांनी केलेला सखोल अभ्यास त्यांची ही भूमिका पाहताना जाणवत राहतो. मूळ कोल्हापूरच्या भानू अथय्या यांनी या चित्रपटाची वेषभूषा केली होती. त्यांना या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या पहिल्याच मराठी व्यक्ती ठरल्या. हा चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारांमध्ये एकूण ११ गटांत नामांकन मिळालं होतं. त्यापैकी आठ पुरस्कार या चित्रपटाला मिळाले. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट पटकथा आदींचा समावेश होता.
या चित्रपटाच्या निर्मितीची कथाही रंजक आहे. सुमारे १८ वर्षे हा प्रकल्प ॲटनबरो यांच्या डोक्यात होता. मात्र, या ना त्या कारणाने तो रखडला. अखेर १९८० मध्ये या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले आणि ते १९८१ मध्ये संपले. या चित्रपटात गांधीजींच्या अंत्ययात्रेचे दृश्य चित्रित करण्यासाठी तीन लाख ‘एक्स्ट्रा’ कलाकार बोलावण्यात आले होते. एखाद्या चित्रपटात समूह दृश्यासाठी एवढे लोक वापरण्याचा हा विक्रम आहे. हा चित्रपट भारतात हिंदी भाषेत डब करून प्रदर्शित करण्यात आला होता.
तेव्हा असा हा महत्त्वाचा चित्रपट तुम्ही आत्तापर्यंत पाहिला नसेल तर नक्की पाहा.

---

गांधी, ब्रिटन/भारत, १९८२, इंग्रजी, रंगीत, १९१ मिनिटे

दिग्दर्शक : सर रिचर्ड ॲटनबरो, निर्माते : सर रिचर्ड ॲटनबरो

पटकथा : जॉन ब्रिली, संगीत : पं. रविशंकर, जॉर्ज फेंटन

प्रमुख भूमिका : बेन किंग्जले, रोहिणी हट्टंगडी, रोशन सेठ, पीटर हर्लो, एडवर्ड फॉक्स, सईद जाफरी

---


१२. इक्बाल

-------------

आशाएँ खिली दिल में...

---------------------------

मुलांनो, तुम्हाला क्रिकेट आवडतं ना? आपल्या भारतात हा एक अत्यंत लोकप्रिय खेळ आहे. सचिन तेंडुलकर तर अनेकांचा आवडता क्रीडापटू आहे. आपल्याकडं पूर्वीपासून क्रिकेट लोकप्रिय खेळ होताच; पण सचिनच्या आगमनानंतर तो अगदी खेड्यापाड्यांपर्यंत, कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यापर्यंत पोचला. अगदी स्वयंपाकघरापर्यंत पोचला! आपल्या देशातील हजारो छोट्या गावांमधून वाढणाऱ्या अनेक लहान मुलांना 'सचिन' होण्याची स्वप्नं पडू लागली. अनेक पालक आपल्या मुलांना क्रिकेट शिकण्यासाठी कोचिंगला नेऊ लागले. अर्थात, सचिन तेंडुलकर होणं एवढं सोपं नाहीच; पण नुसता क्रिकेटपटू होणंही वाटतं तेवढं सोपं नाही. त्यासाठी कठोर मेहनत, बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि जोडीला चांगलं नशीब लागतं. एवढं सगळं तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला कधी तरी देशासाठी खेळण्याची संधी मिळेल. मग तिथं आपली चमक दाखवून मोठा क्रिकेटपटू होणं ही नंतरची गोष्ट! आज आपण ज्या सिनेमाची माहिती घेणार आहोत तो 'इक्बाल' हा सिनेमाही अशाच एका क्रिकेटवेड्या मुलाची कथा सांगतो. आणि विशेष म्हणजे 'इक्बाल' हा मुलगा मूकबधीर आहे. त्याला ऐकू येत नाही आणि म्हणून बोलताही येत नाही. पण तरी हा मुलगा जिद्दीने यावर मात करून भारतीय संघात स्थान कसं मिळवतो याची ही प्रेरणादायी गोष्ट आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक नागेश कुकनूर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. श्रेयस तळपदे यानं यात शीर्षक भूमिका केली आहे. इक्बालला लहानपणापासूनच क्रिकेटचं वेड असतं. मात्र, त्यानं क्रिकेटचा नाद सोडून आपल्याला शेतीत मदत करावी, असं त्याच्या वडिलांना वाटत असतं. इक्बालची बहीण खदिजा (श्वेता प्रसाद) ही मात्र त्याला मदत करत असते. ती त्याला भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार असलेल्या आणि आता कोच असलेल्या गुरुजींकडं (गिरीश कार्नाड) घेऊन जाते. ते इक्बालची वेगवान गोलंदाजीतील गुणवत्ता बघून त्याला अकॅडमीत घेतातही. मात्र, कमल नावाच्या दुसऱ्या एका मुलाच्या वडिलांच्या भीतीवरून ते त्याला अकॅडमीतून हाकलून देतात. त्यानंतर इक्बालला भेटतात मोहित (नसीरुद्दीन शाह) हे एक वल्ली खेळाडू. मोहित एक महान क्रिकेटपटू असतात. मात्र, आत्ता त्यांना दारूच्या व्ससनानं घेरून टाकलेलं असतं. त्यांच्या विक्षिप्त स्वभावाला तोंड देत, इक्बाल त्यांच्याकडून वेगवान गोलंदाजीचे धडे गिरवतो. अखेर त्याला आंध्र प्रदेश संघाकडून रणजी स्पर्धेत खेळायला मिळतं. तिथं तो चांगली कामगिरी करतो. आता राष्ट्रीय निवड समितीच्या सदस्यांसमोर त्याला चांगली कामगिरी करायची असते. तेव्हा गुरुजी त्याला वाईट खेळून, कमलला संधी मिळण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न करतात. इक्बालच्या वडिलांची शेती गहाण पडलेली असते. त्यामुळे त्याला पैशांची गरज असते. म्हणून तो नाइलाजास्तव गुरुजींचा प्रस्ताव स्वीकारतो. मात्र, त्याच वेळी त्याला अचानक एक स्पोर्ट एजंट त्याला चांगल्या पैशांची ऑफर देऊ करतो. त्यानंतर इक्बाल गुरुजींचं न ऐकता, आपली गुणवत्ता दाखवतो आणि आपल्या संघाला सामना जिंकून देतो. तिथं आलेले निवड समिती सदस्य कपिल देव (पाहुणे कलाकार) त्याच्या कामगिरीमुळे खूश होतात. चित्रपटाच्या अखेरीस इक्बाल भारताच्या राष्ट्रीय संघाची निळी जर्सी घालून आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्यासाठी सज्ज होतानाचं दृश्य येतं.
एकदा एखाद्या गोष्टीचं वेड घेतलं, तर कितीही अडचणी आल्या तरी आपण त्यावर मात करू शकतो, हे या सिनेमात फार प्रभावीपणे दाखवण्यात आलं आहे. भारतातल्या मुलांचं क्रिकेटचं वेड लक्षात घेता, या सिनेमातला संघर्ष अनेकांना आपला स्वतःचा वाटू शकतो. दिग्दर्शक नागेश कुकनूरने ग्रामीण भागातल्या आणि सुविधांचा अभाव असलेल्या, गरीब मुलांच्या स्वप्नांची कथा यातून सुंदर पद्धतीनं दाखविली आहे. श्रेयस तळपदेनं यातली 'इक्बाल'ची भूमिका अत्यंत कष्टानं साकारली आहे. त्यासाठी त्यानं मूकबधीर मुलांचा अभ्यास तर केलाच; शिवाय वेगवान गोलंदाजी कशी करतात हेही तो शिकला. गिरीश कार्नाड, नसीरुद्दीन शाह, प्रतीक्षा लोणकर, यतीन कार्येकर, श्वेता प्रसाद आदींनी आपापल्या भूमिका उत्तम रीतीनं केल्या आहेत. सन २००५ मध्ये आलेल्या या चित्रपटाला 'इतर सामाजिक विषयांवरील' सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. यातलं 'आशाएँ खिली दिल में' हे केकेनं गायलेलं गाणं खूप गाजलं होतं.
पुढील वर्षी क्रिकेटचा वनडे वर्ल्ड कप आहे. आताही क्रिकेटचा सीझन सुरू झालाच आहे. तुम्ही हा सिनेमा अद्याप पाहिला नसेल तर दिवाळीच्या सुट्टीत जरूर पाहा.

----

इक्बाल (भारत/हिंदी/२००५/रंगीत/१३२ मिनिटे)

निर्माते : सुभाष घई, दिग्दर्शक : नागेश कुकनूर

कथा-पटकथा : नागेश कुकनूर, सिनेमॅटोग्राफी : सुदीप चॅटर्जी, संकलन - संजीब दत्ता,

संगीत : हिमेश रेशमिया, सुखविंदरसिंग, सलीम-सुलेमान

प्रमुख भूमिका : श्रेयस तळपदे, नसीरुद्दीन शाह, गिरीश कार्नाड, श्वेता प्रसाद, प्रतीक्षा लोणकर

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---

5 Dec 2020

बिंगोस्कोप - भाग ७ ते ९

 बिंगोस्कोप

-------------

स्वाती यादवाडकर या मैत्रिणीनं दोनेक वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बिंगोकिड्स’ या लहान मुलांच्या पाक्षिकात मी ‘बिंगोस्कोप’ या सदरात जगभरातील काही उत्तम चित्रपटांची ओळख मुलांना करून दिली. ही रूढार्थाने परीक्षणं नाहीत. साधारण दहा ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी, त्यांना समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत सिनेमांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकूण २१ सिनेमांवर मी या सदरात लिहिलं आहे. हे लिखाण इथं एकत्रित राहील म्हणून तीन-तीन परिचय एकत्र करून एक ब्लॉग अशा रीतीनं प्रसिद्ध करीत आहे. हा तिसरा भाग...

----


७. दहावी फ

-------------

‘फ’ची पोरं हुश्शार...

-------------------------

बालमित्रहो, या सुट्टीत तुम्ही आवर्जून पाहिलाच पाहिजे असा एक मराठी चित्रपट म्हणजे ‘दहावी फ’. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या प्रसिद्ध दिग्दर्शकद्वयीनं दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हाही या चित्रपटाने सर्वांची वाहवा मिळविली होती. चित्रपटाचं नाव आहे ‘दहावी फ’, त्यामुळं या नावावरूनच हा सिनेमा कशाविषयी आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेलच. बरोबर... इयत्ता दहावीच्या ‘फ’ तुकडीत शिकणाऱ्या मुलांची ही गोष्ट आहे. पुण्यातील एका शाळेत प्रत्यक्ष घडलेल्या एका घटनेवरून सुमित्रा भावे यांना हा चित्रपट सुचला. 

या सिनेमाची गोष्ट अगदी प्रेरणादायी आहे. आपल्याकडं शाळांमधल्या तुकड्या कशा ठरतात, हे तुम्हाला माहिती आहे. ‘अ’ तुकडी ही हुशार मुलांची, ‘ब’ ही त्याहून कमी हुशार... असं करत करत ‘फ’ तुकडी म्हणजे अगदी ढ मुलांची असंच समीकरण रूढ आहे. पुण्यातल्या एका शाळेत अशाच तुकड्या असतात. या तुकडीतील मुलं गरीब घरांतील, कष्ट करून शिकणारी अशीच असतात. सहामाही परीक्षेत त्यातली तीनच मुलं सर्व विषयांत पास होतात. त्यात अ तुकडीतील एक मुलगा फ तुकडीतील मुलाला चिडवतो. त्यावरून त्यांची मारामारी होते. या मारामारीत दोष ‘फ’च्या मुलांचाच असणार, या समजुतीने मुख्याध्यापक त्यांना दंड ठोठावतात. या अन्यायामुळं ही मुलं आणखीनच चिडतात आणि शाळेचं नुकसान करायचं ठरवतात. रात्री ही मुलं एकत्र येऊन शाळेची तोडफोड करतात. या प्रकारानंतर तर शाळेचे मुख्याध्यापक या प्रकाराची पोलिसांत तक्रार करायची, असा निर्णय घेतात आणि या मुलांना शाळेतून निलंबितही करतात.
या मुलांचे लाडके गणिताचे देशमुख सर मात्र या प्रकारामुळं अत्यंत अस्वस्थ होतात. ते या मुलांना विश्वासात घेतात. ही मुलं मुळात वाईट नाहीत; परिस्थितीमुळं ती तशी वागत आहेत याबद्दल त्यांना खात्री असते. ते या मुलांशी बोलून एक निर्णय घेतात. शाळेचं झालेलं नुकसान भरून देण्याचा निर्णय! हा निर्णय सोपा नसतो. त्यासाठी २५ हजार रुपये उभे करायचे असतात. मुलांची आर्थिक परिस्थिती मुळीच तशी नसते. मात्र, ही मुलं काम करून, कष्ट करून हे पैसे कमावण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर पुढं काय होतं, मुलांना त्यात यश येतं का आदी गोष्टी प्रत्यक्ष सिनेमातच पाहायला हव्यात.
कुणीही विद्यार्थी मुळात वाईट किंवा ढ नसतो. त्याच्या आजूबाजूची परिस्थिती त्याला तसं घडविण्यास कारणीभूत असते. आपण चांगलं वागायचं ठरवलं, तर सगळे आपल्याला मदत करतात आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपला आत्मविश्वास परत मिळतो, असा चांगला संदेश हा सिनेमा देतो. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर हे दिग्दर्शक पुण्यातलेच असल्यामुळं त्यांनी पुण्यातल्याच रावसाहेब पटवर्धन विद्यालयात या चित्रपटाचं सर्व चित्रिकरण केलं. या चित्रपटात अनेक हळवे, संवेदनशील प्रसंग आहेत. देशमुख सर मुलांना आपल्या कॉलेजमधली आठवण सांगतात, तो प्रसंग किंवा सिद्धार्थची आई देशमुख सरांसह बोलते तो प्रसंग असे किती तरी प्रसंग आपल्यावर ठसतात.
अतुल कुलकर्णी यांनी यातील गणेश देशमुख सरांची भूमिका केली आहे. याबरोबरच ज्योती सुभाष, मिलिंद गुणाजी, राजेश मोरे आदी कलाकारांनीही यात उत्कृष्ट भूमिका केल्या आहेत. वृषसेन दाभोळकर, सिद्धार्थ दफ्तरदार, निमिष काठाळे आदी मुलांनी प्रथमच या चित्रपटात काम केलं होतं. श्रीरंग उमराणी यांचं संगीत होतं.
शालेय जीवनावर आधारित असा हा चित्रपट रसिकांनीही चांगलाच उचलून धरला. या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा राज्य पुरस्कारही प्राप्त झाला आहे. तेव्हा तुम्हीही तो नक्की पाहा.

---

दहावी फ, भारत, २००२

दिग्दर्शक : सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर

प्रमुख भूमिका : अतुल कुलकर्णी, ज्योती सुभाष, मिलिंद गुणाजी, राजेश मोरे, वृषसेन दाभोळकर, निमिष काठाळे

----

८. हॅलो

---------

हरवण्याची व गवसण्याची गोष्ट

-------------------------------------

बालमित्रांनो, तुमची अतिशय आवडती, लाडकी अशी एखादी तरी वस्तू असेलच ना... तुमची बाहुली म्हणा, किंवा खेळणं म्हणा, क्रिकेट बॅट म्हणा किंवा रॅकेट म्हणा... समजा, तुमची ही लाडकी वस्तू हरवली तर? तुम्ही खूप अस्वस्थ व्हाल... रडाल, ओरडाल, हात-पाय आपटाल... आपण आत्ता ज्या चित्रपटाची माहिती घेणार आहोत, त्या ‘हॅलो’ नावाच्या हिंदी चित्रपटाची नायिका पण अगदी असंच करते आहे. ही नायिका आहे साशा नावाची एक सात वर्षांची छोटी मुलगी. तिचा ‘हॅलो’ नावाचा अत्यंत गोड, लाडका कुत्रा हरवलाय आणि आता ती त्याचा शोध घ्यायला निघालीय... या शोधाचीच गोष्ट म्हणजे ‘हॅलो’ हा सिनेमा. 

प्रसिद्ध कॅमेरामन संतोष सिवन यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा १९९६ मध्ये प्रदर्शित झाला होता. तुम्ही हा सिनेमा पाहिला नसेल तर नक्की पाहा. संपूर्ण सिनेमा अत्यंत गमतीशीर पद्धतीनं चित्रित केला आहे. दिग्दर्शक स्वत: कॅमेरामन असल्यानं त्यानं या छायाचित्रणाच्या खूप गमती-जमती केल्या आहेत. संपूर्ण सिनेमा हा साशाच्या नजरेतून घडताना दिसतो. त्यामुळं त्या छोट्या मुलीच्या उंचीएवढा किंवा तिच्या ‘आय-लेव्हल’लाच अनेक वेळा कॅमेरा लावलेला दिसतो. लहान मुलांना अनेकदा खाली वाकून पायांमधून उलटं पाहण्याची किंवा मान तिरकी करून पाहण्याची सवय असते. तर असेच अनेक गमतीशीर अँगल या चित्रपटात सिवन यांनी वापरलेले आहेत.
साशाला आई नसते. तिच्या वडिलांचं तिच्यावर खूप प्रेम असतं, पण तरीही तिला आईविना खूप एकटं वाटत असतं. सुट्टीत इतर मुलं खेळत असतात, तेव्हा बिचारी साशा एकटीच घरात बसलेली असते. मग तिच्या घरातले नोकर तुला देवाकडून भेट (वलय - ज्याला इंग्रजीत Halo म्हणतात) मिळणार आहे, असं सांगतात. त्यानंतर साशाला रस्त्यावरील एक गोड, छोटा कुत्रा दिसतो. हाच आपल्याला भेटणार असलेला देवदूत आहे, अशा समजुतीतून साशा त्या कुत्र्याला जवळ घेते. ती त्याचं नावही ‘हॅलो’ असंच ठेवते. हा ‘हॅलो’ तिचा जीव की प्राण होतो. तिचे वडीलही काही म्हणत नाहीत. साशा आणि तिचा ‘हॅलो’ छान राहू लागतात. मात्र, एके दिवशी तो गायब होतो. साशाला अत्यंत दु:ख होतं. तिला काय करावं तेच समजत नाही. मग या कुत्र्याच्या शोधासाठी ती घराबाहेर पडते. त्यानंतर मुंबईतील वेगवेगळ्या चित्र-विचित्र लोकांसोबत तिची भेट होते. त्यात एका वृत्तपत्राचे संपादक असतात, मुंबईचे पोलिस कमिशनर असतात, गुंड-पुंड असतात आणि रस्त्यावरची वांड मुलंही असतात. या सगळ्यांना भेटून साशा आपली अडचण सांगते. कुत्र्याला शोधण्यासाठी मदत करायची विनंती करते. पण तिला वेगवेगळे अनुभव येतात. शेवटी काय होतं, तिला ‘हॅलो’ सापडतो का हे सगळं प्रत्यक्ष पडद्यावरच पाहण्यात गंमत आहे. तो शेवट पाहताना आपले डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत, एवढं मात्र नक्की!
साशाची भूमिका बेनाफ दादाचंदजी नावाच्या अतिशय गोड, निरागस मुलीनं केली आहे. बेनाफच्या अभिनयामुळं आपण या सिनेमात गुंतत जातो. मुलांनो, तुम्हाला प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी माहिती असतील ना? तर या संतोषींनी या सिनेमात साशाच्या बाबांची भूमिका केली आहे. आहे ना गंमत? याशिवाय मुकेश ऋषी, टिनू आनंद, विजू खोटे आदी अनेक नामवंत कलाकारांनीही यात वेगवेगळ्या, विचित्र, पण गमतीशीर वेषभूषा असलेल्या भूमिका केल्या आहेत. तेव्हा हा चित्रपट तुम्ही नक्की पाहा आणि आपल्या मित्रांनाही पाहायला सांगा... पाहिल्यावर आम्हालाही कळवा तुम्हाला तो कसा वाटला ते!

---

हॅलो, भारत, १९९६

दिग्दर्शक : संतोष सिवन

प्रमुख भूमिका : बेनाफ दादाचंदजी, राजकुमार संतोषी, टिनू आनंद, विजू खोटे, मुकेश ऋषी

---

९. पेले : बर्थ ऑफ ए लीजंड

----------------------------------

महान फुटबॉलपटू घडताना...

-----------------------------------

बालमित्रांनो, शाळा सुरू झाल्या आणि त्याबरोबरच वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धाही सुरू झाली. सध्या ही स्पर्धा रशियात सुरू आहे. अजून अभ्यासाची फारशी घाई नाही, त्यामुळं फुटबॉल स्पर्धा एंजॉय करायला हरकत नाही. होय ना! फुटबॉल हा जगभरातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे, हे तुम्हाला  माहिती आहेच. आपल्या भारतातही फुटबॉलचे चाहते खूप वाढले आहेत. रात्र रात्र जागून सामने पाहणारे कित्येक फुटबॉलप्रेमी तुम्हाला आपल्या आजूबाजूला दिसतील. तुम्हीही फुटबॉलप्रेमी आहात का? असाल तर तुम्हाला पेले हे नाव नक्कीच ठाऊक असेल. ब्राझीलच्या या महान खेळाडूवर दोन वर्षांपूर्वी 'पेले : बर्थ ऑफ ए लीजंड' हा इंग्रजी चित्रपट आला होता. एखाद्या खेळाडूची जडणघडण कशी होते, त्याच्यासमोर कोणत्या अडचणी असतात, त्यावर  तो कसा मात करतो, महान खेळाडू होण्याकडे एखाद्याची वाटचाल कशी सुरू होते, हे जाणून घ्यायचं असेल, तर हा चित्रपट नक्की पाहा.

ब्राझीलमधील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या एडसन अरांतेस दो नशिमेंतो असं नाव असलेल्या या मुलाचं रूपांतर 'पेले' नामक दंतकथेत कसं झालं, याची कहाणी हा चित्रपट सांगतो. पेलेचे वडील डॉनडिन्हो फुटबॉलपटू होते. त्यांनी पेलेचं नाव प्रख्यात अमेरिकी संशोधक थॉमस अल्वा एडिसन याच्यावरून एडिसन असं ठेवलं होतं. मात्र, नंतर ते त्याला 'एडसन' असंच म्हणू लागले. पुढं मात्र एडसनला सगळं जग 'पेले' म्हणूनच ओळखू लागलं. 'पेले' या नावाला पोर्तुगीज भाषेत तसा काहीही अर्थ नाही. लहानपणी पेलेच्या एका आवडत्या फुटबॉलपटूचं नाव बिले असं होतं. मात्र, ते नाव तो 'पेले' असं उच्चारायचा. त्यावरून एडसनलाच सगळे जण पेले असं म्हणू लागले.
जेफ झिंबालिस्ट या अमेरिकी दिग्दर्शकानं 'पेले' हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. सिनेमाच्या नावाप्रमाणे यात पेलेच्या जीवनाचा अगदी सुरुवातीचा, संघर्षाचा काळ दाखविला आहे. वयाच्या दहाव्या वर्षापासून ते सतराव्या वर्षापर्यंतचा पेलेचा प्रवास हा चित्रपट घडवतो. त्यासाठी दिग्दर्शकाने दोन कलाकारांची निवड केली आहे. दहा वर्षांच्या पेलेची भूमिका लिओनार्दो लिमा कार्व्होलो या मुलानं केली आहे, तर केविन डी पाऊला या कलाकारानं मोठ्या पेलेची, म्हणजे मुख्य भूमिका केली आहे.
पेले दहा वर्षांचा असताना, म्हणजे १९५० च्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत उरुग्वेनं ब्राझीलला अंतिम सामन्यात हरवून विश्वकरंडक पटकावला होता. अवघा ब्राझील देश व अर्थात पेलेही दु:खात बुडाला होता. या पराभवामुळेच पेलेच्या मनात कुठं तरी विश्वकरंडक देशासाठी मिळवायचाच, अशी ठिणगी पडली होती. दिग्दर्शकाच्या मते, एका अर्थानं ब्राझीलच्या राष्ट्रीयत्वाच्या दृढ भावनेचा आणि पेलेचा उदय एकाच वेळी होत होता. पेले आणि त्याचे वडील यांचं नातं या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. सेऊ जॉर्ज या अभिनेत्याने पेलेच्या वडिलांची भूमिका साकारली होती.
आपल्यासाठी या चित्रपटाचं भारतीय कनेक्शन म्हणजे या चित्रपटाला संगीत दिलं होतं ए.आर. रेहमान यांनी. या चित्रपटाचं संपूर्ण चित्रिकरण रिओ डी जानिरोसह ब्राझीलमधील विविध ठिकाणी झालं. दिग्दर्शकानं २०१३ मध्ये चित्रिकरण सुरू केलं, तेव्हा २०१४ च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळी तो प्रदर्शित होईल, असा अंदाज होता. मात्र, चित्रपटाचं काम रखडल्यानं तो मे २०१६ मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटात काही त्रुटी नक्कीच आहेत. समीक्षक व प्रेक्षकांनीही या चित्रपटाचं संमिश्र स्वागत केलं. मात्र, एका महान फुटबॉलपटूचं लहानपण आणि तेथून त्याचा 'लीजंड' म्हणजे एक जिवंत दंतकथा होण्याकडं झालेला प्रवास अनुभवण्यासाठी एकदा हा सिनेमा पाहायला हवा.

---

पेले : बर्थ ऑफ ए लीजंड, अमेरिका, २०१६

दिग्दर्शक : जेफ झिंबालिस्ट

प्रमुख भूमिका : केविन डी पाऊला, लिओनार्दो लिमा कार्व्होलो, सेऊ जॉर्ज, मरियाना नन्स

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---