24 Nov 2016

माधुरी दीक्षित लेख

सुहास्य तुझे...
--------------



माधुरी दीक्षित. आमच्या उमलत्या तारुण्याला पडलेलं एक मुग्धमधुर स्वप्न! माधुरी दीक्षित म्हणजे मनमोहक, खळाळत्या हास्याचा धबधबा! माधुरी म्हणजे नृत्यनिपुणता, कमनीयता, सौष्ठवता!!! माधुरी म्हणजे माधुरीच... तिच्यासारखी दुसरी कुणीही नाही. 'सुहास्य तुझे मनासी मोहे' हे गाणं केवळ जिच्यासाठीच लिहिलं असावं असं कायम वाटतं ती सुहास्यवदना, कोमलांगी, चारुगात्री माधुरी...
सौंदर्य हे अजर असतं, असं म्हणतात. म्हणजेच ते कधी म्हातारं होत नाही. शिवाय ते सौंदर्य जर पाहणाऱ्याच्या नजरेत असेल, तर खरोखरच ते चिरतरुण राहतं. माधुरी दीक्षितला गेल्या मेमध्ये पन्नासावं वर्षं लागलं आणि येत्या १५ मे २०१७ रोजी ती वयाची पन्नाशी पूर्ण करणार आहे, हे केवळ आकडे झाले. माझ्या लेखी ती कायमच ती १९९० मधली अवखळ, चुलबुली माधुरी असणार आहे. याचं एकमेव कारण म्हणजे ती 'माझ्या' पिढीची तारका होती. प्रत्येक पिढीची 'आपली' अशी एक स्वप्नसुंदरी असते. अगदी मधुबालापासून ते आत्ताच्या दीपिका पदुकोण किंवा विद्या बालनपर्यंत ही यादी सांगता येईल. पण आता चाळिशीत असलेल्या माझ्या पिढीच्या समोर माधुरी अवतरली, हे आमचं भाग्य होय. माधुरी निखालस 'नाइन्टीज'ची नायिका होती. तिचा पहिला सिनेमा 'अबोध' झळकला तो १९८४ मध्ये. तेव्हा ती फक्त १७ वर्षांची होती. त्यानंतरही तिनं काही फुटकळ सिनेमे केले. मात्र, ती रातोरात सुपरस्टार झाली ती १९८८ मध्ये आलेल्या 'तेजाब'मुळं. चंद्रशेखर नार्वेकर उर्फ एन. चंद्रा नावाच्या मराठी माणसानं 'एक दो तीन...'च्या ठेक्यावर माधुरीला हिंदी चित्रपटसृष्टीचा विशाल कॅनव्हास मिळवून दिला. 
माधुरी रूपेरी पडद्यावर राज्य करायला आली तेव्हा इथं निर्विवाद श्रीदेवीचं राज्य होतं. त्यापूर्वीच्या हेमामालिनी, रेखा, झीनत अमान, राखी यांचं राज्य खालसा होत आलं होतं. माधुरीला स्पर्धा होती ती फक्त श्रीदेवीची. श्रीदेवी एक अत्यंत जबरदस्त अभिनेत्री तर होतीच; पण शिवाय ती दाक्षिणात्य, नृत्यनिपुण आणि सौष्ठवपूर्ण होती या तिच्या आणखी काही जमेच्या बाजू होत्या. मि. इंडिया, नगीना आणि नंतर आलेल्या 'चांदनी'नं श्रीदेवीची लोकप्रियता कळसाला पोचली होती. मात्र, प्रेक्षकांनी 'तेजाब'च्या वेळी माधुरीला पडद्यावर पाहिलं आणि त्यांच्या हृदयात कसलीशी कळ उठली. माझ्यासारख्या तेव्हा पौगंडावस्थेत असलेल्या प्रेक्षकांच्या तर नक्कीच! पुढं इंद्रकुमारच्या 'बेटा'नं यालाच शब्दरूप दिलं - 'धक धक करने लगा...' पण ही अवस्था आमची 'तेजाब'पासूनच झाली होती, हे नक्की. माधुरीत काही तरी 'एक्स-फॅक्टर' होता, म्हणूनच तिला प्रेक्षकांनी एवढं नावाजलं. तिचं कोडकौतुक केलं. आता मागं वळून पाहताना असं वाटतं, की तिच्या चेहऱ्यात एक निरागसता होती आणि तिचं ते मुक्त, खळाळतं (हेच विशेषण वापरावं लागतंय दर वेळी, पण खरोखर दुसरा शब्दच नाही...) हास्य म्हणजे त्या निरागसतेला लागलेले 'चार चाँद'च जणू. नटीचं शारीर वर्णन करताना त्यात हमखास लैंगिक सूचन येतं. तेच संदर्भ येतात. माधुरीही त्याला निश्चितच अपवाद नव्हती. पण त्याहीपलीकडं जाऊन तिच्यात काही तरी होतं. किंबहुना तिचं ते सुप्रसिद्ध हास्य पाहताना प्रेक्षकांना केवळ लैंगिक सूचन होत नव्हतं, असं आता वाटतं. कदाचित तो काळ पाहिला, तर असं वाटतं, की समाजातला झपाट्यानं कमी होत चाललेला निरागसपणा तिच्या रूपानं पुन्हा पाहायला मिळत होता. लहानपणी आपण असे निरागस असतो. प्रत्येक गोष्टीला खळखळून हसत दाद देत असतो. मित्रांबरोबर दंगा-मस्ती करीत असतो. पण जसजसे आपण मोठे होत जातो, तसतसं हे हास्य लोप पावत जातं. निरागसता हरवून जाते. आपण बनचुके, बनेल, अट्टल होऊन जातो. पण आपण आपल्या बालपणातला तो निरागस भाव कुठं तरी 'मिस' करीत असतो. आणि मग तो असा माधुरीच्या हास्याच्या रूपानं पुन्हा समोर आला, की त्याला कडकडून भेटावंसं वाटतं. माधुरी म्हणजे त्या हरवलेल्या निरागसपणाचं मूर्तिमंत प्रतीक होती, असं आता वाटतं. 
भारताला स्वातंत्र्य मिळून १९८७ मध्ये ४० वर्षं पूर्ण झाली होती. एखाद्या व्यक्तीच्या वयाची चाळिशी आणि एखाद्या देशाच्या स्वातंत्र्याची चाळिशी यात निश्चितच गुणात्मक फरक आहे. पण गंमत म्हणून देशाला एक व्यक्ती कल्पून तुलना केली, तर आपला देश त्या वेळी नक्कीच चाळिशीतल्या माणसासारखा काहीसा प्रौढ, बनचुका, कोरडा (आणि कोडगाही) झाला होता. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या दशकात असलेल्या रोमँटिसिझमची पुढं १९६२ च्या चीन युद्धानं आणि नंतर नेहरूंच्या निधनानं राखरांगोळी झाली. सत्तरच्या दशकात हा हनीमून पीरियड संपला होता, तरीही स्वातंत्र्यानंतरचा देश आता वयात येऊ लागला होता. म्हणूनच या दशकात एक गोड स्वप्नाळूपण, भारावलेपण आणि नवनिर्मितीची आस दिसते. याच काळात देशभरात साहित्य, कला, संस्कृतीला बहर आला. अनेक चांगल्या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, नाटकं आली, सिनेमे तयार झाले. उत्तम दर्जाचं संगीत तयार झालं. देशभरात मोठ्या प्रमाणात कारखाने, धरणं यांची उभारणी झाली. पुढं देश तिशीत आला, तेव्हा संसारातलं नवेपण संपून षड्रिपूंची लागण सुरू झाली होती. बांगलादेश युद्धाच्या पराक्रमानंतर देशातल्या चैतन्याला जी ओहोटी लागली ती लागलीच. मग १९७२ च्या दुष्काळानं देशाला तडाखा दिला. नंतर रेल्वे संप, नवनिर्माण आंदोलन आणि त्याची परिणती झालेली आणीबाणी... देशाच्या स्वातंत्र्याच्या तिशीत देश जणू पुन्हा पारतंत्र्यात गेला. लायसन्सराज, परमिटराज, बाबूंची खाबूगिरी, रेशनवरच्या भेसळीपासून ते कंत्राटांच्या कमिशनपर्यंत भ्रष्टाचारानं देशावर आपले अक्राळविक्राळ पंजे फैलावले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेली मुलं आता तिशीत आली होती. त्यांना स्वातंत्र्याहून अधिक काही तरी देशाकडून हवं होतं. मग या पिढीनं मोठ्या प्रमाणात आंदोलनं, चळवळी सुरू केल्या. देशाला अस्थिर करणाऱ्या शक्तींनीही याच काळात जोर धरला. म्हणून मग पंजाब, आसाम खदखदू लागले. देशानं पुढच्या दहा वर्षांत दोन पंतप्रधान गमावले. ऐंशीनंतर तर देश विलक्षण कात्रीत सापडला. एकीकडं महासत्तांमधल्या शीतयुद्धाचं जगावर पडलेलं सावट आणि दुसरीकडं देशातल्या नवनिर्माणाचा ओसरू लागलेला बहर असा हा दुहेरी पेच होता. त्यामुळं या काळात टीव्ही रंगीत झाला, व्हिडिओ आले, तरी सामान्य नागरिकांच्या दुर्दशेत वाढच होऊ लागली. बेरोजगारी, भ्रष्टाचार, दुष्काळ आणि सार्वजनिक बेशिस्त या मोठ्या अडथळ्यांनीच देशावर राज्य करायला सुरुवात केली. या देशात काहीच चांगलं घडणार नाही का, असा प्रश्न स्वातंत्र्य चळवळ अनुभवलेल्या ज्येष्ठ पिढीला आणि परिस्थितीपुढं हताश, अस्वस्थ झालेल्या नव्या पिढीला पडू लागला होता. (देशात १९९१ मध्ये झालेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतरची एका परीनं झालेली क्रांती हा काळ अद्याप यायचा होता..) अशा काळात भ्रष्टाचारानं गांजलेल्या, काळ्या बाजारानं त्रस्त झालेल्या (१९८७ मध्ये आलेल्या 'मि. इंडिया'मधला तो शॉट आठवा. भेसळ करणाऱ्या अजित वाच्छानीला 'मि. इंडिया' अनिल कपूर भेसळयुक्त अन्न कोंबून भरवतोय असा तो शॉट एखाद्या चऱ्यासारखा आठवणीत राहिलाय...) सामान्य जनतेला माधुरीच्या हास्यात आपलं हरवलेलं निरागस सौंदर्य सापडलं आणि त्यांनी माधुरीला एकदम सुपरस्टार करून टाकलं. माधुरीच्या निरागस व मुग्धमधुर हास्यानं प्रेक्षकांवर जी 'मोहिनी' घातलीय, ती अद्याप एवढ्या वर्षांनंतरही उतरायला तयार नाही, याचं एकमेव कारण म्हणजे त्या हास्याचा प्रेक्षकांच्या हरपलेल्या निरागसतेशी असलेला हा 'कनेक्ट' होय. 
माधुरी वेगळी होती, ती आणखी एका कारणानं. ती इतर काही नट्यांसारखी बालपणापासून सिनेमासृष्टीत आलेली नव्हती किंवा तिचं शिक्षणही अर्धवट राहिलेलं नव्हतं. तिनं रीतसर बी. एस्सी. मायक्रोबायोलॉजीची पदवी घेतली होती. खरं तर तिला त्याच क्षेत्रात पुढं काही तरी करायचं होतं. पण नियतीला कदाचित ते मंजूर नव्हतं. मध्यमवर्गीय घरातली ही तरुणी केवळ मध्यमवर्गीय आयुष्य कधीच जगणार नव्हती. पुढं तिला भारतातल्याच नव्हे, तर जगभरातल्या रसिकांच्या मनातलं ड्रीमगर्ल स्टेटस मिळणार होतंच. 'तेजाब'नंतर माधुरीनं आमिर खानसह केलेला 'दिल'ही प्रचंड गाजला. ही एक सरधोपट प्रेमकहाणीच होती. पण चॉकलेट हिरो आमिर खान आणि माधुरीची मोहिनी यामुळं इंद्रकुमारला मटकाच लागला. आम्ही माधुरीच्या एवढे प्रेमात होतो, की एक्स्ट्रीम क्लोजअपमध्ये तिच्या चेहऱ्यावर दिसणारी मुरमंही आम्हाला दिसत नव्हती. (आता दिसतात...) 'तेजाब'च्या यशानंतर माधुरी-अनिल कपूर जोडीचे अनेक सिनेमे आले. जीवन एक संघर्ष, किशन-कन्हय्या वगैरे. पण त्यात सर्वाधिक लक्षात राहिला आणि गाजला तो 'शोमन' सुभाष घईंचा 'राम-लखन'... या सिनेमाच्या प्रचंड यशानंतर माधुरी-अनिल कपूर ही तेव्हाची सर्वांत 'हिट अँड हॉट' जोडी ठरली. थोड्यात काळात माधुरी जवळपास सुपरस्टार नायिका झाली. पुढच्याच वर्षी आलेल्या लॉरेन्स डिसूझाच्या 'साजन'नंही प्रचंड यश मिळवलं. सलमान आणि संजय दत्त या दोघा नायकांसमोर लक्षात राहिली ती माधुरीच. तिची नृत्यनिपुणता या चित्रपटात विशेष झळाळून दिसली. अशा माधुरीला १९९१ मध्ये आलेल्या 'प्रहार'मध्ये विनामेकअप कॅमेऱ्यासमोर उभं केलं ते नाना पाटेकरनं. पीटरवर (गौतम जोगळेकर) मनस्वी प्रेम करणारी शर्ली माधुरीनं फार आत्मीयतेनं साकारली. तिच्यातले अभिनयगुण प्रकर्षानं दिसले. विनामेकअपसुद्धा ती अत्यंत सुंदर दिसली आणि नैसर्गिक सौंदर्याला बाह्य सजावटीची गरज नसते, हे सत्य पुन्हा एकदा अधोरेखित झालं. 'दिल'च्या यशानंतर इंद्रकुमारनं माधुरी-अनिल या सुपरहिट जोडीला घेऊन पुढचा सिनेमा आणला - 'बेटा'. या सिनेमानं माधुरीच्या सम्राज्ञीपदावर निर्विवाद शिक्कामोर्तब केलं. आधीच्याच वर्षी यश चोप्रांच्या 'लम्हें'मधून श्रीदेवीनं अप्रतिम भूमिका केली होती. पण माधुरीनं 'बेटा'मधून जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. दोघींच्या या तीव्र स्पर्धेचा पुढच्या दोनच वर्षांत याचा फैसला होणार होता. नंतरच्या वर्षी घईंचा एक सिनेमा आला - 'खलनायक'. संजय दत्त नायक आणि माधुरी नायिका. माधुरी आणि संजयमध्ये काही तरी सुरू असल्याची कुजबुज याच काळातली. १९९३ मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटांत संजय दत्त आरोपी म्हणून सापडला आणि माधुरीनं शहाणपणानं योग्य तो निर्णय घेतला. पुन्हा नंतर त्या दोघांची चर्चा कधीही ऐकू आली नाही. माधुरीची क्रेझ एवढी वाढली, की संजय कपूर आणि तिच्या 'राजा' नामक एका चित्रपटाचं खरं नाव 'रानी' असंच असायला हवं होतं, असं लोक म्हणायला लागले. 
पुढचं वर्ष होतं १९९४ आणि याच वर्षानं माधुरीच्या सुपरस्टार पदावर मोहोर उमटवली. सूरज बडजात्यानं 'हम आप के हैं कौन'मधून सलमान आणि माधुरी यांना दिमाखात पेश केलं. लग्नाची व्हिडिओ कॅसेट अशी या सिनेमाची समीक्षकांनी संभावना केली असली, तरी तो त्या वर्षीचा नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला तोपर्यंतचा सर्वाधिक हिट चित्रपट ठरला. तेव्हा २९ वर्षांचा असलेला सलमान आणि २७ वर्षांची माधुरी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली. घरगुती, कुटुंबात रमणारी, तरीही प्रियकरासाठी क्षणात 'रसिकमोहिनी' होणारी सेन्शुअस निशा माधुरीच्या गात्रागात्रांतून उभी राहिली. भारतीय पुरुषी मानसिकता अचून हेरून सूरज बडजात्यानं 'हम आप के'चं पॅकेज आणलं होतं. ते हिट होणारच होतं. श्रीदेवी हळूहळू फेडआउट होत होती, माधुरी तेव्हा या हिंदी चित्रपटसृष्टीतली एकमेव सुपरस्टार नायिका उरली होती. 
माधुरीनं एवढं प्रचंड यश मिळवलं तरी तिच्या अभिनयक्षमतेविषयी काही समीक्षकांना शंका असायची. माधुरी केवळ सुंदर दिसणं आणि नृत्यनिपुणता याच जोरावर चित्रपटसृष्टीवर राज्य करते आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. हे काही अंशी खरंही होतं. अगदी कस लागेल अशा फार कमी भूमिका माधुरीच्या वाट्याला येत होत्या. त्यांची ही शंका दूर केली ती प्रकाश झा यांच्या १९९७ मध्ये आलेल्या 'मृत्युदंड'ने. या चित्रपटात माधुरीची अभिनयक्षमताही दिसून आली. माधुरीचा झंझावात सुरूच राहिला तो पुढच्या वर्षी आलेल्या यश चोप्रांच्या 'दिल तो पागल है'मुळं. शाहरुख आणि करिश्मा कपूर यांच्या जोडीला असलेली माधुरी हा या चित्रपटाच्या यशाचा महत्त्वाचा 'यूएसपी' होता, यात शंकाच नव्हती. 
यशाची ही चढती कमान आणि अपरंपार यश पदरात असतानाच माधुरीनं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला तो १९९९ मध्ये लग्न करून! तेव्हा ३२ वर्षांच्या असलेल्या माधुरीनं अमेरिकेतील डॉ. श्रीराम नेने या डॉक्टरशी विवाह केला आणि भारतात एकाच वेळी लाखो हृदयं अक्षरशः विदीर्ण झाली. माधुरीनं हातातले प्रोजेक्ट पूर्ण केले आणि ती अमेरिकेला निघून गेली. मला वाटतं, अनिल कपूरसोबतचा 'पुकार' हा तिचा चित्रपट तिच्या लग्नानंतर प्रदर्शित झाला.  माधुरी बॉलिवूडमधून एखाद्या धूमकेतूसारखी निघून गेली. ती अमेरिकेत स्थायिक झाली, संसारात रमली, तिला दोन मुलं झाली या सगळ्या बातम्या तिचे चाहते उदासपणे वाचत होते, ऐकत होते. पाच वर्षं निघून गेल्यावर अचानक बातमी आली, की संजय लीला भन्साळी शाहरुखला घेऊन 'देवदास' बनवतोय आणि ऐश्वर्या पारो आणि माधुरी 'चंद्रमुखी' करतेय. ही बातमी ऐकताच माधुरीच्या चाहत्यांना अपार आनंद झाला. पुढं भन्साळीनं पडद्यावर आणलेल्या 'देवदास'बद्दल कितीही वाद-प्रवाद झाले, तरी माधुरीच्या 'चंद्रमुखी'नं सर्वांची हृदयं पुन्हा एकदा काबीज केली, यात कुणालाच संशय नव्हता. पं. बिरजू महाराजांच्या नृत्य दिग्दर्शनाखाली 'धाई शाम रोक लई' ही बंदिश स्वतः म्हणत, अफाट नृत्य करीत तिनं पडद्यावर चंद्रमुखी साक्षात उभी केली. माधुरीच्या या 'कमबॅक'नं ती अद्याप संपलेली नाही, हे सिद्ध केलं. लग्नानंतर नट्यांना कामं मिळत नाहीत, हा समजही तेव्हा हळूहळू दूर होत होता. माधुरीनं त्याचा अचूक फायदा घेतला. पण या सिनेमानंतर ती पुन्हा दीर्घ ब्रेकवर गेली. या वेळी तिच्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. त्यानंतर २००७ मध्ये ती पुन्हा 'आजा नच ले'द्वारे मोठ्या पडद्यावर आली. हा सिनेमा फार चालला नसला, तरी माधुरीच्या अजर सौंदर्याचं आणि थिरकत्या पायांचं कौतुकच झालं. माधुरीनं नंतर भारतात कायमसाठी परत येण्याचा निर्णय घेतला. अगदी दोन वर्षांपूर्वी आलेल्या 'गुलाब गँग'मध्येही तिनं तडफेनं भूमिका साकारली होती. 
माधुरीचं गुणगान गाताना इथं एक सलणारी गोष्ट सांगितलीच पाहिजे. जन्मानं मराठी असलेल्या माधुरीनं मराठी चित्रपटांत वा नाटकांत कधीच काम केलं नाही, ही मराठी रसिकांची खंत आहे. सुयोग नाट्यसंस्थेचे सुधीर भट तिला घेऊन 'लग्नाची बेडी' नाटक पुन्हा रंगमंचावर आणणार आणि माधुरी 'रश्मी' साकारणार, अशी जोरदार चर्चा कित्येक वर्षं ऐकायला येत होती. मात्र, ही कल्पना कधीच वास्तवात उतरली नाही. दुर्गा खोटे, सुलोचनापासून ते स्मिता पाटील, सोनाली कुलकर्णी, ऊर्मिला मातोंडकरपर्यंत सर्व मराठी अभिनेत्रींनी हिंदीबरोबरच मराठीतही (किंवा मराठीसोबत हिंदीतही) उत्तम कामं केली. माधुरी ही मात्र एकमेव अभिनेत्री आहे, की जिनं कधीच मराठी चित्रपट वा नाटकात काम केलं नाही. अगदी पाहुणी कलाकार म्हणून तोंडी लावण्यापुरतंही नाही! मराठी चित्रपट दिग्दर्शक-निर्माते माधुरीच्या बड्या इमेजला टरकून आहेत म्हणावं तर मराठीत अनेक बडे बडे लोक काम करताना दिसतात. माधुरीची स्वतःची कितपत इच्छा आहे, हे कळत नाही. तिची इच्छा असती, तर तिनं एव्हाना नक्कीच मराठीत काम केलं असतं. माधुरी, नाना, सचिन खेडेकर, सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी किंवा अश्विनी भावे या सर्वांना एकत्र आणून महेश मांजरेकर किंवा सचिन कुंडलकर किंवा चंद्रकांत कुलकर्णी यांसारखे बडे दिग्दर्शक एखादा सिनेमा का नाही तयार करत? असा सिनेमा भविष्यात तरी तयार व्हावा, असं वाटतं. 
अर्थात चिरतारुण्याचं वरदान लाभलेल्या या सुंदर, गोड अभिनेत्रीवरचं आमचं प्रेम कायमच राहणार आहे. ती आता पन्नाशीची होईल. यापुढंही ती तिच्या लाजवाब अदांनी आणि त्या मोहक हास्यानं आम्हाला कायम प्रसन्न ठेवील, यात अजिबात शंका नाही.
---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्य शिवार दिवाळी अंक २०१६)

4 Nov 2016

व्हेंटिलेटर रिव्ह्यू

प्रसन्न, ताजा, मोकळा श्वास...
--------------------------------
'श्वास' ते 'व्हेंटिलेटर'... मराठी चित्रपटांचा गेल्या तपातला प्रवास... एक वर्तुळ पूर्ण झालं... काय गंमत आहे पाहा... व्हेंटिलेटर ते श्वास हा खरा जगण्याकडचा प्रवास असतो. पण मराठी सिनेमा श्वास ते व्हेंटिलेटर असा प्रवास करीत 'जगण्या'कडं झेपावतोय.... असो.
फर्स्ट थिंग फर्स्ट. राजेश मापुस्कर दिग्दर्शित 'व्हेंटिलेटर' हा नवा मराठी सिनेमा आपल्याला एक प्रसन्न, ताजा, मोकळा श्वास घेतल्यासारखा निखळ आनंद देतो. खूप दिवसांनी असा स्वच्छ, सुंदर सिनेमा पाहायला मिळालाय. या सिनेमात त्रुटी नाहीतच असं नाही. पण एकूण सिनेमाचा प्रभाव हा पुष्कळच सकारात्मक आणि आनंदीपणाकडं नेणारा आहे.
माणसाच्या जन्म आणि मरणातल्या अगणित क्षणांना आपण जीवन म्हणतो. हे जीवन व्हेंटिलेटर नामक एका यंत्राला बांधलं गेलं, की त्याचा अटळ असा शेवट आला, असंच आपण समजून चालतो. एखाद्याच्या आयुष्यात हा क्षण आला, की त्याच्याशी जोडली गेलेली अगणित आयुष्यं तिथं जमा होतात. त्यांच्याही आयुष्यात मग वेगळ्या पातळ्यांवर उलथापालथी सुरू होतात. हे सगळं शेवटी मग त्या एका श्वासापाशी येऊन थांबतं. हा श्वास कधी थांबवायचा याचा निकाल घेण्याची वेळ ज्या व्यक्तीचा तो श्वास आहे तो सोडून बाकी सर्वांवर येते. इथं मग रक्ताच्या नात्यांची, प्रेमाची, जिव्हाळ्याची, रागाची, लोभाची कसोटी लागते. त्रागा करून चालत नाही. हा सगळा प्रवास अगदी जीवघेणा असतो आणि आपल्यातल्या माणूसपणाला हरघडी आव्हान देणारा असतो.
राजेश मापुस्कर या दिग्दर्शकाला हे नेमकं कळलंय. आपल्याला नक्की काय सांगायचंय याची स्पष्टता दिग्दर्शकाच्या मनात असणं फार महत्त्वाचं असतं. इथं तो प्रश्नच नाही. अर्थात सांगायचं काय हे नुसतं माहिती असून चालत नाही; तर ते नीट सांगण्याची हातोटीही लागते. इथंच दिग्दर्शकाच्या 'दिग्दर्शक' म्हणून असलेल्या कौशल्याचा कस लागतो. चंद्रकांत कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर, मृणाल कुलकर्णी किंवा सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांच्या सिनेमांत ही गोष्ट सांगण्याची, बिटवीन द लाइन्स सांगण्याची हातोटी नीट दिसते. राजेशचा हा सिनेमाही अभिमानानं त्यांच्या पंक्तीत स्थान मिळवू शकेल, इतका उजवा झालाय.
गोष्ट तशी साधीच, नेहमीचीच. मुंबईतील गजानन कामेरकर हे गृहस्थ अचानक चक्कर येऊन पडलेयत आणि एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती झाले आहेत. तिथं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलंय आणि प्रकृती गंभीर आहे. अशा वेळी त्यांचे सगळे नातेवाइक तिथं गोळा होतात. कामेरकरांचा मुलगा प्रसन्न (जितेंद्र जोशी) राजकारणात काही तरी धडपड करतोय, पुतण्या राजा (आशुतोष गोवारीकर) प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. इतर काही नातेवाइक श्रीवर्धनवरून यायला निघाले आहेत. प्रत्येकाची काही ना काही तऱ्हा आहे. प्रत्येकाची काही ना काही व्यथा आहे. प्रत्येकाचं काही तरी सांगणं आहे आणि ते सांगण्याची असोशीही आहे.
राजेश मापुस्करचं कौतुक यासाठी, की पात्रांची भाऊगर्दी असूनही त्यानं जवळपास प्रत्येक पात्राला न्याय दिलाय. प्रत्येक पात्र नीट उभं केलंय. त्यांना काही तरी व्यक्तिमत्त्व दिलंय. त्यामुळं लांबीनं अगदी छोटी भूमिका असलेले यातले कलाकारही लक्षात राहतात. कथेतल्या पात्रांचं हे असं नीट मॅपिंग करणं भल्याभल्यांना जमत नाही. फार चांगल्या सिनेेमांतच असं पाहायला मिळतं. राजेशनं पटकथेवर भरपूर काम केल्याचं आणि प्रत्येक दृश्याची नीट सांगड घातल्याचं जाणवतं. त्यामुळं इथं आपल्याला प्रत्येक माणसागणीक एक वेगळा नमुना भेटतो. या नातेवाइकांतील काहींची मांडणी थोडीशी अर्कचित्रात्मक आहे. विशेषतः गावाकडच्या सगळ्या पात्रांना जाणूनबुजून हा बाज देण्यात आला आहे. आणि हे नीट जाणवतं. पण तरीही खटकत नाही. गावाकडची मंडळी मुंबईला यायला निघतात तेव्हाचा सर्वच सिक्वेन्स धमाल जमला आहे. विशेषतः ते वयस्कर आजोबा आणि त्यांच्या लघुशंकेच्या सवयीवर दीर्घ हशे मिळविण्यात आले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सर्व आता इथं विनोदनिर्मिती करायचीच अशा अहमहमिकेनं केलेलं नाही. ते अगदी स्वाभाविक आणि कथेच्या ओघात आपल्यासमोर येतं. हा बॅलन्स साधणं हे ताकदीच्या दिग्दर्शकाचं काम आहे. राजेशच्या कलाकृतीत ते पूर्णपणे दिसून आलंय. इथं आपले एकसे एक मराठी कलाकारही त्याच्या मदतीला आले आहेत, यात शंका नाही. विशेष उल्लेख करावासा वाटतो, तो सुलभा आर्य, उषा नाडकर्णी, सुकन्या कुलकर्णी-मोने, नम्रता आवटे यांचा. या सर्व अभिनेत्रींनी अगदी थोड्याशा अवकाशातही अभिनयाचा जो वस्तुपाठ समोर ठेवलाय ना, त्याला तोड नाही. शिवाय निखिल रत्नपारखी, विजू खोटे, अभिजित चव्हाण, शशांक शेंडे, नीलेश दिवेकर, भूषण तेलंग, विजय निकम, मनमित पेम या सर्वांनीच दमदार काम केलंय. विशेषतः अश्विनची भूमिका करणाऱ्या संजीव शहांचं काम मला आवडलं. सतीश आळेकरांनी साकारलेले भाऊ पाहण्यासारखे. बमन इराणीची पाहुणा कलाकार म्हणून उपस्थिती आनंददायक! आशुतोष गोवारीकर बऱ्याच दिवसांनी पडद्यावर दर्शन देत असला, तरी त्याचा वावर सहज आहे. मात्र, लोकप्रिय दिग्दर्शकाची भूमिका त्याच्यासाठीच खास तयार केलीय की काय, असं वाटतं. कारण या सर्व खानदानात तोच फक्त वेगळा आहे. अर्थात सिनेमॅटिक लिबर्टी आहेच. या सर्वांत महत्त्वाचा उल्लेख करावासा वाटतो तो जितेंद्र जोशीचा. जितेंद्र हा ताकदीचा अभिनेता आहे, यात शंकाच नाही. या चित्रपटात त्यानं साकारलेला 'प्रसन्न' बघण्यासारखा आहे. या व्यक्तिरेखेचे सर्व कंगोरे अगदी सूक्ष्मपणे त्यानं पकडले आहेत. वडिलांशी कधीही पटलेलं नाही, त्यांनी कायमच आपला राग राग केला या भावनेपासून ते शेवटच्या धक्क्यापर्यंत जितेंद्रनं त्याच्या पात्राचा ग्राफ कसा वरवर नेला आहे, हे प्रत्यक्ष पाहायलाच हवं.
चित्रपटाचं बहुतांश चित्रिकरण हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे. ते खूप तपशीलवार आणि हळवं आहे. पार्श्वसंगीताचा वापर परिणामकारक आहे. गणपतीच्या दिवसांतलं वातावरण सुरुवातीच्या शीर्षकांच्या वेळी सुंदर टिपलंय.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच एका दृश्यात प्रियांका (चोप्रा) येते आणि बाप व मुलं यांच्या नात्यावर टिप्पणी करते. हे थोडंसं हेतुतः केल्यासारखं असल्याचं जाणवतं. पण फार खटकत नाही. प्रियांकानं म्हटलेलं प्रमोशनल गाणं एंड स्क्रोलला येतं की काय, असं वाटत होतं. पण सुदैवानं तसं काही नाही.
एकूणच बाप आणि मुलं यांच्या नात्यावर हलकीफुलकी टिप्पणी करणारा, हसत-खेळत मनोरंजन करणारा हा सिनेमा पाहायलाच हवा.
---
दर्जा - चार स्टार
---

16 Oct 2016

दिवाळी लेख

दिवाळी... 
------------
दिवाळी आल्याचं निसर्गाला बरोबर कसं काय कळतं? कसा हलकेच हवेत गारवा येतो? चोरपावलांनी हळूच मागे येऊन डोळे झाकत मिठी घालणाऱ्या सखीसारखी थंडी बरोबर पहाटे कशी आपल्या दुलईत शिरते? दसऱ्याच्या आधी नदीवर धुऊन वाळवलेल्या गोधडीसारखी सगळी झाडं-पानं-फुलं एकदम अशी सुस्नात आणि हिरवी-स्वच्छ कशी काय दिसायला लागतात? निसर्गात आधी दिवाळी येते आणि मग ती हळूच आपल्या तना-मनांत उतरते, हे खरं. आपले सगळे सण-समारंभ असेच निसर्गाशी जैव नातं जोडून आहेत. म्हणूनच तर चार महिने दंगा घालणारा पाऊस हलके हलके एक्झिट घेतो आणि मग सगळा भवताल हळुवारपणे थंडीच्या आधीन होतो. या वातावरणातल्या बदलाची पण मजा असते. एखादी मैफल रंगत रंगत जावी, तसा तो आस्ते आस्ते आपल्यात भिनतो. एकदा या बदलाची चाहूल लागली, की मग घरही हसू लागतं. दसऱ्यानिमित्त घरातली जळमटं निघालेलीच असतात. कोपरा न् कोपरा लख्ख उजळलेला असतो. पंख्यावरची, कपाटांवरची धूळ झटकलेली असते. पाऊस संपून गेल्यावर जशी वातावरणातील धूळ खाली बसते आणि अगदी दूरवरचा आसमंतही व्यवस्थित न्याहाळता येतो, तसं घरातला प्रत्येक इंच न् इंच स्वच्छ आणि सुंदर दिसायला लागतो. दसऱ्यानिमित्त दारावर, गॅलरीत लावलेले हार आणि तिथल्या झेंडूचा दरवळ कायम असतो. हार सुकले तरी लवकर काढावेसे वाटत नाहीत. उत्सवी वातावरण असं सगळीकडं भरून राहिलेलं असतं. तेच मग अलवारपणे मनातही उतरतं. मेंदूत कसल्याशा अचाट संदेशांची देवाणघेवाण सुरू होते... मनातली दिवाळी सुरू होते ती तिथंच...
एकदा का मन सज्ज झालं, की मग सणही रंगू लागतो... आपण माणसं मूलतः सामाजिक प्राणी असल्यानं आपल्याला कळपात, घोळक्यात राहायला आवडतं. आपले सण-उत्सवही असेच गर्दीच्या साक्षीनं रंगतात. मग मनातल्या उत्सवाला भौतिक सुखांचं मखर हवंसं वाटू लागतं. दिवाळीनिमित्त बाजार फुललेलाच असतो. मग ही सुखाची साधनं दिमाखात घरात येतात. कधी जुनी जातात अन् नवी येतात... कधी एकदम नवीनच येतात... त्यांच्या अस्तित्वानं घराचा गाभारा भरायला लागतो. प्रसन्नतेचा अनाहत नाद मग ऐकू येऊ लागतो. काही तरी सुखद भावना रोमरोमांतून फुलून येते. सगळं जग कसं सुंदर आहे, असं वाटायला लागतं. मनातले सगळे विकार काही काळापुरते का होईना, कुलूपबंद होतात. अष्टसात्त्विक भाव प्रकटतात. चेहरा सौम्य होतो, वक्ररेषा हसऱ्या होतात... शरीर असा प्रतिसाद देऊ लागतं आणि मग या मोठ्या सणाची जाणीव जागृत होते... 
हे सगळं पाहिलं, की दिवाळीला सर्व सणांची महाराणी का म्हणत असतील, ते लक्षात येतं. चांगला आठवडाभर चालणारा सण. प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्व. आणि वर्षानुवर्षं दिवाळीची प्रतीकंही ठरलेली... तीपण किती अर्थपूर्ण! घरासमोर टांगलेला आकाशकंदील, पणत्यांची रांग, फुलबाज्या, भुईनळे, भुईचक्रं ही सगळी उजेडाची प्रतीकं! आसमंताबरोबरच मनातला काळोखही मिटवून टाकणारी; जगायला सदैव बळ देणारी, आशादायक अशी! तो तीनदा हातातून निसटून खाली पडणारा मोती साबण म्हणजे स्वच्छतेचं प्रतीक... तनाप्रमाणंच त्याला आपलं मनही स्वच्छ करता आलं असतं तर, असं कित्येकदा वाटून जातं. सुवासिक उटणं म्हणजे या दिवसांतल्या निरामय आरोग्याचं प्रतीक! पत्नीसाठी पाडवा, तर बहिणीसाठी भाऊबीज... कुटुंबाच्या समृद्धीसाठी लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशी... सर्व कुटुंबाच्या एकोप्याचा जणू संदेश देणारी वसुबारस... दिवाळीतला प्रत्येक दिवस असा आपापला अर्थ आणि सांगावा घेऊन येत असतो. त्यांचा अर्थ आपण नीट समजून घेतला तर दिवाळीचा झगमगाट आणखी वाढलाच म्हणून समजा. दिवाळी आपल्या सोबत अनेक प्रकारचे आनंद घेऊन येते. दिवाळीचा फराळ हा त्यातला एक जिव्हातृप्ती करणारा आनंद! कितीही नाही असं ठरवलं तरी ज्याचा मनमुराद आस्वाद घेतल्याशिवाय समाधान वाटत नाही, असं हे खाणं! यासोबतच खास आपल्या प्रांतात मिळणारा दिवाळीचा आनंद म्हणजे दिवाळी अंक. हे आपलं खास वैशिष्ट्य. चकल्या आणि चिवड्याचे बकाणे भरत भरत दिवाळी अंकातल्या साहित्याचा आनंद लुटणं हे आपल्यासाठी परमसुखाचं निधान! एकही दिवाळी अंक कधी घेतला नाही, असं मराठी घर असेल असं वाटत नाही. आपल्या जगण्याचा अविभाज्य भागच झालाय आता तो...
पूर्वी दिवाळीनिमित्त नातेवाइक एकमेकांकडे जायचे... दुसऱ्या गावाला जाता यायचं. आता हे प्रमाण निदान शहरांत तरी कमी झालंय. त्याऐवजी लोक आता पर्यटनस्थळी दिवाळी साजरी करतात. शहरातल्या गजबजाटापासून, कोलाहलापासून दूर जावंसं वाटणं आणि निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावरच 'दिवाळी' वाटणं, हेही स्वाभाविकच आहे. विशेषतः आर्थिक संपन्नता आल्यानंतर सणाचे आणि एकूणच सेलिब्रेशनचे निकष बदलतात, हे खरं. पूर्वी बारा महिने गोडधोड खायला मिळायची सोय नव्हती, ऐपतही नव्हती. म्हणून दिवाळीत मिळणाऱ्या गोडाधोडाचं अप्रूप असे. तीच गोष्ट कपड्यांची किंवा अन्य खरेदीची! आता बारा महिने शॉपिंग सुरूच असतं आणि गोड-धोडाचं तर बोलूच नका. आपण पूर्वी निदान काही तरी निमित्त काढून सेलिब्रेशन करायचो. आता निमित्ताचीही गरज उरली नाही. याचं कारण आपली वाढलेली व्यवधानं आणि त्याच्या व्यस्त प्रमाणात मिळणारा मोकळा वेळ. त्यामुळं जेव्हा कामातून सुट्टी मिळेल किंवा रजा मिळेल तीच आपली दिवाळी आणि तोच आपला दसरा असतो. किंबहुना आता शहरांत तरी हीच मानसिकता वाढू पाहतेय. आणि त्यात गैर काही नाही. असं असलं, तरी दिवाळीचा माहौल हे सगळं विसरायला लावतो आणि दिवाळीचं म्हणून खास असं वेगळं सेलिब्रेशन आपण करतोच करतो... 
 याचं कारण दिवाळीचं स्वरूप बदललं असेलही; पण तिचा अंतरात्मा तोच आहे. तिचं सांगणं तेच आहे. दिवाळी बदलत चाललीय असं, मला वाटतं, गेल्या शंभर वर्षांपासून लोक बोलत असतील. पण दर वेळा तो आकाशकंदील आणून घरासमोर आपल्या आनंदाची जणू प्रकाशमय गुढी उभारण्याची ती ऊर्मी कायमच असते. हा सण प्रकाशाचा आहे, त्यामुळं अखंड ऊर्जादायी आहे. वर्षभरात आपल्या मनात साठलेलं नैराश्य, मळभ दूर करून नव्या उत्साहानं जगण्याला सामोरं जाण्याची प्रेरणा हा सण देतो. दिवाळीच्या वेळी घराबाहेर, उंबऱ्याच्या कोपऱ्यात शांतपणे तेवत असलेली पणती जणू काही आपलंच इंधन बनते. तिचा तो इवलासा प्रकाशही आपल्याला आतून उजळवून टाकतो. आपल्या देशातला एकही भाग किंवा कोपरा असा नसेल, की तिथं दिवाळी साजरी होत नाही. सगळ्या देशवासीयांना उल्हसित करणारा हा भलताच ऊबदार सण आहे. दिवाळी आवडते, ती या अशा कारणांसाठी... निसर्गही तिच्या स्वागतासाठी कसा तयार होऊन उभा असतो. आपल्या चिमुकल्या जगण्याला प्रकाशाचा अर्थ देणारा हा सण आणि आपल्याला भौतिक सुखांच्या मखरातून काढून सृष्टीच्या कुशीत जोजवू पाहणारा निसर्ग... दोघेही भव्य आणि उदात्त! दोघांचंही सांगणं तसंच - जगणं समृद्ध करणारं! निसर्गापासून दूर जाऊ नका आणि आतला विवेकाचा प्रकाश सदैव प्रज्वलित राहू द्या, एवढ्या दोन गोष्टी कधीच विसरायच्या नाहीत. मग आयुष्यभर दिवाळीच दिवाळी! 
---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे; संवाद पुरवणी; १६ ऑक्टोबर २०१६) 
----

11 Oct 2016

अमिताभ @ ७५

मोठा ‘माणूस’ 
----------------



अमिताभ बच्चनच्या वागण्या-बोलण्यात, वावरण्यात एक खानदानी आदब दिसते. अलाहाबादच्या श्रीवास्तवांचे संस्कार लख्ख दिसतात. पिता थोर कवी आणि साहित्यिक असल्याचा सर्वाधिक परिणाम अमिताभच्या व्यक्तिमत्त्वावर झालेला स्पष्ट कळून येतो. अमिताभ अभिनेता म्हणून किती श्रेष्ठ आहे किंवा महान आहे, यावर कदाचित एक वेळ चर्चा होऊ शकेल. मात्र, तो एक उत्तम ‘माणूस’ आहे, याबद्दल दुमत होण्याची शक्यता नाही. आजच्या काळात हे माणूसपण दिवसेंदिवस दुर्मीळ होत चाललेलं असताना अमिताभसारख्या बुजुर्ग कलाकाराचं आपल्या आसपास असणं हे किती सुखावह आणि आश्वासक आहे!
अमिताभच्या तरुणपणी जेव्हा तो ‘अँग्री यंग मॅन’ साकारत होता, तेव्हा त्याला प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं नाही. आम्ही कळत्या वयाचे झालो, तेव्हा अमिताभच्या कारकि‍र्दीचा पूर्वार्ध संपून गेला होता. त्याचं पडद्यापलीकडचं अस्तित्व तेव्हा फार काही जाणवायचं नाही. त्या काळात माध्यमेही मर्यादित होती. शिवाय अमिताभ तेव्हा काही फार मीडिया-फ्रेंडली नव्हता, म्हणे. ते काही असो... अमिताभमधलं हे सुसंस्कृत माणूसपण भावलं ते त्याच्या उतारवयात! दुसऱ्या इनिंगमध्ये म्हणजे साधारणतः ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये अमिताभला आपण पाहिलं, तेव्हा मात्र त्याच्यातला हा गुणविशेष सर्वांच्याच प्रकर्षानं लक्षात आला. एक तर तेव्हा तो जवळपास ५६-५७ वर्षांचा झाला होता. या वयात येणारी एक गोड परिपक्वता त्याच्या अंगात ठायी ठायी भिनली होती. या कार्यक्रमातला त्याचा वावर बघण्यासारखा होता. अमिताभ तेव्हा ऑलरेडी ‘महानायक’ पदाला पोचला होता. सामान्य लोकांना थेट त्याच्याशी संवाद साधण्याची मिळालेली संधी आणि स्वतःच्या प्रतिमेची जाणीव असूनही अमिताभचं त्या सर्वसामान्य लोकांशी वागणं खूप सहज होतं. अमिताभच्या वागण्या-बोलण्यातली नम्रता, आदब कमालीची मोहवणारी होती. थोडं यश मिळालं, की माणसं बहकल्यासारखी वागतात. डोक्यात हवा गेल्यासारखी उडायला लागतात. अमिताभसारखं उत्तुंग यश तर फारच थोड्यांना मिळतं. या पार्श्वभूमीवर त्याचं हे सार्वजनिक कार्यक्रमातलं वागणं खूपच आपुलकीचं आणि संस्कारशील होतं. कुणी म्हणेल, अशा कार्यक्रमांत मोठे लोक मुद्दाम तसे वागतात-बोलतात. हे काही अंशी खरंही आहे. मात्र, अमिताभच्या वागण्यात-बोलण्यात कुठेही हा बेतीवपणा दिसला नाही. तो सुसंस्कृतपणा त्याच्या रक्तातच होता; असला पाहिजे. सर्वसामान्य लोकांशी, विशेषतः महिलांशी बोलताना, त्यांना त्या खुर्चीवर बसवताना, त्यांच्याशी हास्य-विनोद करताना अमिताभ कुठंही अभिनय करत होता वा त्याचा हा सगळा बेतीव सभ्यपणा होता, असं कुठंही वाटलं नाही. किंबहुना अशा कार्यक्रमात यजमानानं कसं वागावं-बोलावं याचा वस्तुपाठच त्यानं घालून दिला. अमिताभच्या या आदबशीर वागण्यानं घरातल्या एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीविषयी वाटतो तसा आदर त्याच्याविषयी सर्वांना वाटू लागला हे निश्चित. 
अमिताभच्या आयुष्याकडं नीट पाहिलं, तर लक्षात येतं, की एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याप्रमाणेच त्याच्याही आयुष्यात अनेक चढ-उतार आले. सुख-दुःखाचे प्रसंग आले, आशा-निराशेचे क्षण आले. अमिताभचं कुटुंब म्हणजे अलाहाबादमधलं एक प्रतिष्ठित कुटुंब. वडिलांची कीर्ती केवळ त्या शहरातच नव्हे, तर देशभरात पसरलेली. शिवाय इंदिरा गांधी आणि एकूणच नेहरू-गांधी घराण्याशी अत्यंत जवळचे संबंध. राजीव गांधी आणि अमिताभ हे बालमित्र. अशा वेळी अमिताभचं आयुष्य सर्वसामान्यांसारखं असणार नव्हतं, हे उघडच होतं. पण एका वेगळ्या पातळीवर अमिताभलाही संघर्ष टळला नाहीच. त्याचं आयुष्य यशापयशाच्या रोलरकोस्टर राइडसारखं भासतं. त्याला सुरुवातीला रेडिओवर मिळालेला नकार, नंतर लंबूटांगा नट म्हणून होणारी हेटाळणी, मग एकदम मोठं यश, सुपरस्टारची बिरुदावली, मग प्रेमाचा त्रिकोण, नंतर अचानक झालेला जीवघेणा अपघात, नंतर राजकारणात प्रवेश, तिथली अपयशी खेळी, मग पुन्हा खासदारकीचा राजीनामा, नंतर चित्रपटसृष्टीत पुनरागमन, चुकीच्या चित्रपटांची निवड, मग पुन्हा काही चित्रपटांना यश, मग दीर्घकाळ विश्रांती, मग कंपनीची दिवाळखोरी, मग पुन्हा त्यातून सावरण्यासाठी राजकीय मित्रांची मदत, नंतर पुन्हा सेकंड इनिंग, ‘कौन बनेगा करोडपती’चं तुफान यश आणि त्यात एक से बढकर एक चांगल्या भूमिका साकारण्याची संधी...
अमिताभच्या या सर्व प्रवासात सर्वसामान्यांना आपल्याही आयुष्याशी असलेलं साम्य जाणवतं. अमिताभकडं असलेलं वलय आणि पैसा यांची तुलना सामान्यांशी होत नसली तरी हे साम्य त्यांना जाणवतं, हे विशेष! याचं कारण अमिताभनं स्वतः कधी आपल्या या स्थानाचा आणि वलयाचा सामान्यांसमोर गवगवा केलेला नाही आणि हेच त्याच्या ‘मोठा माणूस’ असण्याचं गमक आहे.
---

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती : ११ ऑक्टोबर २०१६*)

(* अमिताभच्या पंचाहत्तराव्या वर्षातील पदार्पणानिमित्त केलेल्या विशेष पानातील लेख.)
---

6 Oct 2016

ओम पुरीवरचा लेख

ओम, पुरे!
---------
राजकारण, सिनेमा आणि क्रिकेट या तीन विषयांवर बोलायला भारतात कुणालाही तज्ज्ञ असायची गरज असत नाही; कारण सगळेच जण या तीन विषयांत ‘तज्ज्ञ’ असतात, असं नेहमी गमतीनं बोललं जातं. भारतीयांचं या तिन्ही विषयांविषयीचं अतिरेकी प्रेम आणि नको तेवढा उत्साह लक्षात घेता, ते सार्थही आहे. पण कधी कधी मात्र अति होतं आणि सर्वत्र संतापाची लाट पसरते. सध्या पाकिस्तानबरोबर आपला देश एका गंभीर तणावातून जात आहे. अशा वातावरणात देशवासीयांकडून मर्यादशील वक्तव्यांची अपेक्षा करणं गैर नाही. पण तसं झालं तर अजून काय पाहिजे? सध्या ओम पुरीपासून ते सलमान खानपर्यंत सगळे सिनेमा कलाकार जे काही बडबडत सुटले आहेत, ते पाहता ‘ओम, पुरे!’ असंच म्हणायची वेळ आली आहे, हे निश्चित.
कलाकारांना, त्यातही हिंदी सिनेमांत काम करणाऱ्या कलाकारांना आपल्या देशात एक विशेष ‘स्टेटस’ आहे. म्हणजे सरकारनं किंवा लोकांनी त्यांना हे ‘स्टेटस’ दिलंय असं नाही; तर त्या लोकांनीच स्वतःला ते बहाल केलंय. त्यांना असं वाटतं, की ते सुपरस्टार किंवा लोकप्रिय कलाकार आहेत, त्यामुळं त्यांना या देशात प्रत्येक गोष्टीत मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. नुसता अधिकार आहे असं नाही; तर लोकांनी ते ऐकलं पाहिजे. याचं कारण त्यांना जवळपास प्रत्येक गोष्टीतलं सगळं काही कळतं.
ओम पुरी हे हिंदी चित्रपटसृष्टीतले नामांकित कलाकार. कलात्मक आणि समांतर सिनेमांमधला एक महत्त्वाचा चेहरा. आपल्याकडे नॉर्मल कलाकारांपेक्षा समांतर कलाकारांना आणखीनच एक अतिविशेष ‘स्टेटस’ आहे. आपल्या देशात कलात्मक आणि समांतर सिनेमांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या कलाकारांचं योगदान निश्चितच श्रेष्ठ दर्जाचं आहे, यात वाद नाही. पण असं केल्यानंतर आपल्याला जगातल्या प्रत्येक घटनेवर भाष्य करण्याचा जन्मसिद्ध अधिकार मिळतो, असा समज त्यांच्यात कुठून वाढीस लागतो, हे अनाकलनीय आहे. ओम पुरीही त्याला अपवाद नाहीत. म्हणूनच परवा ते दूरचित्रवाणीवरील चर्चेत बरळले. हो, ते जे काही बोलले त्याला आणि त्यांच्या त्या अवस्थेतील बडबडीला आपल्याकडे ‘बरळणे’ हाच एक चपखल शब्द आहे. सध्याच्या तणावाच्या स्थितीत पाकिस्तानच्या कलाकारांनी भारताविरुद्ध सुरू असलेल्या दहशतवादाचा किमान निषेध तरी करायला पाहिजे की नको, असा साधा प्रश्न होता. त्यावर ओम पुरी यांनी अद्वातद्वा प्रत्युत्तरं तर दिलीच; पण कहर म्हणजे ‘त्या जवानांना कुणी आर्मी जॉइन करायला सांगितली होती?’ असं अत्यंत बेमुर्वत व अश्लाघ्य वक्तव्य करून सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. ओम पुरी हे वक्तव्य करताना नक्कीच मद्याच्या अमलाखाली असावेत, असा संशय घ्यायला जागा आहे. त्यामुळं त्या या बेताल वक्तव्याकडं दुर्लक्ष करायला हवं, असं कुणी म्हणेल. पण तसं असतं तर ओम पुरी यांनी कदाचित दुसऱ्या दिवशी माफी मागितली असती वा दिलगिरी व्यक्त केली असती. तशी त्यांनी ती दुसऱ्या दिवशी मागितलीही; पण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या एका वाहिनीवर बोलताना त्यांच्यातला उर्मटपणा कायमच राहिला. याही वेळी ते मद्यप्राशन करूनच बोलत असावेत, असं वाटण्याजोगी परिस्थिती दिसत होती. एके काळी उत्तमोत्तम भूमिका करून देशभरातल्या रसिकांची वाहव्वा मिळवणाऱ्या या कलाकाराची अवस्था बघवत नव्हती. त्यांना स्वतःचं एक वाक्यही नीट बोलता येत नव्हतं की त्याचं समर्थन नीट करता येत नव्हतं. ‘मला आर्मीच्या कोर्टात न्या; मला फाशी द्या,’ असं काय वाट्टेल ती बडबड ते करीत होते. एका मोठ्या कलाकाराचं हे जाहीर अधःपतन अक्षरशः केविलवाणं आणि त्यांच्यासाठी लाजीरवाणं होतं. कलाकाराला त्यांची प्रतिमा बनवायला आयुष्य खर्च करावं लागतं, पण तीच प्रतिमा नष्ट होण्यास केवळ एक मिनिटही पुरेसं ठरतं, असं जे म्हणतात त्याचा शब्दशः प्रत्यय आला.
ओम पुरी काय किंवा सलमान खान काय, किंवा पाकिस्तानचा वा तिथल्या कलाकारांचा अष्टौप्रहर पुळका येणारे महेश भट किंवा शाहरुख खानसारखे लोक काय... हे नक्की कुठल्या जगात वावरतात, असा प्रश्न पडतो. सामान्य माणसाशी, त्यांच्या भावभावनांशी यांचा कुठलाही कनेक्ट राहिलेला नाही, हे वारंवार दिसून येतं. हस्तिदंती मनोऱ्यात राहून, स्वप्रतिमेशी अखंड प्रेमालाप करणारे हे सगळे तकलादू लोक... यांना सामान्य माणसाच्या सुख-दुःखाशी काय घेणं-देणं आहे? वास्तविक ओम पुरी हा कलाकार असा नाही. त्यांनी अनेक समांतर वा कलात्मक सिनेमांत सामान्य माणसांचीच कथा आणि व्यथा मांडली आहे. ‘अर्धसत्य’पासून ‘धूप’पर्यंत अनेक उदाहरणं सांगता येतील. मग असं असताना त्यांच्या प्रत्यक्ष जगण्यात या पडद्यावरच्या संवेदनशीलतेचा थोडा तरी अंश का येऊ नये? याचं कारण कदाचित सामान्य माणसाच्या देशप्रेमात कुठलाही व्यवहार दडलेला नसतो आणि या कलाकारांची प्रत्येक कृती त्यांचं व्यावहारिक यश आणि प्रतिमा यांचा सौदा केल्याशिवाय घडतच नाही, यात असावं. प्रत्येकाचे कुठे ना कुठे ‘स्टेक्स’ वा हितसंबंध गुंतलेले असतात. असं असेल तर यांनी किमान गप्प बसून तरी हे हितसंबंध सांभाळत बसावं. तर तसंही नाही. ‘आपणच कसे शहाणे आणि तुम्ही सगळे गाढव’ हे सांगण्याची यांची अहमहमिका लागलेली असते. मग स्वतःच्या बेताल आणि खोट्या वक्तव्यांची समर्थनं करण्यासाठी यांना कलास्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य असल्या बेगडी भावनांचा आधार घ्यावा लागतो.
कलाकारांचं स्वातंत्र्य किंवा लोकशाहीनं दिलेलं भाषण स्वातंत्र्य आहेच ना! ते सगळेच जण मान्य करतात. पण लोकशाहीनं दिलेले हे सर्व हक्क नेहमी ‘कंडिशण्ड’ असतात. याला सदैव अटी व शर्ती लागू असतात. या अटी व शर्ती अर्थातच लोकशाहीपूरक खुल्या वातावरणाच्या आणि सर्वांना समान न्यायाच्या असतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातले सध्याचे अत्यंत तणावाचे संबंध लक्षात घेता, इथं सर्वसामान्य वातावरणातले एरवीचे नियम लागू होत नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे. इथं आपला देश आणि त्याचे हितसंबंध हेच सर्वोच्च प्राधान्याचे असले पाहिजेत; तुमचे भाषण स्वातंत्र्य वगैरे नंतर! 
 ओम पुरी आणि सलमान यांना एकाच मापात मोजायचं एरवी कारण नाही. पण पाकिस्तानसारख्या संवेदनशील विषयावर बोलून आणि पाकिस्तानी कलाकारांविषयी अकारण सहानुभूती दाखवून ओम पुरींनी इथल्या नागरिकांची मनं दुखावली आहेत यात शंका नाही. हे लोक असं बोलू धजतात, याचं कारण आपल्याकडे आपल्या या अशा उथळ आणि सवंग विधानांचीही तळी उचलणारे कुणी ना कुणी भगत भेटतील याची त्यांना असलेली खात्री! या देशात असा एक कथित मानवतावादी, डावीकडं झुकलेला, इंटुक कंपू आहेच आहे आणि तो अशा वेळी अहमहमिकेनं पाकिस्तानच्या बाजूला उभा राहतो हे कित्येकदा बघण्यात आलेलं आहे. या सर्वांना फक्त आठच दिवस सियाचिनच्या युद्धभूमीवर लढायलाही नको; नुसतं राहायला पाठवा... मग किती पाकप्रेम शिल्लक उरतंय हेच आम्हाला बघायचं आहे. मुळात काय आहे, हे लोक इकडं मुंबईत आपल्या वातानुकूलित घरांमध्ये, ऐश्वर्यात लोळत असतात (आणि हा पैसाही इथल्या जनतेनंच यांचे सिनेमे डोक्यावर घेऊन यांच्या खिशात ओतलेला असतो) आणि त्यांना सीमेवर आपले जवान तुमच्यासाठी काय हाल सोसत उभे आहेत, याची काडीमात्रही कल्पना नसते. त्यामुळेच त्यांच्या तोंडून अशी भाषा निघू शकते.
यावर या मंडळींचे सिनेमे बहिष्कृत करा, वगैरे टूम निघेल. पण त्यालाही काही अर्थ नाही. याचं कारण मूळ मानसिकतेत आहे. ती जोवर हे लोक बदलत नाहीत, तोवर काहीच बदलणार नाही.
एके काळी हिंदी सिनेमांतल्या कलाकारांच्या समाजभानाविषयी आदरानं बोललं जायचं. बलराज सहानी, सुनील दत्त यांच्यापासून ते अलीकडच्या नाना पाटेकर व मकरंद अनासपुरेपर्यंत अनेक कलाकारांनी हे समाजभान जपलं आहे आणि इथल्या रसिकांनीही त्यांना कायमच पाठिंबा दिलाय. ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले कित्येक वर्षं लष्करासाठी (माझ्या माहितीनुसार) किमान एक लाख रुपये दर वर्षी स्वउत्पन्नातील देत असत. त्याचा गवगवाही ते अजिबात करत नसत. चंद्रकांत गोखलेंची हीच परंपरा त्यांचे चिरंजीव विक्रम गोखले यांनीही पुढं चालविली आहे, असं कळतं. या दोन्ही कलाकारांची सैन्याप्रतीची ही सक्रिय आदरभावना आपल्याला त्यांच्यासमोर नतमस्तक करणारी आहे. ओम पुरींसारख्या ज्येष्ठ कलाकाराकडूनही तशीच अपेक्षा होती. मात्र, त्यांनी ती पार धुळीला मिळविली. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो! तो सोकावू नये यासाठी भविष्यात असा वेडेपणा आणि बेताल बडबड कुणी कलाकारानं करू नये, एवढीच इच्छा आपण व्यक्त करू शकतो. तोपर्यंत ‘ओम, पुरे!’ 
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; ६ ऑक्टोबर २०१६)

2 Oct 2016

एम. एस. धोनी - ॲन अनटोल्ड स्टोरी

प्रेरणादायी, पण अपुरा...
----------------------------------------------------

'एम. एस. धोनी - ॲ
न अनटोल्ड स्टोरी' आज बघितला. मला आवडला. म्हणजे एकदा बघण्यासारखा नक्की आहे. सुशांतसिंह राजपूतनं धोनीचं काम मस्तच केलंय. तो संपूर्ण सिनेमाभर धोनीच वाटतो, हे त्याचं यश आहे. रांचीसारख्या छोट्या गावातून येऊन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि त्यातही सर्वाधिक यशस्वी कर्णधार हा धोनीचा प्रवास खूपच प्रेरणादायक आहे. नीरज पांडेसारखा दिग्दर्शक असल्यानं हा प्रवास रोचक पद्धतीनं पाहायला मिळेल, अशा अपेक्षेनं आपण सिनेमा पाहायला सुरुवात करतो. सिनेमा खूपच मोठा आहे. तीन तास दहा मिनिटांचा... त्यामानाने त्यात नाट्यमयता कमी आहे. पूर्वार्धात धोनीचं पूर्वायुष्य आलं आहे. (जी खरंच आपल्याला माहिती नसलेली, म्हणजेच अनटोल्ड स्टोरी आहे..) ही सगळी गोष्ट एकरेषीय पद्धतीनं साकारते. पण त्यात आपल्याला माहिती नसलेल्या अनेक गोष्टी असल्यानं त्यातील रंजकता टिकून राहते. धोनी शाळेत असतानाचं त्याचं फुटबॉलप्रेम, क्रिकेटकडे अपघातानं वळणं इथपासून ते खरगपूर स्टेशनवर टीसी म्हणून त्यानं केलेली नोकरी हा सगळा भाग पूर्वार्धात चांगला जमला आहे. विशेषतः धोनी हा 'यारों का यार' आहे आणि त्याचे सर्व मित्र आणि त्यांनी धोनीच्या उत्कर्षासाठी केलेला आटापिटा हा सर्वच भाग खूपच सुंदररीत्या समोर येतो. विशेषतः धोनीला कलकत्ता विमानतळावर रात्रीतून जीप करून सोडायला जाणारे मित्र आणि त्यांची तगमग डोळ्यांत पाणी आणते. हेलिकॉप्टर शॉट धोनी एका मित्राकडून अचानक कसा शिकतो, हेही रंजक आहे. धोनीचे शालेय व नंतर प्रथम दर्जा सामने यात सविस्तर दाखवले आहेत आणि ते सगळे तपशिलाची गरज भागवणारे आणि धोनीच्या करिअरची पायाभरणी कशी झाली, हे नीट दाखवणारे झाले आहेत.
उत्तरार्ध धोनीच्या सगळी क्रिकेट करिअरची चढती भाजणी मांडणारा आहे. हा भाग बऱ्यापैकी निराश करतो. धोनीसारख्या छोट्या गावातून आलेला तरुण भारतीय संघात तेव्हा असलेल्या दिग्गजांशी कसा वागतो, कसा बोलतो, संघ उभारणी कशी करतो, त्याच्याविरुद्ध सुरू असलेल्या राजकारणाचा मुकाबला कसा करतो, तो स्वतः इतरांविरुद्ध कसं राजकारण करतो, त्याच्या बाजूनं कोण असतं, विरोधात कोण असतं, हे सगळं यात आपल्याला पाहायला मिळेल, असं वाटतं. पण तसं ते काहीच होत नाही. कारण आपल्याकडं बायोपिक काढण्यासाठी वास्तवाचा कठोर सामना करण्याचं धैर्य ना त्या कथानायकाकडं असतं, ना दिग्दर्शकाकडं! बीसीसीआयचा यातला उल्लेख तर एवढा गुडीगुडी आहे, की हसू येतं. गांगुली, द्रविड, सेहवाग, कुंबळे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ज्याचं पोस्टर लहानपणी धोनीनं हट्टानं विकत घेतलेलं असतं, तो सचिन तेंडुलकर... या सर्वांसोबत खेळण्याची, एवढंच नव्हे, तर त्यांचा समावेश असलेल्या टीमचं नेतृत्व करण्याची संधी धोनीला मिळाली. तेव्हा त्याला काय वाटलं, तो या सगळ्यांशी कसा वागला-बोलला हे पाहण्यात प्रेक्षकांना रस होता. केवढं नाट्य आहे या घटनेत! पण या सगळ्या घटना नुकत्याच घडून गेल्यामुळं आणि खुद्द धोनीही वन-डेत का होईना, पण अजून खेळत असल्यानं त्या सर्वांवर काहीही भाष्य करायला त्यांची छाती झाली नसावी. नाही म्हणायला एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये धोनी वरिष्ठ खेळाडूंच्या फिल्डिंगविषयीची आपली मतं स्पष्ट सांगतो आणि आपल्याला हवी तशी टीम मिळत नसेल, तर नेतृत्वही नको असं सांगतो एवढा एक प्रसंग यात आला आहे. २००७ च्या वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाची दारूण स्थिती असताना आणि द्रविडनं कर्णधारपद सोडल्यानंतर आता कुणाला कर्णधार करायचं, यावर खल सुरू असताना सचिननं आपलं मत धोनीच्या पारड्यात टाकलं आणि तसं शरद पवारांना सांगितलं, हे खुद्द पवारांनी अनेक वेळा जाहीररीत्या सांगितलं आहे. मग हा एवढा महत्त्वाचा प्रसंग या सिनेमात का नाही? गांगुली, द्रविड, लक्ष्मण, कुंबळे आणि सचिन या पाच पांडवांविषयी धोनीची मतं काय होती, हे सर्वांनाच ठाऊक आहे. धोनीनं पद्धतशीरपणे एकेकाला संघातून दूर केलं. ज्या गांगुलीनं धोनीला संघात घेतलं आणि कायमच त्याची पाठराखण केली, त्या गांगुलीलाही धोनीनं सोडलं नाही. हा सर्व इतिहास माध्यमांतून नुकताच चर्चिला गेल्यानं सर्वांना माहिती आहे. यात सांगोवांगीच्या काही गोष्टी नसतीलच असं नाही. पण जर त्या तशा असतील, तर स्वतःच्या बायोपिकच्या निमित्तानं त्या वादाला उत्तर देण्याचा प्रयत्न करणं धोनीला शक्य होतं. मात्र, या सिनेमात त्यावरही मौन बाळगण्यात आलं आहे. किंबहुना एक युवराज सोडला, तर अन्य कुठल्याही खेळाडूचं दर्शन का घडविलेलं नाही, हे अनाकलनीय आहे. बाकी प्रत्यक्ष सामन्यांचं चित्रण आणि धोनीच्या जागी सुशांतचा चेहरा चिकटवण्याचं कसब अनेकदा अति झालेलं आहे.
 धोनीच्या आयुष्यात साक्षीच्या आधी आलेल्या प्रियांका नावाच्या तरुणीचा एपिसोड जेवढा मजेशीर आहे, तेवढाच या प्रकरणाचा अंत धक्कादायक. साक्षी आणि माहीची ओळख होते, तो प्रसंगही मजेशीर आहे. नंतर माही तिला भेटण्यासाठी औरंगाबादला येतो आणि तिच्या आणि तिच्या एका मैत्रिणीसह रिक्षानं फिरतो हा भागही मस्त जमलाय. विशेषतः औरंगाबादमधलं सर्व चित्रिकरण पाहून औरंगाबादकर खूश होतील. सिनेमाचा क्लायमॅक्स अर्थातच मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २०११ मध्ये झालेला वर्ल्ड कपचा अंतिम सामना आणि त्यात धोनीनं षटकार मारून भारताला मिळवून दिलेला अविस्मरणीय विजय हाच आहे. किंबहुना याच दृश्यापासून चित्रपटाची सुरुवात होते आणि शेवटही इथंच येऊन होतो...
धोनीच्या वडलांची भूमिका अनुपम खेरनं छान केली आहे. धोनीच्या बॅनर्जी नावाच्या प्रशिक्षकांची भूमिका राजेश शर्मानं झक्कास केली आहे. (क्रीडा चित्रपटांत राजेश शर्माचा चेहरा आता जणू मस्ट झाला आहे.) धोनीच्या बहिणीच्या भूमिकेत भूमिका चावलानं बऱ्याच दिवसांनी दर्शन दिलं आहे. धोनीच्या आयुष्यात आलेल्या प्रियांका आणि साक्षी या दोन तरुणींच्या भूमिका अनुक्रमे दिशा पटणी आणि किआरा अडवानी यांनी चांगल्या केल्या आहेत. किआरा अडवानी विशेष छान.
चित्रपटातील गाणीही चांगली आहेत, पण ती लक्षात मात्र राहिली नाहीत.
क्रीडापटूंवर बायोपिक बनवणं सोपं नाही. विशेषतः तो खेळाडू अद्याप खेळत असेल तर खूपच. पण तरीही नीरज पांडे दिग्दर्शक असल्यामुळं अपेक्षा उंचावतात. हे सर्व लक्षात घेता, हा सिनेमा वन टाइम वॉच ठरतो. धोनीसारख्या खेळाडूचं आयुष्य नक्कीच प्रेरणादायी आहे. पण सिनेमा ते सगळं आयुष्य दाखवत नाही आणि इथंच तो अपुरा वाटतो.
---
दर्जा - तीन स्टार
---

22 Sept 2016

पिंक - रिव्ह्यू

'पिंक' बिफोर यू ॲक्ट...
---------------------------


आपण असं म्हणतो, की ज्याच्याविषयी आदर आहे अशा माणसानं समजावून सांगितलं, तर नीट कळतं. चुकत असेल, तरी अशा माणसानं एक मुस्कटात लगावून सांगितलं, तर डोक्यात कायमचा प्रकाश पडतो.
'पिंक' हा अनिरुद्ध रॉयचौधरीचा नवा हिंदी चित्रपट म्हणजे अशीच आपल्या श्रीमुखात लगावलेली एक सणसणीत चपराक आहे. आणि इथं हे समजावून सांगतोय साक्षात अमिताभ बच्चन. म्हणजे अर्थातच त्यानं साकारलेलं दीपक सहगल हे एका वकिलाचं पात्र. पण अमिताभ बच्चन या व्यक्तिरेखेशी जोडला गेलेला सारा आदर आपोआपच त्या पात्राला लाभतो आणि त्याच्या तोंडून जणू काही हा ज्येष्ठ समाजपुरुषच आपले कान (विशेषतः भरकटलेल्या तरुणाईचे) उपटतोय, असं वाटत राहतं.
इथं मी आता दीपक सहगल न म्हणता अमिताभच म्हणतो. कारण बच्चनचा 'ऑरा' असा काही आहे आणि त्याची इमेज अशी काही 'लार्जर दॅन लाइफ' आहे, की अनेकदा तो साकारत असलेल्या पात्रांनाही हे वलय चिकटतं. कधी कधी हे वलय अनावश्यक व हानीकारक असतं आणि कधी कधी ते फारच उपकारक ठरतं. इथं अमिताभ बच्चन या प्रत्यक्षातल्या व्यक्तीचा समाजमनावर असलेला प्रभाव आणि त्याच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा दबदबा त्यानं साकारलेल्या वकिलाच्या भूमिकेला भलताच पूरक ठरलाय. अशा या अमिताभनं आपल्या खर्जातल्या आवाजात शांतपणे, पण खणखणीतपणे आपल्याला इथं चार गोष्टी सुनावल्या आहेत. अनेक वर्षं मूल्यशिक्षणाचे तास घेऊनही जे कदाचित साध्य होणार नाही, ते इथं त्याच्या दमदार आवाजामुळं सहज साधून गेलं आहे.
अमिताभ सांगतो, जेव्हा एखादी मुलगी 'नाही' म्हणते तेव्हा त्याचा अर्थ 'नाही' असाच असतो. अगदी सोपं आहे हे! इथं ती मुलगी किंवा तरुणी कशाला 'नाही' म्हणतेय हे सांगायची गरज नाही. एखादी तरुणी महानगरात रात्री उशिरा घरी येते, किंवा मैत्रिणींसोबत एकटी राहते, किंवा पार्टीला जाते, किंवा मित्राशी हसून बोलते, किंवा त्याच्या पाठीवर सहज थाप मारते, किंवा हस्तांदोलन करते, किंवा मद्यपान करते किंवा तुमच्यासोबत रात्री डिनरला येते... तेव्हा याचा अर्थ ती कायम तुम्हाला 'उपलब्ध' असते, असं नाही. वास्तविक आता या वास्तवाशी अनेक तरुण जुळवून घेत आहेत. किंबहुना त्यांना याची हळूहळू जाणीव होते आहे, असं म्हणू या. पण तरीही समाजात उच्च सत्तास्थानी असलेले, सरंजामी मानसिकता असलेले आणि अशिक्षित अशा अनेक वर्गांमध्ये मुलींविषयी अजूनही हीच भावना आहे. या भावनेला खतपाणी घालणारी पोलिस यंत्रणा मुलींसाठी आणखीनच बिकट स्थिती निर्माण करते.
'पिंक' हा सिनेमा या सगळ्यांच्या चुकीच्या वागण्याचा पर्दाफाश करतो आणि शेवटी मुलींशी नीट कसं वागलं पाहिजे, याचा 'कायदेशीर' धडाच देतो. यातल्या कथेला नेपथ्य आहे ते दिल्लीचं. 'निर्भया' प्रकरणाचा बॅकड्रॉप निश्चितच दिसतो. दिल्ली हे शहर मुलींसाठी कायमच असुरक्षित गणलं गेलं आहे. त्यामुळं तिथल्या मुलींचा, तरुणींचा लढा अजूनच अवघड आहे. मीनल (तापसी), फलक अली (कीर्ती कुल्हारी) आणि आंद्रेया (आंद्रेया तारिआंग ) या तीन तरुणी दिल्लीत एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत असतात. मीनल दिल्लीतलीच आहे. मात्र, तिचे नाटकाचे प्रयोग वेळी-अवेळी संपतात, याचा घरच्यांना त्रास होऊ नये म्हणून ती बाहेर राहतेय. फलक अली लखनौची आहे आणि दिल्लीत एका मॅगेझिनमध्ये काम करते. तिसरी आंद्रेया ही मेघालयमधली (पण दिल्लीत सरसकट नॉर्थ-ईस्टवाली म्हणून ओळखली जाणारी), ती दिल्लीत एका कंपनीत काम करतेय. पण ती केवळ ईशान्य भारतातील मुलगी असल्याने ती 'तसलीच' असणार, असा भंपक समज तिच्या शहरात जवळपास सगळ्यांचा असतो.
या तीन मुलींपैकी फलकच्या एका मित्राच्या ओळखीतून एका रॉक कॉन्सर्टनंतर या तिघी राजवीर नावाच्या तरुणाचं डिनरचं आमंत्रण स्वीकारतात. हा राजवीर म्हणजे एका प्रभावशाली राजकारण्याचा पुतण्या असतो. राजवीर आणि त्याच्या मित्रासोबत त्या सूरजकुंड येथील एका रिसॉर्टमध्ये जातात. तिथं गेल्यानंतर राजवीर मीनलशी गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न करतो. मीनल त्याला जबरदस्ती करण्यास विरोध करते आणि 'नाही' असं निक्षून सांगते. मात्र, तरीही राजवीर जबरदस्ती करतो, तेव्हा ती जवळचा मद्याची बाटली उचलून त्याच्या डोक्यात मारते. त्याच्या डोळ्याला गंभीर इजा होते. त्यानंतर या तिघी तिथून पळून जातात.
सिनेमा सुरू होतो तो या प्रसंगापासून. तिघीही भयभीत अवस्थेत टॅक्सीतून घरी येतात आणि तिकडे राजवीरला त्याचे मित्र ॲडमिट करतात. काही काळानंतर राजवीर आणि त्याचा एक मित्र या मुलींना, विशेषतः मीनलला धडा शिकवण्याचा विडा उचलतो. दीपक सहगल (अमिताभ) हा वकील या मुलींच्या समोरच राहत असतो. तो रोज मीनलला जॉगिंग ट्रॅकवर पाहत असतो. दीपक सहगलची पत्नी रुग्णशय्येवर असते. त्यानंही वकिली सोडलेली असते. कालांतरानं या मुलींच्या मागे सुरू झालेला त्रास तो पाहतो आणि अखेर त्यांची केस लढविण्याचा निर्णय घेतो.
राजवीर आणि त्याचे मित्र आधी या मुलींच्या मालकावर त्यांनी फ्लॅट सोडून जावे, म्हणून दबाव आणतात. नंतर फलकविषयी विकृत फोटो तयार करून तिच्या संपादकाकडं पाठवतात. त्या संपादकावर वरून दबाव आल्यानंतर तिचीही नोकरी जाते. नंतर त्या पोलिसांत तक्रार करायला जातात, तर त्यांच्याविरुद्धच खुनाचा प्रयत्न केल्याचा उलटा एफआयआर दाखल होतो. मीनलला पोलिस कोठडीत राहावं लागतं. इथं दीपक सहगल मैदानात उतरतो. दुसऱ्या दिवशी तो आपला कोट चढवून फलकच्या दारी येतो, तेव्हा आपल्याही मनगटांत जोर आल्यासारखं जाणवतं.
इथून पुढं उत्तरार्धात खरा न्यायालयीन लढा सुरू होतो आणि तोच या सिनेमाचा हायपॉइंट आहे. दिग्दर्शकानं बाकी तपशिलाचा फापटपसारा आवरून फक्त अशी कृत्ये करणाऱ्यांच्या मानसिकतेचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. राजवीरचा वकील प्रशांत मेहरा (पियूष मिश्रा) या मुलीच कशा बदफैली होत्या, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न सातत्यानं करतो. त्याच्या या संतापजनक आरोपांनी या तिघीही अनेकदा भर कोर्टात पेटून उठतात, संतापतात, ओरडतात, कधी थिजून जातात, जागीच गोठून जातात, अश्रूंना वाट करून देत राहतात... हा कोर्टरूम ड्रामा रंगतो तो दीपक सहगलच्या, अर्थात अमिताभच्या खणखणीत बचावानं. अमिताभचे या वेळचे संवाद अत्यंत प्रभावी आहेत आणि बऱ्याचदा प्रेक्षकांच्या टाळ्या-शिट्ट्या मिळविणारे आहेत. मुलींकडं चुकीच्या नजरेनं पाहणारे, त्यांना सदैव आपल्या मालकी हक्काचा माल मानणारे, त्यांचा कधीही गैरफायदा घेता येईल अशा भ्रमात असणारे अशा सगळ्यांनाच हे संवाद छान खणखणीत तोंडात वाजवतात.
अमिताभ चौऱ्याहत्तराव्या वर्षीही ज्या तडफेनं इथं कोर्टात आपली भूमिका साकारतो, ते पाहून वाटतं, की कुठून येते एवढी ऊर्जा या माणसात! राजवीरची उलटतपासणी घेत असतानाचा प्रसंग या दृष्टीनं पाहण्यासारखा आहे. त्याच्या डोळ्यांतली ती जरब प्रसंगी संपूर्ण देहबोलीत उतरते आणि त्याचा तो खर्जातला, ऑथरेटिव्ह आवाज! दिग्दर्शकाला नेमका संदेश द्यायचाय आणि त्यासाठी त्यानं खुबीनं या प्रसंगांची निवड त्यासाठी केलीय. इथं न्यायव्यवस्थेला साक्षी ठेवून दोन्ही बाजू जणू आपापली शस्त्रं परजत आहेत आणि लढाई लढत आहेत. इथं मुलींची बाजू अर्थातच न्यायाची आहे. याचं कारण त्यांच्यावर झालेला अन्याय आपल्याला ढळढळीतपणे समोर दिसतोय. विशेषतः नंतर त्यांना धडा शिकवण्याची राजवीर व त्याच्या मित्राची भाषा ऐकून हे लोक डोक्यात जातात. यांना कायमचा धडा शिकवायला पाहिजे, असं वाटून मुठी वळू लागतात. नंतर एका प्रसंगात हे लोक एका गाडीतून मीनलचं अपहरण करतात आणि तिला भयानक टॉर्चर करून, तिच्यावर जवळपास बलात्कार करून तिला पुन्हा घराजवळ आणून टाकतात. हा प्रसंग बघताना प्रचंड अस्वस्थ व्हायला झालं. याउप्पर काही बोलू नये, काही लिहू नये... शरमेनं डोकं खाली घालून बसावं... स्वतःच्याच चार तोंडात मारून घ्याव्यात... एवढा तो प्रसंग अंगावर येणारा आणि प्रत्ययकारक झालाय.
तापसी पन्नू ही अभिनेत्रीही लक्षात राहते. खूपच संवेदनशीलतेनं तिनं यातली मीनल साकारली आहे. तापसीकडं यापुढंही लक्ष राहील. कीर्ती कुल्हारी आणि आंद्रिया या दोघींनीही उत्तम कामं केलीयत. राजवीरच्या भूमिकेत अंगद बेदी आणि त्याच्या वकिलाच्या भूमिकेत पियूष मिश्रा यांनी चांगली कामं केली आहेत.
एंड स्क्रोलला मग शेवटी तो सुरुवातीला वर्णन केलेला प्रसंग दिसतो आणि त्या पार्श्वभूमीवर अमिताभच्या आवाजातील
'तू खुद की खोज में निकल,
तू किस लिए हताश है,
तू चल, तेरे वजूद की,

समय को भी तलाश है'
ही कविता ऐकू येते आणि सिनेमा संपतो.
एकूणच हा न चुकवावा असाच अनुभव आहे. हा सिनेमा पाहून देशभरातल्या तरुणांच्या नजरेतील 'पिंक' रंगाची ओळख बदलली तर अजून काय हवं!

----
दर्जा - साडेतीन स्टार
---

20 Sept 2016

रविवार पुरवणीतील लेख - 'ट्विटर'सखा

'ट्विटर'सखा
-----------


एक ट्विटर अकाउंट द्या मज आणुनी, जे मी हँडलीन स्वप्रेमाने...

...सध्या टि्वटरवरून काही मोजक्या नेतेमंडळींनी, मंत्र्यांनी आणि इतर ज्येष्ठांनी जी त्वरित प्रतिसादाची कार्यक्षम चळवळ सुरू केली आहे, ती पाहून प्रत्येक भारतीयाच्या मनात वरीलप्रमाणे (केशवसुतांचे शब्द जरा बदलून) भावना आली नसल्यासच नवल.
याचं ताजं उदाहरण घडलं ते रेल्वेत. भारतीय रेल्वे म्हणजे एक चमत्कार आहे. रेल्वेच्या डब्यात शिरलं, की अखिल भारताचं दर्शन घडतं. अशाच एका रेल्वेत एक टीसी जादा पैसे घेऊन सीट देत होता. आता सर्व प्रवाशांसाठी ही तर अगदी अंगवळणी पडलेली बाब. किंबहुना टीसी पैसे घेऊन सीट देतो, याची खात्री असल्यामुळंच प्रवासी कन्फर्म तिकीट नसतानाही रेल्वेच्या आरक्षित डब्यात शिरतात. तर ते असो. इथं घडलं ते असं, की अशा एका लाचखाऊ टीसीचा फोटो आणि माहिती कुणा प्रवाशानं ट्विटरवर टाकली आणि त्यात थेट रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनाच टॅग केलं. रेल्वेमंत्री त्वरित प्रतिसाद देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पुढच्याच स्टेशनवर रेल्वेमंत्र्यांनी एक तपास पथक या गाडीत पाठवलं. त्यांनी या टीसीला पकडलं आणि तिथल्या तिथं त्याला कामावरून काढल्याचं पत्र दिलं. आता एवढी अचाट कार्यक्षमता म्हणजे फारच झालं की! त्यामुळं लगेच सगळीकडं याच्या बातम्या झाल्या. सुरेश प्रभू हे एक विद्वान, सज्जन आणि अत्यंत कार्यक्षम मंत्री आहेत यात शंका नाही. त्यांनी यापूर्वीही अनेकदा ट्विटरवरील तक्रारींना प्रतिसाद दिला आहे. सुषमा स्वराज याही ट्विटरवर अत्यंत क्रियाशील असलेल्या मंत्री. परदेशात भारतीयांना काहीही अडचण आली, की सुषमा स्वराज त्यांच्या मदतीला धावून जातात आणि त्याचं नेहमीच खूप कौतुकही होतं. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर सध्या निराळ्या कारणांसाठी चर्चेत असले, तरी तेही सामान्यजनांना नेहमीच उपलब्ध असतात आणि अनेकांची कामे मार्गी लावतात, अशीच त्यांची ख्याती आहे. पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान हेही ट्विटरवर क्रियाशील असलेले नेते आहेत. याचं कारण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर असतात आणि त्यांच्या तंत्रकुशलतेचा प्रत्यय सर्वांनीच घेतला आहे. 
ट्विटरवरून थेट नेतेमंडळींकडून असा प्रतिसाद मिळायला लागल्यावर आपण भारतीय लोक गहिवरून येणं अगदी स्वाभाविक आहे. याचं कारण म्हणजे जेवढा नेता वा मंत्री मोठा, तेवढा तो सामान्य माणसासाठी दुर्लभ अशी आपली अनेक वर्षांच्या अनुभवांती खात्री पटली आहे. शिवाय एकदा एखादा नेता मंत्री झाला, की त्याचे हात आभाळाला टेकले अशीच त्याची व आपलीही समजूत होते. साध्या गल्लीतल्या नगरसेवकाचा रुबाब आपण रोजच पाहत असतो. नगरसेवक होण्यापूर्वी सहज चहाच्या टपरीवर गप्पा मारणारा माणूस नंतरच्या पाच वर्षांत कसा चंद्राच्या कलेप्रमाणे बदलत जातो, हेही आपण नेहमी अनुभवत असतो. त्यामुळे नगरसेवकाचा एवढा रुबाब, तर केंद्रीय मंत्र्याचा किती असेल, असं त्रैराशिक मांडून आपण त्याच्या  अनुपलब्धतेची किंवा माजाची किंवा रुबाबाची मनातल्या मनात एक प्रत ठरवत असतो. सामान्य माणसानं सरकारी कार्यालयांचे फक्त खेटेच घालायचे, त्याचा वशिला नसेल तर त्याचे काम होणे कठीण याचा नित्य प्रत्यय येत असल्यामुळे मंत्री वगैरे सामान्य माणसाला थेट उत्तर देतील किंवा त्याचं काम सहजपणे करतील, यावर आपला विश्वासच बसत नाही. त्यामुळंच ट्विटरवर केलेल्या एका पोस्टची दखल थेट केंद्रीय मंत्री घेतात आणि संबंधित माणसावर कारवाई होते, याचं कौतुक वाटणारच. आता हे पाहून अनेक लोक मंत्र्यांना ट्विटरवर फॉलो करू लागतील आणि त्यांच्याकडे तक्रारींचा पाऊस पडेल. किंबहुना आत्ताच हे प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं दिसतं आहे. अमुक एका एक्स्प्रेसमध्ये स्वच्छतागृहांमध्ये वास येतोय ते स्टेशनवर माझ्या बाळाला दूधसुद्धा मिळालेलं नाही इथपर्यंत सर्वच ट्विटर तक्रारी आपण पाहिल्या आहेत. रेल्वेमंत्र्यांनी त्यांना जेव्हा जेव्हा शक्य झालं तेव्हा तेव्हा तत्परतेनं कारवाई केलेली आहेच. 
मुद्दा या कार्यक्षम मंत्र्यांचा नाहीच. कारण हे मंत्रिमहोदय केवळ ट्विटरवरच कार्यक्षम नाहीत, हे सर्वांना माहिती आहे. त्यांनी रेल्वे मंत्रालयात काही मूलभूत सुधारणांना प्रारंभ केला आहे, असं चित्र आहे. त्यामुळं त्यांचा प्रश्नच नाही. मुद्दा आहे तो अन्य मंत्र्यांच्या कार्यक्षमतेचा आणि त्याला जोडूनच किती जनतेकडं ही ट्विटरवरून तक्रार करण्याची सोय आहे, हा! समाजमाध्यमांची शक्ती आता सर्वांना माहिती आहे. त्याचे फायदे-तोटे आपण गेलं संपूर्ण दशक अनुभवत आहोत. समाजमाध्यमांमुळं, विशेषतः स्मार्टफोनमुळं फार मोठा वर्ग आता एकाच लेव्हलवर आला आहे, हेही लक्षात घ्यायला हवं. तरीही ही सुविधा सर्वांपर्यंत पोचली आहे, असं म्हणणं फारच धार्ष्ट्याचं होईल. त्यामुळं सर्व अडचणी या माध्यमातून संपणार नाहीतच. उदा. तेलंगणमधील एका खेडेगावात वर्षानुवर्षं पाण्याची समस्या आहे. टँकरही वेळेवर येत नाही किंवा त्यात भ्रष्टाचार होतोय. अशा वेळी तिथल्या माणसानं पेयजल मंत्र्यांना ट्विट करून ही समस्या सांगितली, तर त्यांच्याकडेही यावर तत्पर उपाय नसेल. एक गोष्ट मात्र ते जरूर करू शकतील. ती म्हणजे संबंधित यंत्रणेवर कारवाई करू शकतील. सामान्य माणसाला दिलासा हवाय तो याच गोष्टीचा. आपण केलेल्या तक्रारीवर कुठं तरी सरकारी यंत्रणा हलतेय याची त्याला खात्री हवी आहे. ट्विटरनं त्याला ही संधी उपलब्ध करून दिली आहे.
अर्थात हे दुधारी शस्त्र आहे, याचीही जाणीव हवी. सामान्य जनतेच्या फायद्याची एखादी सोय उपलब्ध करून दिली, की त्याचा गैरफायदा घेणारे दलाल किंवा तत्सम यंत्रणा लगेचच कशी उभी राहते हे आपण माहितीच्या अधिकाराबाबत बघितलं आहे. या अधिकाराचा गैरवापर करून ब्लॅकमेलिंगचा धंदा करणारे कमी नाहीत. म्हणजे पुन्हा तिथं सामान्य माणूस खऱ्या अर्थानं या अधिकारापासून वंचितच राहिलेला आहे. उद्या समाजमाध्यमांच्या या उपायाचंही असंच होण्याचा धोका मोठा आहे. मंत्री ट्विटरवरून दखल घेऊन कारवाई करतात म्हटल्यावर चुकीच्या किंवा एखाद्याला त्रास देण्यासाठीही तक्रारी केल्या जाण्याची शक्यता आपल्याकडं नाकारता येत नाही. अर्थात अशा तक्रारींची शहानिशा करण्याची काळजी कार्यक्षम मंत्री घेतीलच. पण अशा चुकीच्या तक्रारी करणाऱ्यांनाही काही तरी शिक्षा करण्याची तरतूद केलीच पाहिजे, यात शंका नाही. अन्यथा रोगापेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था व्हायची. 
भारतासारख्या महाकाय देशात वास्तविक या समाजमाध्यमाचा प्लॅटफॉर्म किती तरी चांगल्या गोष्टींसाठी वापरला जाऊ शकतो. सुदैवानं आपले पंतप्रधान तंत्रकौशल्याचं महत्त्व जाणतात. डिजिटल इंडिया किंवा अशा किती तरी घोषणा प्रत्यक्षात आल्यास कारभारातील पारदर्शकता वाढेल. केंद्रीय मंत्रिमंडळ किंवा राज्यांमधील मंत्रिमंडळे जनतेच्या सेवेसाठी आहेत हे भान वाढीला लागेल. जनतेच्या प्रती असलेला प्रतिसादाचा वेळ ('रिस्पॉन्स टाइम') कमी होईल. अर्थात हे करताना जनतेलाही आपल्या कर्तव्यांप्रती जागरूक राहावे लागेल. रेल्वे डब्याचा कोपरा गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी भरायचा आणि दुसरीकडं अस्वच्छतेबद्दल तक्रार करायची असं चालणार नाही. लाच घेणारा गुन्हेगार असतो, तसाच देणाराही असतो. त्यामुळं रेल्वेत ऐन वेळी प्रवास करताना लाच देऊन मी जागा मिळविणार नाही, असा निर्धार आपल्यापैकी सर्वांनीच केला तर? रेल्वे हे एक उदाहरण झालं. आपल्या जगण्यातल्या प्रत्येक घटकाशी भ्रष्टाचार या ना त्या स्वरूपात जोडला गेला आहे. त्यामुळं एरवी भ्रष्टाचारात सामील नसलेल्या सामान्य माणसाला कमालीचं वैफल्य येऊ शकतं. ही वैफल्यग्रस्तता टाळण्यासाठी समाजमाध्यमांचा चांगला उपयोग करून घेता येईल; अन्यथा व्हॉट्सअपवर निरर्थक फॉरवर्ड करणारे काही कमी नाहीत. आदर्श समाजव्यवस्थेत सरकार या यंत्रणेबरोबरच तिच्याकडून सेवा बजावून घेणारी जनताही समान जबाबदार असते. मुळात सरकार म्हणजे वेगळी कुणी यंत्रणा नसतेच. ती एका प्रकारे जनतेचेच प्रातिनिधिक रूप असते. त्यामुळं जबाबदारी दोन्ही घटकांची आहे. आपण आदर्श समाजव्यवस्था नाही आहोत. पण त्या दिशेनं सदैव वाटचाल करायला काय हरकत आहे?
टि्वटरसख्याचाही हाच संदेश आहे.
 ---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे : १ सप्टेंबर २०१६)
----

21 Aug 2016

संवाद पुरवणीतील लेख - ओ काका...


ओ काका...
-------------

हल्ली सार्वजनिक ठिकाणी जायचं मी टाळतो. म्हणजे भीतीच वाटते. ‘आली कुठूनशी साद’ की अक्षरशः दचकायला होतं. कुठं तरी खोल लपून बसावंसं वाटतं. ‘कृतान्तकटकामलध्वजजरा दिसो लागली’ आणि शरद तळवलकरांच्या शब्दांत ‘सकाळी उठल्यावर तोंड कुठपर्यंत धुवायचं’ हे कळेनासं झालंय हे प्रमुख कारण तर झालंच; पण बालवयातच (किंवा ‘अबाल’वयात म्हणा...) ‘काकापद’ मिळाल्यानंतर आता अल्पवयात ‘आजोबा’ होण्याची वेळ येते की काय, हेच त्या भीतीमागचं खरं कारण आहे. पण ही भीती केवळ अस्मादिकांनाच आहे, असं समजण्याचं कारण नाही. आज समाजात असे हजारो अकाली काका आणि काकू अस्वस्थपणे आणि उद्विग्न मनानं सर्वत्र संचार करीत आहेत. ‘एखाद्याचा मामा करणं’ हे माहिती होतं; पण ‘एखाद्याचा काका करणं’ हे नवीनच आम्ही ऐकतो आहोत. एक वेळ काका होणंही परडवलं; पण एखादी अविवाहिता, नवयौवना, मृगनयना रसिकमोहिनी अशी सार्वजनिकरीत्या अचानक ‘काकू’ होते, तेव्हा तर धरणी दुभंगून पोटात घेईल तर बरं, असं तिला वाटल्याखेरीज कसं राहील? (येथे सदरहू विचार मनात येणारी तरुणी पुण्यातली असल्यानं धरणीनं दुभंगून ॲक्चुअली तिला असं काकू म्हणणाऱ्याला पोटात घ्यायचं असतं, हा सूक्ष्म पोटभेद जिज्ञासूंनी लक्षात ठेवावा.)
या काकापुराणाचा इतिहास फार प्राचीन आहे. काका हे प्रस्थ मोठंच आहे. काकास्पर्श झाल्यानं अनेक आत्मे ऐहिक जगात प्रगतीची परमावधी गाठून राहिले आहेत, हे सर्व मान्यच आहे. तेव्हा काका होण्यासही अस्मादिकांची काडीमात्र हरकत नाही. पण जेव्हा कुणीही म्हणजे अगदी आपल्यापेक्षा लहान वयाचं माणूस आपल्याला काका किंवा काकू म्हणतं, तेव्हा मात्र ‘काका (म्हणण्यापासून), मला वाचवा’ असाच आर्त टाहो फोडावासा वाटतो. अलीकडं हे फारच वाढलं आहे. बसस्टॉप म्हणू नका, मॉल म्हणू नका, सिनेमा हॉल म्हणू नका... जिथे जिथे ओ काकाचा गजर! वाईट याचं वाटतं, की आपल्याला हे हाकारे घालणारे सगळे पुतणे किंवा पुतण्या आपल्यापेक्षा किमान वीस वर्षांनी तरी मोठे असतात. चाळिशीच्या माणसाला दहा वर्षांच्या मुलानं किंवा मुलीनं काका म्हटलं तर काहीच अडचण नाही हो! पण जेव्हा तिशीतल्या बस कंडक्टरला पन्नाशीतली सुगृहिणी ‘ओ काका, तिकीट द्या हो’ असं म्हणते, तेव्हा काय करावे! आणि हे दृश्य अस्मादिकांनी याचि देही याचि डोळा पाहिलेलं आहे. खरं तर केवळ याच कारणासाठी अनेकांना ही सार्वजनिक कामं करायला नकोशी वाटतात. कधी आपले ‘सार्वजनिक काका’ होतील, याचा नेम नसतो. अनेकदा आपण सार्वजनिक समारंभांत सजून-धजून उभे असतो. आपलं लग्न होऊन मारे दहा वर्षं उलटली, तरी नव्या नवऱ्याच्या रुबाबात तिथं व्यासपीठावर उभे असतो. अशा वेळी नेमकी त्या आख्ख्या हॉलचं लक्ष वेधून घेणारी एखादी नवतरुणी येते आणि तोंडात मारल्यासारखी आपल्याला ‘काका’ म्हणून जाते. कृपया हे लक्षात घ्या, की आमच्यापेक्षा निम्म्या वयाच्या या मुलीमध्ये आता आम्हाला काडीचाहीतसा’ रस नसतो. (आम्ही आमच्या वयाच्या कॅटॅगरीतच लक्ष ठेवून असतो.) पण तरी आम्हाला सगळ्यांसमोर या कन्येनं काका का म्हणावं? या मुलीला तिथल्या तिथं मावशीआज्जी म्हटलं तर चालेल का?
असे अनेक मानहानीचे प्रसंग सोसत अस्मादिकांसारखे कित्येक दुःखी जीव या आसमंतात जगत आहेत. अकारण लादलेल्या काकापणाचं ओझं सहन करीत आहेत. पुरुषांसारखीच अवस्था अकाली काकूपण सोसायला लागलेल्या आमच्या भगिनींची होत असणार, याविषयी शंका नाही. या पुण्यनगरीत तर अनेक बालकांना लहानपणीच प्रशिक्षित केले जाते, की कुठल्याही अनोळखी माणसाला काका व कुठल्याही अनोळखी महिलेस काकू म्हणावयाचे. यावर आमचा हृदयभेदी सवाल आहे, की पण का? काका? कुठल्या काकूंनी काढले हे नियम? त्यांना कुणी भाऊ-वडील वगैरे कुणी नव्हते? अहो, तिशीतल्या तारुण्याच्या हेलपाटणाऱ्या तारूवर आपले उरलेसुरले अवसान शिडागत सांभाळणाऱ्या आमच्यासारख्या नवप्रौढांना अचानक काकापदाच्या पाताळी ढकलण्याची ही पाताळयंत्री कल्पना कोणत्या काकांच्या डोक्यातून प्रथम बाहेर आली असेल? काय वाटलं असेल त्या आत्म्याला, जेव्हा त्यानं एखाद्या पंचविशीतल्या घोडम्या तरुणाच्या वा एखाद्या तिशीतल्या विवाहितेच्या तोंडून प्रथम ‘काका’ हे संबोधन ऐकले असेल? काही विचार? आपले दिवस भरले एवढा एकच नैराश्यवादी विचार त्याच्या मनात प्रकट होऊन, त्या चिंतेपायी त्याच्या माथ्यावरचे उरलेसुरले केसही गळून पडले नसतील काय? त्या परिस्थितीत तो खरोखर काका म्हणण्यास पात्र होतोही; पण त्याची इच्छा नसताना त्यास या नव्या नात्याचा दागिना का म्हणून बक्षीस द्यावयाचा?
सार्वजनिक ठिकाणी कोणास काय म्हणायचे याचे आपले पूर्वापार संकेत आता काय उपयोगाचे आहेत? कुठल्याही दोन व्यक्तींमध्ये कसलाही बंध निर्माण व्हायला लागला, की उठसूठ त्यास प्रस्थापित नात्यांच्या मुसक्या बांधून आवळून टाकायचे ही आपल्याकडील रीतच होऊन गेली आहे. बंध वगैरे सोडा, पण नंतर कधीही संबंध येणार नाही, असे लोक जेव्हा सार्वजनिक ठिकाणी भेटतात तेव्हाही त्यांना एकमेकांना संबोधण्यासाठी काही अधिक चांगले व उभयपक्षी सन्मान्य वाटेल, असे संबोधन आपल्याला अजूनही सापडत नाही, यास काय म्हणावे! काकाला दादा हा एक पर्याय आहे, पण तेच एखाद्या मुलीने म्हटलं, की पुन्हा चेहरा पंक्चर झालाच म्हणून समजा. तेव्हा दादा, भाऊ, भाई इ. सर्व पर्याय बादच ठरतात. पूर्वी सिनेमातल्या नायिका नायक पहिल्यांदा भेटला, तर त्याला ‘अहो मिस्टर, दिसत नाही का?’ असं काही तरी म्हणायच्या. हल्ली कोण कुणाला मिस्टर वगैरे म्हणणार? त्यामुळं तोही पर्याय बाद. थोडक्यात, आपल्याकडं असं अधलंमधलं व्यवस्थित संबोधनच नसल्याचा हा परिणाम आहे. काय करावे?
इथं लक्षात घेण्यासारखा मुद्दा असा, की आपले कितीही वय झाले, तरी आपण अद्याप तरुणच असल्याचा दावा सगळ्यांचा असतो. स्त्रियांना हे अधिक लागू आहे. त्यामुळेच स्त्रीचे वय २५ च्या पुढं कधीच वाढत नाही, असं म्हटलं जातं. पण पुरुषांनाही अगदी असंच वाटतं, हे त्यांना अकाली काका करणाऱ्या समस्त काकवांना कळायला हवं. आता यावर कुणी असं म्हणेल, की तुम्ही दिसताच काकाछाप... त्याला कोण काय करणार? तर हा मुद्दा बरोबर आहे. काका दिसू नये, यासाठी आम्ही पुरुषांनीही प्रयत्न केलेच पाहिजेत. सुटलेलं पोट, अजागळ कपडे आणि डोईवरचं उडत चाललेलं छप्पर असा अवतार असेल तर स्वर्गातली रंभा वा ऊर्वशीही तुम्हाला ‘काका’ म्हटल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडं एकूणच व्यक्तिमत्त्वाची जोपासना वगैरे प्रकार पूर्वीपासूनच ऑप्शनला टाकलेले असल्यामुळं पुरुषांकडून काही होईल, याची शक्यता नाही. पण तरी जमल्यास करून बघा. काका म्हणणारी शेजारची १८ वर्षांची तरुणी अचानक तुम्हाला ‘हाय मि. अमुकतमुक (इथं ज्यानं त्यानं आपापलं नाव घालावं)’ असं म्हणेलसुद्धा.
हल्ली सोशल मीडियावर वैयक्तिक बोलायची सोय असल्यानं तिथं हे अवडंबर बऱ्यापैकी गळून पडतं आणि अनौपचारिक आणि कम्फर्टेबल नात्यांचे बंध तयार होतात. मर्यादा शेवटी सगळीकडंच पाळायची असल्यानं ती सांभाळणाऱ्याला ही नवी नातीही छान जतन करता येतात आणि त्यातून आनंदनिर्मितीच्या अपरिमित शक्यता तयार होतात. सार्वजनिक जीवनात हा मोकळेपणा आपल्याकडं यायला अजून काही वर्षं जावी लागतील. तोपर्यंत किमान उठसूट कुणालाही काका किंवा काकू म्हणू नये, एवढं भान तरी आपल्या आजूबाजूला मोकाट सुटलेल्या पुतणे-पुतण्यांनी पाळावं ही अपेक्षा गैर ठरू नये.
बरोबर ना काका, बरोबर ना काकू!
---

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणी, पुणे आवृत्ती - दि. २१ ऑगस्ट २०१६
)
---

12 Aug 2016

वायझेड - रिव्ह्यू

'निरामय' जगण्याची 'वायझेड' गोष्ट
-----------------------------------------
समीर विद्वांस दिग्दर्शित आणि क्षितिज पटवर्धन लिखित 'वायझेड' हा नवा मराठी चित्रपट म्हणजे, सिनेमातल्याच टर्म्सचा वापर करून सांगायचं, तर 'निरामय' जगण्याची एक 'वायझेड' गोष्ट आहे. लहानाचं मोठं होत जाताना हातातून वाळूसारख्या निसटलेल्या क्षणांची ही गोष्ट आहे. आपल्यातल्या लहान मुलाची आणि अकाली पोक्त झालेल्या वास्तव जगण्यातल्या आपली झालेली 'वायझेड' अवस्था सांगणारी ही गोष्ट आहे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या नातेसंबंधांची आणि त्याकडे निकोप दृष्टीनं पाहता येण्याची ही 'निरामय' गोष्ट आहे. थोडक्यात, चुकवू नये असाच हा सिनेमा आहे.
समीर विद्वांस आणि क्षितिज पटवर्धन या दोघांचंही आधीचं काम, मग ते नाटकांतलं असो किंवा सिनेमांतलं, आश्वासक आहे. या दोघाही 'भावां'चा विषय 'खोल' असल्याची साक्ष पटवणारं आहे. अशा वेळी मग पुढच्या कलाकृतीकडून जाणकार प्रेक्षकाच्या अपेक्षा वाढतात. समीर आणि क्षितिज दोघंही या अपेक्षांच्या कसोटीला उतरले आहेत, असं म्हणता येईल. 'वायझेड'मधून त्यांनी अशीच हसता हसता अंतर्मुख करायला लावणारी झक्कास गोष्ट सांगितली आहे.
गोष्टीचा नायक गजानन कुलकर्णी (सागर देशमुख) हा वाईमधला ३३ वर्षांचा प्राध्यापक. नाकासमोर चालणारा, काहीसा गबाळा किंवा वेंधळा असा. अजून त्याचं लग्न झालेलं नाही किंवा त्याच्या आयुष्यात अद्याप कुणी स्त्रीही आलेली नाही. अशा या गजानन उर्फ 'अबब'ला अचानक सहा महिन्यांसाठी पुण्याला जावं लागतं. पुण्याला मावशीकडं जाऊन राहिलेल्या गजाननचं सगळं विश्वच पुण्यात आल्यावर बदलून जातं. वाईतल्या सुरक्षित, छोट्याशा जगातून तो एका महानगरात येऊन पुरता बावरतो. इथं त्याला कॉलेजमध्ये शिकणारा श्यामकुमार पारिजातक उर्फ 'बत्तीस' (अक्षय टांकसाळे) भेटतो. साध्याभोळ्या गजाननला जगण्यासाठी आवश्यक असा 'वायझेड' अटिट्यूड तो शिकवतो. पुढं त्याच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक तीन स्त्रिया येतात. या तिघी जणींमुळं आपल्या नायकात जो काही बदल होतो त्याचा गमतीदार प्रवास सांगणारी ही गोष्ट आहे.
समीर आणि क्षितिजच्या या सिनेमाची भट्टी जमून येण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांचं पेपरवर्क उत्तम असतं आणि हे सिनेमा पाहताना जाणवतं. दुसरं म्हणजे क्षितिजचे तडतडीत संवाद.... हे संवाद प्रेक्षकाला सिनेमाच्या गोष्टीत आत खेचून घेतात. तिसरं म्हणजे कास्टिंग. प्रमुख आणि लहान भूमिकांसाठीही अगदी परफेक्ट कास्टिंग असेल, तर गोष्ट रंगायला वेळ लागत नाही. हल्ली साधारण सिनेमे दोन ते सव्वादोन तासांचे असतात. हा सिनेमा अडीच तासांचा आहे. पण बोअर होण्यासारखे क्षण फार क्वचित येतात. सिनेमाचा पहिला भाग गजाननचा वाई ते पुणे हा प्रवास आणि त्याचा वेंधळेपणा दाखवण्यात खर्ची पडला आहे. पण हा सर्व प्रवास निश्चित कुठे तरी एक दिशा धरून सुरू आहे हेही जाणवत राहतं. पहिल्या भागात 'बत्तीस'च्या व्यक्तिरेखेला जरा जास्त फुटेज दिलं गेलं आहे. ते किंवा 'ओ काका'सारखं गाणं अनावश्यक वाटतं. पण व्यापक ऑडियन्स डोळ्यांसमोर ठेवून हे केलं असणार. अर्थात त्यामुळं मूळ कथाप्रवाहात फार अडथळे येत नाहीत. 'बत्तीस'चा आगाऊपणा हा नायकाला उपकारक ठरणार असल्यानं आपण खपवून घेतो. अन्यथा अशी पात्रं प्रेक्षकांच्या डोक्यात जाण्याची शक्यता असते. इथं ती धूसर सीमारेषा दिग्दर्शकानं व्यवस्थित पाळली आहे, हे समीर विद्वांस यांचं कौशल्य!
क्षितिजची पटकथा घट्ट असतेच, पण ती कायमच कंटेंपररीही असते. हा लेखक आजच्या तरुणाईची भाषा बोलतो, आजच्या तरुणाईच्या संवेदना मांडतो. आजच्या गुंतागुंतीच्या जगण्यातले व्यामिश्र ताणेबाणे नेमके उकलून दाखवतो. जुन्या, म्हणजे मोबाइलपूर्व काळाशी जोडणारा एक धागाही त्यानं जपून ठेवला आहे, हे जाणवतं. हे सगळं आज पस्तीस-चाळिशीत असलेल्या प्रेक्षकाला जोडणारं आहे. त्याला सुखावणारं आहे. या काळाचा कनेक्ट नसलेला प्रेक्षक कदाचित या गोष्टीमधल्या 'बिटवीन द लाइन्स' वाचू शकणार नाही. त्यामुळंच 'वायझेड' हा कदाचित सर्व प्रेक्षकांसाठी नाही. असलीच तर ही एकच त्रुटी त्यात दिसते.
बाकी आधी म्हटल्याप्रमाणं सिनेमाचं कास्टिंग उत्तम. सागर देशमुख आणि अक्षय टांकसाळे हे दोघंही (माझ्या माहितीनुसार) प्रथमच सिनेमाच्या पडद्यावर झळकले असावेत. दोघेही नाटकातले कलाकार. मात्र, सिनेमाच्या माध्यमात त्यांना चपखलपणे बसवण्याची किमया दिग्दर्शकाची. मूळचे नाटकवाले असल्यानं सागर आणि अक्षय यांना अभिनय, संवादफेक, देहबोली यांची उत्तम जाण आहे आणि सिनेमात ते जाणवतं. मराठी सिनेमा हा बऱ्याच वेळा 'बोलपट'च असतो आणि नाटकातील अभिनेत्यांच्या ते पथ्यावर पडतं, हेही आहेच. याशिवाय सई ताम्हणकर आणि पर्ण पेठे या सिनेमाच्या नायिका. (तिसरी मुक्ता बर्वे, पण ती जवळपास पाहुण्या भूमिकेत असल्यासारखी शेवटच्या अर्ध्या तासात येते.) सईला सोज्वळ भूमिकेत दाखवून दिग्दर्शकानं फारच धारिष्ट्य दाखवलंय. गमतीचा भाग सोडला, तर सईनं ही भूमिका छानच केली आहे. तिनं अशा नॉनग्लॅमरस भूमिका यापूर्वीही (उदा. अनुमती) केल्या आहेतच. पर्ण पेठे ही सध्याच्या नव्या नायिकांपैकी आश्वासक चेहरा आहे. ती आजच्या काळातली तरुणी आहे आणि कॉन्फिडंट व अट्यिट्यूड असलेल्या पिढीची प्रतिनिधी आहे. सिनेमातली तिची भूमिकाही अशाच व्यक्तिरेखेची आहे आणि त्यामुळं तिनं ती फारच सहजी साकारली आहे. मुक्ता बर्वे अगदी थोड्या काळासाठीही आपल्या अस्तित्वानं पडदा उजळवून टाकते. यातही ती लांबीनं थोड्या, पण महत्त्वाच्या भूमिकेत आहे आणि ती पडद्यावर आल्यापासून सिनेमाचाही पोत बदलतो.
यातली गाणीही धमाल आहेत. 'ओ काका' हे गाणं एरवी नुसतं ऐकायला धम्मालच आहे आणि ते हिट झालंही आहे. 'प्रियकरा' हे केतकी माटेगावकर व स्वप्नील बांदोडकरनं गायलेलं संस्कृत गाणं 'अबब' आहे. ते पडद्यावर सागर आणि पर्ण यांनी फारच रोमँटिक सादर केलं आहे. हे गाणं या सिनेमाचा एक 'यूएसपी' ठरणार, असं वाटतं. 'अरे कृष्णा, अरे कान्हा'पासून 'मीचि मज व्यालो' या संत तुकारामांच्या रचनेपर्यंत सर्व गाण्यांची निवड आणि वापर समीर व क्षितिज यांची कल्पकता दाखवणारा आहे.
हवा, खवा आणि धुव्वा यांची मजा अनुभवायची असेल, तर 'वायझेड' होऊन हा सिनेमा पाहण्याला पर्याय नाही.

---
दर्जा - चार स्टार
---